ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण...
दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं! पहाटे पहाटे गावाला जाग यायची ती बिरोबाच्या मंदिरातील ढोलच्या आवाजाने. गाव वसायच्या आधीपासून बिरोबा येथे येऊन बसलेला, आणि बिरोबाच्या आशिर्वादाने हे गाव वसलं असे गावाची जुनी खोडं सांगायची. विजेचे खांब तालुकाच्या गावात कधीच पोचलेले, पण तारा आल्या नसल्यानं, आणि पाटलाला वेळ नसल्यामुळे गावात अजून वीज पोचलेली नव्हती. म्हणून बिरोबाच्या मंदिरासाठी वाण्यानं दान दिलेला स्पिकरचा भोंगा तसाच निपचिप मान टाकून लटकलेला. पण बिरोबाचा पुजारी रोज पहाटे आरती झाली की चांगला अर्धातास ढोल बडवायचा आणि गावाला जाग यायची. शेताकडे जाणारा, नदीकडे जाणारा-जाणारी प्रत्येक व्यक्ती बिरोबाला नमस्कार करूनच पुढे जात असे. त्यांच्या जगण्यात असाधारण असे महत्त्व या मंदिराचे होते. प्रत्येकाने त्याची आपल्यावर कृपादृष्टी असलीच पाहिजे व ती कृपादृष्टी असण्यासाठी त्याला नमस्कार करणे, प्रसाद चढवणे व वेळोवेळी नवस आणि कौल लावणे गरजेचे होते, कारण गावाचा तो जसा राखणकर्ता होता तसाच तो भल्या-बुरयाचां निर्णय घेणारा जागृत देव देखील होता.
गावाच्या वेशीवर असलेल्या बिरोबाच्या मंदिरातून ढोलचे आवाज आवाज येऊ लागले, आणि नेहमीची मंडळी नियम असल्याप्रमाणे मंदिराकडे जाऊ लागली. एक एक करत मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमा होऊ लागले. गप्पांचा फड रंगू लागला होता. बिरोबाच्या पुजारी हातात प्रसादाचे ताट घेऊन वडाकडे आला व प्रत्येकाच्या हातात खोबरं ठेऊ लागला. प्रसाद वाटता वाटता पुजारी म्हणाला “पाटील, यंदा देवाची जत्रा एकदम जोरात झाली पाहिजे बरं का!” पाटीलांनी प्रसाद आपल्या कपाळीं लावला व म्हणाले “हो, म्हणजे या, यंदा दणक्यात जत्रा होणार. यंदा देवाच्या क्रिपेने शेतात सोनं पिकले आहे प्रत्येकाच्या. कोणी हात आकडता घेणार नाही, मी शब्द देतो.. काय म्हणता मंडळी?” तेथे बसलेला प्रत्येकजण देवळाकडे तोंड करून दोन्ही हात जोडत म्हणाला “हो, नक्कीच.” पाटलानं आपला हात डोळ्यासमोर धरला व म्हणाला “अरे, तो रम्या हाय का? आवाज द्या रं त्याला.” केश्या जोरात ओरडला “ये, रम्या, इकडे ये. पाटील बोलावत हाईत.” रम्या जवळपास धावत आला व पाटालासमोर हात जोडून म्हणाला “राम राम, पाटील, बोला की” पाटलानं आपल्या खिश्यात हात घातला व पन्नास रुपयाची करकरीत नोट रम्याच्या हातावर ठेवली व म्हणाला “विहारीचा गाळ नीट काढलास नव्हं?” रम्याने ती नोट आपल्या दोन्ही हातात दाबून पाटलाला हात जोडत म्हणाला “होय हो, एकदम तळाचा दगड आणि दगड लक्ख दिसतो बघा.” पाटलाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व पाटील म्हणाला “गड्या, तुझे काम बेसं असतं म्हणून तर तुला सांगितले. पण या पैशाची दारू पिऊ नकोस. पैका जपून ठेव.” रम्या गडबडला, कसं बसं मानेनं हो म्हणत तो निघून गेला व पाटील हताश आवाजात म्हणाला “आपण लई वंगाळ काम केलं, त्याच पापाची फळ आहेत, तरणीताठी पोरं व्यसनाच्या नादी लागली, आपण लई मोठी चूक केली...” मोठी माणसं थरारली, व काहीच न बोलता, एक एक उठून जाऊ लागला व प्रत्येकाची मान खाली होती. पाटलाने बिरोबाला हात जोडले व म्हणाला “देवा, गावासाठी एवढं केलसं, या पापातून गावाला मुक्तीपण दे रे.” आणि पाटील मान खाली घालून चालू लागला.
बिरोबाच्या नावाने भलेमोठं पठार गावाच्या लोकांनी सोडलं होते, तेथे ना कोणी शेती करे, ना खूपच गरज असलेल्या शिवाय त्या देवाच्या जागेत प्रवेश करे. कधी कधी गावची पोरं मात्र, चिंचा, बोरं, कवटी यांच्या नादाने त्या पठारावर मनसोक्त दंगा घालत असत. मग कधी हणम्या त्यांना जोर जोरात शिव्या देत त्यांना पळवून लावत असे. हणम्या, हा गावातलाच, पण त्याची म्हातारी मेली व तो कायमचा बिरोबाचा सेवक झाला. त्याच्यावर देवानं जबाबदारी दिली होती पठार राखायची, पूर्ण गावासमोर देवाला कौल लावला होता, हणम्या देवळात सेवक म्हणून राहणार की पठार संभाळणार, दिला देवानं कौल, तेव्हा पासून तो पठार संभाळतो.
रम्याला आज पाटलानं पैसे दिले होते, त्यानं पाटलाच्या विहीरीचा गाळ काढून दिला होता, रम्या मजेत होता, खिश्यात पैसा खुळखुळत होता, रम्या मनातल्या मनात म्हणाला “आयला, आज जाता जाता हणम्याला पण तालुक्याला घेऊन जायचे, मस्तपैकी पहिल्या धारेची मनसोक्त प्यायची व उरला पैका तर उद्याच्याला म्हणून सोबत घेऊन यायची. हणम्या जेव्हा जेव्हा दारू मिळाली तेव्हा तेव्हा आपल्याला बोलावून दारू पाजली गड्याने. आज मोका हाय, त्याला पण पाजू.” रम्या झापाझाप रान तुडवत, पठारावर पोचला व टिपेच्या आवाजात ओरडल्या “ अरे, हणम्या, रांडेच्या कुठे आहेस रे!” पठारावर त्याचा आवाज दूरवर पोचला, पण हणम्याची परिचित अशी शिळ काय आली नाही. रम्याला आधीच तालुक्याला जाण्याची घाई झाली होती, तो हणम्याच्या नावाने शिव्या घालत, त्याला शोधू लागला. पठारावर भलं मोठं असलेलं चिंचे झाड, त्या दिशेने रम्या गेला, आणि त्याने पाहिले कि, त्या झाडाच्या बुध्यांलगत हणम्या तोंड वासून जमिनीवर उताणा पडला.. रम्या हणम्याला उन्हांतानात शोधात शोधात चिंचेच्या झाडाजवळ आला आणि..समोर हणम्या हा असा आडवा.. रम्या स्वत:शीच बोलल्यागत म्हणाला “च्यामायला, रांडेच्याला दारू कुठून मिळाली? आणि मिळाली तर मला का नाही पाजली? भोसडीच्याच्या गांडीला लै माज आला आहे आजकाल..” असे म्हणत रम्या त्याच्या जवळ जाऊन बसला आणि त्याला हलवत म्हणाला “ये हणम्या, रांडेच्या तुला कुणी दिली रं दारू?” पण हणम्याने काही उत्तर दिले नाही. रम्याने हणम्याला निरखून पाहिले.. आणि दचकून एकदम उभा राहिला. हणम्याचे डोळे उघडेच होते, वर चिंचेच्या झाडावर एक टक बघत असल्यागत! हिंमत करून रम्याने त्याच्या नाकाजवळ बोटं नेलं, काहीच हालचाल जाणवली नाही, तेव्हा त्याने जोरात बोंब मारली... “हणम्याssssssssss! अरा अरा देवा हे असं कसं झालं... त्यांनीच त्यांनीच मारला हणम्याला!!!” असे म्हणत तो गावकडे तोंड करून बोंबलत पळू लागला. धापा टाकत कसाबसा वेशीजवळ पोचल्या पोचल्या हणम्या जोरात ओरडला “चोराच्या भूतानी हणम्याचा पण जीव घेतला!” आणि रम्या धापकन जमिनीवर कोसळला.
गावातली चार-पाच तरणी पोरं धावत धावत पठारावरील चिंचेच्या झाडाखाली पोचली व, हणम्याला उचलून बिरोबाच्या मंदिरासमोरील पारावर त्याला झोपवला. वैदूबुवा धावत पोचले व त्यांनी हणम्याचा हात हातात घेतला व थोड्या वेळानं म्हणाले “हाय, थोडा जित्ता हाय यो. अरं कोणती पळत जावा आणि माझा घरातून माझं औषधाचे गाठोळ घेऊन या रं!” तडकाफडकी दोन पोरं वैदूबुवाच्या घराकडे पळाली. इकडे वैदूबुवा कधी हणम्याचे तळहात चोळत होते, तर कधी छाती. गेलेली पोरं लगेच पळत आली व त्यांनी गाठोळ वैदूबुवाच्या हाती दिले. वैदूबुवा लगेच २-३ पाला एकत्र करून त्याचा रस काढू लागले आणि रम्याने खूप वेळ मनात दाबून ठेवलेला प्रश्न वैदूबुवाला विचारला “वैदूबुवा, हणम्यानं दारू पिली हाय काय?” वैदूबुवाने रम्याकडे पाहिले व म्हणाला “नाय, पण पाटलाला बोलवा. लगेच या म्हणावं.” रम्या जागच्या जागी थिजला होता व तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो म्हणाला “म्हणजे, चोरांच्या भुतांनी.......” तोच वैदूबुवा परत ओरडले, “अरे जा, आधी पाटलाला बोलवा.” तसा रम्या पळाला, पाटलांच्या घराकडे. वैदूबुवाच्या चमत्कारानं हणम्याचा गेलेला श्वास जसा काय परत आला होता, पण हणम्याला दातखिळी बसली होती. वैदूबुवाने अनंत प्रयत्न करून कसाबसा त्याला शुद्धीत आणला आणि जवळपासं आखं गाव एकदम बोललं “हणम्या, मर्दा झालं काय होतं?”
रम्या पाटलाला घेऊन मंदिराच्या आवारात आला, आणि पाटील ओरडले “अरे, त्याला हवा लागू द्या, व्हा बाजूला.” तसा हणम्याच्या भोवती जमलेला जमाव झरकन बाजूला झाला. पाटील पारावर बसत म्हणाले “वैदूबुवा, आता काय परिस्थती? दारू पिली असेल फोद्रीच्याने. देवाचं काम करतो तरी. लाखवेळा बोललो, गड्या देवाचं काम करतोस तू, कश्याला देवाचा कोप होईल असलं वागतोस ऑ.” पण हणम्या पाठोपाठ वैदूबुवा पण मान हलवत म्हणाले “पाटील, यानं दारू नाही पिली. काय झालं आता तोच सांगेल.” हणम्या अजून भेदरला होता, पारावर आडवाच होता, आणि थोड्यावेळाने त्याच्या तोंडातून असप्ष्टसा असे म्हणाला “मी बदला घेणारं, तुमच्या गावचा मी बदला घेणारं” असं म्हणून हणम्या परत शुद्ध हरपून बेशुद्ध झाला. पण जवळ बसलेल्या पाटलाला मात्र पूर्ण समजलं, तो काय म्हणाला ते. मानेच्या मागून थंड घामाचा ओघळ पाटलाच्या पाठीपर्यंत पोचलेला पाटलाला जाणवला व हातापायाला त्याच्या कंप सुटला. कसाबसा धीर गोळा करत पाटील दबक्या आवाजात म्हणाला “आज, सांजच्याला आपण येथे एक बैठक करू. घरटी किमान एकतरी माणूस इथं पाहिजेच पाहिजे. बायका, पोरं घेऊन येऊ नका.” असे म्हणत, पाटील कपाळावर आलेला घामाचा ओघळ झटकत, पटकन उठला, व ताडताड मंदिराकडे गेला, आणि बिरोबासमोर साष्टांग नमस्कार घातला.
दुपार टळायच्या वक्ताला, हणम्या शुद्धीत आला होता. हणम्याने डोळं किलकिलं करून पाहिलं तर आजूबाजूला पुजारी, वैदूबुवा, रम्या, पाटील बसलेले त्याला दिसले तसं त्यानं रम्याचा हात हातात घेतं म्हणाला “रम्या, मर्दा, आपलं काय खरं नाय. ते आपल्याला बी मारणार, अगदी तसंच.” असं बोलून त्यानं हंबरडा फोडला. हणम्याला छातीशी धरून रम्यापण मुसमुसू लागला, तोच पुजारीने बिरोबाचा अंगारा हणम्याच्या कपाळावर चोळला व म्हणाला “शांत हो, शांत हो. आता निवांतपणे सांग काय झाले, काय पाहिलेस तू? हणम्या. तुला कळतय ना मी काय विचारतो आहे ते?” असं म्हणत पुजारी कुठलेसे मंत्र पुटपुटु लागले. हणम्याने पाटलाचे पाय धरले व म्हणाला “पाटील, वाचवा. ते जीव घेणारं माझा.” पाटलाच्या पोटात विहिरीएवढा मोठा खड्डा पडला व पाटील कसाबसा बोलला... “अरं, मर्दासारखा मर्द तू. आणि असा बाईसारखा रडतो आहेस? धीर धर काढू काय तरी मार्ग. मी सांजच्याला गावाला बोलावलं हाय इथं. मार्ग काढू आपण. पण आधी तू सांग काय झालं चिंचेच्या झाडाखाली?” चिंचेच्या झाडाचे नाव कानावर पडतातच हणम्याने डोळं गरारा फिरवले आणि तो परत बेशुद्ध पडला.
*
बिरोबा मंदिरासमोरील पारावर पाटील, पुजारी, वैदूबुवा बसलेले होते, शेजारी हणम्या अजून अर्धवट शुद्धीत आडवा होता, रम्या त्याच्या शेजारी बसला होता व सर्वांच्यासमोर गावातील झाडून सारी पुरुष मंडळी बसली होती, शून्यात नजर लावून. पाटलाने घसा खाकरला व अपरिचित अश्या घोघऱ्या आवाजात म्हणाला “मंडळी, गेल्या काही महिन्यात जे काही घडले, याचा आपल्याला खूप त्रास झाला. गावातील तरणीताठी अशी पाच पोरं गेली, तीन गर्भार बायका गेल्या, आज हणम्याचा जीव जाता जाता राहिला. हणम्या तर देवाचा सेवक. पण त्याला देखील ते सोडत नाही आहेत. यावर काय तरी उपाय गेला पाहिजे. नाही तर गावाचं अस्तित्वच धोक्यात येईल.” तोच गर्दीतून एक म्हातारा पण खणखणीत आवाज आला “पण विडीचे चटके देऊ म्हणत पुढे येणारा हाच, हाच तो हणम्या होता. केलेल्या पापाची फळं आपल्या सगळ्यांना येथेच भोगायची आहेत पाटील..” असे म्हणत तो म्हातारा खदाखदा हसू लागला.. आपले हसू आवारत, तो म्हणाला “मी म्हणालो होतो तेव्हा पण, काय बी करा, पण अशी अभद्र शिक्षा नगा करू त्या पोरांना. माझा काशी तर त्या दिवशी गावात पण नव्हता, पण हकनाक गावाच्या पापाचं फळ म्हणून पहिला बळी त्याचाच गेला. झाडावरून पडायचे काय त्याचे वय होते? मरायचे काय त्याचे वय होते?” असं म्हणून हसता हसता तो म्हातारा घाय मोकळून रडू लागला. तोच अजून एक पोरसवदा आवाज आला “अरे खोता, पेटवा पेटवा म्हणून तूच आधी बोंबलला होतास. इसरलासा?” हळू हळू आवाज वाढू लागले, प्रत्येकजण दुसरा कसा दोषी हेच सांगत होता. ढिल्या अंगाने बसलेला पाटील, हे सगळं पाहून पारंच ढेपाळला. पुजारीकडे हताश नजरेने पहात त्याने, आता तुम्हीच बघा असा इशारा केला... पुजारी उठला व जोरात ओरडला “गप्पा, बिरोबाची शपत हाय, पाटीलाचे बोलणं होऊ पर्यंत मध्ये जो तोंड उघडेल तो मुक्का होईल. कायमचा!” गप्प करून समोरचा जमाव शांत झाला व पाटील पुन्हा बोलू लागला “बघा, जे झालं ते झालं, आज एकमेकाला टोचून काय मिळणार. पण समोर उभं असलेलं संकट दूर कसं करायचं याचा इचार नको का करायला?” समोरचा जमाव चुळबुळ करू लागला, ते ध्यानात आल्यावर पाटलानं पुजारयाकडे एक नजर टाकली व पुजारी पटकन उठाला व म्हणाला “बिरोबाची शपथ मागे घेतो, पण वंगाळ काय बोलायचे नाही, मुद्दाचे बोला फक्तं!” असे म्हणून पुजाऱ्याने बिरोबाकडे तोंड करून हात जोडले. गावातला सगळ्यात म्हातारा असा सुतारआज्जा उभा राहिला व सगळ्यांकडे नजर फिरवत शांतपणे म्हणाला “बघा पाटील, मी सांगतो तुम्ही जावा तालुक्याला. शोधा कोणीतरी मांत्रिक-तांत्रिक. इशय आता तुमच्या बी हातात नाय ना या बिरोबाच्या. त्यांनी मरताना बिरोबाचीच शपथ घेतली होती, आठवतंय ना?” असं म्हणत तो म्हातारा थरथरत बसला, पण गावाच्या प्रत्येक माणसांच्या कानावर ते शब्द पडू लागले “मी चोर नाय, पण या बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!” एक एक करत सगळे गप्पं गुमान उठू लागले, पाटील थिजल्यागत तेथेच बसून होता, पुजारी अगतिकतेने कुठलेसे मंत्र पुटपुटू लागला व वैदूबुवा आता काय हे प्रश्न चिन्ह चेहरयावर घेऊन पाटलाकडे आशेने पाहू लागले, पाटील थोड्या वेळात बोलला “मी जातो उद्या, तालुक्याला.” हताशपणे प्रत्येकजण उठला पण जाताना, चिमूटभर बिरोबाचा अंगारा न विसरता प्रत्येकजण सोबत घेऊन जात होता. थोड्यावेळात तेथे भयाण शांतता पसरली व निवांत बेशुद्ध असलेल्या हणम्याचा राखणदार मित्र रम्या, बिरोबाचा अंगारा हातात घेऊन दूरवर दिसत असलेल्या पठारावरील चिंचेच्या झाडाचे टोक पाहत तसाच बसून होता.
पुजारी पाहटच्या पहिल्या वक्ताला, मंदिराकडे निघाला होता, मंदिराकडे पोचल्या पोचल्या त्याने पारावर नजर मारली तर, रम्या हणम्या शेजारी बसून होता, पुजारीने मंदिरातून आवाज दिला “रम्या, जा पोर, घरी जाऊन आवरून ये. मी पोचलो हाय मंदिरात.” थोडा वेळ उत्तराची वाट पहात पुजारी जागेवर थबकला पण रम्याकडून काहीच उत्तर आले नाही. पुजाऱ्याने मंदिराचे आंगण झाडले व सहज नजर पारावर टाकली तर रम्या अजून तसाच बसला होता. पुजारीने हातातील खराटा टाकला व हळू हळू पाराकडे जाऊ लागला व जाता जाता तो रम्याला आवाज देत होता “अरे, रम्या, रम्या?... रम्या बसल्या बसल्या झोपलास काय रे? हणम्या? कशी आहे रं तुझी तब्येत?” पण उत्तर कोणीच देत नव्हते. पुजारी पाराजवळ पोचला व त्याने रम्याला हाथ लावला तसा रम्या, धाडकन आडवा पडला. पुजार्याला काही सुचायच्या आत त्याची नजर हणम्याकडे गेली, तर हणम्याचे डोळे पांढरे झालेले. त्याच वेळी त्याने रम्याकडे पाहिले तर रम्याचे डोळे सताड उघडे होते, व चेहऱ्यावर भयंकर काहीतरी दिसल्याचे भाव... पुजारी धावत पळत ढोलजवळ पोचला व वाटेल तसा जमेल तसा दोन्ही हाताने ढोल वाजवू लागला. नादमय ढोलच्या स्वराची सवय असलेले गाव अश्या विचित्र ढोलच्या नादाने धडपडत जागे झाले व जो तो बिरोबाच्या मंदिराकडे धावू लागला, तालुक्याला जायचे म्हणून लवकर उठलेला पाटील सुद्धा!
*
(क्रमशः)
(माझ्याच "एक अडनिड गावाची गोष्ट... " या पुस्तकातील एक प्रकरण)
* मिपाच्या वाचकांना ही एक भेट, खरं तर हे मी मिपाच्या दिवाळी अंकासाठी लिहित होतो, व लिहिता लिहिता एवढी मोठी कथा झाली की, आता याचे पुस्तक होत आहे.
प्रतिक्रिया
14 Nov 2014 - 9:49 pm | दशानन
आवडली नाही, समजली नाही, पटली नाही, काहीही तुमचे प्रतिसाद असतील तसेच यावेत ही विनंती. अश्याच काही कथांचे संमिश्र पुस्तक येत आहे, त्यात मिपावर प्रकाशित झालेले काळेसार ही देखील कथा व अजून काही.
हा फक्त वाचकांना काय वाटते याची चाचपणी करावी शक्यतो हा हे तू असेल माझा, पण मी एक प्रयोग म्हणून तुंच्या समोर पूर्ण कथा देतो आहे. माझे लेखन याची सुरवात मनोगत पासून झाले असले तरी, मला वाचक येथे आपल्या मिपावर मिळाले. म्हणून पहिला भाग तुमच्यासाठी.. मिपासाठी.
14 Nov 2014 - 10:57 pm | अमित खोजे
कथा छानच आहे. समजली देखील पूर्णपणे.
सुरुवातीचा थरार सस्पेन्स चांगला तयार केला आहे. पाटलाने चोर्या केल्या असतील असे वाटले नव्हते किंवा वाचनाच्या नादात तेवढा विचारच नाही केला त्यामुळे त्याच्या कबुलीजवाबाचा धक्काच बसला.
आवडली.
14 Nov 2014 - 11:23 pm | टवाळ कार्टा
+१११११११
15 Nov 2014 - 1:35 am | धडपड्या
हाईंग!!! भुताला काय माहीत पाटिल चोर होता?
15 Nov 2014 - 3:12 pm | दशानन
भुताला सगळे माहिती असते असे म्हणतात (आधार - अनेक लोककथा / भयकथा)
15 Nov 2014 - 7:21 pm | धडपड्या
असं असतयं व्हय! म्या पामराला न्हवतं म्हईत...
बाकी थरार एकदम मस्त जमलाय... एकदम वेगवान कथानक असल्याने मजा आली... अश्याच मेजवान्या देत रहा..
15 Nov 2014 - 6:41 pm | एस
कथा आवडली. थोडी साफसफाई आणि एकदोन ढोबळ चुका टाळल्यास अजून मजा येईल. उदा. गर्भार बाया दोन की तीन?
16 Nov 2014 - 2:55 am | मुक्त विहारि
बाकी, भुताच्या कथा आम्हाला नेहमीच आवडतात...
पुस्तक कधी येणार आहे?