काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १
काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २
बऱ्याच इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की कॉफीचा जन्म अरेबियामधे व ॲबिसिनियामधे म्हणजे आत्ताच्या इथोपियामधे झाला. एकदा त्याची आवड निर्माण झाल्यावर मात्र त्याचा प्रसार सर्व उष्णकटीबंध प्रदेशात फारच झपाट्याने झाला. नवव्या शतकात अरबस्तानातील थोर वैज्ञानिक अबू अलि अल् हुसेन इब्न इबद अल्ला इब्न सिना याला कॉफीचे औषधी गुण माहीत होते. या माणसाला पाश्च्यात्य जग ॲव्हिसेना या नावाने ओळखते. त्याला ही माहिती होण्याआधी हे झाड रानावनात रानटी झाड म्हणून दुर्लक्षिले जात होते. जेव्हा इथोपियाचे नागरीक अरेबियामधे आले तेव्हा त्यांनी कॉफीच्या बिया येथे आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे खरे असले तरीही त्या बियांचे पेय तयार करण्यात व कॉफीच्या प्रसारात अरबांचा मोठा हात आहे हेही नाकारता येत नाही.
अरब कॉफी पिताना............खाली कॉफी उकळायचे भांडे दिसत आहे.
काही इतिहासकारांचे असेही म्हणणे आहे की येमेनमधे ५७५ साली कॉफी माहीत होती. याच काळात पर्शियाने येमेन इथोपियाकडून जिंकून घेतले होते. येमेनमधे कॉफीची लागवड त्या काळात होत होती हेही आता सिद्ध झाले आहे. अरब या पेयाच्या व्यापारीकरणाबद्दल इतके आशावादी होते की त्यांनी कॉफीचे बी बाहेर जाऊ नये म्हणून अटोकाट प्रयत्न केले व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले. हे बी ते बाहेर पाठवत पण त्याची रुजण्याची क्षमता मारून. ते हे काम त्या बिया उकळून करत. मक्केला लाखो यात्रेकरु ये जा करत असताना कॉफीचे स्संरक्षण करणे अशक्यच होते व शेवटी त्यांना त्याचा नाद सोडावा लागला.
बाबा बुदान...एक काल्पनिक चित्र.......
भारतातही कॉफी एका हाज यात्रेकरुनेच आणली. त्याचे नाव होते हाजी बाबा बुदान. हा १६०० सालच्या आसपास (म्हणजे शिवाजीच्या आधी) चिकमंगळूरला आला व तेथील जंगलात एक झोपडे बांधून राहू लागला. त्याच झोपडीच्या बाहेर त्याने स्वत:च्या वापरासाठी काही कॉफीच्या बिया पेरल्या. त्याला कल्पना नव्हती की या बिया भारतात एका फार मोठ्या उद्योगाला जन्म देणार आहेत. त्याने लावलेली झाडे एका ब्रिटिश माणसाने शोधून काढली. आज भारतात जी काही कॉफीची झाडे आहेत त्यातील जवळजवळ ६०/७० टक्के तरी या झाडांची बाळे आहेत. बाबा बुदान हे आता त्या भागात एक मोठ्ठे प्रस्थ झाले आहे. ब्रिटिशांनी १८४० साली भारतात कॉफीची शास्त्रशुद्ध लागवड करण्यास प्रारंभ केला. आपल्या लक्षात आले असेल की दक्षिणेवर बाबा बुदानचे किती उपकार आहेत ते. अर्थात मला वाई, महाबळेश्र्वर सारख्या भागात कॉफीची लागवड करून बघायला निश्चितच आवडेल. मला खात्री आहे की हे पीक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगले येऊ शकेल.
इकडे बाबा बुदाननी कॉफीच्या बीया भारतात पेरल्या त्याच काळात डच, जर्मन व इटालियन प्रवाशांनी लेव्हांटहून या अप्रतिम पेयाची माहीती आपल्या वनस्पतीशास्त्रज्ञांना पुरवली. लेव्हांट म्हणजे आत्ताचे सिरिया. १६१४ साली डच व्यापाऱ्यांनी कॉफीच्या लागवडीचे प्रयत्न करायचे ठरवले आणि त्यांनी एक रोप येमेन मधील लाल समुद्रावरील एक बंदर, मोचाहून, हॉलंडला नेण्यात यशही मिळवले. त्या काळात व आत्ताही हे बंदर कॉफीच्या व्यापाराचे एक प्रमुख केंद्र आहे. बऱ्याच कॉफीखान्यांचे नाव मोचा का असते याचे उत्तर याच्यात आहे. (इंग्लिश : मोका, स्पॅनिश: मोचा, अरेबीक: मोचा) त्या काळात श्रीलंका ही डचांची वसाहत असल्यामुळे त्यांनी याची लागवड तेथे केली. खरेतर अरबांनी सिलोनमधे कॉफी १५०५ सालीच आणली होती. डचांनी मात्र कॉफीची व्यापारी दृष्टीकोनातून लागवडीचा प्रयत्न चालू केला. १६७० साली फ्रेंचांनी युरोपमधे कॉफी लावायचा प्रयत्न केला पण तो फसला. १६९६ साली डचांनी मलबार येथून त्यांच्या जावाच्या वसाहतीत कॉफीची रोपे पाठविली ती त्या बेटांवरची पहिली रोपे. ही रोपे ‘कॉफी अरेबिका’ या जातीची होती व ती मलबार येथे कननूर येथे थेट अरेबियातून आणण्यात आली होती. या रोपांनी मात्र जावाच्या बेटांवर मूळ धरले. हीच जात पुढे इंडोनेशिया, सुमात्रा इ.....बेटांवर पसरली. १७०६ साली जावामधून कॉफीची रोपे ॲम्स्टरडॅम येथे आणण्यात आली. तेथील रोपवाटिकेमधून ही रोपे सामान्य जनतेत वितरीत करण्यात आली. डच त्यांच्या वसाहतींमधे कॉफीची लागवड करत असताना फ्रेंच वसाहतीत लागवड करण्यासाठी काही रोपांची रवानगी फ्रान्समधे करण्यात आली पण त्या रोपांनी तेथे तग धरला नाही. १७१४ साली मात्र फ्रेंच सरकारने ॲम्स्टरडॅमच्या नगरपालिकेबरोबर झालेल्या एका करारानुसार एक तरुण, जोम धरलेले कॉफीचे रोप फ्रान्सच्या राजाला मार्ले येथे पाठविले. तेथे राजाच्या प्रतिनिधीने, जार्डीन रोपवाटिकेत अँटोनी जुसॉं नावाच्या प्राध्यापकाने स्वीकारले. फ्रेंचांच्या दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका व मेक्सिको या वसाहतींमधे याच रोपांची लागवड करण्यात आली. त्या काळात व्यापारी कॉफीची लागवड ही उत्तम उत्पन्न देण्याचा व्यवसाय म्हणून त्यासाठी जीव टाकत होते. त्या व्यापारातून चांगला कर मिळे म्हणून देश त्याच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील होते.
कॉफीच्या इतिहासात काही घटना लोकप्रिय आहेत त्यात गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियूचे कॉफीचे रोप मार्टिनिक बेटावर नेण्याचे प्रयत्न विशेष लोकप्रिय आहेत.
मार्टिनिक.......
दक्षिण आफ्रिकेच्या वर कॅरिबियन समुद्रात फ्रान्सची ही एक वसाहत होती. क्लियू एक नॉर्मन वंशाचा नौदलाचा अधिकारी होता व काही व्यक्तिगत कामानिमित्त तो फ्रान्समधे आला होता. मार्टिनिकमधे कॉफीची लागवड करण्याच्या महत्वाकांक्षेनी त्याने काही रोपे त्याच्या परतीच्या प्रवासात नेण्याचे ठरविले. त्याच्या पुढे पहिली अडचण होती ती म्हणजे पॅरिसमधे तयार होत असलेली कॉफीची रोपे कशी मिळवायची ती. राजघराण्याचा वैद्यकीय आधिकारी डॉ. चिराक याच्या मदतीने त्याने काही रोपे मिळवली जी रोशफोर्ट येथे क्लियू मार्टिनिकच्या परतीच्या प्रवासास निघेपर्यंत सांभाळून ठवण्यात आली. साल होते १७२०. क्लियूच्या दुर्दैवाने ही रोपे जाईपर्यंत मरून गेली. क्लियूने १७२३ मधे हाच प्रयत्न पुन्हा केला. या वेळी मात्र त्याने चांगली निरोगी रोपे बोटीवर चढविली. त्यात एकाला तर त्याने काचेची पेटी तयार केली होती जेणेकरुन त्या रोपट्याला उन मिळेल व ढगाळ वातावरणात उब मिळेल. त्यातच त्या जहाजावर एक माणूस त्याच्या वाईटावर टपलेला होता. त्या प्रवासाबद्दल त्याने एका पत्रात लिहिले आहे, ‘माझ्यासमोरील अडचणींचा पाढा वाचण्यात अर्थ नाही पण या माणसाला माझ्या आनंदाचा हेवा वाटत असे. त्याने एक दिवस मी प्राणापलिकडे जपलेल्या रोपट्याची एक फांदीच तोडली.' ट्युनिसच्या समुद्रचाच्यांना तोंड देत त्यांचा प्रवास चालू होता. ‘सगळ्यात अडचण होती ती पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षाची. प्रत्येकाला पिण्यासाठी ठराविक लिटर पाणी मिळे. जवळजवळ महिनाभर मी माझ्या वाट्याला आलेल्या पाण्यातील अर्धे पाणी या रोपट्याला घालत असे. ‘भविष्यातील कॉफीच्या आनंदासाठी मी हा सगळा त्याग करण्यास तयार झालो’. क्लियूच्या या प्रवासवर्णनासाठी फ्रान्सच्या साहित्यात अनेक पाने खर्ची पडली आहेत.
गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियू.........
मोठ्या कष्टाने जपून आणलेले हे रोपटे अखेरीस मार्टिनिकच्या किनाऱ्यावर उतरले. द् क्लियूने हे रोपटे आपल्या प्रेचूर येथील जमिनीत लावले. त्याच्या नशिबाने या रोपट्याने जोम धरला व १७२६ साली या रोपट्याला फळे लागली. याच रोपट्यापासून आज जे काही कॉफीचे मळे अँटिलेसमधे फुलले आहेत त्यातील रोपे तयार करण्यात आली आहेत. क्लियू लिहितो, ‘आल्याबरोबर मी पहिल्यांदा माझ्या रोपट्याकडे लक्ष पुरवले व ते माझ्या बागेत लावले. त्याच्या संरक्षणासाठी तेथे मी दिवसरात्र एक नोकर ठेवला व त्याच्या भोवती काट्यांचे कुंपण घातले. हे अत्यंत किमती रोप माझे अजूनच लाडके झाले कारण काहीच दिवसात मला कॉफी मिळणार होती’. थोड्याच काळात क्लियूने या कॉफीच्या बिया जनतेत वाटल्या. कॉफीचे उदंड पीक आले व मार्टिनिकमधील कॉफीच्या रोपांची संख्या १७७७ साली १८७९१६८० इतकी भरली. ज्या क्लियूने कॉफी उद्योगाचा तेथे पाया रचला तो मात्र निर्धन अवस्थेत त्याच्या ९७व्या वर्षी सेंट पिअरे येथे मरण पावला. मार्टिनिकमधे या माणसाचे एक स्मारक बांधण्याची योजना मांडण्यात आली पण ती सत्यात उतरली नाही. एका डोनास नावाच्या हॉलंडमधील धनाढ्य व्यापाऱ्याने उच्च दर्जाची पोर्सेलिनची कॉफीची भांडी तयार करुन त्यावर क्लियूच्या या प्रवासाची हकिकत रंगवून घेतली होती असा एक उल्लेख आढळतो. नशिबाने या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ मार्टिनिक येथे फोर्ट द फ्रान्स येथे एक वनस्पती उद्यान उभारण्यात आले. साल होते १९१८.
१७१५ साली हाईती व डॉमिंगो येथे कॉफीची यशस्वी लागवड करण्यात आली. त्याच सुमारास रियुनियन बेटांवर कॉफीची लागवड करण्यात आली. तेथे ही लागवड इतकी यशस्वी झाली की फ्रेंच तेथून कॉफीची निर्यात करायला लागले. डचांनी कॉफी १७१८ मधे सुरिनाममधे आणली. ब्राझिलमधे कॉफीची लागवड झाली १७२३ मधे पण फ्रेंच गिनीमधून आणलेल्या या रोपांनी ब्राझिलच्या हवामानात तग धरला नाही. इंग्रजांनी १७३० मधे जमाईकामधे कॉफी १७३० मधे यशस्वीरित्या लावली तर १७४० मधे स्पॅनिश मिशनरींनी फिलिपाईन्समधे कॉफीची रोपे जावामधून आणून लावली. १७४८ मधे अँटोनिओ गेलबार्ट नावाच्या माणसाने सँटो डॉमिंगोमधून क्युबामधे कॉफी नेली. डचांनी १७५० मधे सेलेबेस व नंतर १७५० मधे कॉफी ग्वाटेमालामधे पोहोचली. ब्राझिलमधे कॉफीच्या यशाचे श्रेय जाते पोर्तुगिजांकडे. पोर्टोरिकोमधे १७५२ मधे कॉफीची लागवड सुरु झाली. १७६० साली ज्यो अलबर्टो कास्टेलो ब्रँको या पोर्तुगिजाने गोव्यातून कॉफी रिओ द जॅनेरिओमधे आणली व तेथे त्याची लागवड सुरु केली. ब्राझीलमधील हवामान कॉफीच्या लागवडीसाठी योग्य असल्याची बातमी पसरताच एका बेल्जियमच्या चर्चच्या धर्मगुरुने १७७४ साली कापुचिन मठाला काही बिया भेट दिल्या. तेथून हे पीक पूर्ण ब्राझिलमधे पसरले. डॉन फ्रॅन्सिस्को झेवियर नाव्हेरो या स्पॅनिश प्रवाशाने क्युबातून कोस्टा रिकाला १७७९ मधे कॉफीच्या बिया नेल्या. व्हेनेझुएलामधेही एका पाद्र्याने कॉफीचा उद्योग चालू केला. त्याने कॉफीच्या बिया मार्टिनिकमधून आणल्या होत्या. इंग्रजांनी भारतात कॉफीची पद्धतशीर लागवड १८४० मधेच चालू केली होती. १८५२ मधे साल्व्होडरमधे कॉफी क्युबामधून आणण्यात आली. १८८७ मधे फ्रेंचांनी टॉन्किनमधे कॉफीची लागवड केली व तेथून ती इंडोचायनामधे पसरली. कॉफीचा जगभर प्रवास हा असा झाला. वरील नोंदींवरुन आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या माणसाने कॉफीची रोपे घेऊन नवीन प्रदेशात न्यायची व त्याची कष्टाने लागवड करुन त्याचा प्रचार करायचा हे सगळीकडे चालले होते. अर्थात हे शक्य झाले कारण कॉफीचा वास व चव. या दोन गुणांवर अतोनात विश्र्वास असल्यामुळे व्यापाऱ्यांनी या पेयावर व लागवडीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्याच कॉफीचा आता केवढा मोठा व्यवसाय जगभर फोफवला आहे ते आपण बघतोच आहे. बाबा बुदानच्या रोपांनी भारताला कॉफी उत्पादनाच्या यादीत नवव्या स्थानावर आणले आहे व काही वर्षातच जर प्रत राखली गेली तर तो पहिल्या पाचात येईल याची मला खात्री आहे.
कॉफी कशी लोकप्रीय होत गेली व व्यापारात केवळ तिच्या स्वादामुळे व वासामुळे व्यापाऱ्यांना कसा अतोनात फायदा होत गेला हे आपण पाहिले. कॉफीचे महत्व किती होते याची जाणीव व्हावी म्हणून या ओळी अगोदर लिहिल्या होत्या. आता आपण कॉफीचा या आधीचा इतिहास बघूया.
अरेबियाच्या वैद्यकीय संदर्भातील जे ग्रंथ होते त्यात अनेक ग्रंथ लिहिणारा ८५०-९२२ या काळात एक अत्यंत हुशार वैज्ञानिक, वैद्य, शास्त्रज्ञ हो़ऊन गेला. त्याचे नाव होते अबू बक्र मुहम्म्द इब्न झकरिया अल् राझी.
अबू बक्र मुहम्म्द इब्न झकरिया अल् राझी....
त्याच्या एका ग्रंथात कॉफीचा पहिला उल्लेख आढळतो. तेव्हा इराकवर इराणचे राज्य होते आणि त्यातील राज नावाच्या गावात याचे घराणे कैक वर्षांपासून स्थायीक असल्यामुळे तो स्वत:ला राझी म्हणवून घेत असे. राझी एक थोर तत्ववेत्ता व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याचा औषधांचा व मानवी शरिराचा सखोल अभ्यास होता. त्याच्या या अभ्यासामुळे तो बगदादमधील एका इस्पितळाचा प्रमुख म्हणून काम करत असे. त्याने या काळात औषधशास्त्र व शल्यशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. पण त्याचे सगळ्यात महत्वाचे पुस्तक होते अल् हाईवी. या ग्रंथात तोपर्यंत ज्ञात असलेल्या सगळ्या रोगांवरील उपचारांचा उहापोह केला होता. ८५६ सालच्या एका जावामधील शिलालेखात काव्हीचा उल्लेख सापडतो. त्याच्याही बरीच आधी मानवाला कॉफी माहीत असली पाहिजे. कॉफीच्या बियांपासून पेय तयार करण्याच्या कलेचा इतिहास वेगळा आहे व त्याचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांच्या मते, कॉफी इथोपियात प्राचीन काळापासून माहीत होती. या नंतरचा उल्लेख येतो ॲव्हिसेना म्हणजे इब्न सिना याच्या ग्रंथात. हा ९८०-१०३७ या काळात हो़ऊन गेला. राझीने त्याच्या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की कॉफी ही पोटाच्या विकारावर चांगली. (आजही जुलाबावर रामबाण औषध म्हणून काळी कॉफी व लिंबू घेतात) राझीने कॉफीचा उल्लेख त्याच्या ग्रंथात केला पण वेगळ्या नावाने. राझीने कॉफीचे औषधी गुण सांगितले आहेत त्याचीच पुढे री ओढत अव्हिसेना लिहितो, ‘पिवळटसर रंगाच्या व चांगल्या वासाच्या बिया सगळ्यात चांगल्या. कॉफी प्रकृतीने उष्ण आहे तर काहींना ती शीत प्रकृतीचीही वाटते. प्राशन केले असता शरिराच्या कातडीला अत्यंत फायदा होतो व काया सुवासिक होते.’
१५ व्या शतकात राऊवुल्फ नावाचा एक जर्मन डॉक्टर व वनस्पतीशास्त्रज्ञ हो़ऊन गेला. याने कॉफीची चव पहिल्यांदा घेतली अलेप्पोमधे. तुर्की कॉफीचे पेय कसे करतात याबद्दल त्याने लिहून १५७३ मधे ठेवले आहे. १६५९ साली डॉ. एडवर्ड पोकॉकनने ॲव्हिसेनाच्या पुस्तकाचे भाषांतर केले त्यात कॉफीबद्दल बरेच काही लिहून ठेवले आहेत त्यात एक मजेदार उल्लेख आढळतो. ‘कॉफी बरोबर काहीतरी गोडधोड खायला पाहिजे. काही लोक कॉफीत दुध घालतात पण ती त्यांची मोठी चूक आहे. त्याने लेप्रसीसारखे रोग हो़ऊ शकतो.’ पाश्चात्य वैद्यकीय शास्त्राचा महागुरु हिपोक्रेटसला कॉफीची माहिती होती. अरब वैद्यांनी त्या काळात एक मोठी चूक केली ती म्हणजे त्यांनी कॉफीकडे फक्त एक औषध म्हणून पाहिले नाहीतर एक उत्साहवर्धक पेय म्हणून ते केव्हाच जगभर पसरले असते.
ग्रीकांच्या आणि रोमच्या लिखाणातून या पेयाविषयी उल्लेख सापडत नाहीत पण असे म्हणतात हेलेनने नेपेंथे नावाच्या बिया इजिप्तमधून बाहेर आणल्या त्या कॉफीच्याच बिया होत्या. त्याची पावडर ती वाईनमधे मिसळून तिचे दु:ख हलके करायला वापरत असे. अर्थात बऱ्याच जणांनी हे म्हणणे खोडून काढायचा प्रयत्न केला आहे. कॉफी जन्माला आली आणि कॉफीला पर्यायही पुढे येऊ लागले. त्याच्या एका पर्यायाला पायथोगोरसने बंदी घातली होती. तो म्हणाला, ‘अरबस्तानातीला कॉफी वेगळी आहे’
कॉफी माणसाला कशी मिळाली याबद्दल कमीतकमी सहा तरी दंतकथा मोठ्या चवीने चघळल्या जातात. त्यातील वास्तवाला जवळ जाणारी आपण बघुयात.
हि.६५६ साली मुल्ला शादेली मक्केच्या यात्रेस गेला असतानाची ही गोष्ट. युसूफच्या पर्वाताच्या पायथ्याला मुल्ला आपल्या शिष्याला म्हणाला, ‘ओमर, मी येथे माझे जीवन संपविणार आहे. मी मेल्यावर एक बुरखा घेतलेली व्यक्ती येथे ये़ईल. तो तुला जी आज्ञा करेल त्याचे पालन करण्यात हयगय करु नकोस.’ असे म्हणून शादेलीने प्राण सोडले. त्याच रात्री ओमरला पांढरा बुरखा घेतलेली आकृती भेटली.
कोण आहेस तू ?’ ओमरने विचारले. त्या आकृतीने त्याचा बुरखा मागे सारल्यावर तो दचकला कारण स्वत: मुल्ला शादेलीच त्याला भेटायला आला होता. फक्त त्याची उंची दुप्पट झाली होती. काहीतरी पुटपुटत मुल्लाने जमिनीत थोडे खणले तर तेथे आश्चर्याने पाणी लागले. मुल्लाने ओमरला त्याचे भांडे त्या पाण्याने भरुन घेण्यास सांगितले व म्हणाला, ‘हे पाण्याने भरलेले भांडे घेऊन असाच चालत रहा. ज्या ठिकाणी हे पाणी हलायचे थांबेल तेथेच तुझे नशीब फळफळेल.’ ओमरने पडत्या फळाची आज्ञा म्हणून चालण्यास सुरुवात केली. मोचाला आल्यावर त्या भांड्यामधील पाणी हलायचे थांबले. आता येथेच थांबायचे आहे असा विचार करुन तो तेथे थांबला. त्या सुंदर शहरात त्यावेळी प्लेगने थैमान घातले होते. प्रेषिताच्या जवळचा असल्यामुळे त्याने नुसत्या प्रार्थनेनेच बरेच रुग्ण बरे केले. मोचाच्या सुलतानाची सुंदर राजकन्याही प्लेगने आजारी पडल्यावर ओमरला बोलविण्यात आले. राजकन्येला आपल्या शक्तीने बरे केल्यावर ओमर दर्वेशीने त्या राजकन्येला घेऊन पळ काढला. सुलतानाला अर्थातच ते न आवडल्यामुळे त्याने ओमरला पकडून शहराबाहेर हाकलून दिले. एवढेच नाही तर त्याला युसुफच्या डोंगरात जवळजवळ कैदेत ठेवण्यात आले. खाण्यासाठी काही पालेभाज्या व राहण्यास एक गुहा अशा पद्धतीने त्याचे आयुष्य चालले होते. तेही संपल्यावर त्याची उपासमार हो़ऊ लागली. वैतागून एक दिवस तो मुल्लाला उद्देशून म्हणाला, ‘असे जर माझे नशीब फळफळणार होते तर मला ते पाणी का बरे दिलेस तू ?’ तेवढ्यात त्याला एक छोटासा पक्षी एका फांदीवर बसून शीळ घालताना आढळला. त्याच्या दिशेने पाऊल टाकले मात्र त्याला काहीच दिसेना पण तेथे त्याच फांदीवर त्याला अनेक फळे दिसली. भूकेने कासावीस झालेल्या ओमरने त्या फळावर ताव मारला. त्या फळांची चव एवढी काही वाईट नव्हती. त्याने पोटभर फळे खाऊन आपले खीसे भरु घेतले व तो आपल्या गुहेत परतला. संध्याकाळी पालेपाजी उकडताना सहज गंमत म्हणून त्यातील काही फळे त्या उकळत्या पाण्यात टाकली. ती फळे काही शिजली नाहीत पण त्या पाण्याला मात्र छान चॉकलेटी रंग आला होता. तीच आपली चवीष्ट कॉफी.
श्री. सोत्रींनी लिहिलेली मेंढ्यांची हकिकत आपण वाचलीच आहे. ती कथा ऐकल्यावर जवळच असलेल्या एका ख्रिश्चन मठातील प्रमुखाने ती फळे स्वत:च खाऊन बघायचे ठरवले. ज्या संध्याकाळी त्याने ही फळे खाल्ली त्या रात्री येशूची प्रार्थना करताना त्याला एकदाही डुलकी लागली नाही. थोड्याच दिवसात या जागत्या मठाची कीर्ती दूरवर पसरली व सर्व मठात या बियांचा उपयोग रात्री जागे राहण्यासाठी हो़ऊ लागला.
त्या काळात कॉफीचे पेय करण्याच्या दोन पद्धती होत्या. एकात टरफले व बियांभोवतालीचा गर उकळून त्याचे अर्क काढण्यात येई व तो कॉफीसाठी वापरण्यात येत असे. दुसऱ्यात खुद्द बियांचा अर्क काढण्यात येत असे. बिया भाजायचा उद्योग नंतर सुरु झाला व त्याचे श्रेय पर्शियाला जाते. इस्लाम जगतात मद्याला बंदी असल्यामुळे ख्रिश्चन मठांमधे वाईन पिण्यास बंदी होती तेथे वाईनची जागा कॉफीने घेतली असे म्हणायला हरकत नाही. थोडक्यात त्या काळात तीन प्रकारची पेये अत्यंत लोकप्रीय होती. एक खुद्द वाईन व दोन प्रकारच्या कॉफ्या. अशीही शक्यता आहे की सुरवातीला कॉफीच्या फळांपासून वाईन तयार केली गेली व नंतर बंदी आल्यावर त्याचे आपण पितो तसले पेय तयार करण्यात आले. गॅब्रियेलने स्वत: मोहम्मदला कॉफीची माहीती दिली असाहे एक उल्लेख एका दंतकथेत सापडतो. पण ते काही खरे नाही. राझीचा कॉफीचा उल्लेख हा पहिला उल्लेख व तो मोहम्मदानंतर दोनशे वर्षाने हो़ऊन गेला हे वास्तव बघता त्या साऱ्या दंतकथाच म्हटल्या पाहिजेत. चहाचे मात्र तसे नाही. चीनमधे टँग साम्राज्यामधे (सातव्या शतकात) चहावर कर लादण्यात आला होता असा स्पष्ट उल्लेख आहे व त्याच काळात अरबांना चहाचीही चव माहीत झाली होती.
वरील माहिती ही थोडीफार विवादास्पद असू शकते पण १४५४ साली झालेल्या कॉफीच्या उल्लेखाबद्दल कोणालाही कसलीही शंका नाही. या वर्षी एडनचा शेख जमालउद्दीन अबू मुहम्मद बीन सईद - एडनचा मुफ्ती अल् दाभानी (हा दाभान नावाच्या गावचा होता) याने कॉफीची चव ॲबिसिनियामधे चाखली होती. एडनला परत आल्यावर हा आजारी पडला. त्याला आजारी पडल्यावर ॲबिसिनियामधील लोक कॉफी पितात हे माहीत असल्यामुळे त्याने लगेचच तेथून कॉफी आणण्याची व्यवस्था केली. ती पिऊन तो बरा झाला एवढेच नाही तर त्याने झोप उडते हेही त्याच्या लक्षात आले व त्याने सर्व दर्वेशींना कॉफी पिण्यास परवानगी दिली जेणे करून ते रात्री उशीरापर्यंत अल्लाची प्रार्थना करु शकतील. या कामात त्याल त्याच्या वैद्याचा म्हणजे अल् हद्रामी याची बरीच मदत झाली. १४व्या शतकाच्या शेवटी या दर्वेशींकडून कॉफी मक्का व मदिनेला पोहोचली. १५१० मधे ती इजिप्तला पोहोचली. मक्का, मदिना, येमेन काय वा इजिप्त काय या सर्व ठिकाणी कॉफी प्राशन करण्याचे कारण रात्री जागे राहण्याला मदत हेच होते. ते दर्वेशी कॉफी एका मोठ्या लाल रंगाच्या माठात ठेवत. त्यातील कॉफे ते मोठ्या भक्तिभावाने ग्रहण करत व सतत कुराणातील ओळींचे पठण करत असत. दर्वेशींनंतर उरलेली कॉफी जमलेल्या इतर लोकांमधे वाटली जायची. अशा रितीने सामान्य लोकांना कॉफी माहीत झाली. कॉफीला त्यामुळे कुठल्याही सभारंभात मानाचे स्थान मिळू लागले. मक्केमधे हे पेय इतके लोकप्रिय झाले की त्याची धार्मिक महत्ता कमी हो़ऊन नागरीक ते रोज प्राशन करू लागले व त्यासाठी दुकानेही निघाली ज्यांना म्हणत ‘काव्हीकाने’. काव्हीकानेमधे रोज जमणे, बुद्धीबळाचे डाव टाकणे, नाच गाण्याचा आस्वाद घेणे हा नित्याचाच उद्योग झाला. त्याचे प्रस्थ इतके वाढले की कर्मठ मुसलमानांच्या डोळ्यात ही मौजमजा सलू लागली. जे घरी बोलता येत नसे, ज्यावर रस्त्यावर चर्चा करता येत नसे, जी टीका इतर ठिकाणी करता येत नसे, ज्या राजकीय विषयांवर चर्चा उघडपणे करता येत नसे त्या सगळ्या गोष्टी काव्हीकानेमधे हो़ऊ लागल्यावर त्याकडे कर्मठांची वक्र दृष्टी न वळाल्यास नवलच ! १५११ मधे कैरबेग नावाचा एक कर्मठ माणूस मक्केचा गव्हर्नर होता. एकदा नमाज पढून बाहेर पडताना त्याच्या नजरेला काही माणसांचा घोळका पडला. चौकशी केल्यावर ती माणसे रात्रीच्या प्रार्थेनेची तयारी करत असल्याचे त्याला कळाले. ते काय पीत होते याची चौकशी केल्यावर त्याला कळाले की ते वाईन पीत नसून कॉफी पीत होते. कॉफीचा एवढा सुळसुळाट झाल्याचे बघून त्याला धक्क बसला. हे तर वाईनपेक्षाही भयंकर झाले. कॉफी पिऊन आलेल्या सर्वांची मशिदीतून हकालपट्टी करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी कैरबेगने सर्व मुल्ला मौलवींची बैठक बोलाविली व कॉफीवर बंदी घालण्याचा त्याचा विचार बोलून दाखविला. त्याची कारणे देताना तो म्हणाला, ‘काव्हीकानेमधे स्त्रिया व पुरुष भेटतात व ताम्बोरिन (तंबोरा) व्हायोलिन व इतर वाद्ये वाजवून त्याचा आनंद घेतात. बुद्धिबळ, मंकाला व इतर बैठे खेळ पैसे लाऊन खळले जातात. हे सगळे प्रेषिताच्या आज्ञेविरुद्ध आहे. हे सगळे थांबवायला हवे’’. उपस्थित असलेल्या सर्वांनी याला दुजोरा दिला फक्त कॉफीवर बंदीबाबत मात्र वेगळे मत व्यक्त केले. कॉफी ही शरीराला अपायकारक आहे का नाही याची तज्ञांकडून चौकशी करण्यात यावी व ती अपायकारक असल्यास कॉफीवर सगळीकडेच बंदी घालावी असा विचार मांडण्यात आला.
तीन तज्ञांना या समितीवर नेमण्यात आले. त्यातील दोघे पर्शियन भाऊ होते. त्यातील एकाने तर कॉफीच्या दुष्परिणामांवर एक पुस्तकच लिहिले होते तर दुसऱ्याने कॉफीच्या दुष्परिणामांचा पाढा वाचला. त्यांनी कॉफी ही शीत व कोरड्या प्रकृतीची असून घातक आहे असे सांगितले. तिसऱ्याने मात्र जेव्हा त्यांना थोर ॲव्हिसेनाने कॉफी ही उष्ण प्रकृतीची आहे असे सांगितले आहे तेव्हा त्याने मोठे मासलेवाईक उत्तर दिले जे अजूनही कर्मठ धर्मगुरु देत असतात...‘त्याने काही फरक पडत नाहे. कॉफीने जर प्रेषितांच्या आज्ञांचा भंग होत असेल तर त्यावर बंदीच घातलेली बरी.’ कॉफीच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांची यामुळे पंचाईत झाली. मुफ्तीने मात्र कॉफीचे समर्थन केले. एका मौलवीने उठून सांगितले की कॉफी वाईन प्रमाणे चढते. तो विनोद ऐकून सभेत खसखस पिकली कारण त्या मौलवीने दारुची चव घेतली असण्याची शक्यता नव्हती तरी तो हे प्रतिपादन करत होता. जेव्हा त्याला त्याने कॉफी किंवा दारु प्यायली आहे का हे विचारण्यात आले तेव्हा त्याची जी गडबड उडाली ती बघून सभेत परत हास्य पसरले. शेवटी कर्मठ माणसांचा विजय झाला आणि कॉफीवरच्या बंदीचा मसुदा घाईघाईने कैरोला सुलतानाकडे पाठविण्यात आला. तोपर्यंत कैरबेगने मक्केत कॉफीवर बंदी घातली आणि सगळी कॉफी जप्त करुन ती जाळून टाकण्याचा हुकूम बजावला जो ताबडतोब अमलात आणण्यात आला.
जनमताविरुद्ध लादण्यात आलेले नियम कधीच यशस्वी होत नसतात या नियमाला अनुसुरुन हाही नियम चोरुन मोडण्यात येत होतेच. कॉफीच्या काही मित्रांनी या आदेशाविरुद्ध उघड विरोधही दर्शविला पण तोही दडपण्यात आला. एका माणसाला कॉफी पिताना पकडण्यात आल्यावर त्याची गावातून गाढवावरुन धिंड काढण्यात आली.
नशिबाने कॉफीच्या शत्रूंचा हा विजय अल्पजिवी ठरला कारण कैरोच्या सुलतानाने मक्केच्या गव्हर्नरचा हा आदेश रद्दबादल केला. एवढेच नाही तर कैरबेगला त्या सुलतानाने सुनावले, ‘कॉफीवर कैरोमधेही बंदी नसताना तुझी ही हिंम्मत कशी झाली ? कैरोमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांपेक्षा तुला जास्त कळते असा तर तुझा दावा नाही ना ? जगात चागल्या गोष्टींच्या नशिबात नेहमीच टीका येते म्हणून त्यावर सरसकट बंदी घालणे योग्य नाही. उद्या हे झमझमच्या पाण्याच्या नशीबीही येऊ शकते.’ (झमझम ही मक्केच्या काबाच्या कुंपणात असलेली एक विहीर आहे ज्याचे पाणी भक्तगण तीर्थ म्हणून मोठ्या भक्तीने पितात). कैरबेगच्या डोक्यात या आदेशाने प्रकाश पडला की नाही हे माहीत नाही पण त्याची सुलतानाचा आदेश न पाळण्याची हिम्मत नव्हती. कॉफीवरील बंदी ताबडतोब उठविण्यात आली. कैरबेगला नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडण्यात येऊन त्याचे हालहाल करुन मारण्यात आले, हे कॉफीचे चहाते कॉफीने उगवलेला सूडच मानत. ज्या दोन पर्शियन तज्ञांनी कॉफीवर खोटेनाटे आरोप केले त्यांचेही पुढे हाल झाले व त्यांना मक्का सोडून कैरोला पळून जावे लागले. तेथे तुर्कस्तानच्या बादशहावर टीका केल्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली. कॉफीच्या विरोधकांचा असा सत्यनाश झाल्यामुळे मक्केमधे कॉफीचे परत बस्तान बसले ते १५२४ पर्यंत. त्या साली काही भांडणांमुळे काव्हीकानेंवर बंदी घालण्यात आली पण घरी कॉफी पिण्याच्या हक्कावर काही गदा आली नाही. त्यानंतरच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कॉफीच्या दुकानांना परवाना देण्याची पद्धत सुरु केली व काव्हीकाने सुरु झाले ते आजपर्यंत. नाही म्हणायला १५४२ मधे परत एकदा कॉफी वर सॉलिमन द ग्रेटने बंदी घातली पण ती कोणी पाळली नाही व त्याने ही त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. कॉफीच्या इतिहासात आपल्याला एक मजेशीर गोष्ट आढळेल ती म्हणजे जेव्हा जेव्हा कॉफीवर बंदी आली तेव्हा तेव्हा उठाव झाले आहेत. या हिशेबाने कॉफीला या जगातील एक क्रांतीकारक पेय मानायला लागेल. याचे खरे कारण आहे काव्हिकानेमधे जगातील सर्व बाबींवर चर्चा होते व प्रश्नांवर उत्तरेही शोधली जातात. आणि जेव्हा जनता विचार करायला लागते तेव्हा काय होते हे मी सांगायची गरज नाही. जनता विचार करायला लागते तेव्हा अन्याय करणारी सत्ता डळमळीत होण्यास सुरुवात होते....... हेच आपल्याला कॉफीवर जेव्हा दुसऱ्यांदा बंदी घालण्यात आली तेव्हा दिसून आले.......तेव्हा साल होते १५३५.......
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
17 Jul 2013 - 12:48 am | रामपुरी
मनोरंजक आहे..
17 Jul 2013 - 2:10 am | अग्निकोल्हा
सवय नाही पण मला सुध्दा कॉफि फार आवडते हॉट अन कोल्ड दोन्हिही.
लहानपणी कोणि चहा पिणार का विचारले कि नको कॉफि द्या म्हणायचो. कारण घरातल्यांनीच बजावुन ठेवले होते कि कोणी चहा घेणार का विचारल्यास "नको" म्हणावे ;)
17 Jul 2013 - 2:45 am | प्रभाकर पेठकर
कॉफीचा जन्म, प्रसार, औषधी पेय ते दैनंदिन उत्तेजक पेय हा भौगोलीक आणि सामाजिक प्रवास अत्यंत रंजक वाटतो आहे.
अरबस्थानात कॉफीला 'काहवा' नांवाने ओळखतात. पण नेसकॉफी, फिल्टर कॉफी इ.इ.ला ते कॉफीच मानतात तर अरबी कॉफीबियांपासून बनविलेली कॉफी अरबस्थानात 'काहवा' ह्या नांवानेच ओळखली जाते.
ह्या कॉफीबिया 'डार्क' आणि 'लाईट' अशा रंगात आणि स्वादात मिळतात. त्या दुकानात समोरच दळून मिळतात. कोणी 'डार्क' काहवा घेतात तर कोणी 'लाईट' घेतात. चांगल्या चवीचे जाणकार दोन्ही बियांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण करून दळून घेतात.
'काहवा' बनविताना त्यात साखर घालतात पण दुध घालीत नाहीत. साखरे सोबत वेलची पावडर, केशर असे वेगवेगळे स्वाद त्यात मिसळतात. पण असे स्वाद मिसळणे वैकल्पिक (Optional) असते. वेलची बहुतेक सर्वजणं मिसळतात पण कांही खास प्रसंगी, खास पाहुण्यांसाठी केशरही मिसळण्यात येते.
'काहवा' हे पेय, बहुतेक सरकारी कचेर्यांमधून, कांही अरबी उपहारगृहांमधून 'स्वागत पेय' (वेलकम ड्रिंक) म्हणून विनाशुल्क आणि कितीही कप दिले जाते. 'काहव्या'चे कप आपल्या नेहमीच्या चहा-कॉफीच्या कपापेक्षा आकाराने लहान (अर्ध्या आकाराचे) असतात. 'काहवा' पिण्याची पद्धत आहे. तुमच्या कपात 'काहवा' ओतणारा माणूस तुम्ही 'काहवा' पिऊन संपवेपर्यंत तिथेच अदबीने उभा असतो. तुम्ही 'काहवा' पिऊन कप खाली ठेवला की तो लगेच पुन्हा भरतो. 'काहवा' पिऊन झाल्यावर तुम्हाला अजून 'काहवा' नको असेल तर तो छोटासा कप खाली ठेवण्याआधी, आपण देव्हार्याती घंटा वाजवताना हलवतो तसा, हलवून ठेवायचा. म्हणजे 'काहवा' ओतणार्याला समजते की आता तुम्हाला 'काहवा' नको आहे. नुसते हाताने किंवा तोंडाने 'बस' म्हणणे शिष्टाचारात बसत नाही. बिगरअरबी माणसे कधी कधी प्रथा माहित नसल्याने हाताने खुण करून, किंवा 'बस' असे म्हणून किंवा 'शुक्रन' (शुक्रिया, Thanks) असे म्हणतातही आणि अरब चिडतही नाही. पण पारंपारीक पद्धत वरील प्रमाणे कप हलवून ठेवण्याची आहे. तसे केल्याने त्यांना, त्यांची प्रथा पाळल्याबद्दल, तुमचा आदर वाटतो.
कॉफी बद्द्ल अजून वाचायला आवडेल. तेंव्हा पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
17 Jul 2013 - 3:25 pm | सुधीर
कॉफीचा इतिहासही रंजक आणि काहवाची माहितीही रोचक आहे.
17 Jul 2013 - 6:50 am | शिल्पा ब
माहीती आवडली.
बाकी ते झमझम वाचुन एकदम तात्यांच्या झमझम बारची आठवण आली.
17 Jul 2013 - 7:09 am | स्पंदना
मस्त माहीती.
17 Jul 2013 - 8:16 am | चित्रगुप्त
कॉफीविषयी सांगोपांग माहिती देणारा हा लेख कमालीचा रोचक वाटला.

धन्यवाद, आणि पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (काही चित्रे मी पण देऊ का ?):
कॉफीची पाने, फळे व बिया:
Coffee, from 'Drawings of Plants from Malacca', c.1805-18
कॉफी पिणार्या युरोपीयन स्त्रियांची चित्रे:

चित्रकारः Edward Killingworth Johnson
चित्रकारः Jean-Baptiste Vanmour
कॉफी पिणारा अरब बंदुकधारी:

चित्रकारः Edwin Long (1829-1891
कॉन्स्टंटिनोपल मधील एक कॉफीगृहः

चित्रकरः Ivan Konstantinovich Aivazovsky
कैरो मधील कॉफीगृहः

चित्रकारः Arthur von Ferraris
तुर्किश कॉफी बनवताना:

चित्रकारः Daniel Israel
चित्र विकिगॅलरी वरून साभार.
17 Jul 2013 - 11:54 am | तिमा
नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण लेख. मागे एकदा, कुठे तरी मला कॉफीच्या फ्लेवरचे मद्य चाखायला मिळाले होते, त्याची कोणी माहिती देऊ शकेल का ?( कॉलिंग सोकाजीराव)
17 Jul 2013 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर
कॉफी लिक्युअर.
लिक्युअर हे, जेवणानंतर आपण बडीशोप खातो तसे, अगदी अल्प प्रमाणात, मुख्य ड्रिंक्स नंतर, घेतले जाते. त्याची चव तोंडात घोळवत घोळवत मजा लुटत घ्यायचे असते. घिसाडघाई करायची नाही.
बाकी सोत्री गुरू भाष्य करतीलच, त्याने आमच्या ज्ञानात भर पडेल, त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे.
17 Jul 2013 - 3:24 pm | तिमा
पेठकरसाहेब, धन्यवाद. ह्याच नांवाने ते मला चमचाभर देण्यात आले होते. आता आठवले!
17 Jul 2013 - 12:06 pm | बॅटमॅन
कॉफीप्रवास आवडला-यद्यपि कॉफी आवडत नसली तरी. पुढील भागाच्या प्रतीक्षेत-विशेषतः ब्रिटिश काळात दक्षिणेत कॉफी कशी पसरली त्याबद्दल.
17 Jul 2013 - 12:53 pm | जेपी
*****
17 Jul 2013 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत माहितीपूर्ण आणि रोचक लेख... पुभाप्र.
तुम्हाला आमच्यातर्फे ही कुवेतमधली आधुनिक कॉफी !...

17 Jul 2013 - 5:01 pm | जयंत कुलकर्णी
कॉफीचा वास आला अगदी........:-)
17 Jul 2013 - 5:01 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
18 Jul 2013 - 5:26 pm | मदनबाण
सुरेख लेखन !
जयंतकाका एक विनंती करावी वाटते... ती म्हणजे व्हॅनिलावर सुद्धा अशी लेखमाला तुम्ही लिहाल का ?
18 Jul 2013 - 9:35 pm | सस्नेह
गोष्टपण आवडली.
18 Jul 2013 - 9:36 pm | सस्नेह
गोष्टपण आवडली.