---भाग - १ ---
---भाग - २ ---
---भाग - ३ ---
तोंड बघ जरा आरशात. तिचं नाव ऐकुन कसं झालय ते, आणी म्हणे तुला कसं माहीत. सगळ्या गावाला पत्ते दाखवुन रम्मी खेळतोय ये**वा."
"ठीक आहे ठीक आहे." पटकन कँटीनकडे निघालो.
कँटीन म्हणजे सगळ्यांची आवडती जागा. सगळं गाव इथे पडीक असायचं. लेक्चर बंक करुन तासनतास गप्पा ठोकत बसण्यासाठीची हक्काची जागा. चहुकडे किलबिलाट होता नुसता. माझी नजर तिला शोधु लागली, एका टेबलावर ती एकटीच बसलेली दिसली, लाल रंगाच्या ड्रेसमधे किती सुंदर दिसते ना. माझी स्माईल २-३ ईंचांनी वाढली. काय बोलुन सुरुवात करायची हा विचार करत पुढे जाण्यासाठी पाउल टाकले तेवढ्यात कुणीतरी मुलगा दोन समोसाच्या प्लेट घेऊन तिच्या समोर येऊन बसला. २-३ ईंचाच्या स्माईलचा ०.५ ईंचाचा चंबू झाला. मी पाऊल मागे घेतले, तेवढ्यात कुणीतरी मला मागुन जोरात हाक मारली आणी तिने वळुन माझ्याकडे पाहिले. पण मला पाहुन देखील तिने न पाहिल्यासारखे केल्यावर माझा पारा चढला, तडक तिथुन निघालो, सरळ बाहेर जाणार्या गेटकडे.
"अरे कहा जा रहे हो" - शीतल. (कॉलेजातली माझी नविन बेस्ट फ्रेंड)
"कही भी जाऊ, तुम्हे क्या. तुम सब लडकिया एक जैसी होती हो. जब कुछ काम होता है तो प्यार से बात करती हो, और जब नही होता तब देख के भी अनदेखा करती हो." - मी.
"स्वतःला समजतात काय ह्या मुली. जरा भाव मिळाला की लगेच परीच समजायला लागतात आणी आभाळात उडायला लागतात. अरे जा म्हणावं. अशा हजार पोरी रोज दिसतात." रागाच्या भरात चालत चालत मी बराच दुर आलो होतो. एक सिगारेट पेटवुन झाडाच्या सावलीत उभा राहिलो आणी शांत डोक्याने विचार करु लागलो.
मी कुणावर आणी का रागावतोय? माझा आणी तिचा काय संबंध? तिला माझ्याशी बोलायचं नसेल तर मला राग का यावा? पण मी आजकाल तिचाच विचार करत असतो, रात्री, दिवसा तिचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. ती हसली की माझं पण मन हसतं, ती शांत असली की तिला नुसतं पहातच रहावस वाटतं. ती नेहमी समोर असावी असं का वाटत. मी प्रेमात पडलोय की काय? हो हो हो. हेच प्रेम असतं मला कळालयं. मी तुझ्यावर प्रेम करतो प्रेरणा. येस. आय एम इन लव." चटकन सिगारेट चा चटका बसला आणी मी पुन्हा पृथ्वीवर आलो. चटका लागलेल बोट तोंडात धरलं आणी स्वतःवरच हसु लागलो, काय मि. शेखर वॉट्स हॅपनिंग टु यु? स्वतःशीच पुटपुटलो. पण आता कुणाला काही सांगायचं नाही असं ठरवलं.
कॉलेज अर्धवटच सोडुन बाहेर आलो होतो एकटाच, म्हंटल आता काय करावं, तर बालाकडे जाऊन टाईमपास करावा अशा विचाराने त्याच्याकडे निघालो. सगळ्या बॅचलर लोकांचे फ्लॅट शेवटच्या मजल्यावर आणी दारे कधी बंद नसतात इकडे. बालाच्या फ्लॅटमधे गेलो, आत कुणीच नाही. बालाच्या बेडरुमकडे गेलो, दार थोडंस उघडं होतं. थोडं पुढे गेलो तर मला एक शॉकच बसला. बाला आणी सारीका ते पण ह्या अवस्थेत, मी तोंड फिरवलं, मला घृणा वाटली त्या प्रकाराची, पुन्हा माघारी फिरलो, सरळ रुमवर आलो. बेडवर येऊन पडलो. पण पुन्हा पुन्हा ते दृष्य डोळ्यांसमोर येत होतं. बालाचं माहीत होतं, पण सारीका? आमची सिनिअर, अभ्यासात एवढी हुशार, सर्व प्रोफसरांची लाडकी, स्वभावाने सोज्ज्वळ, चांगल्या घरातली वाटणारी वाटणारी ती अशी निघावी. शीट. वॉट द हेल. कुठुन वाईट बुद्धी झाली आणी हा प्रकार बघायला मी गेलो. हे नसतं कळाल तरच बर झाल असतं. विचार करता करता प्रेरणा माझ्या डोळ्यासमोर आली. ती पण अशीच असेल तर? कुणी सांगावं? कोण कसं असेल हे कळणं अवघडच. मनाची चलबिचल, अस्वस्थता वाढत होती. काय कराव सुचत नव्हतं. तडक निघालो, जवळचा बार गाठला. चिक्कार प्यालो, एकटाच.
पुन्हा बालाच्या रुमवर गेलो, त्याला हा प्रकार विचारण्यासाठी, पहातो तर काय, बालाच्या बेडरुममधे प्रेरणा?
खाडकन डोळे उघडले. सकाळचे नऊ वाजले होते.
"अरे ए भो**च्या" कुठे झक मारायला गेला होता काल?" आम्ही सगळे शोधुन शोधुन दमलो तुला. वर रात्री गुपचुप येऊन झोपलास हॉलमधे." - रुपेश, विजय तुषार, वैभव आणी सचिन माझ्या बाजुला बसले होते. मी त्यांना झालेला प्रकार सांगितला.
"अरे मुलीचं वेड लागली की माणुस आयुष्यातुन ऊठतो रे राजा. आताच थांबव हे सगळं. अभ्यासात लक्ष घाल." - वैभव.
"प.पु.श्री श्री संतबाबा वैभव महाराज की जय." - रुपेश म्हणाला आणी आम्ही सगळे हसायला लागलो.
परिक्षा जवळ आली होती. हजारो पाने लिहुन त्यावर मास्तरांच्या शिव्या खात सह्या घ्यायच्या होत्या. अॅटेंडन्स कशी बशी काठावर पास झाली होती त्यामुळे आम्ही वर्ल्ड कप खेळायला क्वालीफाय झालो होतो. फाईली पुर्ण करायला शीतलने मला बरीच मदत करायची, आणी मला आणी प्रेरणाला मुद्दाम समोरासमोर आणायचा प्रयत्न करायची. ती मला चांगलीच ओळखायला लागली होती.
कुल्क्याची फाईल पुर्ण करुन सही घ्यायला पुर्या वर्गाची रांग लागली होती. काही ना काही चुका काढुन सर्वांना तो परत पाठवत होता. माझा नंबर आला तेव्हा "फाईल पुर्ण केलीत, नशीब आमचं" असं म्हणत पाने फाटतील अशा पद्धतीने टीक मार्क करायला लागला. सगळ्या सह्या करुन त्याने फाईल दरवाजाकडे फेकली. माझा आजतागायत एवढा अपमान कुणी केला नव्हता. सर्वजण माझ्याकडे पहात होते, प्रेरणा पण होती तिथे. तिला पाहुन मला आणखीनच हिरमुसल्यासारखं झालं. मी काहीही न बोलता पाठ फिरवली, फाईल घ्यायला खाली वाकलो. फाईल उचलली. मान खाली घालुन निघालो तेवढ्यात कुल्क्या पुन्हा केकाटला. "माझ्या विषयात पास तरी होऊन दाखवा. निर्लज्ज कुणीकडचे". माझा भडका उडाला, कानशीलं तापली.
"नुसतं पास नाही होणार सर, तर तुमच्या विषयात पहिला येऊन दाखवेन" असे उद्गार माझ्या तोंडातुन निघाले. सरळ रुमवर आलो. राग शांत झाल्यावर मी रुपेशला म्हणालो. "अरे यार, नेत्यासारखं बोलुन तर आलो, पण पहिलं येण म्हणजे काय खाउ नाही रे. आपण काठावर पास होणारे बहाद्दर, पहिलं कसं येणार"
"अरे नेत्यासारखं बोलुन आलास ना, मग नेते आश्वासनं विसरतात तसं विसरुन पण जा ना." त्यात काय एवढं? - रुपेश.
"तसं नाही रे, प्रेरणा पण होती तिथे" - मी.
रुपेश भुवया उंचावुन डोकं खाजवु लागला आणी म्हणाला "आधी खोलुन ठेवायची अन मग बोंबलायचं, चढला चढला म्हणुन. आता काय घ्या सारुन खुट्टा"
पण मी मनाशी काहीतरी वेगळच ठरवल होतं. परीक्षा संपली, एक महिना घरी जाणार म्हणुन आनंद, पण प्रेरणा दिसणार नाही म्हणुन दु:ख.
तिसरी सेमीस्टर उजाडली. यावेळी शीतलनं जरा जास्तच मनावर घेतलं होतं आमचं सुत जुळवायचं. हळु हळु आमचा मुलामुलींचा एक ग्रुप तयार झाला. मग बाहेर फिरणं, कँटीनला गप्पा मारत बसणं सुरु झालं. रुपेश दिप्तीशी धागा जोडण्यात गुंतला होता. माझी प्रेरणाशी चांगलीच मैत्री झाली होती, आणी तिला कुणी बॉयफ्रेंड नाही ही सुद्धा माहिती सुत्रांकडुन कळाली होती. तिचे वडील सरकार दरबारी क्लास वन ऑफिसर आहेत आणी एक लहान भाउ आहे एवढी माहीती झाली होती. तिच्या आवडी निवडी कळु लागल्या होत्या. कधी कधी मी तिला रुपेशच्या बाईकवरुन बस स्टॉप पर्यंत सोडत असे.
आज रिझल्टचा दिवस होता. आम्ही सर्व मुलं एकमेकाशी न बोलता कॅंटीनमधे चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात प्रेरणा तिथे आली आणी जवळजवळ ओरडलीच. "शेखरSSSSSSSSS, चल मला तुला एक गंमत दाखवायची आहे." असं म्हणुन तिने माझा हात धरला. मी तिथेच वारलो. पण कसाबसा सावरत तिच्याबरोबर गेलो. नोटीस बोर्डावर तिने मला काहीतरी दाखवले, पण मी तिच्याकडेच पहात होतो. तिने पुन्हा एकदा खुणावल्यावर मी तिथे पाहिले. एक छोटीशी प्रिंटाआउट होती.
"शेखर देशमुख इज युनिवर्सिटी टॉपर फॉर माय सबजेक्ट. आय काँग्रॅचुलेट हिम ऑन बिहाफ ऑफ द व्होल डिपार्टमेंट" खाली कुल्क्याचे नाव लिहिलेले होते.
एका दिवसात दोन जग जिंकल्याचा आनंद मला झाला. मी पुन्हा प्रेरणाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात मला आज वेगळेच काहीतरी दिसले - माझा चेहरा.
अॅन्युअल गॅदरींगची तयारी सुरु झाली. कॉलेजच्या स्पोर्टस मधे मी कॅरम आणी टेबल टेनीस अशी दोन अजिंक्यपदे प्रेरणाच्या प्रेरणेवर म्हणजे चीयरींगमुळे जिंकली होती. गॅदरींगमधे मी तिच्यासाठी तिच्या आवडीचे एक रोमँटीक गाणे म्हंटले, पुर्ण कॉलेजमधे मी स्टार सिंगर म्हणुन सुद्धा प्रसिद्ध झालो. प्रेमासाठी माणुस कोणतही जग जिंकु शकतो, कितीही उंच शिखर गाठु शकतो हे मला पुर्णपणे पटले होते. प्रेरणा जर मला जीवनसाथी म्हणुन मिळाली तर यश आणी सुख माझ्या पायाशी लोळण घेइल असा मी विचार करायला लागलो होतो.
प्रेरणाचा वाढदिवस दोन दिवसांनी. मला दोन रात्रीपासुन झोप नव्हती. तिला काही द्यायच तर पुरेसे पैसे सुद्धा नाही माझ्याकडे. रुमजवळच्या टपरीवर बसलो होतो सगळे. काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात रुपेश म्हणाला "हे घे दोन हजार रुपये".
"अरे पण कशासाठी?" - मी
तुषारने माझा गळा धरला आणी म्हणाला "साला नाटकी, मागच्या जन्मी नाटकात काम करायचा काय रे. हरामखोर. अरे प्रेरणाचा वाढदिवस आहे ना म्हणून देतोय तो. घे."
"तुला कसं थॅ़क कराव मला कळत नाहीये रे रुपेश" - मी
"ए केळ्या. कसलं थँक्स रे, आण ते पैसे परत थँक वँक करायचं असेल तर, आणी माझे एकट्याचे नाहीयेत ते. सगळ्यांनी एकत्र केलेत. वैभ्याचे पण दोनशे रुपये आहे त्यात. पाच सहाशे रुपये सगळे असतील तेव्हा पार्टीला लागतील आणी बाकीच्यातुन काहीतरी गिफ्ट घे तिला" - रुपेश.
माझ्या डोळ्यात आसवं दाटली आणी मी रुपेशला आणी तुषारला मिठी मारली.
"ए ए मी पण पैसे दिलेत असं म्हणुन सचिनने पण मला मिठी मारली. देव पण कसे कसे लोकं तयार करतो. माझ्यासाठी केवढा विचार करतात हे सगळे. खरचं मी भाग्यवान आहे की मला असे मित्र मिळाले. मी असा विचार करत होतो तेवढ्यात रुप्या म्हणाला - "अरे पण गिफ्ट देणार काय तु तिला?"
हा प्रश्न मी पुन्हा स्वतःला विचारला. आजपर्यंत कधी कुणाला गिफ्ट दिले नव्हते. मुलीला तर कधीच नाही. काय करावं? आयडीया. "शीतल ला विचारतो" असं म्हणुन मी तिला फोन लावला.
"उसको नये नये ड्रेस का बहुत शौक है, और लाल रंग उसका फेवरेट है तुम्हे तो पता ही है ना.एक और बात. तुम उसे प्रपोज क्यो नही करते उसके बर्थडे के दिन?" - शीतल.
"नही यार. उसको बुरा लगा तो उसका पुरा दिन खराब हो जायेगा" - मी
"कुछ बुरा नही लगेगा. वो भी तुम्हे चाहती है. हमेशा तुम्हारी तारीफ करती रहती है" - शीतल
"ऐसी बात है तो मै ट्राय करुंगा कहने का." - मी
"हे भगवान. उसमे ट्राय क्या करना है? बस आय लव यु बोल दो और बात खतम" - शीतल
"ईतना आसान नही है मेरे लिये. ट्राय करुंगा" - मी बोलुन फोन ठेवला. मला पण वाटत होतं की वेळ आलेली आहे. लोहा अगर गरम है तो हतोडा मारलो.
उरलेले दोन दिवस मी काय बोलायचं याची तयारी करत होतो. तो दिवस उजाडला. मी सकाळीच तिच्या घरी फोन केला.
"हॅपी बर्थडे प्रेरणा. तुला आयुष्यात जे हवे ते सर्व मिळो." - असे म्हणुन मी एक छोटीशी कविता तिला म्हणुन दाखवली. पलिकडुन खुदकन हसण्याचा आवाज आला.
"थँकस शेखर. थँक्स अ लॉट. मला अजुन आई बाबांनी पण विश नाही केलं, तुच पहिला आहेस मला विश करणारा" - प्रेरणा.
"आज येतेस ना कॉलेजला?" - मी
"हो नक्की." - तिने बाय म्हणुन फोन ठेवला.
ती आली. पण आज पुर्ण ग्रुपने कॉलेज अॅटेंड करायचं नाही असं ठरवलं होतं. दिवसभर बाहेर हिंडुन संध्याकाळी प्रेरणाच्या वाढदिवसानिमित मी पार्टी जाहीर केली. पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स यावर ताव मारण्यात आला. सर्वांनी तिला बर्थ्डे ग्रीटींग्स दिली.
"सात वाजले. मला जायला हवं, घरी सगळे वाट बघत असतील" प्रेरणा म्हणाली.
"थांब मला तुझ्याशी काही बोलायचं आहे" - मी
"काय" - ती
"हे माझ्याकडुन तुला प्रेझेंट" - मी
"काय आहे ह्यात?" - ती
"घरी जाउन बघ" - मी
"ठीक आहे. निघु मी?" - ती
"प्रेरणा. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझ्याशिवाय माझं असणं अशक्य आहे. आयुष्यभर तुझ्या सोबत राहण्याची माझी ईच्छा आहे. आय लव यु प्रेरणा" - मी तिला म्हणालो, काळजाची धडधड बहुतेक ५०० प्रतिमिनिट असावी.
ती लाजली, लाजेन लाल झाली. आणी तिने हलकेच एक स्मितहास्य केलं" मला हार्ट अॅटॅक यायचा बाकी होता.
"तुला माझं हे बोलणं आवडलं नसेल तर मला माफ कर आणी जमल्यास विसरुन जा. तुला दुखवायचं नाही मला." मी उरली सुरली एनर्जी वापरुन बोललो.
"तसं नाही रे शेखर. मला पण तु आवडतोस पण.." - ती माझी बॅटरी तीन वेळा बीप करुन बंद होणार होती.
"पण काय? बोल ना. प्लीज" - मी
"मला तु सिगारेट पितोस हे अजिबात आवडत नाही, ते तु सोडशील का?" - ती.
मी मनातल्या मनात डोक्याला हात लावला. घ्या, मुली कधी कशाचा विचार करतील याचा काही नेम नाही. पण एव्हाना माझी बॅटरी चांगलीच चार्ज झाली होती.
"मी तुझ्यासाठी जग सोडु शकतो, सिगारेट काय चीज आहे." - तिचा अघोषीत होकार समजुन मी तिचा हात हातात घेतला आणी ती लाजुन पाणी पाणी झाली.
तिला मी घरापर्यंत सोडलं आणी बाईक नागमोडी चालवत गाणे म्हणत रुमवर आलो.
"आज तर पार्टी झालीच पाहिजे शेखर्या. मी काहीही ऐकणार नाही" - असं म्हणत तुषारने पुन्हा बाटल्या रुमवर आणल्या.
नाही नाही म्हणत ती पार्टी पण झाली. आणी सारीका प्रकार मी विसरलो नसलो तरी बालाच्या पाठींब्यावर हळु हळु पुन्हा पार्ट्यांचे चक्र सुरु झाले. अर्थात प्रेरणापासुन लपवुनच.
पण हे किती दिवस चालणार होतं. निसर्गाचे काही अलिखित नियम असतातच ना.
क्रमशः
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 8:20 pm | रामदास
प्रवास सुखरुप पार पडलेला आहे.
पुढे काय ?
शिग्रेटीसाठी पोरीला फसवलंस तर वाचनमात्र करून टाकीन.
11 Jul 2010 - 11:37 am | अप्पा जोगळेकर
अहो काय बोलताय. हे मराठमोळा अजबच आहेत.पोरीपायी शिग्रेटीला फसवणार अशी चिन्ह दिसताहेत.
(विडी, सिगरेटप्रेमी अप्पा)
10 Jul 2010 - 8:27 pm | प्रभो
भारी रे ममो....
रामदास काकांची कमेंट पण भारी... :)
10 Jul 2010 - 9:43 pm | नावातकायआहे
>>माझी बॅटरी तीन वेळा बीप करुन बंद होणार होती.. :)
ममो भाऊ फुडच येउ द्या लव्कर...
11 Jul 2010 - 6:18 am | गणपा
>>पण हे किती दिवस चालणार होतं. निसर्गाचे काही अलिखित नियम असतातच ना.
कलाटणी देणार हा नक्की पुढच्या भागात....
छान लिहिलयस.
हा भाग बराच पटकन टाकलास आणि मोठाही. धन्स.
हाच वेग ठेव.