झोप.

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
18 Oct 2010 - 3:27 pm

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो,

झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे.

असो,
तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात.
दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे. रविवारी दुपारी गोडधोड आणि जड जेवण करुन संध्याकाळपर्यंत लोळत पडणे आणि सोमवारी दुपारी ऑफिसात पेंगत बसणे हा एक अलिखित कायदा बनला आहे आणि सर्वजण याचे अगदे मनोभावे पालन करतात.

काही लोकांना कधीही आणि कुठेही झोप येते, मग ऑफिसातली मीटींग असो किंवा बसमधला प्रवास. यांना वेळ काळ काही नियम लागू होत नाहीत. काहींना अंधार करुन झोपायची सवय असते. मग अगदी भर दुपार का असेना, हे खिडकीला चादरी बांधुन अंधार करतात, मोबाइल सायलेंट करुन गाढ झोपी जातात. काहींना पंख्याशिवाय झोप येत नाही, मग बाहेर कितीही थंडी असो, स्वेटर घालुन, दोन गोधड्या अंगावर घेतील पण पंखा चालुच ठेवतील. रात्री लाईट्स गेले आणि पंखा बंद झाला तर यांना कितीही गाढ झोपेतुन जाग येते.

काही जणांना सकाळी नाष्ता केल्यानंतर झोप येते, अगदी लहान बाळांना अंघोळ घालुन छान टिक्की पावडर करुन शालीत लपेटुन पाळण्यात झोपवतात तसे यांना सकाळी सकाळी अंघोळ करुन नाष्ता केला की पुन्हा बेड आणि रजई दिसायला लागते.

घोरणे या अत्यंत भयानक प्रकार. मग स्त्री असो वा पुरुष. काहीजण ईतक्या लयीत घोरतात की एखाद्य गाण्याच्या मैफीलीत सुद्धा हा माणुस ठेक्याला ताल देतोय असे वाटावे. काही जणांचे घोरणे रात्री घड्याळ्याच्या काट्याच्या आवाजाच्या तालावर चालु असते, म्हणजे इकडे टीक वाजला की दुसर्‍या टीक पर्यंत श्वास घेणे आणि पुढचे दोन तीक टीक ब्रेक मधे घोरत श्वास सोडणे. काही जण वाघासारखी डरकाळी फोडुन नागासरखा फुस्स करुन फुत्कार सोडतात, जोडीदार असा असला तर काही खरं नाही ब्वॉ. मला वाटतं लग्नासाठी सर्वांनी अपेक्षेमधे ही पण एक रिक्वायरमेंट ठेवायला हवी. ;)

झोपेत चालणे म्हणजे अजबच, मी स्वत: एकदा रात्री झोपेत उठुन घरभर फिरत होतो. आईने मला दुसर्‍या दिवशी सांगितलं, मला स्वत:चीच भिती वाटली. पुढचा एक आठवडा मी हाताला दोरी बांधुन खिडकीला गाठ मारुन ठेवत असे. काहे लोकं नुसती चालतच नाहीत तर बोलतात सुद्धा. एखाद्याला भितीनेच हार्ट अ‍ॅटॅक यावा असा प्रकार. माझा एक मित्र झोपेत उठुन अंघोळ करुन तयार होऊन कॉलेजला गेल्याचही आठवतय, पहाटे ३:३० ला ;). मानवी मेंदु म्हणजे समजायला अवघडच ब्वॉ. :)

प्रवासात झोपणारे आणखीनच विचित्र प्रकार. काही लोकांना तोंड उघडे ठेवुन झोपायची सवय असते, अशा वेळी फारच विचित्र दिसतात हे लोकं. काहींना टेकु हवा असतो, मग बाजुच्याच्या खांद्याला उशी समजुन निर्ल्लजपणे झोपी जातात आणि आपल्याला दर थोड्या वेळाने खांदे उडवत बसावं लागतं. मग यांची मान दोलकाप्रमाणे ठराविक वेळानंतर पुन्हा तुमच्या खांद्याकडे झुकते, पुढचे स्टेशन्/स्टॉप येईपर्यंत हे दोलक घड्याळ चालु असते.

झोपेत माणसाच्या पोझिशन सुद्धा कॉमेडी असतात. काही स्वतःला गोळा करुन झोपतात, इतके की माणुस झोपलाय की एखादी गुंडाळलेली चादर आहे अशी शंका यावी. काहींना शरीराचा काटकोन करुन झोपायची सवय असते, मग कधी उजवीकडे तर कधी डावीकडे. काहींना पालथं झोपुन पार्श्वभाग उंचावुन झोप लागते. म्हणजे एखाद्याला लाथ घालायची इच्छा होईल असे.

झोपेत स्वप्न पाहुन बरळणारे, हसणारे, ओरडणारे आहेतच. झोपेमुळे गाड्या, फ्लाईट्स चुकवणारे आहेत. आणि संध्याकाळी डाराडुर झोपुन रात्री झोप न येण्याने लेख लिहिणारे माझ्यासारखे सुद्धा. ;)

विनोदसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

18 Oct 2010 - 4:22 pm | योगी९००

छान लेख...

लेख वाचता वाचता कधी डोळा लागला ते कळलेच नाही..(ह्.घ्या. तसे काही झाले नाही ..नाहीतर प्रतिक्रिया देता आली नसती..).

बाकी झोपेत चालणे, गाणे म्हणणे ह्या गोष्टींवर एक मोठ्ठा स्वतंत्र लेख होईल.. माझ्या माहितीतले एकजण झोपेत राष्ट्रगीत म्हणायचे..एकदी शेवटच्या "भारत माता की जय " सकट..

लहान बाळं जेव्हा झोपेत स्वप्न पाहुन हसत असते..ते बघणेबल असते..आणि नेमक्या अश्या वेळी आपल्याकडे कॅमेरा नसतो...

माझा एक मित्र झोपेत उठुन अंघोळ करुन तयार होऊन कॉलेजला गेल्याचही आठवतय, पहाटे ३:३० ला
हे जरा पटायला अवघड आहे..अंघोळ पाण्यानेच केली असेल तर पाणी अंगावर घेतल्यावर जागा नाही झाला..? आणि समजा जाग आली असेल्..तर बाहेर अंधार पाहून त्याला वेळेचा अंदाज नाही आला? (आमच्या इथे नॉर्वेला असेल तर शक्य आहे..कारण उन्हाळ्यात पहाटे ३.०० -३.१५ ला च सुर्य उगवतो)

कानडाऊ योगेशु's picture

18 Oct 2010 - 5:11 pm | कानडाऊ योगेशु

लहान बाळं जेव्हा झोपेत स्वप्न पाहुन हसत असते..ते बघणेबल असते..

अगदी खरे आहे.जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट पाहायला मिळाल्याचा आनंद मिळतो अश्या वेळी.

रेवती's picture

18 Oct 2010 - 6:41 pm | रेवती

अगदी! मस्तच!

शुचि's picture

19 Oct 2010 - 6:45 am | शुचि
सुहास..'s picture

18 Oct 2010 - 5:44 pm | सुहास..

छान !!

एक झोपेचा प्रकार म्हणजे वळवळीत झोपणे ..अजिबात आजुबाजुला न बघता ईतर कशाचीही लांबी-रुंदी न मोजता अंथरुणात ईकडुन तिकडे वळवळत झोपणे अश्या लोकांना सकाळी ऊठल्यावर रात्री झोपताना आपले पाय कुठे होते आणी डोके कुठे होते हे प्रश्न पडता..."अंथरुण पाहुन पाय पसरणे " ही म्हणीचा वाट कशी लावायची हे या लोकांना छान जमते .ही मंडळी अंथरुणात एकटी जरी झोपली तरी बेडशीटचा चुरगळा बघुन लोकांना वेगळेच प्रश्न पडतात..

दुसरा एक झोपेचा प्रकार म्हणजे ऊशी डोक्याखाली न घेता ईतर ठिकाणी ठेवणे ..ऊदा. दोन पायांच्या मधे

पर्नल नेने मराठे's picture

18 Oct 2010 - 5:57 pm | पर्नल नेने मराठे

काहींना पालथं झोपुन पार्श्वभाग उंचावुन झोप लागते.
=))

लहान बाळ पाहिलित अशि झोपलेली मोठी माणसे नाहि पाहिलित अजुन

झोपेबद्दलचा लेख आवडला. सध्या हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.
दरवर्षी फॉल सुरु झाला कि माझ्या झोपेचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.
दर दिड दोन तासाने जाग येते तीही एखाद्या मिनिटासाठी.
साडेतीन वाजल्यापासून साडेपाचपर्यंत दर १० मिनिटाने जागी होते.:(
संध्याकाळी सहा वाजले कि मग झोप यायला सुरुवात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2010 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा लै भारी. :) लेखात काही 'नमुने' डकवायला पाहिजे होते राव....!

-दिलीप बिरुटे

मस्त रे मम्या...झोप हा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.

प्राजु's picture

18 Oct 2010 - 7:22 pm | प्राजु

छान लेख.
झोपेत मारण्याचे प्रकार ही होतात.
माझ्या काकाने, त्याच्या लहानपणी आजीजवळ झोपलेला असताना, जोरात आजीच्या थोबाडीत मारली होती. मग आजीने अर्ध्या रात्री काकाला खराट्याने मारलं होतं.. असा किस्सा ऐकत आले आहे काका कडून. :)

भारी समर्थ's picture

18 Oct 2010 - 8:42 pm | भारी समर्थ

समस्त भूतलावरील 'नविन' नवर्‍यांनी (वरांनी) दखल व बोध घेण्यायोग्य अनुभव. उपरोल्लेखित प्रतिसादामधे 'काका'च्या जागी स्वतःचे नाव आणि 'आजी'च्या जागी बायकोचे नाव टाकून वाचावे व सदर प्रयोग करून तो अनुभव शेअर करणे.

बायकोने जोरदार भांडण करून आपल्याला बोलण्याची संधीही दिली नसल्यास हा उपाय आजच रात्री करा, सकाळी ओके.

भारी समर्थ

तिमा's picture

18 Oct 2010 - 8:28 pm | तिमा

लेख अजून विस्तारायला हवा होता. अजून चांगला झाला असता.
झोप आणि 'झोपू' योजना यात काही साम्य आहे का ?

भारी समर्थ's picture

18 Oct 2010 - 8:32 pm | भारी समर्थ

रात्री किंवा कधीही झोपल्यावर अविरत अचाट व अफाट ऊर्जेने घोरणारे लोक हे 'अघोरी' कॅटेगरीमधेच गणले जावेत. एकदा मी अशाच 'पट्टीच्या' घोरणारांच्यामधे झोपल्यावर, माझा मेंदू 'व्हायब्रेट'ही होतो ही 'सेल्फ्-डिस्कवरी' मला झाली होती. आता हे घोरणारे पट्टीचे, म्हणजेच अनुभवाने तरबेज (एक चाळिशीचा तर दुसरा पन्नाशीचा) तर होतेच पण त्यांची घोरण्याची पट्टी ही तार सप्तकातलीच होती. घोरण्यातले 'दिनानाथ'च म्हणा ना. त्या रात्री माझी नक्षत्रं फिरलीच होती बहुदा. कारण एक तर या दोघांमधे मला झोपावं लागलं होतं आणि ते दोघे झोपायच्या आधी झोप न लागण्याचं पातक घडलं होतं. मी अंथरूणाला पाठ टेकली तीच या दोघांच्या बहारदार जुगलबंदीला दाद देत. काही वेळ आवरलेला संयमाचा बांध 'त्या' हादर्‍यांनी उध्वस्त झाला. देवघरातून कापूस आणून कानात घातला, दोन दोन उशा (पिलोज हो) कानावर दाबल्या पण काही म्हणता काही फरक नाही. बरं त्यांची वयं पहाता त्यांना झोपेतून उठवण्याचं धाडसही होत नव्हतं. अशीच पहाटे केव्हातरी झोप अगदी अनावर झाली, तेव्हाच डोळा लागला.

बसच्या लांबच्या प्रवासामधे एक स्पेअर ड्रायव्हर असतो. अशा प्रवासांमधे मला नेमकी त्या ड्रायव्हरच्या शेजारचीच सीट मिळते. पुढची सीट मिळाल्यामूळे पाय पसरून झोपायची संधी ते सहजा सहजी उपभोगू देत नाहीत. बरं मागची सीट मिळावी, तर मागे, पुढे किंवा शेजारी बसणार्‍या पाचापैकी एखादा तरी घोरणार्‍या ड्रायव्हरची उणीव भरून काढतोच. ट्रेनमधे हा त्रास त्या मानाने कमी, त्यामूळे आजकाल ट्रेननेच प्रवास घडतो.

भारी समर्थ

शिल्पा ब's picture

18 Oct 2010 - 10:51 pm | शिल्पा ब

कशी काय एवढी झोप लागते लोकांना काय माहिती? मला तर झोपेचा खूपच प्रोब्लेम आहे..नाही म्हणायला रात्री कशीबशी झोप लागते, दुपारी २-३ तासांचा डूलका होतोच, सकाळी आंघोळ झाल्यावर थोडी पाठ टेकवते तेवढेच...बाकी एरव्ही नाही हो अजिबात झोप येत..

बाकी छोट्या बाळांना झोपेत खुदकन हसताना पहिले खूप छान वाटते..माझी माऊ तर २-३ महिन्याची असताना पहाटे जवळजवळ २ तास खुदुखुदू हसत असायची...मी आपली तिचं हसणं ऐकत जागी.

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 10:56 pm | इंटरनेटस्नेही

दोन क्वार्टर मारल्यावर लै भारी झोप लागते!

मस्त लेख! आवडला.

एमी's picture

19 Oct 2010 - 8:26 am | एमी

आवडला !

निरंजन's picture

19 Oct 2010 - 8:51 am | निरंजन

फारच छान लेख आहे.

नगरीनिरंजन's picture

19 Oct 2010 - 9:17 am | नगरीनिरंजन

चांगला लेख आणि आमच्या आवडीचा विषय. मजा आली वाचून.

निरंजन's picture

19 Oct 2010 - 9:27 am | निरंजन

घोरणारे मेंबर सकाळी उठल की आपण रात्री घोरत होतो हे कबूलच करत नाहीत. रात्रभर घोरुन त्रास देतात आणि सकाळी सरळ सरळ नाकारुन आणि त्यावर मस्त मोठ्या मोठ्यानी वादवादी करुन त्रास देतात.