जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली.
"फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान.
तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली.
मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला. खाचगळगे, प्रवांश्यांच्या गावरान गप्पा, हिरवाईला सोबत करत हाही अनुभव घेतला. सगळचं अनोळखी, काहीच माहीती नाही.
मध्येच एक वेगळच गाव लागलं. 'पाचुरी' म्हणे.
टमटमवाल्यानं तिथचं सोडलं. आणि गेला निघुन.
आता त्या अनोळखी खेड्यात मी असा एकटा. बरं जायचयं कुठं हे विचारणार तरी कसं? यायचं 'कारण' कोणी विचारलं तर बोंबच.
तरी एकाला धाडस करुन विचारलचं " हे थिरडी कुठं आलं?". त्यानं हात दाखवुन लांबवर रस्ता दाखवला. मी निघालो, एकटाचं.
मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन चालायला कित्ती छान वाटतं ना! हातात एक काठी घेतली आणि उगाच रस्त्यावर डोकावणारे झुडपांचे शेंडे छाटत चाललो. अगदी उंडग्या पोरांसारखा.
चालतं चालतं पुढं आलो तर एक नदी दिसली. पलिकडच्या काठावर गर्द झाडीतुन डोकं वरं काढत असलेलं एक प्राचीन मंदिरही दिसलं. सुंदर. हा तर बोनसचं की. एखाद्या झाडावर कैरी शोधायला जावं आणि पिकलेला हापुसचं भेटावा असं काहीसं.
काठावर एक होडी होती. बहुदा नेहमी येजा करणाऱ्या गावकऱ्यांसाठी. नुकतीच पाण्यात शिरत होती. धावत धावत जाऊन चढलो. पाच रुपयांत नदी पार केली. हा तर अजुन एक बोनस. हापुस तोही कोकणातला असल्यासारखा.
अवाढव्य मंदिर पुढं ऊभं होतं. भिंती शेवाळानं रंगवलेल्या, नानाप्रकारची झुडपं आणि वेली तिच्यात शिरलेल्या. आतमध्ये देव कुठला होता काय माहित, पण आकर्षण आणि गुढ यांनी ठासुन भरलेला एकंदर परीसर. इच्छा असुनही मंदिराकडे न जाता तसाच चालत राहिलो. शेवटी आपलं ध्येयं महत्वाचं. दिवसाउजेडी ते गाठलचं पाहिजे.
नाही म्हणायला आता डांबरी लागला, खड्याखड्यांनी भरलेला. जुनाट छपरी घरं, एखादा टुमदार बंगला, रानभर पसरलेलं जोंधळ्याचं पिक हे या रस्त्याशेजारी दिमाखानं मिरवत ऊभं होत. डोळ्यांनी ही सौदर्य सृष्टि टिपत घेत पावलं झपाझप टाकत होतो. एखादी शेतावरुन परतनारी बैलगाडी, सायकलवर दुध घालायला चाललेलं एखादं मिसरुड फुटलेलं पोर, गुराढोरांच शेण काढणारी एखादी म्हातारी हे रस्ताभर भेटत राहिले. तरी मी आपला थोडा भीतभीतचं चालत राहिलो. शक्यतो संवाद टाळायचा प्रयत्न केला.
शेवटी एकदाचं ते 'थिरडी' आलं. गाव कसलं वाडीच म्हणा. पाच पंधरा घरांची. एक हाळी मारली तर समद्या गावाला ऐकु जाईल अशी.
उगचं नुसतं ताटकळत ऊभं राहणं बर दिसलं नसतं. सरळ फाट्यावर गेलो. बसस्टॉप शेजारी एक टपरी दिसली. शेजारी म्हणण्यापेक्षा टपरी हीच बसस्टॉप होती. किंवा उलट. तिथचं एका बाकड्यावर बसलो. टपरीवाल्या म्हाताऱ्याला चहा मागितला. कधी पित नाही पण वातावरणाचा परिणाम म्हणुन एक सिगारेट ही मागवली. चहा सिगरेटचा आस्वाद घेत तिनं सांगीतलेल्या खाणाखुणा आठवुन बघितल्या. हो, पहिल्यांदा फाटा, तिथेच बसलो होतो मी. फाट्यापासुन जरा आत गेल्यावर जि. प. प्रा. शाळा. आहे, दिसतेय, ती काय समोर.
शाळेला पाठीमागं लागुनचं एक टुमदार घर, थोडं पुढं जाऊन बघतो, पिवळसर दिव्याचा प्रकाश निलगीरीच्या झाडांतुन बाहेर येतोय, पाठीमागे घराचं अस्पष्ट चित्र समोर आलयं. हो तेच. तेच आहे माझं ध्येय.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन.
क्रमश:
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 2:54 am | बहुगुणी
येऊ द्यात पुढचा भाग लवकर.
26 Sep 2015 - 3:07 am | रेवती
वाचतिये.
26 Sep 2015 - 7:09 am | सामान्य वाचक
.
26 Sep 2015 - 7:32 am | मांत्रिक
वातावरणनिर्मिती छान जमलीय!!! मला बर्फी मधलं क्यों न हमतुम चले टेढेमेढेसे रस्तोंपे नंगे पाव रे, हे गाणं आठवलं वाचताना! बाकी उत्कंठावर्धक आहे!!!
26 Sep 2015 - 7:47 am | चांदणे संदीप
पुभाप्र!
26 Sep 2015 - 10:39 am | उगा काहितरीच
वा ! येऊद्या पुढचा भाग लवकर .
26 Sep 2015 - 11:08 am | संजय पाटिल
वाचतोय..
26 Sep 2015 - 1:43 pm | द-बाहुबली
फुल मांगुना बहार मांगु..... मय तव सणम तेर्हा प्यार मांगु... लै मस्त गाणे आहे.
बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन.
आहाहा ! डोळे भरुन आले मोजींच्या बहारीच्या काळातील आठवणीने.. झाले बहु होतील बहु... परि त्यासम तोचि.
बाकी वातवरण निर्मीती रोचक आहे.. कथा काय वळण घेइल याची उत्सुकता आहे.
26 Sep 2015 - 1:59 pm | पद्मावति
तुमच्या लेखनात वातावरण निर्मिती फारच सुरेख असते, नेहमीच. अतिशय चित्रदर्शी वर्णन.
पु.भा.प्र. वाचतेय.
26 Sep 2015 - 4:00 pm | बाबा योगिराज
सुरुवात तर मस्त आहे. पुढील भाग लवकर येऊ द्या....
26 Sep 2015 - 5:11 pm | प्राची अश्विनी
पुभाप्र
26 Sep 2015 - 7:02 pm | स्रुजा
वाह ! चित्रदर्शी खरंच ! लवकर येऊ द्या पुढचा भाग.
27 Sep 2015 - 10:32 am | कविता१९७८
मस्त सुरुवात
27 Sep 2015 - 11:04 am | जव्हेरगंज
धन्यवाद मित्रहो! क्रमश: कथा लिहीणे हा माझा प्रांत नाही. छोटीशीच कल्पना आहे. पण एका दमात टंकणे जमत नाही. नसता गाडी बुंगाट सुटते. म्हणुन तुकड्या तुकड्यात टाकतोय. :)
14 Jan 2016 - 10:46 pm | Rahul D
साहेब काय झाले ? पुढचा भाग कधी?