भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154
भाग तीन : http://www.misalpav.com/node/23248
....आम्ही तळजाईची वाट चढत होतो आणि मी मनात खूप वर्षांपूर्वी उतरलेली सिंहगडाची वाट पुन्हा उतरत होतो...सोसायटी मधली आम्ही सगळी पोरंसोरं मिळून सकाळी सहाची पीएमटी विश्व हॉटेलपासून पकडून गडावर गेलो होतो. सिंहगड वॉज माय टर्फ. अख्खी कल्याण, अवसरवाडी तरफ आमच्या घरातल्या सगळ्यांना नावानिशी ओळखत असे. आम्ही खेडेबार्याचे एके काळचे इनामदार, त्यात आमच्या आजोबांची पुण्याई मोठी. माझी आज्जी सांगायची कि गांधीवधानंतरच्या जळीतात, पंचक्रोशीतली ब्राम्हणांची घरं जळाली पण आमच्या वाड्याभोवती तीन साडेतीनशे कातकरी आणि रामोशी हातात तीर कामठे आणि काठ्या घेवून आठवडाभर पहारें देत होते...
असो, तर सांगत काय होतो कि गडावर सगळे दुकानवाले मला ओळखत असत, पंडित काकांचा नातू म्हणून. सुमीवर इम्प्रेशन मारण्याची इतकी भारी संधी मला आपटून सुद्धा मिळाली नसती. फुल सगळ्यांना 'वळख' देत आम्ही माझ्या शाळेतल्या मित्राच्या हाटीलात जावून बसलो. सर्वांना अगदी पेश्शल जेवण घालून आणि मित्राच्या हातात बळच पैसे कोंबून आम्ही हिंड हिंड हिंडलो. गडावरचा दगड आणि दगड ओळखीचा असल्याने मीच गाईड होतो. कारण घरात लहानपणी कोणताही पाहुणा आला कि सिंहगड वर जाण असायचंच.
शिवचरित्राचं पारायण आमच्या घरात नेहमीच चालू असे. अफझल वधाचा अज्ञानदासाचा पोवाडा आणि जाणता राजा मधला औरंगजेबाचा शेवटचा मोनोलॉग मी पाहुण्यांसमोर घडाघड म्हणून दाखवत असे. तीच केसेट तेव्हाही गडावर वाजवली आणि काय विचारता ! जो भाव वाढलाय म्हणून सांगू...खल्लास. सुमी मधूनच 'बास आता' वाली एक्स्प्रेशन देवून माझ्याकडे बघून ग्वाड हसत होती. उतरताना आम्ही दोघंच सगळ्यात पुढे माकडासारखे पळत होतो. आणि शेवटच्या पठाराच्या आधी एका टप्प्यावर सुमी सडकून आपटली. मी मागे वळून तिच्याकडे पळत आलो. तिला उठवताना जो हात धरला तो गाडीपर्यंत तसाच धरूनच राहिला होता...नकळत. त्यावेळेस जाणवलं नाही पण त्या हाताची ऊब, धपापलेले तिचे श्वास, मधूनच खाली बघून तिचं ओढणी सावरणं आत्ता जसंच्या तसं स्लो मोशनमध्ये तळजाई चढताना आठवत होतं.
तिलाही हे सगळं तसंच आठवत असेल का असा विचार माझ्या मनात आला आणि जाणवलं कि सुमी भयानक शांत आहे... मी हात सोडवून घेतला. सुमे…सुमे जावूदे यार...मला हे सगळं विसरायचय ! …सुमीने चमकून मागे पाहिलं आणि लक्षात आलं कि मी हे प्रत्यक्षात बोलून गेलोय...विचाराची तंद्री तुटली आणि पुन्हा शांतता येवून मी भानावर आलो. मी अस्वस्थपणे सुमीकडे पाहिलं तर हि वळून पुन्हा चालायला लागली होती. सुमे, सांगणार आहेस का? काय झालंय? …बसुयात कुठेतरी, सुमी म्हणाली. तिला आज वेळेची फिकीर न्हवती. नाहीतर नेहमी ठरल्या वेळेत घरी जाणारी सुमी इतका अंधार झाल्यावर एव्हाना मनगटाकडे बघायला लागलीही असती.
पुन्हा काही वेळ चालून आम्ही एकेक दगड पाहून बसलो.
सुमे, इथे का? किती अंधार आहे...कृष्णावर बसलो असतो ना....
सुमी काही न बोलता एकटक माझ्याकडे काही वेळ बघत राहिली आणि अचानक उठून माझ्याकडे आली. मी उठून उभा राहिलो. सुमीच्या डोळ्यात संताप दिसत होता. …..तुला तीन वेळा संधी होती. एकदाही का विचारलं नाहीस रे? सारसबागेत नुसताच सगळं घडाघड बोललास, तू मोकळा झालास. नंतर काय झालं? मी बावळटासारखी नुसतीच स्वतःशी काही दिवस हसत राहिले, खुश होत राहिले आणि पुढे तू अचानक वेगळा झालास, तुझ्या विश्वात रमून गेलास. तुला बोलता करण्यासाठी मी त्या समीरला मध्ये आणलं तर तू अजूनच लांब गेलास. नंतर कृष्णा मध्ये आपण भेटलो तेव्हा शेवटी मीच बोलण्याची तयारी करून आले होते. पण अर्थात मीही कचरत होतेच. माझा एक 'पण' तुला जिव्हारी लागला आणि तू सलग दहा मिनिटे बोलून माझा पुतळा करून ठेवलास. मी मोठी आहे, कायम समजुतदारपणे वागले आहे हि माझी चूक? आणि सगळ्यात मीच पुढाकार घ्यायचा हा हट्ट का? थोडाही भांडला नाहीस माझ्याशी. यु नेव्हर फॉट फॉर मी ! हे सगळं तुझ्यासाठी आणि आणि तुझ्याच बरोबर घडतंय अशी गोड समजूत करून घेवून सगळं स्वतःवर घेत राहिलास तू. कृष्णाच्या भेटीपर्यंत मला वेळ होता पण जेव्हा आरोहीचं मला समजलं तेव्हाही तुझी हीच अपेक्षा होती कि मीच पुढे यावं ? तुला ते शक्य आहे असं वाटलंच कसं रे? बाईला आत्मविश्वास भावतो पुरुषातला! पण तू माझ्यासाठी कधीच पुरुष झालाच नाहीस. आपल्यातली दोन वर्ष तशीच राहिली, नाही तू ती तशीच ठेवलीस. तुला कदाचित दाई हवी होती, प्रेयसी नाही. आणि आज हे सगळं अशा कुरूप बोलण्यातून बाहेर येतंय....मी इतकी दोलायमान कधीच न्हवते. इट हॅज कम टू धिस नाऊ.
एव्हाना सुमीच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. मी तिचा हात धरला...ती कसल्याशा भाराने असहायपणे खाली वाकली आणि मी तिला आवेगाने उठवत मिठीत घेतलं. सुमी हमसत होती…. 'मी माझा' च्या गारूडात असताना मी नववीत पाडलेली एक चारोळी मला आठवली....
'जीवनात' एकच इच्छा उरली आहे,
तीही सुखावह मरणासाठी....
तुझा खांदा मिळावा,
दोन अश्रू ढाळण्यासाठी.
त्याही अवस्थेत मला हसू आलं. मी मोठा झालोय याचीही जाणीव झाली. सुमीही असहाय होवू शकते हे मला नव्याने कळत होतं. पण मध्ये बराच काळही गेला होता. सुमी माझ्यामध्ये इतकी अडकून पडली असेल याची मला सुतराम शक्यता आत्ताही वाटत न्हवती. नक्की काय झालंय हेच समजत न्हवतं.
सुमे आपण सोसायटीत असताना मी तुझ्यावर कविता करायचो माहितीये का तुला? सुमी तशीच गळ्यात पडून होती. मग मी तिला हीच चारोळी ऐकवली. ती ऐकून सुमी हसली हे मला तिच्या उत्छ्वासामुळे लक्षात आलं. मी तिला अजून एक दोन अशाच सोपान छाप कविता ऐकवल्या. सुमीने स्वतःला मिठीतून सोडवून घेतलं आणि डोळे पुसत हसत म्हणाली कि किती चीजी लिहाय्चास रे. या तेव्हाच ऐकवल्या असत्यास तर आज इथे भेटायची गरजच राहिली नसती. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो. सुमी थोडी शांत झाली होती. खोल श्वास घेऊन ती म्हणाली कि, हेच ! तुला हे कसं जमतं? किती सहज मला बदलून टाकतोस तू...दुर्दैव हेच आहे कि मला हे सगळं खूप उशिराने कळतंय. तुझं असणंच मी माझ्या दृष्टीने संपवून टाकल्यानंतर…. हे बघ, मी तुला इथे कुठल्याही कल्पना द्यायला किंवा काही विचारायला बोलावलं नाहीये. खरंतर मला नक्की सांगता येणार नाही कि मी तुला इथे का बोलावलंय. पण एका मोमेंटला मला हेच बरोबर वाटलं आणि मी तुला मेसेज केला.
सुमे, सगळं नीट पहिल्यापासून सांगशील का?
समीरने मला नकार कळवलाय. घरचे साखरपुड्यासाठी मुहूर्त शोधत आहेत आणि आजच दुपारी त्याने मला फोन करून सांगितलं. अजून घरी माहित नाहीये. लग्नाची फायनल बोलणी सुरु झाल्यापासून मी 'वेगळी' झालीये असं तो म्हणाला. मी तशी होते, तुझ्यामुळे. मी आल्टरनेट फ्युचरला नाकारू नाही शकले, नाकारू शकत नाहीये. मी भयानक कन्फ्युज्ड आहे.
सुमीला मधेच थांबवून मी बोलायला सुरुवात केली. आता मला संधी होती, सगळं बोलून टाकायची...सुरुवातीपासून.
सुमे, तुझ्यामुळे मला पहिल्यांदा माझ्या हृदयाची धडधड पूर्ण सराउंड साउंड मध्ये जाणवली. तिचा अनुभव मी तू दिसलीस, तुझा आवाज ऐकला कि प्रत्येक वेळेस घेत आलो आहे. टोटल कन्फ्युजन म्हणजे काय हे मला तुझ्या भोवती असताना जवळजवळ प्रत्येक वेळेस जाणवलय. तुझी एकनएक हालचाल, भाव, प्रतिक्रिया हे सगळं अनुभवण्यासाठी मला प्रत्यक्ष तू समोर नसलीस तरी चालतेस. तुझे विचार डोक्यात घेवून मी तीस तीस किलोमीटर अंतर सहज सायकल केलं आहे...तेही भर उन्हात, पावसात. तू भेटशीलच याची खात्री नसताना ! त्याची मला फिकीर नसायची कारण तुझ्या आसपासचा एक दोन किलोमीटरचा एरियाही माझ्यासाठी गंधाळलेला असायचा.
सुमे, तुझी मला दिलेली प्रत्येक प्रतिक्रिया हि माझ्यासाठी 'साईन' असायचीही आणि नसायची सुद्धा. तू कायमच माझ्यासाठी एक मिस्टरी राहिलीस सुमे....मला तुझा अंदाज कधीच लागला नाही. नंतर मला सवय झाली तू नसण्याची. त्रास खूप झाला. मला वाटायचं कि का? प्रत्येक भावनेला अंत का असावा? पण त्याचं उत्तर मी माझ्यापुरतं शोधलेलं होतं कि एकतर्फी भावनेला अंत हा असावाच लागतो. नाहीतर त्याचं मातेरं होवू शकतं.
खूप छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या सुमे. आणि मग त्या गोष्टींचा डोंगर माझ्या डोक्यावर बसला. त्या बोलायच्या राहून गेल्या कारण, तुझ्याबाबतीत प्रतिसादाची कायमच भीती होती. आपल्यातल्या विसंगत गोष्टीही मातब्बर होत्या, आहेत.
याच्या उलट अरुच्या बाबतीत गोष्टी खूप सोप्या होत्या, आधीच ठरवून ठेवल्या सारख्या. मी तिथे सुखावलो. आपला मध्ये संपर्कही नावाला राहिला होता. तुझ्याकडून पुढाकाराची अपेक्षा मी कायम ठेवली कारण तुला नैसर्गिक एडवांटेज होतंच. तू नेहमीच कमांडिंग पोजिशन मध्ये होतीस सुमे....वेडा मी होतो तुझ्यामागे. तू माझ्या रुसण्याची जागा होतीस. सुमे विचार कर कि आज, आज तू अशी आहेस...याआधी तुला मी असं बघेन हे तुलातरी कधी वाटलं होतं का? तू पुढे आली नाहीस हे मी आज समजू शकतो, ते किती अवघड होतं हेही ! पण तेव्हा...तेव्हा मी या लेव्हललाच न्हवतो.
जसा तू समीरला उभा केलास तसंच मलाही वाटत होतं कि मी अरुला ढाल बनवतोय. पण सुमे, मला आज खात्री आहे आणि उद्याही राहील कि अरु असणार आहे कायमची. फक्त गोष्टी सोप्या होत्या म्हणून नाही तर त्या तिच्या बरोबर सोप्या वाटतात म्हणून. अरुबरोबरही मी या सर्व प्रेशर मधून गेलोय, पण हे वेगळं होतं...त्यात प्रेशर पेक्षा जास्त आनंद होता, प्रतिसादाच्या धसक्यापेक्षा उस्तुकता जास्त होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी तू माझ्यासाठी आहेस तो मी तिच्यासाठी आहे सुमे. मी तिची सुमी आहे. फरक इतकाच कि मी आपल्यातलं क्लोजर शोधलं...तुला ते असं मिळवावं लागतंय....मला खात्री आहे सुमे कि हि तुझी तात्पुरती अवस्था आहे. कारण यु मूव्हड अवे लाँग अगो....आपल्या रेषा कायमच समांतर होत्या, तशाच जाणार आहेत. आपण एकमेकांना बघू शकू पण ठराविक अंतरावरून.
आणि तसंही तू मला प्रत्यक्षापेक्षा कल्पनेतलीच जास्त आवडायला लागली आहेस. माझीना त्या गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यासारखी गत होती सुमे....गाडी थांबल्यावर काय करायचं असतं हे मला तेव्हाही माहित न्हवतं आताही नाहीये.
मला आता कळतंय कि तू मला मेसेज का केलास...तुही माझ्यासारखी छोट्या छोट्या गोष्टी त्या कपाटात टाकत राहिलीस. त्याची अडगळ झाली आणि तू त्यात समीरला बसवायचा प्रयत्न करत होतीस. आपल्या दोघांनाही क्लोजर हवं होतं सुमे. आपण दोघांनीही कपाट उचकटून सगळ्या आठवणींचे गुंडाळे बाहेर काढले. आता गरज आहे त्यांच्या नीट घड्या घालून ठेऊन द्यायची. एकदा त्या कप्प्यांच अस्तित्व वेगळं काढलं न कि त्याचा खजिना होईल बघ. अजून वीस वर्षांनीही तू माझ्यासाठी अकरावीतच राहशील आणि जेव्हा जेव्हा मी तुझा विचार करेन तेव्हा मीही अलगद नववीत जाईन...
सुमी माझ्याकडे मंद हसत बघत होती. मला ती तेव्हाही तशी वाटली...मोठी ! समंजस...आधीसारखीच. आम्ही शांतपणे न बोलता पुन्हा उतरायला लागलो. हातात हात पुन्हा गेले....निरोपाचे अंदाज मागे ठेवून.....
....पुढे सुमीने समीरला फोन करून गोष्टी क्लियर केल्या. त्यांचा साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी वाजलं. सुमी खुश होती कि तिने पुन्हा स्वतःला एडजस्ट करून घेतलं याचं उत्तर मला मिळणार न्हवतं, नकोही होतं. कारण वुई लेफ्ट दि स्टोरी ऑन दि सेम पेज. त्यादिवशी मात्र मी माझ्यापुरतं मळभ दूर केलं होतं....खात्री होती कि आठवणींचा वारा आला कि ते पुन्हा मनावर येईल, येत राहील....
रमणा गणपतीपाशी येऊन आम्ही एकमेकांना टाटा केला आणि मी गाडीला किक मारली आणि निघालो अरुकडे सर्वस्वी माझ्याच अरुकडे.
पहिली जखम हि नेहमी सगळ्यात जास्त खोल असते असं म्हणतात....ती तशी असते का नाही ते माहिती नाही, पण कदाचित ती तिच्या पहिलेपणामुळे तशी वाटत असावी....
समाप्त !
प्रतिक्रिया
9 Dec 2012 - 5:50 am | स्पंदना
अक्षरशः नि:शब्द!!!
काय उपमा आहेत! कस उलगडलय भावविश्व!! मस्त! इष्टुर फाकडा मस्त!!
चला पुढच्या गुंताळीच्या मागे लागा आता.
9 Dec 2012 - 8:06 am | अन्या दातार
अप्रतिम कथा.
9 Dec 2012 - 8:06 am | गवि
सॉल्लिड ... केवळ कातिल..
9 Dec 2012 - 10:48 am | इनिगोय
मस्त.. मस्तच..! एकदम हुळहुळ्या दिवसांची याद देणारी गोष्ट.
या भागातला डायलाॅग वाचून तर दुनियादारीतला श्रेयस आणि शिरीनचा शेवटचा संवाद आठवला...
लिहित राहा, मजा आली वाचायला.
9 Dec 2012 - 10:48 am | इनिगोय
मस्त.. मस्तच..! एकदम हुळहुळ्या दिवसांची याद देणारी गोष्ट.
या भागातला डायलाॅग वाचून तर दुनियादारीतला श्रेयस आणि शिरीनचा शेवटचा संवाद आठवला...
लिहित राहा, मजा आली वाचायला.
9 Dec 2012 - 11:00 am | बाबा पाटील
क्लासिक......
9 Dec 2012 - 11:10 am | बॅटमॅन
ऐच्यान्!!!!!!!!! एकच नंबर कथा. किञ्चित अपेक्षित शेवट, पण मधले एक्स्प्लनेशन लय खत्तर्णाक रंगवले आहे!!!
9 Dec 2012 - 11:32 am | अर्धवटराव
मागच्या सगळ्या भागात मूळ कथानकाची थीम प्रत्येक वाक्याला स्पर्षुन जात होती. या भागात सींहगडचा संपूर्ण प्लॉट मूळ कथेच्या पार्श्वभूमीवर अगदीच विजोड वाटला (मला कोरीलेट करता आलं नसेल कदाचीत).
सुमीची कमांडींग पोझीशन आणि मॅच्युरीटी व्हर्च्युअल वाटावी, किंवा तिच्यावर ति पोझीशन लादली गेली असावी इतकी भरकटल्यासारखी वाटली. तसं नसतं तर तिने गोष्टी या थराला जाऊच दिल्या नसत्या... अगोदरच निकाल आपल्या बाजुने सिक्युअर करुन घेतला असता. सुमीचं गोंधळलेपण शेवटी एक सरप्राईझ म्हणुन समोर आलं, आणि आश्चर्य म्हणजे आपल्या हिरोला त्याचा फारसा धक्का बसला नाहि.
आपल्या हिरोला खरा पुरुषीपणा अरु नावाच्या प्राजक्त फुलाने दिला. अरुची तिलाच न उमगलेली हि क्षमता संपूर्ण कथेचा सर्वात सशक्त भाग आहे. एव्हढं अद्वितीय वरदान मिळालेला आपला हिरो मात्र त्याच्या आणि अरुच्या नात्यात तो सुमीसारखा कमांडींग पोझीशनला आहे या सुखसंवेदनेला जास्त महत्व देतोय... अगदीच मातीमोल केलं त्याने अरुला आणि आपल्या पुरुषत्वाला.
खैर... ये बाते है ख्वाईशोंकी... इथे जे जसं आहे ते तसं आहे... पण एक लेखक म्हणुन तुम्हाला या कथेचा अंत खरच असा करायचा होता का ? ( तसं बघितलं तर हा अशाप्रकारचा अंत फार स्वाभावीक होता)
अर्धवटराव
9 Dec 2012 - 2:17 pm | इष्टुर फाकडा
अर्धवटराव,
थोडी गल्लत होते आहे. मी ते पोचवायला कमी पडलोय बहुतेक. सुमी कमांडिंग पोझीशनला होतीच पण तिला गोष्टी पुढे जावू द्यायच्या न्हवत्याच आधी. त्यांच्यात विसंगत असणाऱ्या गोष्टी आजही तशाच आहेत. सुमीला तेव्हा त्या विसंगत गोष्टी नायकापेक्षा मोठ्या होत्या आणि त्याचमुळे मध्ये ती नायकाला विसरूनही गेली होती. आजचा तिचा outburst हा थोडासा कोल्ड फीट मधूनही आला आहे लग्नाच्या.
पुन्हा गल्लत होतेय, सुमीचा outburst अरुमुळेच नायक नाकारू शकतो असे सुचवायचे आहे राव. हा मुद्दा तर कथेत पक्का बसलाय. आणि सुमी कमांडिंग पोझीशनला भूतकाळात होती. नायक शेवटी अरुकडेच जातो हे तरी क्लियर आहे म्हणा नाहीतर मी इथे गाडी खाली विष पिऊन संपतो :)
9 Dec 2012 - 10:27 pm | अर्धवटराव
>>आजचा तिचा outburst हा थोडासा कोल्ड फीट मधूनही आला आहे लग्नाच्या.प
-- ठीक आहे. आपला नायक जर सुमीचं पहिलं प्रेम असेल तर हा बेनिफीट ऑफ डाउट ग्राह्य आहे.
अरुचे प्राजक्तपण नायकाला एका आल्हादकारी तटस्थपणा देण्याइतपत उंचीचे आहे. मला ति तेव्हढी जाणवली नाहि... (सट्ल वगैरे भानगडी आपल्या पल्ले पडत नाहि हा आमचा कोरडेपणा)
एखादी कथा आपल्याला आवडते, एखादी नाहि आवडत. काहि कथा आवडण्याच्या पातळ्यांत खोलवर उतरुन समीक्षक टाईप प्रतिसाद द्यायला भाग पाडतात. हि ख्वाईशे त्यापैकीच.
अर्धवटराव
9 Dec 2012 - 10:37 pm | इष्टुर फाकडा
तुम्हाला आवडलं मला पावलं :)
थोडं इन बिटवीन दि लाईन्स लिहायचा प्रयत्न केलाय. सामिक्षेबद्दल धन्यवाद, त्याबरहुकूम अजून एक परिच्छेद म्हणूनच नंतर समाविष्ट केला.
9 Dec 2012 - 10:43 pm | अर्धवटराव
.
अर्धवटराव
9 Dec 2012 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार
मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती.
9 Dec 2012 - 5:12 pm | इष्टुर फाकडा
तुम्ही पास केलत म्हणजे खरच काहीतरी बरं लिहिलं गेलंय म्हणायचं :)
धन्यवाद !
9 Dec 2012 - 10:20 pm | चिगो
सुपर्ब.. भावनिक गुंतागुंत अत्यंत सुंदरपणे मांडली आणि उलगडली आहे तूम्ही..
9 Dec 2012 - 10:33 pm | बहुगुणी
कथानायकाला आपल्या भावनिक गुंतवणुकीतून अलगद सुटका करून घेता आली म्हणून वाचकांचा जीव भांड्यात पडला असणार :-).
आपण दोघांनीही कपाट उचकटून सगळ्या आठवणींचे गुंडाळे बाहेर काढले. आता गरज आहे त्यांच्या नीट घड्या घालून ठेऊन द्यायची. एकदा त्या कप्प्यांच अस्तित्व वेगळं काढलं न कि त्याचा खजिना होईल बघ.
यासारखे खूपसे वाक्प्रयोग आवडले.9 Dec 2012 - 10:54 pm | लॉरी टांगटूंगकर
पहिली जखम हि नेहमी सगळ्यात जास्त खोल असते असं म्हणतात....ती तशी असते का नाही ते माहिती नाही, पण कदाचित ती तिच्या पहिलेपणामुळे तशी वाटत असावी....
निव्वळ अप्रतिम,
9 Dec 2012 - 10:54 pm | लॉरी टांगटूंगकर
पहिली जखम हि नेहमी सगळ्यात जास्त खोल असते असं म्हणतात....ती तशी असते का नाही ते माहिती नाही, पण कदाचित ती तिच्या पहिलेपणामुळे तशी वाटत असावी....
अप्रतिम,
9 Dec 2012 - 11:52 pm | कवितानागेश
आवडली. :)
10 Dec 2012 - 8:29 am | ५० फक्त
लै भारि लिहिलंय हो, वाचताना जाम अडकुन गेलो होतो, शब्दप्रभु आहात हे निश्चित.
अर्थात वर अर्धवटराव म्हणतात त्याच्याशी सहमती आहे, किमान अरुच्या बाबतीत तरी. पण आता समीक्षकाच्या रोलमधुन एवढा छान शेवट असलेली कथा पाहायला नको आहे.
धन्यवाद इष्टुर फाकडा.
10 Dec 2012 - 2:50 pm | खडीसाखर
खुप खुप आवडली कथा :-)
10 Dec 2012 - 3:33 pm | रुमानी
आवडली
एकदम मस्त .........!
10 Dec 2012 - 3:52 pm | इनिगोय
शेवटची अॅडिशन पण भारीच, मूळ कथेत एकदम मिसळून गेलीत ती वाक्यं. आणि गंमत म्हणजे पुन्हा दुनियादारीच आठवली. :)
मानलं तुम्हाला!!
10 Dec 2012 - 4:18 pm | इष्टुर फाकडा
मी दुनियादारी अजूनही पूर्ण वाचलेली नाही ! कॉलेजात असताना वाचायला घेतली होती. तेव्हाच जी ती अर्धी राहून गेलीये तिला कधीच पुन्हा मुहूर्त मिळाला नाही. खरं सांगायचा तर मी जितकी ती वाचली होती त्यात मला ती फारशी आवडली न्हवती तेव्हा. पण आता मला ती पूर्ण करायचीये.
शाळा ने मात्र भयानक प्रभाव सोडला आहे माझ्यावर. बोकीलांनी दुसरा भाग कंटीन्यूएशन मध्ये लिहावा अशी फार इच्छा आहे.
10 Dec 2012 - 5:08 pm | बॅटमॅन
शेम टु शेम हिअर. दुनियादारी वाचून लै दिवस झाले, पण नै आवडली. भावजीवनाचे सुरेख चित्रण शाळेत जसे आढळते, तसे दुनियादारित नै आढळत. भाबडेपणा कॉलेजात शिल्लक नसणार किंवा असलेला हळू हळू जाणार याबद्दल दुमत नै, पण मग स्ट्रिप्ड ऑफ भाबडेपणा, भावजीवनात काय उरते, हे नीट दाखवण्यात यश आलंय असे नै वाटत. कॉलेजात असताना जणू मँडेटरी असलेल्या मारामार्या, थोड्याफार मारलेल्या लायनी, हे वगळता विशेष असे काही दिसलेच नाही. शाळेत किंवा अगदी लंपन सेरीजमध्येही भावजीवनाचे किती सुंदर चित्रण बघायला मिळते! तसे ते इथे नै मिळत. म्हणजे सगळं कसं गोग्गोडच पाहिजे असा आग्रह बिल्कुल नै, पण भावजीवनाच्या समृद्धतेचे दर्शन घडावे तसे घडले नसल्याचे फर्स्ट इंप्रेशन घर करून बसले ते बसलेच. त्यानंतर मी पुन्हा म्हणून दुनियादारीला हात लावला नै. इन्शाल्लाह कदाचित एखादवेळी वाचेनसुद्धा, तेव्हा मग बघू कसे मत बदलेल तर, पण सध्यापुरते तरी हेच मत आहे.
11 Dec 2012 - 4:15 pm | इष्टुर फाकडा
अगदी याच आणि अशाच कारणामुळे नाही आवडली दुनियादारी.
10 Dec 2012 - 5:27 pm | ५० फक्त
पण आता मला ती पूर्ण करायचीये.
खरं सांगु नका वाचु आता, उगाच तुमच्या चांगल्या स्टाइलवर उगाच प्रभाव पडेल, पण असं होत नसेल तुमच्या बाबतीत तर जरुर वाचा.
10 Dec 2012 - 4:41 pm | स्मिता.
कथा सुरुवातीपासून वाचतेय पण म्हटलं संपल्यावरच प्रतिक्रिया द्यावी.
शेवट खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. कथा आवडली. मधून मधून आलेली परिणामकरक रुपकं तर मस्तच.
10 Dec 2012 - 7:36 pm | बाबा पाटील
मानवी भावनांची गंतागुंत खुपच छान व्यक्त केली आहे..
10 Dec 2012 - 7:37 pm | शैलेन्द्र
सुंदर, आवडली
10 Dec 2012 - 9:34 pm | आनन्दिता
काय मस्त उभ्या केल्यात दोन्ही व्यक्तिरेखा!!!
आरोही च साधेपण एकदम भावलं बुवा........!
10 Dec 2012 - 9:56 pm | पैसा
फार सुरेख! लै आवडली कथा आणि तिची गुंफण.
10 Dec 2012 - 10:56 pm | हारुन शेख
एकदम भावली पूर्ण कथा. खूप मस्त.
11 Dec 2012 - 1:20 pm | श्रावण मोडक
छोटंसं चित्र, आखीवरेखीव, रंगसंगती साधलेली. छान.
20 Dec 2012 - 9:55 pm | प्रीत-मोहर
मस्त ....
21 Dec 2012 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>पहिली जखम हि नेहमी सगळ्यात जास्त खोल असते असं म्हणतात....ती तशी असते का नाही ते माहिती नाही, पण कदाचित ती तिच्या पहिलेपणामुळे तशी वाटत असावी....
खरंय...!!! वाचनीय लेखन.
-दिलीप बिरुटे
21 Dec 2012 - 5:00 pm | स्पा
लाजवाब
असचं लिहित रहा.
सुरेख फ्लो अाहे , तुमच्या लिखाणाला.
वेलडन
21 Dec 2012 - 5:30 pm | प्यारे१
आज एका झटक्यात कथा पूर्ण वाचली. (भाग १ ते ४)
छान लिहीलंय. त्या त्या वयातल्या गोंधळलेपणासकट मस्त सगळं रिसीव्ह होतंय. :)
21 Dec 2012 - 5:42 pm | किसन शिंदे
सुप्परक्लास लेखन!
हि कथा खुप्पच आवडली.
अगदी योग्य नि समर्पक वाक्य...
हॅट्स ऑफ टू यु.!
21 Dec 2012 - 5:51 pm | गवि
आता तुमची पूर्ण करा हो साहेब..
21 Dec 2012 - 5:55 pm | किसन शिंदे
पुर्ण करण्याचं काम चालूच आहे कि..पण त्याचबरोबर १० वी च्या वर्षातल्या गमती जमती टाकयच्या म्हटल्यावर संपायला थोडा वेळ जाईल असं दिसतंय.
22 Dec 2012 - 7:32 am | इष्टुर फाकडा
स्पा, प्यारे, प्रा डॉ, किसनराव आणि सगळेच या सर्वांचे मनापासून धन्यवाद :)
22 Dec 2012 - 1:06 pm | चिर्कुट
सलग १ ते ४ भाग वाचून काढले. लय म्हंजी लयच भारी लिवलंय.. __/\__
या भावना शब्दांत मांडणं आमच्यानं कधीही शक्य झालं नसतं. २र्या आणि ३र्या भागाच्या सुरुवातीचे परिच्छेद आणि शेवट केवळ अप्रतिम..
आता नवीन गोष्ट येऊंद्या.. :)
22 Dec 2012 - 3:51 pm | चाणक्य
आवडली कथा.
22 Dec 2012 - 8:01 pm | शैलेंद्रसिंह
कथा तर उत्तमच आहे...पण लेखनशैली लाजबाब...मधे मधे तत्वज्ञान येतं तरी कथेचा ओघ थांबत नाही...हे अगदी उच्च दर्जाचं लेखन आहे.
25 Apr 2013 - 10:30 pm | मनिम्याऊ
आज परत एकदा (कितव्यांदा ते मोजायचं आता सोडुन दिलय ) हि कथा वाचली. परत एकदा तेव्हढ्याच उत्कटतेने मन गुंतले...
लाजवाब कथा
26 Apr 2013 - 6:02 pm | कोमल
काय प्रतिक्रिया देउ?? कळेना.. इतकी छान जमून आलीये कथा.. सारखी वाचावीशी वाटणारी..
हझारो ख्वाहिशे ऐसी मनको छू जाती है|
मनमे यादें और पलकोंपे आसू छोड जाती है||
पुलेशु