भारांच्या जगात... ४

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
13 Aug 2018 - 1:12 am

भारांच्या जगात... ४

उडती छबकडी- भा. रा. भागवत

उडती छबकडी- भा. रा. भागवत

उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता. आणि ही त्या काळातील गोष्ट ज्यावेळेस विज्ञानकथा आपल्या साहित्याला नवीन होत्या.
ह्या संग्रहात एकूण ७ कथा आहेत.

.

पैकी धिक्‌ काल यान! ही कालप्रवासाला धरून आहे आणि उत्तम प्रकारे खुलवलेली आहे. बाकी कल्पना ह्या अंतरिक्ष प्रवास, परग्रहवासीयांचे आगमन आणि त्याभोवती फिरणार्‍या कल्पना, अडथळे आणि रोमांच यांना धरून आहे.

उडती छबकडी ही कथा एका गृहस्थाचे आपल्या पत्नीवर असणारे प्रेम पण मनात त्यांच्या ठेंगण्या ठुसक्या बायकोला एकदम सडपातळ आणि आकर्षक असण्याची सुप्त इच्छा यावर आहे. यात ते अंतरिक्ष प्रवासाला निघतात न्‌ एका परग्रहावर असणार्‍या स्लीम ट्रीम छबकडीवर यांचे आणि छबकडीचे यांच्यावर मन जडते आणि पुढे जी धमाल उडते ती मजा औरच!
धिक्‌ काल यानात एका गरीब शास्त्रज्ञ मित्राला एक पैसेवाला आपली मेलेली बायको परत आणण्यासाठी तो बनवत असलेल्या कालयंत्रासाठी आर्थिक मदत करतो आणि यानातून जो प्रवास करतो त्या प्रवासाची अजब कहाणी आहे.

मंगळावर स्वारी ही सरळ सरळ त्यांची पहिली अंतराळकथा. नावाप्रमाणेच ती अंतरिक्षप्रवासाशी निगडीत आहे.

बाकी गुरुचा प्रसाद व सूर्याची पिल्ले ह्या मला आता नीटश्या आठवत नसल्यामुळे सांगताना गफलत होईल पण दोन्ही कथेत अंतराळ प्रवास आहेच पण एका कथेत एक शास्त्रज्ञ एका महिलेला जॉबवर घेतो आणि जवळपास तिला किडनॅप करून पृथ्वीचा विनाश होणार असतो त्याला गृहित धरून पृथ्वीवरून निघून दुसर्‍या ग्रहावर राहायला जायचे ठरवतो. यात यान प्रवास आणि इतर गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट एका शास्त्रज्ञाचीच आहे ज्यात तो एका माणसाला बेशुद्ध करून स्वत:बरोबर मंगळ प्रवासाला घेतो आणि वाटेत तो त्याला त्याची कर्मकहाणी सांगतो. ज्यात त्याने आपल्या बुद्धीने अधू असलेल्या मुलीला आधीच एका यानात पहिल्या मंगळ प्रवासाला पाठवलेले असते. आणि यात कालभ्रमणात ते वाट चुकून दुसर्‍याच ग्रहावर येतात आणि त्याच्या मुलीला भेटतात जी जिवंत आणि आश्चर्यकारक रित्या नीट देखील झालेली असते. पुढे काय होते, हे त्या कथेतच अनुभवणे योग्य राहील.

टंगळ मंगळ या कथेत एक माणूस आपल्या मंगला नावाच्या पत्नीला गमावून बसलेला असतो आणि त्याची गाठभेट एका महिला शास्त्रज्ञाशी होते जिचे नाव सुमंगला टंगळ असते. ते एका ग्रहाच्या प्रवासाला निघतात. ह्यात एक प्रकाश/ हवेचा बोगदा अश्या प्रकरची संकल्पना वापरली आहे जी एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहाला जोडलेला असतो. ह्यात त्यांना आलेले विलक्षण अनुभव आहेत.

आणि शेवटची गोरटिल्ला ही एक मोकाट सुटलेला परग्रहवासी एका तरुणीच्या प्रियकराचे अपहरण करतो आणि त्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल करत तिच्या घरात राहायला सुरुवात करतो.

उड्डाणापूर्वी

वर प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे ह्या सर्व कथांमध्ये एक प्रकारचा वेडेपणा आहे, जो भारा त्यांच्या पद्धतीतच मिस्किलपणे मांडतात. आणि हे सर्व होताना ह्या कथांची बांधणी विज्ञानकथेच्या स्वरुपातच होत आहे ना याची पुरेपूर भान ठेवतात.

कालप्रवास, अंतरिक्ष प्रवास, दुसर्‍या ग्रहावरील लोक, आणि इतर वैज्ञानिक माहिती ते कुठेही संथ अथवा बोजड भाषेत न देता आपल्या मिश्किल शैलीत खुलवून सांगतात. त्यातल्या प्रोटोन , न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनसाठी जे मराठी शब्द वापरलेले आहेत ते देखील त्या काळानुसारच उदा. प्रतानू, नतनू (इलेक्ट्रॉनसाठीचा शब्द विसरलो.)

बाकी भारा हे बी.ए. झाले असले तरी त्यांचा विज्ञानकथेचा आवाका हा अचंबित करण्यासारखा आहे. ह्यात त्यांची कुशाग्र बुद्धी आणि विपुल आणि चांगले वाचन कामी येते. आणि पुस्तकाच्या शेवटी भारांचा त्या काळचा फोटो पण आहे, जो आपण कदाचित न पाहिल्याची शक्यता गृहित धरून मी तो देत आहे.
भा. रा. भागवत

बाकी भारांच्या अजून मिळणार्‍या पुस्तकांबद्दल मी सांगेनच. दरम्यान तुम्हाला जर कुठल्या भारांच्या पुस्तकाचा परिचय करून देता आला तर तो मलादेखील वाचायला आवडेल.

आज मात्र इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद!

ता.क.- मी भागवतांची खालील पुस्तके खूप आशेने आणि मेहनतीने शोधत आहे. मिळाल्यास कृपया मला देऊ शकत असाल तर नक्की संपर्क साधा. पुस्तकाचा योग्य तो मोबदला अथवा बदल्यात कुठले पुस्तक हवे असल्यास नक्की कळवा, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. (संपर्क- +९१ ८९५६८ ६८३३२)
१. मायापूरचे रंगेल राक्षस- लाखाणी बुक डेपो
२. मुक्काम शेंडेनक्षत्र- लाखाणी बुक डेपो
३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो
४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो
५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो
६. किल्ल्यातील कारस्थान-लाखाणी बुक डेपो
७. उडती छबकडी- भारतीय ग्रंथ भवन
८. माझा विक्रम
९. वैतागवनातील वाफारे
१०. चिन्याचा चिन्याचा जमालगोटा
११. भटकबहाद्दर
१२. हिंमतवान जासूद- (लाखाणी बुक डेपो-बहुतेक)
१३. सगळं सगळं ठीक होतं- मॅजेस्टिक बुक डेपो
१४. अंतराळात अग्निबाण- मॅजेस्टिक बुक डेपो
१५. तोरणा कुणी जिंकला
१६. खरा खजिना
१७. काश्याची काशियात्रा
१८. लाख मांजरी
१९. अलकनंदा आणि जादूगार जिम
२०. समुद्र सैतान- लाखाणी बुक डेपो
२१. सफरचंद-लाखाणी बुक डेपो
२२. शाळेतली भुताटकी- मॅजेस्टिक बुक डेपो
२३. वनस्पतींचा जादूगार- मॅजेस्टिक बुक डेपो
२४. पबुताईच्या गोष्टी- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२६.निळा मासा- नाग विदर्भ प्रकाशन
२७. एक चमत्कारिक रात्र- नाग विदर्भ प्रकाशन

ह्या लेखप्रपंचाचे आणखी दुवे

१. सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत.
२. भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत
३. मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत

वाङ्मयकथाआस्वादलेखमाहितीसंदर्भचौकशी

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

14 Aug 2018 - 5:08 pm | सिरुसेरि

छान ओळख . हे पुस्तक बहुतेक करुन आता फक्त वाचनालयांमधेच मिळु शकेल .

अजिंक्य विश्वास's picture

15 Aug 2018 - 9:36 pm | अजिंक्य विश्वास

हो. खरे आहे तुमचे. पण मध्ये उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी याची आवृत्ती काढली होती. आता आऊट ऑफ प्रिंट आहे असे सांगत आहेत पण अश्या त्यांची 'आऊट ऑफ प्रिंट' झालेली
मायापूरचे रंगेल राक्षस, जंगलबुकातील दंगल आणि त्या दंगलीतील दोन पोरे, गडावरचा खजिना, मुक्काम शेंडेनक्षत्र ही त्यांच्या दुकानात खूप मागितल्यावर आणि जोशीबुवा नसताना मिळाली, आणि ती ही जास्त प्रती घेतल्या तरच. माझ्याकडे सध्या ह्या पुस्तकांच्या ५-१० प्रती आल्या त्यामुळे. आता नागफणी, झपाटलेला प्रवासी आणि उडती छबकडी मिळत आहे का ह्या साठी मस्का मारणे चालू आहे