नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४
खराब हवामानाने जर्मनीच्या समादेश साखळीत चांगलीच शिथिलता आली. जवळजवळ सगळ्याच मुख्यालयातून ‘आता लगेच काही आक्रमण होत नाही’ असे बोलले जाऊ लागले. हा निष्कर्ष त्यांनी दोस्तांची आत्तापर्यंतची जी समुद्री किनार्यावरची आक्रमणे उत्तर आफ्रिका, इटली व सिसिलीच्या किनार्यावर झाली होती, त्या अनुभवावरुन काढला होता. त्यात त्यांनी मोठीच चूक केली असे म्हणावे लागेल. त्या आक्रमणात दोस्तांची सगळी आक्रमणे ही हवामानाचा अभ्यास करुन त्यांना सुयोग्य असे हवामान झाल्यावरच झाली होती. जर्मन माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत अशा हवामानात आक्रमण करणे बसत नव्हते आणि अमेरिका तसे करेल यावरही त्यांचा विश्वास नव्हता.
रोमेल जरी हजर नसला तरी आर्मी ‘ग्रुप बी’ मधे त्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे जोरदार काम चालले होते. सध्याच्या कंटाळवाण्या परिस्थितीत त्याचा चिफ ऑफ स्टाफ मे. जनरल डॉ. स्पायडेलने एक मेजवानी आयोजित करणे काही वावगे समजले नाही. त्याने अनेक मित्रांना आमंत्रण दिले होते व त्यातच अर्न्स्ट जुंगर नावाचा प्रसिद्ध लेखक व तत्ववेत्ताही होता. स्पायडेल आतुरतेने त्या भेटीची वाट बघत होता कारण त्या दोघांनाही एका विषयात अत्यंत रस होता तो म्हणजे फ्रान्सचे साहित्य. त्याला त्याच्याबरोबर अजून एका महत्वाच्या विषयावर त्याच्याबरोबर चर्चा करावी लागणार होती. या माणसाने हिटलरला सत्ताभ्रष्ट केल्यावर दोस्तांशी कशी बोलणी करावीत यावर एक दस्तावेज तयार केला होता. रोमेल व स्पायडेलला त्याने याच्या प्रती दिल्या होत्या. ‘याही विषयावर आपल्याला बोलायचे आहे’ स्पायडेलने त्याला आमंत्रण देताना आठवण करुन दिली होती....
जर्मनीच्या ८४ कोअरच्या सेंट लुईच्या मुख्यालयात मेजर फ्रेडरिक हाईन त्याच्या साहेबाच्या वाढदिवसाची तयारी करत होता. कमांडर एरिक मार्कसचा वाढदिवस सहा जूनला होता. आज रात्री त्यांनी त्यांच्या कमांडरला मेजवानी देऊन आश्चर्याचा धक्का द्यायचे ठरविले होते कारण मार्कस् उद्या पहाटे ब्रिटनीला जाणार होता. तेथे जर्मन सैन्यातील अनेक अधिकारी नकाशावरील लुटुपुटीच्या लढाईत भाग घेण्यासाठी चालले होते. त्यातच हाही भाग घेणार होता. या लढाईची सगळीकडे चर्चाच चर्चा होती कारण या सैद्धांतिक लढाईचा विषय होता ‘दोस्तांचे नॉर्मंडीवर आक्रमण’. या कागदावरच्या सरावाने सातव्या आर्मीचा चीफ स्टाफ ऑफिसर ब्रि. जनरल पेम्सेल काळजीत पडला. या अशा काळात नॉर्मंडी आणि चेरबोर्गच्या आघाडीवरील जवळजवळ सर्व कमांडर आघाडीवर गैरहजर असणार, या कल्पनेनेच त्याला बेचैन केले. हल्ला झाला तर पहाटेच होणार याची त्याला खात्री असल्यामुळे त्याने तातडीने सर्व आधिकार्यांना तारा पाठविल्या. त्यात म्हटले होते, ‘ज्यांना या सरावाच्या लढाईसाठी जायचे आहे त्यांनी आज रात्री किंवा पहाटे न जाता उद्या सकाळी निघावे’. पण हा आदेश देण्यास त्याला उशीर झाला. बर्याचशा अधिकार्यांनी अगोदरच त्यांची जागा सोडली होती. एका मागून एक अधिकारी युद्धाच्या आदल्या दिवशीच त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले. आघाडीवर फार कमी अधिकारी शिल्लक राहिले हे जर्मनीचे दुर्दैव. प्रत्येकाला जाण्यासाठी योग्य कारण होते पण त्यांच्या गैरहजेरीने परिणाम व्हायचा तो झालाच. जणू काही दैवानेच या अधिकार्यांना अशा महत्वाच्या काळात रजा दिली होती. रोमेल व बी आर्मीचा कमांडर टेंपलहॉफ हे दोघे जर्मनीत होते. मेजर जनरल हाईंझ हेलेमिच जो चेरबोर्गच्या द्वीपकल्पाची आघाडी संभाळत होता तो त्या सरावासाठी रेनेमधे होता. ७०९ डिव्हिजनचा मेजर जनरल कार्ल श्लिघबेन, ९१- एअर लँडिंग डिव्हिजनचा ब्रि. जनरल फॅली हे नॉर्मंडीला आले होते पण तेही रेनेला जाण्यासाठी. रुनस्टेडच्या हेरखात्याचा प्रमुख कर्नल डिटरिंगही नुकताच रजेवर गेला होता. खुद्द हिटलर या काळात बव्हेरियामधे विश्रांती घेण्यासाठी रवाना झाला होता.
या सगळ्या गोंधळातच लुफ्तवाफने त्यांची स्क्वाड्रन्स नॉर्मंडीपासून दूर हलविली. जर्मन वैमानिक तो निर्णय ऐकून आवाक झाले..... ही विमाने म्हणे त्यांना जर्मनीच्या संरक्षणासाठी हवी होती कारण ब्रिटनचे जर्मनीवरील हल्ले आता जोरात चालू झाले होते. शत्रूचे आकाशात वर्चस्व असताना जर्मनीच्या सेनाधिकार्यांना ही स्क्वाड्रन्स फ्रान्समधे उघड्यावर नष्ट होण्यासाठी ठेवणे परवडणारे नव्हते म्हणून त्यांनी ती तेथून हलविली असेही सांगितले जाते. त्याला थोडाफार विरोध झाल्यावर हिटलरने फ्रान्स येथे तैनात असलेल्या सेनाधिकार्यांना आश्वासन दिले की जर आक्रमण झाले तर किनार्यावर लुफ्तवाफची हजार विमाने बाँबवर्षाव करतील. पण अर्थातच तसले काही झाले नाही. चार जूनला फ्रान्समधे जर्मनीची फक्त १८३ लढाऊ विमाने होती. त्यातील एकशेसाठ विमानांना थोडीफार दुरुस्तीची आवश्यकता होती. त्यातील १२४ त्याच दिवशी हलविण्यात येणार होती.
१५व्या आर्मीच्या ताब्यातील लिल नावाच्या गावातील त्याच्या कार्यालयात कर्नल जोसेफ प्रिलर त्याच्या साहेबाशी दूरध्वनीवर बोलत होता. प्रिलर हा लुफ्तवाफचा अत्यंत निष्णात वैमानिक होता व त्याने आत्तापर्यंत शत्रूची ९१ विमाने पाडली होती.
‘हा शुद्ध वेडेपणा आहे’ तो ओरडला. ‘जर आक्रमण होणार आहे तर युद्धभूमिपासून विमाने दूर हलविणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. समजा मी माझे स्क्वाड्रन हलवितानाच हल्ला झाला तर ? ग्रुप कमांडरने उत्तर दिले, ‘ते आक्रमण वगैरे काही होणार नाही... हवा किती खराब आहे ते पाहिलेस का?’ ते ऐकून प्रिलरने टेलिफोन खाली आपटला व त्याच्या सार्जंटला म्हणाला,‘काय करणार आपण? बहुतेक आक्रमण झाले तर ते आपण दोघांनीच परतववून लावावी अशी त्यांची इच्छा दिसते ! जाऊदे मरु देत.. सध्या तरी आपण मद्यपान करु....’ आता त्या विमानतळावर फक्त दोनच विमाने उरली....
फ्रान्समधील लाखो जनता आता आक्रमणाची आतुरतेने वाट बघत होती पण यातील बारा जणांना हे आक्रमण होणारच आहे याची खात्री होती कारण ते होते फ्रान्सचे भूमिगत स्वातंत्र्ययोद्धे. या संघटना गेली चार वर्षे चिवटपणे त्यांचे युद्ध लढत होत्या. हजारो कार्यकर्त्यांची धरपकड झाली, हजारोंना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्या क्षणासाठी ते एवढे चिवटपणे लढले तो क्षण आता केव्हाही येणार होता. अर्थात त्यातील सगळ्यांना हे माहीत नव्हते. गेले काही दिवस या सैनिकांना अक्षरश: हजारो संदेश बी.बी.सीवरुन मिळाले व त्यातील एकाने त्यांना हे समजले होते की आता कुठल्याही क्षणी आक्रमण होऊ शकेल. जो संदेश जर्मनीच्या ले. कर्नल मायर्सने पकडला होता तोच तो संदेश. कॅनॅरिसची माहिती बरोबर होती. या संघटनाही याच संदेशाच्या दुसर्या भागाची वाट बघत तयार झाल्या. त्यांना या संदेशाशी जुळणारा दुसरा भाग मिळाला की घातपाती कारवाया करायच्या होत्या.....
आक्रमणासाठी दोनपैकी एक संदेश प्रसारित होणार होता. एक होता ‘इट इज हॉट इन सुएझ’. हा संदेश मिळाल्यावर ‘ग्रीन प्लॅन’ अमलात येणार होता तर ‘द डाईस आर ऑन द टेबल’ हा संदेश मिळाल्यावर ‘रेड प्लॅन’ अमलात येणार होता. ग्रीन प्लॅनमधे रेल्वेचे जाळे उध्वस्त करायचे होते तर रेडमधे दूरध्वनी व संदेशवहनाचे जाळे उध्वस्त करायचे होते.
सोमवारी म्हणजे डी-डेच्या संध्याकाळी बी. बी. सी वर एक संदेश प्रसारित झाला. ‘द डाईस आर ऑन द टेबल....नेपोलिअन्स हॅट इस इन द रिंग.....द अॅ.रो विल नॉट पास....’
भूमिगत संघटनांच्या नेत्यांनी हा संदेश ताबडतोब त्यांच्या अनुनयांना पोहोचता केला. त्यांच्या प्रत्येक गटाला यानंतर काय करायचे आहे हे पक्के ठाऊक होते. केनच्या स्टेशनमास्तरला, अल्बर्ट ऑग आणि त्याच्या माणसांना रेल्वेयार्डमधील पाण्याचे पंप नष्ट करायचे होते. नंतर सगळ्या रेल्वे इजिनांची वाफेची यंत्रणा नादुरुस्त करायची होती. लिउ फॉन्टेन येथील कॅफेच्या मालकाला, आन्द्रेला, नॉर्मंडीच्या दळणवळण व्यवस्थेचा गळा घोटायचा होता. त्याच्या चाळीस माणसांना चेरबोर्गमधून निघणार्या जाडजूड तारा कापायच्या होत्या. चेरबोर्गमधील एका दुकानाचा मालक व त्याच्या माणसांवर, ग्रेसेलिनवर चेरबोर्ग-पॅरिस हा रेल्वे मार्ग डायनामाईटने उध्वस्त करायची जबाबदारी टाकण्यात आली होती. जेथे आक्रमण होणार होते त्या किनारपट्टीवर, पार ब्रिटनीपासून बेल्जियमच्या सरहद्दीपर्यंत कार्यकर्ते नेमून दिलेल्या घातपाती कारवायांच्या तयारीस लागले.
विरे नदीच्या मुखाशी असलेल्या ग्रँडकँप नावाच्या गावात मॅरिऑनला वेगळीच काळजी पडली होती. त्याला ओमाह व उताह बीचच्या मधे जर्मनांनी विमानविरोधी तोफा आणून ठेवल्या होत्या ही बातमी दोस्तांपर्यंत पोहोचवायची होती. त्याला त्यावेळेस हे माहीत नव्हते पण सैनिकांना घेऊन जाणारी दोस्तांची विमाने याच मार्गावरुन जाणार होती.
त्याच दिवशी रात्री नऊ वाजता नॉर्मडीच्या किनारपट्टीवर जहाजांचा एक छोटा ताफा अवतरला. तो किनार्यावच्या इतक्या जवळ गेला की त्यावरील नौसैनिकांना किनार्यावरील घरे स्पष्ट दिसत होती. ही होती दोस्तांची पाणसुरुंग निकामी करण्याची जहाजे.
इकडे चॅनेलमधे हिटलरच्या युरोपचा समाचार घेण्यासाठी असंख्य युद्धनौकांच्या रांगा तयार होत होत्या. या कधीही न पाहिलेल्या आरमारात अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या एकूण २७२७ युद्धनौका होत्या. या आरमारात नवीनच दाखल झालेल्या वेगवान मालवाहतुकीची जहाजे होती तसेच जुनाट जहाजेही होती. वाफेवर चालणारी जहाजे, तरंगती इस्पितळे, इंधनाचे टँकर. मोठ्या जहाजात किनार्यावर उतरण्यासाठी लागणार्या बोटी ठासून भरल्या होत्या. त्याची संख्या होती २५००. या भल्यामोठ्या आरमाराच्या पुढे होता पाणसुरुंग निकामी करणार्या जहाजांचा ताफा. त्यांच्याबरोबर अनेक प्रकारची जहाजेही होती. त्या जहाजांच्या वर बराज बलून्स तरंगत होते. ढगांच्या आवरणाखाली विमाने सराव करत होती. या सगळ्या जहाजांच्या बरोबर ७०० युद्धनौकांचा ताफा होता. या युद्धनौकाही सैनिक, गाड्या, रणगाडे, तोफा व इतर युद्धसाहित्याने खचाखच भरल्या होत्या.
अमेरिकेच्या सैन्याला वाहून नेणार्या जहाजांच्या ताफ्यात अग्रभागी होती युएस्एस् ऑगस्टा ज्याचा प्रमुख होता रेअर अॅडमिरल कर्क. या ताफ्यात एकूण १९ जहाजे होती जी ओमाह व उटाह किनार्यावर सेना उतरविणार होत्या. त्याच जहाजाशेजारी एच्एमएस् रॅमिलेस, वॉरस्पाईट, युएस्एस् टेक्सास, अॅवराकान्स, व नेवाडा मोठ्या डौलात उभ्या होत्या.
स्वोर्ड, जुनो व गोल्ड या किनार्यावर चालून जाणार्या ताफ्यात एकूण ३८ ब्रिटिश व कॅनेडियन जहाजे होती. या ताफ्याचे नेतृत्व रेअर अॅएडमिरल सर फिलिप व्हिअॅ्नची एच् एम् एस् स्कायला करणार होती. याच युद्धनौकेने बिस्मार्कला शोधून काढण्यात मोलाची कामगिरी बजाविली होती. जवळच माँटेव्हिडिओच्या बंदरात जर्मन ग्रॅफ स्पी नष्ट करण्यात सहभाग असलेली अॅगजॅक्स उभी होती. इतरही एन्टरप्राईज, ब्लॅक प्रिंन्स, टुस्कालुसा, क्विन्सीसारख्या अनेक प्रसिद्ध युद्धनौका तेथे उभ्या होत्या.
या ताफ्यात अनेक देशांच्या युद्धनौकाही सामील झाल्या होत्या. उदा. डचांची सोम्बा, जी एक पाणबुडीविरोधी नौका होती, कॅनडाच्या तीन युद्धनौका, नॉर्वेची स्वेनेर व पोलंडची पायोरन.
जहाजांचा व युद्धनौकांचा हा अजस्र ताफा हळूहळू चॅनेलमधून मार्गक्रमण करु लागला. त्याची गती धीमी पण आखलेल्या नागमोडी मार्गावरुन होत होती. असा प्रयत्न प्रथमच करण्यात येत होता. ब्रिटनच्या सर्व बंदरातून वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा बोटी बाहेर पडून खोल समुद्रावर जमण्याच्या ठिकाणी मार्गक्रमण करु लागल्या. ही जागा आईल ऑफ वाईटच्या दक्षिणेस होती. तेथे त्यांची विभागणी करण्यात आली व आपापल्या लक्ष्यावर त्या रवाना झाल्या. त्या जागेचे सैनिकांकडून लगेचच नामकरण करण्यात आले, ‘पिकॅडली सर्कस’. त्या सगळ्या ताफ्यांचे मार्ग बॉय पेरुन अधोरेखित करण्यात आले होते.
पुढच्या संकटांची व युद्धाची जाणीव असतानासुद्धा सैनिकांनी एकदाचे आक्रमण सुरु झाले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला. वातावरणात तणाव भरला होता, पण सैनिकांना कधी एकदा या युद्धाचा निकाल लागतोय असे झाले होते. सैनिकांना किनार्याणवर उतरविणार्या, बोटींवर सैनिक शेवटची पत्रे लिहीत होते तर काही जण पत्ते खेळत होते. काहीजण बोटीवरच्या पाद्य्रांबरोबर प्रार्थनेत गुंतले होते. आश्चर्य म्हणजे जे सैनिक दोन दिवसांपूर्वी चॅनेलवर ते या युद्धात जिवंत राहतील का याची काळजी करत होते तेच आता किनार्यांवर उतरण्यास अधीर झाले होते. एखादा साथीचा आजार पसरावा तसा त्या जहाजांवर सर्व सैनिकांना उलट्या व मळमळण्याचा त्रास होत होता. प्रत्येक सैनिकाला त्या आजारावरची औषधे देण्यात आली होती तसेच ओकण्यासाठी पिशव्याही देण्यात आल्या होत्या. लष्करी कार्यक्षमतेचा ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड हा परोमच्च बिंदू होता पण तरीही काही उणिवा राहिल्या होत्याच. एक सार्जंट म्हणाला, ‘ओकण्याच्या पिशव्या भरल्या होत्या, वाळूच्या बादल्या भरल्या.....’
काही सैनिक त्याही अवस्थेत वाचण्याचा प्रयत्न करीत होते. त्या पुस्तकांवर नजर टाकली तर त्या पुस्तकांचे सध्याच्या परिस्थितीशी काहीही घेणेदेणे नव्हते असे लक्षात येईल. चॅप्लेन (पाद्री) लॉरेन्सला एक ब्रिटिश आधिकारी लॅटीनमधे लिहिलेले ‘ओडेस’ वाचताना बघून आश्चर्य वाटले. हा पाद्री स्वत: पहिल्या लाटेत ओमाहाच्या किनार्यावर उतरणार होता व ‘लाईफ ऑफ मायकेलअँजेलो’ हे पुस्तक वाचत होता. जवळच एका बोटीजवळ कॅनडाचा कॅप्टन डग्लस एक मोठे पुस्तक वाचून दाखवत होता जे त्या रात्रीच्या परिस्थितीशी सुसंगत होते. तो बायबलमधील ‘द लॉर्ड इज माय शेफर्ड......’ हे वचन वाचून दाखवित होता.
अंदाजे त्याच रात्री सव्वादहानंतर जर्मनीच्या ११५व्या आर्मीचा लष्करी हेरखात्याचा प्रमुख ले. कर्नल मेयर धावतपळत त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला. त्याला कारणही तसेच होते. त्याच्या हातात टेलिप्रिंटरचा एक कागद फडफडत होता ज्याची तो वर्षभर वाट पहात होता. त्या संदेशावरुन त्याची आता खात्री झाली होती की आता येत्या ४८ तासात शत्रूचे आक्रमण होणार आहे. या संदेशामुळे दोस्तांच्या सैन्याला किनार्याावरच प्रतिकार करुन परत मागे लोटणे आता सहज शक्य होते. तो संदेश बी.बी.सीवरुन फ्रान्सच्या भूमिगत लढवैय्यांसाठी होता. फ्रेंच भाषेतील एका कवितेची दुसरी ओळ होती ती.
ले. कर्नल मेयरने धावतपळत जेवणाची मेस गाठली. तेथे जनरल हॅन्स सालमुथने त्याच्या आधिकार्यांबरोबर ब्रीजचा डाव मांडला होता.
‘जनरल, संदेशाचा दुसरा भाग प्रसारित झाला आहे.’ मेयर धापा टाकत म्हणाला.
जनरल सालमुथने क्षणभर विचार केला आणि १५व्या आर्मीला दक्ष राहण्याचा आदेश दिला.
इग्लंडच्या सर्व विमानतळांवर दोस्त राष्ट्रांचे विमानातून जाणारे सैन्यदल विमानांत व ग्लायडरमधे चढत होते. त्या काळ्याकुट्ट अंधारात विमानांमधे चढण्यासाठी त्यांनी रांगा लावल्या. विमाने आकाशात जाऊन घिरट्या घालत ठरलेल्या रचनेत उडत होती. १०१-एअरबोर्न डिव्हिजनच्या न्युबेरी येथील मुख्यालयात जनरल आयसेनहॉवर त्याच्या आधिकार्यांबरोबर ही विमाने आकाशात झेपवताना पहात होता. तेथे चार युद्धवार्ताहरही उपस्थित होते. आयसेनहॉव्हरने आपल्या विजारीच्या खिशात हात खुपसले व आकाशात नजर टाकली. अंधारात एकामागून एक विमान धावपट्टीवरुन आकाशात झेपावत होते. विमानांचा तो अवाढव्य ताफा फ्रान्सच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता. त्या वार्ताहरांपैकी एकाने आपल्या सर्वोच्च सेनापतीवर नजर टाकली.
आयसेनहॉवरच्या डोळ्यात ते दृष्य पहात असताना पाणी तराळले होते.
काहीच मिनिटात चॅनेलवर मार्गक्रमण कराणार्या जहाजांवर असणार्या सैनिकांना या विमानांचा आवाज अस्पष्ट ऐकू आला. जशी विमाने त्यांच्या डोक्यावरुन जात होती तसा हा आवाज मोठा होत गेला. त्या जहाजांना पार करण्यास या विमानांना जवळजवळ तास लागला. हळूहळू त्या विमानांच्या इंजिनांचा आवाज कमी कमी होत नाहिसा झाला. त्या जहाजांवर सैनिक आकाशाकडे डोळे लावून बसले होते. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेवटच्या विमानाच्या पंखाखालचे दिवे लुकलुकले. बिनतारी संदेशाच्या मोर्सकोडमधील तो एक संदेश होता ‘व्ही फॉर विक्टरी’.
सहा जूनच्या मध्यरात्री जर्मनीच्या ३५२ डिव्हिजनच्या मेजर वॉर्नर प्लुस्काटला आकाशातून येणार्या घोंघावणार्या आवाजाने जाग आली. तो त्यावेळी नॉर्मंडीपासून चार मैलावर असलेल्या त्याच्या मुख्यालयात गाढ झोपेत होता. त्या आवाजाने दचकून त्याने त्याच्या रेजिमेंट कमांडरला फोन लावला. ‘काय होतंय ? तो फोनवर किंचाळला. त्याच्या या फोनने ले. कर्नल ऑकर खूष झालेला दिसला नाही. ‘मित्रा, काय चालले आहे याची आम्हाला अजून नीट कल्पना नाही. आम्हाला कळले की तुला कळवेनच.’ असे म्हणून त्याने चिडून फोन ठेवून दिला. अर्थात प्लुस्काटचे या उत्तराने अजिबात समाधान झाले नाही. गेली वीस मिनिटे शत्रूची विमाने सतत त्याच्या विभागात बाँबवर्षाव करीत होती. या विभागाचे नाव काहीच काळात ओमाह बीच होऊन प्रसिद्ध पावणार होते.
अस्वस्थ होत प्लुस्काटने परत डिव्हिजनच्या मुख्यालयात फोन लावला. त्याचा फोन उचलला ३५२ रेजिमेंटच्या इंटेलिजन्स अधिकारी मे. बॉक याने. तो म्हणाला, ‘प्लुस्काट नेहमीप्रमाणे बाँबवर्षाव असेल. अजून काही निश्चित माहिती हाती आलेली नाही’.
स्वत:च्या बावळटपणामुळे ओशाळून त्याने फोन ठेऊन दिला. ‘कदाचित आपण उगीचच उत्तेजित होतोय’ त्याने स्वत:ची मनाशीच समजूत घातली. शिवाय धोक्याची कसलीही सूचना आली नव्हती. गेले कित्येक दिवस अनेक वेळा अशा सूचना आल्या होत्या व नंतर रद्द करण्यात आल्या होत्या. आजचा पहिला दिवस होता जेव्हा सैनिकांना त्या सूचनांपासून सुटका मिळाली होती व त्यांना थोडा आराम मिळत होता. पण प्लुस्काटची झोप उडाली ती उडालीच. तो त्याच्या बिछान्यावर थोडावेळ बसला. त्याच्या पायाशी त्याचा हारास नावाचा ऑल्सेशियन कुत्रा पहुडला होता. दूरवर त्याला अजूनही बाँब फुटण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यातच त्याला विमानांची घरघरही ऐकू येत होती. अचानक त्याचा फोन वाजला. प्लुस्काटने झडप घालून तो उचलला.
‘शत्रूचे छत्रीधारी सैनिक उतरले आहेत. तुझ्या सैनिकांना सावध कर आणि ताबडतोब किनार्यावर जा. कदाचित हे आक्रमण असू शकेल.’ कर्नल ऑकर शांतपणे सांगत होता. काही मिनिटातच प्लुस्काट, कॅ. विल्केनिंग व ले. थिन, हॉनराईन किनार्यावरील एका टेकाडावर बांधलेल्या टेहळणी बंकरकडे निघाले. प्लुस्काटला आता एकच काळजी होती ती म्हणजे त्याच्या तोफखान्याकडे फक्त चोवीस तास पुरेल एवढाच दारुगोळा होता. त्या टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला काटेरी तारांचे कुंपण घातले होते कारण इतरत्र भूसुरुंग पेरलेले होते. त्या बंकरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग होता. प्लुस्काटने त्या कड्याच्या टोकावर पोहोचल्यावर एका खंदकात प्रवेश केला. एका बोगद्याच्या कडेला असलेल्या काही पायर्या उतरुन त्याने एका बंकरमधे प्रवेश केला. त्यात तीन सैनिक टेहळणीसाठी नेमलेले होते. प्लुस्काटने लगेचच तोफखान्याच्या शक्तिशाली दुर्बिणीसमोर ठाण मांडले व त्याने ती दुर्बिण एका खाचेतून समुद्रावर रोखली. टेहळणीसाठी सगळ्यात सोयिस्कर अशा जागी ते ठाणे उभारले होते. खाली असलेल्या किनार्यापेक्षा शंभर फूट उंचावर असलेल्या त्या ठाण्यातून सर्व समुद्र व किनारा स्पष्ट दिसत होता. पश्चिमेला चेरबोर्गच्या द्वीपकल्पाचे टोक ते पूर्वेला ल्-हार्वेपर्यंतचा प्रदेश या ठाण्याच्या टप्प्यात आरामात येत होता. आत्तासुद्धा चंद्रप्रकाशात प्लुस्काट त्या देखाव्यावर खूष झाला. त्याने परत एकदा डावीकडून उजवीकडे आपली दुर्बिण फिरवून समुद्र व किनारा न्याहाळला. शेवटी मागे सरुन तो म्हणाला ‘काही दिसत नाहीए’ पण त्याचे अजून समाधान होत नव्हते. काहीतरी चुकते आहे असे त्याला सारखे वाटत होते. त्याने त्याच्या रेजिमेंटच्या मुख्यालयाला फोन लावला. ‘मी येथेच राहणार आहे !’ त्याने कर्नल ऑस्करला सांगितले. ‘कदाचित ती धोक्याची सूचना चुकीची असेलही पण काही व्हायचे असेल तर ते अजूनही होऊ शकते.’
हे सगळे होईपर्यंत जर्मनीच्या सातव्या आर्मीच्या नॉर्मंडीवरील कमांड पोस्टवर अनेक अहवाल सतत येत होते. सगळे अधिकारी या अहवालांची छाननी करण्यात गुंतले. काही ठिकाणी काही मानवी आकृत्या दिसल्या होत्या तर काही ठिकाणी झाडांवर छत्रीधारी सैनिकांची पॅराशूट लटकत असल्याचा अहवाल होता. या सगळ्याचा अर्थ हळू हळू स्पष्ट होता पण किती सैनिक उतरले, कोठे उतरले ? इत्यादि प्रश्नांची उत्तरे अजून मिळत नव्हती. कोणालाच कसलीच खात्री नव्हती त्यामुळे सातव्या व पंधराव्या आर्मीच्या मुख्यालयात कोणीच जबाबदारी घेऊन धोक्याची घंटा वाजविण्यास तयार नव्हते. परत एकदा ती सूचना खोटी ठरली तर ?.... घड्याळाचे काटे मात्र पुढे सरकत होते....
क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
2 Jul 2015 - 8:30 am | श्रीरंग_जोशी
थराराची वातावरणनिर्मिती जोरदार झाली आहे.
पुभाप्र.
2 Jul 2015 - 12:24 pm | एस
असेच म्हणतो.
2 Jul 2015 - 9:07 am | मुक्त विहारि
पु भा प्र....
कथानक जबरदस्त पकड घेत आहे.
2 Jul 2015 - 10:54 am | सौंदाळा
पुभाप्र.
काय झाले पुढे?
2 Jul 2015 - 3:00 pm | असंका
धन्यवाद या सुरेख मालिकेसाठी...!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
2 Jul 2015 - 3:55 pm | अस्वस्थामा
पुभाप्र. जयंत काका.. :)
मस्तच लिहिताय हो. कितीही वेळा याबद्दल वाचलं/पाहिलं तरी दर वेळेस काहीतरी नवीन समोर येतं. तो थरार अनुभवास येतोच येतो.
१९३० ते १९५० ही वर्षे जागतिकच नव्हे, मानवी इतिहासासाठी जबरदस्त अशी आहेत. त्यांनी शेकडो वर्षांच्या इतिहासाला सर्वच दृष्टीने बदलवून टाकलेय. पहिल्या महायुद्धात घोड्यावरुन लढणारे या दुसर्या महायुद्धात जेव्हा टॅक्ससाठी युद्धनिती आखत असतील तेव्हा त्यांच्यासाठी ते नवीनच सगळे पण तरीही त्यांनी ते आव्हान पेलले.
टँक्स, विमाने, पाणबुलाईन, संदेशवहन इ.इ. सगळेच आणि या सगळ्याला पूरक अशी इंडस्ट्री, सप्लाय लाईन हे सगळंच अद्भूत असं आहे.
या सगळ्यांचे शोध आणि निर्मिती याच काळातली. नवे देश, विचारसरण्या, जगाची राजकीय मांडणी इथूनच सुरु झाली.
हा डी-डे या सगळ्यातला शिरोमणी आणि "द लाँगेस्ट डे" हे त्याचं नाव पण अगदी यथायोग्यच वाटतं.
"बँड ऑफ ब्रदर्स" या सीरीजने प्रथम या थराराचा अनुभव दिला. इतक्या वर्षांनंतर यातला चार्म काही कमी झालेला नाही हेच जाणवलं मला तरी. :)
धन्यवाद..
16 Jul 2015 - 9:54 am | पैसा
एवढ्या मोठ्या हल्ल्याची किती प्रमाणात आणि किती पातळ्यांवर तयारी केली असेल! बीबीसीवरून हे संदेश कसे प्रक्षेपित होत होते? एखाद्या कार्यक्रमात ही वाक्ये बोलली जात होती का?