नमस्कार मंडळी. हा भाग लिहिण्यास उशीरच झाला त्याबद्दल क्षमस्व. मधे बरेच दिवस वेळ होत नव्हता. पुढचे भाग लवकर लिहिन. :)
------भाग -१------
-----भाग - २------
एक-दोन महिन्यात असं काय बदललं होतं? आणी का? काहीतरी चुकतय. आई वडील कष्ट करुन पैसे पाठवतात. त्याच चीज करायला नको?
"अरे कोणी सांगितलं? की हे सगळं करुन तु त्यांना सुख देशील? आणी नाही दिलं तरी बिघड्ल काय? तु सांगितल होत का तुला जन्माल घालायला? मग? सोड रे चु**गिरि. ऐश कर.." बाला किती सरळ बोलायचा ना? त्याचे फंडे एकदम साफ होते. मला पटायला लागले होते. (का कुणास ठाऊक)
एक दिवस पुन्हा वेगळाच आला आज....
रविवार होता. नेहमीप्रमाणे सकाळी नाष्ता करायला जवळच्या हॉटेलात गेलो. नाष्ता करुन बाहेर आलो, एक सिगारेट सुलगावली तेवढ्यात रुपेश समोरुन येताना दिसला. त्याने गाडी थांबवली आणी म्हणाला "चल लवकर. एका ठिकाणी जायचं आहे."
"अरे पण कुठे, मी झोपायच्या कपड्यांवर आहे." - मी
"चुपचाप गाडीवर बस." - रुपेश.
मी काही न बोलता गाडीवर बसलो. २-३ किमी अंतरानंतर गाडी एका हॉस्पिटलसमोर थांबली.
"किरणचा अॅक्सीडंट झाला काल रात्री. कोमामधे आहे. डॉक्टरांनी हात वर केलेत." असे म्हणुन रुपेश किरणच्या चुलत भावाकडे जाउन थांबला.
माझ्या छातीत एकदम धस्स झालं. हातपाय गळाले. असं काही पाहण्याचा पहिलाच प्रसंग होता, त्यात हॉस्पिटलचा वास माझा श्वास कोंडण्याचा प्रयत्न करतोय असं वाटु लागलं. आत गेलो, दुरुनच पट्ट्यांमधे गुंडाळलेला किरण पाहिला. बाहेर त्याचे वडील डॉक्टरांशी बोलत होते. आई धाय मोकलुन रडत होती, त्याच्या आईकडे पहावत नव्हते. शॉकमधुन सावरत हे सगळं कस झालं असाव याचा मी विचार करत होतो तेवढ्यात बाजुच्या दोन पोलिसांना बोलताना मी ऐकलं.
"काय नाय राव. रात्री दारु पिरुन हे पोरगं हायवेला गाडी चालवत होतं. चौकात एका ट्रॅवल्स वाल्यानं दिली टक्कर. गाडीच्या डिकीत पणेक दारुची बाटली सापडलीयं." पहिला पोलिस.
"चायला. ह्यांनी असले धंदे करायचे अन आपन निस्तरायचे. त्या बिचार्या आइ बापाचा तरी काय दोष." दुसरा पोलिस.
हा संवाद ऐकुन माझ्या पायात त्राणच राहिले नाही. मी मटकन बेंचवर बसलो, तेवढ्यात रुपेश परत आला आणी म्हणाला " चल, मेडीकल मधुन ही औषध घेउन यायची आहेत."
किरण एकुलता एक मुलगा होता घरात. रुपेश तिथे रात्रीपासुन धावपळ करतोय समजल्यावर मी त्याच्याकडे पहातच राहिलो. २-३ दिवस सलग आम्ही हॉस्पिटलच्या चक्रा मारत होतो. पण काळ किरणला वेळ देणार नव्हता. तिसर्या दिवशी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणुन घोषित केले. आम्हा सर्वांमधे दु:खाची एक लहर पसरली. रुपेशचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं त्या दिवशी. दोघे एकत्रच लहानाचे मोठे झालेले, एकाच शाळेत एकाच कॉलनीत राहिलेले, खेळलेले. किरणच्या मृत्यु नंतर बरेच दिवस गेले त्यातुन बाहेर येण्यासाठी.
"एक काम करा. थोडे दिवस कॉलेज अॅटेंड करा. तुमची अॅटेंडन्स पण कमी झालीये खुप. ब्लॅक लिस्टमधे नावं लागलीत." - बाला म्हणाला.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पुन्हा कॉलेजला जायला सुरुवात केली. हळुहळु पुन्हा सगळं सुरळीत होऊ लागलं. रुपेशच्या बाइकचा हॉर्न, सकाळी घाईत चहा पिऊन लवकर कॉलेजला जाण्याची घाई. दुपारी सावंत काकींकडे मेसवर जेवायला, संध्याकाळी कॅरम किंवा व्हॉलीबॉल. रात्री गप्पा, एकमेकांची खेचाखेची करणं, मस्ती, जोक्स सिनेमे सर्व काही. कुणीही दारुचं नाव काढत नव्हतं.
आज पुन्हा कॉलेजात जायला थोडा उशीरच झाला. वर्गात जाताना आज एक नवाच चेहरा दिसला. आधी कधीच पाहिला नव्ह्ता तो चेहरा. मी नेहमीप्रमाणे मागच्या बेंचवर जाऊन बसलो.
"आपल्या वर्गात नविन माल आला आहे." - रुपेश.
"हो पाहिलं" - मी.
प्रॅक्टीकल लॅबमधे प्रिंटाआउट घेत असताना तो चेहरा पुन्हा माझ्या समोर आला. "मला पण एक प्रिंट काढुन देतोस का" असा गोड आवाज आला. मी नकळतच हो म्हणालो.
आजुबाजुचे तोंड ऑ वासुन बघत होते. स्वतःचं प्रॅक्टीकल कधी नीट न करणारा शेखर दुसर्या कुणाला प्रिंटाआउट काढुन देतोय म्हंटल्यावर सहाजिकच होतं. माझ्या हातातुन प्रिंट्स घेउन ती "थँक यु!" म्हणुन निघुन गेली. ती गेल्यानंतर सुद्धा तिच्या परफ्युमचा मंद सुवास दरवळत होता. काही दिवस हेच चालु होतं.
उजळ रंग, मोठे, पाणीदार, बोलके आणी काजळ घातलेले बदामी डोळे, गोल चेहरा, थोडे कुरळे केस, लालचुटुक पण नाजुक ओठ. डाव्या गालावर रेंगाळणार्या बटा आणी त्या बटा सारख्या बोटांभोवती गुंडाळण्याची सवय. क्लच तोंडात धरुन केस सावरताना किती छान दिसते. हनुवटी तळहातावर टेकवुन मी एका रिकाम्या वर्गात विचार करत बसलो होतो.
"ती कँटीनमधे आहे. जा." - सचिन
"कोण?" - मी
"कशाला नाटकं करतोयस? प्रेरणा दुसरं कोण" - सचिन.
"तुला काय माहित मी तिचा विचार करतोय ते." - आजकाल तिचं नाव ऐकुन गुदगुल्या झाल्यासारखं वाटायचं.
"तोंड बघ जरा आरशात. तिचं नाव ऐकुन कसं झालय ते, आणी म्हणे तुला कसं माहीत. सगळ्या गावाला पत्ते दाखवुन रम्मी खेळतोय ये**वा."
"ठीक आहे ठीक आहे." पटकन कँटीनकडे निघालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 11:39 pm | रामदास
वाचायची आणि क्रमशा म्हणायचं हे काही बरोबर नाही.
तुमची लॅब नक्की कशाची होती ?
क्लच तोंडात धरुन केस सावरताना किती छान दिसते. हे काही उमगलं नाही.
8 Jul 2010 - 11:46 pm | मराठमोळा
क्लच म्हणजे केस बांधुन ठेवण्यासाठीचा चिमट्यासारखा एक जो प्रकार असतो तो. :)
कोणत्याही मुलीला विचारा.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jul 2010 - 11:53 pm | रामदास
मुली ज्याला चाप म्हणायच्या ते होय.?
8 Jul 2010 - 11:58 pm | चतुरंग
तुमच्या वेळी लावायचा 'चाप' पुढे पुढे कंट्रोल करायचा 'क्लच' झाला! ;)
(अॅक्सलरेटर)चतुरंग
9 Jul 2010 - 12:01 am | रामदास
(कायम क्लचावर पाय ठेवणारा एस.टी. डायवर)
रामदास
11 Jul 2010 - 11:33 am | अप्पा जोगळेकर
हेअरबअँडला काय म्हणायचे हो. स्टिअरिंग व्हील का?
8 Jul 2010 - 11:57 pm | यशोधरा
पुढे काही रडकं वगैरे लिहिशील तर याद राख हां...
9 Jul 2010 - 3:18 am | गणपा
हा हा हा
यशोतै बर झाल तुच हाग्यादम दिलास =))
आवांतर : रंगाशेठ/रामदास काका दोघे धन्य आहात _/\_
अतीआवांतर : ओ ममो ते पुढचे भाग जरा लौकर टाका, माताय लिंक लावायला परत भाग १ आणि २ वाचावे लागले ना.