२००० ? ८८ ? २१ वे शतक ? ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Jul 2018 - 3:44 pm

* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत.
*** नमनाला घडाभर, अस्मादिकांचा एक अनुभव ***
एका आफ्रीकन देशातील एका आफ्रीकन कंपनीच्या ऑफीस मध्ये एक आफ्रीकन स्त्री, एक बिझनेस डील पूर्ण होतो. तोंडी आदेश निघतात, कागदपत्रांची पुर्तता करण्यात स्टाफ गर्क होतो, चहाची पण ऑर्डर होते. बिझनेस मिटींग मध्ये हाच मधला थोडासा वेळ बिझनेस शिवाय चर्चा - (सहसा अविवाद्य कारण बाकी मिटींगचा उद्देश औपचारीकच असतो) -होण्याची शक्यता असते, तसे इथेही झाले . पण समोरच्या मॅडमनी चक्क डायरेक्ट अस्मादिकांच्या धर्मालाच हात घातला !

आर यू अ हिंदू - तुम्ही हिंदू आहात का ? ,
येस व्हेरी मच - होय अगदी ;
हाऊ डू यू (हिंदूज) बिलीव इन सो मेनि गॉड्स ? हाऊ मेनी गॉड्स डू यू युवरसेल्फ बिलीव्ह ईन ? हिंदू धर्मात एवढ्या सगळ्या देवांमध्ये विश्वास कसा ठेवतात आणि तुमचा स्वतःचा किती देवांवर विश्वास आहे ?

जेव्हा माणसांची लोकसंख्या जेव्हा लाखात होती तेव्हा देवांची संख्या अब्जावधी होती आणि आता लोकसंख्या अब्जात आहे तर देवांची संख्या किती ट्रिलीयन आहे ते मला मोजता येणे कठीण आहे :)) माझ्या उत्तरावर समोरच्या आफ्रीकन देवी पण हसल्या .

तुमचं उत्तर ईतर हिंदूंपेक्षा वेगळ दिसतय , तुम्ही हे नेमक कस मोजताय ?

माणसे पृथ्वीतलावर आली आणि सृष्टी निर्मात्याचा विचार करावयास लागली तेव्हा पासून प्रत्येकाच्या कल्पनेतला इश्वर थोडा थोडा वेगळा असतो आणि बरेच लोक इश्वराचे अस्तीत्व असंख्य ठिकाणी असंख्य कल्पना आणि संकल्पनात अनुभवतात त्यावरुन तुमच्यासाठी मोजण्याचा प्रयत्न करुन पाहीला :) आणि त्या नंतर प्रत्येक चांगल्या गोष्टीशी / संकल्पना आणि चांगल्या अनुभवांशी ईश्वरास जोडून घेण्याचे कसे प्रयत्न करतात ते विवीध उदाहरणे देऊन मॅडमना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जातवर्णादी प्रश्नांवर शंकासमाधान केले. मी काय शंका समाधान केले त्या बद्दल वाद घालण्यास ईतर कुणि येणार नव्हते त्यामुळे हे शंका समाधान करणे माझ्यासाठी सोपे होते. उदारमतवादी भूमिका मांडणे सहसा सोपेच असते आणि उदारमतवादी भूमिका कोणत्याही धर्माच्या बाजूनी मांडल्या तरी सहज पटवता येतात तसे हिंदू धर्मीय उदार भूमिका मी समोरच्या मॅडमना पहिल्या दहा पंधरा मिनीटात सहज पटवून बसलो होतो. त्यांचा पुढचा प्रश्न अधिक अनपेक्षीत आणि अधिक पेचात टाकणारा होता.

समजा मला हिंदू व्हायचय काय करावे लागेल ?

काहीच विशेष नाही, तुम्ही एक चांगल्या ख्रिश्चन राहूनही चांगल्या हिंदू असू शकता ! ( आता हे उत्तर कर्मठ परंपरावाद्यांना पटणे अवघड जाईल कल्पना आहे - पण माझ्या खापर खापर पुर्वजांनी हिंदू होण्यासाठी काय विशेष केले होते ?) आणि मग हे उत्तर त्या मॅडमना सविस्तर समजावून दिले. तेही त्यांना आवडलेच . पण त्या मॅडमनाही माझी आणखी परीक्षा बघावयाची असावी,

मला हिंदू मंदिर बघणे आवडेल, (आता एवढ्यावर थांबलेतर बरे ना !) स्थानिक अमुक मंदिरे तुम्ही दाखवू शकाल का ?

हिंदू धर्माची बाहेर देशात जाऊन केलेल्या चर्चेत सकारात्म्क प्रतिमा उभी करणे सोपे होते. बाई अधिकृतपणे हिंदू धर्मात घेण्यासाठी फारच मागे लागल्या तर, हरेरामा हरे कृष्णा किंवा आर्यसमाजींकडे जाण्यास सांगून तेही करता येईल. पण स्थानिक अमुक मंदिरे दाखवता येतील का ? त्यांच्या देशातली स्थानिक अमुक मंदिरे बहुधा गुज्जू समाजाची होती , स्थानिक गुज्जू मंदिराचा पुजारी वर्ग किती मनमोकळा आहे आणि गैर- हिंदूंना मंदिरात घेऊन गेले तर त्यांचा काय रिस्पॉन्स राहील याची मला काहीच कल्पना नाही. मी त्या परक्या देशात केवळ एक व्हिजीटर माझ्या स्थानिक गुज्जू पुरोहीतांशी ओळखी असण्याचाही प्रश्न नव्हता. स्पष्ट नाही म्हणावे तर औचित्याला धरून होत नाही आणि इकडे आपले लोक परधर्मीयांच्या मंदिर प्रवेशाला कसे वागतील ते सांगता येत नाही. बरे देश त्यांचा म्हणजे आफ्रीकनांचा आणि त्यांच्या देशात त्यांना हिंदू मंदिरात डिस्क्रीमिनेट केले जाऊ शकणार नाही हे मला ठामपणे माहित असणे शक्य नव्हते. ती वेळ, ' हो अगदी जाऊयात का नाही ' असे म्हणत पण प्रत्यक्षात न जाता मारुन नेली, पण खात्री देऊ शकत नाही या बद्दल आत माझेच मन मला खात राहीले. केवळ मी नव्हे, माझ्या कल्पनेतला जोपासलेला सकारात्मक हिंदू धर्मही माझ्या सोबत, एका इश्वरीय परीक्षेत नक्कीच अनुत्तीर्ण होत होता.

असे नाहीए की मी परंपरावाद्यांना मंदिर प्रवेशाच्या मुद्यावर कंन्व्हीन्स करु शकणार नाही - तसे नंतर प्रवासा दरम्यान एक दोन विरोधात असणार्या युपी मंदिर पुजार्‍यांना यशस्वी पणे कन्वीन्स केले ही, कारण ईश्वरापुढे असमानता भेदभाव असणे शक्य नाही पाळणे योग्य नाही हे पटवण्यास फार बुद्धीमत्ता लागते असे नाही. पण रविंद्रनाथा टागोरांनी डेड हॅबीट्सना कवटाळर्‍ञांबद्दल , माझ्या देश बांधवांना जागे कर अशी आळवणी केली. आणि तशी आळवणी त्यांना का करावी लागली नसेल ? पुरीच्या जगन्नाथ मंदिरात सोबतच्यांना घेऊन प्रवेश न मिळालेल्यांमध्ये रविंद्रनाथ टागोरांचाही समावेश होतो म्हणे (चुभूदेघे) .

ओमान मध्ये बरेच पुर्वी पासून एक शिवमंदिर आहे. शक्यता नाही पण समजा मोदीजी आप मंदिर मे जा रहे है चले हम भी आपके साथ दर्शन करने चलते है म्हणून ओमानचा सुल्तान चुकून अचानक म्हणालाच तर मोदीं नेमके काय करतील ? किंवा जपानच्या पंतप्रधानांना मोदींनी गीता भेट दिली , आता जपानचे पंतप्रधान म्हणाले की तुमचे ओडीसाचे जगन्नाथ मंदिराबाबत खूप ऐकलय चला मी येतो मंदिर दर्शनाला तर मोदींनी काय उत्तर द्यावे ? किंवा एकगाव एक मंदिर प्रचार करणार्‍या सरसंघचालकांना कोणी अमुक एका मंदिरात घेऊन चला अशी इतर धर्मीयाने गळ घातली तर सरसंघचालकांकडे काय उत्तर असेल ? त्या आफ्रीकन देशातील गुज्जू पुजार्‍यांनी माझे ऐकले असते का ते देवालाच माहित.
*** विषय ओळख समाप्त धाग्याचा विषय असलेल्या मुख्य बातम्या पुढे ***

महाराष्ट्रात सुमारे ८८ वर्षापूर्वी दलितांसाठीचा आधूनिककालिन पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला . त्या नंतर काळाच्या ओघात बर्‍याच मंदिरांची कवाडे उघडली. खालील चित्रात तेलंगाणातील एक पुजारी सि.एस. रंगराजन एका दलितांच्या समुहास एका चर्चेत देवा समोर सर्व जण कसे समान आहेत आणि दोन हजार वर्षापुर्वी लोकसारंग नावाच्या ऋषीने आपल्या इतर वर्णीयांना आपल्या खांद्यावरुन मंदिरात नेऊन प्रदक्षिणा कशी घातली हे सांगितले . तुम्ही तसे कराल का म्हणून कुणि म्हणाले तर मुनि वाहन सेवा म्हणून आनंदाने दलितास आपल्या खांद्यावरुन घेऊन प्रदक्षिणा घातली. एप्रिल २०१८

muni vahan seva

हिंदू धर्माच्या सुरवातीच्या विकास काळातच संत मुनी असमानता बाळगणारे असते तर हिंदू धर्मात सध्या एवढे काय मुठभरही माणसे असली असती का या बद्दल रास्त शंका वाटते. ईश्वरापुढील समानता समजणारे समजावून देणारे उदारमतवादी हिंदू धर्मातही राहत आले असतील म्हणूनच अनेक समुहांनी स्वतःस वेगवेगळ्या काळात हिंदू धर्माशी जोडून घेतले असेल. पण प्रत्येक धर्मात जसे उदार मतवादी असतात तसे संकुचितही असतात. त्या संकुचित भूमिकांच्या लोकांचा काही एक वाटा देवाने, एक चॅलेंज म्हणून हिंदू धर्मासही वाटून दिला असावा . नाही तर जगन्नाथ पुरीच्या मंदिरात भारताच्या राष्ट्रपती आणि पत्नींना सर्व समान वागणूक न मिळता खुपणारी वागणूक मिळण्याची बातमी आली नसती. तसे महामहीम रामनाथ कोविंदांनी या विषयाचा बाऊ केला नाही. कलेक्टरला रितसर माहिती दिली . मंदिर कमिटीत विषय चर्चीला गेला फाईल क्लोज झाली पण मंदिर कमिटीत झालेल्या विषयाचे मिनीट तीन साडेतीन महिन्यानंतर पत्रकारासमोर येण्याचे देवाच्या मनात असावे त्यामुळे मार्च २०१८ मध्ये घडलेल्या बातमीला जून २०१८ च्या शेवटी तोंड फुटले, कारण बहुधा वेगळ्या कारणाने म्हणजे परधर्मीयांच्या प्रवेशावरुन पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालया समोर आला ती बातमी कव्हर करण्यासाठी कदाचित पत्रकार मंडळींची पावले जगन्नाथ पुरी मंदिराकडे वळली असावीत . सध्या परधर्मीयांच्या मंदिर प्रवेशा बाबत स्वतः सर्वोच्च न्यायालयही पेचात असावे (कारण मागच्या तलाक निर्णयातला एक अप्रत्यक्ष फॉल आऊट म्हणजे धर्म स्वातंत्र्य भारतीय घटनेत मुलभूत असल्याचे दोन न्यायाधिशांनी अधोरेखीत केले ) त्यामुळे पुरीच्या मंदिर प्रशासनाकडे बिच्चार्‍या सर्वोच्च न्यायालयास परधर्मीयांच्या प्रवेशा बद्दल विनंतीचा सूर लावावा लागलाय - तिथली रथ यात्रा पहाण्यास बरेच विदेशी पाहुणे येतात त्यांना रथ यात्रा पहाता येते मंदिर प्रवेश मिळण्यास अडचणी येतात असा काही इश्यु असण्याची शक्यता असावी (चुभूदेघे). पोषाख आणि इतर काहीअटी टाकून प्रवेश देता येतो का यावर विचार करावा असे काहीसे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचे दिसते. परंपरवादी भूमिकांच्या बातम्या हम है के मानते नही ! खरच २१ व शतक चालू आहे ? (खरे म्हणजे पारसीं सारखे अपवाद सोडले तर बहुतेक धर्मात छोट्या मोठ्या पोशाख डोक्यावर कापटे, हातपाय धुणे इत्यादी अटी टाकून त्यांच्या प्रार्थना स्थळात इतर धर्मीयांना प्रवेश असतो, हिंदूंच्या ही अनेक मंदिरात असा प्रवेश नाकारला जात नाही पण नाकारला जाणार नाही याची गॅरंटीही नसते. जो पर्यंत कुणिही तुमच्या धर्मस्थळात येऊन आदर पुर्वक वागते आणि तुम्हाला नको असलेले धर्मांतराचे मुर्ती भंजनाचे प्रयत्न करत नाही सर्वसामान्य भाविका प्रमाने वागते तेव्हा त्यांना नाकारण्याचे तत्वतः काही कारण रहावयास नको उलट कमीत कमी प्रक्रीयेने नव्या लोकांना तुमच्या धर्म पद्धती अनुभवण्याची संधी मिळते अनायसे प्रसार आणि जाहीरातच होते)
(हिच नाही याच ओरीसतली दलितांना प्रवेश नाकारणारी अजूनही दुसर्‍या मंदिरांबाबतची अलिकडील बातमी दिसते आहे)

सगळीकडे असेच वागतात असेही म्हणायचे नाही विविध परदेशी पाहुणे ज्या मंदिरात प्रवेश दिला जातो तिथे भेटी देऊन जातातही. पण पुरी सारख्या संकुचिततेच्या प्रदर्शनाच्या बातम्या सकारात्मक विश्वास निर्माण करण्यात कमी पडतातच त्या पेक्षा महत्वाचे टिकाकारांसाठी आयत्या संधी असतात. आणि टिकारारांनीनी रास्त टिका का करु नयेत ?

सगळेच वाईट आहे प्रगती नाहीच असे म्हणावयाचे नाही, राहुल गांधींनी मंदिरांना भेटी दिल्या आई वडलांच्या धर्माचे विषय काढून बहुतेक ठिकाणी आडवणूक झालेली नसावी; डि एम केचे राजपूत्र एम.के. स्टालीन तिरुचीच्या स्रिरंगम मंदिराच्या बाजुस आले - मंदिरात गेले नाहीत तरीही त्यांना बाहेर जाऊन आमंत्रण देण्याचे सौजन्य मंदिर प्रशासनाने दाखवले.

trichur temple

अलिकडे एक हिंदू परंपरावादी नेते म्हणालेत. आम्ही उदारतेतेत कट्टर आहोत. त्या उदारतेचा मंदिर प्रवेशाच्या बाबतीत सार्वत्रिक सुखद अनुभव यावा यासाठी त्यांचे अनुयायी आणि अनुयायी नसलेले हिंदू काय करतात ते काळाच्या ओघात कळेलच. चुभूदेगे. असो.

* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत.

* धाग्याच्या मुद्द्यास धरुन रहावे. चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट वाकडे कसे अशा प्रकारचे प्रतिसाद बर्‍याचदा देण्याचा बर्‍याच जणांना मोह होतो असे मोह टाळण्यासाठी सुद्धा आभार.

संदर्भ

* What Is This ‘Muni Vahana Seva’ By A Telangana Priest All About?
* Supreme Court asks Jagannath Temple administration if it can allow entry of non-Hindus

* Priest denies President Kovind's harassment at Jagannath Temple in Puri

* OPINION | The Jagannath Temple Incident Shows That the Socially Ruling Class Can Nudge Even the President

* Madurai Miracle’ ensured equality of worshippers

* DMK working president M K Stalin on Friday accepted the honours given by priests of the Sri Ranganathaswamy temple, but declined their invitation to enter the temple.
* Temple entry movement Carrying Dalits on shoulders in AP

*

धर्मइतिहाससमाजमाध्यमवेधअनुभव