रेजोल्यूशन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
27 Dec 2013 - 10:57 pm

२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील. सगळं काही दरवर्षी सारखंच.

दुस-या दिवशी आपापल्या कार्यालयात जाण्याची तीच धडपड, तोच ट्रॅफिक, तोच हॉर्न चा ठणाणा, तेच बेशिस्त, बेछूट वाहन चालवणं, तीच ट्रेन ची गर्दी, तेच दुस-याला लोटून आपण पुढे जाणं, त्याच गर्दी ओथंबून वाहणा-या बसेस, तीच लळालोंबी, सगळं पुन्हा तेच असेल. मग त्यात असल्यास घराची काळजी असेल, कुणा आपल्याच्या आरोग्याचं, करियर चं, शिक्षणाचं टेन्शन असेल, आणि या सगळ्यामुळे आपण राहतो त्या देशाबद्दल, राज्याबद्दल, शहराबद्दल आपल्या मनात द्वेष, आणि तोंडात शिव्या असतील, एक अनामिक वैफल्य असेल.

आपल्यात एक विचित्र शर्यत वाढीला लागलीय. त्यात फक्त स्वत:चा विचार आणि दुस-याच्या पुढे जाण्याचं उद्दिष्ट या दोनच गोष्टी आहेत. हटवाद आहे, चंगळवाद आहे, शक्तिवाद आहे. विचार, तत्व, मूल्य, संस्कार, सामंजस्य, आदर, स्वाभिमान या गोष्टींना आता जागाच उरलेली नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून हे प्रतीत होतं. रस्त्यावरून गाडी चालवताना, दुस-या गाडीच्या पुढे नाक खुपसून जाण्यात आपल्याला श्रेष्ठता वाटते. आपण रस्त्यावर चालणा-या व्यक्तीला रस्ता क्रॉस न करू देता तिच्याकडे डोळे वटारून बघत आपली गाडी पुढे दामटतो. आपण उगीचच सिग्नल ला आपल्या पुढे उभ्या असलेल्या गाडीच्या पुढे जाण्यासाठी आपल्या गाडीचा जीव काढतो. दुकानात आपण आपल्या मापाचा शर्ट, ड्रेस मिळाला नाही अशा क्षुल्लक कारणावरून हकनाहक एखाद्या सेल्समनला चार शब्द ऐकवतो. बसमध्ये, ट्रेनमध्ये, एखाद्याचा चुकून पायावर पाय पडला, तर ‘डोळे फुटले का’, ‘आंधळा आहेस का’ अशा उक्त्या उच्चारायला लागतो. हा द्वेश, ही नकारात्मक उर्जा, ही ईर्ष्या आपण क्षणोक्षण घेऊन वावरत असतो आणि आपल्या वागण्यातून तिचा सतत प्रसार, आणि प्रचार करत असतो. कारण मात्र पडताळून पहात नाही. या उर्जेचा स्फोट मग कधी घरी, कधी ऑफिसात, कधी कुणा व्यक्तीवर तर कधी वस्तूवर होतो, आपण पर्यायाने स्वत:लाच त्रास देतो, आणि आपल्याच सुखाचा मार्ग क्लिष्ट करत जातो.

आपल्या मनात प्रश्नांचा एक झरा अव्याहत वाहत असतो. मी काय करू, मी कशाला करू, मला काय मिळणारंय, माझं काय जातं, मला कोण विचारतो, मलाच का, मी का ऐकून घेऊ, माझ्याच बाबतीत का आणि असे असंख्य प्रश्न. सगळ्यात एकच साम्य, ते म्हणजे ‘मी’. आपण किती स्वार्थी, आत्मकेंद्री विचार करतो याची आपल्याला खरोखर कल्पना नसते. आणि का न करावा; सगळेच तसां विचार करतात, आपण नाही केला तर आपणच मागे राहू हे आपलं स्वत:ला समजावणंही असतं. पण ते समजावणं हे पुन्हा तशाच वागण्याकडे नेणारं असतं.

चांगल्या सवयी, चांगली मूल्य जपायला किंवा ती आत्मसात करायला आपण इतके निरुत्सुक का असतो? आपल्यावर झालेले संस्कार, आपल्याला शाळेत शिकवलेली मूल्य, दिलेली थोरांची उदाहरणं, ही तेवढ्यापुरतीच होती का? परवा रस्त्यावर पडलेलं केळ्याचं साल उचलून रस्त्याच्या कडेला असलेल्या कच-याच्या डब्यात टाकल्यावर एक सहकर्मचारी मला म्हणाला, ‘उचलणारा एक असशील, टाकणारे लाखो आहेत’. हा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही की उचलणारे दुसरे आपण होऊ शकतो, किंवा व्हावं. पुढे काही मिनिटांनी गोळीचं वेश्टन त्यानेही रस्त्यावरच टाकलं होतं. एखाद्या रांगेत उभं असताना पुढे घुसण्याचा मोह आपल्याला होतोच होतो. आपल्या मधे कुणी घुसलेलं मात्र आपल्याला चालत नाही, आपण चरफडतो. ‘रांगेचा फायदा सर्वांना’ हा केवळ एक सुविचार म्हणून उरतो. रस्त्यावरचे सिग्नल आपण पाळत नाही, कुणी पाळले तर त्याच्यावर विनोद करून तो व्हॉट्सॅप्प वर फ़ॉरवर्ड करून हसतो जरूर. कारण आपण एकट्याने सिग्नल पाळून काय होतंय, सगळ्यांनी पाळला पाहिजे हे आपलं उत्तर असतं. पण हे सगळे म्हणजेच आपण; हा विचार केला जात नाही. बाईकने जाताना एखाद्या आजोबांना, आजीला, रस्ता क्रॉस करायचा असेल आणि आपण दोन क्षण बाईक थांबवली तर आपलं काहीच नुकसान होत नाही, उलट दिलाच तर ते आशीर्वाद देतील आपल्याला; पण आपण हे करत नाही. त्या दोन सेकंदानी आपण कुठे पुढे पोहोचणार आहोत हा विचार आपण करत नाही. समोरचं वाहन थांबलं, की सेकंदकाटा पुढे सरकायच्या आत आपल्या वाहनाचा हॉर्न चारदा वाजलेला असतो. आपण डाव्या-उजव्या, असेल त्या बाजूने त्या वाहनाच्या पुढे आपलं वाहन दामटण्याचा प्रयत्न करतो, पुढे ट्रॅफिक अजून वाढवतो, आपला जीवही धोक्यात घालतो, जाता जाता त्या अडलेल्या वाहनाचालकाला शिव्या घालतो, पण त्याची गाडी बंद पडलीय का, किंवा त्याला काही झालंय का, हा साधा विचारही करत नाही. का? इतकी कसली घाई असते आपल्याला? एखाद्या ति-हाईताशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपण तलवार उपसूनच बोलतो. ‘ ‘अरे’ ला ‘कारे’’ हे समीकरण आहे आपलं. पण नम्रपणे बोललं तर समोरचाही ऐकतो, आणि नम्रपणे, प्रेमाने बोललं तर आपण छोटे होत नाही, हे शाळेत शिकवलेलं तत्व शाळेच्या वहीतच विरलेलं असतं.

सामंजस्य दाखवणं, आदर देणं, म्हणजे कमीपणाचं नाही, हे आपण आधी समजलं पाहिजे. हे एक दुष्टचक्र आहे. आणि हा संयमाचा अभाव, हा राग, हे आत साठलेलं वैफल्य ह्या त्या दुष्टचक्राच्या व्युत्पत्ती आहेत. आपण हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवू शकतो. याचे दूरगामी परिणाम वाईट आहेतच, पण प्रत्येक क्षणी स्वत:वर आपण यामुळे किती ताण देतो, त्यातून काय काय व्याधी होऊ शकतात हा विचार आपण आपल्याशीच करायला हवा. एखादी गोष्ट मिळायला किंवा घडायला हवी, तर त्यासाठी प्रयत्न करायचे, की ती त्या च्या त्या वेळी मिळत नाही म्हणून चिडून त्याचा राग आपल्या इतर वागण्यात व्यक्त होऊ द्यायचा आणि अनेकांना उगीचच दुखवायचं हे ठरवावं. आपण नियम पाळले, म्हणून आपण भ्याड ठरत नाही आणि ते मोडले म्हणून शूर ठरत नाही, हे आधी समजून घेतलं पाहिजे. उलट नियम पाळून आपण आणखी चार जणांना ते पाळायला उद्युक्त करावं, आपल्या आजूबाजूच्यांसमोर, पुढच्या पिढीसमोर चांगलं उदाहरण ठेवावं, हे मनाला पटवायला हवं. वर्चस्व गाजवूनच मोठं होता येतं, असं नाही. सामोपचाराने वागून एकाच वेळी अनेकांच्या मनात आपण मोठे होतो, आणि तेच खरं मोठेपण असतं. रस्त्यावर कचरा टाकणे, थुकणे, हे करून काय मिळतं, आणि तोच कचरा आपण व्यवस्थित कच-याच्या कुंडीत नेऊन टाकला, तर काय बिघडतं याचा आढावा घ्यायला हवा. थोडा आळस बाजूला ठेवायला हवा.

aaa

आपण हे सगळं करत नाही, आणि मग परदेशांच्या तुलनेत आपल्या देशाला नावं ठेवतो. आपला देश सध्या एका बदलाची वाट बघतोय. नवीन वर्ष बदलाचं असेल असे वारे वाहत आहेत. आपण सगळे सुद्धा एकत्रितपणे बदलू शकतो, एकमेकांना चांगल्या बदलात सामील करून घेऊ शकतो. वुई कॅन ऑल बी गुड मेन अ‍ॅण्ड विमेन. काहीही करताना आपण एक क्षणभर विचार करूया. योग्य अयोग्य चा ताळेबंद मांडूया. चांगलं वागूया. चांगल्या सवयी लावूया, समोरच्याला मान देऊया, आपणही तो कमवूया. ति-हाईत का असेना, त्याच्याशी हसून बोललो तर बिघडलं कुठे? हसून बोलूया. नियम पाळूया. सौजन्य, सामंजस्य, आपुलकी, माणुसकी, एकता, प्रामाणिकपणा, ही सगळी मूल्य रंगांसारखी आहेत, त्यांना एकत्र आणून आपल्यासकट आपल्या समाजाचं, गावाचं, देशाचं एक सुंदर चित्र आपण बनवूया. आपण माणसं आहोत, माणसांसारखं वागूया. २०१४ साठी; नव्हे नेहमीसाठी, एखादं रेजोल्यूशन असंही करूया. तेंव्हा, काय बरोबर आहे, आणि काय चूक; तुम्हीच विचार करा.

संस्कृतीसमाजजीवनमानविचारलेखमतसल्ला

प्रतिक्रिया

स्पा's picture

27 Dec 2013 - 11:00 pm | स्पा

अप्रतीम लिहील आहेस रे,

wish u a very happy and prosperous new year :-)

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 9:12 pm | वेल्लाभट

धन्यवाद मित्रा

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2013 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा

+१ अप्रतिमच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2013 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विचार ! ते दुसरा काय करतो ह्याचा विचार न करता आचरणात आणण्याची गरज आहे !!

अनिरुद्ध प's picture

28 Dec 2013 - 1:03 pm | अनिरुद्ध प

+१

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 9:13 pm | वेल्लाभट

+१

मुक्त विहारि's picture

27 Dec 2013 - 11:09 pm | मुक्त विहारि

निदान माझ्या पुरते तरी, मी आपले विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न करीन.

बिजुरीया's picture

28 Dec 2013 - 7:57 am | बिजुरीया

अशा रेजुलेशनचीच आज आपल्याला गरज आहे!

छान विचार.

अनुप ढेरे's picture

28 Dec 2013 - 9:44 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. विचार आवडले.

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 10:26 pm | वेल्लाभट

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Dec 2013 - 10:06 am | ज्ञानोबाचे पैजार

वेल्लाभट गुरुजी,
विचार चांगला आहे आणि तो प्रत्येकाने नक्की आचरणात आणला पाहिजे असाच आहे.

किंबहुना इथे येणार्‍या प्रत्येकाने कधी ना कधी असा प्रयत्न नक्कीच केला असेल. पण मिळणार्‍या नकारात्मक प्रतिसादांमुळे नाउमेद झालेला असतो. या वर काही उपाय करता आला तर अशा समविचारी आणि कृतिशील लोकांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही.

उदा. नियमीत पणे हा धागा वर काढुन मधल्या काळात आलेले चांगले अनुभव जर सांगीतले तर हा विचार टिकवता येईल.

देशपांडे विनायक's picture

28 Dec 2013 - 10:36 am | देशपांडे विनायक

जे लोक असे वागत आहेत त्यांचा कट्टा व्हावा

ब़जरबट्टू's picture

28 Dec 2013 - 11:42 am | ब़जरबट्टू

छान लिहलेय..
स्वतापासून सुरवात करुनच काही गोष्टी बदलता येतात.. मुळात काही गोष्टीत तर आपली सुरुवात सगळ्या कळपाला सवय लावते. उदाहरणार्थ, मी तरी प्रत्येक सिग्नल ला हिरवा कदींल मिळेपर्यन्त थांबवतो चारचाकी..साहजिकच शेवटच्या १० सेंकदामध्ये तर नुस्ते भोंगे बदडतात लोक.. काय घाई असते देव जाणे.. मी मजा घेतो ते माझ्या भंगार गाडिने मागच्या "ऑड्या" अडवण्यात.... :).. साला.. सेकंदात माज उतरवता येतो एखाद्याचा कायदा दाखवून.. फक्त सुरुवात आपण करावी लागते, नाहीतर विदेशवारी झाल्यावर भारतात येणारी लाज कमी कशी होणार ?

नितीन पाठक's picture

28 Dec 2013 - 12:09 pm | नितीन पाठक

जेव्हा स्वःता पासून सुरुवात होईल तेव्हाच बदल दिसून येईल. सिग्नल तोडून पुढे जाणे यातच खूप मोठा पराक्रम केला असे वाटणारे खूप जण आहेत. एकदा मी लाल सिग्नल असल्यामुळे थांबलो होतो, गर्दी नव्ह्ती, "मामा" पण नव्हते परंतु मागच्या एका 'मोठ्या' गाडीची माझ्या थांबण्यामुळे अडचण झाली. त्याने ठ्णठणा ओरडयाला सुरूवात केली. चला पुढे, कोणी बघत नाही. मी त्याला नकार दिला व सिग्नल सुरू व्हायची वाट पाहू लागलो आणि तो हमरीतुमरी वर आला अगदी - आला मोठा नियम पाळणारा इत्यादी.... मी त्याला शांतपणे म्हणालो की, तुला नियम पाळावयाचा नसेल तर तू नको पाळू मी नियम पाळणारच. तो शेवटी रागारागाने माझ्याकडे पहात निघून गेला.
कारण नसतांना हॉर्न वाजवणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, कोठे ही थुंकणे अशा साध्या गोष्टी टाळल्या तरी चांगलाच बदल होईल.

ब़जरबट्टू's picture

28 Dec 2013 - 12:41 pm | ब़जरबट्टू

गाडी मोठी घेता येते, पण त्यासोबत लागणारा मोठेपणा कसा येणार...

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 10:26 pm | वेल्लाभट

@बिजुरिया : खरंच हो...
@मुक्तविहारी : नक्की करा; वाचून आनंद झाला
@बजरबट्टू : सेम ! मीही हेच असंच करतो. नुकताच आलेला एक अनुभव. I was at this signal yesterday and had stopped my car behind the Zebra Crossing strip. As expected, the other vehicles were going past that strip and halting almost at the middle of the square. The bus driver behind my car was honking relentlessly. I stepped out of the car, went at him with a smile, and began explaining. I told him, "this is that zebra crossing which is for the pedestrians to cross the road and where the vehicles should stop, right?" then I am doing exactly that, and when this signal goes green, I am going to move, so please, consider it a request to not panic and honk" "But the other vehicles are going ahead" was the reply. "I agree. But WE are educated, aren't we?" "yes" with a smile was what I got.
He did not honk then till the signal went green and I moved my car. (though the other vehicles zoomed off from besides us) I was happy having Done The Right Thing.

@पैजार, देशपांडे : कट्टाच नव्हे, भेटून काही अ‍ॅक्टिव्हिटी झाली तर काहीतरी होताना दिसेल. Do The Right Thing असा आम्ही अशाच समविचारी मित्रांनी केलेला एक चेपु ग्रूप आहे जिथे आम्ही असे अनुभव, असं वाचनीय शेअर करतो आणि प्रयत्न करतो, इतरांना असं करण्यास प्रेरित करण्याचा.

देशपांडे विनायक's picture

29 Dec 2013 - 9:57 am | देशपांडे विनायक

आपला हा गृप मला JOIN करावयास आवडेल
काय करू ?

वेल्लाभट's picture

30 Dec 2013 - 9:39 am | वेल्लाभट

फेसबुकात Do The Right Thing शोधा...

यसवायजी's picture

30 Dec 2013 - 11:37 am | यसवायजी

@ I was happy having Done The Right Thing.
आवडले.

वाटाड्या...'s picture

28 Dec 2013 - 11:52 pm | वाटाड्या...

वेल्लाभटशेठ..

अगदी मनातलं बोल्लात. मीपण हे करतोच. माझ्या डोळ्यादेखत एका वृद्ध माणसाला जेव्हा चिरडताना पाहीलं तेव्हा गप्प राहणं सोडुन दिलं. अर्थात दोन हात करायची ताकद असल्यानं फारसं कोणी वाट्याला जात नाही. तरी शक्यतो हात जोडुन पटवायचं धोरण सोडत नाही. उत्तम लेख. तुमच्यासारखीच अजुन पिढी सक्षम आणि समंजस होवो हीच इच्छा...

- वाट्या...

इन्दुसुता's picture

29 Dec 2013 - 4:29 am | इन्दुसुता

सुंदर विचार.
I always do the right thing because it is the right thing to do. लहान वयापासून तसे करत असल्यामुळे मी वेगळी पडते हे सांगायला नकोच.
इतर गोष्टींचा आता मी स्वत:ला त्रास होऊ देत नाही, मात्र राष्ट्र्गीताला अटेन्शन मध्ये उभी राहते ते बघून हसणारे बघीतले की वाईट वाटते खरे ( मला हसतात म्ह्णून नाही तर आपल्या देशाचा अनादर होतो याची त्यांना कल्पनाही नसते )! अर्थात हा थोडा वेगळा मुद्दा आहे याची जाणीव आहे मला!

वेल्लाभट's picture

30 Dec 2013 - 9:40 am | वेल्लाभट

@इन्दुसुता, वाटाडया.... अनुमोदन आणि आभार

ओंकार सुतार's picture

30 Dec 2013 - 10:04 am | ओंकार सुतार

मस्त...

चाणक्य's picture

30 Dec 2013 - 10:35 am | चाणक्य

अगदी शब्दाशब्दाशी सहमत.

अर्धवटराव's picture

30 Dec 2013 - 11:08 am | अर्धवटराव

साला एकंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच निगेटीव्ह झालाय आपला... अगदी शैक्षणीक जीवनात त्याची स्रुरुवात होते. मग पुढे हे फ्रस्ट्रेशन असं बेशिस्तीच्या रूपाने बाहेर पडतं. पण हे ही खरं कि खुप आवष्यक असं बरचसं परिवर्तन वाटतं तेव्हढं कठीण नाहि, किंबहुना फार सोपं आहे.

वेल सेड वेल्लाभट.

जेम्स गोळीच्या आवरणासारखी (दिखाऊ/आकर्षक)नसून लोणच्या सारखी आत मुरली पाहिजे.
म्हणून खरे निसर्ग प्रेमी /दुर्गप्रेमि कृतीमधून आदर्श देतात्.(मि पावरच्या लेखात एक समर्पक वाक्य आहे "मागे फक्त पाऊलखुणा ठेवा, सोबत फक्त आठवणी आणा"
मी सार्वजनीक ठिकाणी शिस्तीने वागलो तरच माझी मुले नक्की तशीच वागतील.
अशा(च) विचाराचा

लेख आवडला

दिपक.कुवेत's picture

30 Dec 2013 - 12:21 pm | दिपक.कुवेत

दिलेल्या उदाहरणांप्रमाणे अगदी तस्सच वागतो (निदान मी तरी हे कबुल करतोय). माझ्या घराजवळ एक सीग्नल आहे जीथुन यु टर्न अलाउड नाहिये. पण सकाळच्या वेळेत तीथे कोणी नसतं म्हणुन बिनधास्त सगळे टर्न घेतात...अगदि मी सुद्धा. पण आता नाहि......ह्या छोटया छोटया गोष्टिच फार मोठा बदल घडवतात. एक खुप चांगला लेख दिल्याबद्दल धन्यवाद. त्या प्रमाणे वागायचा जरुर प्रयत्न करीन.

मदनबाण's picture

30 Dec 2013 - 12:59 pm | मदनबाण

खरयं... हल्ली तर मला माझाच स्वभाव बदलत चालला आहे का ? हेच कळेनासे झाले आहे.आपल्या देशातले लोक असे का वागत आहेत हे कळेनासे झाले आहे. मोठ्या गाड्या माजुरडेपणे हाकणारे इतके मस्तवाल झाले आहेत की ज्या रस्त्यावरुन हे गाड्या चालवत आहेत तो ह्यांच्या बापानेच बनवला असावा असा तोरा असतो. बाकीचे गाड्या चालवणारे म्हणजे जणु किडे-मकोडेच ! चारचाकीवाले तर वायझेडपणा करतातच पण दुचाकीवाली धुम वर्गातली मंडळी तर त्याहुन भयानक वाटतात ! दुचाकी इतक्या वेगात जवळुन नेतात की त्याची दहशत बसावी आणि त्याच बरोबर आपला तोल देखील सांभाळायची गरज पडावी. मध्यंतरी अश्या एका दुचाकीस्वाराला मी सिग्नला गाठला होता... त्याला मी म्हंटले जितक्या वेगाने तू चालवतो आहेस ना त्यापेक्षा जास्त वेगाने तू वरती जाणार आहेस असे घरच्यांना कळवुन ठेव्.घाई अत्यंत घाईत असतात हल्ली सर्व जण,आणि आपण बावळटा सारखे हे बघत राहतोय असे वाटते.असाच दुसारा नमुना मला भेटला होता त्याला देखील मी सांगीतले बाबा रे तू देखील ऑफिसला चालला आहेस आणि मी सुद्धा,जिवंत राहिलो तर उध्या देखील ऑफिसला जाता येइल.
हॉर्न वाजवणारे तर इतके वायझेड असतात की त्यांच्या हाताला जणु हॉर्न वाजवायचे व्यसनच लागले असावे की काय असा संशय मनात येतो.आजु-बाजुला रुग्णालय आहे,शाळा आहे,सिग्नल लागला आहे तरी या माकडांना त्याचे भान नसते... नुसती पीप-पीप चालु असते...अश्या मंडळीशी माझा बर्‍याचदा खटका उडतो.तशीच परिस्थीती तोंडभर पानाचा रस्ता पचकन पिंक टाकणार्‍यांची देखील आहे. ही देखील बिनडोक माकडच ! एसटी बस मधला प्रवासी असो,४०७ टेंपो चालवणारा असो वा नवीकोरी डस्टर रस्त्यावर उधळवत जाणारा असो... या माकडांना एकच माहिती,उघडा खिडकी आणि मारा पिचकारी. अरे पण तुमच्या या बिनडोक कॄतीमुळे इतरांची काशी-मथुरा होते त्याच काय ? अश्याच एका टेंपो समोर मी माझी बाईक भर रस्त्यात आडवी लावुन नडलो होतो...अर्थातच तो जे थुकला ते माझ्या अंगावर उडाल्यानेच माझा असा तळतळाट झाला होता.रोजच जगण तसही हालाकीच झालं आहे ! या भिकार ****,**,***,***,भ्रष्ट राजकारण्यांनी इतकी पाचर मारुन ठेवली आहे की कधी कधी नेमके आपण का जगतो ? असा प्रश्न आपल्यालाच पडावा !
नक्की जगतो आहे म्हणजे काय करतो आहे ? जस्ट ट्राइंग टु सरव्हाइव्ह ? मग हे तर या देशातली कुत्री-मांजर सुद्धा करतात ! कधी कधी तर मला हे प्राणीच जास्त सुखी वाटायला लागतात्...मेंदुला रोज शॉट तर लागत नाही ना यांच्या मग तर हे नक्क्कीच सुखी.
मुळात रस्ते हे चांगले बांधण्याची गोष्ट नाही हे लोकांच्या मनावर बिंबले गेले आहे याची खात्री पटली आहे.जशी लहान मुलांची झोपण्याची गोधडी विविध तुकडे एकत्र शिवुन रंगीबेरंगी केलेली असते तसेच इष्टमन कलरचे रस्ते हे आपल्याला आपल्या देशातील भ्रष्ट कंत्राटदारांनी दिलेली देणगी आहे.सिंमेटच्या रस्त्यावर डांबर्,डांबराच्या रस्त्यावर पेव्हरब्लॉक पेव्हरब्लॉकच्या रस्त्यांवर डांबर आणि सिमेंट तर कधी संपूर्ण पुल पेव्हर ब्लॉकचा ही अशी काही अनोखी बांधणी या मंडळींनी इतक्या वर्षात केली आहे की नक्क्की रस्ता या शब्दाची व्याख्या काय यावर गहन संशोधन होउ शकेल्.वर या रस्त्यांचे फोटो काढुन ते वेबसाईटवर चढवुन ते डिजीटली बुजवण्याचे तंत्रज्ञान सुद्धा या मंडळींनी आत्मसात केले आहे ! कोण म्हणत की टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नाही ? वर करुन दाखवलेचे फोटो पेपरात येतात... दर वर्षी हेच होतं तेच कंत्राटदार तेच खड्डे आणि या खड्यांच्या बातम्या देणारी तीच वर्तमान पत्रे...बदलत ते फक्त वर्ष.
ही कुठली जगण्याची जीवन पद्धती जी मलाच जगणे नकोसे करु लागली आहे ?बलात्कार ही तर पूर्णपणे सामान्य गोष्ट झाली आहे हे मानायला माझे मन तयार होत नाही,पण रोज वर्तमान पत्र चाळले की तेच मन क्षुब्ध होत. रोज नवे घोटाळे नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहुन मन कोडगं तर झालं नाही ना हे मी अधुन मधुन चेक करत असतो...कारण मी या समाजात राहतो तो समाजच असा झाला आहे याची मला भिती वाटु लागली आहे.इतकी अराजकता माजावी की कशालाही धरबंद नाही ? इथे एटीएम मशिन्स लुटल्या जात आहेत,माफिया मंडळींनी वाळु पासुन पाण्या पर्यंत सर्वच क्षेत्रात आपले हातपाय पसरुन आहे,शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. सर्वाधिक तरुन लोक असणार्‍या माझ्या देशाची संपूर्ण वाताहतच नजरेस का पडते आहे ? या तरुणांना निराशेच्या गर्तेत जाउन आत्महत्येस प्रवॄत्त व्हावे का ?आपला देश महासत्ता होणार हा स्वप्नविलास खरचं सत्यात उतरेल का ? आणि या बाबतीत व या दिशेने या देशातले नागरिक विचार तरी करतात का ? असे अनेक प्रश्न रोजच माझ्या मनाला त्रास देण्याचे काम करत असतात...

नविन वर्षाचे माझे रेजोल्यूशन काय असावे ? मन मुर्दाड करु जगायला शिका ? शिस्त,प्रामाणिकपणा या आणि अधिक अवगुणांना फाट्यावर मारा ? जिथुन शक्य होईल आणि जसे शक्य होईल तितक्या मार्गांनी पैसे मिळवा,त्यासाठी कोणत्याही खालच्या थराला पोहचुन इतरांना जगणे कठीण करुन ठेवा ?पुढच्या हिंदुस्थानच्या तरुण पिढीची इतकी मजबुत पाचर मारुन ठेवा की त्यांना वाममार्ग हाच खरा खात्री दायक यशाचा मार्ग दिसला पाहिजे ? दारु प्या , बलात्कार करा ,लुट करा आणि जमेल तितका भ्रष्टाचार करुन इथल्या प्रत्येक माणसाला भिकेला लावा ?

सुहास झेले's picture

30 Dec 2013 - 1:17 pm | सुहास झेले

अप्रतिम... !!!

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 2:14 pm | वेल्लाभट

सुहास, मदनबाण, दीपक, नादखुळा, अर्धवटराव, चाणक्य, ओंकार सुतार....
सगळ्यांचे आभार!

राही's picture

31 Dec 2013 - 2:55 pm | राही

लेख आवडला.
'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' असे संतवचन आहेच.

मोहन's picture

31 Dec 2013 - 8:08 pm | मोहन

समयोचित लेखा बद्द्ल धन्यवाद. बदलायचा नक्की प्रयत्न करेन!