भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
मागे बघताना, दोन पेग झालेले असताना किंवा कातरवेळेला कधी एकटा असताना कधी कधी असा विचार येतो कि, एकाच व्यक्तीवर आपण इतके का लटकतो? वर्षांमागून वर्षे जातात, बोलणं होत नाही, एकमेकांचा संपर्क राहत नाही पण साला पीळ राहतो. आणि तो सामान्यतः त्रासदायक नसतो. आयुष्य सरकत राहतं...पण भेंचोत किडा आपल्याला असतो, उकरून काढायचा! आणि हा किडा मग तुम्हाला भरलेल्या पार्टीत अंतर्मुख करून वेगळा पाडतो, दोन पेग झाले कि लोकांना फक्त तुमची पाठ बघायला मिळते खिडकीपाशी. खिडकीपाशी तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत उभे असता, त्या व्यक्तीशी बांधलेल्या जाणीवा, स्पर्श आठवायचा प्रयत्न करत उभे असता आणि सर्व काही करून फक्त एक धूसर बोच जाणवत असते...जी हवीशीही वाटते आणि नकोशीही. जरा जास्त सेंटी झालं न हे ? पण काय सांगू...आज अवस्था त्या वेड्या टारझन सारखी सारखी झालीये...जुनं बुमरेंग तो फेकून द्यायचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक वेळेस ते पुन्हा पुन्हा त्याच्याचकडे परतून येतेय ...
असो, तर सांगत काय होतो कि सुमीला सांगून स्थळं यायला लागली होती. आणि मी रुसलो...म्हणजे रुसलो, आता माझ्या वागण्याला वर्णन करणारा समर्पक शब्दच सापडत नाहीये पण जे झालं ते असंच होतं कि जिच्यावर माझा घंटा अधिकार न्हवता तिच्यावर मी रुसलो ! आणि मी कोशात गेलो.
अब तक दिल-ए-ख़ुश’फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ ।
हे असलं काहीतरी खूप पटायला लागलं. तिच्याबद्दलची इतकी महत्वाची गोष्ट मला तीसर्याकडून कळत होती. आणि मी भयानक अस्वस्थ होतो. यातच मूड आय च्या स्पर्धा बोर्डावर लागल्या आणि मी ठरवलं कि मी किशोरचं ओ साथी रे म्हणणार. निदान आता मला सुमीच Frustration काढायला व्यासपीठ होतं. आता त्या वेडेपणावर हसू येतं. पण एनीवेज, आमच्या रिहर्सल्स सुरु झाल्या. त्याचवेळेस फिरोदियासाठी नवीन मुलामुलींचं सिलेक्शन सुरु होतं. त्या सगळ्या 'रुकीज' मध्ये मला 'ती' भेटली.
आरोही...कलामंडळात भेटलेली एक बावळट परी ! जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हिने एक जबर्या लाल रंगाची साडी घोट्याच्या वर नेसली होती. मस्तानी छाप गोरा रंग, गौरीचे मुखवटे (देशस्थांकडे) असतात तसला रेखीव चेहरा त्यावर अश्राप, भोळे भाव. जगावर एक गुलाबी विश्वास कि ज्या विश्वासाचा फायदा घेण्याकडेच अख्ख्या मंडळाचा कल. अशी मुलगी कि जिने स्वतःला आपणहून जरी तुम्हाला अर्पण केलं तरी तुम्ही फारतर फार तिच्या कपाळाचा मुका घ्याल. कारण त्या प्राजक्ताला कोमेजावून टाकण्याचं भय त्यापुढे तुम्हाला सरकूच देणार नाही. जेमतेम १८ चं वय, जसा ओल्या मातीचा गोळा. तिने मला खेचून घेतलं. गम्मत म्हणजे तिलाही मी आवडलो होतो आणि मला सुमी इतके प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करावे लागत न्हवते. पहिल्यांदा आयुष्यात मी वन वे वर न्हवतो. सादेला इतक्या लवकर आणि सोपेपणाने प्रतिसाद मिळण्याची मला सवयच न्हवती आणि म्हणूनच मला आरोही आवडली.
तिला माझी सिगारेट सोडून जवळजवळ प्रत्येक गोष्ट आवडत होती. माझी ढोलकी, संवादफेक, मूड इंडिगो मधलं फालतू गाणं यावर तिच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव मला बेकार गार करत होते. झेड ब्रिज वरून फिरताना आपोआप आमचे हात हातात जावू लागले आणि त्यानंतर एकमेकांकडे बघून दिलेल्या स्मिताने त्या गाठीवर शिक्कामोर्तब केलं कि येस वायझेड येस धिस इज इट ! विश्वास अजूनही बसत न्हवता कि आरोही, प्रत्यक्षात आरोही ! सुमीपेक्षा दिसायला किलोभर सरस आणि इतकी प्युअर, निरागस मुलगी मी स्कोर करू शकतो ???
असेच खूप दिवस खूप गुलाबी रंगात गेले. आरोही मझ्यात खूप गुंतत चाललेली होती आणि मलाही ती जाणीव सुखावत होती. मी आता आरोहीची 'सुमी' झालेलो होतो. हेच! हेच साला अजूनही सुमी डोक्यात होतीच कारण तुलना सुमीशीच होत होती. माझं अजूनही काही 'सामान' सुमीकडेच 'पडलेलं' होतं. मला सुख बोचत होतं.
अशातच कधी आठवत नाही पण कधीतरी सुमीचा निरोप अमित बरोबर आला. सुमीने मला भेटायला बोलावलं होतं ! कृष्णा हॉटेल मध्ये, शुक्रवारी सात वाजता. मला निरोप मिळाला तो बुधवार होता आणि माझी झोप पुढच्या ४८ तासांसाठी ठोकली गेली होती. आरोहीला मी पहिल्यांदा खोटं बोललो.
पण मला ते सगळं दुय्यम होतं. सुमीला मी भेटणारच होतो आणि पहिल्यांदाच आमच्या भेटीमध्ये मी कमांडिंग पोजिशनमधे असणार होतो कारण आता माझ्याबरोबर आरोही होती. शिवाय सुमीबद्दल मला राग होताच. आमच्यामध्ये एक अलिखित करार होता. जी गोष्ट बोलली गेली न्हवती ती दोन्ही बाजूंना माहित होती. आमचे व्यवहार त्या गोष्टीनुसार होते. आणि हे सगळं तिने मला न सांगता मोडून टाकलं होतं. ह्या सगळ्याचे हिशोब मी तिच्याकडून घेणार होतो, आरोहीच्या असण्याचा आधार घेवून !
मी सुमीला इतक्या दिवसांनतर भेटणार होतो. मरूदे तिच्यायला काय सांगू...दोन रात्री पुन्हा मी मनाने आमच्या सोसायटीमध्ये घालवल्या...नको असताना ! शुक्रवारी नवा शर्ट घालून खिशात शंभर रुपये सरकवले आणि सीडी १०० बाहेर काढली...कृष्णा च्या रस्त्याला. साडेसहालाच तिथे पोहोचलो आणि तिच्या येण्याच्या संभाव्य रस्त्याकडे डोळे लावून बसलो. कानाच्या पाळ्या गरम आणि गुडघ्यांची निरुपयोगी अस्वस्थ पर्पेचुअल हालचाल असा अर्धा तास गेला न गेला तेवढ्यात... .
शेवटी ती आलीच...आणि माझ्या मेंदूत 'पेहला नशा', 'तू चीझ बडी है', 'ती येते आणिक जाते' आणि 'बाहो में चले आओ' यांची जबरदस्त सरमिसळ सुरु झाली. तिचं स्कुटी वळवताना हात दाखवणं, मला ओळखीचं स्मित देणं हे सगळं मला सिनेमातल्या flash back सारखं कृष्ण धवल मध्ये आत्ता या क्षणी समोर दिसतंय ! आमची नेहमीप्रमाणे यंदाही टोटल तंतरलेली होती. चेहऱ्यावरच्या भावांची विलक्षण जाणीव सतत होवून बावळट हास्य नकळत बाहेर पडत होतं. या सगळ्याची मला सवय होती, पण पूर्वी...आरोही माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी! मला वाटत होतं कि हे गेलंय, संपलंय आणि आता मी पूर्ण आत्मविश्वासाने तयार आहे सुमीला भेटायला. तिला नाक वर करून सांगायला कि मला माफ कर पण 'I have moved on' तू तुझा चान्स घालवलेला आहेस आणि आता आरोही माझी जीएफ आहे and I have already committed!
पण हे सगळं तिने धुळीला मिळवलं होतं तेही एका कटाक्षाने, स्कुटी पार्क करायच्या आधी !! तिने मला पुन्हा सामना सुरु व्हायच्या आधीच जिंकलेलं होतं. हॉटेलमध्ये पाय ठेवताना ते टेबल पर्यंत येताना मी आरोही, आमची प्रॉमिसेस, भविष्यातले सगळे प्लान्स यावर पाणी सोडलेलं होतं ! आणि आता पुन्हा टेबल वर बसल्यावर छातीतला ऐवज पोटात येणे वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण करून मी जागेवर येण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं माझ्यासाठी लांच्छनास्पद होतं. कारण एकाच वेळी सुमीच्या गुदगुल्या आणि आरोहीचा विचार मला बेकार छळत होते. शेवटी मी पूर्ण शरणागती पत्करायची ठरवली आणि वहावत जाणंच मला बरं वाटायला लागलं.
सुमी: कसा आहेस?
मी: तुला कसा वाटतोय?
सुमी: गाल वर आलेत :) काहीतरी मानवलेलं दिसतंय :)
मी: ........सुमे ....मला तुला काही....(भयानक पॉझ)
सुमी: हम्म आता बोल हा प्लीज
मी: ......तू काय घेणार आज? नेहमीच्या हाक्का नुडल्स का अजून काही?
सुमी: तेच नेहमीचं :) पण तू काहीतरी...
मी: हो...सुमे म्हणजे मला सांगायचं होतं कि मला तुझ्याबद्दल...
सुमी: हो...म्हणजे मला कल्पना आहे. म्हणजे होती कि...आधीपासूनच....पण, पण...
तिच्या त्या 'पण' मध्ये मी खूप गोष्टी तिने न बोलता सामील करून टाकल्या...माझं वय, जात, मी अजूनही शिकत असणे आणि या सगळ्या बेसिस वर तिला माझ्या भावनांचं उत्तर देणं अवघड असणे इत्यादी इत्यादी. बट आय हॅड इनफ. मला तिने तिच्या भावना मान्य करून हव्या होत्या आणि त्या मी मान्य करणं हे मला आता अमान्य होतं. आणि म्हणूनच….
(खरंतर, बर्याच गोष्टी मला आत्ता कळतात...तिच्या फक्त एका 'पण' मध्ये मी शोधलेले अर्थ, आरोहीची ढाल करून मी माझीच काढलेली समजूत...आरोही ही मी तिच्या छायेविरुद्ध उभी करत असलेली ढाल आहे या सगळ्या गोष्टी आताशा समजतात…)
…आणि म्हणूनच तेव्हा मी फक्त बालिश अहंकाराने पेटून गेल्या वर्षांचा सर्व हिशोब आरोहीसकट सुमीसमोर मांडला. (का भाड्या का??? हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे)
तेवढ्यात साला वेटरने नुडल्स आणून ठेवल्या. यानंतर सुमीच्या चेहऱ्यावरचे भराभर बदलेलेले भाव अजूनही क्रमाने आठवतात.....जावूदे काय सांगू... ओळींमध्ये काहीच बसत नाहीये…
टकलीने तेव्हाही पुढाकार घेतला नाही...आणि आता बसलीये अशी, माझ्यासमोर जन्माचं कोडं घालून...
क्रमशः :) .
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 4:42 am | स्पंदना
भाऽऽऽरी!
12 Nov 2012 - 4:50 am | श्रीरंग_जोशी
इस कहानी में जान हैं!!
12 Nov 2012 - 2:37 pm | इष्टुर फाकडा
धन्यवाद :)
12 Nov 2012 - 7:34 am | ५० फक्त
मस्त लिहिलंय,डोंगरातल्या पायवाटांसारखं, सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या, जाणार एकाच ठिकाणी पण तिथं जाईपर्यंत कशाचाच बांध नसलेल्या.
12 Nov 2012 - 2:38 pm | इष्टुर फाकडा
जसं सुचेल तसं लिहितोय, घ्या सांभाळून.
15 Nov 2012 - 2:20 pm | श्रावण मोडक
सुचेल तसंच लिहित रहा. उगाच त्याला आकार देण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यानं सारंच बिघडेल. :-)
12 Nov 2012 - 7:48 am | संजय क्षीरसागर
अश्या लेखनाला अनंत शुभेच्छा!
दादू, बहोत उंची बात सुना रहे हो, सम्हलिओ!
12 Nov 2012 - 9:20 am | श्री गावसेना प्रमुख
+१
12 Nov 2012 - 11:40 am | बॅटमॅन
तंतोतंत!!!!!
12 Nov 2012 - 2:40 pm | इष्टुर फाकडा
'अश्या' लेखनाला ??? उपरोधाचा वास येतोय ;)
सांभाळून तुम्ही घ्यायचं. आमचं काय जातंय उंची बाते लिहायला :)
12 Nov 2012 - 3:11 pm | श्री गावसेना प्रमुख
खुपच तीक्ष्ण आहेत हो तुमचे ते नासीका.
12 Nov 2012 - 3:20 pm | संजय क्षीरसागर
बिनधास्त आणि लवकर लिहा
12 Nov 2012 - 3:58 pm | श्री गावसेना प्रमुख
बिनधास्त आणि लवकर लिहा
हेच म्हणतो
कवतीकाचे बोल आहेत हो हे
12 Nov 2012 - 11:31 am | ह भ प
जबरा लिखाण..
12 Nov 2012 - 11:43 am | इनिगोय
खास जमलाय हा भाग.. खासच! पहिलाच परिच्छेद एक्दम शंभर नंबरी.
गुरु करावा तर असा! तिथे दक्षणा पोचती करा हो.. :)
आणि ते क्रमशः टाकलं आहेत, पूर्ण न करता सोडू नका बरं. इथे काही काही मंडळींनी फार छळलं आहे तो शब्द वापरून!
12 Nov 2012 - 2:43 pm | इष्टुर फाकडा
क्रमशः नक्कीच पूर्ण करेन.
12 Nov 2012 - 3:22 pm | निश
इष्टुर फाकडा साहेब, कथा मस्त जमली आहे.
12 Nov 2012 - 4:41 pm | चिगो
रंग जमतोय कथेचा.. येवू द्यात. पु.भा. शुभेच्छा..
12 Nov 2012 - 6:03 pm | जेनी...
एकदम मस्त ... हकुना मटाटा !
13 Nov 2012 - 1:09 am | अर्धवटराव
नमनाला गवींच्या नावे कान का टोचलेत ते...
अगदी गंडाबंध शागिर्दी घेऊन अगदी शिस्तीत तालीम चाललीय. हजार ख्वाईशांपैकी एक आमची ख्वाईश म्हणा हवं तर...गुरुदेवांचं नाव नक्की रोशन करणार तुम्ही.
अर्धवटराव
14 Nov 2012 - 3:04 am | इष्टुर फाकडा
धन्यवाद :)
13 Nov 2012 - 1:40 am | किसन शिंदे
जबरदस्त!!
काय भारी लिहिता राव तुम्ही. दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले. लिखान प्रचंड आवडलं.
14 Nov 2012 - 3:05 am | इष्टुर फाकडा
तुम्हाला आवडलं आम्हाला पावलं :)
13 Nov 2012 - 10:50 pm | पैसा
लिखाण खूप आवडलं.
14 Nov 2012 - 3:16 am | बहुगुणी
लिखाणात कमालीची सफाई आहे. (आता गविंच्या नावाने कानाची पाळी शिवलीय म्हंटल्यावर त्यात आश्चर्य नकोच...)
चालू ठेवा.
15 Nov 2012 - 12:51 pm | अमृत
वाचायला मजा येते आहे. पहिला उतारा तर खरचं अचूक वातावरण निर्मीती करणारा आहे अगदी शब्दा शब्दाशी सहमत...
15 Nov 2012 - 7:24 pm | टुकुल
प्रतिसाद द्यायचा कंटाळा येतो कधी कधी पण तुमच्या लेखणाने लॉगीन करुन प्रतिसाद द्यायला भाग पाडले. बहोत खुब
--टुकुल
16 Nov 2012 - 1:16 pm | बॅटमॅन
ओ काय ओ इष्टुर फाकडे, हजार इच्छांचा तिस्रा भाग कंदी?
16 Nov 2012 - 2:51 pm | इष्टुर फाकडा
वीकांत ते वीकांत लिहित आहे रे. या विकांताला टाकेन पुढचा :)
16 Nov 2012 - 3:02 pm | बॅटमॅन
नरवाघूळ- काय नाव आहे तेचायला नराधम किंवा नरराक्षसागत वाटतंय एकदम ;)
बाकी मग हकुना मटाटा!
16 Nov 2012 - 1:31 pm | चित्रगुप्त
वाचून 'पुढे काय' ही उत्कंठा वाढीला लागली आहे... लवकर येउ द्या पुढील भाग.
शुभेच्छा.