भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
__________________________________________________________________________________
मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले. जाग झोप जाग झोप चालू होती. सकाळी हिने पण हळूच विचारले, "अहो, जाताय की झोपताय?" मोठा मुलगा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "बाबा, उठ ! अरे जायचं ना तुला". त्याच्या मागे धाकटा पण झोपाळलेले डोळे चोळत उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागसपणाकडे बघून मी अंग सावरत, स्नायू आवरत उठलो. वॉचमन केबिनमधल्या रेडीओवर माउलींची रचना लागली होती.
जंववरी रे तंववरी, जंबूक करी गर्जना
तव त्या पंचानना, देखिले नाही रे बाप ।।
माउलींनी लवकर समाधीच नव्हे तर जन्मही लवकर घेतला असे वाटले. आज असते ज्ञानोबा तर नक्की एक चरण वाढवला असता, या रचनेमध्ये.
जंववरी रे तंववरी, जिम जाण्याच्या वल्गना
तव स्नायुदुखीचा ताप, देखिला नाही बाप ।।
शशी कपूरला सावरलं, वासराला वेसण घातली, जपानी माणसाला सरळ केलं आणि तयारी करून कसाबसा निघालो. जिम मधल्या सहाय्यकाला माझ्यासारख्या हौश्या गवश्यांची सवय असावी. मी काहीही न बोलता, माझ्या चेहऱ्यावरून जे काही समजायचे ते तो समजला. त्याने ट्रेड मिलकडे बोट दाखवलं. मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले. आणि ट्रेड मिलकडे मोर्चा वळवला.
मी आरशा समोरच्या ट्रेड मिलवर सराईतपणे चालू लागलो. आज काही गाणी गिणी नव्हती. हसण्या खिदळण्याचे आवाज नव्हते. सतत जिम करून पिळदार शरीरयष्टी कमवलेले सराईत लोक अजून आले नव्हते. ललना तर नव्हत्याच. माझ्या तीन दिवसांच्या उपद्व्यापाने, मी जिमचा बिझनेस कमी केला की काय? अशी पुसटशी शंका मनाला चाटून गेली. माझा स्वभावाच तसा आहे. एकदा कुणाला आपले मानले की एकदम काळजी घेणारा. इथे तर मी जिमला पैसे भरून आपले मानले होते. म्हणून मी महिलावर्गाबद्दल चौकशी करतोय असे वाटू नये याची काळजी घेत, सहाय्यकाला कमी गर्दीचे कारण विचारले. तो म्हणाला, "शनिवारी लोक कमी येतात. बायका तर अजूनच कमी". माझा जीव भांड्यात पडला.
ए सी ची थंड हवा अंगावर येत होती. खालच्या पळत्या भुईने वेग पकडला होता. अंग दुखतंच होते. आपण वर्षभराचे पैसे भरून मूर्खपणा केलाय असे वाटू लागले होते. मित्र, भाऊ, सहाय्यक प्रोफेसर बरोबर होते असे वाटू लागले. आपल्याच्याने काही हे जिम प्रकरण झेपणार नाही हे मनोमन पटले. एखाद आठवडा करून सोडून द्यावे आणि जिमकडून कसल्याही परताव्याची अपेक्षा न करता केवळ स्वेच्छेने जिमला वर्गणीइतकी रक्कम दान देणाऱ्या इतर अनेक दानशूर व्यक्तींच्या रांगेत सामील व्हावे अशी इच्छा प्रबळ होऊ लागली. शरीर नश्वर आहे. त्याचा मोह कशाला? असे मंगल, सात्विक आणि पवित्र विचार डोक्यात येऊ लागले.
तुकोबांना आपुला संवाद आपणाशी करण्यासाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर जावे लागत होते, तीच अवस्था जिमच्या ट्रेड मिलवर आल्याने मी मनातल्या मनात जिमचे नाव भंडारा ठेवले. भंडारा जिम. इथेच मोरे सरांना शरीराच्या नश्वर पणाचा साक्षात्कार झाला. इथेच त्यांच्यातील सनदी लेखापाल, कडक शिक्षक, मागे पडून दानशूर संत स्वभाव जागा झाला अशी भविष्यकालीन स्वप्ने मला उघड्या डोळ्यांनी पडू लागली.
माझ्यासमोरच्या आरशात माझे प्रतिबिंब दिसत होते. आणि काहीतरी विलक्षण घडले. सकाळच्या वेळी मुलांचा तो हसरा चेहरा आठवला, माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यातले साम्य जाणवले. आणि एकाएकी माझ्या चेहऱ्याच्या जागी बाबांचा चेहरा दिसू लागला. तीच उंची, तसेच दाट आणि वळणदार केस.पण बाबा सडपातळ होते.
बाबा. आठवड्याला पाव किलो सुपारी संपवणारे पण मुलं मोठी होत आहेत मग त्यांच्या समोर चुकीचा आदर्श नको म्हणून एका झटक्यात ते सुपारीचं व्यसन कायमचं सोडणारे बाबा. आमच्या फिसाठी कायम ओव्हर टाईम करणारे बाबा. रोज चालत जाऊन चालत येणारे आणि रिक्षाचे पैसे वाचवणारे बाबा. सकाळी गाडीला गर्दी असते मग फर्स्ट क्लासचे तिकीट न काढता, गर्दी टाळण्यासाठी लवकर निघून कल्याण डाऊन करून सेकंड क्लासच्या पासवर जाणारे आणि पैसे वाचवणारे बाबा. घेतलेला वसा कधी न टाकणारे माझे बाबा. मी प्राथमिक इयत्तेत असताना रोज सकाळी मला शाळेत डबा द्यायला धावत येणारे माझे बाबा. वर्ष भर चार जोड कपडे वापरूनही टापटीप रहाणारे माझे बाबा. शाळेच्या whatsgroup एक बाल मैत्रीण बाबांच्या जाण्याची बातमी कळल्यावर म्हणाली पण होती, "तुझे बाबा कित्ती छान दिसायचे. तू पण त्यांच्या सारखाच दिसतोस बराचसा. फक्त सुटलायस थोडासा".
ज्ञानोबा आणि तुकोबांच्या सहवासातून बाहेर पडून मी एकाएकी वर्तुळात सापडलो. एक छोटेसे वर्तूळ. जिच्यात माझ्या मागे माझे बाबा होते आणि माझ्या पुढे माझी मुलं. बाबा प्रेमाने पुढे ढकलत होते, मुलं हौसेने पुढे खेचत होती. मी कोणी वेगळा नव्हतोच मुळी. मी होतो तो फक्त दुवा. माझ्या बाबांमधला आणि माझ्या मुलांमधला. बाबांकडून जे आलं त्यात भर टाकू शकलो नाही तरी निदान जसेच्या तसे मुलांकडे पोहोचवता आलं पाहिजे. घेतला वसा न टाकण्याचा त्यांचा मंत्र तर सगळ्यात महत्वाचा. आणि मग सगळा शीण पळाला. स्नायू मोकळे झाले. रक्तप्रवाह सुरळीत झाला. श्वास नियमित झाला. काय करायला हवे ते लख्ख दिसू लागले.
मी पण माझ्या मुलांच्या शाळेत रोज जातो. त्यांचे मित्र मैत्रिणी मला रोज पहातात. ते मोठे होतील तेंव्हा कदाचित whatsapp group नसतील, पण त्यांचेही कुठले ना कुठले ग्रुप असतीलच. त्यांची reunion होतील. त्यांना त्यांचे बाल मित्र आणि मैत्रिणी पुन्हा भेटतील. आणि त्यांना त्यांच्या बाबाची आठवण करून देतील. ती आठवण चांगली रहायला हवी. माझ्या बाबांच्या आठवणीने जशी मला कायम उभारी मिळते, त्यांच्या बद्दलच्या अभिमानाने ऊर भरून येते त्याच्या अगदी १० टक्के जरी मी माझ्या मुलांसाठी करू शकलो तरी पुरे. या विचाराने मनावर आलेली मरगळ दूर झाली. आणि पुढील वर्षभर नेमाने येण्यासाठी सबळ कारण मिळाले. माझा स्वभावंच तसा आहे. बाबा आणि मुलांची गोष्ट आली की मला माझे असे वेगळे काही मत राहातच नाही. फक्त जिम वाल्यांना माझा दानशूर अवतार पाहण्याची संधी हुकली.
आता जर तुम्हाला डोंबिवली मध्ये सकाळच्या वेळी मुलांना शाळेत सोडून, राजीखुशीने जिमकडे जाणारा, एखादा पोट सुटलेला, चाळीशीच्या आसपासचा इसम दिसला तर खुशाल समजा तुम्ही मला पाहिलंत. माझ्या भंडारा जिमकडे जाताना.
सुटलेल्या पोटाची कहाणी संपूर्ण … जिमचा प्रवास चालू आहे आणि तो चालू राहावा यासाठी तुमच्या सदिच्छांच्या अपेक्षेत.
__________________________________________________________________________________
हा भाग वाचल्यानंतर माझ्या एका मित्राने, 'जंववरी रे तंववरी, जंबूक करी गर्जना ' ही रचना ज्ञानोबा माऊलींची नसून तुकोबारायांची आहे असे सांगितले. आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच समाधान पसरले. हे समाधान, या भागातील विचारामुळे होते? की लेखमाला संपली, यामुळे होते? की कशी सापडली तुझी चूक, यामुळे होते? ते मला कळले नाही. पण मी आता ते वाक्य कसे बदलायचे या चिंतेत असल्याने त्याला समाधानाच्या समुद्रात डुंबायला सोडून आंतरजालावर शोध घेत होतो. अजून पर्यंत तरी मला रचना ज्ञानोबांच्या नावावर दिसली आहे. अधिकारी व्यक्ती ससंदर्भ मार्गदर्शन करतील तर मी त्यांना स्वानुभावाबरोबरचा माझा चांगला गुरू मानायला तयार आहे. माझा स्वभावच तसा आहे. मी पटकन गुरु मानतो. त्यामुळे आपण विद्यार्थीपणाच्या चुका करायला मोकळे राहतो.
तर, मिसळपाववर माझे स्वागत रोज ज्ञानोबा माउली आणि तुकोबाराय रोज करीत असल्याने आणि अजूनपर्यंत हाती आलेल्या माहितीअनुसार ही रचना माऊलींच्या नावावर दाखवण्यास ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांनी स्वप्नात येउन दृष्टांत देऊन काहीही हरकत नोंदवली नसल्याने आणि माझे आडनाव लिहिल्यावर आणि उच्चारताना तुकोबारायांच्या दुसऱ्या आडनावासारखेच असल्याने, तुकोबा या अजाण बालकाची पहिली चूक माफ करतील अशी आशा असल्याने, मी वाक्य बदलले नाही आहे.
ही या लेखमालेची सांगता असल्याने, तुकोबांच्याच "शेवटला दिस गोड व्हावा" च्या चालीवर म्हणतो, "तपशीलात चूक निघाली तरी हे वाचकांनो, शेवटला भाग गोड व्हावा". (आता हा तरी अभंग तुकोबांचा निघावा…. देवा पांडुरंगा, सांभाळून घे रे बाबा)
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 1:18 pm | एस
मस्त लेखमाला!
9 Dec 2015 - 1:18 pm | पैसा
सुंदर लिहिलंय! हसता हसता गंभीर केलंत.
9 Dec 2015 - 1:38 pm | कविता१९७८
मस्त लेखमाला
9 Dec 2015 - 1:43 pm | शलभ
मस्त. आवडलं.
9 Dec 2015 - 1:46 pm | बेकार तरुण
मोरे सर अत्यंत आवडली लेखमाला.
9 Dec 2015 - 2:01 pm | मोहनराव
छान लेखमाला... पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
9 Dec 2015 - 2:03 pm | आनंदराव
झकासच !
9 Dec 2015 - 2:03 pm | अजया
सुरेख लेखमाला आनंद.
पुढच्या लेखनाच्या प्रतीक्षेत...
9 Dec 2015 - 2:06 pm | अर्पित
आवडलं.
तीन महिन्याची फी वाया घालवलेला
9 Dec 2015 - 2:07 pm | वेल्लाभट
अतिशय छान लेखमाला होती ही ! मस्तच.
फिट रहा; व्यायाम करत रहा. हा वसा म्हणण्यापेक्षा हे तत्व अधिक आहे. त्यामुळे त्याच्याशी तडजोड करू नका.
रिझल्ट्स हे शाश्वत असतील आणि अतिशय सुखद असतील.
पु ले शु
9 Dec 2015 - 2:07 pm | अरिंजय
फार छान लिहिलेत.
9 Dec 2015 - 2:10 pm | पिशी अबोली
सुंदर लिहिलंय. खुसखुशीत लिहीत लिहीत शेवट इमोशनल केला.
पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत..
9 Dec 2015 - 2:15 pm | pacificready
मस्त लिहिलीय मालिका.
9 Dec 2015 - 2:15 pm | यशोधरा
अतिशय सुरेख भाग. खूप आवडला.
9 Dec 2015 - 2:25 pm | सूड
भारी, जिमसाठी शुभेच्छा!! वर्षभर नियमित जा, वर्कआऊटचं पण व्यसन लागतं. =))
9 Dec 2015 - 3:15 pm | टुकुल
वर्कआऊटचं पण व्यसन लागत... एकदम बरोबर :-)
--टुकुल.
9 Dec 2015 - 2:34 pm | जातवेद
शेवट पण सुंदर. फार आवडली.
9 Dec 2015 - 2:40 pm | विवेक ठाकूर
मस्त !
9 Dec 2015 - 3:13 pm | पियुशा
भारिये , सगळे भाग खुसखुशीत न शेवटपण तितकाच प्रभावी :)
9 Dec 2015 - 3:47 pm | वगिश
मस्त लेखमाला ा
9 Dec 2015 - 4:00 pm | नीलमोहर
पुढील लेखनासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपणास शुभेच्छा !!
9 Dec 2015 - 4:14 pm | विलासराव
__/\__
9 Dec 2015 - 4:21 pm | प्रमोद देर्देकर
मस्त छान झाली लेखमाला. पण लवकर संपवलीत. मधला बाबांच्या आठवणींचा परिच्छेद मनाला हळवं करुन गेला.
9 Dec 2015 - 4:40 pm | खेडूत
संपूर्ण लेखमाला आवडली. ;)
अजून अनुभव लिहीत रहा!
9 Dec 2015 - 5:01 pm | llपुण्याचे पेशवेll
मालक जंववरि रे तववरी ही रचना ज्ञानेश्वर महाराजांचीच आहे.
बाकी लेख छान.
9 Dec 2015 - 5:10 pm | राजाभाउ
मस्त एकदम. हसता हसता गंभीर केलत, तसा तुमचा स्वभावच असावा कदाचीत.
9 Dec 2015 - 5:23 pm | बोका-ए-आझम
पुलेशु! ये दिल मांगे मोरे! ;)
9 Dec 2015 - 5:33 pm | सुबोध खरे
+100
9 Dec 2015 - 6:09 pm | रेवती
खूपच गोड लेखमाला आहे. आवडली. तुम्हाला शुभेच्छा.
9 Dec 2015 - 6:18 pm | मीता
सुंदर लिहिलंय
9 Dec 2015 - 6:52 pm | उगा काहितरीच
सुरेख लेखमाला! व्यवस्थित कंप्लिट केल्याबद्दल अभिनंदन !!
9 Dec 2015 - 6:53 pm | दमामि
आवडली.
9 Dec 2015 - 7:19 pm | संदीप डांगे
जबरदस्त लेख माला... खूप सहज, खुदकन हसवत गंभीरपणे आयुष्याकडे बघायला लावणारं लिखाण.
तुम्ही जिमला जाणे आणि मिपावर लिहिणे, छोडने का नै...
9 Dec 2015 - 7:38 pm | चांदणे संदीप
+१
9 Dec 2015 - 8:42 pm | राघवेंद्र
+२
9 Dec 2015 - 7:38 pm | चांदणे संदीप
मस्तच...लेखमाला!
व्यवस्थित आणि आटोपशीर अशी दुसर्यांना न ताटकळवता पूर्ण केलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.
अजून नवनवे लिहून लोकांना हसवत रहा!
धन्यवाद!
Sandy
9 Dec 2015 - 8:09 pm | टिवटिव
सुरेख लेखमाला !
9 Dec 2015 - 9:11 pm | Madhavi1992
मस्त लेखमाला!
9 Dec 2015 - 10:12 pm | पद्मावति
फारच सुरेख जमलीय लेखमाला. खरं म्हणजे अजुन काही भाग चालली असती तर छान वाटले असते.
अगदी फ्रेश, मस्तं लेखनशैली.
पुढील लेखन लवकरच येऊ द्या.
9 Dec 2015 - 11:28 pm | ब्रिटिश टिंग्या
छान लेखमाला! अजुन येउ देत!
9 Dec 2015 - 11:33 pm | अंतु बर्वा
मस्तच. आवडली लेखमाला आणी बंद पडलेल्या रनिंगची पण आठवण झाली :-) सुरु करायला हवी पुन्हा!
10 Dec 2015 - 12:33 am | अमीबा
मोरे सर, मिपावर आपल्या पुढच्या लेखनाची प्रतीक्षा राहील
10 Dec 2015 - 1:14 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त लेखमाला ! भरपूर हसवलेत. लिहीत रहा.
10 Dec 2015 - 5:38 am | इडली डोसा
लेखमालेतले सगळेच भाग एक से बढकर एक झालेत. लिहात रहा आणि जिमलाही जात रहा.
10 Dec 2015 - 8:47 am | रुपी
काय सुंदर लिहिलं आहे!
सगळे भाग आत्तच वाचले. पहिले चारही भाग वाचताना खदखदून हसत होते, आणि शेवट थोडा गंभीर तरीही आनंद देऊन गेला. पोट सुटलेलं असो नाहीतर नसो, सर्वांनाच अंतर्मुख करायले लावणारे लेखन!
आणखी लिहा :)
11 Dec 2015 - 6:26 pm | मी-सौरभ
ही लेखमाला खुप आवडली. तुमच्या पुढील लेखनाची आता आतुरतेने वाट बघु सर.
असेच लिहित रहा.
सर्वात जास्त हा भाग आवडला
11 Dec 2015 - 10:25 pm | आतिवास
सगळे भाग आत्ता वाचले.
सगळे भाग आवडले. मजा आली वाचताना.
पुढील लेखनास शुभेच्छा.
12 Dec 2015 - 10:02 pm | अभिजीत अवलिया
अतिशय सुन्दर लिखाण. लिहीत रहा.
12 Dec 2015 - 11:20 pm | अनिरुद्ध.वैद्य
जमली की! छान लिहिलीत :)
12 Dec 2015 - 11:59 pm | रातराणी
उत्तम लेखमाला! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत :)
19 Dec 2015 - 12:26 pm | वपाडाव
लेखमाला म्स्त झाली आहे...
रोज जिमला जाउन तुमचा 'स्वभाव' आता कमी झाला असेल अशी आशा बाळगतो...
19 Dec 2015 - 12:34 pm | नाखु
आगदी मोअर "आनंद" देणारा !!!
2 Feb 2016 - 3:23 pm | प्रसाद को
नन्तर चे अनुभव वाचायला आवडतील.
शुभेच्छा
26 Sep 2017 - 11:40 pm | प्रियाभि..
खुमासदार शैलीतील लेखमाला वाचताना शेवटपर्यंत हसू होतं..शेवटी थोडं इमोशनल केलंत राव