गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
23 Mar 2012 - 7:08 pm

नमस्कार वाचकांनो,

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न

शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल.

१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये
१ ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य म्हणजे ३६००० कल्पे
१ कल्प अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १४ मनु
१ मनु म्हणजे ७१ महायुगे
१ महायुग म्हणजे ४ युगे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्यवर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे (संवत्सरे)
(ही माहिती पुराणांतून दिलेली आहे)

हे गणित लक्षात आले म्हणजे एका संवत्सर चक्रात येणार्‍या ६० वर्षांच्या ६० नावे का ठरवली गेलीत याचे उत्तर मिळते. नेमकी हीच ६० नावे का? याचे उत्तर मात्र माझ्याजवळ सध्या नाहिये. त्यावर कधीतरी सवडीने अभ्यास करुन लिहिन.

शके १९३४ चे संवत्सरनाम नंदन आहे. जे मी पुढील यादीत ठळक केले आहेच. एकदा ही ६० नावे माहिती झाली की पुढील वर्षाचे म्हणजे शके १९३५ साठी कोणते संवत्सरनाम असेल हे तुम्ही स्वतःच ओळखू शकाल :)

६० वर्षांचे चक्र.

१. प्रभव
२. विभव
३. शुवल
४. प्रमोद
५. प्रजापति
६. अंगिरा
७. श्रीमुख
८. भाव
९. युवा
१०. धाता
११. ईश्वर
१२. बहुधान्य
१३. प्रमाथी
१४. विक्रम
१५. विश्व
१६. चित्रभानु
१७. सुभानु
१८. तारण
१९. पार्थिव
२०. व्यय
२१. सर्वजित्
२२. सर्वधारी
२३. विरोधी
२४. विकृत
२५. खर
२६. नन्दन
२७. विजय
२८. जय
२९. मन्मथ
३०. दुर्मुख
३१. हेमलम्ब
३२. विलम्ब
३३. विकारी
३४. शर्वरी
३५. प्लव
३६. शुभकृत्
३७. शोभन
३८. क्रोधी
३९. विश्वावसु
४०. पराभव
४१. प्लवंग
४२. कीलक
४३. सौम्य
४४. साधारण
४५. विरोधकृत्
४६. परिधावी
४७. प्रमादी
४८. आनन्द
४९. राक्षस
५०. नल
५१. पिंगल
५२. कालयुक्त
५३. सिद्धार्थ
५४. रौद्र
५५. दुर्मति
५६. दुन्दुभि
५७. रुधिरोद्गारी
५८. रक्ताक्ष
५९. क्रोधन
६०. क्षय

लेखात काही चूक असेल तर ती अवश्य लक्षात आणून द्यावी ही वाचकांना नम्र विनंती

धन्यवाद,
- सागर

संस्कृतीइतिहासआस्वादलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2012 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

वा...!वा...! सुंदर...! वर्षारंभ निमित्तानी फार छान माहिती... :-)

काही वर्षानी पाडवा उन्हाळ्याच्या सुरवातील न येता पावसाळयातील एखाद्या महिन्यात येईल हे कल्पना कशी वाटते सागर ?

नाही, असे होणार नाही. भारतीय सण थोडे मागे पुढे होतात पण अधिक मासाच्या अ‍ॅडजेस्टमेंटमुळे ते ऋतु सोडू शकत नाहीत.

चौकटराजा's picture

24 Mar 2012 - 9:50 am | चौकटराजा

आपला अधिक महिना जरी ३ वर्षानी येऊन सौर वर्ष व चांद्र वर्ष यातील फरकाचा मेळ घालीत असला तरी तो मेळ परिपूर्ण नाही. त्यात अवसर आहेच. हा अवसर वाढत वाढत जाऊन चांद्र महिन्याची मौसमातील जागा बदलते. यावर जास्त प्रकाश डॉ. प.वि.वर्तक यानी टाकला आहे. पुस्तकाचे
नाव आठवत नाही . बहुदा " वास्तव रामायण" असे त्याचे नाव आहे. सध्याचा ध्रूव हा आता अढळ असला तरी तो १४००० वर्षानी अढळ असणार
नाही.

गणपा's picture

23 Mar 2012 - 7:40 pm | गणपा

भारी अभ्यास दिसतोय मित्रा.
माझ्यासाठी ही माहिती नवीनच आहे. :)
जाणकार लोकं अधिक भर टालतीलच.

सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या आप्तेष्टांना हे नंदनवर्ष सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा.

पैसा's picture

23 Mar 2012 - 8:01 pm | पैसा

कालगणनेची कल्पना आली. अगदी विशेष अशी माहिती आहे!

सगळ्या मिपाकरांना "नंदन" नाम संवत्सराच्या शुभेच्छा!

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 8:01 pm | प्रचेतस

भन्नाट माहिती रे मित्रा.
पुराणांमधे ही माहिती चवथ्या , पाचव्या शतकात आलेली असावी

शक संवत् हे कुशाण वंशीय कनिष्काने सुरु केले आणि क्षत्रपांनी पुढे प्रचलित ठेवले.

सागर's picture

23 Mar 2012 - 8:11 pm | सागर

उस्फूर्त प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो :)

@ अतृप्त आत्मा - अवश्य येत राहीन

@ चौकटराजा कल्पना म्हणून चांगली आहे. पण जोपर्यंत पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची भ्रमणकक्षा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ऋतुचक्रात हे परिवर्तन अवघड आहे :)

@ गणपा भाऊ म्हटले आजच्या दिवशी गुढीपाडव्याची माहितीमेजवानी वाचकांना देऊ. तुझी कडूनिंबाची खास पाककृती कुठे दिसली नाही आज. भारतात आला आहेस वाटते :)

@पैसा - नंदन नावाचे आपल्या मिपावरचे एक पुस्तकप्रेमी सदस्यही मला परिचित आहेत ;)

@वल्ली - मित्रा आजच्या मटामधे आलेला हा लेख शक संवताची काही वेगळीच जन्मकथा सांगतो :)

सर्वांनाच शके १९३४, 'नन्दन' नाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2012 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा

@अतृप्त आत्मा - अवश्य येत राहीन >>> ह्हा ह्हा ह्हा ... अरे सागर... बाबा,,,ती माझी साइन नाहिये. ते ब्लॉगचं नाव आणी तिथे येण्याचं आमंत्रण आहे.

होय होय आले लक्षात पण उशीरा

- मित्रा आजच्या मटामधे आलेला हा लेख शक संवताची काही वेगळीच जन्मकथा सांगतो

त्यावर चर्चा करूच रे. इनफॅक्ट मागेही आपण केली होतीच.
सोनवणींचे काही शोध अजिबात पटणारे नाहीत. शिलालेख नाणी वेगळेच सांगतात आणि सोनवणी पुराणांमध्ये जास्त अडकलेत असे वाटतेय.

गौतमीपुत्राचा पराक्रम सोडला तर लेखात बरेचसे चुकीचे आहे.

वल्ली मित्रा,

वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले तरी ९० % लेख गौतमीपुत्र सातकर्णीवर आहे. त्या अंगाने त्यांनी या लेखात अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे हे तर मान्य करावेच लागेल. न पटणार्‍या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करता आली तर मजा येईल. असो.

दुसरे असे की मटा सारख्या वृत्तपत्रात असा लेख छापून आलाय म्हणजे त्याचे छापण्याअगोदर मूल्यमापन तर झालेच असेन असे वाटते. बाकी चर्चा इथे अवांतर होईल :) ती व्यनितून करु

खेडूत's picture

23 Mar 2012 - 9:36 pm | खेडूत

सनातन काळगणना
------------------
पृथ्वीवरचा काल -
परम अणु -
ज्याचे विभाजन होऊ शकत नाही .

२ परम अणु - १ अणु
३ अणु - १ त्रसरेणु (हा आपण पाहू शकतो)
३ त्रसरेणुंना सूर्यप्रकाश पार करतो तो काल - त्रुटि
३०० त्रुटि - १ बोध
३ बोध - १ लव
३ लव - १ निमेष
३ निमेष - १ क्षण
५ क्षण - १ काष्ठा
१५ काष्ठा - १ लघु
१५ लघु - १ घटी
२ घटी - १ मुहूर्त
५ ते ७ घटी - १ प्रहर
४ प्रहर - १ दिन
४ प्रहर - १ रात्र
८ प्रहर - १ अहोरात्र (अह: - दिन)
७ अहोरात्र - १ सप्ताह
१५ अहोरात्र - १ पक्ष (१ कृष्ण, १ शुक्ल)
२ पक्ष - १ मास (मास - महिना)
२ मास - १ ऋतु
३ ऋतु - १ अयन (१ उत्तरायण, १ दक्षिणायन)
-----------------------------
पितरलोकांचा काल -

पृथ्वीवरचा शुक्ल पक्ष - पितरांची रात्र
पृथ्वीवरचा कृष्ण पक्ष - पितरांचा दिवस
पृथ्वीवरचा महिना - पितरांची अहोरात्र
पृथ्वीवरचे ३० महिने म्हणजे पितरांचा एक महिना
पृथ्वीवरची ३६० वर्षे - पितरांचे एक वर्ष
--------------------------
स्वर्गातला काल -

१ उत्तरायण - देवांचा १ दिन
१ दक्षिणायन - देवांची १ रात्र
२ अयन - १ वर्ष (देवांची १ अहोरात्र)
देवांच्या ३६० अहोरात्री (माणसांची ३६० वर्षे) - १ देववर्ष (दिव्यवर्ष)
----------------------
त्रैलोक्याबाहेरचा काल -

माणसाची ३०३० वर्षे - १ सप्तर्षिसंवत्सर
माणसाची ९०९० वर्षे - १ क्रौंच संवत्सर

------------------------------------------------
४००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X ४००० वर्षे) - १ सत्ययुग (कृतयुग)
संधि - ८०० दिव्यवर्ष (एक युग संपल्यानंतर दुसरे युग येण्यापूर्वीचा काल)
(माणसांची ३६० X ८०० वर्षे)
३००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X ३००० वर्षे ) - १ त्रेतायुग
संधि - ६०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ६०० वर्षे)
२००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X २००० वर्षे) - १ द्वापरयुग
संधि - ४०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ४०० वर्षे)
१००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X १००० वर्षे) - १ कलियुग
संधि - २०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X २०० वर्षे)
४ युग - १ चौकडी (१२००० दिव्यवर्ष - ३६० X १२००० = ४३,२०,००० मानवी वर्ष)
-----------------------------------
मनु-कल्प

७१ चौकड्या - १ मन्वंतर (मन्वंतरात इंद्र, मनु व सप्तर्षी बदलतात व नवे निर्माण होतात.)
७१ X ३६० X १२००० = ३०६७२०,००० मानवी वर्षे
१४ मन्वंतरे - ब्रह्मदेवाचा १ दिवस (सृष्टीनिर्मिती) - १ कल्प
(१४ X ३०,६७,२०,००० = ४,२९,४०,८०,००० मानवी वर्षे)
१४ मन्वन्तरे - ब्रह्मदेवाची रात्र(सृष्टीसंहार)
२८ मन्वन्तरे - ब्रह्मदेवाची अहोरात्र
----------------------------------

ब्रह्मदेवाच्या ३६० दिनरात्री - १ ब्रह्मवर्ष
ब्रह्मदेवाचे आयुष्य - १०० ब्रह्मवर्ष
१०० ब्रह्मवर्षे - १४ भुवन ब्रह्मांडांचा (सप्तपाताळ, सप्तस्वर्गासहित भूलोक) नाश होतो - महाप्रलय, यावेळी ब्रह्मदेव ब्रह्मलोकातील इतर मुक्त जीवांबरोबर भगवंतामध्ये विलीन होतात.
अशी अनंत ब्रह्मांडे या विश्वात आहेत. त्यांचे स्वामी अनंत ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत.
महाविष्णूच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते.
---------------------------------------------
विष्णुचा काल -

महाविष्णूच्या एका श्वास घेण्याने ब्रह्मांडे निर्माण होतात.
महाविष्णूच्या एका श्वास सोडण्याने ब्रह्मांडे नाश पावतात.
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूचा १ दिन
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ रात्र
२०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ अहोरात्र
विष्णूच्या ३६० अहोरात्री - विष्णूचे १ वर्ष
विष्णूचे आयुर्मान - २०० विष्णूवर्षे
---------------------------------------
शिवाचा काल -

३०० विष्णूवर्षे - शिवाचा १ दिन
३०० विष्णूवर्षे - शिवाची १ रात्र
६०० विष्णूवर्षे - शिवाची १ अहोरात्र
शिवाच्या ३६० अहोरात्री - १ शिववर्ष
शिवाचे आयुर्मान - ३०० शिववर्षे

म्हणून शिवाला पुराणपुरुष म्हणतात.
त्याला साक्षात ब्रह्मा व विष्णुही जाणू शकत नाहीत.
-------------------------------------------
माणसाला मोजताही येणार नाही अशा काळाचे असे हे संसारचक्र फिरत राहाते.

संदर्भ -
- श्री श्री चैतन्य चरितावली
गीताप्रेस, गोरखपूर
पृष्ठ ५०६, ५०७, ५०८
अध्याय - श्री सनातनको शास्त्रीय शिक्षा,
लेखक - प्रभुदत्त ब्रह्मचारी

त्यांचा संदर्भ:

- सर्व व्यासरचित-संपादित पुराणे

नेत्रेश's picture

24 Mar 2012 - 12:33 am | नेत्रेश

पण या गणने नुसार राम आणी कृष्ण या अवतारामध्ये लाखों वर्षांचे अंतर दीसते, तसेच रामाचा काळ हा ३० ते ४० लाख वर्षांपुर्वीचा येतो. (बात कुछ हजम नही हुई)

खेडूत's picture

24 Mar 2012 - 4:09 am | खेडूत

''अहो दीडशे वर्ष तुमची! ब्रम्हदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान देखील सरकत नाही हजार वर्ष ओलांडल्याशिवाय!
--(अंतू बरवा)

चिगो's picture

24 Mar 2012 - 11:42 am | चिगो

किती फेकसाल, किती फेकसाल !? (खेडूत हे तुमच्यासाठी नाही, ओरीजनल फेकूसाठी आहे.. ;-))
च्यायची, घाम फुटला मला.. इथे च्यामारी तासा-तासाला बोर होतंय नी ह्यांनी हे ऽ ऽ ऽ वाढून ठेवलंय..

दादा कोंडके's picture

24 Mar 2012 - 12:43 pm | दादा कोंडके

माहिती संकलन म्हणून छान.

जेंव्हा खरोखरच अशी परिमाणं मोजता येतील किंवा गरज पडेल तेंव्हा नावं देणं कळू शकतं पण उगाच कुठ्ल्याश्या कालखंडाला काहितरी नाव आहे या शिवाय याची उपयुक्तता काय असेल त्या लोकांना सुद्धा?

हि सगळी माहिती माझ्यासाठी नवीन आहे.तरीही एक गोष्ट समजली नाही अणु आणि निमिष,क्षण चा काय संबध? ,म्हणजेच वस्तू आणि वेळेचा काय संबध?
नवीन नंदन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

खेडूत's picture

25 Mar 2012 - 3:46 am | खेडूत

मंजे महर्षी व्यासांना परम अणू आणि सूर्यप्रकाशाचा वेग, दोन्ही माहीत होते .
असे १,४५,८०० परम अणू पार करायला सूर्यप्रकाशाला लागणारा वेळ म्हणजे क्षण!

आता हे क्षण MKS परिमाणात सेकंदात बदलू ;
९०,००० क्षण= १ दिवस
३७५० क्षण =१ तास
१.०४१ क्षण= १ सेकंद ...

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2012 - 4:00 pm | राजेश घासकडवी

मंजे महर्षी व्यासांना परम अणू आणि सूर्यप्रकाशाचा वेग, दोन्ही माहीत होते .
असे १,४५,८०० परम अणू पार करायला सूर्यप्रकाशाला लागणारा वेळ म्हणजे क्षण!

म्हणजे हे परम अणू दोन किलोमीटर इतके मोठे होते तर!
जर त्यांना परम अणूंची खरी त्रिज्या माहीत असेल तर प्रकाशाचा वेग सेकंदाला १४.६ मायक्रॉन (तासाला सुमारे ५३ मिलीमीटर) इतका कमी वाटत होता!

महर्षी व्यास कुठे गंडले होते की तुम्ही टंकताना कुठे चूक केली आहे?

व्यास नाही, मीच गंडलो आहे असे वाटते. शून्ये बरीच कमी पडलीत. पण किती ते शोधायला भारतातच जावे लागेल. (मूळ ग्रंथातून )
मूळ मुद्दा होता वस्तुमान आणि काल यांचा संबंध काय, त्यावर गडबडीत लिहीले.
मग उलट calculation करताना दिवसाचे क्षण आणि सेकंद बरेच बरोबर जमतात असे दिसले! (आणि खूष झालो!) :)

सागर's picture

26 Mar 2012 - 3:32 pm | सागर

अहो नावच तुमचे खेडूत
आकडेवारीने दिले तुम्ही चाट पाडून :)

सत्य असत्य काहीही असो. पण ही सविस्तर आकडेवारी किमान पुराणकारांच्या बुद्धीमत्तेची साक्ष देतात.

खेडूतराव, तुमचा पुराणांतला व्यासंग खूप दांडगा दिसतोय.

खेडूत's picture

30 Mar 2012 - 12:21 am | खेडूत

आवड आहे पण वाचायला कमी मिळते इकडे. कधी मिळालेच तर चर्चा करायला कुणी नाही!
भारतात आल्यावर लोकांशी अनेक विषयांवर बोलायला मिळेल. (तोपर्यंत मि. पा. तर आहे! :))

विषय आणि होणारी चर्चा अनंतकाल से अनंतकाल तक होणारी असल्याने वाचनखूण साठवली आहे. :)
सागर आणि खेडूत या दोघांचेही आभार.

अर्धवटराव's picture

23 Mar 2012 - 10:28 pm | अर्धवटराव

ज्या कुठल्या कालगणानेनुसार नवीन वर्ष सुरु होतय ( इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ दॅट) , मिपा परिवाराला नववर्ष्याच्या हार्दीक शुभेच्छा !!

अवांतरः आयला, हे मन्वान्तर, ब्रह्मवर्ष वगैरे भानगड ज्या कोणि शोधुन काढली त्याच्या बुद्धीला (आणि हे सर्व काल्पनीक असेल तर त्याच्या कल्पनाशक्तीला) सलाम.

(टायटन) अर्धवटराव

नावातकायआहे's picture

23 Mar 2012 - 10:42 pm | नावातकायआहे

महाविष्णूच्या एका श्वास सोडण्याने ब्रह्मांडे नाश पावतात....

२०१२त सोडतोय? ;-)

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2012 - 11:07 pm | स्वाती दिनेश

अनादिअनंत काळाच्या गणनेच्या माहितीबद्दल सागर आणि खेडूत, दोघांनाही धन्यवाद.
स्वाती

सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
अवांतरः कलियुग संपायला अजुन किती वर्षं आहेत? कंटाळा आलाय!

तुमच्या आमच्या हयातीत काय पण कित्येक पिढ्या कलियुग संपणार नाहिये.

अजून कलियुगाची बरीच वर्षे शिल्लक आहेत :)

१२०० दिव्यवर्षे म्हणजे १ कलियुग (३६० मानव वर्षे = १ दिव्यवर्षे ) नुसार ४,३२,००० वर्षे म्हणजे १ कलियुग

महाभारतकाली कलियुग सुरु झाले असे मानतात. (तसा स्पष्ट उल्लेख महाभारतात आहे)

आणि महाभारत हे (कितीही वाद असले तरी) इसवीसनापूर्वी ५००० वर्षांपूर्वी झाले असे मानले जाते

तेव्हा तुम्हीच ठरवा कलियुगाची किती वर्षे शिल्लक आहे ती ;)

प्रचेतस's picture

26 Mar 2012 - 4:24 pm | प्रचेतस

आणि महाभारत हे (कितीही वाद असले तरी) इसवीसनापूर्वी ५००० वर्षांपूर्वी झाले असे मानले जाते

महाभारत नाही मित्रा. 'जय' नावाची व्यासांची मूळ संहिता. इस.पू. ३२०० ते ५००० असा काळ संशोधकांनी काढला आहे.
महाभारत साधारण इ.स ४/५ पर्यंत प्रक्षिप्त होत राहिले.

सागर's picture

26 Mar 2012 - 4:39 pm | सागर

'जय' नावाची व्यासांची मूळ संहिता. इस.पू. ३२०० ते ५००० असा काळ संशोधकांनी काढला आहे.
महाभारत साधारण इ.स ४/५ पर्यंत प्रक्षिप्त होत राहिले.

हाच तो वाद आहे रे मित्रा हा हा हा :)

नेमका काळ माहिती आहे काय? संहितेचा नव्हे महाभारताचा ;)

स्पंदना's picture

24 Mar 2012 - 11:55 am | स्पंदना

थोडीफार माहिती होती . परत एकदा रिव्हाएज झाल.
धन्यवाद.
अन खेडुत ना पण धन्स!

स्पंदना's picture

24 Mar 2012 - 11:56 am | स्पंदना

थोडीफार माहिती होती . परत एकदा रिव्हाएज झाल.
धन्यवाद.
अन खेडुत ना पण धन्स!

वर्षाचे नाव नंदन आहे व्हय, मला इतके दिवस ' नंदन ' हा आय डी वाटत होता .

जोयबोय's picture

24 Mar 2012 - 1:49 pm | जोयबोय

सर्व काहीखोटे आहे या काल गनना सोईसठि अहे फक्त

चौकटराजा's picture

24 Mar 2012 - 2:10 pm | चौकटराजा

मूळात कालगणना ही माण्साने निर्मिलेली आहे. त्यास मानवी जीवनापलिकडील जगात काही अर्थ नाही. माणूस कालगणना करतो म्हणून विश्व
चालत नाही. त्यातल्या त्यात आकाशातील ग्रहांची बदलती स्थिति ही कालगणनेचे अचूक माप आहे. त्यालाच आपण पंचाग म्हणतो. पंचाग ही काहीभारतीय संस्कृतिची मोनापली नाही.जगात सर्वत्र पंचांग ही कल्पना आहे. व तिचा भविष्य वर्तविण्याशी काही संबंध नाही.

रणजित चितळे's picture

24 Mar 2012 - 7:08 pm | रणजित चितळे

सागर साहेब आपला लेख आवडला. खेडूतांनी सुद्धा संदरपणे काल गणना दिलेली आहे आवडला.

http://rashtravrat.blogspot.in/2010/09/gods-calendar-or-calendar-of-univ...

हे जमले तर वाचा

रघु सावंत's picture

25 Mar 2012 - 2:01 pm | रघु सावंत

मिपा वरील सर्व मराठी मनांना, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चौकटराजा, यांच्या विधानाशी मला सहमत असायला हरकत नाही.
कारण पुर्वी पाऊस ६ जुनला यायचा नंतर १० जुनला यायला लागला ,आता केव्हाही येतो.तसेच थंडी चे ही होते . म्हणजे रुतू आता फूढे सरकायला लागलेत.
(काही वर्षानी पाडवा उन्हाळ्याच्या सुरवातील न येता पावसाळयातील एखाद्या महिन्यात येईल हे कल्पना कशी वाटते सागर ? )= या चौकटराजा यांचे विधान खरे ठरू शकते.
रघू

सहमत.
दीडशे वर्षांपूर्वी संक्रांत १२ जानेवारीला आली होती ..आता १४/१५ जानेवारीला येते.( स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस १२ जानेवारी १८६३, मकरसंक्रांत)

चौकटराजा's picture

25 Mar 2012 - 3:26 pm | चौकटराजा

@ रघु , आपण जे म्हणता ते रुतू सरकायचे झाले. त्याचे उत्तर तुम्हाला एक हवामानशास्त्रज्ञ देउन शकेल कदाचित. मी लिहिले आहे ते सौर व चांद्र वर्षाच्या मेलनातील फरकाबद्दल. त्यात रूतू सरकत नाही तर सण सरकतो. कारण सण हा रूत मानाप्रमाणे येत नाही तर तो चांद्र मासातील विशिष्ट दिवशी परंपरेने आणला जातो .

श्री प वि वर्तक यानी आकाश्स्थ गोलकांच्या स्थितीचा अभ्यास करून रामायणात रामाच्या जन्माच्या वेळचे आकाश वर्णन आहे म्हणे. त्यानुसार
रामाचा जन्म इ स पूर्वी ४२०० वर्षे झाला असे त्यांचे म्ह्णणणे आहे. " चैत्र मास नवमी त्यात ..गंध युक्त तरीहे वास उष्ण किती "( शब्दशः ओळी आठवत नाहीत .चौ रा आजोबा (?) ) अशी स्थिति
रामजन्माच्या वेळी नव्हतीच असे ही त्यांचे अनुमान आहे.

अहो मंगळावर जाऊन आलेले वर्तक ते हेच ना? :P

छ्या राव वल्ली! मारले बूच?
आता तो वरचा वास कसा जाणार?

चौकटराजा's picture

25 Mar 2012 - 4:40 pm | चौकटराजा

यक्का, आम्ही यक्का नसलो तरी राजा आहोत. आम्ही कंसात सोय करून ठेवली हाय ! )

चौकटराजा's picture

25 Mar 2012 - 3:33 pm | चौकटराजा

पण पृथ्वी बाबत तरी त्यांचे ज्ञान वाखाणण्या सारखे आहे .

प्रचेतस's picture

25 Mar 2012 - 3:34 pm | प्रचेतस

अगदीच.
फारच दिव्य ज्ञान आहे हो त्यांचे.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2012 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

याच प.वि. वर्तकांना,,,''मंगळावर जाता तर सुक्ष्म देहानी शेजारच्या खोलित जा..आणी आंम्ही ठेवलेल्या दहा वस्तु कोणत्या ते इथे सांगा..'' असे श्याम मानवांचे सोप्पे आव्हान स्विकारता आलेल नाही... किंवा त्या वेळी लादेनला अमेरिका शोधत असतांना... ''लादेन कुठे दडलाय ते सुक्ष्म देहानी भटकुन शोधा आणी अमेरिकेचे बक्षिस जिंका'' असे दिलेले आव्हानही न स्विकारता ,ते पाय लाऊन पळुन गेले... ;-)

ही गोष्ट अनेकांची आहे पाय लावून पळून् जाण्याची. आपल्याला फक्त काय बघायचे त्यानी मांडलेला सणाची जागा बदलण्याचा दावा बरोबर आहे की नाही ? बाकी " महान" गुरू ना भारतात तोटा नाही. तरीही शेती उप्तादनाची वाढ ४ टक्के च्या वर जात नाही. विभूति काखेतून दाखविणारे
आहेत बरेच .

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2012 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा

@विभूति काखेतून दाखविणारे
आहेत बरेच .>>> खरं आहे...

अपूर्व कात्रे's picture

25 Mar 2012 - 4:42 pm | अपूर्व कात्रे

नवीन माहिती कळली. मनापासून धन्यवाद.

काही माहिती इथे देखील मिळेल :-
http://www.bipinjoshi.com/articles/30dc2b9e-c28d-42d6-89a2-54c5343eae80....

सागर's picture

26 Mar 2012 - 3:40 pm | सागर

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद

सस्नेह's picture

26 Mar 2012 - 3:41 pm | सस्नेह

सुरेख संकलन ! अभ्यासू प्रव्रुत्तीचे निदर्शक. तसेच आपले पूर्वजही (आपल्यासारखेच ) अभ्यासू होते हेही दिसून येते...