काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
22 Jun 2008 - 7:27 pm

काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध.
लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज.
अनुवाद : उषा तांबे.
प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे.
मूल्य : १९५ रू.

मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी... या पुस्तकातून ९/११ नंतर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केल्यानंतर, तालिबानी राजवट उलथून टाकल्या नंतरही तिथे एक स्त्री होऊन जगणं म्हणजे शाप असण्यासारखं आहे हे पदोपदी जाणवतं. पुस्तकाचा काळ २००२ नंतरचा आहे. म्हणजे नुकत्यात घडलेल्या घटनांची लेखिका साक्षिदार आहे.
थोडंसं लेखिकेबद्दल .. डेबोरा उर्फ डेबी, अमेरिकेमध्ये मिशिगन या राज्यात राहणारी. आई ब्युटीशियन म्हणून घरच्याच पार्लरमध्ये आईला मदत्र करता करता स्वतः उत्तम हेअर ड्रेसर बनली. पहिल्या लग्नाच्या अपयशानंतर, दुसर्‍या पतीशी भांडत रखड्त चाललेला संसार करत पार्लर चालवणारी..९/११ च्या दुर्घटने पूर्वी 'केअर फॉर ऑल फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने आपत्कालीन आणि दुर्घटनाकालीन मदतीचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे ९/११ नंतर या संस्थेनं अफगाणिस्तानात मदत कार्यासाठी पाठवलेल्या पहिल्या टिममध्ये, दुसर्‍या पतीकडून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने, लेखिकेने स्वतःची वर्णी लावून घेतली. ग्रुपलिडरने ओळख करून देताना हेअर ड्रेसर अशी ओळख करून देताना तिथल्या परदेशी लोकांच्या चेहर्‍यावर अतिशय आनंद पसरला असे लेखिका लिहिते. कारण तिथे मदत कार्यासाठी आल्यापासून त्यांना चांगले पार्लर मिळाले नव्हते. हळू हळू डेबी कडे भरपूर स्त्रीया येऊ लागल्या त्यात अफगाणी स्त्रियांची संख्याही खूप होती. तिथे येणार्‍या स्त्रियांकडून त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल, त्यांच्या परावलंबनाबद्दल समजू लागले. आणि त्यातून 'आपण ब्युटीस्कूल चालू करून इथल्या स्त्रीयांना स्वावलंबी बनवायचे या उद्देशाने लेखिकेने स्कूल चालू केले. त्यासाठी अमेरिकेतल्या कोणकोणत्या कॉस्मेटीक्स कंपन्यांनी मदत केली ... त्यांनी पाठवलेले कॉस्मेटीक्स चे बॉक्सेस अफगाण पर्यंत नेण्यासाठी काय दिव्य करावी लागली, त्यातच दुसर्‍या नवर्‍याने दिलेला त्रास.. त्यानंतर झालेला घटस्फोट..ह्यासगळ्याबरोबरच मुलांना आपल्या आईकडे सोडून येताना काळजात झालेली कालवाकालव.. याचं वर्णन या पुस्तकांत पहायला मिळतं.
काबूल मध्ये डेबीला भेटलेली पहिली मैत्रीण म्हणजे रोशना.. १९-२० वर्षीय रोशना आपल्या आईच्या वयाच्या डेबीशी अतिशय मित्रत्वाने वागते. पुस्तकाची सुरूवातच रोशनाच्या लग्नाच्या प्रसंगाने होते. तिच्या लग्नातल्या नृत्याचं वर्णन करताना लेखिका म्हणते, "ज्या तर्‍हेचा नाच इथे चाललेला असतो त्याची मी स्वप्नात्सुद्धा कल्पना केली नसती. या बायका एरवी फारशा घराबाहेर पडत नाहीत. पडल्याच तर नखशिखांत झाकलेल्या असतात. इथं मात्र त्या जो नाच करताहेत त्याला केवळ अश्लिल असंच म्हणावं लागेल - काबुली पद्धतीचा अश्लिल नाच. त्या सगळ्या अंगाला झतके देतात, पाठ वाकवतात...पाठीमागे , बाजूला, डोक्यावर हात असे हलवतात की, जणू काही प्रियकराला कुरवाळत आहेत....पुरूषांच्या हॉलमध्येही अशाच प्रकारचा नाच चालू असतो... मी तो नाच बघू शकत नाही."
त्यानंतर ब्यूटीस्कूलच्या माध्यमातू डेबीशी संपर्कात आलेल्या, बहार, बसीरा , टोपेकाई, नाहीदा, शाझ.. अशा स्त्रीयांची कहाणी आपल्याला समजू लागते आणि त्यावर कळस होतो हमा या १४ वर्षीय मुलीचं डेबीच्या देखत एका वेश्येमध्ये झालेलं रूपांतर वाचताना. डेबीच्या अटोकाट प्रयत्नांना आलेलं अपयश वाचताना.. मन खिन्न होतं. डेबीच्या अफगाणी नवर्‍याची तिला या स्कूलच्या उभारणीमध्ये मिळणारी साथ सुखाऊन जाते. तो सौदीमध्ये राहिलेला बराच सुधारीत विचारांचा अफगाणी आहे. .. त्याच्या मदतीमुळेच ती स्कूलचे काम करू शकली असे डेबी नमूद करते. स्कूलच्या सत्रांसाठी पैसा उभा करताना कोणकोणती दिव्यं पार करावि लागली .. तिथल्या रस्त्यांवरून वावरताना लोकांचे आलेले अनुभव.. तिथले दुकानदार, तिथला नोकरवर्ग, सरकारी कामकाज, पोलिस या सगळ्यांचे अनुभव वाचायला मिळतात. सगळ्यात शेवटी तिचा अफगाणी सासरा सौदीहून् तिच्याकडे येतो आणि तिच्याही नकळत तिला आपलंस करतो .. डेबीने याचं वर्णन खूप छान केलं आहे. सध्या डेबी तिच्या या अफगाणी नवर्‍यासोबत काबूल मध्ये राहते आहे आणि काबूल ब्यूटीस्कूल, ओऍसिस सलून.. यांचे काम जोरात आणि झोक्कात करते आहे.
स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल...

-प्राजु.

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचय आवडला.
अजुन येऊ द्या पुस्तक परिक्षणे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 1:31 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2008 - 2:01 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत. हेच म्हणतो. प्रतिभा रानडे यांचे 'अफगाण डायरी' हे पण एक अफलातून पुस्तक आहे.

बिपिन.

चित्रा's picture

22 Jun 2008 - 9:35 pm | चित्रा

पुस्तक वाचायला उत्सुक आहे.

अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते.

धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 6:18 am | विसोबा खेचर

वा प्राजू,

थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस...

स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल...

अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक!

तात्या.

सहज's picture

23 Jun 2008 - 7:57 am | सहज

अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते.

कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक.

शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे.

अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.

ईश्वरी's picture

23 Jun 2008 - 1:23 pm | ईश्वरी

वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
ईश्वरी

आनंदयात्री's picture

23 Jun 2008 - 1:34 pm | आनंदयात्री

छान परिक्षण प्राजु !
नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !

वरदा's picture

23 Jun 2008 - 10:52 pm | वरदा

पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस...
आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....

संदीप चित्रे's picture

23 Jun 2008 - 11:07 pm | संदीप चित्रे

पुस्तक मिळवायचा प्रयत्न करतो..