सत्यकथा .. अध्याय - ३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
7 Aug 2015 - 1:31 am

मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २
सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले. म्हणूनच हे ऋषिजनहो...सत्य हे या पद्धतिनी जीवनात अवतरीत झाले आणि त्याची दुसरी तुमच्या माझ्यातलिही बाजु दाखवून ते लाभले..तरच ते सत्य तेव्हढ्या कारणापुरते आणि तेव्हढ्या कारणाकरीता सत्य मानावे,आणि त्याला प्राणपणाने पाळावेही!"

शौनक म्हणातत, "हे महर्षी...आज मनाचे अतिशय समाधान झाले.आणि त्याही पेक्षा आंम्हाला सत्य हे असावे कसे?,आणि वापरावे कसे? याचे सम्यक ज्ञान झाले. तेंव्हा येव्हढ्यावरच न थांबता.. आंम्हाला या सत्याचे व्यक्तिगत सोडून सामाजिक आचरणाचे काही मार्ग असले तर ते ही अश्याच एखाद्या कथेच्या द्वारे सांगा...ऐकण्यासाठी आमची मने आता आसुसली आहेत.
===============================================
इति श्री सत्यकथायां द्वितीयोध्यायः .. श्री सत्यार्पणमस्तु. सत्यजगत् ,जगत् सत्य की जय.. !

पुढे चालू........
.........................................................अध्याय तिसरा...........................................................
साधुवाणी नावाचा एक व्यापारी होता. निरनिराळ्या गावी तो आपली जडजवाहिर आणि रत्नांनी भरलेली नौका घेऊन व्यापारासाठी हिंडत असे. हा साधुवाणी एक चतुर,हुशार,शहाणा आणि बुद्धिमान व्यापारी होता. व्यापारासाठी अर्थनीतीचा हरेक प्रकारे तो उपयोग करीत असे. असाच तो एक दिवस उल्कामुख नावाच्या राजाकडे व्यापारासाठी गेला. त्याच्या राज्यात व्यापाराची परवानगी मिळावी म्हणूनच तो त्याला प्रथम भेटायला गेला. सेवकांनी राजा उपासना मंदिरात गेलेला असल्याचे सांगितले. असे सतत तीन दिवस घडले. साधुवाण्याला राजाची भेट काहि केल्या लवकर मिळेना. अखेर चवथ्या दिवशी ती मिळाली. वाण्याने राजाला त्या उपासना मंदिरातून बाहेर आलेला दिसता क्षणीच तेथे दंडवत घातला. राजाने त्याला भेटीचे कारण पुसले असता, वाण्याने त्याच्या राज्यात आपल्याला व्यापारी परवाना मिळावयास हवा असल्याची विनंती त्याला केली. आणि नंतर लगेच बोलता झाला. "महाराज..मला अभय देऊन,माझ्या एका व्यापाराखेरिज असलेल्या शंकेचे निरसन कराल काय?" "बोला महाशय." राजा म्हणाला. "तुम्ही एव्हढे मोठे राजे..तुमच्यापाशी कमी, ते काय असणार? जे तुम्ही भगवंताची एव्हढी तीन तीन दिवस विना खंड उपासना करता? राजाकडे तर धनधान्य,सैन्य,प्रासाद इत्यादी पैकी काहिच कमी नसते.मग हे भगवंताकडचे एव्हढे मागणे तरी कसले? आणि ते देणारा तो भगवंत तरी कुठचा? मलाही सांगाल काय?" राजा मंद हास्य करित उत्तरला. "हे वाण्या..तू तुझ्या व्यापारी बुद्धिने जो विचार करतो आहेस,त्यानुसार तुझे मनोगत सुसंगत आहे. परंतू राज्य ..तू म्हणतोस ह्या ऐहिक साधनांमुळे चालते थोडेच? ते तर त्यांमुळे फक्त जिवंत रहाते. म्हणूनच ह्या गोष्टी मी भगवंताजवळ कधि मागितल्या नाहीत,मागणारंही नाही. हे मंदिर देखिल या भूतलावरील प्रस्थापित अश्या कोणत्याही एका धर्माचे नाही ,ना त्यातील देवता त्या धर्माच्या कल्पनांशी आणि तत्वज्ञानांशी संबंधित आहे. हे मंदिर आहे,ते माझ्या मनोदेवतेचे! मीच त्याचा निर्मिक ,पूजक,प्रथम अनुयायी आणि त्यायोगे आचरक देखिल! मी त्या मनोदेवतेकडून हे राज्य चालवायला बळ,मार्गदर्शन मिळवत असतो. माझ्या देवाचं...नव्हे नव्हे माझ्या त्या मैत्राचं नाव "विवेक". "

या उत्तराने साधुवाणी प्रभावित झाला. पुढे राजाकडून व्यापारि परवाना मिळवून तो तिथे काहिकाळातच एक कुशल व्यापारी,म्हणून स्थिरावला. आता त्याला असे वाटू लागले,की "मि ही राजाप्रमाणेच एक मंदिर का बांधू नये? राजाला जर त्याच्या मनोदेवतेकडून त्याला हवे ते हवे तसे प्राप्त होते..तर या न्यायानी ते मलाही प्राप्त झाले पाहिजे." हा मनोदय त्यानी आपल्या पत्नीला म्हणजेच लीलावतीला बोलून दाखविला. तिनेही त्यास सहजपणाने संमती दिली. मग दुसरे दिवशी या वाण्याने आपल्या घरामागील भागात राजाच्या मंदिरासारखेच एक छोटे मंदिर बांधून घेतले. आणि दोघांनी तिथे जाऊन मनोदेवतेला प्रार्थना केली.. "आमच्या जीवनात जे जे काहि न्यून (कमी) असेल, ते ते तू पूर्ण करून दे. जर ते प्राप्त झाले..तर आंम्ही तुझे हे मंदिर प्रतिवार्षिक आणखि सजवू..वाढवू" पुढे घडले असे, की हा वाणी विवाहानंतर जो अपत्यहीन होता..त्याला या अपत्यप्राप्ती न होण्यात आपल्यात तर काहि न्यून नाही ना? हा विचार मनास सतावू लागला. आणि मग त्याने तेथिल काहि कुशल वैद्यांना स्वतःची विवंचना सांगितली. तर त्याला जे वाटत होते..तेच घडले..त्याच्यामधे असलेल्या न्यूनतेचेच कारण वैद्यांनीही त्याला परिक्षणांती सांगितले. मग योग्य त्या उपचारांच्या परिणामी काहि दिवसातच त्यांच्या आयुष्यात तो मंगल क्षण आला. लीलावती गर्भार राहिली. आणि तिला कन्यारत्न प्राप्त झाले. वाण्यास मोठ्ठा आनंद जाहला. त्याने मनोदेवतेने दिलेल्या फळाचे हे शुभवर्तमान प्रथम उल्कामुख राजास जाऊन सांगितले. काय?कसे? घडले याची कहाणिही कथन केली. राजानी पुन्हा एकवार तेच मंद स्मितहास्य केले,आणि त्या वाण्यास शंभर मोहोरांची एक थैली भेट देऊन बोळविले. वाण्यास मनातून स्वाभावीकच आणखि हर्ष झाला. आणि तो मनातल्या मनात आणखि कल्पनांचे इमले रचू लागला.."जर मनोदेवतेकडे अपत्य मागितले..तर ती ते देते..मग आणखि इतरंही तिजकडे का मागू नये? तसेही विचार सुचतील..आणि ते ही मिळेलच की!"

याच खुशीत विहरत तो घरी गेला. पुढे ह्या कन्येची चंद्राच्या कलेप्रमाणे होणारी वाढ पाहून त्यांनी उभयतांनी तिचे नामकरण 'कलावती' असे केले. कालमानानी ही कन्या कलावती एक वर्षाची झाली. आता वाण्याची ही पत्नी लीलावती वाण्याला बोलल्याप्रमाणे मंदिर सजविण्या वाढविण्याविषयी आठवण देऊ लागली. परंतू वाणी अत्यंत चतुर. तो आपल्या भार्येचे काहितरी समाधान करवून देण्याकरिता तिला म्हणाला.."देव भावाचा भुकेला.तो पैश्यानी थोडाच मोठा होणार? आपण या मनोदेवतेकडे असेच काही मागत राहू..म्हणजे काय दर फलप्राप्तीनंतर हे मंदिर असेच वाढवत रहायचे काय? नपेक्षा आपण असे करू की कलावतीचा विवाह होइल,त्याच वेळी आपण ह्या मंदिराचे एक भव्य पुनर्निर्माण करू..ज्यायोगे मधिल सर्व मनोरथपूर्तीचेही माप आपल्याला त्या मंदिराचे ठायी भरभरून एकदाच देता येइल.आणि त्यावेळी तेथे असलेल्या उपस्थितांनाही याचे महात्म्य समजेल. अनेकांना याची प्रचितीही येइल. तेंव्हा...,अत्ता हे मंदिर वाढवून अल्पसंतुष्टी कशाला करा?" त्याच्या या चतुर उत्तरानी लीलावती समाधान पावली. कालमान पुढे पुढे सरकू लागले.साधुवाणी मनोदेवतेकडे दररोज व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रामधील यशस्वितेसाठी प्रार्थना करून कोणत्याही प्रकारची साधने आणि मार्ग मागू लागला. आणि ती त्याला त्याच्या लालसी स्वभावानी भरपूर मिळूही लागली. व्यापारामधे प्रत्येक प्रकारे यशस्वी होण्यासाठी तो मिळेल त्या मार्गाचा अवलंब करू लागला. व हे सर्व "माझी मनोदेवताच मला सुचवत असेल..तर त्यात माझी चूक काय? शेवटी हे त्या देवतेकडून आपणहून मिळालेले वरदान..मग त्यात गैर ते काय?" असे त्याचे मनात समर्थनंही करू लागला.
पुढे ही कन्या कलावती विवाहयोग्य वयाची झाली. मग साधुवाण्याने तिच्यासाठी, घरजावई होऊन आपणास व्यापारात मदत करण्याची अट मान्य असलेला..असा एक योग्य वर शोधला..आणि त्याच मनोदेवतेच्या मंदिरात त्यानी त्यांचे थाटमाटानी लग्नहि लाऊन दिले. लीलावतीला दिलेले मंदिराच्या पुनर्निर्माणाचे वचन हे तिच्या मनाच्या समाधानास्तवच दिलेले असल्याने..ते वाण्यानी लक्षात ठेवलेले नव्हतेच..काळाच्या ओघात लीलावतीही ते विसरून गेली. परंतू हे वचनभंगाचे घटीत होते साधुवाण्याचे. आणि ते ही स्वतःच्याच मनोदेवतेजवळ केलेले..मग ती देवता त्याचे फळ पुरेपुर त्याच्या पदरात टाकावयास चुकणार थोडीच!? शेवटी ती ही मनुष्यधर्माच्या नियमांनी बद्ध आहेच की! पुढे घडलेही तसेच...

साधुवाण्याच्या.., ग्राहकांना विक्रीच्या वेळेस भलीमोठ्ठी लोभस वचने देण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्या व्यापाराचा अवाका एव्हढा वाढला की तो संपात्तीच्या हिशोबात अगदी उल्कामुख राजाच्याही वरचढ ठरू लागला.यामुळे राज्यामधे त्याला आणखि मानमरातब मिळू लागला. उल्कामुखाचे मंत्रिगणंही , या वाण्याला राज्याच्या एखाद्या विभागाचे अधिकारी बनवून राज्य अधिक सबल करावे अशी गळ राजाला नेहमी घालू लागले. पण उल्कामुखंही काहि कमी चतुर नव्हता. एक दिवस त्यानी विधिपूर्वक या वाण्याला आपल्या राज्याचे महसूलमंत्रीपद देववून टाकले. आणि पहिल्या महसूल अधिकार्‍यास वाण्याच्या हताखाली कामास नेमले. आता साधुवाणी आपला (मूळ)सर्व व्यापार जावयाचे हाती सोपवून ह्या मंत्रीपदाचा कारभार पाहू लागला. व पुढे आपल्या या मनोमंदिरात रोज जाऊन, "याही नविन क्षेत्रात (काहिहि करून) मला प्रचंड सफलता दे" अशी मागणी तो करू लागला. मग तश्याच बुद्धिने प्रेरीत होऊन त्याचे हातून सदर पदाचा कारभारंही घडू लागला. उल्कामुखालाही नेमके हेच अभिप्रेत होते. तो वाण्याच्या सर्व हलचालींवर आपल्या पूर्वमहसूल अधिकार्‍याचे मार्फत बारिक कसून लक्ष ठेऊ लागला. व एक दिवस आपल्या बंदरात आलेल्या एका व्यापारी जहाजातील काहि संपत्ती साधुवाण्याने महसूलाच्या नावाखाली स्वतःच्या प्रासादात वळती करत असताना त्याने त्याला रंगेहाथ पकडले. झाले...पुढे न्यायाधीशा समोर सर्व निवाडा होऊन वाण्याचा गुन्हा सिद्ध झाला. शिवाय साधुवाण्याला त्याची मूळ व्यवसायातली संपत्तीही नेमकी कोणत्या प्रकारे जमविली आहे? या चौकशीला सामोरे जावे लागले. त्यात स्वाभाविकच साधुवाण्याची सारी पूर्व व वर्तमान व्यावसायिक पातके उघडकीस आली..आणि या वर्तमान पातकात त्याचा जावईही त्याने सहभागी करवून घेतल्याचे उघड झाले. परिणामी त्या दोघांसही सर्व स्थावर मालमत्ता जप्त होऊन तुरुंगात बंदिस्त व्हावे लागले. मग आता काय? दु:खच दु:ख! जेव्हढ्या प्रमाणात गैरमार्गानी संपत्ती जमविली होती तेव्हढ्या प्रमाणात दु:ख्ख! आणि मनापुढे सारा अंधःकारच अंधःकार..त्या राजाने दिलेल्या कोठडी इतकाच शाश्वत परंतू कोठून तरी प्रकाशाची अंधुक किरणे येणाराही!

इकडे सारीच संपत्ती गेल्यामुळे लीलावती व कलावती यांचेवर विपन्नावस्था आली. मग त्यांनी आपले रहाते घर विकून त्यातील ते मनोदेवतेचे मंदिर तेव्हढे आपल्याला ठेवले. व त्या मिळालेल्या धनाच्या सहाय्याने त्या तेथे आपला उदरनिर्वाह पाहू लागल्या. याखेरिज जे हाताला मिळेल ते काम करून त्या आपला जीवंही त्यात गुंतवू लागल्या..त्यायोगे दोन पैसे ही पदरी पडल्याचे समाधान , त्यांना त्या विपन्नावस्थेत मोलाची मदत करू लागले. पैसा हा पोटाला अन्न देतो,पण तो श्रमातून मिळवलेला असेल तर त्या अन्नासह त्या मिळवणुकिचे समाधानही देतो..मनुष्यजातीचा हा ही एक मानसिक निर्वाहाचाच भाग आहे. ह्या सत्याची समज त्यांना ह्या विपन्नावस्थेनी करवून दिली. त्यामुळे त्यांचे मन हळूहळू स्थिरावू लागले. आणि एक दिवस लीलावतीला आपल्याच या मनाची प्रचिती आली. व तिने आपल्या मुलीला "तू या आपण सध्या जिथे राहतो,त्या मनोमंदिराचेच फळ आहेस" असे सांगितले. त्या मागिल घटनाही सांगितल्या . त्या समंजस मुलिलाही आपल्या बापाच्या वागण्यातील विचित्र सवयींचे अधिष्ठान कशात आहे? याचे ज्ञान झाले. त्यामुळे तिचाही राग हळूहळू शांत झाला. आणि हे सर्व पुन्हा घडत होते,ते त्या मनोमंदिरातच. (व्यक्ति बदलल्या होत्या..जागा तीच होती.)

सूत शौनकादी ऋषिंना म्हणतात , "हे ऋषिहो..स्वतःचे मन असो किंवा आणखि काही.. साधनाचि लायकता, ही साधकाच्या व्यवहाराबाहेर कधीच जात नसते..हेच सत्य या सर्व कथेवरून प्रमाणित होत नाही काय?" भारावून ऐकत असलेले हे शौनकादी ऋषिगण त्वरेने म्हणाले "होय..मुनिवर होय.. व्यक्ति आणि सामाज यातील व्यवहारांच्या सत्यांचे हे परिणामात्मक खडखडीत वास्तव ..असे आंम्ही यापूर्वी न कधी पाहिले..न ऐकले. .. परंतू हे अपुरे आहे .साधुवाण्याला मिळायचे ते फळ मिळाले.. पण त्याच्या काहिही दोष नसलेल्या त्या कुटुंबियांचे पुढे काय झाले मग??? .. हे ही सांगा..."
=================================================
इति श्री सत्यकथायां तृतीयोध्यायः .. श्री सत्यार्पणमस्तु. सत्यजगत् ,जगत् सत्य की जय.. !
..........................................
क्रमशः

संस्कृतीधर्मकथाविचारमतविरंगुळा

प्रतिक्रिया

बोला सत्यनारायण भगवान की..... जय!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2015 - 7:51 am | अत्रुप्त आत्मा

ही पारंपारिक सत्य-नारायणाची कथा नाही.

कंजूस's picture

7 Aug 2015 - 3:44 am | कंजूस

भगवान की..... जय! ,अगदी कृष्णाबाई महाराज की जय! हे "की " जय मराठीत कधी आले असेल?

प्रचेतस's picture

7 Aug 2015 - 8:50 am | प्रचेतस

हाही भाग रोचक.

वा! फारच छान! आयुष्यात कधी सत्यनारायण घातला तर तुमच्याकडूनच घालून घेणार आणि हीच कथा सांगायला लावणार.