कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
6 Mar 2010 - 8:10 am

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते

कथा कशा असतात? महाभारतासारख्या सगळंच भरताड असलेल्या, भरकटलेल्या कथा सोडल्या तर मुळात त्या अगदी सोप्या असतात. (कवितक प्रमाणे कथक लिहिण्याची सुद्धा आमची मनीषा आहे...) एक तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडतो. मग पागल होऊन प्यार मुहब्बतची गाणी म्हणतो. ती सुरूवातीला त्याला प्रतिसाद देत नाही, किंवा नकार देते. (मुलं लाईन मारतात व मुली लाईन देतात - फार क्वचित... अशी कोणीतरी 'टाकलेली लाईन' एका 'प्रतिसादात' वाचली होती.) मग तो पुन्हा पागल होऊन प्रेमभंगाची दर्दभरी गाणी म्हणतो. मग अचानक काहीतरी शौर्याचं काम करून तिचं आर.पी (हृदय परिवर्तन - ते एच.पी. असलं तरी तसं म्हणण्याची परंपरा आहे) करतो. मग ते दोघं मिळून मुहब्बतीची गाणी म्हणतात. पुन्हा काहीतरी मध्येच त्या मुहब्बतवर संकटं येतात. त्यांचं निवारण करून ते सुखाने शेवटपर्यंत जगतात. गोष्ट संपल्यासारखे.

पण खर्‍या गोष्टी इथे संपत नाहीत हे आपल्या सर्वांना माहीत असतं. राजाराणीच्या जीवनात ते एकत्र आले की त्या दोघांपेक्षाही मोठं काहीतरी तयार होतं - ते म्हणजे नातं. खरं तर आधीचे सर्व प्रसंग हे देखील त्या एकाच नात्याचे वेगवेगळ्या वेळचे वयाचे आविष्कारच आहेत असं म्हणायला हरकत नाही. अल्लड वयातली नाती ही लहानग्या - नवजात बालकाच्या कुल्ल्याप्रमाणे मऊ, कोमल, निरागस... तारुण्यात, ऐन बहरात आकर्षक भरीव नितंब होतात तर नंतर फार वाढून थोराड झालेल्या ढुंगणांसारखे. अशा या विविध रूपांवर केव्हा ना केव्हा आपल्याला एखाद्या कवितेचं सुंदर वस्त्र चढवावंसं वाटतंच. ते वस्त्र म्हणजे कधी गोंडस गुबगुबीत प्राण्यांची चित्रं असलेला, डायपर कधी असतो. किंवा कधी लेसची नक्षी घट्ट रुतवून अंग अंग शृंगारीत करणारी व्हिक्टोरिया सीक्रेटमधली पॅंटीसारखी सटीनदार कविता चढवावीशी (आणि मग हलकेच उतरवावीशी) वाटत असेल. अगदीच काही नाहीतर सगळं झाकून दिसेनासं करणारी, नात्याच्या गहन चर्चेची - जुन्यापुराण्या वादांच्या नाड्यांच्या गाठी असलेली - चट्टेरीपट्टेरी लांब कुलकर्णी बर्मुडा कविता घालायची सर्वांवरच पाळी येते. प्रेमभंगाची लाथ बसून त्याचं शेकलेलं स्वरूप पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मलमासारखी किंवा जळफळाटाची आग बाहेर टाकणारी (फारच ताणली बुवा प्रतिमा, आता लवकर आवरा) कवितासुद्धा खूप डीमांडमध्ये आहे. इतकं असलं तरी मागच्या लेखात मांडलेल्या गृहिणी-गृहस्थांच्या अल्पोपाहाराच्या प्रश्नांइतकेच नव्या तरुणाईचे आणि मध्यमवयीनाईचे हे नात्याचे प्रश्न तितकेच गहन आणि तितकेच अनुत्तरीत आहेत.

पहिल्या भागात दिलेल्या मेदूवड्याच्या, झटपट डोशाच्या कृती या सार्वजनिक वाटपासाठी होत्या. कोणालाही सहज भिडावेत, आणि डोळ्यात पाणी टचकन आणून चटकन दोन मीटिंग्जच्या मधल्या पाच मिनिटात वाचतावाचता फाड फाड फेकाटे स्टाईल जीवनाविषयी अर्थबोध देऊन जावेत अशा. आज काय केलं, तर प्लास्टीक सर्जरी दाखवून बॉसला मनात शिव्या घातल्या (दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता आलं नाहीतर अकरा अक्षरी शिवी हाणता आली असती...) आणि काय केलं - सहकाऱ्यांची अगम्य भाषा ऐकून कानाचा खडखडाट करून घेतला व त्यांच्यातला कोण मॅनेजर होण्यासाठी दादागिरी करतोय, बॉसपुढे पुढेपुढे करतोय याचं विश्लेषण केलं. आणि हो, जाता जाता जीवनविषयक मूल्यं सुद्धा शिकले(लो) असं कोणालाही म्हणता यावं अशा. नात्याच्या कविता थोड्या वेगळ्या असतात. त्यांची मूळं वेगळी असतात. त्यांचा लक्ष्य दर्शक (टार्गेट आडयन्स) वेगळा असतो. त्यांचे उपयोग वेगळे असतात. एका अर्थाने तो जीवन वगैरेचा पोटभाग आहे, त्यामुळे त्यावर नातं म्हणजे काय असतं टाईप कविता करता येतात हे आपण गेल्या भागात बघितलंच. नात्याची व्याप्ती अजून जास्त असते. त्यांच्यासाठी हृदयाचा एक वेगळाच कोपरा ठेवलेला असतो. काही चतुर व्यक्ती दोन तीन वेगळे कप्पे करतात व त्यात वेगवेगळ्या व्यक्तींना ठेवतात. (कोलटकरांच्या 'तक्ता' या कवितेचा अर्थ या अंगानेही घेता येईल का? 'जोपर्यंत त्या कप्प्यांच्या चौकटी तुटत नाहीत तोपर्यंत मांजरीला लांडोरीवर झेप घेऊन तिला बोचकारायची व नंतर दोघींनी मिळून क्षत्रियाला उखळीत घालून कांडण्याची काहीच गरज नाही.' अधिक माहितीसाठी पाहा मूळ कविता, व तीखालील प्रतिसादात लावलेला कोता अर्थ). पण मुख्य फरक म्हणजे तो दोन व्यक्तींमधला संवाद असतो.

जग आता अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेलं आहे. नव्या जाणीवा, नवी स्वातंत्र्यं, नवे आयडीज यामुळे नात्यांच्या प्रतिमा बदललेल्या आहेत. अपेक्षा बदललेल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीच्या नाकावर टिच्चून मनू वगैरेला न जुमानता स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवलं. 'न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति' - ला 'अनलेस शी पगारं अर्नति' ची पळवाट लावून प्रधान-पुरुषांनीही आपल्या नाकांवर टिच्चून घेतलं. त्यात मुतालिक वगैरेंच्या नाकावर टिच्चून संत व्हॅलेटाईनचा दिवस पाळणं सुद्धा आल. त्यामुळे कलाक्षेत्रात इतका आमूलाग्र बदल झाला की विचारता सोय नाही. एके काळी ही सगळी काव्यं म्हणजे स्त्रियांचं, पुरुषांनी, पुरुषांसाठी केलेलं वर्णन या स्वरूपाची असायची. उत्तम शरीरयष्टी असलेल्या पुरुषांचं वर्णन बायकांना ऐकायला मिळायचं ते हनुमान वगैरेंचंच. (म्हणूनच बहुधा त्याला वानर केला, आणि तितकं पुरेनासं झालं म्हणून की काय ब्रह्मचारीही केला. मग मगरीच्या पोटात घामाचे थेंब वगैरे त्यातूनच आलं.) पुढे जसजसा स्वातंत्र्याचा परीघ विस्तारला तसतसे ह्या तीन भूमिकांमध्ये सरमिसळ व्हायला लागली - पण बराच काळ पहिली आणि तिसरी ही विरुद्धच राहिली. मग गेल्या दशकांत खूपच विस्तारला तेव्हा शेवटी आठही पर्म्युटेशनं शक्य झाली. ही चावट, वात्रट वर्णनं लोकं मोठ्या चवीने एकांतात वगैरे वाचायचे. 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का, लाजता?' हे गाणं आता लहान मुलांनासुद्धा पोरकट वाटेल. असो, खूप बदल झालाय वगैरे वगैरे. आम्ही आमच्या लेखनिक प्रणालीने सांगितलेला सगळा मसाला लेखात टाकून झाला. आता कवितक प्रणालीमध्ये वापरात असलेल्या प्रेमगीतांच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया.

प्रेमकाव्य १: मी तुझ्या प्रेमात आहे मला लाईन दे.
प्रेमकाव्य २: मी पण तुझ्या प्रेमात आहे, ही घे लाईन. (जवळपास नाहीच...)
प्रेमकाव्य ३: मी/आपण दोघं प्रेमात आहोत, कित्ती कित्ती छान.
विरही/प्रेमभंगी काव्य : (मालक चुकीचा शब्द तर वापरला नाही ना?) तू नाहीस/ माझ्या भावनांचा चुराडा झाला/तू केलास, आता जीवन व्यर्थ आहे.

याचा फार्म्युला असा येतो : मी/आपण - तू/आपण - प्रेम आहे/नाही. त्यामुळे/तेव्हापासून जग/आयुष्य सुंदर/असह्य आहे.

बस्. इतका सोपा आहे. गेल्यावेळी आपण क्ष हे य असतं, त्यामुळे ते व सारखं क करायचं असतं असं सूत्र बघितलं. या कवितेचं सूत्रदेखील तसंच आहे, थोडंसं वेगळं.

क्ष१ जेव्हा व१ क१ झालं तेव्हा क्ष२ व२ क२ झालं. [झालंच्या ऐवजी होतं, असतं; जेव्हा-तेव्हाच्या जागा बदलणं, वेगवेगळी पादपूरकं वापरणे हे एव्हाना तुम्हाला माहीतच असेल]

क्ष१ बहुतेक वेळा तू, मी, आपण, हृदय घ्यावे लागतात. ते दोघांमधल्या संवादाचे, संबंधांचे शब्दही (स्पर्श, प्रेमाची नजर, भावना) असू शकतात. क१ हे वाट पहाणं, दिसणं, भेटणं, हसणं, प्रेमात पडणं, एकत्र असणं, अव्हेरणं, नाकारणं, झिडकारणं अशा नात्यांमध्ये करण्याच्या गोष्टी असतात. क्ष आणि क मध्ये कधीकधी सरमिसळ होऊ शकते, कारण क्रियापद हे नाम म्हणून येऊ शकतं. व१ हे अर्थातच या दोनशी मिळतंजुळतं विशेषण, किंवा जोडणारा शब्द.
क्ष२ साधारणपणे निसर्गातल्या (चंद्र पाऊस, सकाळ, पानं), कलेतल्या (स्वर, नाद, गीत, संगीत, शब्द, अर्थ वगैरे) सुंदर गोष्टी किंवा मन, अंग, मी. क२ हे खूप महत्त्वाचं असतं. त्यात सगळ्या काव्याचा अर्क आहे. हे नादचित्रमय क्रियापद असलं पाहिजे. झंकारणे, मोहरणे, लाजणे, रोमांचणे, उजळणे हे नेहेमीचेच यशस्वी शब्द आहेत. व२ हे अर्थातच तसंच महत्त्वाचं होतं. खूप वेळा धुंद, गोजिरे, भावूक, गहिरे, असे शब्द वापरून निभतं. जर विरहिणी, प्रेमभंगी कविता करायची असतील तर झाकोळणे, विझणे, अंधारणे वगैरे क्रियापदं आणि उजाड, वैराण, कोमजलेले वगैरे शुष्क शब्द घ्यावे.

आता तुम्ही म्हणाल की याच्यात यमकी शब्द कुठे आहेत? एव्हाना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की क्ष, व, क हेच य च्या जागी येऊ शकतात. क्रियापदं विशेषत: यमक साधायला खूपच उपयुक्त पडतात. किंवा एकच पादपूरक जेव्हा, तेव्हा हेही यच्या जागी वापरता येतात. या सर्व गोष्टींचा सराव करा. मी दोन कडवी लिहून दाखवतो...

क्ष१, व१, क१ = तू, मनात, येणे, क्ष२, व२, क२ = स्वप्न, गोजिरे, खुलणे
क्ष१, व१, क१ = तू, समोर, दिसणे, क्ष२, व२, क२ = फूल, धुंद, बहरणे

शिरतेस मन्मनी तू जेव्हा
जणु स्वप्न गोजिरे खुलते

दिसतेस समोरी तू जेव्हा
मनि फूल धुंद बहरते

क्ष१, व१, क१ = स्पर्श, तन, भिरभिरणे, क्ष२, व२, क२ = घन, शरीरी, ओथंबणे
क्ष१, व१, क१ = आलिंगन, वेड, लावणे, क्ष२, व२, क२ = पाऊस, जमिनीवर, पडणे

यापासून

स्पर्श तुझा तनि भिरभिरतो
घन ओथंबुन ये मज शरिरी

आलिंगन तव वेड भरी
जणु पाउस पडतो उष्ण धरी

काही पादपूरकं बदलली आहेत हे लक्षात आलं असेलच. यातसुद्धा दोन गोष्टी नोंदण्यासारख्या आहेत. एक म्हणजे यमक फक्त प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या ओळीशी साधलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या कडव्यात स्पर्श आहे, दुसऱ्या कडव्यात मिठी आहे. जर आधीच्या कडव्यांमध्ये आठवण, दृष्टी, हास्य असे क्ष वापरत गेलेले असले तर कवितेला एक खोली येते. घन ओथंबणं व सर पडणं हे एकामागोमाग आल्यानेही एक सहजता, अनिवार्यता येते. ते नुसतं तांत्रिक काव्य राहात नाही. हे दुर्दैवाने अजून तरी कवितक मध्ये घेता आलेलं नाही. प्रयत्न चालू आहेत. कविता आणखी चांगली करण्यासाठी चौथी ओळ - 'जणु सर वळवाची तप्त धरी' अशी केली तर जास्त खुलते.

कविता जास्त गहन अर्थाची करायची असेल तर हे काव्य प्रियाला उद्देशून म्हटलंय की देवाला यात थोडीशी संदिग्धता ठेवावी. त्यासाठी मी तुझ्या मीलनाची वाट बघते. तू कधी बरं येशील? आपल्या आत्म्याचं मीलन कधी होईल? तू मला केव्हा जवळ घेशील? असे प्रश्न टाकावे. मीरेने हेच केलेलं होतं.

आता जरा एक कठीण तंत्र दाखवतो. (तंत्र दाखवण्यासाठी मी आत्ता यमकाकडे दुर्लक्ष करतो आहे)

आपण एकत्र असताना
चंद्र आकाशी उजळतो
रात्र काळी झळकते
स्वप्न डोळ्यात उगवते
जगण्यात धुंदी भरते

एकच पहिलं वाक्य घेऊन दुसरी चार वाक्यं घेतली आहेत. याच्यातून विरहिणी करायची तर सरळसरळ विरुद्ध करावं.

तू जेव्हा नसतेस
चंद्रही उजाड दिसतो
रात्र अंधारी एकाकी
स्वप्न मावळून जाते
जगण्यातली धुंदी संपते

खऱ्या कवीची प्रतिभा अशी की विरह नसताना, बाकी सर्व असताना नातं मेलेलं असू शकतं हे जाणणं. या मरण्यात जी शोकांतिका आहे ती शमा-परवाना स्टाईल विरहात नाही. हे तंत्राच्या पलिकडचं आहे. त्यामुळे कवितक मधून त्याची अपेक्षा करू नका. हा विचार एकदा सुचला की व्यक्त करण्यासाठी तंत्र वापरता येतं.

चंद्र आकाशी उजळतो आहे
रात्र काळी झळकते आहे
तू माझ्याबरोबर आहेस
पण ते स्वप्न कुठे गेलं?
ती धुंदी कुठे गेली?

ओळखीचं वाटतंय?

असो. एकदम कठीण तंत्रांची ओळख करून देऊन तुम्हाला दडपून टाकायचं हा हेतू नाही. हा लेख आधीच खूप मोठा झाला त्यामुळे नात्यांच्या घनगंभीर कवितांसाठी बिनतरुणाईला व मध्यमवयीनाईला पुढच्या लेखाची वाट पहायला लागेल. पण तोपर्यंत कविता लिहायची वाट बघू नका. प्रेमकाव्य म्हणजे काय फक्त व्हॅलेंटाईनच्या दिवशीच करायचं का? तुमचे क्ष, य, व, क निवडा आणि एक सुंदर प्रेमगीत बनवा. डकवा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीला दाखवा... तंत्राची चर्चा करण्याची गरज पडणारच नाही असं वाटतं.

आभार/उल्लेख : प्लास्टीक सर्जरी - टारझन; सहकारी - शुचि; अकरा अक्षरी शिवी - बिपिन कार्यकर्ते; कुलकर्णी बर्मुडा, लाईन टाकणे - कोणीतरी माहीत/लक्षात नसलेला मिपाकर

कविताविनोदप्रकटनमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Mar 2010 - 9:08 am | विसोबा खेचर

राजेशराव, आपल्याला दंडवत... लेख जबराच झाला आहे.. :)
बोले तो, एकदम वरच्या दर्जाचे लेखन..!

अल्लड वयातली नाती ही लहानग्या - नवजात बालकाच्या कुल्ल्याप्रमाणे मऊ, कोमल, निरागस... तारुण्यात, ऐन बहरात आकर्षक भरीव नितंब होतात तर नंतर फार वाढून थोराड झालेल्या ढुंगणांसारखे.

ख ल्ला स...! :)

साहेब, येऊ द्या अजूनही असेच बहारदार लेखन..

तात्या.

स्मृती's picture

6 Mar 2010 - 12:13 pm | स्मृती

इथे डिट्टोची खुण कशी घालावी बरे??

श्रावण मोडक's picture

6 Mar 2010 - 10:27 am | श्रावण मोडक

दंडवत.
विद्यार्थी (आणि विद्यार्थिनी) कुठं आहेत? अरे, चला पटापट. मास्तराचा तास झाला आहे. आता सुसाट सुटा!!!

दुसराच धडा अश्या अत्यंत कठिण विषयाचा घेतल्याने मास्तरांचा निषेध आहे. हा धडा आम्ही ऑप्शनला टाकत आहोत. ह्यातली अनेक गृहितकं आम्हाला समजलेली नाहीत आणि ती समजण्याकरिता आम्हाला प्रात्यक्षिकाची(च) जरुरी आहे.

बाकी लेख फर्मास! दुसर्‍यांचे पराक्रम वाचुच (परिक्षेत कोण कोणास म्हणाले असे प्रश्न तरी सोडवता यावेत ह्या साठी!)

-दुर्दैवाने कुठलीच 'प्रतिमा' पहायला न मिळालेला आणि स्वत:ची प्रतिमा पहायला कुणी न मिळाल्याने 'प्रतिमेची वस्त्रं' कमरेवरच, ढीली का असेना, असलेला.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2010 - 12:55 pm | राजेश घासकडवी

हे निषेधाचं लोण सगळीकडेच पसरायला लागलंय. जे ते उठतंय ते आपलं निषेध करतंय. मालकांचा निषेध, मास्तरांचा निषेध... तरी बरं तुमची आत्मिक कोंडी वगैरे नाही झाली.

अहो, कवितकचा उद्देशच मुळी हा आहे की अनुभवाची काडी इतकी गरज नाही. तेव्हा करा गोळा शब्द इकडून तिकडून अन् चालवा यंत्र. निदान पहिलं पाऊल म्हणून क्ष, व, क तरी निवडा. मग आम्ही मार्गदर्शन करू.

राजेश

दत्ता काळे's picture

6 Mar 2010 - 1:28 pm | दत्ता काळे

लेख आवडला . दुसरा अगोदर वाचण्यात आला वाचला. त्यानंतर पहिला ( म्हणजे.. क.पा. १ ) वाचला. बरेच दिवसांनी मिपावर येतोय, त्यामुळे पहिला लेख वाचला नव्हता. तो ही लईच भारी.

शुचि's picture

7 Mar 2010 - 12:16 am | शुचि

पाय लागू|
आपल्या चरणी प्रथम ती-तो पुष्प अर्पण-

क्ष१=तू ....क्ष२=तनू
व१=नाक्यावर.....व२=रोमांचीत
क१=येणे......क२=होणे
___________
क्ष१=भीडताच ....क्ष२=कळी
व१=नजर.....व२=गोमटी
क१=तू......क२=खुलते

तू नाक्यावरती येता
तनू रोमांचीत होते
भीडताच नजर तुझी तेव्हा
कळी गोमटी खुलते

क्ष१=कटाक्ष ....क्ष२=सुगंध
व१=मन.....व२=शरीरी
क१=लागीर होणे......क२=धुमारणे
___________
क्ष१=बोलणे ....क्ष२=मन
व१=हरवून.....व२=चिंब
क१=जाणे......क२=भीजू जाणे

मन लागीर होई कटाक्षे
सुगंध धुमारे शरीरी
तव बोलण्यात मी हरवे
मन चिंब चिंब मग भीजवी

____________________

पूर्ण कविता -
तू नाक्यावरती येता
तनू रोमांचीत होते|
भीडताच नजर तुझी तेव्हा
कळी गोमटी खुलते||१||
मन लागीर होई कटाक्षे
सुगंध धुमारे शरीरी|
तव बोलण्यात मी हरवे
मन चिंब चिंब मग भीजवी||२||

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

राजेश घासकडवी's picture

7 Mar 2010 - 12:59 am | राजेश घासकडवी

छान कवितक. 'ती-तो' संवाद हे विशिष्ट प्रकारच्या संवादांना लागू करावे का असा आम्ही विचार करत आहोत. सध्या तरी तुमच्या कवितेला प्रेमगीतच म्हणू.
नाक्यावरती शब्दाने एकदम नागर, आधुनिक टच येतो. ही(हा) कालिदासाची नायिका (नायिक) नसून अलिकडची(चा) आहे असं प्रतीत होतं. बाकीचे शब्द कालातीत आहेत.
शिवाय वेगवेगळ्या पंक्तीमध्ये
येणे, नजरानजर होणे, सार्थ कटाक्ष, बोलणे
रोमांचित, कळी उमलणे, सुगंध पसरणे, चिंब होणे
असा क्रमिक प्रवासही झालेला आहे.(चिंब थोडंसं पॅटर्नबाहेरचं वाटतं... तरीही सुगंधाने चिंब होणे असा अर्थ काढू शकतो...)

अजून येऊ द्यात
राजेश

शुचि's picture

7 Mar 2010 - 3:19 am | शुचि

नाक्यावर येतोस मुद्दाम घातलय ....... =))
लै भारी टच येतोया!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चतुरंग's picture

7 Mar 2010 - 3:54 am | चतुरंग

तू त्या संदीप खरेचा बाजार उठवणार रे! :D

चतुरंग(खोटे)

गुर्जी तुमच्या (ख. व.) आदेशावरून ही आधुनीक कविता -
क्ष१, व१, क१=तू , हपीसात , येणे
क्ष२, व२, क२=मी , आय एम , करणे
क्ष३, व३, क३ = तू, रिप्लाय, करणे
क्ष४, व४, क४ = मी मज, हरवून , बसणे
_________________
क्ष१, व१, क१=तू , कोडींग , करणे
क्ष२, व२, क२=मी , बग, शोधणे
क्ष३, व३, क३ = तू, फिक्स, करणे
क्ष४, व४, क४ = मी ,रिटेस्ट, करणे
__________________
क्ष१, व१, क१=तू , हार , न मानणे
क्ष२, व२, क२=मी , हार, न मानणे
क्ष३, व३, क३ = मॅनेजर चे , मग, फावणे
क्ष४, व४, क४ = आपली ,जोडी, जमणे
__________________
क्ष१, व१, क१=प्रकल्प , भरास , येणे
क्ष२, व२, क२=प्रीत , पूर, येणे
क्ष३, व३, क३ = मॅनेजर , बढती, देणे
क्ष४, व४, क४ = विन्-विन ,स्थिती, होणे

कविता -
तू हापीसात येता, मी आय एम करते
तू रिप्लाय करता, मी मज हरवून बसते||१||

तुझ्या कोडींग मधला, बग बघ हा मी शोधीला,
करत फिक्स तू त्याला, मीही रिटेस्ट तो केला||२||

तू ही हार ना मानी, मी ही ना हारे रे,
मॅनेजरचे मग फावे, आपुली जोडी तो जमवे||३||

प्रकल्प भरास मग येइ, प्रीतीला पूरही येई,
मॅनेजर बढती देई, विन्-विन स्थिती ही होई||४||

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

राजेश घासकडवी's picture

7 Mar 2010 - 4:50 am | राजेश घासकडवी

प्रेमासाठी जगाला ठोकर मारू... जग हरामखोर आहे, तू व मी एवढेच केवळ आहोत या पारंपारिकतेपासून फारकत घेणारी कविता आहे. वाचून धन्य झालो - हसून झाल्यानंतर.

तुला बढती, मला बढती, मॅनेजरची सोय, आपल्याला एकत्र असण्याची संधी, प्रीतीला पूर, प्रकल्पाला बहर... पृथ्वीवर शांतता माजायचीच तेवढी राहिली आहे! (पुढच्या ओळी म्हणून पसायदान शोभून दिसेल...)

पहिल्या पाच ओळी ती तू व मी भोवती फिरते मग हळूहळू वैश्विक होते. तुम्हाला केवळ ओळी-अंतर्गतच नाही, तर ओळींच्या ग्लोबल रचनेचंही तंत्र जमतंय.

राजेश

पुढच्या कविता सरळ लिहा - क्ष, व, वगैरे लिहीत बसण्याची गरज नाही.

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Mar 2010 - 6:15 am | अक्षय पुर्णपात्रे

मास्तर धड्याचा अभ्यास चालू आहे. मागच्या वेळपेक्षा यावेळच्या वर्गात कमी विद्यार्थी दिसतात. तीन नाठाळ विद्यार्थ्यांनी तर अभ्यास करण्याचे टाळले आहे - एक दंडवत घालून मोकळा झाला, दुसरा निषेध करुन आणि तिसरा माजी यशस्वी विद्यार्थ्याच्या व्यावसायिक अधोगतीचा उल्लेख करून. पण शुचितैंप्रमाणेच मी प्रामाणिक विद्यार्थी (मागच्या वर्गातच मी हे दाखवून दिले आहे.) आहे. सध्या सर्दीने त्रस्त असल्याने काही सूचत नाही. पण जोमाने प्रयत्न करतोय. श्री सुनीत आणि श्री बिरुटे यांच्याप्रमाणे विडंबने फेकून जाणार नाही. प्रणालीशी सुसंगतच कविता करीन.

राजेश घासकडवी's picture

7 Mar 2010 - 7:23 am | राजेश घासकडवी

तुमच्या अभ्यासू वृत्तीचं आणि निष्ठेचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

वर्गात विद्यार्थी कमी आहेत हे खरं आहे. मी समजूत अशी करून घेतोय की झटपट प्रेमगीत रचून ते आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीला दाखवायला गेले असावेत. ते महत्त्वाचं काम आटपल्यावर डकवतीलच...तसं असेल तर मी समजू शकतो.

ज्यांनी हात झटकले आहेत त्यांच्याबाबतीतसुद्धा अजून मला आशा आहे. अर्थात त्यांना जर ही किचकट प्रणाली अवलंबायला कठीणच जात असेल तर मग आपण काय करणार. पण शुचिंनी ती प्रणाली वापरून इतक्या सुंदर कविता केला त्यावरून हुरूप येईल असं वाटतं.

तुमच्यावरची आलेली सर्दीची पीडा, शाप लवकर जावो ही प्रार्थना...

श्री. सुनीत व प्रा. डॉ. बिरुटे यांनीही या कार्याला आपापला हातभार लावावा अशी विनंती.

राजेश