ईशान ..... भाग २

निरंजन's picture
निरंजन in जनातलं, मनातलं
21 Oct 2010 - 7:09 pm

ईशान ..... भाग १ http://www.misalpav.com/node/15049

वरच्या मजल्यावर एका पडद्या समोर मला उभ केल आणि ईशान म्हणाला

"काका पडदा बाजुला करा. डेंजर भुत दिसेल तुम्हाला."

मला थोडा अंदाज आलाच होता. त्यामुळे पडद्याला हात लावताना मला खुप भिती वाटते अस मी नाटक करत होतो. मुलांकडे बघुन घाबरलेला चेहरा करत होतो आणि मुल खदखदून हासत होती. थोड्या वेळानी मी पडदा बाजूला केला. पलिकडे एक मोठा आरसा होता व त्यात माझ प्रतिबिंब दिसत होत. माझा मस्त पोपट केला होता त्या छोट्यांनी. एकमेकांना आनंदानी टाळ्या देत व मिठ्यामारत त्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. माझी फ़िरकी घेतली म्हणुन मी खोट खोट रडुन दाखवल. आणि मोठा माणुस आपल्या चिडवण्यानी रडु शकतो म्हणुन मुलं पोट धरुन हासत होती. एका प्रसंगानी माझी व त्यांची गट्टी जमली. मग तीथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्य़ा. शशांक छान गाणी म्हणायचा. रवी तबला वाजवायचा. कोणत्यातरी संगीताच्या क्लासमधे ते शिकत होते. शशांकचा आवाज इतका मधुर होता व रवीची बोटं तबल्यावर इतकी सफ़ाईनी फ़िरत होती की मी तर थक्कच झालॊ.

ईशान तर लहान असुन सर्व मुलांना सहज कंट्रोल करु शकत होता. हा चालू पोरगा तर मोठा नेताच होणार याबद्दल माझी मनोमन खात्रीच पटली.

आम्ही एकमेकांशी बोलताना इतके रंगुन गेलो, मुल माझ्या मांडीवर बसली होती. काही माझ्या खांद्यावर भार देऊन माझ्याशी बोलत होती. फ़ार गोड वातावरण होतं. संगीताची मैफ़िल झाल्यावर, ईशाननी मला एक एक मुलाची ओळख करुन देत त्यांची खासियत सांगायला सुरुवात केली. मग पिंकी छान नाच करते, मोहन कोणत्याही पक्षाचा आवाज काढतो वगैरे सर्व व ती मुलं मला त्यांच वैशिष्ठ दाखवत होते. परत शशांकनी एक गाणं म्हणल.

मी सहजच त्या मुलांना विचारल की तुम्हाला कोण व्हायचय ? कोणी "वैमानीक, कोणी डॉक्टर" "कोणी नर्स", कोणी काही कोणी काही उत्तर दिली. मी ईशान, रवी व शशांकला विचारल या तीघांनी मला काहीच उत्तर दिल नाही.

मी परत जायला निघालो. ही तीन मुल एकमेकांमधे काही तरी बोलत होती. मी गेटपाशी आलो. मुलांचा हात हालवून निरोप घेत होलो. आणि ईशाननी "काका एक मिनीट" म्हणुन मला थांबवल. ते तीघेही जवळ आले. मी खाली वाकलो. त्या तीघांनीही माझ्या गालाची पापी घेतली व निरोप दिला.

परत ईशान म्हणाला "काका एक मिनट," त्यानी मला बाजूला नेल व मला म्हणाला
"काका तुम्हि विचारलत की मोठेपणी तुम्ही कोण होणार ? तेव्हा आम्ही उत्तर दिल नाही. कारण काका आम्हाला माहीती आहे की आम्ही कधीच मोठे होणार नाही. मोठ होण्याआधीच आम्ही आमच्या आई-बाबांसारखे एड्‌स्‌नी मरुन जाणार आहोत."

मी त्या तिघांना जवळ घेतल. त्या तिघांच्या गालाची पापी घेत मी म्हणालो "नाही रे अस मुळीच नाही. आता बघ या रोगावर लवकरच औषध येणार आहे. आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. मला तुम्हाला मोठ झालेलच बघायच आहे" माझ्या बोलण्यातला खोटेपणा मला स्वतःला जाणवत होता.

मागे न बघता मी भराभर पायर्‍या उतरुन रस्त्यावर आलो आणि गाडित बसलो. माझे खरे खुरे अश्रु मला त्या मुलांना दाखवायचे नव्हते.

.

कथासमाजविचारअनुभव

प्रतिक्रिया

तुमचा वेळ सामाजिक कामाला दिल्याबद्दल अभिनंदन!

पैसा's picture

21 Oct 2010 - 10:17 pm | पैसा

:(