दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला .
सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती.
मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.
एक वर्ष गेले असेल. एके दिवशी ते आश्चर्यकारकरित्या गायब झाले. पेन्शनर माणूस - धडधाकट आणि कुणाच्या अध्यात ना मध्यात ! काय झाले कळेना. सगळीकडे शोधून झालं - शेवटी शोधाशोध थांबली . पोलिसांना कळवले. तितक्यात दुपारी लिफ्टच्या डक्टमध्ये दुर्गंधी येऊ लागली. पुन्हा पोलीसांना कळवल्यावर ते आले आणि जे काही निष्पन्न झाले ते अतर्क्य आणि भयानक होते.
पहाटे फिरायला जायला निघाले म्हणून पाचव्या मजल्यावर खाली जाण्यासाठी त्यांनी लिफ्टचं दार उघडलं, आत गेले - पण तिथे लिफ्ट नव्हतीच ! ती होती तळ मजल्यावर.
त्यांना बाहेरून डिस्प्ले तळमजल्याचा 'G' दाखवत असूनही त्यांनी दुर्लक्ष्य केले. जनरली तसेच कुणीही करेल. दार उघडतेय म्हणजे आत जायचं - आपणही असंच करतो ना ? दार उघडायलाच नको ते उघडले आणि काका सवयीने आत गेले ते तोल जाउन थेट तळमजल्यावर असलेल्या लिफ्टच्या छतावर पडून गतप्राण झाले.
लगेच लिफ्टच्या सर्व्हिस इंजिनियरला बोलावण्यात आलं . हा दाराच्या सेन्सरचा बिघाड होता, जो एकदाच झाला म्हणे. लिफ्ट कंपनीच्या माणसाला तो बिघाड पुन्हा करून दाखवता आलाच नाही. लिफ्ट पूर्ववत चालू होती! कदाचित पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून केस बंद करून टाकली असणार. मी त्याकाळी परदेशात असल्याने नंतर ही धक्कादायक हकीकत समजली. त्यामुळे बिघाड नक्की कसा होता ते कळलं नाही.
सर्व इमारतींच्या लिफ्टस पंधरा वर्षे जुन्या झाल्या होत्या. वार्षिक निगराणीसाठी त्याच कंपनीला कंत्राट दिले होते. ते नियमित देखभाल करत असत. या दुर्दैवी घटनेनंतर सोसायटीने सर्व पंधरा इमारतींचे लिफ्टचे डबे तसेच ठेवून बाकी सर्व विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक् नियंत्रक, संवेदक बदलून घेतले आहेत. आतां सगळं काही ठीकठाक आहे असं वाटतं पण अनेक शंका-कुशंका मनात येतच रहातात.
आता इंजिनियर म्हणून विचार करता असा प्रश्न पडतो की असं होईलच कसं ? जरी पंधरा वर्षांपूर्वीची लिफ्ट असली तरी तेव्हाची आणि त्याही आधीची इतरत्र असलेली डिझाईन्स अजून छान चालतात. मग चुकलं कुठे? अन्यत्र लेखात म्हटल्याप्रमाणे वाहन उद्योगासारखेच याही उद्योगांत सुरक्षिततेसाठी '' एफ एम ई ए '' विश्लेषण करून डिझाईन केलेले असते. सोफ्टवेअरची कसून तपासणी केलेली असते. तरीही मर्फीच्या नियमानुसार अशा अपघातांची शक्यता धरून सुरक्षिततेचे विशेष नियोजन डिझाईनमधे केलेच असायला पाहिजे. आजच्या काळांत हे डिझाईन उत्तम होत असले तरी या भारतीय कंपनीने पंधरा वर्षांपूर्वी कदाचित केले नसेल असे वाटते.
कोणत्याही मजल्यावर लिफ्ट आली, आणि लिफ्टचा पाळणा योग्य ठिकाणी पोहोचून थांबल्याची खात्री झाली की मगच तिथला संवेदक (सेन्सर ) बाहेरचा दरवाजा उघडणे आता सुरक्षित असल्याची माहिती मुख्य कंट्रोलरला देतो. आणि मगच दरवाजा उघडू शकतो. असं असताना 'त्या' एकाच वेळी असं का झालं असेल? आधी लाखो वेळा इतरांनी लिफ्ट वापरताना असं झालं नाही !
यापूर्वीही वर्तमानपत्रात असे अपघात वाचले होते - मुख्यतः लहान मुले खेळताना किंवा कुत्री / मांजरे घेऊन लिफ्टशी खेळत असताना अनेक अपघात झाले आहेत. दार बंद न होताच लिफ्ट सुरु होणे असे प्रकार घडतात. अनेक इमारतींच्या लिफ्ट्स भयाण स्थितीत असतात. बटणे गायब असल्याने आतले मायक्रोस्विचेस पेन किंवा काड्या वापरून चालू केले जातात , दारे नीट बंद न होणे, मजल्याच्या दोन इंच वर- किंवा खाली थांबणे, असे विचित्र प्रकार पहायला मिळतात. नेहमीपेक्षा वेगळे काही होतंय - जसं स्पिन होत असल्याचं फीलिंग किंवा विचित्र आवाज यावर लगेच दुरुस्ती करून घ्यायला हवी .
कारणं काहीही असोत, तांत्रिक गोष्टीना गृहीत धरणे चुकीचंच आहे. अगदी कितीही चांगल्या ब्रान्डची वस्तू असेल तरी कधीही ती बिघडू शकते किंवा चुकीचे- अनपेक्षित वागू शकते हे लक्षात ठेवायलाच हवं !.
आपण काय काळजी घेता येईल?
१) सोसायटीच्या बैठकीत लिफ्टची निगराणी आणि अन्य सुरक्षा उपायांचा मुद्दा नेहेमी चर्चेत असावा. चेकलिस्ट करता आली तर उत्तम. नियमित तपासणी अनिवार्य असावी .
२) मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एकट्याने लिफ्ट वापरू देऊ नये. कुणीतरी बरोबर जावे. वयस्करांनी निघताना घरी कुणाला तरी तशी कल्पना द्यावी.
३) लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
४) लिफ्ट बंद पडली तर घाबरून जाऊ नये. मदतीचे बटण/ अंतर्गत फोन वापरावेत / सुरक्षा कर्मचार्याचा फोन क्रमांक आपल्या मोबाइलमधे साठवलेला असावा.
५) जनरेटर ब्याअकप बंद पडल्यास / न मिळाल्यास अंधारात दहा पंधरा मिनिटे जातील अशी मनाची तयारी असावी .
तुमच्या सोसायटीत लिफ्ट सुरक्षिततेसाठी काय वेगळे करतात?
अजून बरेच मुद्दे असतील . शेवटी काळजी काय, घेऊ तितकी कमीच !
प्रतिक्रिया
15 Jun 2015 - 12:16 pm | ज्ञानोबाचे पैजार
विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी.
आमच्या सोसायटीच्या लिप्टला पण ढकलून उघडायचे जाळीचे दरवाजे आहेत.
मी बर्याचवेळा वीज वाचवण्यासाठी म्हणुन लिफ्ट मधले दिवे बंद करुन टाकतो.
असे करणे कितपत बरोबर आहे?
पैजारबुवा,
15 Jun 2015 - 12:28 pm | वेल्लाभट
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम केलेलं आहे ती कंपनी मॅन्युअल डोअर लिफ्ट विकत नाही. मेंटेनही करत नाही. देअर सेफटी स्टँडर्डस डोन्ट अलाउ दॅट.
व्यवस्थित सुरक्षा प्रणाली असलेल्या लिफ्ट चा अपघात होण्याची शक्यता नगण्य असते. निष्काळजी पणा हे एकमेव कारण होऊ शकते.
धाग्यातील शेवटच्या मुद्द्यांशी सहमत.
१) पॅनिक होऊ नये. लिफ्ट ला वेंटिलेशन असतं, तुम्ही गुदमरत नाही. स्टँडर्ड क्वालिटी वाली कुठलीही लिफ्ट धप्पकन वगैरे खाली पडू शकत नाही. मेकॅनिकली इम्पॉसिबल. देअर आर सेव्हरल मेकॅनिजम्स टू स्टॉप द कार इफ रोप/बेल्ट फेल्स.
२) इमर्जन्सी नंबर लिफ्ट मधे लिहिलेले असतात. त्यांना फोन करावा.
३) वॉचमन ला जुजबी गोष्टींचं ट्रेनिंग असावं. लिफ्ट जवळात जवळच्या मजल्यावर आणता येते. उघडता येते.
महत्वाचं.
- कमी पैशात मिळते म्हणून सुरक्षेच्या दॄष्टीने वाईट लिफ्ट लावू नये.
- मेंटेनन्स नियमित करून घ्यावा.
- मॅन्युअल डोअर जबरदस्त डेंजर वाटते मला पर्सनली.
- लोकं ग्रिल ला दिलेली हँडल न वापरता दारात हात घालून उघडबंद करतात. याने अनेक अपघात झालेले आहेत.
- लिफ्ट मधून हात काढून शेक हँड/बायबाय करणं.... इन्व्हिटेशन टू डिजास्टर
अव्हॉईड. डोन्ट टेक इट लाइटली.
15 Jun 2015 - 4:07 pm | खेडूत
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण घर घेताना तेव्हा तरी तो मुद्दा गौण होता. पुण्यात तळमजला + ४ पर्यंत लिफ्टची सक्ती नसल्याने खूप इमारती अजूनही तश्याच लिफ्टविना आहेत. शिवाय पंधरा वर्षांपूर्वी अशी दारेवाली लिफ्ट महाग असल्याने प्रचलित नव्हती. जे दुसऱ्याकडून सदनिका घेतात त्यांना लिफ्ट स्वयंचलित नाही - हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही. किंबहुना तशी जुनी घरे मिळणे कठीण आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वात महत्वाचे!
सर्वाधिक अपघात माणसांनी दारे उघडण्याच्या लिफ्टला होताना दिसतात .
16 Jun 2015 - 2:16 pm | वेल्लाभट
तेच तर.
15 Jun 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा
झाले ते वाईट झाले...लिफ्ट सुध्धा जुनी होती मान्य..पण अश्या केसेस मध्ये human error हा मुद्दा का दुर्लक्षीत रहातोय?
15 Jun 2015 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लेख.
लिफ्टसारख्या अत्यंत उपयोगी पण नादुरुस्त झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकणार्या प्रणालिला खरेदी करतानाच...
(अ) उत्तम सुरक्षेची व्यवस्था विकत घ्यावी,
(आ) उत्तम नियतकालिक तपासणी आणि देखभाल करण्याच्या अटी (पिरिऑडिक प्रिव्हेण्टिव्ह मेंटेनन्स) विक्रिकरारात असाव्या,
(इ) नियतकालिक तपासणी आणि देखभाल होते की नाही हे पाहणारी सोसायटीची स्वतंत्र व्यवस्था असावी (केवळ कंपनीवर विसंबून राहू नये)
या सगळ्या बाबतीत हयगय अथवा निष्कारण काटकसर नको. माणसांचे जीव त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेत.
याशिवाय, लिफ्ट कशी वापरावी याचे सर्व लहानथोरांना नियतकालिक शिक्षण द्यावे... लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.
15 Jun 2015 - 12:35 pm | टवाळ कार्टा
याबाबत काही विदा आहे का असेसुध्धा विचारणारे असतील इथे ;)
15 Jun 2015 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
विचारोत बापडे !
सत्य हेच आहे की...
एकदा का जीवघेण्या प्रकारात सापडलो की विदा, स्टॅटिस्टीक, तर्कटे, इ इ कामाला येत नाही... कारण जरी त्यात सापडण्याची शक्यता दहा लाखात एक इतकी कमी असली तरी, त्यात सापडलेल्या प्रत्येकाचा धोका (जीवहानी अथवा मोठी दुखापत) १००% असतो !
म्हणूनच अश्या गोष्टीत, खूप काळजी अशी काही गोष्ट नसतेच (No level of safety is too much safety). वस्तुस्थितीचे भान ठेवून जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी स्वागतार्हच असते.
15 Jun 2015 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची रचना करताना ग्राहक चूक करणार हे गृहीत धरून त्याला कोणतीही चूक करता येऊ नये अशी प्रणाली वापरली जाते.
15 Jun 2015 - 1:05 pm | कंजूस
टॅावरच्या इमारतीतला हा आणखी संभाव्य जीवघेणा धोका आहे.
15 Jun 2015 - 1:41 pm | खटपट्या
चांगला धागा.
मलातरी अजुन असा काही अनुभव आलेला नाही. पण लीफ्टची नियमीत तपासणी व्हायला पाहीजे. एकाने नेहमी फीरुन सर्व लीफ्ट वापरून जे काही दोष असतील ते लीहून ठेऊन, लीफ्ट तपासायला जो माणूस येतो त्याच्या कानावर घालणे गरजेचे आहे. मी हे आमच्या सोसायटीच्या मीटींग मधे वारंवार सांगीतले आहे.
15 Jun 2015 - 1:59 pm | मधुरा देशपांडे
दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
अत्यंत आवश्यक. एवढ्यातच एक नातलग एका प्रवासी कंपनीमार्फत युरोप सहलीला आले होते तेव्हाचा एक किस्सा.
अक्खी ५० लोकांची बस उतरली, रुम्स मिळाल्या आणि हॉटेलमध्ये असणार्या एकमेव लिफ्टवर लोकांनी आक्रमण केले. मोठमोठ्या बॅग्स आणि त्यात दिलेल्या सुचनेपेक्षा बरीच जास्त डोकी. लिफ्ट अर्ध्यात बंद पडली. फोन करुन नंतर सुरक्षारक्षकाने येऊन यांना सोडवले पण या सगळ्यात बराच वेळ गेला. अडकलेले लोक पॅनिक झाले, इतर लोकांना आपापले सामान घेऊन चढावे लागले, सगळ्यांचीच गैरसोय झाली. भारतीय लोक म्हणुन हॉटेलात वेगळी ओळख मिळाली हेवेसांनल :(
15 Jun 2015 - 2:14 pm | सौंदाळा
घराचे नुतनीकरण करताना, घर बदलताना सामान शिफ्ट करण्यासाठी लिफ्ट वापरायला बंदी आहे आमच्या सोसायटीत.
अवांतरः काही वर्षांपुर्वी (१/२) कोंढव्यामधे गार्बेज शुट मधे गॅस तयार होऊन त्याचा स्फोट होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची बातमी वाचली होती.
मागच्या वर्षीच पिंपळे सौदागरमधल्या मोठ्या सोसायटीत ड्रेनेजमधे काम करताना गुदमरुन एका कामगाराचा मृत्यु झाला होता.
15 Jun 2015 - 2:39 pm | अमृत
PCMC मधे दरवर्षी उदवाहन (लिफ्ट) निरिक्षक येऊन उदवाहन तपासून जातात ६०० रूपये प्रति उद्वाहन तपासणी फी द्यावी लागते. ही तपासणी उदवाहन कंपनीवाल्यासमक्ष होते व या नंतर उदवाहनाचे प्रमाणपत्र नविनीकृत करून मिळते.
15 Jun 2015 - 2:41 pm | मोहनराव
मी पुण्यातील गाव भागात अश्या जुनाट, डेंजर लिफ्ट्स पाहिल्या आहेत. अगदी पाय ठेवायलाही भिती वाटतील इतक्या जुन्या. वैयक्तिक अनुभव कधी आला नाही देवाक्रुपेने. एक रेग्युलर मेंटेनंसचं / चेकिंगचं श्येड्युल असणं गरजेचं आहे असं वाटतं. चलताहै चलने दो वृत्ती कमी व्हायला पाहिजे.
15 Jun 2015 - 3:14 pm | संदीप डांगे
धक्कादायक आहे घटना. काही ध्यानी-मनी नसतांना असं काही होणं भयानक आहे.
तुम्ही मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.
त्या लिफ्टविषयी खुळचट कल्पनांपायी काही अफवा पसरल्या नाहीत ना? नाहीतर कुणी वयोवृद्ध घाबरून बळी पडायचा.
15 Jun 2015 - 3:17 pm | शब्दबम्बाळ
माणसाच्या हातून उघडण्यासारखे दार लिफ्टला नसलेच पाहिजे.
बटण दाबल्यावर जोपर्यंत लिफ्ट आपल्या मजल्यापर्यंत येउन स्वतः दार उघडत नाही तोपर्यंत काहीही न करता थांबावे.
लिफ्ट automatic असेल आणि जर लिफ्टचे उघडलेले दार तुम्ही लिफ्टच्या आत मध्ये जाण्याआधी बंद होणार असे दिसत असेल तर ते बंद न होता पुन्हा उघडण्यासाठी दारांच्या मध्ये हात वगैरे घालू नये . पिंच डिटेक्शन सेन्सर योग्य काम करतील हे गृहीत धरू नये. जर दार पुन्हा न उघडता बंद झाले तर हात त्यामध्ये अडकून अनर्थ होऊ शकतो.
15 Jun 2015 - 3:46 pm | वेल्लाभट
खरं आहे. कधीही करू नये असं. बटण दाबावं.
15 Jun 2015 - 5:13 pm | हाडक्या
हे अगदी खरंय.. आत्ता याच वर्षी मुंबईमध्ये एक २०-२५ वर्षांची मुलगी लिफ्टच्या दारात उभी राहून तिच्या आईसाठी लिफ्ट थांबवून उभी होती. स्वयंचलित दरवाजे अडथळा आल्यास परत उघडतात आणि त्याच भरवशावर ती उभी होती.
अचानक दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट थांबेपर्यंत खेळ संपला होता. लिफ्टच्या आतील लोकांसाठी तो एक भयानक अनुभव होता.
15 Jun 2015 - 5:22 pm | यशोधरा
बापरे! सगळं वाचून अंगावर काटा आला!
15 Jun 2015 - 6:03 pm | रेवती
बापरे! फार वाईट झालं. हे असले अपघात वाचून जिने चढलेले परवडले असे वाटते.
पुण्यातील आमच्या बिल्डींगला लिफ्ट आहे पण ती आमच्याच मजल्यापासून सुरु होते म्हणून फारशी वापरली नाही.
तरी काहीवेळा गच्चीवर जाण्याच्या निमित्ताने जो वापर केला गेला त्यावेळी लक्षात आलेल्या गोष्टी अशा होत्या.
१. लिफ्टला कोल्याप्सिबल डोअर असल्याने लहान मुलांची बोटे सटासट अडकू शकतात. आणि वरच्या मजल्यांवरील अनेकांपैकी दोन फ्यामिलीजच्या दृष्टीने मुलांना घेऊन जाणे म्हणजे 'आपण फक्त जात रहायचे, मुले मागून आपोआप येतात' या प्रकारातली आहेत.
२. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तळमजल्यावरून कधीकधी भरावे लागते. पाणी भरलेल्या हांडे, कळश्या घेऊन जाताना पाणी जिन्यात व लिफ्टमध्ये सांडलेले असते. त्यावरून घसरण्याचा धोका.
३. लिफ्टमधील जमीनीचा भाग (तळ्/फ्लोअर) यासाठी जे मटिरिअल वापरलेय ते काही ठिकाणी फाटले आहे. त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता.
४. लिफ्ट व जमीन हे एका पातळीमध्ये नसल्याने व ही पातळी बदलती असल्याने आज लिफ्टमध्ये चढताना खरोखरीच पायरी चढायची आहे की उतरायची आहे हे बघावे लागते.
दरवर्षी मेंटेनन्सचे लोक्स येतात व दिवसभर तेलपाणी करून जातात. यापेक्षा जास्त अपेक्षा आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला लिफ्ट रोज वापरावी लागत नाही मग सोसायटीचा मेंटेनन्स का वाढवता? शिवाय तुम्ही या देशात रहात नाही असेही असते. हे झाले लिफ्टच्या वापराबाबत. आमचा प्रश्न वेगळा असतो.
आमच्या शेजार्यांचा फ्ल्याट (व त्यांच्यावरील सगळे) लिफ्टच्या असण्यामुळे झाकला जातो व आमचा झाकला जात नाही. आमच्या व शेजारच्या इमारतीत चोर येऊन लिफ्टच्या मागील भागात लपला व बाहेर गेलेले पब्लिक घरी येऊन दरवाजा उघडताच धक्का मारून अनपेक्षितपणे घरात घुसला. यामध्ये शेजारील इमारतीत गंभीर गोष्ट घडली व आमच्या इमारतीत त्या मूर्ख चोराने जिना चढणार्या, आमच्या समोर राहणार्या नवविवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यामुळे ती दचकली व जिन्यात पडली. पोटातील बाळ दगावले. मग लिफ्टमागे घरे असणारांनी जादा जाळ्या बसवून घेतल्या. आता तेथे कोणी लपू शकत नाही पण गच्चीजवळ राहणार्यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली गच्चीसकट सगळीकडे जाळ्या बसवून आपल्या घराचा वाढीव भाग म्हणून वापरायला सुरुवात केलीये. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला जाणारे उत्साही पब्लिक, वाळवणे घालणार्या सुगृहिणी, संध्याकाळी गच्चीवरच काठी टेकत चालणारे ज्येष्ठ नागरिक यांना दरवेळी गच्चीचा वापर करण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात व सध्या त्यावरून वाद चालूएत. वाईटातून चांगली गोष्ट एकच झालीये की लहान मुलांचे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर जाणे व पालकांना लक्ष ठेवण्याची सततची डोकेदुखी कमी झालीये.
15 Jun 2015 - 7:05 pm | तिमा
आम्ही गेली ४४ वर्षे, एका लिफ्ट असलेल्या इमारतीत रहात आहोत. सध्या जी लिफ्ट आहे ती दुसरी. पहिली साधारण ३० वर्षांपूर्वी मेली. माझे आत्तापर्यंतचे अनुभव.
१. सुरवातीला एक लिफ्टमन ठेवला होता. तेंव्हा लिफ्ट व्यवस्थित चालायची आणि देखभालही कमीतकमी येत असे. पुढे लिफ्टमनचा पगार परवडत नाही या कारणासाठी ती स्वयंचलित करण्यांत आली.
२. आमच्या विंगमधे काही चाळी-झोपड्यांतून लोक आले होते. त्यांच्या बायका सर्रास, रात्री उरलेली आमटी, निवडलेल्या भाज्यांचा कचरा वगैरे, लिफ्टच्या छतावर भिरकावत असत.
३. पुढे ही संवय घालवण्यांत आली पण लिफ्ट पूर्ण थांबायच्या आंत, दरवाजे उघडणे, बंद करताना दरवाजे आपटणे, लिफ्टच्या कोपर्यांत पानाची पिंक टाकणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यांत बाहेरची मंडळी (म्हणजे फुलवाला, दूधवाला, मच्छीवाला, वाणीसामान आणणारे हेही सामील असावेत.)
४. उत्तर भारतीय लोकांना तर लिफ्ट आपल्याच बापाची वाटत असल्याने, घरांतून निघताना काही विसरले तर लिफ्टचे दरवाजे उघडे टाकून आत वस्तु आणायला जाणे, हे अगदी कॉमन आहे.
५. लिफ्टमधे रॅपर्स, पानमसाल्याची रिकामी पाकिटे, कागदी बोळे टाकणे हे हल्लीच्या पिढीचे आवडते छंद आहेत.
६. जुनी इमारत असल्याने, लिफ्ट बंद पडली असता कसलीही पर्यायी व्यवस्था नाही.
७. सर्व्हिसिंग जवळ आले की, लिफ्टच्या दोराचा आँव आँव असा आवज येऊ लागतो, पण आमच्याशिवाय तो एकाही मेंबराला ऐकू येत नाही.
15 Jun 2015 - 7:16 pm | रेवती
क्र. ३, ४ व ७ शी अगदी सहमत.
16 Jun 2015 - 10:22 am | नाखु
तीव्रतेने सहमत.
गंमत म्हणजे अश्या घाणेरड्या आणि अजागळ्पणे ठेवलेल्या लिफ्टसंकुलातील घरे मात्र अगदी चकाचक फॉल्सिलेंग्वाली डेकोरेटीव, असतातच. पण किमान लिफ्ट तरी सुरक्षीत आणि स्वच्छ असावी असे कधीच वाटत नाही हे खरे आहे.
आप्तेष्ट अश्या गृहरचना संस्थेत रहात असल्याने नियमीत भेट देणारा.
आणि सुदैवाने स्वतंत्र बगल्यात राह्याला असल्याने लिफ्ट्मुक्त असलेला नाखुस
16 Jun 2015 - 6:45 pm | रेवती
होय. घरे चकाचक आहेत. कामवाल्या बायकांचे नियम आहेत. जसे, आम्ही इलेक्ट्रोलक्स मशीनीतच कपडे धुतो. अमूक प्रकारातील फरशी असेल तर पुसण्याचे चार्जेस जास्त. वर राहणार्या लोकांना पैशात डिस्काऊंट कारण रोज दुपारी २ तास त्यांच्या एसीमध्ये कामवाल्या बाईंना झोपायची परवानगी व वामकुक्षी झाल्यावर बोन चायनाच्या कपातून चहा.
पूर्वी सोसायटीकडे जनरेटर नव्हता आता आहे. नैतर वीज नसताना (लिफ्ट बंद असताना) कामवाली बाई वरच्या मजल्यांवर कामासाठी जात नसे किंवा जास्त पैसे आकारत असे.
समजा आमच्या १ बिएचकेच्या २० सदनिकांची १ बिल्डींग आहे तर सगळ्यांनी शेजारचे दोन फ्ल्याट विकत घेतलेत, ज्यायोगे मधील भिंत पाडून मोठी घरे वापरता येतील किंवा २ लहान घरे ठेवून भाडेकरू राहतील. पण आमचा व शेजार्यांचा असे दोनच १ बिएचके आहेत म्हणून आम्ही गरीब असल्याने कामवाली बाई आमच्याकडे फारसे लक्ष देत नाही व आम्ही शिंगापूरला राहतो, पुन्यात र्हात नाही असे सांगत फिरत असते. ताई मला एकदा शिंगापुरचे पैशे द्या ना! असे म्हणत होती. हितं र्हाणार्या सगळ्यांची दुसरीकडेही घरे झालीत आणि अज्जून तुमी हितंच! असेही म्हणाली. ;) असो. विषयांतर झाले पण कामवाल्या बाईंनी यावेळी माझ्या ह्र्दयाला घरे पडतील असे बोलल्याने हे लिहिले. ;)
16 Jun 2015 - 6:55 pm | यशोधरा
बोन चायनाच्या कपातून चहा. >> हे वाचून रेवाक्का मला भयानक डिप्रेशन आलेय! आमच्याकडे कोणीच बोन चायनाच्या कपातून चहा घेत नाही! उलट मस्त डिझाईन्स आणि रंग असतात म्हणून रस्त्यावर मिळतात ते रंगीबेरंगी, छान छान डिझाईनवाले कप आणण्यात मला आजवर काहीच गैर वाटले नाही! आता नेक्स्ट टैम बोन चायनाच आठवेल!
तू दुत्त आहेस रेवाक्का!
16 Jun 2015 - 1:47 pm | खेडूत
सर्व मुद्द्यांशी सहमत! पुण्यातही ठराविक भागात असंच चालतं .
प्रतिसादावरून आपण मुंबईकर दिसता,
कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात लिफ्ट म्हणजे मला वाटतं अरोरा टॉवर नामक हॉटेलात होती. १९८० च्या सुमाराला अलका सिनेमाजवळ पहिली १० मजली इमारत आली त्यात लिफ्ट होती- मग इतर रहिवासी ठिकाणी सुरु झाल्या. तोपर्यंत पुण्यात वाडे आणि G+४ मजले होते!
17 Jun 2015 - 5:30 am | स्पंदना
ईईईईईए!!
15 Jun 2015 - 7:21 pm | अत्रन्गि पाउस
अत्यंत गंभीर प्रकार आहे हा ...
माझा एक अतिशय जिवलग मित्र पुण्यात डेक्कन वर एका लिफ्ट अपघातात गेला ...दार उघडले आणि तो आत जात असतांना लिफ्ट अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली ...जेव्हा कि वरचा मजला अजून तयारच नव्हता लिफ्ट जाण्यासाठी ...वाईट चिरडला गेला आणि गेलाच बिचारा !!
.
.
.
कोणत्याही देखभालीसाठी चार चव्वल वाचवण्यात कमालीची तत्पर मंडळी जोपर्यंत मुबलक वावरताहेत ...तो पर्यंत हे असले धोके असतीलच ...
16 Jun 2015 - 10:56 am | टवाळ कार्टा
झाले ते वाईट झाले पण तुमचा मित्र लिफ्ट अर्धवट उघड्या स्थितीमध्ये सुरु झाली हे पाहून लगेच बाहेर का नाही आला? लिफ्ट काही एकदम झपकन वर खाली होत नाही....इथे इतक्या लोकांनी वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत पण एक इ.एक्का काका सोडले तर कोणालाच असे वाटत नाही की लिफ्ट वापरताना उगाच्च घाई गडबड केली नसती तर तो अपघात झाला नसता?
मी अजून्पर्यंत लिफ्ट वापरताना घाई करू नये...गर्दी झाली तर लिफ्ट सोडून द्यावी...ती परत येणारच आहे (ते सुध्धा जास्तीत जास्त २-३ मिनिटांत) असा विचार आपल्या लहान मुलांना शिकवताना पाहिलेले नाही...मोठे झालेल्यांना शिकवता येते यावरचा विश्वास कधीच उडालाय
माझा प्रतिसाद टोकदार अथवा भावना दुखावणारा वाटल्यास क्षमस्व पण आजकाल असे human error मुळे होणारे अपघात बघून सगळ्यात पहीले असेच्च विचार येतात...Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are
16 Jun 2015 - 12:36 pm | नाखु
बाडिस.
तंत्रज्ञान परदेशातून आणता येते अक्कल थोडीच आणता येते.
अगदी वाहनाचे दिशादर्शक दिवे न वापरणार्या लोकांचीही किईव वाटते बाकी सुरक्षा-दक्षता तर राम भरोसे!
रस्त्यातून कसे चालू नये याचे प्र्यात्य्क्षीक पहाय्चे असेल तर निगडी पासून सुरुवात करून थेट स्वारगेट पर्यंत पहाणी करा.
16 Jun 2015 - 1:31 pm | अत्रन्गि पाउस
भावना बिवना मुळीच दुखावल्या नाहीत...माझ्या मित्राचा प्रसंग ...नक्की काय कसे ह्यात अनेक शक्यता असाव्यात...त्यांमुळे शेवटी 'नशीब' ह्यावर थोडसं यावे लागते ...
पण
Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are
ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'
16 Jun 2015 - 1:39 pm | टवाळ कार्टा
मग ते generalization होईल की...सग्ळेच नस्तात ना तसे :)
16 Jun 2015 - 2:14 pm | वेल्लाभट
पूर्ण सहमत !
लायकी नाही; शुद्ध मराठीत.
16 Jun 2015 - 5:36 pm | मृत्युन्जय
असे अपघात बरेच झाले आहेत. ते नक्की कसे होतात हे नाही माहिती पण अडकणार्या माणसाला वेळ न मिळता तसे होत असावे असे वाटते. यात तो माणूस लिफ्ट वापरण्याच्या लायकीचाच नाही, सिव्हिलाइज्ड नाही वगैरे गोष्टी, अप्रस्तुत आहेत असे वाटते.
16 Jun 2015 - 9:41 pm | अत्रन्गि पाउस
लायकीचा प्रश्न हा जनरल बेशिस्त आणि अन्य बेजबाबदार लोकांसाठी ...
अहो जे गेले त्यांच्या विषयी फक्त सहानुभूती आहे ...
16 Jun 2015 - 12:23 pm | मदनबाण
माझ्या मित्राच्या भावाचा अंगठा जाळीवाल्या दरवात हात घालुन बंद करण्याच्या नादात गेला आहे !
जाता जाता :- आमच्या लिफ्ट मधे कोणीतरी महा हरामखोर माणुस थुकतो आहे, तो पार डोक्यात गेला आहे. पिचकारीचे शिंतोडे पार बटणांपर्यंत उडवतो... एक कॅमेरा लिफ्ट मधे बसवुन साल्याची मानगुटी पकडण्याची फार इच्छा होत आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
16 Jun 2015 - 4:27 pm | खटपट्या
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा.
16 Jun 2015 - 4:42 pm | मदनबाण
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा.
आहेत काही अॅटिक पीस... पण काय कळत नाय बाँ. :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
16 Jun 2015 - 10:54 pm | मास्टरमाईन्ड
लिफ्टमध्ये एक सूचना लिहा :
"थुंकणार्याच्या आXXXXX "
वरील ओळींबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व!
पण आमच्या इमारतीच्या लिफ्टमधे थुंकलेल्या व्यक्तीला मी असंच बोललो होतो. नाईलाज होता, सर्व सदस्य अत्यंत शांत आणि कायदेपालक असल्याने कोणी बोलण्याचं धाडस केलं नसावं. तो एका हॉटेलचा कर्मचारी होता. वरच्या मजल्यावरच्या विद्यार्थिनी(?) ना "पार्सल" द्यायला यायचा.
"परत थुंकलास तर चाटून साफ करावं लागेल आणी न केल्यास डायरेक्ट "वैकुंठ" मध्ये रवानगी होईल" याच भाषेत (प्रत्यक्ष वापरलेले शब्द जास्त समर्पक आणी realistic होते. ते इथे देऊ शकत नाही)
16 Jun 2015 - 2:28 pm | चौकटराजा
म्या आता म्हातारा व्होवू घातालाया आन फ़ुड्ल्या म्हय न्यात पाळ णा वाल्या जाग्येत जानारेय्य .आमच्या पाळ ण्याला त्ये बंद दार अस्नारे.पर काळ जी घिन्न मातुर.
16 Jun 2015 - 4:05 pm | नाखु
काकोबा
हितचिंतक नाखु
17 Jun 2015 - 2:31 am | प्रभाकर पेठकर
आमच्या सोसायटीतील बहुतेक सदस्य सेवानिवृती आलेल्या फंडातून सदनिका घेऊन राहतात. हल्लीचे उत्पन्न म्हणजे जे निवृत्ती वेतन मिळते तेव्हढेच. त्यामुळे प्रत्येक रुपया वाचविण्या कडेच ओढा. सोसायटीच्या बाहेरील बागेत दिवे काय करायचेत. कॉमन पॅसेज मध्ये मिणमिणते सिएफएल लावलेत. का तर ट्यूब लाईटने सोसायटीला विजेचे बिल जास्त येते. लिफ्ट मध्ये दोन दोन दिवे काय करायचेत? त्यांमुळे एक दिवाच काढून टाकला आहे. त्या साठी त्या सदगृहस्थाने दिवसातून सरासरी किती वेळ आपण लिफ्ट मधे घालवितो वगैरेचे गणित मांडून दाखविले.
अशा खत्रूड सदस्यांमुळे मनस्तापापलीकडे काही होत नाही. नशिबाने जनरेटर बॅकअप आहे.
तेही एकदा डिझेलच्या वापरावरून एका सेक्रेटरीने, विज गेली असता, जनरेटरवर लिफ्ट फक्त वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठीच चालू करण्यात येईल असा फतवा काढला. त्याची सदनिका दुसर्या मजल्यावर होती. माझी सदनिका सातव्या मजल्यावर आहे. मी त्याच्या घरी जाऊन जाम राडा केला. म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.
17 Jun 2015 - 5:36 am | स्पंदना
हे भारी!!
17 Jun 2015 - 6:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!!! =))
17 Jun 2015 - 9:06 am | नाखु
चांगला इंगा दाखवला
ह्या नतद्र्ष्ट लोकांचे घरी नक्कीच हाड्-हाड कुत्रे झालेले असते म्हणून बाहेर फुकट फौजदारी करण्याची खाज असते असे रोचक निरिक्षण आहे.
अपार्टमेंटात ७ वर्षे काढलेला
अनुभवी नाखु
17 Jun 2015 - 7:32 am | श्रीरंग_जोशी
धाग्यात उल्लेखलेला अपघात फारच दुर्दैवी. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असा अपघात आपल्या ओळखीच्या व्यक्ती वा नेहमीच्या ठिकाणी झाल्यास आपण अधिक काळजी घेतो कारण आपल्या मनात कुठेतरी भिती घर करून बसलेली असते.
माझ्या पहिल्या कंपनीत एक टिम लीड पोझिशनवर काम करणार्या दक्षिण भारतीय सहकारिणीचा नवरा पुण्यात त्यांच्या सोसायटीतील लिफ्टच्या अपघातात मरण पावला होता. तो अपघात बहुधा २००३ साली घडला होता. त्याने लिफ्टमध्ये पाय टाकताच लिफ्ट वेगाने खाली कोसळली व अक्षरशः शरीराचा काही भाग बाहेर अन काही भाग लिफ्टमध्ये अडकून तो मनुष्य जागीच गतप्राण झाला होता.
२००५ मध्ये तिच्या दुसर्या विवाहाला जाऊन आल्यावर आमच्या टिम लीडने (जी तिची जवळची मैत्रिण होती) याबाबत आम्हाला सांगितले होते. माझे शिक्षण सुरु असताना हीच बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती पण जोवर प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे कळले नव्हते तोवर मला विशेष भिती वाटली नव्हती.
तेव्हापासून मी कधीही लिफ्टचे दार बंद होत असताना शेवटच्या क्षणी हात घालून ते परतवत नाही. इतर लोकांना हे नेहमी करताना पाहूनही मी स्वतः तसे अजिबात करत नाही.
भारतात घर घेताना लिफ्ट्सच्या कायमस्वरूपी २४ x ७ उपलब्धतेबाबत शंका असल्याने (वीजपुरवठा खंडित होणे, यांत्रिक बिघाड किंवा मेंटेनंस फी न भरल्याने सेवा देणार्या कंपनीने लिफ्ट सुरू ठेवणे बंद करणे अशी विविध कारणे) मी दुसर्याच मजल्यावरचा फ्लॅट घेतला आहे.
सोबत वजनदार सामान असल्याखेरीज माझे आईवडीलही जिन्याचाच वापर करतात.
धाग्यात दिलेल्या सूचना उपयुक्त आहेत. हा लेख वाचणारे सर्वजण लिफ्ट वापरताना अधिक काळजी घेतील अशी आशा करुया.