http://www.misalpav.com/node/41789
"माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले.
नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती.
संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता.
विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व .
घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता. त्याच्या पारंब्या तालुक्यातील ७ मोठ्या गावांमध्ये पसरल्या होत्या.
चेहऱ्यावरून खूप निरागस पण पक्का व्यावहारिक.
नानांचं आणि त्यांचे वयक्तिक काही वैर नव्हते. पण त्यांच्या वडिलांबरोबर मात्र पूर्वी कॉम्पेटीशन असायचे.
संगीत बारीवर कोण जास्त पैसे उडवतो.
एकदा एस टी कंडक्टरकडून ४ रुपये घायचे विसरून राहिले तर बायकोने तेरा बोल ऐकवले. (तेरा अंकाला काही मोल नाही, अतिशोयक्ती आहे ती)
पूर्वीचे गडी नाचणाऱ्या बायांवर नोटांच्या गड्ड्या फिस्करायचे. म्हाताऱ्या काहीच बोलायच्या नाहीत राव. धोतार मला अजून पण माझ्या बायकासमोर अभिमानाने त्या सुरस कथा ऐकवते.
असा राग येतो काय सांगू.
विजूबापू वाकून खिशातला मोबाईल सांभाळत, एक हाताने नानांच्या पाया पडले. सुरकुतलेला हात हातात घेऊन किंचित दाबला आणि लक्ष असू द्यात आमच्या उमेदवारावर असे डोळे मिचकावत म्हणाले.
काय ती आपुलकी आणि प्रेम...! जणू त्यांच्या पिताश्रींच्या करतुकीमुळे काहीतरी उद्योगधंदा चालू करायची प्रेरणा मिळाली आणि पतपेढीचा वेल गगनावरी गेला तो फक्त माउलींच्या पुण्याईमुळेच..!
बाकी भावी सरपंच आणि कार्यकर्ते पटापटा नानांच्या पाया पडले. त्यात शान्तिमामा पण होता जो चटकन बाजूला झाला.
नानांनी विजूबापूच्या हाताला धरून त्यांना घरात ओढून नेले. इतर ४ दाढीवाल्याना आणि सरपंच उमेदवाराला पण विजुभाऊंनी आत येण्याचा इशारा केला.
मतभेद असले तरी मनभेद असू नयेत राजकारणात.
नेहमीच्या शैलीत नानांनी चहाचे फर्मान सोडले.
" पाचच कप आदण ठेवा. ये बाकी पोरा हो जावा पुढच्या घरी प्याम्पलेट वाटा." विजूबापूने आपल्या करड्या आवाजात सगळी वेठबिगारी प्रचारक हाकलून लावली.
"माउली प्रभात फेरीत चालताना दिसला नाहीत." दाढी नंबर १.
"बापू एक पाय जास्त चालू देत नाही आणि पोरंसोरं आहेत की पळायला. आता आपलं वय उरलं आहे काय ?" नाना टिपिकल पोरांनी टाकून दिलेल्या जर्जर झालेल्या म्हाताऱ्यासारखी व्यथा सांगू लागले.
" पाय थकले असतील पण खोपडी मात्र अजून तेजतर्रा आहे माउली तुमची. तुमच्यामुळे गटारीतून वाट काढत बोंबलत फिरावे लागतंय दारोदारी आम्हाला." दाढी नंबर ४.
आल्याचा गरगरीत चहा आला. पुण्यावरून स्टार बाजारातून ऑफरमध्ये आणलेले 'गुड डे'ची बिस्किटांची प्लेट देखील आली.
फूड डिप्लोम्यासी मध्ये बायकोचा हातखंडा आहे.
" तुमचे सगळे शिलेदार निवांत दिसत आहेत. निवडणूक होयच्या आधीच माघार घेतलेली दिसतेय. असेच लढायचे होते तर बिनविरोधच केली असती की. कशाला एवढा जीवाचा आटापिटा आणि पैशाचा नासधूस. आमच्या उमेदवारांचे लीड तोडणे अवघड आहे" सायबूनानांनी ग्राऊंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला.
" म्हातारपणात वेळ घालवणे लय मुश्किल असते सायबू. तुला आता नाही समजायचे."
धोतराने गड्डी फिस्कारली...!
.....
"धोतराच्यात चहा बिस्कीट करूनच आला असाल. का करायचंय चहा आणखी?" शान्तिमामाचे गृहमंत्र्यासमोर काही चालत नाही हे जग जाहीर होते.
"लका चहा राहूं देत पण चुलत्याला नीट बोल जरा. धोतार काय म्हणतोय. संग्राम आमच्या नाकावर टिचून विरोधात गेला पण चारचौघात आमच्यात कोणी कधी त्याची मानहानी नाही केली. तुझ्या वाचाळपणामुळे घोळ करशील बरका." विजुभौने शांतारामचे कान उपटले.
"धोतार आहेच त्या लायकीचे. ज्याची लायकी नाही असे उमेदवार उभे केलेत. त्याला नाही धोतार सोडून डोक्याला बांधायला लावले तर नाव सांगणार नाही." पुनरुच्चार केला.
एखादं असतं लापाट. किती पण समजावा.
वेठबिगारी शरमली. एकाने प्याम्पलेटचा बोळा करून खाली फेकून दिला.
इकडे सरपंचाचा उमेदवार दत्ता, संभा आणि सतीश १०-१२ पोरं घेऊन जंगजंग पछाडत होते. त्यांना माउली संग्रामच्या करिष्म्यापेक्षा स्वकष्टातून निकराने लढायचे होते.
संग्रामच्या वॉर्डातील सगळे उमेदवार तगडे होते. त्यांचे घरगुती फिक्स मतदान त्यांना सहज निवडून आणणार होते.
विश्वासच्या दारात पॅम्प्लेट वाटायला गेले तसे त्याच्या वडिलांनी कोणालाही आत येऊ दिले नाही.
" चेष्टा लावली काय? विरोधात उभे राहून आमच्याच घरात प्रचार करायला येता." असे म्हणत अण्णांनी प्याम्प्लेट त्यांच्या समोरच फाडून टाकले.
सामाजिक सेन्स नावाचा प्रकार काय असतो हेच माहित नव्हते यांना आणि हे चाललेत राजकारण खेळायला.
रहदाऱ्यांच्या वस्तीत गेल्यावर रमाबाई ने घरामागच्या झाडाची ४-५ लिंबं चटकन तोडून आणली आणि गूळचॅट सरबत बनवला.
दत्ताचा आठवड्याभराच्या प्रचाराचा सगळा शिणवटा निघून गेला.
"दत्ता भाऊ संध्याकाळी 'नाईन्टी' नाही दिली तरी चालेल. रमाबाईंच्या सरबताची नशा आयुष्यात उतरणार नाही." दत्ता बरोबर होपलत फिरणारा बेरोजगार पोरगा म्हणाला.
"आमच्या पारुबाईला निवडून आना रे पोराहो. मला येडीला नाही कळत राजकारण पण ती काहीतरी चांगले करेल रहदाऱ्यांसाठी. माझं 'घरकुल' पण अडकलं आहे वर्ष झालं, तेवढे जरी बघितल तरी मेहेरबानी होईल."
रमाबाई इमोशनल झाल्या तसे दत्ताला 'नायक' मधल्या अनिल कपूर सारखा फील यायला सुरवात झाली.
"माझ्या पोरींना शाळेत जाण्यासाठी पंचायत समिती मार्फत सायकली मिळायच्या होत्या पण त्या आल्याच नाहीत." रंजाबाईने बेसिक मागणी केली.
संभाने लगेच पक्षाचा तालुका अध्यक्ष असलेल्या आपल्या मामाला फोन लावला.
" माळवाडीत मामाच्या घरी सायकली ठेवल्या आहेत. तिथल्या रजिस्टरवर सह्या करा आणि दोन सायकली घेऊन या. माझे नाव सांगा. आणखी कोण असेल त्यांना पण सांगा"
संभाने एका फ्री कॉलवर चुटकीसरशी एक बेसिक प्रश्न सोडवला.
----
अधिकृत प्रचाराची वेळ संपायला अवघे काही तास उरले होते. दोन्ही पक्षांनी आपआपल्या याद्या तपासून पाहिल्या.
मन्या मोबाईलवर लोकसत्ता अँप वरील बातम्या वाचत होता.
" पंतप्रधान परत चाललेत विदेशात. त्या NRI लोकांचा आपल्याला काय फायदा? ना ते मतदान करत ना देशाला त्यांची ठोस मदत. काही फायदा नाही होणार. फक्त अक्कल शिकवतात NRI तिथे बसून."
" आयला आपल्या यादीतील NRI लोकांचा फायदा आपल्याला होईल ना भाऊ." यादी तपासत असताना माझ्या खोपडीत विचार चमकला.
सहसा ज्यांच्या घरातला आणि अगदी जवळचा उमेदवार असेल तरच पुण्यामुंबईला राहिलेले आणि मतदार यादीत नाव असलेले गावाचे NRI च मतदानाला येतात. त्यातले पण सगळे येत नाहीत.
" दत्ता गाडी काढ. निगडी पासून चालू करून, खडकी, नारायण पेठ, कात्रज- मग हडपसर पिंजून सासवडला "गारवा धाब्यावर" जेवूनच प्रचाराची सांगता करू. आता लय झालं. बस्स प्रचार. वैतागला जीव."
मन्याच्या Earnestness, Planning and Execution चा मला हेवा वाटतो.
हा सगळा कारभार तरुण पोरांचा होता. गाव बदलायचा होता त्यांना.
" गुंड्याला भेटायचे होते. कोणत्या फ्ल्याट मध्ये राहतो." मन्याने सेक्युरिटी वाल्याला चुना मागत चौकशी केली.
" चुना नाही आहे माझ्या कडे. म्हणजे इथे कोणी गुंड लोक राहत नाहीत." महाराष्ट्री सेक्युरिटीवाला बोलताना अडखळला.
" हा हा भारी जोक करता राव. गुंड नाही हो गुंड्या. गूं$$$ड्या. सोलापूरचे दिसताय पण चांगली पुणेरी टोमणा मारताय की." मन्या सगळा भारत फिरला आहे. पण मुद्दाम अनासपुरे सारखा आव आणतो.
" क्या है? इधर कोई गुंडा वगैरे नहि रहता. निकलो यहांसे. कहा कहा से आते है लोग पता नही." एक उत्तर भारतीय गोराचिट्टा सेक्युरिटी गरजला.
" कहा कहा से आते है???? नरसाळ्या राज साहेबांना फोन करू क्या ?" मन्याकडे सगळ्यांचे फोन नंबर होते.
" अरे भायसाब, गजानन मोडवे को मिलना था". मी मध्ये हस्तक्षेप केला.
" भैया मराठीमध्येच बोला की नरसाळ्याशी. का तुम्ही पण भैये झालात पुण्यात येऊन?" मण्याची 'अस्मिता' त्याला मिस कॉल देऊन देऊन हैराण करत होती. अस्मिता त्याची तीन महिन्याची बायको.
रजिष्टर मध्ये माहिती भरून आम्ही सोसायटी मध्ये घुसलो. क्लब हाऊस जवळचा स्विमिंग पूल पाहून पोरांना राहवेना.
" सुळकी मारायची का मन्या? "
" पहिले तो चीकाट गुंड्या वेळेवर मेन्टेनन्स भरतोय का आधी बघू मग उड्या मार. इथं काय पोहायला आलाय वय? येताना का नाहीं सांगितले, मुळा नदीत सोडला असता की तुला. रताळ्या " मन्याच टेम्परामेंट खतरनाक.
दारात नाजूक रांगोळी काढली होती. मन्याने बेल दोन चार वेळा कचा कचा वाजवली. दार उघडताच मन्या टून करून उडाला.
" वहिनी, गाऊन घातलाय. सांगू का काकीला? पण नशीब आहे तुमचं बरका. आमच्या हिला पण घालावसा वाटतो म्हणा. माझी देखील बिलकुल ना नाहीं पण आमची मातोश्री.." मन्याला दत्ता ने थांबवले.
" मनू भाऊजी बसा सगळेजण. जैसा देश वैसा भेस." असे म्हणून वहिनीनी तांब्या फुलपात्र आणून ठेवले.
" कोण आले आहे ग जानू?" बाथरूम मध्ये काही तरी करत असणारा गुंड्या उर्फ गजानन बर्मुड्यावर बाहेर आला.
" गुंड्या लका आता तरी हाफ चड्डी घालायचे सोडून दे." गुंड्या सकट सगळ्यांचा हशा.
गजानन ची पूर्वी घरची बेताची परिस्थिती होती. दहावीत पण त्याला म्हणावी अशी मार्क पडली नव्हती. कामाच्या शोधात तो पुण्यात आला. तो गावात परत फिरकलाच नाहीं. कॉल सेण्टरला काम करत करत पदवी बरोबर एमबीए केले. त्यावेळेस एमबीए च वारं पण चांगलं वाहत होते. त्या वाऱ्यात त्याची नाव लवकर किनाऱ्याला पोहचली.
बायको देखील नोकरी करणारी मिळाली. सोन्यवने पिवळं.
आता स्वतःचा फ्लॅट, चारचाकी, पोरं चांगल्या शाळेत. गावाकडे आई वडिलांना सर्व सुखसोयीयुक्त २ खोल्या बांधून दिल्या. त्यांचे औषध पाणी वेळेवर पाहतो. मध्यंतरी केरळ वगैरे फिरवून आणले त्यांना. गजाननाचा सर्वांगीण विकास झाला होता. त्याच्या ड्रॉइंग रूम मधल्या वस्तूंवरून ते स्पष्ट दिसत होते. गावातल्या त्याच्या समवयस्क पोरांच्या तो कितीतरी पटीने पुढे होता. आणि महत्वाचे त्याने आपल्यासकट बायकोचे देखील गावातील मतदार यादीतच नाव नोंदवले होते.
मी येण्याचे प्रयोजन सांगितले.
दत्ता गजाननच्याच वर्गात होता आणि त्याला चांगलं ओळखत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
आम्ही निघायची गडबड केली तसा वहिनींनी लग्नाचा अल्बम आमच्या मध्ये आणून ठेवला. गावातील सगळ्या पोरांच्या फोटोना अल्बम मध्ये स्थान दिले गेले होते.
" चला भाऊजी सगळे जेवायला." वहिनींनी डायनिंग टेबल सजवला होता.
" स्कॉच घेयची का मन्या?",गुंडा भाऊ भलताच उदार झाला होता.
" खाटखुट असले तरच मी घेतो." मन्याच भलतंच असतं.
" खाटखुटच आहे, भैय्यासाठी श्रीखंड आणि पनीरची भाजी आहे."
गुंड्याभाऊच्या बायकोने एवढा साग्रसंगीत स्वयंपाक एक ही भांडं न वाजवता कधी बनवला हे गप्पांच्या नादात कोणाच्या लक्ष्यात देखील आले नाहीं.
शहरातल्या सगळ्याच मुली अगाव असतात हे कीर्तनकारांनी पसरवलेल्या भाकड कथांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हा खूप मोठा सुखद धक्का होता.
दाबून हाणले.
'गारवा' कॅन्सल आता.
दत्ता ने डिझेलसाठी दोन हजार रुपये गजाननाच्या बनेल मध्ये कोंबले.
दरमजल करत सगळी लिस्ट पूर्ण केली. पोलीस, टेल्को-भारत फोर्ज मध्ये काम कारणारे, मार्केट यार्डात गाळे असणारे, पी एम टी डायवर कंडक्टर कोणी कोणी सोडले नाही. मन्या ड्राइविंगला असल्यामुळे वाकडेवाडीचे ट्रॅफिकपण काही वाकडे करू शकले नाही.
सगळ्यांनी येण्या-जाण्याची खर्ची घेऊन मतदानाला येण्याची हमी दिली.
चहा कॉफी नाश्ते खाऊन खाऊन पोटाचा रायता झाला होता.
रात्री १.३० वाजता गावात पोहचलो.
मन्याच्या मोबाईल वर 'अस्मिता'चे ११० मिस कॉल्स. (११० ही मात्र अतिशोयक्ती नव्हती)
... बोंबला...!!
====
क्रमश :
((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))
प्रतिक्रिया
13 Jan 2018 - 11:09 pm | एस
रात्र वैऱ्याची सुरू झाली आता.
14 Jan 2018 - 12:18 am | अनन्त अवधुत
जाहीर प्रचार आता संपला. पु भा प्र
14 Jan 2018 - 2:51 am | गामा पैलवान
साली आत्ता कुठंशी लाग्ल्यासार्की वाटंत व्हती ती ग्रांपंचायत, आन तेव्ड्यात पर्चार संप्ला बी?
-गा.पै.
14 Jan 2018 - 8:21 am | विशुमित
अधिकृत प्रचार काळात जास्त घडामोडी घडल्या नाहीत.
खरा आणि effective प्रचार अजून चालू होयचाय.
लेखमाला आवडते आहे, याचा खूप आनंद होत आहे.
धन्यवाद...
18 Jan 2018 - 7:57 pm | घाशीराम कोतवाल १.२
आता मतदानाच्या दिवशी काय होतय ते बघु
18 Jan 2018 - 9:51 pm | पैसा
मस्त आहे! गडबडीत नावे जरा गडबड झालीत काय मधे मधे! विजुबापूचा विजुभौ, शांतिमामा बघा जरा.
19 Jan 2018 - 10:13 am | विशुमित
शांतीमामा -म्हणजे शांताराम... ते बरोबर आहे पण विजुभौ चे विजूबापू केले पाहिजे.
संपादक मंडळ कृपया हेल्प मी...
20 Jan 2018 - 10:24 pm | अमितदादा
लेख आवडला...पुभप्र
28 Jan 2018 - 12:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
मस्त जमलंय प्रकरण.