लोकशाहीच्या वाटेवर...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
26 Jan 2011 - 11:59 pm

नमस्कार,
आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे. मला कल्पना आहे की मी जरा धाडशी वाक्य बोलतो आहे, परंतु मला भारताच्या पारतंत्र्याचा व त्यानंतर स्वातंत्र्याकडे केलेल्या वाटचालीचा अभ्यास केल्यावर हे नक्की सांगता येईल की आजची व्यवस्था सर्वोत्तम नसली तरी अतिशय उत्तम आहे.

भारताला कायदे किंवा नियमांचे नावीन्य नाही. मात्र एक काळ असा आला की धर्मव्यवस्था राजकीय व्यवस्थेवर प्रभावी झाली आणि राजकीय नियमांऐवजी धार्मिक कायद्यांची सामाजिक आणि वैयक्तिक वर्तन नियंत्रित करण्यासाठी अंमलबजावणी केली जाऊ लागली. यात सर्वात जास्त माहिती असलेले नियमांचे पुस्तक म्हणजे 'मनुस्मृती'. हे पुस्तक काही काळ हिंदू समाजाचे संविधान म्हणून ओळखल्या गेले. मात्र यात जातीआधारीत समाजनियंत्रण असल्यामुळे काळाच्या ओघात ही असमान व्यवस्था नाकारल्या जाणार होतीच. तसे झालेही. पुढील काळात व्यवहाराच्या आधारे राज्यव्यवस्था व्यवस्थापनाचा अत्यंत आदर्श (त्याकाळानुसार) नमुना म्हणून आपल्यासमोर 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हा ग्रंथ येतो. चाणक्याने हा ग्रंथ लिहिल्याचे मानतात. त्यात केवळ अर्थशास्त्र विषयावरच माहिती आहे असे नाही तर राज्य चालविताना लागणार्‍या सर्वच विषयावर कौटिल्याचे भाष्य आहे. आणि विशेष म्हणजे त्याकाळात धर्माचा एवढा पगडा असल्यावरही हा ग्रंथ व्यवहारपातळीच्या जवळ जाणारा दिसतो.

पुढील काळात भारतात वेगवेगळ्या राजसत्ता आल्यात ज्यांचेवर हिंदू धर्माच्या नियमांचा पगडा नव्हता त्यामुळे हे धार्मिक कायदे प्रशासकीय/ राजकीय पातळीवर मागे पडले आणि त्याची जागा नवीन नियमांनी किंवा शासनकर्त्याच्या इच्छेने घेतली. अश्या प्रकारे काही शतके गेल्यावर महाराष्ट्रात काही काळ मराठे शाहीत, विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात नियमांना व कायद्यांना महत्त्व प्राप्त झालं. मात्र त्यापुढे त्याचे तेवढे महत्त्व टिकलेले दिसत नाही. सर्व काही शासकाच्या मनाचा कारभार चालायचा.

इंग्रजांचा भारतातील प्रवेश झाला तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्गाने. राणीकडून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची कायदेशीर सनद प्राप्त करून ही कंपनी पूर्वेकडील प्रदेशांत व्यापार करायला निघाली. ह्या कंपनीला सुरुवातीला पिट्स इंडिया अ‍ॅक्ट आणि त्यानंतर चार्टर अ‍ॅक्ट १८१३ , १८३३, व १८५३ नुसार भारतात व्यापार व इतर उद्योग (?) करण्याची मुभा होती. १८५७ ला झालेल्या उठावानंतर मात्र भारतीय प्रशासनाचा कायदा १८५८ नुसार ब्रिटिश संसदेचा अंमल भारतावर सुरू झाला. १७५७च्या प्लासीच्या लढाई पासून ते १८५७ च्या उठावापर्यंत कंपनीचा कारभार व नंतर १८५८ ते १९४७ असा ब्रिटिश सरकारचा कारभार. हा कसा चांगला वाईट ते सर्वांनाच ठाऊक आहे. आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे की ब्रिटिश भारतात आल्यावर सुरू झालेले आधुनिक कायद्याचे युग आणि आजचे संविधान. त्यामुळे कंपनीच्या स्थापनेपासून तर कंपनीकडून सत्ता काढून घेऊ पर्यंत सर्व कामे ब्रिटिश शासनाने कायद्याच्या आधारावर केलेली आहेत. तसेच कायदे हे व्यवहाराला धरून केली जावीत आणि आपल्या देशाचे हित ही त्याच्या उपयोगितेची कसोटी असावी, हा सामान्य पाया या कायद्यांना असायचा. यापेक्षा उलट चित्र आपल्याकडे दिसत होतं. आपले नियम कायदे हे आपण अपरिवर्तनीय समजून बसल्यामुळे ते काळाच्या ओघात मागे पडले व अकार्यक्षम झाले. असे असताना सुद्धा आपण ते बदलायला धजत नव्हतो.
ब्रिटिशांच्या सोबत जश्या खूप वाईट गोष्टी भारतात आल्या तश्या काही चांगल्याही आल्या. इंग्रजी शिक्षण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'सर्वांना शिक्षण' ही त्यातील एक प्रमुख चांगली गोष्ट आहे. अश्या शिक्षणातून तयार झालेल्या पिढीला जगातील आधुनिक ज्ञानाचे दरवाजे खुले झाले व त्यानंतर ते आपल्या समाजाची तुलना अन्य समाजाशी करायला लागले. यातूनच भारतात सामाजिक प्रबोधनाची परंपरा उभी झाली. अश्याच प्रकारे भारतातील शिक्षित वर्गाला जागतिक बदलातून वाहणार्‍या नवीन मूल्यांची सुद्धा ओळख झाली. समता, बंधुता आदी मूल्ये भारतीयांना नवीन वाटावी अशीच होती.
अश्या वातावरणातून शिकून पुढे आलेल्या पहिल्या काळातील नेत्यांनी आपापल्या परीने या समाजात योगदान दिले. कुणी सती बंदीचा कायदा आणायला प्रयत्न केले तर कुणी शाळा काढल्या. कुणी तर सरळ ब्रिटिश राजकीय व्यवस्थेप्रमाणे भारतात संरचना असावी अशी मागणी केली.

भारतीयांच्या प्रांतिक अथवा स्थानिक पातळीवरील चळवळीला राष्ट्रीय स्वरूप देण्याचेच एक रूप होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. ब्रिटिशांना अभिप्रेत अश्या सदनशीर मार्गाने आपलं मत मांडणारी व्यवस्था उभी करण्यात इंग्रजांना त्यावेळी रस होताच. कारण तीसच वर्षांपूर्वी भारतीयांच्या उद्रेकाने ते चांगलेच पोळलेले होते. अश्या प्रकारे भारतीय लोक आता आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडताना दिसू लागले. यात गोपाळकृष्ण गोखले, ब्योमेशचंद्र बॅनर्जी आणि फिरोजशहा मेहता हे अग्रणी होते. अर्थात लोकमान्य टिळकांना १९१० पर्यंत यात विशेष रस नव्हता आणि त्यांनी आपले जहाल मत अतिशय प्रखरपणे मांडलेले दिसून येते.

यानंतर प्रवास सुरू झाला तो भारतीयांनी ब्रिटिशांना सुधारणा मागण्याचा आणि खूप उशीरा आणि काहीतरी थोडंसंच ब्रिटिशांनी पुरवण्याचा. १८८५ साली स्थापन झालेल्या काँग्रेसचा ब्रिटिश संसदेवर खूप विश्वास होता. मात्र १८९२ साली आलेल्या कॉउन्सील अ‍ॅक्ट मध्ये ब्रिटिशांनी भारतीयांच्या तोंडाला पानेच पुसली. त्यामुळे पुढे भारतीय काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या प्रवाहांची निर्मिती झाली. जहाल - मवाळ वाद आपण वाचलेला आहे तो याच काळातील. मात्र याचवेळी काँग्रेस लोकशाही मूल्यांची जाणीवपूर्वक रूजवन करीत होती. अध्यक्षीय निवडणुका अथवा जिल्हा कार्यकारी मंडळाच्या निवडणुका असोत सर्वत्र निवडणुकांचा अवलंब केला जात होता. पौढ मतदानाचे सूत्र त्यात विशेष होते. पुढे सुरत अधिवेशनात (१९०७) कॉग्रेसमध्ये फूट पडली . पुढे आलेल्या '१९०९ च्या भारतीय प्रशासनाच्या कायद्या'ने(मोर्ले मिंटो) काँग्रेसच्या काही जुन्या मागण्या पूर्णं केल्या.मात्र पहिल्यांदाच या कायद्यात लोकशाही निवडणुकांची तरतूद होती. भारतीय लोकांना निवडणुकीच्या मार्गाने सभागृहात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतीयांनी मागणी केलेल्या मागण्या खूप उशीरा आणि अल्प प्रमाणात पुर्‍या करण्याचे धोरण ब्रिटिशांचे होते. यातच ब्रिटिशांचे फोडा आणि राज्य करा तत्त्वावरील मुस्लिम तुष्टीकरणाचे (खरंतर विलगीकरणाचे... आयसोलेशन !) प्रयत्न चालू होते. सोबतच ब्रिटिश कायद्याचे सखोल ज्ञान असलेला नव्या दमाचा सेनापती आता हातात चरखा घेऊन भारतीयांना दिशा देत होता.

पुढील काळात आलेल्या 'भारतीय सुधारणा कायदा १९१९' (मॉन्टेग्यु चेम्स्फोर्ड) ने सुद्धा भारतीयांना काही सुधारणा दिल्यात. त्यात राज्य आणि केंद्रीय सरकारची रचना होती. तसेच राखीव व सोपीव खाती वेगवेगळी करण्यात आली. अत्यंत साधी खाती भारतीय लोकांना देण्यात आली. मात्र त्यावेळी असलेल्या नेतृत्वाला या सुधारणा पुरेशा वाटल्या नाहीत. मुळात त्या पुरेश्या नव्हत्याच.

यावेळी भारतात एकाच वेळी काय काय घडत होते याची थोडी दखल घेऊया. गांधीजी भारतात आले आहेत. टिळकांचे हे शेवटचे दिवस. याच वेळी जगात सर्वत्र साम्यवादाची लाट आली होती. पुढील दशकात म्हणजे १९२० ते १९३० मध्ये अनेक प्रवाह एकाचवेळी गतिमान झालेले दिसून येतात. एकीकडे गांधीजी असहकार आंदोलन घडवून आणताहेत मात्र अहिंसा या तत्त्वाची ओळख करून देण्यासाठी चौरीचौराच्या घटनेनंतर ते आंदोलन परत सुद्धा घेत आहेत. जालीयांवाला आणि इंग्रजांच्या अन्य अत्याचाराविरुद्ध क्रांतीची मशाल युवक पेटवत आहेत. यातच काकोरीची घटना रामप्रसाद बिस्मील घडवतात. या दशकात क्रांतिकार्य अत्यंत जोरावर होतं. सोबतच पुढील भारतावर आपला प्रभाव पाडणार्‍या दोन संघटनांची स्थापनासुद्धा याच दशकातील. त्याम्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरी म्हणजे जगातील साम्यवादाची लाट अधिकृतपणे भारतात नेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना. सोबतच सामाजिक बदलाचे प्रवाह जोरात होते. शाहू आणि टिळकांतील ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर वाद गाजला. अश्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचे सक्रिय समाजकारण व राजकारणात उतरणे आणि त्यांच्या प्रगल्भ अभ्यासाच्या जोरावर त्यांनी दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करणे अश्या घडामोडी घडत होत्या. त्यावेळच्या खूप कमी लोकांना ब्रिटिश प्रशासन व्यवस्था समजली होती. आणि सुदैवाने त्यात त्याकाळच्या शीर्ष नेत्यांचा समावेश होता. त्यासाठीच याच दशकात निर्माण झालेली स्वराज्य पार्टी आणि त्यात आघाडीवर असलेले चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आदी लोक कायद्याच्या आधारे ब्रिटिशांना जेरीस आणण्याचे प्रयन्त करीत होते. गांधींप्रमाणे डॉ. आंबेडकरांना सुद्धा ब्रिटिश कायद्याचा चांगलाच अभ्यास होता. स्वातंत्रचळवळीबद्दल त्यांचं स्वतः:चं मत होतं. त्यांनी आपली शक्ती दलितांच्या उद्धारासाठी दिली. मुस्लिमांना १९०९ च्या कायद्याने दिलेले स्वतंत्र मतदार संघ त्यांनी तसेच दलितांसाठी सुद्धा मागितले. कायद्याने चालणारं ब्रिटिश राज्य त्यांना दलितांना जास्तीत जास्त चांगलं जीवनमान मिळवून देण्यासाठी वापरायचं होतं. ते त्यांनी तसं वापरलंही मात्र त्यांच्या या कामाच्या आड अनेकदा गांधीजी आलेले दिसून येतात. याच दशकात महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि बाबासाहेबांना हिंदू धर्माच्या सनातनी लोकांची विचारसरणी समजून आली आणि त्यांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली ती याच दशकात. या शिवाय अनेक प्रवाह यावेळी भारतीय सामाजिक/ राजकीय जीवनात घडत होते.

अश्या घडामोडीत १९१९ च्या कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार दहा वर्षांनी या कायद्याची समीक्षा करण्यासाठी ब्रिटिशांनी सायमन कमिशन पाठवले. यात कुणीही भारतीय नसल्याने काँग्रेसने त्यावर बहिष्कार घातल्याचे आपल्याला माहिती आहे. पुढे याच आंदोलनात लाला लाजपत राय यांचे निधन आणि भगतसिंहांनी त्याचा घेतलेला सूड आपल्याला माहितीच आहे. मात्र या सायमन कमिशन ने आपले काम चालूच ठेवले. त्यासमोर डॉ. आंबेडकर आणि बॅ. जीनांनी आपले मत मांडले. यावेळी जीना राजकीय जीवनात परत सक्रिय झाले.

पुढील काळात सविनय कायदेभंगाची चळवळ चालली. भगतसिंहांनी न्यायालयात चाललेल्या खटल्यात क्रांतिकार्यामागची भूमिका देशासमोर मांडली. भारतासाठी चांगले शासन देण्यासाठी सर्वसंमतीने एक नवीन कायदा देण्याची भूमिका ब्रिटिशांनी घेतली होती. त्यासाठी तीन गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या. त्यातून काही विशेष चांगले झाले नाही. झालंच तर अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी कोण? यावर गांधी आणि आंबेडकरांत वाद झाले.

पुढे १९३५चा 'भारतीय प्रशासनाचा कायदा' आला. हा कायदा तो पर्यंतचा सर्वात मोठा कायदा होता असं म्हटल्या जातं. भारताच्या स्वातंत्र्याची चाहूल या कायदाने लागली होती. भारतीय संविधानावर या कायद्याचा खूप प्रभाव आहे. यापुढे भारतात निवडणुका घेणात आल्या. प्रांतिक सरकारे स्थापन झाली. काँग्रेसची सरकारे बहुमताने आली. मात्र पुढे जेव्हा दुसर्‍या महायुद्धात भारताचा सहभाग ब्रिटिश सरकारने परस्पर घोषित केल्यामुळे काँग्रेसने आपल्या सरकारचे राजीनामे दिले.

आता जागतिक पातळीवर वातावरण अत्यंत अस्थिर बनलेले होते. भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्याचे वेध लागले होते आणि अशावेळी भारतीय नेत्यांचा युद्धासाठी पाठिंबा घेण्यासाठी क्रिप्स मिशन पाठवण्यात आले. या मिशनने देऊ केलेली सर्वात मोठी गोष्ट होती ते वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. ही त्याकाळी अत्यंत गैरलागू अशी बाब होती. कारण १९२९ च्या लाहोर अधिवेशनातच काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केला होता आणि अश्या वेळी १९४२ च्या मध्यात अशी योजना देऊ केल्याने आणि सोबतच सर्व वचनांची पूर्तता करण्यासाठी युद्ध संपल्यानंतर बोलणे होईल अशी तरतूद केल्याने ह्या शिष्टमंडळाची वार्ता विफळ ठरली.

दुसरे महायुद्ध संपल्यावर पंतप्रधान म्हणून मजूर पक्षाचे अ‍ॅटली आले. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी भारताच्या संविधान मंडळाच्या निवडणुकीसाठी व भारताच्या सत्तांतरासाठी कॅबिनेट मिशन भारतात पाठवले. पुढे भारताच्या संविधान समितीची निवड झाली आणि भारताचे संविधान तयार झाले. या संविधान निर्मितीवरयेथे वाचता येईल.

- नीलकांत

मांडणीइतिहाससमाजविचारलेखमत

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

27 Jan 2011 - 12:07 am | नितिन थत्ते

_/\_

सुंदर लेख.
संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा.

मुक्तसुनीत's picture

27 Jan 2011 - 1:17 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.

धनंजय's picture

27 Jan 2011 - 1:38 am | धनंजय

त्या कालखंडाचा चांगला धावता आढावा.

सुनील's picture

27 Jan 2011 - 2:14 am | सुनील

संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा
सहमत!

मुस्लिमांना १९०९ च्या कायद्याने दिलेले स्वतंत्र मतदार संघ त्यांनी तसेच दलितांसाठी सुद्धा मागितले

येथे थोडे अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

लोकशाहीत समाजातील सर्व घटकांना (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणे आवश्यक असते. तरच ती व्यवस्था आदर्श समजली जाईल. एखादा अल्पसंख्य (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) समाज एकूण लोकसंख्येच्या २५% असेल पण त्या समाजातील लोकप्रतिनिधींची टक्केवारी यापेक्षा खूपच कमी असेल तर, त्या समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. जो अंतिमतः घातक ठरू शकतो.

यावर उपाय म्हणून अनेक पर्याय असतात. स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे. ही परिपूर्ण नसली तरी योग्य आहे. ह्यात मतदारसंघातील सर्व पात्र मतदार मतदान करू शकतात. मात्र निवडणूक लढण्याची पात्रता फक्त त्या समाजातील व्यक्तींसाठी तो मतदारसंघ राखीव आहे, त्यांनाच असते.

स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना यापेक्षा वेगळी होती. ह्यात मतदानाचा हक्कदेखिल त्या विशिष्ठ समाजातील पात्र मतदारांनाच असणार होता. यातूनच पुढे दुहीची बीजे पेरली जाऊ शकत होती. हे जाणूनच गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या कल्पनेला विरोध केला होता.

गणपा's picture

27 Jan 2011 - 2:51 am | गणपा

लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.

नंदन's picture

27 Jan 2011 - 11:50 am | नंदन

लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.

--- सहमत आहे. लेख अतिशय आवडला, सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे १९५० नंतरच्या बदलांबद्दल लिहिता आले तर फारच उत्तम.

पैसा's picture

28 Jan 2011 - 10:38 pm | पैसा

नीलकांत, तुमच्या धावपळीतून जरा सवड काढून तुमच्यातला लेखक जरा जास्त वेळा आम्हाला भेटला तर सगळ्यानाच आवडेल!

पंगा's picture

31 Jan 2011 - 2:44 am | पंगा

स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे.

याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय?

लोकसभेत अँग्लोइंडियन समाजाकरिता राखीव असलेल्या दोन जागा वगळता लोकसभा- किंवा विधानसभा-पातळीवर (म्हणजे केंद्रीय किंवा राज्यपातळीवरील विधीमंडळाच्या निम्नकक्षपातळीवर) तरी अशा इतर 'राखीव मतदारसंघां'बद्दल कल्पना नव्हती. (हल्ली स्त्रियांसाठी तेहतीस टक्के राखीव जागांबद्दल काहीतरी चालल्याचे किंवा झाल्याचे ऐकले होते, पण त्याबद्दल आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीबद्दल निश्चित कल्पना नाही.)

बाकी उच्चकक्षपातळीवर शिक्षकमतदारसंघ, पदवीधरमतदारसंघ वगैरे असल्याची कल्पना होती, परंतु तो वेगळा प्रकार असावा.

नुकत्याच झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांपैकी खालील मतदारसंघ हे अनुसुचित जातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - अमरावती, रामटेक, शिर्डी, लातुर आणि सोलापूर. तसेच हे मतदारसंघ हे अनुसुचित जमातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - नंदुरबार, गडचिरोली, दिंडोरी आणि पालघर.

पूर्वीच म्हटल्याप्रमाणे, सदर मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांना मत देण्याचा हक्क आहे परंतु, निवडणूक लढविण्याचा अधिकार फक्त त्या विशिष्ठ जाती-जमातीतीलच लोकांनाच आहे.

पंगा's picture

2 Feb 2011 - 10:03 am | पंगा

माहितीबद्दल आभारी आहे.

शिवाय हे राखीव मतदारसंघ बदलते (rotating) असतात असे वाचले आहे. त्यांच्या बदलण्याच्या क्रमाबद्दल/पद्धतीबद्दल नीलकांत-जी किंवा सुनिल-जी कांहीं लिहू शकले तर वाचायला आवडेल.

चिंतामणी's picture

27 Jan 2011 - 12:11 am | चिंतामणी

थोड्या सवडीने सविस्तर लिहीन म्हणतो.

रेवती's picture

27 Jan 2011 - 1:00 am | रेवती

लेख आवडला.

वाटाड्या...'s picture

27 Jan 2011 - 1:49 am | वाटाड्या...

प्रिय नीलकांत,

मला माहीत आहे की तु प्रशासकीय सेवेत आहेस. त्यामूळे तुझा स्वातंत्र्य पुर्व कालापासुनचा ते संविधान येण्यापर्यंतचा अभ्यासक लेखाजोखा आवडला..

त्यातले एक "मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे." ह्या वाक्याकडे वळूया. यावर जरा भाष्य करशील का? भ्रष्टाचार, राजरोस हत्या, कंबरडे मोडणारी महागाई हे एकिकडे तर ८-९% जीडीपी इतका वाढदर दुसरीकडे ह्या नविन बदलांना सामावून घेणारी व्यवस्था अत्यंत संतुलित कशी असेल/आहे ह्या प्रश्नाचे मला वाटतं तुझ्यासारखेच लोक चांगले उत्तर देऊ शकतील.

तेव्हा कृपया माझ्या ह्या विनंतीचा स्विकार करुन उत्तर देच...

कळावे लोभ असावा..

- वाटाड्या...

विकास's picture

27 Jan 2011 - 2:29 am | विकास

प्रजासत्ताक दिना निमित्ताने हा लेखाजोगा वाचताना विशेष भावला.

त्यात केवळ अर्थशास्त्र विषयावरच माहिती आहे असे नाही तर राज्य चालविताना लागणार्‍या सर्वच विषयावर कौटिल्याचे भाष्य आहे. आणि विशेष म्हणजे त्याकाळात धर्माचा एवढा पगडा असल्यावरही हा ग्रंथ व्यवहारपातळीच्या जवळ जाणारा दिसतो.

मला पुसटसे आठवते त्याप्रमाणे, दुर्गा भागवत संकलीत कौटिलीय अर्थशास्त्राच्या पुस्तकात त्यांनी एक गोष्ट लिहीली होती, ती म्हणजे "अर्थशास्त्र" म्हणजे आजच्या काळात धरले जाते तसे केवळ "इकॉनॉमिक्स" नव्हते तर चार पुरूषार्थातील तो एक भाग होता ज्याच्या आधारे आणि नियमांवर समाज चालतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 3:36 am | निनाद मुक्काम प...

सखोल
माहिती देणारा सकस लेख आहे .

अर्धवटराव's picture

27 Jan 2011 - 4:11 am | अर्धवटराव

जुन्या व्यवस्थेतुन संविधानाच्या आधारे चालणार्‍या व्यवस्थेत आपल्या राज्यव्यवथेचे जे ट्रांन्सफॉर्मेशन झाले त्याचा सुंदर आढावा !!

अर्धवटराव

सहज's picture

27 Jan 2011 - 6:32 am | सहज

शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयातील प्रमुख नोंदीची उजळणी छानच.

पण १९५० नंतर आजपर्यंतचा प्रवास व यापुढील आव्हाने यावर आता फोकस हवा असे वाटते.

त्या अनुषंगाने, नीलकांत ह्या लेखाचा पुढचा भाग लिही असे सुचवतो.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 12:06 pm | स्वाती दिनेश

नीलकांत, उत्तम लेख..( मिपाच्या संपादकीयाची आठवण झाली..)
स्वाती

विजुभाऊ's picture

27 Jan 2011 - 1:00 pm | विजुभाऊ

सहजकाकाशी सहमत.
एक संतुलीत लेख
नीलकान्त या निमित्ताने भारतीय समाजाची १९५० ते २०१० सहा दशकांची वाटचाल मांडावीस असे सुचवतो.
समाजदवादी विचारसरणीतून आपला समाज भांडवली विचारसरणी कडे ८० च्या दशकात वातचाल करू लागला.
यातून मध्यमवर्गाचा उदय झाला. शिक्षीत शेतकरी वर्ग हा देखील सधन होउ लागलाय.
मध्यमवर्गाच्या दृष्टीने पाहिले तर १९९५ नन्तर सुवर्णयूगाचा प्रारंभ झाल्या सारखेच झालेय.छोट्या शहरांचा उदय झाला. तालुक्याच्या गावात देखील बर्‍याच सुवीधा मिळु लागल्य आहेत.
पण आहेरे आणि नाहीरे ही दरी वाढतच चाललीय.
जागांचे भाव मध्यमवर्गाच्या देखील आटोक्याबाहेर चाललेत.
भांडवली गुंतुवणुक वाढत चाललीय.
नवे रोजगार होऊ घातलेत.
हे चित्र सर्व व्यापक व्हावे .

विसुनाना's picture

27 Jan 2011 - 4:52 pm | विसुनाना

लेख आवडला.

आजची व्यवस्था सर्वोत्तम नसली तरी अतिशय उत्तम आहे.

-मुळात आपली राज्यघटना ही एका आदर्श समाजाची रचना करण्यासाठी (योग्य रितीने आणि योग्य प्रतिनिधींनी राबवली तर) सर्व जगाला ललामभूत ठरेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. परंतु वर कंसात लिहिलेला मजकूर प्रत्यक्षात न उतरल्याने तिची पायमल्ली होत आहे.
वर सहज यांनी म्हटल्याप्रमाणे १९५० नंतर कोणत्या टप्प्यांवर तिच्यावर आघात झाले , (ते कसे टाळता आले असते?) आणि कोणत्या योग्य नव्या गोष्टी तिच्यात अंतर्भूत झाल्या याचाही आढावा उत्तरार्धात घेतल्यास उत्तम.

नीलकांत's picture

27 Jan 2011 - 9:44 pm | नीलकांत

नमस्कार,
अनेक दिवसांनी लेख लिहायचे ठरवले आणि दिनविशेष म्हणून लिहायला लागलो. लिहीण्यासारखे खुप काही आहे. जसं १९२० ते १९३० चे दशक लिहायला लागलो तेव्हा अनेक वेगवेगळे प्रवाह एकत्र यायला लागले त्यावर लिहावंसं वाटतंय ते कधीतरी लिहील. सध्या वाटाड्याच्या शंकेविषयी...

मी आजची भारताची व्यवस्था खुप चांगली आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी आजच्या व्यवस्थेची तुलना गेल्या काही शतकांतील भारतातील वेगवेगळ्या शासकांच्या काळातील व्यवस्थेशी करतो आणि मला लक्षात येतं की सामान्य मानसाला सर्वाधीक अधिकार याच व्यवस्थेत दिलेले आहेत. कुठल्याही व्यवस्थेत काही चांगल्या तश्या काही वाईट गोष्टी असतात. तश्याच आपल्या व्यवस्थेत सुध्दा आहेत. मात्र सामान्य आणि सर्वात खालच्या स्तरातील लोकांना आज प्रगतीच्या ज्या शक्यता आज उपलब्ध आहेत त्या या आधी कधीच नव्हत्या. आज आपण आपल्या मुलभूत हक्कांना संरक्षण आहे. आपण - अभिव्यक्ती, शांततेत निशस्त्र एकत्रीत येणे, संघटना बनवण्याचे, देशात कुठेही फिरण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे( काही पात्रता वगळून), कुठेही मालमत्ता संपादन करण्याचे(अपवाद) असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवतो. हे सर्व या आधी कधीच नव्हते.

संविधान बनवतांना अश्या अनेक गोष्टी दूर दूर पर्यंत शक्य वाटत नव्हत्या मात्र त्यासाठी प्रयोजन केलेले दिसून येते. त्याकाळात सामान्य जनतेत नसलेली राजकीय प्रगल्भता पुढे येईल असे अपेक्षीत होते. आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो. आज आपल्यासमोर असलेल्या कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही व्यवस्था तयार आहे. पुरेशी लवचीक आहे. आणि त्यासाठी मार्गसुध्दा राजरोस उपलब्ध आहेत. हे असं या आधी कधीच नव्हतं. म्हणून ही व्यवस्था उत्तम आहे असं मी म्हणालो.

स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रवास सुध्दा खूपच रोचक आहे. नेहरू युग, त्या युगात त्यांनी केलेले नव्या भारताच्या पायाभरणीचे काम, त्यांची काश्मिर आणि चीन बाबतची भूमीका... अश्या अनेक बाबी आहेत, पुढे इंदीरा गांधींचा काळ, हा सर्वात थरारक होता असे मी मानतो.

स्वातंत्र्योत्तर काळात १९८० ते १९९० चे दशक खूप उलथापालथीचं होतं. मंडल आयोग,ब्ल्यु स्टार, शहाबानो, सुचना तंत्रज्ञान, बोफोर्स, रामजन्मभूमी असे अनेक आयम आहेत, सोबतच याच धामधुमीतून आजच्या राजकाणारणात आघाडीवर असलेले सर्व नेते पुढे आले. नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या आर्थीक घडीचा कालखंड संपलेला असून आता नवीन जगाशी हात मिळवून चालायला पाहीजे हे लक्षात घेऊन खा-उ-जा धोरण राबवण्यासाठी केलेली धडपड हा सर्व इतिहास झकास आहे.

- नीलकांत

स्वातंत्र

इन्द्र्राज पवार's picture

27 Jan 2011 - 9:47 pm | इन्द्र्राज पवार

".....सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे. ...."

~ वरील वाक्याबद्दल खुद्द धागाकर्तेच म्हणतात, "मला कल्पना आहे की मी जरा धाडशी वाक्य बोलतो आहे..." तर त्यांच्याही मनात कुठेतरी सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल (वा त्याच्या अंमलबजावणीबाबत..) पाल चुकचुकत असेल. प्रशासकीय व्यवस्था भारतीय घटनेतील तरतुदीनुसार अंमलात आलेली एक अशी रचना आहे की त्या अनुषंगाने प्रशासानाचा रथ जर चालविला गेला तर खर्‍या अर्थाने देशातील सर्वात शेवटच्या घटकाला "कल्याणकारी" राज्याची फळे चाखायला मिळतील. ICS कॅडरमध्ये काम केलेल्या भारतीय अधिकार्‍यांना त्याच पातळीवरील ब्रिटिश ऑफिसर्स यांचे "प्रशासकीय सेवे"चे मार्गदर्शन उत्तमरित्या मिळत असे (हे मान्यच करावे लागेल) त्यामुळे रामचंद शिवदासानी, केपीएस मेनन, सी.डी.देशमुख, बद्रुद्दिन तय्यबजी, वेंकटाचारी, एल.के.झा, गोविंद नारायण, सीपी श्रीवास्तव आदी प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे जरी उच्चारली तरी नजरेसमोर एक "आदर्श" येतो ज्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशासकीय व्यवस्था किती चांगल्या प्रकारे आणि चांगल्याच कारणासाठी राबविली गेली होती याचे चित्र नजरेसमोर येते. संसद सदस्य आणि किरकोळ मंत्री तर देतीलच पण अगदी पंडित नेहरूंदेखील आयसीएस अधिकार्‍यांच्या विद्वत्तेला मान देत असत, त्याला कारण म्हणजे या अधिकार्‍यांच्या नैतिकतेचा दबदबा.

आयसीएस जाऊन आयएएस आले. या सेवेचे आकर्षण वाढत गेले आणि जरी "टॅलेन्ट" लागत असले तरी "आपल्या भल्याबुर्‍याच्या किल्ल्या मंत्र्याच्या हाती आहेत..." ही जाणीव घर करू लागल्यावर गेल्या काही वर्षात या सेवेचे दुसरे नाव 'त्यांच्या कृपाछ्त्राखाली आहे करीअर तोपर्य्ण्त होईल तितके कमावून घेणे' असेच झाल्याने मध्य प्रदेशमधील बहुचर्चित अरविंद जोशी आणि सौ. टिनू जोशी यांच्यासारखेच आयएएस अधिकारी निर्माण होत राहतात....आणि इतरत्रही असेच असतील तर प्रशासकीय सेवा कोणत्या अर्थाने 'नवीन बदलांना सामावून घेणार?' हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडातोच. ३ कोटीपेक्षा जास्त रोकड, २५० एकर जमीन, देशातील मोठ्या शहरात २५ फ्लॅट्स, दागदागिन्यांची तर मोजदादच झालेली नाहे....या जोशी दांपत्याच्या घरी सापडून [दोघेही की पोस्टवरील आयएएस अधिकारी] सार्‍या देशाने "त्या" पदाची झालेली अवहेलना पाहूनही आज त्यांच्याच परिवारातील आयएएसची लॉबी त्या जोडप्यावर होत असलेली कारवाई कशी टाळता येईल या प्रयत्नात असल्याचे पाहून मन विषण्ण होणारच.

आता 'जोशीदांपत्यासारखे अपवाद सर्वच क्षेत्रात असणार...' असे म्हटले गेले तर ती शुध्द पळवाट ठरेल आणि एकप्रकारे आपल्याच घटनेची ती वंचना ठरेल. कारण अन्य क्षेत्रातील खाबुगिरी करणारे आणि आयएएस अधिकार्‍याने (त्यातही एक स्त्री) तोच मार्ग अवलंबणे तसेच त्यांच्या कृष्णकृत्याला त्यांच्याच भाऊबंदांनी पाठीशी घालणे या बाबी प्रशासकीय सेवा संतुलीत आणि लोकाभिमुख मानता येणार नाही, आणि जर अशा पाण्यातील प्रशासन असेल तर मग त्यात जगणार्‍या साध्या माश्यालादेखील तहान लागल्याशिवाय राहाणार नाही.

~~ हे झाले प्रशासकीय व्यवस्थेबद्दल.....राजकीय व्यवस्थेबद्दलही असेच लिहिता येईल. तिथे तर आनंदच आहे. असो.

(बाकी समयोचित लेखाबद्दल....जो एक प्रकारे घटना वाटचालीचा थोडक्यात इतिहासच आहे.... श्री.नीलकांत यांचे अभिनंदन.)

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2011 - 8:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभ्यासपूर्ण धागा आणि इंद्रा, सुनील यांचेही उत्तम प्रतिसाद.

शाहरुख's picture

29 Jan 2011 - 11:05 pm | शाहरुख

चांगली माहिती मिळाली धाग्यातून !

देशाचा इतिहास फारसा माहित नसल्याची आणि शाळेत शिकलेला इतिहास विसरल्याची जरा लाज वाटली :(

ऋषिकेश's picture

28 Jan 2011 - 8:54 am | ऋषिकेश

वा अभ्यासपूर्ण धागा आणि रोचक धांदोळा

अवांतरः हे वाचून मागे मधेन सोडून दिलेली 'एक ऐतिहासिक घटना' ही मालिका पुन्हा सुरू करावी अशी इच्छा होत आहे.. बघुया कसे जमते ते :)

आजानुकर्ण's picture

28 Jan 2011 - 9:35 am | आजानुकर्ण

उत्तम लेख आणि प्रतिसाद. नीलकांतचा लेख आवडला.

यशोधरा's picture

28 Jan 2011 - 10:03 am | यशोधरा

नीलकांत, सुरेख लेख. आवडला. पुढे प्रतिसादात लिहिले आहेस, तेही.

इन्द्र्राज पवार's picture

28 Jan 2011 - 10:33 pm | इन्द्र्राज पवार

"....आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो...."

श्री.नीलकांत.... येथे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो तुमच्या या विधानामुळे.

कुठल्या निवडणुकीविषयी तुम्ही बोलत आहात? आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे. ती इथे या धाग्यावर वा नव्याने होणे फार फार गरजेचे आहे, अन्यथा वरील वाक्याचा अर्थ 'विशफुल थिंकिंग' असा होऊ शकतो.

इन्द्रा

ऋषिकेश's picture

29 Jan 2011 - 9:43 am | ऋषिकेश

अश्या बर्‍याच निवडणूका आहेत. आणिबाणीनंतरच्या निवडणूका तर आहेतच, बिहारमधील नितीशकुमार यांचा विजय असो किंवा उमा भारती यांचा मध्यप्रदेशातील विजय असो भारतीय जनतेने सुज्ञपणा दाखवला आहेच. याशिवाय केरळमधील डाव्यांचा पराभव, ओरीसातील बिजु पटनायक यांच्या बेरजेच्या राजकारणाला पाठिंबा दाखवल्यानंतर मतदारांना सुज्ञच म्हणावे लागते.

नीलकांत's picture

29 Jan 2011 - 8:17 pm | नीलकांत

स्वतंत्र भारतात निवडणुका ह्या भारतातील नागरीकांना आपले मत देण्याची संधी देतात. नेहरू युगात निवडणुका केवळ त्यांच्याच नावावर व्हायच्या. काँग्रेस संघटन मजबुत होतं. मात्र पुढे परिस्थिती बदलली. नेहरूंच्याच मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनसंघ नावाच्या पक्षाची स्थापना केली. समाजवादी, कम्युनिस्ट, रिपब्लीकन पक्ष आदी होतेच.
नेहरू नंतर शास्त्रीजी आले आणि त्यांच्या अकस्मात निधनानंतर इंदीरांजींच्या आगमनामुळे काँग्रेस मध्ये फुट पडली. इंदीराजींनी निवडणुक लढवून सत्ता संपादन केली. यावेळेला जनतेने इंदीराजींना कौल दिला.

आणिबाणी आल्यानंतर त्यापुढील निवडणूकीत इंदीरांजींच्या विरोधात जनतेने कौल दिला. पर्यायी सरकार ठिक राज्यकारभार करू शकले नाही हे बघुन परत इंदीराजींना कौल दिला.
इंदीराजींच्या हत्येनंतर जनतेने काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधीक मताधिक्याने राजीव गांधींना कौल दिला. राजीव गांधींच्या काळात आलेल्या असंख्य अडचणींमुळे व त्यांची योग्य हाताळणी न झाल्यामुळे ८० च्या दशकात प्रादेशीक पक्षांना महत्व यायला लागले. व काँग्रेस वेगवेगळ्या राज्यांत आपली सत्ता गमावू लागली. आसामचा प्रश्न , 'आसू' संघटनेचे आंदोलन आणि शेवटी आसाम गण परिषदेचे आसाम मध्ये काँग्रेसला हरवून निवडणुक जिंकने. हा त्यातीलच एक टप्पा.

आणिबाणी नंतर जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. गांधीचा गांधीवाद सोबत घेऊन मालवियांच्या एकात्म मानववादातून वाटचाल करणार्‍या या पक्षाला शहाबाणो प्रकरणाने हाती आयताच मुद्दा मिळाला. यामुळे हिंदू मतांचं भावनीक ध्रुवीकरण करायला सुरूवात झाली. याच दशकात रामजन्मभूमीचे आंदोलन तापलं. यामुद्द्यावर भारतीय जनता भाजपसोबत गेली. त्यांच्या खासदारांची संख्यावाढायला लागली होती.
पुढे भ्रष्टाचार आणि कमकुवत पक्ष संघटनामुळे कमजोर झालेली काँग्रेस राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्ये मुळे काँग्रेस परत सहानुभूतीमुळे परत सत्तेवर आली मात्र यावेळी अल्पमताचं सरकार होतं. राजीव गांधीनंतर काँग्रेसची अवस्था पारच ढेपाळली होती. कुणीही गांधी यावेळी समोर नव्हतं. आणि दिसणारे चेहरे नरसिंहराव, मनमोहन सिंग, सिताराम केसरी सारखे होते. यावेळी विरोधी पक्षाजवळ अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आदी आक्रमक लोक होते. सोबतच राज्य पातळीवर पाहिलं तर उत्तर प्रदेश व बिहार हे महत्वाचे दोन राज्ये याच काळात काँग्रेसच्या हातून गेले. ते अद्याप परत मिळवता आले नाही. राजीव गांधींच्या मृत्युनंतर समाजवादी, बसपाचा विकास झालेला दिसून येतो.

यावेळी राष्ट्रीय प्रतिमा असलेल्या नेत्यांची वानवा झालेली दिसून येते. भाजपा कडे काही लोक होते मात्र आता स्थानिक पातळीवरचे मुद्दे हावी झालेले दिसून येतात. तामीळनाडु, कर्नाटक, पश्चिम बंगाल , जम्मु काश्मिर येथे आधीपासूनच प्रादेशीक पक्ष सत्तेत होते, बिहार, ओरीसा, राजस्थान आदी राज्यांत सुध्दा अन्य पक्ष मजबुत झालेले दिसतात.

पुढे जनतेने काँग्रेसचा पाठींबा काढला आणि प्रादेशिक पक्षांना दिला. सोबतच राममंदीराच्या मुद्द्यामुळे भाजपा मजबुत झाली. एक काळ असा आला की भाजपा तिसर्‍यांदा सत्तेवर आली. एकीकडे असे दृष्य होते की भाजपाजवळ एकाहून एक मुलुख मैदान तोफा होत्या, भारत सॉरी इंडीया शायनींग होत होता. अश्यावेळी जिला ठीक ठाक म्हणावे असं हिंदी सुध्दा येत नव्हतं अश्या सोनीया गांधींच्या मागे देश उभा राहीला. आणि काँग्रेसचा तळ गाठायला लागलेला आलेख वर वर जायला लागला आहे.

हा पराजय जसा भाजपाला अनपेक्षीत होता तसाच हा विजय कॉग्रेसला सुध्दा अनपेक्षीतच असावा असं माझं मत.
अश्या अनेक वेळी भारतीय जनतेने सत्तापालट करून दाखवलेला आहे.

राज्य स्तरावर तामीळनाडु मध्ये कशी चितपट होते ते आपण बघतोच. सर्व देशातील मिडीया आणि पक्ष मोदी विरूध्द उभे राहील्या नंतर सुध्दा जनतेच्या पाठींब्यावर मोदी परत विराजमान आहेत. बिहार मध्ये नितीश यांना जनतेने आणलं आणि लालू राज संपवलं.

याच लोकसभा निवडणूकांत लालुप्रसाद, आणि पासवास यांचे जनतेने काय हाल केले ते विसरलात का? :)

खरं सांगायचं तर ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे.

- नीलकांत

चित्रा's picture

31 Jan 2011 - 3:15 am | चित्रा

ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे.

आपल्याला काही ताकद आहे असे भारतीय जनतेला खरेच जाणवते का असे वाटते. जे होते ते ताकद म्हणूनच होते. पण मतदार मात्र खिन्न दिसत असतो. निदान शहरी, शिक्षित मतदार तरी.

पंगा's picture

29 Jan 2011 - 10:28 pm | पंगा

आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे.

"ऑल पॉलिटिक्स इज़ लोकल" या तत्त्वाबद्दल आपण ऐकलेले नाहीत काय?

विसोबा खेचर's picture

29 Jan 2011 - 10:09 am | विसोबा खेचर

एखादा सुरेख अग्रलेख शोभावा असा लेख..

नीलकांता, जियो..!

तात्या.

राजेश घासकडवी's picture

29 Jan 2011 - 10:04 pm | राजेश घासकडवी

कधीकधी मिपावरचे लेख वाचताना खूपच व्यक्तिकेंद्रित लेखन होताना दिसतं. त्या पार्श्वभूमीवर हा भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा धावता आढावा आवडला. हा लेख खरं तर किमान चार भागांत यावा असं वाटलं.

गेल्या पासष्ठ वर्षांच्या कालखंडावरही लेखन करावं ही विनंती.

पंगा's picture

29 Jan 2011 - 10:24 pm | पंगा

थोडक्यात, "नीलकांता, आता भोग आपल्या कर्मांची फळे!" :)

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:13 am | गुंडोपंत

लेख आणि प्रतिसाद आवडले.

नीलकांत-जी,
यापुढील जे लेख आपण लिहाल त्यात
(१) Presidential System आणि Parliamentary System यांची तूलना आणि दोन्हीतील चांगल्या-वाईट गोष्टी याबद्दलही वाचायची इच्छा आहेद.
(२) भ्रष्टाचार आणि त्याच्या पाठोपाठ काळ्या पैशाचा व्यवहार (देशातला आणि देशाबाहेरचा) कसा सुरू झाला 'कॅश पेमेंट' आणि 'चेक पेमेंट'ची पद्धत कधी आणि कशी सुरू झाली याबद्दलही माहिती दिल्यास वाचायला आवडेल. माझा अमेरिकन बॉस म्हणत असे कीं अमेरिकेत मोठी रक्कम कॅशमध्ये द्यायची इच्छा असेल तरीही देता येत नाहीं. (किती खरे-खोटे माहीत नाहीं. कदाचित् ड्रगमनीसारखे व्यापार आजही अमेरिकेत होत असतीलही.) पण रोजच्या आयुष्यात मात्र Credit Card किंवा Check वापरलेलेच पाहिले आहे. Cash payments होत नाहींत हेही पाहिले आहे.
मी अमेरिकेत जातो तेंव्हां माझ्याकडे American credit card नसते. तेंव्हां मी जर Super Market मध्ये १०० डॉ.ची नोट दिली तर बर्‍याचदा तिथल्या कॅश रजिस्टर चालवणार्‍या मुली आश्चर्य दर्शवितात!
कृपया या दोन्ही मुद्द्यांवर नीलकांत-जी किंवा इतरही कुणी प्रकाश टाकावा किंवा नवा धागा काढावा असे वाटते.

इन्द्र्राज पवार's picture

31 Jan 2011 - 7:20 pm | इन्द्र्राज पवार

श्री.नीलकांत आणि श्री.ऋषिकेश यानी "निवडणुका" संदर्भात जे प्रतिसाद/उत्तर दिले आहे त्या अनुषंगाने ~

लोकशाही प्रणाली मानणार्‍या देशाच्या जडणघडणीचे भवितव्य निवडणुका ठरवित असतात हे तरी अमान्य होण्यासारखे नाही. पण भारतातील निवडणुका, अगदी स्वातंत्र्याच्या काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून, "भावनिक" प्रश्नावर लढविल्या गेल्याचे दिसून येते. बैलजोडीवर शिक्का का मारायचा? तर पंडितजीसाठी, पुढे गाय-वासरू वर का? तर अर्थातच इंदिरा गांधीसाठी. आणीबाणीचा कालखंड हा हुकूमशाहीचा अंधःकार आहे ही भावना जेपीनी चेतविली आणि तिचा परिणाम गायवासरू गोठ्यात पडून राहिले, पण जनता पक्षाला सत्तेची पद्मिनी टिकविता येत नाही हे पाहिल्यावर दोनअडीच वर्षानंतर परत नव्याने आलेल्या 'पंजा' ची मोहिनी. कालपर्यंत विमानतळाशिवाय दुसरा प्लॅटफॉर्म न पाहिलेला एक युवक खंडप्राय देशाचे सुकाणू हाती घेतो....का? तर त्याच्या मातेची हत्या झाली म्हणून.

अशा या भावनिक बंधार्‍यावर बांधलेल्या निवडणुकातून देशाने काय साध्य केले असेल तर हे की, लोकसभा असो वा विधानसभा इथे जाणारे उमेदवार काय आणि म्युनिसिपालिटी येथे जावून स्थानिक पातळीवरील जकात वाढीचे प्रश्न "हाताळणारे" नगरसेवक यांच्यात काही फरक राहिला नाही. शहरातील एका वार्डाचा नगरसेवक आणि दिल्लीत जाणारा एक खासदार या दोन्ही कल्पना सर्वस्वी भिन्न आहेत. पण दिसते असे की, आपल्या शहरातील खासदार हा कोणत्या पक्षाचा हीच कसोटी असल्याने मग पक्षाने तिथे "मौनीबाबा" उभा केला तरी त्याच्या नावासमोरील पक्षाचे बटन दाबले की बजावला आपल्या मताचा 'घटनात्मक हक्क'. हे चित्र बदलले गेले असे एकाही (लोकसभा) निवडणुकीत दिसून आलेले नाही.

सध्याची शासनपद्धती अमान्य म्हणून निवडणुकांवर बहिष्कार हा उपाय होऊच शकत नसल्याने कोणत्या शासनपद्धतील पाठिंबा देणे व त्या अनुषंगाने घटनेची वैधानिकता मान्य करणे हा विषय खरे तर व्यापक दृष्टीने चर्चेचा विषय होऊ शकतो, पण शेवटी 'मतदार राजा' ची मानसिकता बदलणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही हे वारंवार सिद्ध झाले असल्याने निकालांकडे हतबलतेने पाहणे याच्याशिवाय दुसरा मार्ग सद्यःस्थितीत नाही.

आणीबाणीचा उल्लेख वर कित्येक ठिकाणी आला आहे. पण ज्या स्थितीला जयप्रकाशजींनी ठोसपणे विरोध केला होता आणि निदान त्या काळापुरते तरी देशाचे चित्र बदलून टाकले होते, ते चित्र त्यांच्या हयातीतीच विद्रुप केले गेले, ते त्यांच्याच आशीर्वादाने निवडून आलेल्या साथिदारांनी. जेपींची रणनीती सुधारणा अथवा क्रांती यापैकी एकही मुक्काम गाठण्यात समर्थ ठरलेली नाही. मग साहजिकच "भ्रमनिरास" झालेल्या मतदाराने पुन्हा जुनीच वाट चोखाळली हा तर इतिहासच आहे. असे होण्याचे कारण म्हणजे जरी खुद्द हे "राजकारणापासून अलिप्त" असणारे "संत" जनसमुदायामध्ये नवचेतनेचा संचार करून त्यांच्याकडून जबरदस्त प्रतिसाद मिळवू शकतात, तरीपण संधी मिळूनही ते नौकेचे सुकाणू आपल्या हाती घेण्यास तयार होत नाहीत असा इतिहास सांगतो. महात्मा गांधी काय, जे.पी. काय आणि अगदी आजच्या राजकारणातील बाळासाहेब असोत वा सोनिया. हे मान्यच करावे लागेल की या चौघांनीही (ही नावे प्रतिकात्मक या भूमिकेतून घेतली आहेत, हे लक्षात असू दे) आपल्या वर्तनाने, वाणीने आणि पक्षीय मार्गाने जनसमुदायावर एक विलक्षण अशी मोहिनी घातली होती/आहे. सर्वांनी आपापल्या पक्षाला भरीव आणि दीर्घकालीन असे यश मिळवून देण्याचे कार्य केले होते/आहे. पण सत्ताकेन्द्रस्थानापासून दूर राहून 'माझे कार्य पक्षाला असेंब्ली आणि पार्लमेंटपर्यंत पोहोचविणे' एवढेच मानल्यामुळे ज्याच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या तो काय करेल ते करेल अशी वृत्ती बाळगल्याने नेमके त्यांच्या करिष्म्याने काय साधले हा सार्वत्रिक प्रश्न आता उभा ठाकला आहे.

"मी गांधीजींचे कार्य पुढे नेईन, मी जेपीना शपथ दिली आहे, बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र मी सत्यात आणीन, सोनियाजींचे हात मी दिल्लीत जावून बळकट करीन...." सदृश्य घोषणांनी निव्वळ टाळ्या मिळविल्या आणि लोकचेतनेच्या धगीवर वैयक्तिक पातळीवर आपापल्या पोळ्या भाजून घेतल्याचे वा घेत असल्याचे या नेत्यांनी "याची देही याची डोळा" पाहिले आहेच. मग निवडणुकातून बदल बदल म्हटले जाते ते नेमके कुठले बदल आहेत?

वरील प्रतिसादात मी ज्यावेळी 'निवडणूक' म्हणतो त्यावेळी लोकसभा हाच अर्थ घेतो. 'आदर्श ग्रामपंचायती' चा पुरस्कार मिळालेला सरपंच देशाचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. त्याच चालीवर नरेन्द्र मोदी आणि नितिशकुमार यांच्या पदरी भरघोस यश ओतणारा मतदार त्याच राज्यातून दिल्लीत पाठविल्या जाणार्‍या उमेदवाराबाबतही तितकाच सजग असेल असेही नाही. म्हणजेच निवडणूक म्हणजे माझ्या राज्याच्या विकासापुरताच विचार ही संकुचित भावना दिवसेदिवस वाढत चालली आहे तिचे परिणाम देशाचा कारभार ठिसूळरितीने चालत राहाणार असे काहीसे उदासवाणे चित्र समोर येत आहे.

इन्द्रा

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jan 2011 - 7:48 pm | प्रकाश घाटपांडे

आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो.

तुम्ही आम्ही आपण सगळेच या व्यथेत सामील आहोत.