सुरेखा..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
30 Jul 2008 - 11:22 pm

"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?"
साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.
मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो. तेव्हा तिचा मुलगा शाळेत होता. त्यामुळे तिने आईला विनंती केली की, याची वार्षिक परिक्षा होईपर्यंत मी इथे रहाते .. तो पर्यंत तुमच्या घरचं काम करते. काम म्हणजे धुणं-भांडी, केर्-फरशी, बाकी आवरा आवर आणि स्वयंपाक .. आईनेही मान्य केलं. आणि २ महिने राहते म्हणून राहिलेली ही सुरेखा आमच्या कुटुंबाचा घटक झाली. तिच्यासाठी बंगल्याच्या बाहेर एक छोटीशी खोली वजा आउट हाऊस बांधून घेतलं. सकाळी अंगण झाडून घेण्यापासून हीचं काम सुरू होई. घरातल्या प्राणीमात्रांना सुद्धा तिची पट्कन सवय झाली. कर्नाटकची असल्याने भाकरी अशा काही सुंदर करते की, वरचा आणि खालचा पापुद्रा यांची जाडी एकच असते. तिला ब्राह्मणी पद्धतीने पोळ्या आणि भाज्या करयाला आईने शिकवल्या. खूप लवकर शिकली. आमच्या घरी स्वयंपाक करता करता आणखी १-२ ठिकाणची स्वयंपाकाचि तिनम कामं धरली. काळासावला रंग, शिडशिडीत बांधा आणि डोक्यावर पदर घेऊन तो कमरेशी खोचलेला अशा अवतारात बाई साहेब निघतात.
हिचे किस्से धमाल असतात. एकदा सगळीकडचे दिवे गेले होते. घरात अंधार होता. पण आमच्या घराच्या मागे चालेल्या बांधकामावर लाईट दिसत होते. आजीने विचारलं, "अगं सुरेखा, लाईट फक्त आपल्या घरीच गेलेत का? फ्युज वगैर नाही ना उडाला? कारण मागे लाईट आहे..." " न्हाई वं... जन्ड्रटल हाय तिथं.." सुरेखा म्हणाली. आजी म्हणाली, "काय आहे तिथं?".."जन्ड्रटल वं.. ते लावत्यात की लाई गेल्यावर"... सुरेखा समजावून देऊ लागली. " अच्छा.. जनरेटर होय..! बर बरं.." आजी म्हणाली. "हां बघा ते जन्ड्रटल हाय" सुरेखाने पुस्ती जोडली. हा प्रसंग आम्ही आठवून आठवून हसत होतो.
त्यानंतर एकदा, तिचा मोठा मुलगा जो कर्नाटकात कुठेतरी नुकताच ओफिसबॉय म्हणून नोकरीला लागला. तो हिला आणि धाकट्या भावाला भेटायला म्हणून आला. पहिला पगार झाला होता. तेव्हा भावाला घेऊन सिनेमाला गेला , त्याला कपडे आणले नवे, हिला साडी घेतली. त्यावेळि हिचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप बरं वाटलं. तिच्या त्या मुलाने एका संध्याकाळी येताना कोण्या गाड्यावरून चिकन ६५ आणले घरी. ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरी आली. आईने विचारलं, " तुझा झाला का स्वयंपाक?" तर म्हणाली, " पक्या (प्रकाश .. तो मोठा मुलगा), आज येताना चिट्टीफाय घ्यून आला हाय नव्हं. ते खाल्लो आताच.. आता पक्त्(फक्त) बाकरी(भाकरी) करनार २ आणि सकाळचा बात (भात) बी हाय तसाच. काय जास्त न्हाइ करायच आज" . आईने विचारलं," काय आणलं प्रकाशनं??" तर पुन्हा म्हणाली," चिट्टीफाय".. "काय??" आईने विचारलं. "अवं चिट्टीफाय वं.. ते चिकनचं असतयं नव्हं का..." सुरेखा समजावू लागली. "अच्छा.. चिकन ६५.. बर बर" आईला समजलं.
एकदा घरातले केर काढत होती. पलंगाच्या खालून केरसूणी फिरवल्यानंतर कसलं तरी छोटं कागदी पाकिट बाहेर आलं. आई म्हणाली," ते काय आलं बघ गं जरा बाहेर.." तिने ते उघडलं. म्हणाली ," निगूटी हाय त्यात". अईचं लक्ष नव्हतं. तिनं विचारलं ," कसली गूटी?".. "आवं.. निगूटी.. निगूटी" सुरेखाने सांगितलं. आईला काही समजेना. ती च्या जवळ गेली आणि पाहिलं. "अगं... निगेटिव्ह होय.. काय सुरेखा काय बोलतिस तू?" "त्येच सांगत व्हुतो न्हवं का निगूटी हाय म्हनून" सुरेखाचं उत्तर. "हम्म .. चुकलं बाई.. निगूटीच आहे ती." आईने नाद सोडून दिला.
आमच्या घरी तेव्हा एक मांजराचं लहान पिलू आणलं होतं. अजून नविन होतं ते आमच्या घराला. त्यामुळे कधी कधी ते पलंगाखाली त्याचे सगळे कार्यक्रम आटोपायचं. अशीच सुरेखा एकदा केर काढत होती. आणि तिला पलंगाच्या खाली काहीतरी पडलेलं दिसलं. ती नीरखून बघत असतानाच तिथे बाबा आले. म्हणाले, "काय गं अशी काय बघती आहेस?" "त्ये बघा तिथं कोपर्‍यात काय हाय?" सुरेखा म्हणाली. बाबा म्हणाले ,'खाली जाऊन बघ पलंगाच्या काय आहे ते.. मांजराने घाण केली असेल तर कागदावर घेऊन काढून टाक.""बर" म्हणत ती पलंगाखाली गेली. बाबांनी विचारलं," काय आहे गं?" तर म्हणाली," बू हाय बू"..बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले. "अवं.. ते नव्हं.. बू हाय बू" सुरेखा. "अगं.. मग काढून टाक ना.. बघत काय बसली आहेस?".. इति बाबा. "आवं दादा, बू हाय ह्यो बू" असं म्हणत ती पलंगाच्या बाहेर आली. तिच्या हातात.. एका भेटवस्तूला सजावटीसाठी लावलेला सॅटीनच्या रिबिनचा बो(बू) होता. तो खाली पडला होता. तो बो बघून बाबांना हसावं की रडावं हे कळेना.. आमची मात्र हसून हसून पार वाट लागली.
हिचे किस्से फार मजेदार आहेत. आईने एकदा गाजर हलवा केला होता. तो दूधात आटवत ठेवला होता. आईला स्पॉन्डीलाटिस असल्याने तिला फार वेळ हलवता येईना. तिने सुरेखाला सांगितलं "सुरेखा, हलवा हलव जरा आणि दूध आटलं की गॅस बंद कर" ती मन लावून ते करू लागली. दूध आटलं, हलवा झाला. तिने गॅस बंद केला आणि आईला म्हणाली,"ह्ये हलवं जालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे. अतिशय प्रेमळ, माया लवणारी ही सुरेखा पूर्ण दिवस राबत असते. मोठा मुलगा आता बेंगलोरला कोणत्यातरी मोठ्या कंपनीत शिपाइ म्हणून काम करतो. धाकटा मुलगा रिक्षा चालवतो. त्याने हिला मोबाईल घेऊन दिला आहे. पण फक्त फोन घ्यायचं बटण कुठलं आणि बंद करायचं बटण कुठलं याशिवाय त्या मोबाईल बद्दल काही माहीती नाही हिला. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, बाळंतीणीला चिकनचं सूप चांगलं असतं म्हणून रोज करून द्यायची. लेकाला माझ्याही खूप माया लावली तिने. तिच्या घरी थालिपिठ केलं की आवर्जून माझ्यासाठी घेऊन येते किंवा, मला तिच्या खोलीत बोलावून खायला लावते. कोल्हापूरि चिकन करावं तर ते सुरेखाने. पांढरा - तांबडा रस्सा तिच्या हातचा खाल्ला की बस्स! कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही इतका सुंदर करते.
आईकडून, पुरणपोळ्या, गूळाच्या पोळ्या, रव्याचे लाडू, उकडीचे मोदक शिकली. मी मात्र आईकडे गेले की, "सुरेखा, मस्तपैकी चिकन , तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी कर गं उद्या." अशी फर्माइश करते आणि माझी ही फर्माइश ऐकली की तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो. आणि मग दुसरे दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान आवाज येतो ,"वयनी, आज चिकन करायची व्हवं का.. मग आनायला पैसं देता का?".. सुरेखा तयारीला लागलेली असते.
- प्राजु

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 11:48 pm | भाग्यश्री

वा..सही लिहीलंय.. किस्से मजेदार!

शितल's picture

30 Jul 2008 - 11:49 pm | शितल

प्राजु,
सुरेखाचे व्यक्तीचित्र मस्त रंगवले आहेस.
हसुन हसुन पुरेवाट झाली. :)

इनोबा म्हणे's picture

31 Jul 2008 - 12:24 am | इनोबा म्हणे

प्राजुताई,
सुरेखाचं व्यक्तीचित्र ्सुरेख रंगवले आहेस.... मजा आली.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मुक्तसुनीत's picture

31 Jul 2008 - 5:00 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! सुरेख लेख !

धनंजय's picture

31 Jul 2008 - 12:33 am | धनंजय

मोठे गोड असते सीमाभागातले बोलणे.

माझ्या वर्गातल्या एका सवंगड्याची आई कोल्हापूर जिल्ह्यातली होती आणि वडील बेळगाव जिल्ह्यातले. त्याची बहीण "मी आलो" म्हणाली की कोल्हापूरचा प्रभाव की बेळगावचा हे कळेना!

व्यक्तिचित्र आवडले.

सर्किट's picture

31 Jul 2008 - 1:43 am | सर्किट (not verified)

त्याची बहीण "मी आलो" म्हणाली की कोल्हापूरचा प्रभाव की बेळगावचा हे कळेना!

विदर्भात देखील "मी आलो" हे बायकांकडून ऐकू येते.

- सर्किट

भडकमकर मास्तर's picture

31 Jul 2008 - 12:38 am | भडकमकर मास्तर

गेलो, जातो ,येतो अशी भाषा बायकांकडून कोल्हापूरला ऐकली आहे...
एकदम मजेदार असते...

शिवाय अनेकवचनी क्रियापदाचे आम्ही खाल्लो, आणलो असे मजेदार रूप तिकडेच ऐकायला मिळते....

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

31 Jul 2008 - 1:01 am | चतुरंग

हो भाषेची ही गोडी कोल्लापूरसारक्या सीमाभागातच अनुभवायला मिळते!
मिरजेतल्या माझ्या मावशीकडे काम करणारी मराठी/कानडी मुलखातली बाई दिवाळीच्या तयारीबद्दल आणि वाढत्या महागाईबद्दल मावशीशी बोलताना ऐकलेला संवाद -
"साकर्‍या, त्येल, ब्येसन झालंच तर गूळ समदं कालच आनलोय की वो ताई, पन आज ल्योक आली म्हनल्यावर आनिक आज पुन्ना आनायचं म्हनजी काय थोडं लागत्यात का काय वो पैसं?"

चतुरंग

संदीप चित्रे's picture

31 Jul 2008 - 2:03 am | संदीप चित्रे

व्यक्तिचित्रण छान लिहितेस प्राजु...
सुरेखाबाईंच्या हातची चिकन - भाकरी खायला कोल्हापूरला जायलाच हवं :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

व्यक्तिचित्रण छान लिहितेस प्राजु...
सुरेखाबाईंच्या हातची चिकन - भाकरी खायला कोल्हापूरला जायलाच हवं

हेच म्हणतो...!

प्राजू, जियो....!

अजूनही येऊ देत अशीच उत्तम व्यक्तिचित्रे...!

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

अनामिक's picture

31 Jul 2008 - 2:17 am | अनामिक

अगं काय मस्तं लिहलेयस... एक तर ऑफिसात लपून वाचतोय .... अन हसू दाबणे कठीण जातयं.

(ऑफिसातल्या आजू-बाजूला बसलेल्यांच स्वगत : काय हे ध्यान येड्यागत एकटच स्क्रिनकडे बघून हसत बसलय!)

(हसू न आवरता येणारा)
अनामिक

टारझन's picture

31 Jul 2008 - 2:39 am | टारझन

सुरेखा वाचुन अशोक सराफ, निशिगंधा वाड आणि सुधिर जोशींचा एक चित्रपट आठवला आणि खुदकन् हसू आलं ...

बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले.
ह.ह.पु.वा. =)) बाबा भलतेच विनोदी दिसतात... मजा आ गया :)

जन्ड्रटल, चिट्टीफाय ,निगुटी
हे जाम झाक !!! आमच्या ईथले एक महाभाग क्रिकेटचा स्कोर विचारतात , भाऊ "कोर्स" काय झालाय?" :)

अवांतर : चिकन आमचा विक पॉईंट आहे. आम्ही चिकन खाण्यासाठी कुठे पण जातो ..कोल्लापुरला पण

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

अरुण मनोहर's picture

31 Jul 2008 - 4:40 am | अरुण मनोहर

व्यक्तीचित्र आवडले. असेच वरचेवर लिहीत जा.

राधा's picture

31 Jul 2008 - 6:41 am | राधा

''ह्ये हलवंजालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे.

हा....हा.........हा........

छान लिहिलस.

सहज's picture

31 Jul 2008 - 6:52 am | सहज

दे धमाल! फूल टाईमपास!!

मजा आली.

दोयल's picture

31 Jul 2008 - 7:00 am | दोयल

सुरेख जमली आहे सुरेखा..

आनंदयात्री's picture

31 Jul 2008 - 8:53 am | आनंदयात्री

>>मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.

=)) .. छान आठवणी मांडल्यात !

नंदन's picture

31 Jul 2008 - 12:33 pm | नंदन

लिहिलंय, लेख आणि त्यातले किस्से आवडले.

अवांतर - दोनेक महिन्यांपूर्वी लावलेल्या तांबड्या-पांढर्‍या रस्स्याच्या ताटाच्या चित्राचे रहस्य हेच का? :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश

वा प्राजु,सुरेखा आवडली, नंदन सारखेच मलाही ते तांबड्यापांढर्‍या रश्श्याचे ताट आठवले,:)
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2008 - 12:47 pm | बिपिन कार्यकर्ते

प्राजु, फर्मास. बू तर मस्तच होता.

बिपिन.

अन्जलि's picture

31 Jul 2008 - 1:06 pm | अन्जलि

ए प्राजु अग सगळ्याच्या समोर हसता येत नाहि ना. काय लिहितेस ग एकदम मस्त. मजा आलि. आणि आपण मात्र उगिचच भासासुध्दि वर चर्चा करत बसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2008 - 6:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उगाच कसं?

आपली बासासुदी झाली पायजे, नव्हं का?

अदिती

प्राजु's picture

31 Jul 2008 - 5:12 pm | प्राजु

आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद..

तांबडा पांढरा रस्स्याचे गुपित तेच आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसुनाना's picture

31 Jul 2008 - 7:57 pm | विसुनाना

काय जंक्शान लिवलंय! एक लंबर!
आसं आजून यिऊंद्या..

बेसनलाडू's picture

1 Aug 2008 - 1:39 am | बेसनलाडू

सुरेखाच्या बोलण्याचे आणि त्यामुळे होणार्‍या गमतीजमतींचे चित्रण आवडले.
(वाचक)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

1 Aug 2008 - 1:43 am | घाटावरचे भट

लैच्च भारी....काय झ्याक लिवता वो तुमी!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 11:15 am | मनस्वी

किस्से लिहिलेस प्राजु.
आवडली सुरेखा.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *