मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा.
थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा.
कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्याचे गंध मनाला मोहिनी घालू लागले मग कधी काही निमित्त करून त्या मित्रांचे घरी जाऊन गुपचूप २-३ फवारे शर्टवर मारून कॉलेजला जाणे होऊ लागले.
आता हळू हळू आपल्या शरीराचा घामाचा वास येत असावा असा शोध लागला आणि १० वी ११ वी पर्यंत एक शर्ट-पँट २-२ दिवस वापरणारे आणि त्याची कधीही तक्रार नसणारे आम्ही आता मात्र जुन्या दिवसांना नाक मुरडु लागलो.
काही असो पण जिथे चहा-सिगारेटचे गणित जुळवताना दमछाक होत असे तिथे सेंट परवडत नाही या कारणाने अत्तर वापरण्याकडे वळलो आणि अगदी गणपती ते सत्यनारायण महापूजेला ठेवल्या अत्तराच्या त्या छोट्या कुप्या अचानक गायब होऊन आमच्या कानात कापसाच्या बोळ्यावर लागून संपू लागल्या.
परंतु ते अत्तर नसून उग्र वासाचे तेल असावे असे काहीसे वाटू लागले कारण सुगंध थोडावेळ राहून काहीवेळाने तेलकट वास येत असे.त्यामुळे तो प्रकार बंद झाला व देवाबाप्पाला परत अत्तराची ती कुपी मिळू लागली.
आता आम्ही केवडा,मोगरा नावाची अगरबत्ती,मोगऱ्याची,रातरणीची फुले कागदाला चोळून ते रात्री शर्टमध्ये ठेऊन एक नवा प्रयोग करू लागलो पण घरातल्या,मंदिरातल्या अगरबत्या आणि पाण्यात ठेवलेला गजरा सुद्धा अचानक गायब होऊ लागल्याने सावध झालेले पुजारी व महिलावर्ग यांचा अगरबत्ती व गजऱ्या भोवती पहारा वाढू लागला आणि आमचा हा प्रयोग सुद्धा फसला.
सुगंधाचे व्यसन लागले हो व्यसनच लागले असे म्हणाले पाहिजे.कारण आता इतर खर्चाला कात्री लावून काहीतरी पर्याय शोधलाच पाहिजे असे वाटू लागले.दारू,सिगारेट पिणारे जसे तल्लफ झाली कि वेडेपिसे होतात तसे कॉलेजला जाताना घराबाहेर पडताना वाटू लागले.आपल्याला खूप घाम आला असून त्याची दुर्गंधी पसरली असून आजूबाजूचे आपल्याला टाळत आहेत असे वाटण्यापर्यंत सुगंधाचे वेड पोहोचले होते.
अचानक एक नविन शोध लागला कि नविन नविन आलेली दाढी जेंव्हा सलून मध्ये जाऊन करू लागलो तेंव्हा चेहऱ्यावर लावले जाणारे कलोन वॉटर व समोर असणारी ती मोठी रोज,संडलवुड,मोगरा या नावाच्या मोठ्या पावडरच्या डब्या आपला सुगंधांच्या शोधाला एक स्वल्पविराम आहेत.मग काय कोणीही दाढी करायला चालले कि त्याच्या मागोमाग सलून मध्ये जायचे जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या आणि बोलता बोलता गालावर कलोन वॉटर व शर्टाच्या आतमध्ये पावडर मारून हळूच तिथून सटकायचे असे करू लागलो.
पूर्वीच्या अनुभवाने हा प्रयोग जास्त चालणार नाही हे समजले होते त्यामुळे आता सलूनचा दरवाजा बंद होण्याअगोदर नविन शोध लावलाच पाहिजे हे मनाने ठरविले आणि देवाने ते ऐकले....
मार्केटमध्ये आता डिओ नावाचा प्रकार येऊ लागला आणि सुगंधांच्या वेड्या आमच्या सारख्यांना स्वर्ग दोन बोटे उरला.
पण हाय रे दैवा !!! हा डिओ विकत घ्यावा लागणार आणि त्याची किंमतही त्यावेळी ५५ ते ६० रुपयाच्या आसपास होती आणि कॉलेजला एका बाजूने ३ रुपये ५० पैसे बस तिकीट आणि १३५ रुपये महिना बसपास असणाऱ्या त्या दिवसात अंगावर उडवायला चक्क ६० रुपयाचे पाणी फवरणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आणि आयुष्यात पहिल्यांदा डिओ घेण्यासाठी स्वतः पैसे कमावले पाहिजे असे वाटून कोठेतरी कामाला गेले पाहिजे हे मनात पक्के झाले.
आणि मंडळी सुगंधाचे ते वेड आजही कायम आहे.
प्रतिक्रिया
28 Jul 2016 - 10:53 pm | पद्मावति
छान लिहिलंय.
क्रमश: आहे का?
28 Jul 2016 - 10:55 pm | राजू
नाही क्रमशः नाहीये.
29 Jul 2016 - 12:11 am | ज्योति अळवणी
छान आहे पण अजून थोडं हवं होतं