भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154
नर आणि मादी या हिशोबात विचार करायचं ठरवलं तर आपलं माणूस कोण असतं? ते जावूदे, पण मला एक सांगा कि, हि कथा ज्यांना आवडतिये/ आवडली आहे, त्या प्रत्येकाची एक कथा असेल... त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं. कधी हे गाणं कॉलेज मध्ये साकारलेलं तर कधी बालपणामध्ये.
प्रत्येकाची सम कुठेतरी अजूनही गुंतून पडलेली आहे...रेंगाळत...त्या समेचं टायमिंग कुणाचं जुळलेलं तर कोणाचं हुकलेलं. पण त्या हुकलेल्या समेची बोच मजेदार ! हुकण्यातच जमून गेलेली. कारण जमून गेलेल्या गाण्याचा परिणाम अनुभूत असतो, जे गाणं राहून गेलंय त्याचा अंदाज शिल्लक राहतो, विचार संपेपर्यंत. पण अंत अनुभूतीला असतो, विचारांना नाही. म्हणून ती व्यक्ती एक सावली किंवा एका प्रतीमेसारखी घुटमळत राहते...तिला आपणच कावळा शिवू देत नाही.. कारण वर्तमानाशी या सावलीचा मेळ जुळत नसतो, आपण तो जुळवून देत नाही. कारण ती एक गोड जखम असते, खपली काढावीशी वाटणारी. शिवाय आठ आठ वर्ष होवून सुद्धा शाहरुख आणि काजोल एकत्र येवू शकतात तेही बायकोला मारून ! ते आपल्याला जमणे नाही ;) आणि मला वाटतं समेवर न जाण्यातच या तानेची इतिकर्तव्यता असते, असावी. त्यातच तिची मजा आहे.
कदाचित म्हणूनच मला सुमी अजूनही आवडते. कारण मला कल्पनाच करता येत नाही कि आम्ही एकत्र असतो तर नक्की कसे असतो? ती माझं वेड होती कि आकर्षण कि प्रेम हि चिकित्सा उरलेली आहे, जी मी करण्याच्या भानगडीत पडणार नाही कारण चिकित्सेमध्ये दुखः आहे. सुमीला आयुष्यातली कधीतरी एक संध्याकाळ देणं मला कायमच जमणार होतं.
अर्थात गेले तीन परिच्छेद हि पश्चातबुद्धी आहे, त्यावेळेस घंटा मला हे सुचलं नसेल. कारण हॉटेलात मी जे काही बोललो होतो ते आठवून माझ्या हळूच कपाळात जात होत्या हे तितकंच खरं आहे. तिला इनसेक्युअर करायचीच इच्छा मी मनात बाळगून होतो. पण इप्सित परिणाम होईल का नाही हा विचार करून डोकं भणाणून जात होतं. तो तसा झाला नाहीच कारण सुमी वॉज अन अडल्ट. ती मला अंतर्बाह्य वाचू शकत होती. आय कन्फेस मी बालिशपणे वागलो. पण हरलेल्या युद्धाची कारणे पानभर असतात या न्यायाने ती पानं भरण्यात अर्थ आता नाहीये. पण आशा मरत नाही साली.
तरीही सुमी हि कायमच 'मोठी'...समजूतदार असते हे मला जाणवलं आणि मी तो विचार सोडून द्यायचं ठरवलं. वाहवत जाण्यात फायदा हा असतो कि तुम्हाला प्रवाहाची फिकीर नसते. पण जेव्हा तुम्ही स्वतःला एका प्रवाहाशी बांधून घेता तेव्हा तुम्हाला त्याच धारेत राहण्यासाठी पोहावं लागतं. आणि मी आता पोहायचं ठरवलं. खरं सांगायचा तर 'मी' काहीच कधीच ठरवलं नाही. मी गोष्टी गृहीत धरत गेलो. सुमी बरोबर एकत्र येणं म्हणजे काय? मी समजा तिला प्रश्न टाकला असता तर तो नक्की काय असता? आणि त्याला जर ती 'हो' म्हणाली असती तर पुढे? काय करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी स्वतःला तेव्हा विचारलीच न्हवती. गरजही वाटत न्हवती. प्रेमही 'प्लान' करावं लागतं हे मी नंतर शिकलो :)
आणि आरोही होतीच तशी...तिला बांधून घ्यावीशी वाटणारी. मला खूप सोपं गेलं सुमीला बाजूला करणं आरोहीमुळे. एकदा आरोहीला घरी ओळख करून द्यायला आणलं होतं, तिला पार्किंग मध्ये बसवून घरात गेलो वर्दी द्यायला. घरातले सगळे पार्किंग कडे डोळे लावून आरोहीला बघत बसले तर हे ध्यान एका मोटार सायकल च्या आरशात बघून कोवळं हसत बसलेलं ह्यांना दिसलं. झालं, घरातले सगळे आरोहीवर इतके खुश कि विचारच सोडा ! अरुचा करिश्माच भयानक आहे...एका भेटीतच समोरच्याला अजाणतेपणाने खिशात टाकते येडी.
दिवस सरकत गेले आणि माझा आणि अरुचा साखरपुडा होवून गेला. सुमी उत्तर मेंदूत हायबरनेट मोड वर पडून होती.
आणि एक दिवस,सुमीचा मेसेज आला, " प्लीज भेटायला ये. रमणा गणपतीपाशी, उद्या सहा वाजता. वाट पहातीये."
गोळ्या कपाटात ! का? आता का? सुमी स्वतःहून असं काही करणं म्हणजे मला नवीन होतं. मला अर्थ लावता येईना. मी भेटायला जायचं ठरवलं. पण या वेळेस का कोण जाणे, मी बराच शांत होतो. कोणतेही अंदाज न लावता आणि नेहमीप्रमाणे अति विचार न करता मी तयार झालो आणि पर्वतीच्या पुलापासून लक्ष्मीनगरला खाली सोडून गाडी रमणा गणपतीच्या देवळापाशी काढली.
सुमी खरंच तिथे उभी होती. ठरलेल्या वेळेच्या दहा मिनिटे आधी. तोच नाही पण तसाच गुलाबी पंजाबी ड्रेस. त्यावर छोटी पांढरी फुलं. मी गाडी वळवून लावेपर्यंत सुमी माझ्याकडेच बघत असल्याची मला जाणीव झाली. काहीतरी रिपीट होत होतं. मी ते मान्य करायला तयार न्ह्वतोच. कारण इट वॉज सुमी. ती मला कायमच एक मजला वरून बघत असल्याची जाणीव मला होती. गाडी लावून मी सुमिजवळ गेलो. आणि खरं सांगतो, ती खूप बदललेली वाटली मला. तिच्या सावळेपणावर एक आत्मविश्वासाची झलक असायची नेहमी जी कोणीही एका नजरेत नोटीस करेल. पण या वेळी ती मला काळवंडलेली वाटली. डोळे नेहमीपेक्षा जरा जास्त खोल गेलेले, खाली काळे अर्धचंद्र...चेहऱ्यावर खोल विहिरीतून पोहरा ओढल्यासारख हसू...
दोन पावलं पुढे जावून तिने हात मागे उंचावला...माझ्यासाठी...तो हातात घ्यायला मी दोन सेकंद उशीरच केला...तेवढ्यात ती म्हणाली कि, "मला माहितीये हि दुसरीच वेळ आहे." "सिंहगड उतरताना तू एकदा हात दिला होतास त्यानंतर आजच..." मी ठार ! तिला लक्षात आहे ! सुमे काय झालंय? ....ती शांतच.
स्पर्श...ती ऊब...प्रत्येकाची वेगळी असते. जी मी ठेवणीतली म्हणून कुलूप बंद करून ठेवून दिली होती तीच जाणीव मी जगत होतो. तिचा राग येत होता...कि आज का? आम्ही जवळची घरं पास करून तळजाईच्या रस्त्याला लागलो...
क्रमशः :)
प्रतिक्रिया
24 Nov 2012 - 8:18 am | किसन शिंदे
हा भाग थोडा उशीरा आल्यामुळे लिंक तुटली होती पण जसजसं वाचत गेलो तसतसं पुन्हा लिंक लागत गेली.
हे वाचलं अनं तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला...व्वा!!!
24 Nov 2012 - 12:48 pm | चिगो
दमदार लिवताय राव.. अगदी सुरवातीचे 'वैचारीक' परिच्छेदपण आवडले. येऊ द्यात..
24 Nov 2012 - 2:26 pm | लॉरी टांगटूंगकर
मस्त चालू आहे; पण थोडे मोठे भाग टाका भौ. सुरु केला आणि लगेच संपलं असे वाटलं,स्टार्टर्स वरच जेवण उरकल्या प्रमाणे
24 Nov 2012 - 2:38 pm | मनिम्याऊ
का कोण जाणे पण मला हे लेखन खुप खुप आवडतय... खरच सार्थ शिर्षक...
हजारो ख्वाहिशे ऐसी....
24 Nov 2012 - 2:52 pm | ५० फक्त
मस्त लिहिलंय, थोडे मोठे भाग टाका. आणि अजुन एक विनंती, तुमच्या लेखनात भावना पोहोचवायची ताकद आहे, त्या स्मायल्या चांगल्या रांगोळीवरचे पाण्याचे शिंतोडे वाटतात, शक्य असेल तर ते टाळा.
24 Nov 2012 - 3:09 pm | मनिम्याऊ
चेपु साठी काही ओळी उचलतेय.... परवानगी आहे न?
24 Nov 2012 - 3:24 pm | बॅटमॅन
आयला भारी!!!
24 Nov 2012 - 4:10 pm | पैसा
बाकी ५० फक्त रावांबरोबर बाडिस. स्मायल्या टाकू नका. लेख असेल तर ठीक आहे, पण ही कथा आहे आमच्यासाठी.
24 Nov 2012 - 5:30 pm | गवि
एक्सलंट..... !!!!!!
24 Nov 2012 - 5:35 pm | स्पंदना
गळ्यात मश्याचा काटा अडकावा तशी ही सुमी दिसते. गिळतापण येत नाही अन काढतापण येत नाही. सोसा राव सोसा.
24 Nov 2012 - 6:19 pm | बहुगुणी
कथेच्या ओघात चपखल बसले असतील तरीही नजरेतून न निसटलेले बरेच quotable quotes आहेतः
त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं.
समेवर न जाण्यातच या तानेची इतिकर्तव्यता असते, असावी. त्यातच तिची मजा आहे.
हरलेल्या युद्धाची कारणे पानभर असतात
वाहवत जाण्यात फायदा हा असतो कि तुम्हाला प्रवाहाची फिकीर नसते. पण जेव्हा तुम्ही स्वतःला एका प्रवाहाशी बांधून घेता तेव्हा तुम्हाला त्याच धारेत राहण्यासाठी पोहावं लागतं.
अपर्णाताईंचं कथेचं विश्लेषणही पटलं!
गळ्यात मश्याचा काटा अडकावा तशी ही सुमी दिसते. गिळतापण येत नाही अन काढतापण येत नाही. सोसा राव सोसा.
:-)आणि 'क्रमशः'चं टायमिंगही खास.
तुमच्या स्पीडने/ सोयीप्रमाणे येऊ द्यात पुढचं लिखाण, पण थोडा मोठा भाग झाला तर आवडेल.
3 Dec 2012 - 10:17 pm | अन्या दातार
तंतोतंत :)
24 Nov 2012 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच. वाचतोय.
-दिलीप बिरुटे
24 Nov 2012 - 9:35 pm | साबु
वाचतोय....
24 Nov 2012 - 9:37 pm | अमृत
वरिल सर्व प्रतिक्रीयांशी सहमत...
25 Nov 2012 - 11:40 pm | इष्टुर फाकडा
हा भाग थोडा छोटा झालाय. पुढचा भाग शेवटचा करायचा म्हणतोय. त्यामुळे हा भाग इथेच संपवणं गरजेचं होतं. स्मायल्यान्बद्दल सूचना नोटेड.
26 Nov 2012 - 6:57 pm | आदिजोशी
संपवू नको रे लेका इतक्यात. चांगली आहे कथा. मस्त वाटतेय. थोड लिही अजून.
27 Nov 2012 - 6:03 am | इष्टुर फाकडा
जी कल्पना डोक्यात आहे, तिच्याप्रमाणे आणि तेवढंच लिहितो. लिहायचं म्हणून वाढवत नको बसायला.
27 Nov 2012 - 10:36 am | टुकुल
मस्त लिहित आहात आणी तुमच्या कल्पनेप्रमाणेच योग्य वेळी शेवट करा, उगाच टिव्ही सिरियल सारख ताणायला नको.
--टुकुल
27 Nov 2012 - 11:32 am | आदिजोशी
मग नवीन सिरियल सुरू करा :)
29 Nov 2012 - 3:20 pm | सुजित पवार
:)
3 Dec 2012 - 3:25 pm | रुमानी
छान लिहिताय.