एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं.
हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले.
कशाबद्दल? आईचा प्रश्न.
'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली.
मग ठीक आहे. त्यात काय एवढं?
एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली. वर्गपाठाच्या त्या वहीत शाळेत तिच्या 'टीचर' सराव घेतात. मुलांकडून हा सराव करून घेतला जातो. त्यानुसार त्या दिवशी हिंदीतली स्वराक्षरे लिहिण्याचा सराव होता.
त्यानुसार लेकीने 'अ आ इ ई.... ' अशी सगळी अक्षरे नीट लिहिली होती. पण तिच्या शिक्षिकेने तिचा दहापैकी पाव मार्क कापला होता. बाकी सगळ्यांना दहा मार्क मिळाले असताना माझ्या लेकीला मात्र ९. ७५ मार्क्स मिळाले होते.
तिच्या आईने पाव मार्क कापण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर मुलीने तिला वही दाखवली.
हिंदीमध्ये 'औ'वरच्या दोन्ही मात्रा शेवटच्या कान्यातून निघणार्या असाव्यात अशी तिच्या शिक्षिकेची अपेक्षा होती. पण घरी अभ्यास घेताना आपण मराठीत लिहितो, त्याप्रमाणे लेकीने 'अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्या कानातून एक अशा दोन मात्रा दिल्या होत्या. पण त्या चुकीच्या असे सांगून तिच्या शिक्षिकेने हा पाव मार्क कापला. त्यांच्या मते दोन्ही मात्र शेवटच्या कान्यातूनच वर जायला हव्यात.
कशीबशी समजूत घालून नि तिचं लक्ष दुसरीकडे वेधून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न तिच्या आईने केला. चार तासांनंतर मी घरी आल्यानंतर त्या पाव मार्काचे माझ्या पुढेही आवर्तन झाले. तोपर्यंत ते तिच्या डोक्यात धुमसत होतेच.
'औ'ची मात्रा पहिल्या काय किंवा शेवटच्या काय कुठल्याही कान्यातून निघाल्याने अक्षराचा, शब्दाचा अर्थ बदलला नक्कीच नसता. पण अचूकतेच्या नादात किंवा ती चूक मार्कांतून दाखविण्याच्या नादात त्या कोवळ्या मनावर किती परिणाम झाला या भावनेनेच मी हेलावलो. दहापैकी पाव मार्क मिळाला नाही आणि इतरांना तो मिळाला याचं दुःख तिला सहन होत नव्हतं. वास्तविक तिला अमुक मार्क्स मिळावेत या अट्टहासाचे आम्ही नव्हतो नि नाहीत. पण स्पर्धेचा भाव तिच्या मनात मात्र नक्कीच होता. व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता.
ज्युनियर केजीमध्ये जाणार्या माझ्या मुलीला कमी मार्क मिळाल्याचे दुःख नि त्यामुळे येणारा ताण एवढा असेल तर गेल्या काही दिवसांत आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो सहन न झाल्यामुळे या कळ्या फुलण्याच्या मार्गावर असतानाच कोमेजल्या. हुशारी मोजण्याची मार्काधारीत मोजपट्टी या ताणाला जन्म घालते. ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल? हे आणि असंख्य विचार आमच्या डोक्यात पिंगा घालू लागले.
तिकडे आई-बाबांपाशी रिती होऊन माझी मुलगी झोपी गेली पण, तिचा तो पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...
प्रतिक्रिया
10 Jan 2010 - 12:49 am | स्वाती२
च्च! ज्युनिअर केजीतल्या मुलांना मार्क वगैरे म्हणजे अतिच आहे. :S धड mortar skill सुद्धा विकसित झालेली नसतात. इतक्या लहान वयात हे असे ओझे लादून काय साध्य होते.
10 Jan 2010 - 5:24 am | अमृतांजन
+१ सहमत
10 Jan 2010 - 12:57 am | टारझन
त्या मॅडम ना मिपा जॉइन करायला लावा :)
आम्ही उजळणी घेऊ त्यांची :)
-
10 Jan 2010 - 2:15 am | रेवती
हम्म!
आजकाल इतक्या लहान मुलांना मर्क्स देण्याची चढाओढ शाळाशाळांमध्ये लागलेली असते. चौथी इयत्ता पूर्ण होइपर्यंत हळूहळू त्यांना मार्क्स किंवा ग्रेडस बद्दल कळावे असे वाटते. इतक्यावेळा अभ्यासातून आलेल्या ताणाचा विषय चघळला जातो, अगदी नको ती पायरी विद्यार्थी गाठतात पण आजूबाजूला बघताना लोकांच्या मानसिकतेत काहीही बदल झाला नसल्याचे जाणवते. या विषयावरचा असलेला '३ इडियटस' हा सिनेमा म्हणूनच तरूण वर्गाला जास्त आवडल्याचे समजते.
तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी.
रेवती
11 Jan 2010 - 6:55 am | सहज
>तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी.
खरे आहे.
10 Jan 2010 - 2:48 am | प्रभो
तिज्यायला...बालवाडीत हिंदी???...
पाचवीत येईपर्यंत हिंदी आणी विंग्रजीचा संबंध पण नव्हता आधी.
धड एक भाषा नीट शिकवा म्हणा आधीतरी...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
10 Jan 2010 - 4:03 am | मदनबाण
ही टीचर अंमळ गंडलेली दिसतोय !!! /:)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
10 Jan 2010 - 10:42 am | अमोल खरे
माझ्या मोठ्या भावाच्या बाबतीत पण असेच झाले होते. आई म्हणाली होती एकदा की त्याला ज्युनिअर की सिनिअर केजी मध्ये "भ" काढता येत नसे आणि म्हणुन त्याला त्याच्या बाई ओरडत असत.........माझा मोठा भाऊ मग घरी येऊन रडत असे व शाळेत जायला भीत असे. काही दिवस सहन केल्यावर मग एके दिवशी माझ्या आईने सरळ शाळेत जाऊन त्या बाईंविरुद्ध कंप्लेंट केली. मुख्याध्यापिका अतिशय सज्जन होत्या. त्यांनी आईला पुर्ण सहानुभुती दाखवत त्या बाईंना समज दिली. पुढे परत त्या बाई माझ्या भावाला "भ" काढता येत नाही म्हणुन ओरडल्या नाहीत. पण ती गोष्ट माझ्या भावाच्या अजुनही लक्षात आहे. तो म्हणतो कि जर का त्या बाई समोर आल्या तर मी त्यांना तुमचं वागणं किती चुकीचं होतं हे नक्की सांगणार आहे. अशा गोष्टी पटकन विसरल्या जात नाहीत. भोचक साहेब व बाकी सभासद ज्यांची लहान मुले आहेत, तुमच्या मुलाला/मुलीला ती टीचर असाच त्रास देत राहिली तर सरळ शाळेत कंप्लेंट करा. टीचर विरुद्ध तक्रार केली तर परीक्षेत कमी मार्क देतील वगैरे विचार करु नका. असे काही होत नाही. तुमच्या मुलीला तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोण करणार. आत्ता ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या त्यात पालकांनी मुलांना सपोर्ट केला असता तर त्या टाळत्या आल्या असत्या असे वाटते. ह्या विषयावर प्रभुसरांचे मत वाचण्यास उत्सुक आहे.
10 Jan 2010 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते
अमोल, तू म्हणतोस ते खरंही असेल... पण शिकवणे ही तारेवरची कसरत आहे हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. लहान मुलांना, विशेषतः केजी वगैरे मधल्या मुलांना थोडीफार तरी जबरदस्ती करावीच लागते. आणि प्रत्येक मूल सारखेच सेन्सिटिव्ह नसते. प्रत्येकाला वेगवेगळी टेक्निक्स वापरावी लागतात. कदाचित, त्या बाईंनी जबरदस्ती केली नसती आणि भावाचे अक्षर खराब राहिले असते तर आपण बाईंनाच दोष दिला असता ना? अर्थात शिक्षकही माणसेच आहेत आणि रागलोभाचे बळी असतातच. म्हणून म्हणले की कोणतीही एक बाजू धरून उपाय नाही... तारेवरची कसरत आहे, प्रत्येक पाऊल टाकताना त्याक्षणीचा तोल सांभाळायला हातातली काठी डावीकडे की उजवीकडे झुकवायची हे बघावे लागते.
बिपिन कार्यकर्ते
11 Jan 2010 - 10:51 pm | पक्या
केजी मधल्या मुलांना जबरदस्ती ?
शिस्तीचा अभाव असू नये पण हस्ताक्षर सुधारण्यासाठी केजी च्या वयात जबरदस्ती करणे म्हणजे अतिच वाटतयं .
जय महाराष्ट्र , जय मराठी !
10 Jan 2010 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते
वेलकम टू द क्लब... आम्ही बरेच दिवसापासून भोगतोय.
बिपिन कार्यकर्ते
11 Jan 2010 - 9:17 am | jaypal
खर आहे तुमच म्हणन........
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
10 Jan 2010 - 2:16 pm | श्रावण मोडक
असो होऊ नये; पण टाळणार कसे?
10 Jan 2010 - 3:37 pm | ज्ञानेश...
असे होवू नये; खरंच!
10 Jan 2010 - 7:27 pm | चतुरंग
ज्यु.केजी इतक्या लहान वयात लिहायला शिकवणे ही चूक आहे जी आपल्याकडे हल्ली सर्रास करतात! इतक्या लहान वयात मुलांच्या हाताला अक्षरांचे वळण बसणे अवघड असते. मोटर कंट्रोल हा साधारण
पहिलीच्या आसपास यायला लागतो. त्याआधी फक्त अक्षर ओळख एवढेच असते. आणि मार्कांची गोष्ट तर अतिशयच चुकीची आहे, अशाप्रकारे चूक दाखवून देणे ह्याने त्या विद्यार्थ्याचा सर्वांदेखत पाणउतारा होतो आणि ते मनाला लागते. मार्कांच्या भानगडीत न पडता फक्त योग्य-अयोग्य सांगितले जाऊ शकते कारण त्या वयात तेवढेच आव्श्यक असते.
चतुरंग
10 Jan 2010 - 9:11 pm | पाषाणभेद
आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. मुलांवर अवाजवी आपेक्षा लादू नये.
झाड वाटेल तसे वाढू द्यावे, चुकार वेली फक्त त्यावर वाढू देवू नये.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
11 Jan 2010 - 9:28 am | II विकास II
हल्लीचे शिक्षण बघुन असे वाटते की माणसांसाठी शिक्षण नसुन शिक्षणासाठी माणसे आहेत.
लहाणपणापासुन ओझ्याचे बैल.
11 Jan 2010 - 11:14 pm | मराठे
आपल्याकडच्या बहुतेक शाळा म्हणजे मुलांना कारकून बनवण्याचे कारखाने आहेत. जोपर्यन्त गुणांच्या टक्केवारी वर मुलांची गुणवत्ता ठरवली जाते तोवर अधिक मार्क मिळवण्याची स्पर्धा संपणार नाही.
12 Jan 2010 - 4:56 am | एक
"औ" काढायला?
"ते जे काही मुलीने काढलं आहे ते "औ" आहे" हे तर त्या बाईला कळलं होतं ना? (कळलं नसतं तर सगळेच मार्क कापले असते ना?) मग प्रॉब्लेम काय आहे? ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल?
२ मात्रा एका कान्यातून नाही आल्या, काय एवढा फरक पडतो? हा प्रश्न त्या बाईला कोणीच विचारताना दिसत नाही आहे? मार्क कापा (मुळात असल्या गोष्टींना मार्क हेच पटत नाही) कापू नका, पण असली तर्कटं लहान मुलांच्या माथी का मारता असा जाब त्या बाईला कोणी विचारणार आहे का? मी दुसर्याच दिवशी त्या बाईची सदिच्छा भेट घेतली असती हे नक्की!!
13 Jan 2010 - 12:38 am | प्राजु
अवघड आहे!!!
माझ्या मुलाला आम्ही आत्ता मुळाक्षरे शिकवत आहोत. ते ही फक्त अ ते अ: पर्यतच. आणि ते ही फक्त ओळखायला.
लेख विचार करण्यास उद्युक्त करतो हे नक्की.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
14 Jan 2010 - 8:14 pm | रेवती
अगदी!
आमच्याकडे कसेबसे ऊ पर्यंत पोहोचलो आहोत.
रेवती
13 Jan 2010 - 7:46 am | पाषाणभेद
त्या बाईंना मिपा वरची सभासद करून घ्या.
अवांतर: कोठे गायब होता ईतके दिवस? ऑ?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
14 Jan 2010 - 10:21 am | वरुणराजे
माझी गोष्टतर याहून वेगळी आहे. मला तर चित्रकलेमध्ये नापास केले होते. बाकी सगळ्या विषयात पास
मग माझी आई शाळेत जाऊन भेटली व मी चित्रकलेत पास झालो. अजुनही मी चित्रकलेत नापास होतोय. ईजिनियरींग ड्रॉईंग कसे पास झालो ते पुणे विद्यापीठाला माहिती!!!
@ एक
ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल?
जबरदस्त !!!!
मी ईजिनियर असुन अजुन पट्टीनेपण सरळ "लाईन" मारु शकत नाही.
माझी "लाईन" वाकडी असते..
20 Jul 2010 - 5:28 pm | वाहीदा
आयुष्याचे धडे शिकण्यास देव तिला सामर्थ्य देवो ....
~ वाहीदा