सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ६)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 8:02 am

सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी

सुम्या आणि तिच्या नवर्‍याला कोकणात रहायला येऊन बराच काळ निघून गेला.सुरवाती सुरवातीला गुरूनाथ आपल्या घरात एकटाच खाणावळीतून डबा आणून जेवायचा.खरं म्हणजे सुम्याने त्याला आल्या आल्या सांगीतलं होतं की तू आमच्या बरोबरोबर जेव म्हणून.पण गुरूनाथला ते अवघड वाटायचं.
नंतर गुरूनाथ एकदा आजारी पडला.सहाजीकच सुम्या आणि तिचा नवरा त्याची देखभाल करायचे.करता करता त्यालाही कळून चुकलं की,बरं झाल्यावर आपण आपला एकट्याचा डाबा आणून जेवणं तेव्हडं योग्य दिसणार नाही.

तेव्हा तो त्यांना म्हणाला,आपल्या तिघांचं जेवण आपण खाणावळीतूनच आणूया.नाहीतरी सुम्याला ह्या वयात दोघांसाठी तरी जेवण करण्याची मेहनत कशासाठी.त्याचा विचार त्या दोघांना पटला.कधीतरी सणावारा दिवशी म्हणून सुम्या खास डिश घरी करायची.बाकी रोजचे व्यवहार चालू रहायचे.सकाळी उठल्यावर आंघोळ करून झाल्यावर गुरूनाथ सोनचाफ्याची फुलं,फुलाची परडीत घालून, त्यांना नेऊन द्यायचा.काही फुलं आपल्या आईवडीलांच्या फोटोला वहायचा.
त्यांच्या खास द्विवशी फुलांचा हार करून त्यांच्या फोटोला वहायचा.

सुम्याच्या मुलीचा मुंबईहून अधून मधून फोन यायचा.त्यांची खूशाली विचारली जायची.गुरूकाकाबद्दल चौकशी करायला ती चुकायची नाही.त्यांचा सर्वांचा बराच घरोबा जमला होता.असं हे सर्व चाललं होतं.

बरेच वेळा सुम्याचा नवरा आपल्या प्रकृतीबद्दल कुरकुर करायचा.त्यांचे दोन्ही पाय सुजायचे.मुंबईला जाऊन एकदा त्यांची सर्व प्रकृती चेक-अप करून घ्यावी असा सुम्याने आपल्या नवर्‍याजवळ प्रस्ताव मांडला.त्या दोघांनी गुरूनाथचा सल्ला घेतला.तो ही त्यांच्या विचाराशी सहमत झाला.सुम्याने आपल्या मुलीला कळवलं.तिने मुंबईला ताबडतोब यायची सुचना केली.

वडीलांच्या प्रकृतीची तपासणी करून डॉकटरनी सांगीतलं की त्यांना सीव्हीअर डायबीटीस आहे.तो जर त्यांनी कंट्रोल केला नाही तर त्यांच्या प्रकृतीला निश्चीतच त्रास होईल.तो कंट्रोलमधे ठेवण्यासाठी त्यांनी औषध लिहून दिलीच त्याशिवाय त्याला पथ्य पाळायला सांगीतलं.

सुम्याची मुलगी आपल्या आईवडीलांना म्हणाली की हे ओल्ड-मिडील-एजचे प्रॉबलेम आहेत.प्रकृतीसाठी नेहमी सादर राहिले पाहिजे.तसं आम्ही करूं असं कबूल करून ती दोघं परत कोकणात रहायला गेली. सुरवातीला वडील आपल्या प्रकृतीची शिस्तीने काळजी घ्यायचे.नंतर पुन्हा कधीतरी त्यांना त्रास व्हायला लागला.मुलीला परत आपल्यापासून त्रास नको म्हणून मुंबईला पुन्हा जायचा विचार त्यांनी टाळला आणि अंगावर काढलं.खरं तर मुलीने त्यांचा त्रास होतं असं कधीही भासवून दिलं नव्हतं.
शेवटी व्हायचं तेच झालं.
त्यांना पायाच्या सुजेमुळे चालायला कठीण व्हायला लागलं.

मुलगी रागवेल म्हणून तिला वेळीच कळवायचं त्यांनी टाळलं.सुम्याने नवर्‍र्‍याची खूप सेवा केली. गुरूनाथसुद्धा औषधं वगैरे वेळेवर घेऊन यायचा.पण काही उपयोग झाला नाही.एकदा त्याच्या शरीरात साखर खूप वाढली.तो भोवळ येऊन पडला.डॉकटर बोलवे पर्यंत तो गेला.

कामाच्या धांदलीत सुम्याच्या मुलीचं आईवडीलांची कसून चौकशी करण्यात दुर्लक्ष झालं.सर्व ठीक असणार अशा समजूतीत ती राहिली.पण ज्यावेळी वडीलांच्या दु:खद निधनाचा फोन तिला आला,तेव्हा तिला खरोखरच धक्का बसला.ती आहे तशीच कोकणात आली.आईला पाहून तिला सहाजीकच खूप दु:ख झालं.थोडे दिवस तिला गुरूकाकांच्या देखरेखेखाली ठेवून मुलीने परत कोकणात येऊन आईला मुंबईला घेऊन जाण्याचा विचार केला.

त्याप्रमाणे ती एकदिवस मुंबईहून कोकणात येऊन आईला घेऊन गेली.गुरूनाथ इकडे कोकणात एकटा पडला.सुम्याचा मुंबईला नातवाईच्या संगतीत राहून वेळ कसा जात होता कळत नव्हतं.नवर्‍याची मधूनमधून आठवण येत असायची.नवर्‍याचे शब्द तिला आठवायचे.आयुष्य म्हणजे योगायोग.उद्या काय होईल हे कुणालाच ठाऊक नसतं.सुम्याच्या मुलीचा कंपनीच्या कामात पुरा वेळ जायचा.आपली आई आपल्या सहवासात आहे हे पाहून तिला बरं वाटायचं.

एक वर्ष उलटून गेल्यावर सुम्याला मुंबईचा कंटाळा यायला लागला.कोकणातल्या घराची तिला आठवण यायची.गुरूनाथ एकटाच असतो याचही तिला बरं वाटत नसायचं.
नवर्‍याचे शेवटचे दिवस जिथे गेले तिथेच आपण जावं. आपलं ही तिकडेच बरंवाईट व्हावं असं तिला वरचेवर वाटायचं.

एकदा सुम्याने आपल्या मुलीकडे कोकणात जाण्याचा विषय काढला.वर्षभर राहून कंटाळली असेल तेव्हा आईने कोकणात थोडा बदल म्हणून जावं.गुरूकाका तिकडे असल्याने तिला आईची तेव्हडी काळजी करायला नको असंही वाटायचं.थोड्या दिवसाठी जाणार असशील तर मी तुला कोकणात सोडून येते ह्या बोलीवर सुम्याला तिची मुलगी घेऊन गेली.सध्यातर जाऊया थोड्या दिवसासाठी,पुढचं मग बघुया ह्या विचाराने सुम्या कोकणात गेली.

गुरूनाथला नक्कीच खूप आनंद झाला.तिच्या देखभालासाठी सुम्याच्या मुलीने एक बाई ठेवली होती. गुरूनाथने खाणावळीतून जेवणाची सोय केली होती.कोकणाच्या वातावरणात सुम्याचा वेळ मजेत जात होता.तिच्या मुलीचा नियमीत फोन यायचा.तिची चौकशी व्हायची.वडीलांच्यावेळेला आपल्याकडून चौकशीला हयगय झाली हे लक्षात ठेऊन ती आपल्या आईची आणि गुरूकाकाची अगदी नियमीत चौकशी करीत असायची.

गुरूनाथ आपल्या फार्मसीच्या कामात दिवसा दंग असायचा.संध्याकाळी आल्यावर सुम्याकडे जाऊन गप्पा गोष्टीत वेळ घालवायचा.जुन्या लहानपणाच्या आठवणी काढीत असायचे,नंतर शिक्षणासाठी दोघंही दुसर्‍या शहरात गेली होती त्यावेळच्या आयुष्याचा आठवणी काढीत असायचे.सुम्याचं लग्न झाल्यावर,गुरूनाथ आपल्या एकट्या आयुष्यातल्या दिवसांची आठवणी सांगून,गप्पा मारून दोघंही वेळ घालवीत असत.

म्हातारपणाची चाहूल लागू लागल्यानंतर दोघही एकमेकांच्या प्रकृतीची काळजी घेत असत.सुम्याची मुलगी मधून कधीतरी कोकणात येऊन त्यांना कंपनी देत असे. तिलाही कोकणात आल्या दिवसात कामावरून विसावा म्हणून मिळणारी व्हेकेशन मिळते असं वाटायचं.तिच्या मुलालाही कोकण खूप आवडायचं.जास्त करून तो पावसाळ्यात यायचं पसंत करायचा.कोकणातला पाऊस कुणाला आवडणार नाही?

एकदा पावसाला सुरवात झाली की सर्व आसमंत हिरवं गार व्ह्यायचं.हवा अगदी थंड व्हायची.सुम्याच्या मुलीला आणि तिच्या मुलाला पावसात येणारे खाडीतले मासे खूप आवडायचे.आई आणि तो गुरूकाकाबरोबर बंदरावर जाऊन रापणी किनार्‍याला लागल्यावर होड्यातून येणारे फडफडणारे मासे विकत घ्यायचे.गुंजले,सुळे,शेतकं,काळूद्रं
असे पावसातले किंवा खाडीत मिळणारे मासे आणून दिल्यावर सुम्या त्याचे छान पदार्थ करायची. तिखलं,सुकं,तळलेले मासे असे प्रकार खाऊन तिची मुलगी आणि नातू खूप सुखायचे.कधी कधी वेळ मिळाल्यावर सुम्याचा जावईसुद्धा कोकणात येऊन त्यांना कंपनी द्यायचा.मुंबईत पावसात धंदा तसा मंदच असायचा.त्या स्लॅक-पिरयडमधे ही सर्व मंडळी कोकणात येऊन रहायची.आणि नंतर मुंबईला परत यायचे.दिवसामागून दिवस जात होते.

कोणच घरी नसल्यावर सुम्याला एकटं एकटं घर खायला यायचं.अशावेळी ती घराच्यामागच्या परसात जाऊन बसायची आणि लहानपणाची आठवणी काढायची एकदा तिला नवर्‍याची खूपच आठवण आली. नेहमीच्या रिवाजात ती आपल्या मनात गुणगूणली,

प्रीति करूनी विसरलास प्रीतिची रीति
जशी अनुरति करिती पंतग अन ज्योती
आता फक्त माझे उदव्हस्त उपवन राहिले
अंतरातले मनोरथ अंतरातच सामावले
सांगशील का ते दिवस कुठे गेले?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

17 Nov 2016 - 11:59 am | आदिजोशी

कथा मस्त आहे काका. एकदम शांत आणि निवांत लय आहे कथेची, कोकणासारखीच :)

शरभ's picture

17 Nov 2016 - 12:57 pm | शरभ

हो अगदी, शांत, पावसातलं ते हिरवंगार कोकण उभं राहतय डोळ्यांसमोर.

- श