सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी.
खासगी नोकरीला निवृत्तीचं वय नसतं.गुरूनाथ सारखे, वेळ जावा म्हणून किंवा कार्यक्षम रहाण्यासाठी काम करत असतात.शरीर थकत असतं हे अशावेळी जाणवत नाही.बाहेरचे अवयव उदा.डोळे, कान, हातपाय,जोपर्यंत कुठलीच कुरकुर न करता कामात येतात तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असं वाटत असतं.पण शरीरातल्या आतल्या अवयवांचं काय? उदा.किडनी,लिव्हर,पोट,आतडं,मेंदू वगैरे.
ह्या आतल्या अवयवात होणारे लहान सहान फरक त्या त्या क्षणी द्द्ष्टोत्पतीस येत नाहीत.वयोमानपरत्वे त्या फरकांचं ओझं वाढत असतं.आणि एखाद दिवशी,हे एकाएकी काय होतंय?असं वाटायला लागतं.पण ते एकएकी कधीच झालेलं नसतं.हे फार उशीरा कळतं.
सांगण्याचा उद्देश असा की,गुरूनाथच्या वागणूकीत हळूहळू होत असलेला फरक सुम्याच्या ध्यानात येत होता.सकाळी उठल्यावर नेहमी प्रमाणे सोनचाफ्याच्या फुलांची परडी तो सुम्याला नेऊन द्यायचा.पण कधी कधी आणखी एकदा तसं तो करायचा.सुम्या त्याला आठवण करून द्यायची की,ही दुसरी परडी आणून दिलीस.पण ते तो मानायचा नाही.मग सुम्या त्याला सकाळी परडीतून आणलेली ताजी फुलं आपण देवाला आणि स्वतःच्या नवर्याच्या फोटोला घातली हे दाखवून द्यायची.त्याशिवाय तिने माळलेलं डोक्यातलं सोनचाफ्याचं ताजं फुल ही ती मागे वळून त्याला दाखवायची.
खरंतर,नवरा गेल्यानंतर बाई डोक्यात फुलं माळीत नाही.कपाळाला कुंकू लावीत नाही. अशा समजूतीची सुम्या होती.पण सुम्याच्या मुलीने आणि गुरूनाथने तिला तसं न करण्याबद्दल समजावून सांगीतलं होतं.एव्हडंच नाही तर सुम्याची मुलगी तिला एकदा म्हणाली होती की,आपले बाबासुद्धा अशा जुनाट विचाराचे नव्हेत.तू जर का असं केलंस तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच दुःख होईल.सुम्याच्या मुलीने तिच्या बाबांच्या विचाराचं दिलेलं विवरण आणि गुरूकाकाचंही सांगणं विचारात घेऊन सुम्या कपाळावर कुंकू आणि डोक्यात फुलं माळायला तयार झाली होती.
माणसाने समजूतदार असावं.काळाबरोबर परंपरात होणारा बदल स्वीकृत करावा.आपल्या जवळच्यानी केलेली एखाद्या रुढीची मीमांसा समजवून घेऊन त्यांना आनंद होत असेल तर ती आपल्या आचरणात आणावी.अशा प्रकारचे उपदेश वजा सल्ले सुम्याचा नवरा तिला नेहमी द्यायचा.त्यावेळी तिला तिच्या नवर्याची तीव्र आठवण आली होती.
सुम्याने दाखवलेलं अगोदरच माळलेलं सुम्याच्या डोक्यातलं ताजं सोनचाफ्याचं फुल पाहून गुरूनाथ स्वतःच्या वेंधळेपणाचं प्रथम कौतुक करायचा.कामाच्या धांदलीत असं होत असेल किंवा सुम्यावरच्या लहानपणातल्या प्रेमाच्या आतुरलेल्या सवयीचे पडसाद असावेत अशी समजूत करून घ्यायचा.अशा तर्हेच्या निरनीराळ्या घटनांचं दर्शन चलाख सुम्याच्या नजरेतून अव्हेरलं गेलं नाही.
एकदा तर तो जेवला असतानाही आपण जेवलो नाही असं म्हणून सुम्याशी वाद घालत होता.
सुम्याने हा प्रकार आपल्या मुलीच्या कानावर घातला.सुम्याची मुलगी सुम्यासारखीच चलाख होती.तिने आपल्या आईला सागीतलं की,गुरूकाकाची ही सारी लक्षणं म्हणजे On set of Dementia असावा.(कोकणात ह्या व्याधीला "बाळां" म्हणतात.एमक्या एमक्याक साठी लागल्यामुळे "बाळां"लागला असां म्हणतत.)
सुम्या खूपच दुःखी झाली.सगळं करून गुरूनाथच्याच मागे असली दुःख का येतात ह्याची तिला विवंचना लागली.
मागे एकदा सुख-दुःखाबाबत तिच्या नवर्याशी विवेचन करीत असताना तो तिला म्हणाला होता ते आठवलं.सुख आणि दुःख कायमची नसतात.त्यावर ती त्याला म्हणाल्याचं आठवतं की गुरूनाथच्या कपाळी मात्र दुःखच आहे.ते विवेचन तिला सध्याच्या गुरूनाथच्या परिस्थितीची जाणीव होऊन आठवलं.
गुरूकाकाला ह्या गोष्टीची जाणीव नकरता केवळ चेंजसाठी म्हणून मुंबईला घेऊन ये म्हणजे आपण इकडे त्याला अलझायमर स्पेशालीस्टला दाखवू या. असं सुम्याच्या मुलीने एकदा सुम्याला फोनवर सांगीतलं.पुढे काही दिवसानी तसं केलं गेलं.सुम्याला आणि तिच्या मुलीला,गुरूनाथच्या नकळत,त्या केसची माहिती देऊन ,त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे त्या स्पेशालीस्टने समजावून सांगीतलं.
एक प्रकारच्या प्रोटीनचा पातळ थर मेंदूच्या अगदी वरच्या भागावर जमतो.त्याचं प्रेशर येऊन खालच्या मेमरीवर ताण आणला जातो.काही लोकेशन्स तुटतात काही पुस्सट होतात आणि त्यामुळे विसरभोळेपणा येतो.अर्थात हे त्या स्पेशालीस्टने ढोबळ माहिती देऊन सांगीतलं.नाहीतर हा रोग आणि त्याच्यावरचा अभ्यास फारच गहन आहे.
एरव्हीच्या व्यवहारात गुरूनाथ तसा नॉर्मल वाटायचा.सुम्याच्या आणि त्याच्या लहानपणीच्या आठवणी तो रंगवून सांगायचा.सुम्याला फावल्या वेळात अशा जुन्या आठवणीवर गुरूनाथशी चर्चा करून खूप आनंद व्हायचा.ती सर्व काळज्या विसरून जायची.पण नकळत तिच्या मनावर परिणाम झालेलाही दिसायचा.सुम्याला लो ब्लड प्रेशर होतं.कधीतरी तिला चक्कर आल्यासारखीही वाटायची.गुरूनाथ तिला फार्मसीतून औषधं आणून द्यायचा.
एकदा ती गुरूनाथशी बोलता बोलता चक्कर येऊन पडली.गुरूनाथ खूप भांबावला.
तिला त्याने हलकेच उचलून तिच्या पलंगावर आणून झोपवलं.डॉक्टरानी तिला संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगीतलं. गुरूनाथने एका बाईला आणून तिची सुश्रुशा करायला सांगीतलं.त्यापलीकडे जाऊन गुरूनाथ तिची सेवा करायचा.
नशिबाचे फांसे म्हणा किंवा नियतीची इच्छा म्हणा कसं असतं ते पहा.आज बिचारी सुम्या,आई -वडीला विना,स्वतःची मुलगी असून ती दूर,अशावेळी शेजार्याकडून देखभाल करून घेण्याचा योगायोग तिला आला.पण एकच त्यात समाधानीचा किरण होता.हा शेजारी असातसा शेजारी नव्हता.लहान वयात ज्याच्याशी प्रेम केलं होतं,प्रणय केला होता त्याच्याशी लग्न करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घ्यायचं नशि्ब नव्हतं.तरीसुद्धा अशा तर्हेने जोडीदाराचंच सुख मिळण्याचा योगायोग तिच्या नशिबी होता.
गुरूनाथने सुम्याच्या मुलीला फोनवरून सुम्याची खुशाली कळवली.सुम्याबद्दल झालेली घटना त्याने तिला समजावून सांगीतली.ती काळजीत पडली.गुरूकाका आणि आपली आई आता आयुष्याच्या अशा पायरीवर येऊन ठेपले आहेत की आपला सहवास त्यांना ह्यावेळी मिळाला नाही तर वडीलांच्या निधनाच्या वेळी झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते आणि कसलाही विचार आपल्याला माफ करू शकणार नाही.विचारविनीमय करण्यासाठी कोकणात येत आहे असं आईला तिने सांगीतलं.
खूप दिवसानी मुलीची भेट होणार म्हणून सुम्या थोडी सुखावली.गुरूनाथ करीत असलेल्या तिच्या सेवेचा विचार करून अंथरूणावर विश्रांती घेत पडली असताना एकदिवस तिला तिचं लहानपण आठवलं. लहानपणचा गुरूनाथ आठवला.आणि ती मनात गुणगुणत होती,
चाँद मिलता नहीं सबको सँसार में
है दिया ही बहुत रोशनी के लिए
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)