काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १
होजाने अल्लाचा प्राण वाचविला त्याची गोष्ट -
बायझिडच्या मशिदीजवळ एका मदरसेत म्हातारा ‘होजा’ लहान मुलांना मोठ्या तन्मयतेने शिकवीत असे. सर्व पुस्तकांचा राजा ‘कुराण’ त्या लहानग्यांना शिकवताना त्याचा ऊर आभिमानाने भरुन येत असे तर कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचाही भास होई. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर त्याचा मुलांचा अभ्यास इतका सखोल झाला होता की तो एका नजरेत कुठल्या मुलाला कुराण पाठ करायला किती काळ लागेल हेही सांगू शकला असता. नव्हे, तो तसे सांगायचाही. आख्ख्या तुर्कस्तानमधे कुराणाचे पठण त्याच्या इतके चांगले इतर कोणाला जमत असेल की नाही याची शंकाच होती. कुराणावर त्याचे भाष्य म्हणजे अगदी अखेरचे वाक्य. बऱ्याचवेळा स्वत: खलिफाही त्याचा सल्ला विचारत असे. एवढी वर्षे मुलांना शिकवता शिकवता त्याची कुराणाची किती पारायणे झाली असतील त्याचा हिशेब फक्त ‘तो’ च ठेऊ शकतो. त्याने त्या हस्तलिखितातील चुकांची दुरुस्ती कितीवेळा केली असेल हे मोजायचे म्हटले तर आपले केस पांढरे झाल्याशिवाय ते जमणार नाही हे निश्चित.
त्याच्या वयाला झेपेल, जमेल तेवढ्या वेगाने पुढेमागे होत मुलांना पाठांतर करायला लावत असताना एके दिवशी त्याची नजर त्या पवित्र ग्रंथातील एका वाक्यावर खिळली आणि त्याला साक्षात्कार झाला. ते वाक्य होते, ‘जो अल्लाला आवडणाऱ्या पद्धतीने पैसे खर्च करतो त्याला तो दामदुपटीने परत देतो’. मुले या वाक्याची घोकंपट्टी करत असताना तो मनात म्हणाला, ‘या एवढ्या महत्वाच्या वाक्याकडे माझे इतकी वर्षे दुर्लक्ष कसे काय झाले ?’ जसेजसे पाठांतराची लय वाढत गेली तशी त्याची खात्री पटत चालली की जर हे खरे असेल तर भौतिक जगातही ही गुंतवणूक चांगली ठरु शकेल. त्या विचारांनी त्याच्या मनाचा इतका पगडा घेतला की त्याने मुलांना सुट्टी दिली आणि आपल्या अंगरख्याच्या आतील खिशात इतकी वर्षे सांभाळून ठेवलेला एक बटवा काढला आणि त्यातील नाणी मोजू लागला. त्याच्या लक्षात आले की हे पैसे जर त्याने अल्लाला पाहिजे तसे खर्च केले तर त्याला कमीतकमी १००० नाणी तरी मिळतील. थोडी फार कमी मिळाली तरी चालतील अशी त्याने स्वत:चीच समजूत घातली. ‘विचार कर १०००.......माशाल्ला !’ तो म्हणाला.
शाळा सोडून देऊन हे महाशय हातात तो बटवा घेऊन निघाले. जाताना भिकाऱ्यांना, गरजूंना बटव्यातील नाणी वाटत असताना घेणाऱ्यांच्या नजरेतील भाव बघून त्याच्या मनाला फार मोठे समाधान लाभत होते. मोठ्या समाधानाने घरी आल्यावर त्याने रात्रीचे जेवण केले व तो शांतपणे निद्रेच्या आधीन झाला. दुसरा दिवस उजाडला पण १००० नाणी काही आली नाहीत. त्या दिवशी त्याने नुसता पाव खाल्ला व ऑलिव्ह खातोय अशी कल्पना केली व अत्यंत समाधानाने अंथरुणावर पाठ टेकली. तिसरा दिवस उजाडला. आज होजाला खायला पावही नव्हता व ऑलिव्हही नव्हते. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला. मदरसेतील मुले घरी गेल्यावर प्रार्थनेने भारलेल्या मनाने व रिकाम्या पोटाने तो शहराबाहेर हळूहळू चालत आला. पोटात भोकेचा आगडोंब उसळला होता. भुकेने त्याच्या पोटात आग पडली होती व मनावरचा प्रार्थनेचा प्रभावही ओसरत चालला होता. जेथे त्याचे रडणे कोणी ऐकू शकत नव्हते अशाठिकाणी तो नशिबाला दूषणे देत असताना त्याला रडू कोसळले. हात आकाशाच्या दिशेने उंचावत तो म्हणाला, ‘या म्हातारपणी हे काय माझ्या नशिबी आले आहे ? माझ्या हातून असा काय गुन्हा घडला आहे की हे मला भोगायला लागते आहे ? हाच का तुझा न्याय ? ‘या अल्ला ! या अल्ला ! असे म्हणून तो त्याची छाती पिटून घेऊ लागला.’
जणूकाही त्याच्या या आर्त हाकेला उत्तर यावे त्याप्रमाणे त्याला त्या डोंगरात एका फकीर दर्वेशीची साद ऐकू आली. त्याकाळी या दर्वेशींना समस्त जनता घाबरत असे. ही मंडळी दरवाजा खटखटवायची आणि धनधान्य मागायचे. न दिल्यास त्या माणसाची हत्याही होई. त्या दरवेशीचा आवाज ऐकल्यावर होजाचा धीर सुटला व तो आक्रोश करु लागला. ‘आता त्याने काही मागितले आणि जर ते मी देऊ शकलो नाही तर अल्लाच्या भेटीस जावे लागणार हे निश्चित’ तो स्फुंदत मनाशी म्हणाला.
"या अल्ला ! या अल्ला !! या अल्ला !!! मला वाचव ! मला मार्ग दाखव !!! तुझ्या लेकराला वाचव ! असे म्हणत त्याने सगळीकडे नजर टाकली पण तेथे एखादे चिटपाखरुही नव्हते, मदत तर दूरच राहिली. शहर दूर राहिले. पांढऱ्याफटक चेहेऱ्याने त्याने धूम ठोकली. जवळच असलेल्या एका झाडावर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा वेगाने चढून तो लपला.
मृत्युची भीती माणसाला परत एकदा तरुण करते हेच खरे ! असो.
थोड्याच वेळात त्या फकीराच्या गाण्याचा आवाज जवळून येऊ लागला व त्याचे वाऱ्यावर उडणारे केसही दिसू लागले. मृत्युची वाट बघत होजा श्वास रोखून त्याची वाट बघू लागला. त्या फकीराच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या शरिरातील रक्त थेंबाथेंबाने गोठत होते. त्या झाडावरील पानांबरोबर थरथरत तो मृत्युची वाट पाहू लागला. त्याचा आवाज स्पष्ट होत गेला आणि होजाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले.
थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच झाडाखाली त्या दर्वेशीने आपली झोळी टाकली होती आणि तोही आक्रोश करत होता. ‘का आलो आहे मी या निष्ठूर जगात...माझे पूर्वज का आले...प्रत्येक जीव का जन्माला येतो आहे ? या अल्ला ! या अल्ला ! काय केले आहेस तू. या विश्वाला जन्माला घातलेस आणि प्रत्येक जीवाला यातना भोगायला लावतोस. माझ्या व माझ्या पूर्वजांच्या यातनांचा मला सूड घेण्यास तूच मला प्रवृत्त करत आहेस. का घेऊ नको मी तुझा सूड ? असे म्हणून त्याने छाती परत एकदा बडविली आणि त्याने आपल्या झोळीतून एक चामड्याची पिशवी बाहेर काढली. त्याचे चामड्याचे बंद काळजीपूर्वक मोकळे करत त्याने आतून कसली तरी आकृती काढली. त्याकडे एकटक नजरेने बघत तो काहीतरी पुटपुटला व एकदम त्वेषाने त्यावर ओरडला,‘ जॉब ! तू एक कंटाळवाणा माणूस आहेस. एवढा मोठा ग्रंथ तू न कंटाळता लिहिलास. लोकांना तत्वज्ञान शिकवतोस आणि स्वत:वर अन्याय झाला की परमेश्वराला शिव्याशाप देतोस ! प्रत्येक वेदनेला काहीतरी बक्षिस मिळते हे तूच मानवाला पटवतोस....तसे काहीही होत नाही. तू मानवजातीला चुकीच्या मार्गावर नेलेस यासाठी तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती ‘मी’ तुला देणार आहे’ असे म्हणून त्याने कमरेची तलवार हातात घेतली आणि एका क्षणात त्या आकृतीचे शीर उडवले.
त्या पिशवीत हात घालून त्याने अजून एक आकृती बाहेर काढली. त्या आकृतीकडे बघत, चमत्कारिक हसत तो त्या आकृतीला उद्देशून म्हणाला, ‘आणि तू डेव्हिड ! मोठी मोठी गाणी गातोस नाही का ! बक्षिसाच्या लोभाने चांगली कामे करा असा उपदेश करतोस तू. मी तुझा अभ्यास केला नाही असे समजू नकोस ! तू तर अनेक पापांचा धनी आहेस त्या पापांची शिक्षा तुला अजून व्हायची आहे. मी आज ती देणार आहे.’ हवा कापण्याचा एकच आवाज झाला आणि त्या आकृतीचे डोके उडाले.
त्या दर्वेशीने पुढे वाकून त्या पिशवीत परत एकदा हात घातला आणि एक आकृती बाहेर काढली. ‘सॉलोमन !’ तो म्हणाला. ‘या विश्र्वातील सगळ्यात ज्ञानी माणूस नाही का तू ! राक्षस आणि यक्षांवर तुझीच हुकमत चालत असे ! तुला पक्षांची, प्राण्यांची, किटकांची, माशांची भाषा येते म्हणे ! सर्व प्राणीमात्राचे तुझ्या इतके ज्ञान कोणालाच नाही असे म्हणतात. हे सगळे खरे असले तरीही तुझा इतिहास वाचल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तू अनेकवेळा मूर्खासारखा वागला आहेस व अन्यायही केले आहेस. या सगळ्यासाठी तुला कोणीही शिक्षा केलेली नाही. अर्थातच मी ती आज करणार आहे. आत्ता या क्षणी ! त्याच्या हातातील तलवार एका निमिषात खाली आली आणि सॉलोमनचे शीर खाली धुळीस मिळाले.
विकट हास्य करत त्या दर्वेशीने परत एकदा त्या पिशवीत हात घातला आणि एक आकृती बाहेर काढली. ती हातात उंच धरुन त्याने आपले डोळे गरागरा फिरवले आणि तो म्हणाला, ‘जिझस् ! जिझस् ! तू या जगात त्याचा प्रेषित म्हणून आलास आणि त्यांच्या पापांची किंमत तुझ्या रक्ताने चुकविलीस. चर्च स्थापन केलेस. याच चर्चने भावाभावांमधे भांडणे लावली. पित्यांना मुलांविरुद्ध उभे केले व रक्तपातात रक्ताच्या नद्या वाहिल्या. तू असशील एक थोर प्रेषित पण हे सगळे तुझ्यामुळेच झाल्यामुळे तूही या पापाचा धनी आहेस. तुलाही शिक्षा झालीच पाहिजे. पण आत्तापर्यंत ती तुला कोणी दिली नाही. आता मी तुला ती शिक्षा देतो असे म्हणून त्याने तलवारीने जिझसचे शिर उडविले.
हातून झालेल्या कत्तलीमुळे दर्वेशीचा चेहरा आता गंभीर व वेदनेने पिळवटलेला दिसत होता. विचारांना बाजूला सारत त्याने त्या पिशवीत हात घातला अणि अजून एक आकृती बाहेर काढली व ओरडला, ‘ मी आत्ताच जॉब, डेव्हिड, सॉलोमन व जिझसचा शिरच्छेद केला आहे. आता तुझे काय करु ? जिझसच्या अनुयायांनी जगभर रक्तपात केला. तरीही माणसाने ते मान्य केले आणि जगात शांतता नांदू लागते ना लागतेच तोच आपण या जगात अवतीर्ण झालात. तू तुझ्याबरोबर एक नवीन धर्म आणलास आणि परत एकदा रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. यासाठी तुलाही शिक्षा झालीच पाहिजे कारण त्या रक्तपाताची अंतिम जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. आजवर तुला शिक्षा करण्याचे धाडस कोणाला झाले नाही पण मी तुझी शिक्षा आता मात्र अमलात आणणार आहे. तुझ्यामुळे माझे जेवढे पूर्वज मेले त्यांच्यासाठीतरी तुला मेलेच पाहिजे. एवढे बोलून एका घावात त्याने आकृतीचे शीर तोडले.
एवढे झाल्यावर त्या दर्वेशीने जमिनीवर लोळण घेतली. छाती बडवत तो ओरडू लागला, ‘ या अल्ला ! परमेश्र्वराच्या परमेश्र्वरा ! तूच सगळ्यांचा त्राता आहेस. तूच एकमेव परमेश्र्वर आहेस. मी जॉब, डेव्हिड, सॉलोमन, जिसस व ****ला आत्ताच त्यांच्यामुळे या विश्र्वावर कोसळलेल्या संकटांसाठी शिक्षा दिल्या. हे परमेश्र्वरा तू सगळ्यात शक्तिमान आहेस. सर्व मर्त्य तुझीच संतती आहे. तूच त्यांना या जगात आणलेस. त्यांचे विचार म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुझेच विचार आहेत कारण या विश्र्वावर तुझेच नियंत्रण आहे. प्रत्येक घटनेच्यामागे तूच आहेस . या सर्व प्रेषितांनी जर या जगात दु:खे आणली असतील तर अप्रत्यक्षपणे तूच ती आणलीस असा अर्थ होतो. त्यांना शिक्षा देऊन मी तुला तसेच सोडले तर त्यांच्यावर अन्याय होईल.’ असे म्हणून त्याने एकदा आकाशाकडे बघितले व त्याची धारधार तलवार उचलली व त्या आकृतीचे शीर तो एका घावात उडवणार तेवढ्यात त्याच झाडावर लपलेल्या होजाचा स्वार्थ जागा झाला. उत्तेजित होत तो किंचाळला, ‘थांब ! थांब ! तो मला १००० मोहरा देणे लागतो.’
ते ऐकताव तो दर्वेशी तेथेच निपचित पडला. हे आपण काय केले असे म्हणून होजा स्वत:ला दूषणे देऊ लागला. भीतीने तो थरथर कापू लागला. त्याला त्या झाडाची फांदीही नीट धरता ये़ईना. आता आपला मृत्यु जवळ आला हे ओळखून त्याने आपले डोळे मिटले व तो अल्लाची प्रार्थना करु लागला. खाली दर्वेशी एखाद्या प्रेतासारखा पसरला होता. होजाने झाडाची फांदी तोडून त्याच्यावर टाकली. काहीच हालचाल झाली नाही. धीर येऊन होजा खाली आला व परत वर चढला. तरीही काही हालचाल नाही. थोड्यावेळाने होजा खाली आला व त्याने त्या दर्वेशीला एका काठीने ढोसले व लाथ मारली. तरीही काही हालचाल न झालेली पाहून त्याने वाकून त्या दर्वेशीच्या छातीला कान लावला.....
तो दर्वेशी मेला होता. ‘चला आता मी उपाशी मरणार तरी नाही. याचे कपडे विकून थोडे पैसे मिळाले तर माझी आजची भूक तरी भागेल’ तो मनाशी म्हणाला. होजाने त्या दर्वेशीचा पट्टा काढला आणि त्याच्या हाताला एक थैली लागली. उत्सुकतेने त्याने तिचे बंद उघडले तर आत सोन्याची नाणी. त्याने घाईघाईने ती मोजली ती बरोबर १००० भरली.
होजाने मक्केकडे आपले तोंड केले व आकाशाकडे बघत मोठ्या भक्तीभावाने तो ओरडला, ‘ या अल्ला ! परमेश्वरा ! तू तुझे वचन पाळलेस !’ तू खरोखरच दयाळू आहेस !’
एक पाऊल मागे घेताना, खाली जमिनीकडे तोंड करुन तो पुटपुटला ‘ पण त्यासाठी मला तुझे प्राण वाचवायला लागले !’
आता तुम्ही म्हणाल या गोष्टीचा आणि कॉफीचा काय संबंध आहे? ही गोष्ट आहे की तत्वज्ञान आहे..... आहे, संबंध आहे. तुर्कस्तानमधील एका काव्हीकानेमधे १७ व्या शतकात (कॉफीखाना-माझा शब्द) मारल्या जाणाऱ्या गप्पांमधे त्या काळात ही गोष्ट मोठ्या चवीने सांगितली जायची. जगात कुठल्याही पेयाला न लाभलेल्या वासाने तेथील वातावरण भरलेले असायचे आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळी आपली संध्याकाळ तेथे व्यतीत करत.
तुर्कस्तानमधील एक कॉफीखाना.........
हे चित्र बघितल्यावर त्यात बसलेल्या माणसांचे चिंतामुक्त चेहरे काय सांगतात ? आजही आपण एखाद्या रस्त्याने चाललेलो असताना जर एखाद्या कॉफीच्या दुकानासमोरुन गेलो तर तेथे दळल्या जाणाऱ्या कॉफीचा वास आपण क्षणात ओळखतो. मला तरी त्यानंतर कॉफीचा आस्वाद घेतल्याशिवाय चैन पडत नाही.
वर सांगितल्याप्रमाणे आम्हीही एका काव्हीखान्यामधे दररोज सकाळी पडलेलो असायचो. त्या काळात त्याचे नाव होते ‘कॅफे मद्रास’. बरोबर! आत्ताचे हॉटेल रुपाली. कॅफे मद्रासमधे बसल्यावर ‘मिडियम स्ट्रॉंग, शक्कर कम‘ अशी ऑर्डर दिल्यावर तेथील एक वेटर जेव्हा ते कॉफीचे कप (आम्ही मुद्दाम ग्लासमधे मागवायचो) घेऊन यायचा तेव्हा कधी एकदा तो कप ओठाला लावतोय असे व्हायचे. एक घोट घेऊन, एक सिगारेट पेटविली की जगातील सर्व बाबींवर चर्चा करण्यास आम्ही मोकळे व्हायचो...कॉफीच्या टेबलाशी कितीतरी आठवणी निगडीत असतात. या टेबलावरुन जे कायमचे उठून गेले त्यांची आठवण तर कॉफीच्या वासाबरोबर हमखास येतेच. वरचे चित्र काय किंवा रुपाली काय, त्यात कॉफी पिणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर आजही आपल्याला तेच समाधान बघायला मिळेल ! तर अशा या पेयाचा इतिहास आपण बघणार आहोत. ते कुठे तयार झाले.....त्याचा प्रसार कसा झाला....भारतात कसे आले.....तो इतिहास मनोरंजक आहे.....तुम्हालाही तो तसा वाटेल असे वाटते म्हणून हा खटाटोप............
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
12 Jul 2013 - 7:31 pm | जेपी
काका शेवट कळाला
, बाकी सगळ डोक्यावरुन गेल , पुभाप्र .
12 Jul 2013 - 7:57 pm | राघवेंद्र
मस्त सुरुवात झाली आहे. पुभाप्र .
12 Jul 2013 - 8:06 pm | पिंपातला उंदीर
कथा छान. हॉटेल रूपाली ओवर रेटेड
12 Jul 2013 - 8:13 pm | जयंत कुलकर्णी
हॉटेल रुपाली १९७० साली असेच होते......त्याला मी काय करणार.........आता गेली २० एक वर्षे तिकडे गेलेलो नाही.
12 Jul 2013 - 8:19 pm | पैसा
गोष्ट आवडली. आता कॉफीची कथा कधी येतेय वाट बघत आहे!
12 Jul 2013 - 9:13 pm | धमाल मुलगा
गोष्ट काय झेपली नाय, पण...इराणी हाटिलातल्या रोजच्या बैठकीतल्या गप्पांच्याच जातकुळीतली असल्यानं कॉफीचे घोट घोट घेत वाचल्यावर मजा आली. :)
साला, ते काव्हीकानेचं चित्र पाहूनच दिल खुश झाला. हैऽऽअसं एक चार दोस्त गोळा करावेत, असल्या अस्सल तुरुकी अॅम्बियन्सच्या ठिकाणी जावं, कॉफीच्या दळलेल्या बियांच्या वासानं आपसुकच मूड जमून जावा, मऊ मऊ गाद्यागिरद्यांच्या मुसुलमानी बैठकींवर तबियतीत मैफिल जमवावी, जन्नत-उल-फिरदौस नाहीतर फक्र-उल-अरब चा फाया कानाशी चढवावा, हुक्क्याची नळी फिरवत गप्पांचे फड रंगत जावेत..सोबतीला अरेबिक/तुर्की कॉफीचे प्याले येत जावेत....
व्वा! जयंतराव, माहौल बनवून टाकलात मियाँ! आज साला शुक्कीरवारचा मुहुर्त धरुन संध्याकाळी जावं लागतंय आता अरेबिक क्याफेमध्ये. :)
12 Jul 2013 - 11:09 pm | चित्रगुप्त
मस्त लेख. कुर्निसात जयंतराव.

@धमु:....जन्नत-उल-फिरदौस नाहीतर फक्र-उल-अरब चा फाया कानाशी चढवावा, हुक्क्याची नळी फिरवत गप्पांचे फड रंगत जावेत..सोबतीला अरेबिक/तुर्की कॉफीचे प्याले येत जावेत....
...आणि सोबतीला असाव्यात वळणावळणाने कंबर लचकवणार्या धुंद नर्तकी...
चित्रकारः Jean-Léon Gérôme (१८२४-१९०४, फ्रान्स)
डावीकडील नर्तकी: माता हरी (१८७६-१९१७)
उजवीकडील नर्तकी: सॅडी.
13 Jul 2013 - 12:46 am | धमाल मुलगा
क्या बात है! चित्रगुप्तकाका झिंदाबाद! :)
स्वगतः आता मोरक्कन रेष्टराँ शोधणं आलं. :D
12 Jul 2013 - 9:37 pm | पिंपातला उंदीर
लाईच झिंदा दिल दिसता हो धमाल मुलगा तुम्ही. नाहीतर मायला आम्ही. कायम १२ वाजलेले तोंडावर
12 Jul 2013 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सुरुवात ! येउद्या कॉफीच्या सुरस कथेचे पुढचे भाग भरभर.
12 Jul 2013 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सुरुवात ! येउद्या कॉफीच्या सुरस कथेचे पुढचे भाग भरभर.
12 Jul 2013 - 11:41 pm | रेवती
वाचतीये.
त्या धम्याच्या हातून बरेचदा कॉफी कळफलकावर सांडली असे ऐकले आहे. ;)
13 Jul 2013 - 12:09 am | बॅटमॅन
लेख जबरा आस्त, चित्रेपण एकदम तशीच!
कॉफीचा इतिहास वाचण्यास उत्सुक आहे एकदम. जल्द-अज़-जल्द येऊद्या सगळे.
13 Jul 2013 - 12:42 am | शिल्पा ब
आमालेबी लै कापी आवाडती.. युंद्या म्हैती .
13 Jul 2013 - 10:55 am | मैत्र
कॉफी हा आवडता विषय. तसे आम्ही अट्टल चहाबाज. पण तो दर्जेदार कॉफीचा दरवळ आणि पहिल्या घोटातली चव चहाला नाही..
परंपरागत दुधाट, वेलदोडे घातलेली कॉफी क्वचित पिण्यात अनेक वर्षे गेली आणि अचानक कूर्गमध्ये थेट बिया वेचण्याचा योग आला. फुलांपासून पार्चमेंटपर्यंत सगळं एकदम पाहिलं.. लै भारी वाटलं. "बाबा बुडान" बद्दलही येऊ द्या..
इथे बंगळूरात मात्र कॉफीची आवड निर्माण झाली. कित्तिही लांबचा प्रवास करून आलो तरी बंगळूरु एअरपोर्टवर आधी हट्टी कापी होते मग घर..हापिसात चहा जवळपास बंद झाला होता हट्टी कापी मुळे.
एमटीआर, ब्राम्हिन्स कॉफी बार, आनंद भवन.. अनेक जागा. झकास कॉफी.
सीसीडी ला ती सर नाही. ती कॉफी पिण्याची नव्हे तर निवांत गप्पाटप्पा करण्याची जागा आहे.
जयंत काकांची लेखमाला म्हणजे असेच जादूगाराच्या पोतडीतले नवनवीन कथा आणि लेख ...
त्या दरवळाप्रमाणे वाट पाहतो.
13 Jul 2013 - 10:59 am | मुक्त विहारि
पु भा प्र....
14 Jul 2013 - 7:33 pm | प्रचेतस
मस्त लेख.
पुभाप्र.
15 Jul 2013 - 9:33 am | मदनबाण
पुढच्या भागाची वाट पाहतो...
15 Jul 2013 - 10:00 am | सौंदाळा
पुभाप्र.
15 Jul 2013 - 10:35 am | सस्नेह
पण गोष्टीचा अन कॉफीचा संबंध कळला नाही...!
कॉफी-पंखी(?)__ स्नेहांकिता
15 Jul 2013 - 2:16 pm | आतिवास
गोष्ट आवडली पण तिच्याशी असलेला कॉफीचा संबंध(संदर्भ)मात्र कळला नाही.
15 Jul 2013 - 2:40 pm | जयंत कुलकर्णी
बर्याच जणांना त्या गोष्टीचा आणि य लेखाचा काय संबंध आहे हे उमगले नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या जुन्या काळात ज्या ठिकाणी कर्मठ मुस्लीम देशात ही कॉफीखाने चालायचे. त्यात काय प्रकारच्या विचारांची माणसे जमायची हे सांगण्यासाठी ती गोष्ट सांगितली आहे. कॉफीखान्यामधे सर्व बंधने झुगारुन मनातील गोष्टी बोलण्याचे स्वातंत्र्य घेता येत असे. आजही तुम्ही बघाना बॅरिस्टामधे किती मस्त गप्पा रंगतात किंवा सीसीडीमधे. तसे स्वातंत्र्य घरी मिळत नाही हे खरे.......
17 Jul 2013 - 3:10 pm | बाळ सप्रे
तिथे बर्याच गोष्टी सांगितल्या जात असतील. हीच गोष्ट का सांगितलीत..
कथाही बरेच बादरायण संबंध जोडल्यासारखी आहे.. विशेष घेण्यासारख काही नाही त्यात!!
थोडक्यात नमनाला घड्यापेक्षा जास्त तेल गेलं तुमचं.. आणि नमनही नीट झालं नाही..
17 Jul 2013 - 4:15 pm | जयंत कुलकर्णी
बरं ! मला नाही वाटत वाचकांचे किंवा माज़े फ़ार नुकसान झाले असेल.........होते असे कधी कधी.......पुढे जर नीट वाचले असतेत तर हा प्रश्न कदाचित पडला नसता.....
17 Jul 2013 - 4:19 pm | बॅटमॅन
लेखातली माहिती सोडून नेमके भुसकाट फोले पाखडता काय म्हणून?
17 Jul 2013 - 4:32 pm | बाळ सप्रे
अहो .. कॉफीविषयी वाचायला उघडला धागा आणि एक शेवटचा परिच्छेद वगळता कॉफी कुठेच दिसेना.. अल्ला काय, होजा काय, जीझस काय .. भुसकाटच निघालं ना सगळं.. पाखडायला ठेवलय काय यात??
17 Jul 2013 - 4:40 pm | जयंत कुलकर्णी
माझ्या कुठल्याही लेखमालिकेची सुरवात अशीच असते हे जे माझे लेख नियमीत वाचतात त्यांच्या लक्षात एव्हाना आले असेल. ही आता लेखमालिका चालू करतोय याची Announcement असते... आपण दुसरा भाग वाचला असतात तर कदाचित आपल्याला हा प्रश्न पडला नसता. आणि शेवटी भुस्कट बाजूला ठेवायचे काम आपण जरुर करु शकता......भुस्कटच ते पटकन बाजूला उडते........... :-) :-)
15 Jul 2013 - 2:09 pm | चित्रगुप्त
कॉफी पिताना बघितले गेलेले हे सुंदर मराठी गाणे बघा:
https://www.youtube.com/watch?v=ceDKN5408Io
17 Jul 2013 - 12:26 am | संदीप चित्रे
वाचतोय :)
17 Jul 2013 - 7:18 am | स्पंदना
हे ही मस्त.
17 Jul 2013 - 10:01 am | कपिलमुनी
पट्टीचे चहाबाज असल्याने आमचा पास ..
बाकी अनुभवावरून तुमची लेखमाला म्हणजे पर्वणीच !! यामुळे तरी कॉफी प्यायची आवड निर्माण होते का पाहू या
17 Jul 2013 - 5:19 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !