उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत.
ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.
"झाले बहु होतीलही बहु परंतु ह्या सम हा"
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन
‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :
“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !
काय घडत होतं ?
हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.
काय मोडणार होतं ?
हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.
घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता
त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !
साभार - स्वरूपयोग
प्रतिक्रिया
9 Dec 2010 - 12:39 pm | चिंतामणी
साभार- http://www.savarkar.org
9 Dec 2010 - 1:01 pm | sagarparadkar
झालं आता अनेक थत्तानींचा सावरकर विरोधी पोटशूळ उठणार ...
संपादक मंडळास आक्षेपार्ह वाटल्यास प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही :)
9 Dec 2010 - 9:54 pm | नितिन थत्ते
>>अनेक थत्तानींचा सावरकर विरोधी पोटशूळ उठणार ...
असं होय?
मी तर वेगळाच प्रश्न विचारणार होतो. प्रतिक्रियांमध्ये अजून "या महान वगैरे वगैरे विभूतीला ठराविक लोकांमुळे मिळायला हवं तितकं थोरपण मिळालं नाही" हे रडगाणं कसं नाही आलं अजून?
संपादकांनी वरचा प्रतिसाद उडवल्यास हा ही उडवावा. कारण तो फक्त या प्रतिसादासाठीच आहे.
माझेही हे आवडते गाणे आहे.
9 Dec 2010 - 2:13 pm | अवलिया
सुरेख लेखन !
हे माझे फार आवडते गाणे आहे... फार फार आभारी आहे मी तुमचा !
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम !!
9 Dec 2010 - 2:21 pm | शिल्पा ब
+१
9 Dec 2010 - 2:24 pm | छोटा डॉन
अवलियाशी सहमत ...
'ने मजसी ने परत मातॄभुमीला ...' हे फार सुंदर गाणे आहे, आमच्या बालवयात १५ ऑगश्ट किंवा २६ जानेवारीला शाळेत हे गाणे हटकुन लावायचे, मस्त मस्त वाटायचे.
आभारी आहे :)
- छोटा डॉन
9 Dec 2010 - 2:38 pm | मेघवेडा
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!
गाण्याबाबत तर काय बोलावे! केवळ अप्रतिम!
9 Dec 2010 - 2:26 pm | sneharani
मस्त लिहल आहे!
:)
9 Dec 2010 - 2:28 pm | नगरीनिरंजन
खूपच सुंदर भावना आणि शब्द असंलेलं गीत आहे हे. रसग्रहण छानच केले आहे.
पण १०१ वर्षात परिस्थिती किती बदलली नाही? आता उलट्या अर्थाची गीते जास्त म्हटली जातात :-)
9 Dec 2010 - 6:56 pm | sagarparadkar
१०००% टक्के सहमत ...
सध्या चालू असणारी बेबंदशाही पाहून अनेकदा असेच मनात येतं ...
"ने मजसि ने परत आंग्लभूमीला , सागरा प्राण तळमळला"
9 Dec 2010 - 2:29 pm | इन्द्र्राज पवार
श्री.चिंतामणी...धन्यवाद !
मी स्वतःला कट्टर सावरकर-भक्त समजतो, पण असे असले तरी सावरकरांचे राजकीय विचार पसंत नसलेल्याविरूद्ध (आणि ते प्रामुख्याने महाराष्ट्रातच आहेत...) मी हातघाईवर न येता यथाशक्ती त्यांच्याशी वैचारिक पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. यश येवो अथवा ना...पण दोन्ही घटक 'सावरकरां'च्या एका दैवी गुणापुढे एकमताने नतमस्तक होतात....ती म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरील अजोड प्रभुत्व !
या क्षणी अगदी मध्यरात्री मला गाढ झोपेतून उठवून तुम्ही मला "ने मजसी...." म्हणायला सांगितले तर मी कानामात्रेचा फरक न करता म्हणून दाखवेन. पण अर्थ सांगताना जिभ कोलमडून पडेल....वर तुम्ही दीर्घ स्वरूपात दिलेल्या अर्थाची गंगा ही बाब स्पष्ट करते की, कविता पाठांतर आणि अर्थासह रक्तात भिनवून घेणे हे किता महाकठिण काम आहे.
तुम्ही 'स्वरूपयोग' चे त्या महान कवितेच्या अर्थाबद्दल आभार मानले आहेत; पण मी तुमचे, तो इथे दिल्याबद्दल, आभार मानतो.
वीर सावरकरांना विनम्र अभिवादन !
इन्द्रा
9 Dec 2010 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुरेख लेखन.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
9 Dec 2010 - 3:11 pm | ५० फक्त
हे माझंही अतिशय आवडतं गाणं आहे, त्याचं तुम्ही केलेलं रसग्रहण सुद्धा खुप छान आहे. धन्यवाद त्या बद्दल.
हर्षद.
9 Dec 2010 - 4:26 pm | अपूर्व कात्रे
फारच सुंदर रसग्रहण...
गाणे ऐकता ऐकता आपले रसग्रहण वाचले. मनाला अधिक भिडले. आपल्याला धन्यवाद.
10 Dec 2010 - 12:25 pm | दीपक साळुंके
अनेक धन्यवाद !
वीर सावरकरांना विनम्र अभिवादन !
9 Dec 2010 - 5:27 pm | अब् क
केवळ अप्रतिम!!!!!!!!!! ___/\____
9 Dec 2010 - 6:09 pm | सूर्य
हे गीत अर्थासहित इथे सांगितल्याबद्दल अनेक आभार.
- सूर्य.
9 Dec 2010 - 6:16 pm | धमाल मुलगा
धन्यवाद चिंतामणी सायबा. :)
9 Dec 2010 - 6:24 pm | स्पंदना
असेच म्हणते.
कधीही ऐकताना मनाला एक पीळ पाडुन जात हे गीत.
9 Dec 2010 - 6:38 pm | मितान
बाबुजींच्या स्वरातलं केवळ एक वाद्य वापरून गायलेलं हे गीत आठवलं ! जगातल्या कोणत्याही समुद्रकिनार्यावर पाऊल पडले की मनात व्याकुळता घेऊन हे गाणे येतेच !
खूप सुंदर लिहिलंय तुम्ही. मनापासून धन्यवाद !!!
10 Dec 2010 - 1:11 am | मिसळभोक्ता
बाबूजींनी अगदी सोप्या ओव्यांसारख्या चालीत (जात्यवर दळल्यासारखे) म्हटले आहे हे गाणे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे, वहिनींच्या निधनामुळे दु:खित होऊन सावरकरांनी हे गाणे लिहिले. माधवानंदांनी त्यावर कैच्या कैच लिहिले आहे.
- मिभो
10 Dec 2010 - 10:22 am | चिंतामणी
माधवानंदांनी त्यावर कैच्या कैच लिहिले आहे.
अधीकृतरीत्या त्याची पार्श्वभुमी वरती लिहीले आहे तशीच आहेमाधवानंदानी बरेचसे बरोबर लिहीले आहे.
माझ्या वडीलांनी स्वा.सावरकरांच्या अनेक काव्यांचा संस्कृतमधे अनुवाद केलेला आहे. त्यावेळी स्वा.सावरकरांबरोबर वेळोवेळी चर्चा व्हायची. या काव्यासंबधातील चर्चेतील माहिती त्यांनी या अनुवाद केलेल्या काव्याच्या आधी (थोडक्यात) अग्निजा पुस्तकात दिला आहे. (बहुतेक सर्व काव्यांची आधी त्या काव्यासंबंधी माहिती दिली आहे.) ती पुढील प्रमाणे
शासनस्य रोषपात्रीभूते अभिनव-भारते सर्वथा अशक्यंम अधुना मम भारतं प्रति निवर्तनं इति दृढा मतिर अभूत श्री. विनायकरायाणाम.
एतादृश्याम अवस्थायाम एकदा ब्रायटन-ग्रामे समुद्रतीरं गतानां तेषां सहसा प्रियजनस्मरणेन एवं श्लोकत्वम आपद्यत शोकः
(हे पुस्तक १९५८ साली प्रकाशीत झाले होते.)
हा जिवनक्रम बघा. स्वा. सावरकर अंदमानात असताना सौ.येसुवहिनींचे निधन झाले. ब्रिटनमधे असताना नव्हे.
१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ दुसर्या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
हे काव्य १९०९ साली लिहीले आहे हे वरती वाचले असेलच.
10 Dec 2010 - 2:01 pm | मिसळभोक्ता
अर्थात, तुम्ही लिहिलेला अनुक्रम बरोबर आहे.
माझी एक मोठी शंका दूर झाली, असे कदाचित म्हणता येईल.
बाबूजी स्वतःला सावरकरांचे अनुयायी म्हणवून घेत. त्यांचे म्हणणे (म्हणजे येसूवहिनींच्या मृत्यूनंतर सदर कविता लिहिली गेली हे) चूक दिसते आहे. येसूवहिनींना काही मूलबाळ होते का ? असल्यास, ते मूलबाळ १९०९ च्या सुमारास निवर्तले का ?
10 Dec 2010 - 2:20 pm | चिंतामणी
स्वा. सावरकर यांचा पहीला मुलगा प्रभाकर हा चार वर्षाचा होउन गेला. त्यावेळी ते यूरोपात होते. (नक्की साल माहीत नाही). ही बातमी कळल्यावर त्यांनी "प्रभाकरस" ही त्याच्या स्मृत्यर्थ कविता लिहीली.
परसुनि यौवन-लतिकेला तूं पहिलें फूल फुले
तनया, तनु थरथरली स्नेहें नेत्र स्निग्ध झाले
अशी सुरवात होती त्या कवितेची.
10 Dec 2010 - 2:24 pm | मिसळभोक्ता
आपण जे काही लिहिले आहे, ते इतर माहितीनुसार बरोबर दिसते आहे, तेव्हा बाबूजींचे चूक आहे असे दिसते.
(बाबूजींनी त्यांच्या सावरकरांवरील चित्रपटात देखील हीच घोडचूक केली आहे, असे म्हणावे का ? त्या चित्रपटातील सदर दळणाचे , अर्र गाण्याचे, स्थान बघा.)
10 Dec 2010 - 2:53 pm | मिसळभोक्ता
येसूवहिनींना त्या काळात काही कारणाने घर सोडावे लागले होते का ? कारण बाबूजींनी असेच काहीसे दाखवले आहे. त्यांनी स्वातंत्रवीरांना त्यांची अशी दुर्दशा झाल्याचे पत्र लिहिले होते का ? सदर कविता लिहिण्यास तात्कालिक असे कौटुंबिक कारण असे बाबूजींनी म्हटल्याचे माझ्या स्मरणात आहे.
9 Dec 2010 - 10:00 pm | निनाद मुक्काम प...
पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले.
We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them
आज पर्यत माहित नसलेले असे किस्से जे पुढे आख्यायिका बनले .ते येऊ दे अजून
हा लेख लिहिल्याबद्दल प्रचंड आभार वाचून भर थंडीत शरीराला एक धग जाणवली .
मातृभूमीसाठी परदेशात राहून काही करता येण्यासारखे असेल तर नक्की करावे अशी प्रेरणा बापट ह्याच्या किश्यातून मिळते .त्यांना सेनापती हि पदवी का मिळाली ह्याचे इंगित आज कळले .
त्याच्याविषयी समग्र वाचायला आवडेल .
9 Dec 2010 - 10:19 pm | रन्गराव
चिंतांमणी, शब्द कमी पडतायत तुमचं कौतुक करायला. असच लिहित रहा :)
9 Dec 2010 - 10:43 pm | अर्धवटराव
शत शत प्रणाम !!
अवांतर : सावरकरांवर काहि विशिष्ट लोकांमुळे अन्याय झाला, त्यांना योग्य मान-सन्मान मिळाला नाहि.. इ. बाबींवर काथ्याकुट करण्यात काहि अर्थ नाहि. सावरकरांना मरतेवेळी स्वतःचे जीवन सफल आणि समाधानी वाटले. त्यांच्या दृष्टीने त्यांना कुठल्याच मान-सन्मानाची कधीच गरज नव्हतीच. राहिली इतरांची गोष्ट... तर या देशाला गरज वाटेल तर तो बघेल सावरकरांकडे, नसेल तर विसरुन जाईल. फायदा-नुकसान भारताचे होणार, स्वातंत्र्यवीरांचे नाहि.
(सावरकरप्रेमी) अर्धवटराव
10 Dec 2010 - 8:54 am | अवलिया
अगदी बरोबर.
10 Dec 2010 - 12:09 am | अविनाशकुलकर्णी
अतिशय सुरेख लेखन ....चिंतामणी..मस्त लिहिले आहे..
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
10 Dec 2010 - 12:14 am | प्राजु
अतिशय आवडते गाणे आहे..
त्यातले शब्द वाचताना नेहमीच अंगावर शहारे येतात.
स्वातंत्रवीर सावरकरांना... कोटी प्रणाम!
10 Dec 2010 - 12:14 am | चिंतामणी
नम्रपणे सांगु इच्छीतो की मी लेखाचे सुरवातीला सांगीतले आहे "‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे ". हे खूप वर्षापुर्वीचे लेखन मी या निमीत्ताने आपणासमोर आणले एव्ह्ढेच.
10 Dec 2010 - 6:02 am | गांधीवादी
छान लिहिलेले आहे.
अवांतर : facebook वर एक मागणी जोर धरत आहे.
http://www.causes.com/causes/373653-bhagat-singh-s-picture-on-indian-rup...
With due respect to Mahatama Gandhi, this cause is just created to show some more respect to other freedom fighthers of India .... Indian government should publish few limited version Indian rupee notes with a picture of Bhagat Singh and other freedom fighters .... This will educate the young, future of India more about Indian past and they will respect the fact that India earned freedom due to the sacrifices of many innocent, patriotic souls .... Let's join this cause and try to get a picture of Bhagat singh and other freedom fighters on Indian rupee.
भविष्यात अशी मागणी सावरकरांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते.
10 Dec 2010 - 9:46 pm | नगरीनिरंजन
हे मला पटत नाही. नुसते प्रतीकात्मक सन्मान करण्यातच आपण पटाईत होत चाल्लोय की काय असे वाटते. त्याच नोटा वापरून लोक काळे धंदे करणार आणि आपण स्वातंत्र्यवीरांचा योग्य सन्मान झाला असा स्वतःचा गोड समज करून घेऊन खुशीत राहणार का?
11 Dec 2010 - 7:35 am | गांधीवादी
ha युक्तिवाद करून झालेला आहे.
त्याला उत्तर असे आहे : महात्मा गांधींचे चित्र असून सुद्धा हे काळे धंदे सुरूच आहेत.
>>हे मला पटत नाही.
खरे तर मला कोणाचेही चित्र नोटांवर असावे हे पटत नाही. (पण असले तर मात्र सर्वांचे असावे, ह्यात गैर काय ?)
10 Dec 2010 - 2:26 pm | यशोधरा
सुरेख.
10 Dec 2010 - 9:37 pm | सर्वसाक्षी
आवाहनातही आव्हान असलेल हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच काव्य.
या लेखाबद्दल आपले आभार