नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ६
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ७
पॅरिसच्या बाहेर असलेल्या त्याच्या मुख्यालयात जनरल रुनस्टेड केव्हाच या निष्कर्षाप्रत पोहोचला होता. पण त्याला अजूनही हे आक्रमण एका मोठ्या आक्रमणाचा एक छोटा भाग आहे व जर्मनीच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेले आहे असेच वाटत होते. तरीसुद्धा त्याने सावधगिरी म्हणून पँझरच्या दोन डिव्हिजन नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर रवाना होण्यासाठी तयार करण्याचा आदेश सोडला. या होत्या १२वी पँझर डिव्हिजन व पँझर लिआ डिव्हिजन. या दोन्ही डिव्हिजन्स पॅरिसच्या आसपास लपलेल्या होत्या. खरे तर या डिव्हिजन्स हलवायची खुद्द हिटलर सोडून कोणालाही परवानगी नव्हती पण जनरल रुनस्टेडने तो धोका पत्करायचा ठरविले. त्याला खात्री होती की हिटलर या आदेशाचा फेरविचार करणार नाही. परिस्थितीच तशी होती. आदेश दिल्यानंतर त्याने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिटलरची परवानगी मागण्यासाठी एक पत्र पाठवून दिले.
त्यावेळी हिटलर बव्हेरियामधील त्याच्या बेश्टेसगाडेन येथील मुख्यालयात होता. तो निरोप चिफ ऑग ऑपरेशन - कर्नल जनरल जोडल याच्या कार्यालयात पोहोचता करण्यात आला. जोडल झोपला होता आणि त्याच्या अधिकाऱ्यांना त्याला लगेचच उठविण्याइतकी आणिबाणी वाटली नाही. तो निरोप त्यांच्या मते सकाळी दिला असता तरी चालला असता.
या मुख्यालयापासून तीनच मैलांवर ऑबरसाल्झबर्ग येथे हिटलर त्याच्या ‘ईगल नेस्ट’ मधे इव्हा ब्राऊन बरोबर विश्रांतीसाठी आला होता. नेहमीप्रमाणे त्याने पहाटे चार वाजता त्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून झोपेचे इंजेक्शन घेतले व तो झोपण्यास गेला. आजकाल त्याला ते इंजेक्शन घेतल्याखेरीज झोप येत नसे. साधारणत: एका तासाने त्याच्या नौदलाचा अधिकारी अॅयडमिरल कार्ल जेस्को फॉन पुटकामरला जोडलच्या कार्यालयातून फोन आला म्हणून झोपेतून उठविण्यात आले. फोन कोणाचा होता हे त्याला नंतर आठवले नाही पण त्या माणसाने त्याला काय सांगितले हे त्याला आठवते. ‘फ्रान्समधे काही गडबड आहे अशी बातमी आहे. परंतू अजून निश्चित अशी काही बातमी हाती आलेली नाही. ही बातमी हिटलरला सांगावी का ?’ त्यानंतर दोघांनी मिळून ठरविले की त्याची आत्ताच काही जरुरी नव्हती. पुटकामरने काय विचार त्यावेळी केला हे त्याने नंतर सांगितले.
‘त्याला त्यावेळी उठवून सांगण्यासारखे आमच्या हातात काही नव्हते. शिवाय त्याला आत्ता जर झोपेतून उठविले असते तर त्याच्या नैराश्याच्या झटक्याला आम्हाला तोंड द्यावे लागले असते.’ पुटमाकरने सकाळपर्यंत वाट बघायचे ठरविले.
मेजर वर्नर प्लुस्काट अजूनही ओमाहच्या किनाऱ्यावरील त्या बंकरमधून समुद्रावर टेहळणी करत होता. १ वाजला तरी त्याला संशयास्पद असे काहीच दिसले नव्हते. पण मग छत्रीधारी सैनिक, ग्लायडर हे सगळे काय असेल ? त्याच्या मनात विचार आला. तो तेथे आल्यापासून त्याला काही तरी चुकते आहे असे सारखे वाटत होते. पण काय ते त्याला अजून उलगडत नव्हते. त्याने परत एकदा आपली दुर्बिण त्या समुद्रावर फिरवली व ते पाणी बारीक नजरेने न्याहाळले. काहीच नाही ! तो मनाशी म्हणाला.
त्याच्या मागे तेथेच त्याच्या कुत्र्याने मस्तपैकी ताणून दिली होती. हारास त्याचा अत्यंत लाडका ऑल्सेशियन होता. तसा तो त्याच्या सर्व सैनिकांना आवडायचा म्हणा. तोफखान्याचे गोलंदाज कॅप्टन विल्केनिंग व ले. थिन तेथेच मागे हलक्या आवाजात गप्पा मारत उभे होते. प्लुस्काटही तेथे गेला व समुद्राकडे बोट दाखवून म्हणाला,
‘मला तरी काही दिसत नाही. मला वाटते मी निघावे आता !’
असे म्हणून त्याला काय वाटले कोणास ठाऊक ! त्याने परत एकदा दुर्बिण हातात घेतली व समुद्रावर रोखली. पहाट होत होती. त्याने डावीकडून सुरुवात केली. समोर आल्यावर त्याची दुर्बिण थांबली व तो दचकला. त्याने तीक्ष्ण नजरेने तो भाग न्याहाळला.
पाण्याला भिडलेल्या क्षितिजावर पसरलेल्या पांढुरक्या धुक्यातून त्याला जे दिसले त्याने तो बेशूद्ध पडायचाच बाकी होता. त्याने पाहिले तेथे असंख्य वेगवेगळ्या आकाराची जहाजे त्याच्याच दिशेने येत होती. एखाद्या भुताचे जहाज एकदम यावे तशी ती हजारो जहाजे कुठूनतरी तेथे अवतीर्ण झाली होती. समोरच्या दृष्यावर विश्वास न बसल्यामुळे त्याने परत एकदा त्या दिशेला डोळे फाडून पाहिले. त्याची वाचाच बसली. त्याला त्याचे चांगले दिवस आठवू लागले. त्याने नंतर आठवणीत सांगितले की ते दृष्य पाहिल्यावर त्याच्या मनात पहिला विचार आला,
‘हा जर्मनीचा शेवट आहे’. प्रत्यक्षात त्याने निर्विकारपणे त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘हे आक्रमणच आहे. बघा !’
दुर्बिण त्यांच्या हातात देऊन त्याने फोन उचलला व ३५२-डिव्हिजनच्या मुख्यालयात मेजर ब्लॉकला फोन लावला.
‘ब्लॉक शत्रूचे आक्रमण झाले आहे. माझ्या समोर समुद्रावर त्यांच्या युद्धनौका दिसत आहेत. १०,००० जहाजे तरी असावीत. दृष्य फारच सुंदर व भयानक आहे. माझा विश्वासच बसत नाही.’
पलिकडच्या टोकाला शांतता पसरली. काही क्षणांनंतर ब्लॉकने विचारले,
‘कुठल्या दिशेला चालली आहेत ?’ प्लुस्काटने बंकरच्या खिडकीतून बाहेर पाहिले.
‘माझ्याच अंगावर येताएत ती !’
अशी पहाट आत्तापर्यंत कधी उगवली नसेल. त्या धुरकट, पांढुरक्या प्रकाशात त्या आक्राळविक्राळ आरमारांनी नॉर्मंडीच्या पाच किनाऱ्यांवर आपले नांगर टाकले होते. समुद्र त्या जहाजांनी गजबजून गेला. नजर पोहोचेपर्यंत युद्धाची निशाणे फडकत होती. क्षितिजावर आकाशाच्या पार्श्वभूमीवर भल्यामोठ्या युद्धनौका, क्रुझर, डिस्ट्रॉयर उठून दिसत होत्या. त्याच्यामागे कमांडची जहाजे त्यांच्या बिनतारी यंत्रणा दाखवित दिमाखात उभ्या होत्या. त्याच्यामागून सैनिकांनी भरलेल्या बोटी पुढे येत होत्या. त्या सगळ्या जहाजांवर एकच गडबड उडाली होती. किनाऱ्यावर सैनिकांना सोडणाऱ्या बोटी पाण्यात सोडताना होणारा साखळ्यांचा खणखणाट सगळीकडे भरुन राहिला होता. या सगळ्या गोंधळावर जहाजांच्या कर्ण्यांवरुन सैनिकांना संदेश देण्यात आला,
‘सैनिकांनो किनाऱ्यावर उतरविण्यासाठी लढा.....आपली जहाजे वाचविण्यासाठी लढा....आणि जर काही शक्ती उरली असेल तर स्वत:ला वाचविण्यासाठी लढा.... शूर सैनिकहो, चला उठा आणि त्यांना नरकात पाठवा......डंकर्कला काय झाले ते आठवा....त्याचा सूड घ्या.....देव तुमचे रक्षण करो.....’
हल्ल्याच्या पहिल्या लाटेतील सैनिकांना त्या धुक्यातून नॉर्मंडीचा किनारा स्पष्ट दिसत नव्हता. त्यांना अजून ९ मैल अंतर कापायचे होते. काही युद्धनौकांतून जर्मन नौदलाच्या किनाऱ्यावरील तोफांना प्रत्युत्तर दिले जात होते, पण उतरणाऱ्या सैनिकांवर अजून बाँबहल्ला किंवा मशीनगनमधून गोळ्यांच्या फैरी झाडल्या गेल्या नव्हत्या. एकंदरीत किनाऱ्यावर शांतताच होती. या क्षणी तरी त्यांना मळमळणे व उलट्या या आजाराची लागण झाली होती.
पहाटेचे ५.३० वाजले. आत्तापर्यंत ब्रिटिश आरमार त्यांच्या १५ इंची तोफांनी त्यांच्यासमोरच्या किनाऱ्याला भाजून काढत होत्या. आता पाळी होती अमेरिकेच्या नौदलाची. तोही सुरु झाल्यावर नॉर्मंडीवर ज्वालामुखी उसळला की काय असा भास होऊ लागला. तोफांच्या धडाक्याचे आवाज आळीपाळीने ऐकू येऊ लागले व त्या मातकट रंगाच्या आकाशात एकाच वेळी अनेक सूर्य उगवले. किनाऱ्यावर काळ्याकुट्ट धुराचा डोंब उसळू लागला.
या सगळ्या आवाजात आता भर पडली अजून एका आवाजाची. सुरुवातीला गुणगुणण्यासारखा हा आवाज मोठा होत गेला व त्याने सगळा आसमंत व्यापून टाकला. हा आवाज आकाशात अवतरणाऱ्या असंख्य विमानांचा होता. ती विमाने त्या जहाजांच्या काफिल्यावरुन सरळ किनाऱ्यावर आपल्या लक्ष्याकडे उडत होती. स्पिटफायर, थंडरबोल्ट, मस्टँग व त्यांच्याहीवर उडणारी बाँबर्स अशी सगळी मिळून ११००० विमाने त्या दिवशी आकाशात उडत होती. ती विमाने मधेच सूर मारत होती तर मधेच आकाशात वर चढत होती. ती गेल्यावर वर असणारी बाँबर विमाने खाली सूर मारुन बाँब फेकत होती. आकाशात एवढी विमाने कशी मावली ? अशी शंका त्या दिवशी कोणालाही सहज आली असती.
मलबेरी बंदरावर सामान उतरत असताना....काय नव्हते या सामानामधे....
खाली बोटींवर सैनिक वर अकाशाकडे पहात असताना त्यांच्या मनाला जरा उभारी आली. त्या विमानांना पाहून सगळ्या सैनिकांमधे आत्मविश्वासाची एकच लहर दौडत गेली. ‘ते आले आहेत ! आता आपण एकटे नाही’ शत्रूच्या तोफा, मशीनगन आता बंद पडतील व किनाऱ्यावर लपण्याइतके खड्डे निश्चितच पडतील अशी आशा सैनिक उघडपणे व्यक्त करु लागले. पण ढगांच्या आवरणातून खालचे दिसत नसल्यामुळे व स्वत:च्या सैन्यावर चुकून बाँब पडायला नकोत या विचाराने वैमानिकांनी किनाऱ्याच्या आत तीन मैल बाँबफेक केली. त्यामुळे ओमाहा किनाऱ्यावरील जर्मन सैन्याच्या तोफा वाचल्या. त्याचा पुढे भयंकर परिणाम झाला.
प्लुस्काट ओमाहच्या किनाऱ्यावरील त्याच्या बंकरमधे, त्याचे असले बंकर या भयंकर माऱ्यात किती काळ तग धरतील याची काळजी करत होता. तेवढ्यात ज्या कड्यावर त्याचा बंकर होता त्यावर एक तोफेचा गोळा येऊन आदळला. त्या स्फोटाच्या धक्क्याने प्लुस्काट मागे फेकला गेला व त्याच्या अंगावर धूळ, प्लास्टरचे तुकडे व मातीचा वर्षाव झाला. त्याला त्या धुराळ्यातून पलिकडचे काही दिसत नव्हते पण त्याची माणसे ओरडत असलेली त्याला ऐकू येत होते. एका मागून एक तोफगोळे त्या कड्यावर येऊन आदळत होते. त्या आवाजाने त्याचा मेंदू बधीर झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्याने स्वत:कडे एक नजर टाकली. केसापासून ते खालपर्यंत तो पांढऱ्या धूळीत माखला होता व त्याच्या कपड्याच्या जवळजवळ चिंध्या झाल्या होत्या. नशिबाने तो जिवंत होता. त्याने पाहिले तर त्याचे दोन अधिकारीही जमिनीवर पडले होते. थोडी उसंत मिळाल्यावर त्याने परत बाँबवर्षाव सुरु होण्याआधी त्याची जागा घेण्यास विल्केनिंगला आज्ञा केली. त्याने प्लुस्काटकडे विचित्र नजरेन पाहिले. त्याचा बंकर थोड्या अंतरावर होता. त्याने बाहेर धाव घेतली व प्लुस्काटने त्याच्या इतर तोफखान्यांच्या ठाण्यांना फोन लावण्यास सुरुवात केली.
आश्चर्य म्हणजे त्याच्या २० तोफांपैकी कुठल्याच तोफांना इजा पोहोचली नव्हती. या सगळ्या तोफा नव्या कोऱ्या व क्रप बनावटीच्या अत्याधुनिक होत्या. त्याला या सगळ्या तोफांच्या जागा ज्या किनाऱ्यापासून अर्ध्या मैलाच्या आत होत्या त्या कशा वाचल्या याचे आश्चर्य वाटत होते. त्याला वाटले ज्या टेहळणीच्या जागा होत्या त्या तोफांच्या समजून त्यांच्यावर बाँबवर्षाव करण्यात आला असावा. त्याच्या टेहळणीच्या बंकरवरील हल्ला हेच सुचवत होता. त्याला त्याचा लाडका कुत्रा हरास दिसला नाही पण त्याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे आता वेळ नव्हता. हातात फोन घेऊन बोलतबोलत त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. मगापेक्षा सैनिकांच्या बोटी वाढलेल्या दिसल्या. लवकरच त्या तोफांच्या टप्प्यात येणार याची त्याला खात्री वाटली. त्याने ले. कर्नल ऑकरला मुख्यालयात फोन केला,
‘ माझ्या सर्व तोफा सुरक्षित आहेत’.
‘छान ! आता तू ताबडतोब मुख्यालयात परत ये !’ कर्नल ऑकरने त्याला सांगितले. जाण्याआधी प्लुस्काटने त्याच्या सर्व गोलंदाजांना फोनवरुन आदेश दिला,
‘लक्षात ठेवा कोणीही शत्रू वाळूवर आल्याशिवाय तोफांचा किंवा मशीनगनचा मारा करायचा नाही. ! मी परत जातोय !’.
अमेरिकेच्या पहिल्या डिव्हिजनच्या सैनिकवाहू नौकांना आता किनाऱ्यावर धडकण्यासाठी थोडाच वेळ राहिला होता आणि प्लुस्काटच्या सैनिकांचे हात मशीनगनचा घोडा आवळण्यास आतुर झाले होते. आक्रमकांनी त्या किनाऱ्यांचे तीन विभाग पाडले होते - इझी रेड, फॉक्स ग्रीन व फॉक्स रेड. आता त्या नौका किनाऱ्यापासून एकच मैल दूर होत्या. त्यावर असणाऱ्या ३००० सैनिकांना त्या किनाऱ्यावर प्रथम उतरायचे होते. सगळ्यांच्या छातीतील धडधड वाढली होती. त्या जहाजांच्या आवाजात कोणालाच कोणाचे ऐकू येत नव्हते. शेजारच्या माणसाशीसुद्धा मोठ्याने ओरडून बोलावे लागत होते. बोटींच्या मागे पाणी फेसाळत त्याच्या न संपणाऱ्या रेषा उमटवत होते. वर डोक्यावर युद्धनौकांतून डागण्यात येणाऱ्या तोफांचे गोळे सटासट जात होते तर समोर किनाऱ्यापलिकडे आगीचे व धुराचे मोठे डोंब उसळत होते. ही दोस्तांच्या हवाईदलाची करामत होती. हे सगळे होत असताना सैनिकांना शत्रूच्या आघाडीवर अजून एवढी शांतता कशी याचे आश्चर्य वाटत होते. त्यांना वाटत होते कदाचित त्यांना कसलाच अडथळा होणार नाही. अनेक सैनिकवाहू नौका यावेळी बुडल्या. बुडणाऱ्या सैनिकांना वाचविण्यात बऱ्यापैकी यश आले पण कित्येक सैनिक त्यांच्या पाठीवरील ओझ्यांमुळे पाण्यात एकही गोळी न झाडता, समोर किनारा दिसत असताना बुडून मेले. जशा बोटी किनाऱ्याजवळ येऊ लागल्या तसे युद्धनौकांवरील तोफांची तीव्रता अजूनच वाढली. सैनिकांच्या डोक्यावरुन अगणित रॉकेटस जाऊन शत्रूवर आदळत होती पण शत्रूकडून काहीच प्रत्युत्तर नव्हते. ५०० यार्डावर बोटी आल्यावर सैनिकांना किनाऱ्यावरील अडथळे व कॉक्रीटचे बंकर दिसू लागले. अजूनही शत्रूकडून प्रत्युत्तर येत नव्हते. ४०० यार्ड, तीनशे यार्ड राहिले आणि जर्मनीच्या तोफा गर्जू लागल्या. त्याच तोफा ज्या दोस्तांची जहाजांनी व विमानांनी नष्ट केल्या आहेत असा विश्वास सैनिकांच्या मनात होता. प्रथम मशिनगनच्या गोळ्यांचा वर्षाव झाला व त्यानंतर तोफांचे गोळे येऊन बोटींवर आदळू लागले.
चेरबोर्ग येथे आढळलेला एक ठार झालेला जर्मन युवा सैनिक....
ओमाहाच्या किनाऱ्यावर आता मात्र परिस्थितीने गंभीर वळण घेतले. अनुभवी यु.एस.फर्स्ट डिव्हिजन (बीग रेड वन) आणि २९वी डिव्हिजन जिने आजपर्यंत एकाही युद्धात भाग घेतला नव्हता अशा दोन सेनांना उटाच्या किनाऱ्यावर झाले त्यापेक्षा दसपट नुकसान सोसावे लागले. नॉर्मंडीच्या किनाऱ्याचा स्टाफ अधिकाऱ्यांनी भरपूर अभ्यास करुनही उतरण्याच्या जागांची त्यांची निवड चुकली असेच म्हणावे लागेल. अर्थात पश्चिमेला उटापर्यंतचा प्रदेश काबीज करुन त्या भागातून सैन्याच्या पुढच्या हालचाली करण्याचा निर्णय झाल्यावर उटा आणि जेथे ब्रिटिश व कॅनेडियन सैन्य उतरणार होते त्या किनाऱ्यांमधील ओमाहा हाच एक पर्याय उपलब्ध होता. या किनाऱ्यावर वाळूनंतर असलेल्या टेकाडांची उंची काही ठिकाणी १५० फूट होती. या टेकाडांवर जर्मन सैन्याने मजबूत ठाणी उभी केली होती, ती आजही आपण पाहू शकता. या ठाण्यांना ब्रिटिश नौदलाच्या युद्धनौकांनी अजून शांत केले नव्हते; अर्धवर्तुळाकार असलेल्या या किनार्यावर जर्मनीच्या सेनेला त्यामुळे टेकाडांवरुन सहज तोफांचा व मशिनगनचा मारा करता येत होता; त्यांनी पाण्याखाली लोखंडी अडथळे उभे केले होते ज्यात बोटी अडकत होत्या; किनाऱ्यावर त्यांनी भूसुरुंग पेरले होते व काटेरी तारांचे अडथळे उभे केले होते. रणगाडयांना अटकाव करण्यासाठी मोठमोठे हेजहॉग उभे केले होते.
जर्मनीच्या तोफांचा अचूक मारा व त्यांच्या अत्यंत कडव्या ७१६ व ३५२ इन्फंट्री डिव्हिजनच्या सैनिकांनी हाहा:कार उडविला. दोस्तांच्या व्युहरचनाकारांनी ओमाहावर शत्रूच्या ४ बटॅलियन असतील हे गृहीत धरून हल्ल्याची आखणी केली होती. अल्ट्राने जर्मनीच्या पकडलेल्या संदेशावरुन ओमाहा येथे ८ बटालियन तैनात आहे हा इशाराही त्यांना दिला होता परंतू आता मूळ योजनेत कुठलाही बदल करण्यासाठी खूपच उशीर झाला होता. ऑपरेशन ओव्हरलॉर्डचा इतिहासकार मॅक्स हेस्टींग याने ‘जर्मनीची संहारक शक्ती याच भागात एकवटली होती’ असे म्हटले ते उगीच नाही.
‘अमेरिकेच्या ओमाहा किनाऱ्यावर उतरणाऱ्या सैनिकांवर यामुळे अनर्थ ओढवला.’
७१६व्या डिव्हिजनच्या ७२६ इन्फंट्री रेजिमेंटच्या फ्रँझ गॉकेलने आठवण सांगितली,
‘आम्हाला समोरच आमच्या बोटी दिसत होत्या. आमच्यावर होणारा गोळ्यांचा वर्षाव वाढत होता. फुटणाऱ्या बाँबमुळे वाळूचे फवारे उडत होते’.
‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटाच्या सुरवातीच्या भागात याचे यथार्थ दर्शन घडते. पण असे म्हणतात की त्या भयानक दृष्यांचे वर्णन करायला हा चित्रपटही खूप कमी पडतो. हे आक्रमण भरतीला होईल असे रोमेलचे म्हणणे होते व त्याला अनुसरुन सर्व तोफा रोखलेल्या होत्या. नशिबाने किनाऱ्यावरील अडथळे दिसावेत म्हणून हा हल्ला ओहोटीला करण्यात आला. जर हा हल्ला भरतीला झाला असता तर यापेक्षाही भयंकर अनर्थ झाला असता. ओहोटीच्या वेळेस हल्ला चढविण्यातही एक तोटा झालाच. स्वोर्ड किनाऱ्यावर उतरणाऱ्या हँपशायर रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनचा सिग्नल सार्जंट जेम्स बेलोज म्हणतो, ‘आमच्यापैकी बरेचजण या बोटींच्या खाली सापडले. जसे सैनिक उतरायचे तशा या बोटी हलक्या व्हायच्या व लाटेबरोबर वेगाने पुढे यायच्या. त्याच्यापुढे असलेले सैनिक याच्या खाली सापडायचे.’ थोड्याच वेळात ओमाहाच्या त्या ६००० यार्ड लांबीच्या किनाऱ्यावर गोंधळ माजला. रक्ताचे पाट वाहू लागले व पाणी लाल झाले. अमेरिकन सैनिक ब्रिटिश व कॅनेडियन सैनिकांपेक्षा तुलनेने तरुण होते. त्यांचे सरासरी वय होते फक्त २०. या सैनिकांना जेव्हा तोफा व मशिनगनच्या माऱ्यासमोर पाण्यात उड्या मारायला लागल्या तेव्हा त्यांच्या अंगावर ६८ पौंड वजनाचे साहित्य असायचे. कित्येकजण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मेले.
समुद्र खवळलेला होता आणि सैनिकांना व सव्वीस तोफांना किनाऱ्याला घेऊन जाणाऱ्या दहा बोटी पाण्यात बुडाल्या. सार्जंट रॉय आठवणी सांगताना म्हणाला,
‘समुद्र एवढा खवळलेला मी कधीच बघितलेला नव्हता व जर्मन सैनिक आमच्यापासून बारा मैलांवर होता.’
या नौकांवरचे बरेचसे सैनिक या तीन तासाच्या प्रवासात खवळलेल्या समुद्रामुळे आजारी पडले. या ठिकाणापासून ब्रिटिश फक्त साडेसहा मैल दूर होते पण तेथे तुलनेने समुद्र शांत होता व त्यामुळे त्यांचे तुलनेने कमी नुकसान झाले. अमेरिकेच्या पाण्यात तरंगू शकणाऱ्या २९ रणगाड्यांना ओमाहाच्या किनार्यापासून ६००० यार्डावर उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यातील २७ रणगाड्यांना जलसमाधी मिळाली. हे रणगाडे नसल्यामुळे उतरुन पुढे जाणाऱ्या सैनिकांना संरक्षण मिळाले नाही व त्यांनाही उशीर झाला. त्यावेळचे वर्णन करताना नॉर्मन फिलिप म्हणाला, ‘आम्हाला आमच्यासमोर आमचे उध्वस्त साहित्य पडलेले दिसत होते. जळणारे रणगाडे, जीप, टाकून दिलेली इतर वाहने, आणि असंख्य प्रेते.....
२९व्या डिव्हिजनमधे असलेल्या ११६व्या इन्फंट्रीची एबल कंपनी ओहामावर उतरली त्याचे अधिकृत वर्णन उपलब्ध आहे. सकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी काय भयंकर परिस्थिती उद्भवली होती ते यावरुन कळते :
‘बोटीच्या काठावरुन पाण्यात उतरण्यासाठी बोटीचा जबडा उघडला की सैनिक उड्या मारायचे. ते जेथे उड्या मारायचे तेथे कंमरेइतके ते डोक्यापर्यंत पाणी असायचे. पाण्याचे एवढे विशेष नाही. पण जर्मनीच्या मशिनगनरांना हा इशारा असायचा. अगोदरच तोफांचा भडिमार होत असलेल्या सैनिकांवर मग किनाऱ्याच्या दोन्ही टोकाला असलेल्या शत्रूच्या मशिनगनचा मारा व्हायचा. पुढच्या ओळीतील सैनिक पहिल्या काही पावलातच गारद व्हायचे. यातून जे नुसते जखमी व्हायचे ते पाठीवरच्या पाण्याने जड झालेल्या सामानामुळे बुडून मरत होते. समुद्र लाल रंगाचा झाला......काहीजण यातून वाचले तर त्यांना उमगायचे की ते तेथे कशाचाच आसरा घेऊ शकत नाहीत मग ते परत पाण्याकडे आसरा घेण्यासाठी परतत. पाण्यात उलथे पडून फक्त नाक वर करून ते तरंगत व पाण्याबरोबर तरंगत किनाऱ्याला लागत होते. बरेचसे सैनिक असेच किनाऱ्यावर पोहोचले...नावेचे दरवाजे उघडल्यावर सात मिनिटाच्या आत ‘एबल’ कंपनी जगातून नाहीशी झाली.......’
क्रमशः
जयंत कुलकर्णी....
प्रतिक्रिया
13 Jul 2015 - 5:32 pm | सौंदाळा
भयानक आहे.
13 Jul 2015 - 5:58 pm | विशाल कुलकर्णी
वाचतोय..
अंगावर शहारा आणि रोमांच दोन्ही एकदमच उभे राहिल्यासारखे वाटतेय ....
13 Jul 2015 - 8:20 pm | एस
वाचतोय. पुभाप्र.
या विषयावर असलेल्या अनंत माहितीतून मिपासाठी इतक्या प्रवाही आणि रंगतदार शैलीने लेखमाला लिहित असल्याबद्दल धन्यवाद.
14 Jul 2015 - 1:46 am | गुलाम
असेच म्हणतो.
युध्दकथा वाचाव्यात तर जयंत कुलकर्णींच्यांच!!!!
13 Jul 2015 - 8:54 pm | रामपुरी
भयानक आहे
14 Jul 2015 - 8:26 am | कैलासवासी सोन्याबापु
जयंत सर एकच नंबर!!!
जबरी वर्णन! शब्द नाही भावना वर्णन करायला! कॅले डंकर्क ते डी डे ओमाहा अप्रतिम उलगड़लात! हिस्ट्री चॅनेल ला काही वर्षे आधी "वर्ल्ड वॉर इन कलर पिक्चर" सीरीज लागत असे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली
14 Jul 2015 - 8:26 am | कैलासवासी सोन्याबापु
जयंत सर एकच नंबर!!!
जबरी वर्णन! शब्द नाही भावना वर्णन करायला! कॅले डंकर्क ते डी डे ओमाहा अप्रतिम उलगड़लात! हिस्ट्री चॅनेल ला काही वर्षे आधी "वर्ल्ड वॉर इन कलर पिक्चर" सीरीज लागत असे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली
17 Jul 2015 - 5:42 pm | पैसा
भयानक प्रकार होता!
18 Jul 2015 - 3:25 pm | बोका-ए-आझम
असं म्हणत जरी असले तरी जे त्यात होरपळून निघतात, त्यांच्यासाठी युद्ध हा क्लेशदायकच अनुभव असतो. जयंतकाकांच्या कथा वाचलेल्या आहेत, पण काका non-fiction पण तेवढ्याच जबरदस्त प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात हे आता वाचून अनुभवलं.
18 Jul 2015 - 3:38 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !