येद्या मुग्या

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
1 Nov 2011 - 11:01 pm

लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

टिळकांच्या प्रेरणेनंतर या तरुणांनी महुज-नाळवंडी-हिवरा-शिवणी-वांगी व अजूबाजूच्या वाड्या-तांड्यातून ४०-६० गबरु तरुण एकत्र केले. त्यांनी शोषितांचे दु:ख समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटले की सर्वांत मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अर्थिक विवंचना. त्यावर उपाय म्हणून धाक दाखवून स्थानिक सावकारांकडून खंडण्या वसूल करुन त्या पैशात गरजुंना मदत करायचे ठरले. खंडणी सत्र सुरु झाले पण गरीबी, रोगराई येवढी भयानक होती की त्यातून काहीच भागेना. दरम्यान यांच्या नावाचा दबदबा सुद्धा तयार झाला होता. त्यातच काही सावकारांनी त्यापुढे खंडणी द्यायला असमर्थता दर्शवली. आपला दबदबा कायम ठेवाचा तर या सावकारांना अद्दल घडवली पाहिजे म्हणून यांनी सरळ डाके टाकायला सुरुवात केली. आता डाक्यांसाठी बंदुका, दारुगोळा, घोडे असा सगळा लवाजम्याचा खर्च वाढू लागला. आणि पंचक्रोशितले सावकार तर अगोदरच नागवले गेलेले. मग पैसा उभारायचा कुठून?

ठरले - आता मोठ्या मोहिमा उघडायच्या. गोदेकिनारच्या मोठ्या सावकारांवर डाके टाकायचे. महुज परिसर बीड जिल्ह्याच्या मध्यावर असल्याने गोदातीर साधारणत: ४०-५०किमी अंतरावर पडे. अशा मोहिमांसाठी तयारी सुरु करुन बेत ठरवले जाऊ लागले. ते साधारणतः असे असत.
१. हिवर्‍या पासून जवळच असलेला घोडेखूर डोंगर अथवा वांगीच्या कान्होबा डोंगरावर शक्यतो वैरणीच्या (अथवा गवताच्या) गंजी रचून ठेवाव्यात.
२. डाक्यासाठीचे/लुटीचे गाव व त्यातील घरे अगोदरच हेरुन ठेवावेत व अमावस्येच्या रात्री त्यावर चाल करावी - गंजी पेटवून उत्तरेला गोदातीरी कूच करावे.
३. लूट झाल्यावर मुद्देमालासह परत येताना गांजीच्या उजेडाच्या दिशेने परत यावे जेणे करुन रस्ता चुकणार नाही.

अशा लुटालुटी सुरु झाल्यावर येद्या-मुग्या ज्या पिडीतांसाठी हे कार्य सुरु केले त्यांना लक्षात ठेवायला काय शिवाजी थोडेच होते. झाले, सगळ्या जिल्ह्यात यांचा हैदोस सुरु झाला. काही गावांना या टोळीने पैसा वाटून खूष ठेवले होते. तिथे या डाकूंची भाकर-कालवणाची सोय लागली. त्यात त्यांचे मुख्य ठाणे म्हणजे महूज जे पुढे डाके-महुज म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरा अड्डा असे तो हिवरा गाव-परिसरात. तिथल्या एका नर्तकीने यांना वेड लावले होते.

ही सगळी टोळी उन-वारा-पाऊस यांना न जुमानता डोंगर दर्‍यातून वार्‍याच्या वेगाने पसार होई. वाड्यांच्या तटबंद्या अन बुरुजांच्या भिंती हा हा म्हणता घोरपडी सारख्या चढण्यात यांचा हात कुणी धरत नसे. पेशवाईच्या काळात मराठ्यांच्या सेनेत लढलेल्या मर्द मावळ्यांच्या वंशजांची ही पिढी अशी काही काळातच नामांकित डाकू टोळीमध्ये रुपांतरीत झाली. त्यांना पकडून देण्यासाठी निजामाने इनाम जाहिर केला पण येद्या मुग्या काही केल्या हाती येईनात. बीडच्या जहागिरदार देशमुखांनी सुद्धा आपली शर्थ केली पण त्यांना सरळ मुकाबल्यात यश आले नाही. बरेचदा पोलिसांसोबत चकमकी झाल्या पण येद्या-मुग्या पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांना एकटे/बेसावध घेरुन पकडायचे प्रयत्न केले. पोलिस त्यांच्या पाठिमागे लागल्यावर ते दोघे एकाच घोड्यावरुन पळ काढत. घोड्यावरचा एक डाकू पुढे तोंड करुन तर दुसरा पाठिमागे तोंड करुन बसत आणि दोन्ही दिशेने गोळीबार करत पळून जाण्यात यसस्वी होत.

एकदा देशमुखांच्या खबर्‍यांनी खबर आणली की येद्या-मुग्याचे हिवर्‍याच्या नर्तकीकडे येणे-जाणे असते म्हणून. देशमुखांनी आणि निजामाच्या पोलिसांनी नर्तकीला फितूर केले अन तिच्या घरात-परिसरात पोलिसांनी जाळे टाकले. असे म्हणतात की जेवताना सुद्धा बंदूक खाली न ठेवणार्‍या येद्या-मुग्याला तिने चहापाण हातात देऊन बंदूक खाली ठेवायला लावली आणि दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना जन्मठेप झाली. येद्या तुरुंगातच मेला पण मुग्या परत आला. तोपर्यंत त्यांच्या टोळीत फूट पडली होती. कही जण पुन्हा शेतीवाडी कडे वळले होते तर काही चोर्‍या-चपट्या करुन म्हतारपणात आले होते.

तुरुंगातून परत आल्यावर मुग्या वांगी-शिवणी भागात राहिला. त्याच्या हडावर मांस राहिले नव्हते. माझे अजोबा सांगत की गाईच्या गळ्याच्या पोळीसारखी (खाली लोंबणारी त्वचा) त्याच्या दंडाखाली त्याची कातडी लोंबत होती त्यावरुन तारुण्यात तो काय गबरू असेल याची कल्पना यावी.

---------------------------------------- समाप्त -----------------------------------------------

********************* काही टिपा *****************************

  • कथा ऐकीव माहितीवर लिहिली आहे. कुणाला अधिक माहिती असल्यास भर टाकावी, दुरुस्त्या सुचवाव्यात ही नम्र विनंती.
  • डाके-महूजच्या गावकर्‍यांनी सत्तर्-ऐंशीच्या दशकात गावचे नामांतर करवुन घेतले - मौज. हेच आमचे गाव :)
  • पाचवी सहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्यात मी गावच्या आडावर (आड कसला, बांधलेली विहीरच आहे ती) गेलो होते. पाच्-सात परस खोल खडकांच्या तळाला टिचभर पाणी दिसत होते. एक आजीबाई आणि तिचा नातू सुद्धा त्यांच्या घागरीत खवंगा-खवंगा करुन पाणि भरत होते. मी घागर खाली टेकवली आणि दगडावरुन गडगडत ती सरळ आडात जाऊन पडली. बाजूला लिंबाच्या झाडाखाली एक अजोबा दोर वळत बसलेले. त्यांनी येऊन आडात पाहिले आणि काही न बोलता सरसर आडात उतरले. मऊ खडकांच्या सांधींचा आधार घेऊन त्यांनी केलेले हे दिव्य बघून मी तर जाम इम्प्रेस झालेलो. ते बघून शेजारच्या आजीबाई कुजबुजल्या, "रक्तातच आहे यांच्या". मी विचारले, "म्हणजे?". "येद्याचा नातू ह्ये त्यो". आमचा झालेला "आ" आजून वासला.
  • असे म्हणतात की आमच्या गावाला त्या दोघांनी केलेल्या पापाचा शाप आहे म्हणून इथे आता वैभव नांदत नाही. नेहमीचे दुष्काळ, आठरापगड दारिद्र्य, निरक्षरता, सरकारी खिरापतींवर अन नेते मंडळींच्या (त्यांचे भाडोत्री गुंड म्हणून) तुकड्यांवर जगायची लागलेली सवय, अशा अनेक प्रश्नांनी हा भाग आणि पूर्ण मराठवाडाच गांजलेला आहे. गावात गेल्यावर जिकडे बघावे तिकडे पडके वाडे, भकास-गांजलेले चेहरे अन शुन्यातल्या नजरा सगळीकडे दिसतात. त्यातील काही येथे आहेत.
  • मी स्वतः कान्होबाच्या डोंगरावर कित्येकदा गेलेलो आहे. तिथून दिसणारे पंचक्रोशीचे विहंगम दृष्य - नद्या, तळे, दूर झाडीतून येणारे मोरांचे आवाज, मधूनच दुडूदुडू पळत जाणारे हरणाचे मखमली गोंडस पाडस - आजही सगळे आत्ता बघितल्यासारखे ताजे समोर दिसते.
  • बालाघाटच्या डोंगरांत पेशव्यांनी निजामाला शह देण्यासाठी किल्यांची योजना केली होती असे म्हणतात (तज्ञांनी खुलासा करावा). सततच्या लढाया आणि नंतर हा भाग निजामाकडे गेल्यावर ते काम तसेच अर्धवट राहिले. त्यातील एक कान्होबा डोंगरावर असावा असे वाटते - तेथे खूप खोल खोदलेले खंदक वा किल्ल्याचा पाया आहे. तिथे डोंगरावर उभा राहून त्याला न्याहाळत मी कित्येक तास कल्पना करत उभा असायचो की पेशवे वा त्यांच्या सेनापतींनी ही जागा निवडताना, बांधकाम सुरु करताना काय विचार केला असेल? त्यांच्या समोर त्या वेळी त्या भावी गड-किल्ल्याचे काय चित्र असेल? जर गड बांधून झाला असता तर आज इथे कसे दिसले असते? अशा अनेकानेक विचारांनी रोमांच उभे होत आणि नकळत अंगात मावळा संचारत असे; मुखातून अरोळ्या निघत - हर हर महादेव! शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी!
इतिहाससमाजलेखसंदर्भबातमीमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

2 Nov 2011 - 12:24 am | शिल्पा ब

गोष्ट एकदम भन्नाट आहे.
पण या दोघांमुळे गावाची वाट लागायचं काहीच कारण नाही. आपल्या जबाबदार्‍या दुसर्‍यावर ढकलुन देण्यात आपण अगदी पारंगत आहोत. आमच्या गावाचीही अशीच परीस्थिती आहे पण जे पुरातन मंदीर आहे त्याचा उपयोग करुन काही स्वतःची प्रगती करायला तयार नैत लोकं..झाडं नाहीत -सगळा फुफाटाच, त्यामुळे पाणी नाही त्यामुळे सगळा आनंदच...आता असोच अन काय!!

अवांतरः आधी मला वाटलं की कशाचंतरी विडंबन वगैरे आहे की काय. येड्या मुंग्याच्या ऐवजी येद्या मुग्या लिहिलंय..

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 1:23 am | भास्कर केन्डे

तुमचं बरोब्बर आहे शिल्पा-तै. त्या दोघांच्या माथी संपूर्ण गावाच्या चुका मारुन जबाबदारी अजिबात संपत नाहिये. मी फक्त लोकांचं मत दिलय "असे म्हणतात" असं सुरु करुन. ;)

भास्करराव,
अहो एक सुंदर आणि प्रभावी कथा फुलवण्यासाठी ही सामग्री एकदम उपयुक्त आहे.
तुमच्या लेखनात ताकद आहे, पण घटनांची निव्वळ जंत्री केल्याने एक छान कथा 'बनते बनते रह गयी'
अजुनही थोडी मेहनत घेतलीत तर काम जमून जाईल.

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 1:14 am | भास्कर केन्डे

बरोबर आहे तुमचं निरिक्षण. शेवटची जंत्री लिहिता लिहिता जरा मोठीच झाली. त्यामुळे मूळ कथा लहान दिसत आहे. पुढच्या कथेला जास्त फुलवायचा प्रयत्न करीन. विषय चिक्कार आहेत त्यामुळे प्रयोग करत रहायला अडचण नाही. :)

धनंजय's picture

2 Nov 2011 - 3:32 am | धनंजय

भन्नाट कथा आहे. लिहिलीसुद्धा छानच.

कच्ची कैरी's picture

2 Nov 2011 - 9:27 am | कच्ची कैरी

धनंजय यांच्याशी सहमत .

सन्जोप राव's picture

2 Nov 2011 - 6:41 am | सन्जोप राव

गबरु हा शब्द फार दिवसांनी भेटला. बरे वाटले. एकूण लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2011 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येद्या-मुग्याचा लेख आवडला.

प्रतिसादात उल्लेख आलाच आहे तसेच म्हणतो की, कथा उत्तम होऊ शकते.

कनकेश्वराबद्दल काही येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 7:46 pm | भास्कर केन्डे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2011 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कनकालेश्वराबद्दलच म्हणायचं होतं.
दोनेक महिन्यापूर्वी गेलो होतो. पूर्ण पाणी होतं.
लोखंडी कठड्यांना धरत दर्शन करुन आलो.

-दिलीप बिरुटे

भास्कर केन्डे's picture

3 Nov 2011 - 2:42 am | भास्कर केन्डे

पावसाळ्यात कनकालेश्वराचे तळे भरलेले असते म्हणून आत जाताना कमरेयेवढ्या पाण्यातून जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात तळ लागत आहे आणि पाणि केवळ पार कपारात असतं असं ऐकलय. गाळही खूप साचला आहे गणपती बप्पांच्या कृपेने आणि साफ होत नाहीये राज्यकर्त्यांच्या अवकृपेने :(

मन१'s picture

2 Nov 2011 - 1:05 pm | मन१

आवडले.
असेच तर हवे आहे.

पैसा's picture

2 Nov 2011 - 1:13 pm | पैसा

छान कथा. कथा एवढ्याचसाठी की आता त्या इतिहासाचे साक्षीदार कोणी नाहीत. ज्या काही कथा आहेत त्या लोकांनी मुलांनातवंडाना सांगून झिरपत आमच्यापर्यंत आलेल्या. तुमच्या भागाबद्दल फार माहिती नाही. अशाच आणखी कथा येऊ द्यात!

विसुनाना's picture

2 Nov 2011 - 4:16 pm | विसुनाना

दुधोंडी, ताकारी, दह्यारी, लोणारी,तुपारी अशी दुग्धजन्य पदार्थांची नावे असलेली गावे असलेल्या तासगाव-कराड दरम्यान खूप पूर्वीच सिमेंटने बांधलेल्या रस्त्यावर 'बिचुद' नावाचे गाव होते. त्याचे नाव औंधाच्या राजाने (औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी, संदर्भ : व्यंकटेश माडगुळकर) बदलून भवानीनगर केले.
या भवानीनगरात अगदी अलिकडे म्हणजे तीस वर्षांखाली 'दत्त्या करवत्या' नावाचा एक देशी रॉबिनहुड झाला. त्याची कथा काहीशी अशीच. त्याचे नाव करवत्या पडण्याचे कारण तो आपल्या विरोधकांचे पाय करवतीने कापत असे. :( त्या काळात त्याचे नावही पंचक्रोशीत कोणी मोठ्याने उच्चारत नसे, इतकी त्याची दहशत होती. दुसरा 'लॉर्ड व्हॉल्देमॉर्ट'च जणू.)
पुढे या दत्त्याला त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्यात आले.
***
या भागात - म्हणजे कृष्णेच्या खोर्‍यात आणि वारणेच्या खोर्‍यात पळून जायला आणि लपून बसायला डोंगर जवळच असल्याने बरेच दरोडेखोर होऊन गेले. पण त्यांच्या पापाने येथील सुबत्ता काही कमी झालेली नाही. उलट आता दरोडेखोरच लोकशाही मार्गाने नेते,पुढारी, आमदार,खासदार, मंत्री इ. बनलेले आहेत. ;)

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 7:29 pm | भास्कर केन्डे

विसुनाना,

दत्त्या करवत्याची कथा येऊ द्यात ना मग. आपल्याला बॉ असल्या खरेच होऊन गेलेल्या कथा (योगप्रभूंच्या भाषेत "मातीतल्या वासाच्या अस्सल कथा") भल्ल्या आवडतात.

औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी - सध्या ते आमचे जीवश्च-कंठश्च मित्र आहेत. त्यांच्या या उल्लेखाचा हा धागा त्यांना मेल करत आहे. ते स्वतः एक कलाकार आहेत... मी त्यांना मिपावर येण्याचे निमंत्रणच देतो कसा. त्यांचे नाव अमोल पंतप्रतिनिधी.

कृष्णे-वारणेच्या खोर्‍यात बरेच डाकू होऊन गेले असे ऐकले आहे. चंद्रकांत०सूर्यकांतचे शिनेमे त्याची साक्षच देतात जणू.

मन१'s picture

2 Nov 2011 - 11:02 pm | मन१

शेवटच्या ओळितला "पंच" आवडला...:)

धनंजय's picture

3 Nov 2011 - 12:23 am | धनंजय

आजकाल जे लोक आमदार वगैरे झाले, त्यांच्यासारखे पूर्वीच्या काळात खुशमस्करी करून राजाची चाकरी मिळवत, किंवा जमीनदारी मिळवत. (राजकारभार बर्‍यापैकी भ्रष्ट असे.)
तेव्हाच्या दरोडेखोर-चोरांशी समांतर आजकालचे दरोडेखोर-चोर होत.

( :-) स्मितहास्याचे चित्र बघितले, हलके घेतले, तरी... लोकशाहीमधले दोष दाखवण्याबाबत तक्रार नाही. मात्र पूर्वीच्या सत्ताव्यवस्थेच्या मानाने लोकशाही वाईट आहे, असे ध्वनित करण्याबाबत तक्रार आहे.)

मनस्विनि२५१'s picture

2 Nov 2011 - 4:25 pm | मनस्विनि२५१

तुमचा लेख आवडला. नवीन माहिती मिळाली.
कथा म्हणून आणखी जास्त सुंदर रचना करता आली असती (आधी आलेल्या उल्लेखाप्रमाणे).
शिवाय डाके महुज आणि मौज मधला संबंध माहित नव्हता आज तो ही कळला.
धन्यवाद.

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 8:48 pm | भास्कर केन्डे

शिवाय डाके महुज आणि मौज मधला संबंध माहित नव्हता
--- ऑ, म्हणजे तुम्ही पण बीडच्या का काय?

दत्ता काळे's picture

2 Nov 2011 - 7:17 pm | दत्ता काळे

लेख आवडला.
अवांतर : नर्तकी आणि डाकू हे समीकरण बर्‍याच जुन्या चित्रपटांना अजरामर करून गेलं

मी पण बीड जिल्ह्यातलाच!
हिवरा म्हणजे कोणत्या तालुक्यात?
व्यंकटेश माडगुळकरांची 'खोपट' की कसल्या नावाची सेम टू सेम कथा आहे.. ती आठवली बघा तुमची कथा वाचून.
फक्त ते दोन डाकू टिळकांना भेटले नव्हते... तो त्यांचा पिढीजात धंदा होता.
फार मस्त आहे ती कथा.

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 8:51 pm | भास्कर केन्डे

यशवंतराव, हिवरा बीड तालुक्यातच आहे. बीड्-तेलगाव रोडवर हिवरा फाट्याला उतरलात की ५-६ किमी आत चालत जावे लागते डोंगरात. तुमचे गाव कुठले (व्यनिने कळवलेत तरी चालेल).

'खोपट' मी वाचलेली नाही. आंतरजालावर असेल तर कळवा. वाचायला नक्की आवडेल.

अतुल पाटील's picture

2 Nov 2011 - 9:38 pm | अतुल पाटील

माहिती.

आजोबांनी भितीदायक गोष्ट सांगावी आणि नातवंडांनी डोळे मोठ्ठे करून ऐकावी तशी माझी गत झाली. मराठवाड्यात एकदा संपूर्ण चार तासांसाठी आल्याने फारसे काही माहित नाही. लेखनशैली आवडली.

चित्रा's picture

3 Nov 2011 - 7:14 am | चित्रा

छान! कथा/शैली आवडली.

ऋषिकेश's picture

3 Nov 2011 - 9:21 am | ऋषिकेश

रोचक माहिती!

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 6:04 pm | धमाल मुलगा

भारी तिच्यायला! लै दिवसांनी डाकू दरवडेखोरांची गोष्ट वाचली राव.
आमच्या गावाकडंही यल्ल्या अन तुक्या बेरडांनी असाच धुमाकुळ मांडला होता. फरक इतकाच की त्यांची (भाडोत्री) दुष्मनी आमच्या घराण्यापुरती होती. हक्काच्या रानात पाय ठेवायची सोय राहिली नव्हती. गेला कोणी देशमुखाघरचा, की एकटा परत यायचा नाही. दोन-चार जणांनी मिळून उचलूनच आणावा लागायचा. आमच्या दोन चुलत आज्ज्या म्हणे ह्या यल्ल्या अन तुक्याला जाब विचारायला अन जमलंच तर तिथंच खेळ संपवायला म्हणून बेरडांच्या डोंगरकिन्हीच्या तळावर गेल्या होत्या.

इथेही येद्या अन मुग्यासारखंच. यल्ल्या गेला, तुक्या राहिला.
ह्या सगळ्या गोष्टी ऐकून गावाकडं गेल्यावर तुक्याला भेटायचा हट्ट धरला अन गेलो त्याच्या खोपटात. सोबतच्या पोरानं नजर गेलेल्या तुक्याला सांगितलं पाटील आल्यात तुला भेटायला..तर जागीच जोहार घालायला लागला. चुक झाली चुक झाली, म्होटं पाप क्येलं आमी वगैरे. अर्थात त्याला ही उपरती व्हायला आमच्या घरची कर्त्यासरवत्या वयाची इतकी लोकं जीवानिशी जावी लागली ही बाब अलाहिदा! :(

असो. बीडकडची गोष्ट, अन यल्ल्या-तुक्याचं साम्य ह्यामुळं आपसूकच लेखाशी नातं जुळल्यागत झालं.

मी-सौरभ's picture

3 Nov 2011 - 6:28 pm | मी-सौरभ

अशाच अजून कथा वाचायला आवडेल :)

विकास's picture

3 Nov 2011 - 6:56 pm | विकास

कथा एकदम मस्तच सांगितलेली आहे. अजून येउंदेत.

कृष्णे-वारणेच्या खोर्‍यात बरेच डाकू होऊन गेले असे ऐकले आहे. चंद्रकांत०सूर्यकांतचे शिनेमे त्याची साक्षच देतात जणू.

एका अशाच व्यक्तिमत्वावरील सत्यघटनेवर आधारीत "वारणेचा वाघ" हा चित्रपट आठवला. त्यातील नायकाचे नाव हे फक्त दत्तूच्या ऐवजी सत्तू होते असे आठवते.

अवांतरः

औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी - सध्या ते आमचे जीवश्च-कंठश्च मित्र आहेत. त्यांच्या या उल्लेखाचा हा धागा त्यांना मेल करत आहे. ते स्वतः एक कलाकार आहेत...

त्यांच्या आजोबांची अथवा पणजोबांची कला औंधच्या वस्तुसंग्रहालयात आणि राजवाड्याच्या बाजूच्या यमाईच्या देवळात पाहीली आहे! खूप सुंदर चित्रे आहेत. कधीतरी येथे त्यांची प्रकाशचित्रे ठेवेन... वस्तुसंग्रहालय पहाण्यासारखे आहे. तसेच पंतप्रधिनिधींचा इतिहास पण माहीती करून घेण्यासारखा आहे - लोकशाहीपद्धतीने चालवलेले संस्थान, अनेक गरजू आणि लायक व्यक्तींना केलेली मदत (लक्ष्मणराव किर्लोस्कर, माडगुळकर...) आणि भारत स्वतंत्र झाल्यावर तात्काळ विलिनीकरण... त्याच बरोबर अत्र्यांनी रंगवलेले "सूर्यनमस्काराबाबत अतिरेकी असलेले आणि जे स्वतः अत्र्यांबरोबर "साष्टांग नमस्कार" या नाटकात पहात असताना मनापासून हसलेले "पंतप्रधिनिधी"... वगैरे वगैरे.. पण हे तुमच्या मित्राकडून ऐकायला/वाचायला मिळाले तर जास्त आवडेल. :-)

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 7:27 pm | धमाल मुलगा

बापू वाटेगावकर ह्या नावाशिवाय वारणाखोर्‍यातल्या दरवडेखोरीचा इतिहास अपुर्णच राहतो राव.