सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी.
सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परीसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती.
टाककरांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे. कधी कधी दोघंच असताना घरात बसून सोंगट्याचे (घुल्यांचे) खेळ खेळायचे.
दोघांच्याही परसात माडाची मोठी झाडं,कवाथे,फणसाची झाडं होती.गुरूनाथाकडे एक सोनचाफा होता.
लहानपणापासून ह्या मुलांची एक सवय होती.एकमेकाला जरूरी प्रमाणे मदत करायची.लक्षात ठेवण्या सारखं म्हणजे रोज सकाळी उठल्यावर सुम्या गुरूनाथासाठी बावीतून कळश्याभरून आंघोळीसाठी पाणी काढून द्यायची. समोर असलेल्या कवाथ्याच्या बुंद्याशी एक पाथर असायची त्यावर उभं राहून आंघोळ करता यायची.हातात पाण्याने भरलेली कळशी मिळाल्यावर तो डोक्यावर पालथी घालून कळशी रिकामी करायचा.दोन तीन कळश्या अश्या सरळ ओतून झाल्यावर अंगाला साबू लावायचा.कधी कधी सुम्या त्याची उघडी पाठ साबू लावून चोळायची.कधी कधी डोक्याला साबू लावून त्याच्या डोक्यावर भरली कळशी ओतायची.असं चालायचं.
बायकांसाठी, बावीजवळच्या दुसर्या कवाथ्या जवळ, झापांचा आडोसाकरून गडग्याचा आधार घेऊन आंघोळीसाठी न्हाणी-घर केलेलं होतं.घरातल्या बायका इथे आंघोळ करायच्या. पाण्याचा हंडा विटांच्या चुलीवर ठेऊन पाणी गरम केलं जायचं.सुम्यासुद्धा तिच्या परसात केलेल्या आडोशाच्या न्हाणी-घरात आंघोळ करायची.गरम पाण्याची बादली उचलालयला कधी कधी गुरूनाथ तिला मदत करायचा.असं सर्व चालायचं.
कालांतरानी मुलं मोठी होत गेली.सुम्या फ्रॉक ऐवजी परकर पोलका नेसायला लागली होती,गुरूनाथाच्या नेसायच्या कपड्यात, म्हणजे तो अर्धी चड्डी आणि कोपर्यापर्यंत शर्ट घालायचा, काही फरक झाला नव्हता.त्यानंतर मुलं आणखी मोठी झाल्यावर सुम्या आता परकर पोलका नेसण्या ऐवजी,चोळी लुगडं नेसायला लागली.गुरूनाथपण अर्धी चड्डी आणि अर्धा शर्ट वापरण्याऐवजी लांब सफेद लेंगा आणि फुल शर्ट घालायला लागला.
गुरूनाथ आता वयात आला होता.त्याला त्याच्या नाकाखाली लव आली होती.हातापायावरचे केस जरा राठ झाले होते.छातीवर सुद्धा भरपूर केस आले होते.गुरूनाथ आता उघड्ं रहायला लाजायचा.आंघोळीला पंचा नेसून यायचा. सुम्याकडून भरलेल्या कळश्या घेऊन पाठमोरा होऊन उभ्या उभ्या ती थंड पाण्याची कळशी डोक्यावर रिकामी करायचा.सुम्यापासून पाठमोरा राहून अंगाला साबू चोळायचा.सुम्या शहाणी होती ती समजून जायची. त्याच्या पाठीला साबू लावायला आता ती जायची नाही.त्याच्या नकळत त्याला उघडा असताना टक लावून बघायची.ती टक लावून बघते हे गुरूनाथच्या लक्षात आल्यावर सुम्या सहाजीकच लाजायची.
गुरूनाथ स्वच्छ आंघोळ झाल्यावर सफेद लेंगा आणि फुल शर्ट घालून अभ्यासाला बसायचा.
"अगो, सुम्या न्हाऊन घे भाऊ थोड्यावेळांत जेवंक येतले"
असं सुम्याच्या आईने तिला ओरडून सांगीतल्यावर सुम्या आंघोळीला जायच्या तयारीला लागायची.
हे गुरूनाथच्या कानावार पडल्यावर तो अभ्यास तसाच टाकून गडग्यावर उंच जागी जाऊन बसायचा. सुम्या नेसतं लुगडं घरात सोडून त्याऐवजी जुन्यार नेसून न्हाणी-घरात आंघोळीला जायची.पाथरीवर बसून अंगातली चोळी कपडे धुवायला ढोणीत टाकायची.पदर अंगाभोवती लपेटून हंड्यातलं गरम पाणी बादलीत घेऊन चार तांबे अंगावर ओतून हमाम चोळून अंग धुवायची.गुरूनाथ बघेल म्हणून त्याच्याकडे पाठमोरी होऊन बसायची.अंग चोळताना हातातल्या काचीच्या कांकणाची किण किण गुरूनाथचं लक्ष वेधून घ्यायची. पाण्याने चिंब झालेला पदर पुढे ओडून पिळायची.पाणी पिळलेल्या पदराने तोंड आणि अंग पूसून घेऊन तसाच तो पदर अंगाभोवती लपेटून ओल्या जुनार्यात धावत पळत घरात जायची.
गुरूनाथाला तिचं आंघोळ करतानाचं लाजणं मुरडणं खूप आवडायचं.
सुम्या घरात्त गेल्यावर गुरूनाथ गडग्यावरून खाली उतरून सोनचाफ्याची फुलं काढून हाताच्या ओंजळीत धरून तिला देण्यासाठी सुम्याला साद घालायचा.
सुम्या धुतलेलं लुगडं नेसून चोळी अंगात घालून चोळीची गाठ बांधत बांधत गडग्याजवळ यायची.तिचा पदर तिच्या दातात धरलेला असायचा.गाठ घट्ट बांधून झाल्यावर पदर खांद्यावर टाकून दोन्ही हाताची ओंजळ करून गुरूनाथ देत असलेली सोनचाफ्याची फुलं आपल्या ओंजळीत घ्यायची.
त्याचवेळेला दोघांच्या अंगाचा एकमेकाला स्पर्श व्ह्यायचा.गुरूनाथ तिच्या चेहर्याकडे टक लावून पहायचा. तो ,निरागस,निर्मळ, नावीन्याचा स्पर्श बरच काही सांगून जायचा.सुम्या ओंजळीतली फुलं गडग्यावर ठेवून त्यातलं एक फुल,तिच्या लांबसडक केसाच्या बांधलेल्या आंबाड्यात, दोन्ही हात वर करून, खोवण्याच्या प्रयत्नात ती असताना,गुरूनाथची नजर ढळलेली पाहून तिला लाज वाटायची.त्याच्याकडे पाठमोरी होऊन सुम्या ते फुल आंबाड्यात खोवायची. गडग्यावर ठेवलेली सोनचाफ्याची फुलं ओंजळीत घेऊन गुरूनाथकडे बघत हसत हसत लगबगीने आपल्या घरात जायची.तिच्या उजव्या गालावरची खुललेली खळी नकळत त्याला थॅन्क्यू म्हणायची.
सुम्या,गुरूनाथचा हा प्रणय बरेच दिवस चालाला.आणखी पुढे शिकण्यासाठी दोघंही शहरात गेली.सुम्या पुण्याला गेली. गुरूनाथ मुंबईला गेला.पुढे बरीच वर्ष त्यांचा एकमेकांचा संपर्क नव्हता.सुम्या शिक्षण पुरं झाल्यावर परत कोकणात आली.सुम्याचं लग्न ठरलं होतं.पुण्याचाच मुलगा होता.गुरूनाथला मुली सांगून यायच्या.
उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा गुरूनाथ कोकणात त्याच्या घरी आला होता.हे सुम्याला कळलं.
सुम्या आलेली त्याला कळलं.सुम्याचं लग्न ठरल्याचं त्यावेळी त्याला कळलं.गुरूनाथ उदास झाला होता.
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर सुम्या आंघोळ करून बाहेर केव्हा येईल याची गुरूनाथ वाट पहात होता.कारण मधल्या काळात आता दोघांच्याही घरात बाथरूम बांधल्या गेल्या होत्या.बावीला पंप जोडून नळाने पाणी घरात आणलं होतं.गरम पाण्याचे गिझर लावले होते.सहाजीकच बावी जवळच्या झापांच्या आडोश्याने बांधलेली न्हाणी-घरं आता राहिली नव्हती.फक्त पाथरी आणि ढोण्या जागच्या जागी होत्या. कवाथे आता मोठे होऊन माडासारखे वाढले होते.
सुम्याच्या आईला मोठ्याने ओरडून,
"अगो,सुम्या न्हाऊन घे भाऊ जेवूंक येतले"
असं ओरडून सांगायची गरज उरलेली नव्हती.
हे केव्हाच गुरूनाथच्या लक्षात आलं होतं.
गुरूनाथची आंघोळ झाली होती.शहरातल्या रहाणीची सवय होऊन तो आता जीन प्यांट आणि सफेद शर्ट घालायचा.
गुरूनाथ आत बाहेर करत होता.त्याला सुम्याची आंघोळ झाली की नाही हे समजायला हवं होतं.वाटपाहून शेवटी त्याने सोनचाफ्याची फुलं काढायचं ठरवलं.सोनचाफा आता बराच उंच झाला होता.त्याने शीडी लावून ओंजळभर फुलं काढली आणि गडग्याजवळ येऊन सुम्याला साद घातली.
सुम्या त्याच्या सादेची वाटच बघत असावी.सुम्याल्या पण शहरी रहाणीची सवय झाल्याने तिने चोळी लुगडं घालायचं बंद केलं होतं.घरात ती गाऊन घालायची.तसाच एक सिल्कचा रंगीत गाऊन आणि खांद्यावर सफेद ओढणी घेऊन लगबगीनेत ती बाहेर आली होती.नेहमीच्या जागी गडग्याजवळ गुरूनाथ उभा होता.सुम्या गडग्याजवळ येऊन आपल्या दोन्ही हाताची ओंजळ करून त्याच्या ओंजळीतली फुलं आपल्या ओंजळीत घेत होती. खूप वर्षानी एकमेकाच्या हाताला स्पर्श झाला होता.हा स्पर्श बरंच काही सांगून गेला होता.पण त्या वयातला स्पर्श आणि आताचा स्पर्श ह्यात बराच फरक झाला होता.ते निर्मळ, निरागस, नावीन्याचे दिवस आता राहिले नव्हते.
परिस्थितीत आता बदल झाला होता.दोघांनाही ते कळत असावं,कारण उघड होतं.
सुम्याने पुर्वीसारखं फुलं गडग्यावर ठेवून एक फुल आंबाड्यात खोवण्यासाठी दोन हात वर करून मागे नेले होते.आणि गुरूनाथची नजर तिच्या चेहर्यावरून ढळली होती.तिच्या बेरक्या नजरेतून ते दृश्य सुटलं नाही.तिने लगेचच पाठमोरं होऊन ते फुल ती आंबाड्यात खोचू पहात होती.पण सुम्याचा आता आंबाडा नव्हता.लांब सडक केस कापून तिने खांद्यावर रुळतील एव्हडे तोकडे केले होते.हे लक्षात आल्याबरोबर तिने ते फुल आपल्या कानाच्या पाळीवर खोचलं.गडग्यावरची फुलं तिच्या ओंजळीत घेऊन पुन्हा तिने गुरूनाथकडे हसून बघीतलं.लगबगीने परत घरात जाताना,तिच्या उजव्या गालावरची खळी खुलली पण ती नकळत थॅन्क्यू न म्हणता सुम्याच मोठ्याने थॅन्क्यू म्हणाली.
तो फरक गुरूनाथच्या लक्षात आला.गुरूनाथ उदास झाला होता.पाठ फिरवून त्याने सोनचाफ्याकडे बघीतलं.
"चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना"
हे गाणं त्याला क्षणभर आठवलं.
पण खरं तर चाफा त्याला म्हणाला होता.
"मी आहे साक्षीला"
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
29 Sep 2016 - 3:32 pm | अभिरुप
सुंदर कथा वर्णन
29 Sep 2016 - 4:01 pm | प्रभास
सुरेख कथा...
29 Sep 2016 - 10:32 pm | रातराणी
सुरेख कथा!
30 Sep 2016 - 8:11 am | यशोधरा
कथा आवडली.