"ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू... उद्या सांच्याला आपल्या घरला!" शंकऱ्याने तळहातावरील तंबाखूवर थापा मारल्या व इतरांपुढे तंबाखूचा हात पसरीत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.
***************************************************************************************
रात्री आठला मिरवणुकीत नाचून झाल्यावर अंगावरचा गुलाल झटकीत चौघे पाव्हण्यासोबत घराकडे आले. हातपाय धुऊन झाल्यावर अंगणात अंथरलेल्या भल्यामोठ्या सतरंजीवर पाय पसरून इतर जमलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा सुरू झाल्या. स्वयंपाकाची लगबग सुरू होती. छपरातून घरात, घरातून छपरात अशी घरातल्या सुगरणीची नुसती धावपळ चालली होती. यथावकाश अंगणात छपराकडच्या बाजूला जेवणाच्या पंगती बसायला सुरूवात झाली. आग्रहाने वाढणे, पळीतून रस्सा कमी करून नुसत्या मटणाच्या बोटक्या ताटात जबरदस्तीने टाकणे वगैरे रात्री उशीरापर्यंत चाललं. गडीमाणसांची जेवणं उरकल्यावर बायकांनी वाढून घेतल व हसण्या-खिदळण्यात त्यांचेही जेवण आटोपलं. पाहुण्यांपैकी काही हौशींनी पत्त्याचा डाव मांडला आणि सकाळपर्यंत जागायचा बेत पक्का केला.
पहाटेच्या लगबगीत केव्हातरी शंकऱ्याच्या पाव्हण्यांनी या चौकडीची आंघोळीची व्यवस्था लावली. सकाळचे चहापाणी उरकताच शंकऱ्याचे पाव्हणे चौघांना व जत्रेनिमीत्त घरी आलेल्या इतर पाहुण्यांना घेऊन गावात कुस्ती बघण्यासाठी निघाले.
गावातल्या ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर एक भलामोठा वडाचा पार होता... एवढा मोठा की, अर्ध गाव त्याच्या सावलीखाली आरामात बसू शकेल. त्याच्याच थोडंसं पुढे जिथे गावातले माध्यमिक विद्यालय होते त्याच्या आणि ग्रामपंचायत ऑफिसच्या बरोबर मध्ये कुस्तीचा फड रंगला होता. मोठ्यांच्या कुस्त्या सुरू करण्या अगोदर आणि पुरेशी गर्दी जमण्याआधी, आतापर्यंत जमलेल्या लोकांची करमणूक म्हणून गावातल्या लहान लहान पोरांच्या कुस्त्या सुरू होत्या. साधारण, उभी राहायला शिकलेली बाळं ते पंधराएक वर्षे अशा वयोगटातील मुले त्या मातीत लोळून मौजमजा करीत होती. कोणी मुद्दामच मातीत लोटांगण घालत होते. कुणी ओरडून दंगा करत होते तर कुणा पोरांचे हौशी बाप पोरांच्या मागे उभा राहून जोरजोराने ओरडून त्यांना कुस्तीतले डाव सांगत होते.
पान-चुना-तंबाखू घेऊन सर्वजण कुस्तीच्या ठिकाणी येऊन पोचले. पारावरच शंकऱ्याने जागा मिळविली आणि सर्वजण पाराच्या कडेलाच पाय खाली सोडून बसले. हळूहळू गर्दी वाढू लागली आणि फडाच्या सभोवती लोकं दाटीवाटीने बसली. पारावर बसलेल्यांना खाली उतरून जायची पंचाईत होईल अशा रांगा त्या पाराच्या खाली चिकटून बसल्या.
कुस्त्या सुरु झाल्या. गावातला पैलवान असला की पब्लिक खूष होऊन जायचं आणि एकच जल्लोष करायचं. मध्येच एखाद्या नवख्या पैलवानाला घेऊन त्याचा वस्ताद रिंगणात घेऊन यायचा आणि ओळख सांगून झाल्यावर आलेल्या पैलवानांना आव्हान द्यायचा. मग एकाचवेळी चार-चार पैलवान उठायचे आणि पंचाची पंचाईत व्हायची. मग शक्यतो गावातल्या पैलवानांना प्राधान्य दिलं जायचं आणि उरलेले हातात माती घेऊन, हात चोळत खाली बसायचे. काही कुस्त्या निकाली लागत होत्या. काही कुस्त्या बरोबरीत सोडवल्या जात होत्या. विजयी पैलवान बक्षीस घेऊन फडाला गोल चक्कर मारून माती फडातली माती कपाळाला लावून बाहेर पडत होते. काही कुस्त्या इतक्या कंटाळवाण्या असायच्या की लोकं शिव्या घालायला चालू करायचे की मग ती कुस्ती पंचाकडून लगेचच बरोबरीत सोडवली जायची. काही विशेष कुस्त्यांमध्ये हरलेल्या पैलवानालाही लोक टाळ्यांचा गजर करायचे. किती नोटा आणि नाणी उधळली गेली त्याची तर गणतीच नव्हती.
दत्ताची चुळबूळ सुरु झाली. शंकऱ्याने विचारलं तर म्हणाला, "काय मजा यीना गड्या! मी आन इन्या जातु जरा वड्यात बसून येतु." तसे शंकऱ्याचे पाव्हणे म्हणाले, "पाव्हणं, अजून गावातला शिवा पैलवान बगाया नाय तुम्ही. त्याची कुस्ती बगाय तर लांबनं लांबनं लोक येत्यात. किती येळा तर बरुबरीचा पैलवान न्हाय म्हणून त्याला डबल बिदागी मिळल्याली हाय." तसा दत्ता गालात हसला, शंकऱ्याकडे बघून म्हणाला, "शंकरशेट, पावन्यानला येकदा सांग म्या बगितल्याली कुस्ती, तवर मी जरा येतोच जाऊन, चल रं इन्या" असं म्हणून दत्ताने पारावरून खाली उडी मारली आणि पाठोपाठ विनोदनेही. दोघे बसलेल्या लोकांच्या पाठीवर हात ठेऊन कुणाचा हात-पाय चुकवत तर कुणाच्या अंगावरून उड्या मारीत वाकत वाकत बाहेर निघाले तेवढ्यात अचानक गर्दीचा आवाज शांत झाल्यासारखा वाटला आणि पाठोपाठ लाऊडस्पीकर गरजला.
क्रमश:
प्रतिक्रिया
2 Jun 2017 - 3:03 pm | प्रचेतस
जबराट.
पुढचा भाग लवकर येउ दे.
5 Jun 2017 - 12:28 pm | एस
लय भारी. होऊन जाऊद्या!
5 Jun 2017 - 1:30 pm | सुखी
बरोबर वेळेला तोडलीत
5 Jun 2017 - 4:08 pm | बापू नारू
पुढचा भाग येउद्या लवकर
5 Jun 2017 - 11:45 pm | रातराणी
पुभाप्र! मस्त रंगलीये कथा!
6 Jun 2017 - 2:32 am | अमितदादा
मस्तच ...शैली आवडली..
6 Jun 2017 - 7:18 am | कंजूस
**पाव्हणं, अजून गावातला शिवा पैलवान बगाया नाय तुम्ही. **
येऊ द्या लवकर.
11 Jun 2017 - 10:16 pm | असंका
सुरेख!!!
पुभाप्र...