ग्राम"पंचायत" लागली..!! -6

विशुमित's picture
विशुमित in जनातलं, मनातलं
3 Nov 2017 - 12:53 pm

http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
http://www.misalpav.com/node/41296
http://www.misalpav.com/node/41316
http://www.misalpav.com/node/41364

"आरं आपल्याला नको हे राजकारण. आपल्या गरिबाच काम नाही आहे हे. कुठे फेकून देतील आपल्याला कळनार पण नाही ". रात्री दोन वाजेपर्यंत सल्लामसलत करत रिटायर होऊन पुन्हा कंसल्टंट म्हणून काम करणारा दादामामा संभाला म्हणाला.
दादा लहानपणापासून नानाच्या घरात वाढला. शेणाची पाटी टाकत सुरवात करून सगळ्या शेतीचा ठेकेदार झाला होता. ते पण फक्त खाऊन-पिउन. नानांच्या वडिलांनीच त्याचे लग्न लावून दिले. राहायला छत म्हणून २ गुंठे जागा सरमाडाचा कूड घालायला दिली. सामायिक होते तो पर्यंत दादा दुसरा वहिवाटदारच होता संपूर्ण ६०-७० एकराचा.
पण वाटण्या झाल्यावर त्याच्यावर बाका प्रसंग आला. "ज्याला कोणी नाही त्याला 'माउली' आहे." अजून पण दादा सगळ्यांना हेच सांगतो.
नानांनी स्वतःची सगळी १० एकर दादामामाच्या हातात दिली. आजपावतोर नानांनी स्वतःच्या रानात पाय ठेवला नाही. संडासला पण नाही. ऊस काळा आहे का गोरा हे त्यांनी कधीच पाहिले नाही. त्यांचे फक्त कारखान्यातले टनेज आणि बिल एवढीच जवाबदारी होती.
बदल्यात त्याला काय दिले तर प्रत्येक मंगळवारी बाजाराला पैसे, प्रत्येक हंगामाला वर्षभर पुरेल एवढे धान्य, कारखान्याचे ५ किलो साखरेचं कार्ड, त्याच्या स्वतःच्या २ गाया आणि ४-५ शेरडांना आमच्या जनावरांच्या बरोबर कडवळ आणि त्याला पोरे झाल्यावर शाळे वगैरेसाठी कपडालत्ता- फी भागवणे. बाकी उरलेला हिशोब एका अर्धाफुटी व्यापारी वापरतात अशा वहीत लिहलेला असायचा. इतकी भारी वही गावात कोणाकडेच नव्हती.
बैलं, गाय-म्हशीच्या शेण-पाणी-धारा, नांगरट, पेरणी, मोटरी, भिजणे आणि मुजारांच्या मागे उभे राहून खुरपणी उरकणे हा त्याचा केआरंए (KRA) आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी अप्प्राईजलमध्ये एक्ससीलण्ट असायचा.
आता काम होत नाही पण नानांनी त्याला कंसल्टंट म्हणून नेमले आहे. त्याच्यासारखे पेरणीचा हात पंचक्रोशीत कोणाचाच नव्हता. त्यामुळेच की काय नाना काडीचे लक्ष घालता उत्तम पेरणी मुळे उत्तम उगवणी आणि उत्तम उगवल्यामुळे भरमसाट उत्पन्न.
वाडीतल्या संपूर्ण गुरांना वेसनी घालायचे काम दादा कडेच असायचे.दादाचा हात लागला की गुरं पण गरीबागत शांत उभा राहायची.
" बरोबर आहे दादा तुमचे, नको आपल्याला राजकारण " संभा पण गरिबासारखा शांत उभा होता.
-----
६ वाजता नोकिया फोनची रिंग वाजली.
" हॅलो, बोल की संभा, सकाळी सकाळी फोन केला?"
"नाना, दादा म्हणत्यात नको आपल्याला राजकारण".
" का रे बाबा?" टर उडवल्यागत ऍक्शन केली.
" तुम्ही दिलेल्या २ गुंठ्यांवर घरकुल बसले होते, ते बोगस ठरवून पाडू, असे पुढची पार्टी म्हणते." दादा का राजकारण नको म्हणतोय याचे खरे कारण सांगितले.
"तसे करणार असतील तर गावातील ४०-५० टक्के घरे जमीनदोस्त होतील."
" बाकीच्यांचे माहित नाही पण आमच्यासारख्या गरिबांचे नक्की पाडतील." नानाच्या वयोमानामुळे विरोधीपक्षाची काही वाकडी करू शकणार नाही ही प्रचिती आली होती बहुतेक.
"बरं ठीक आहे. अजून २ दिवस आहेत तुला विचार करायला." ठेवतो म्हणून फोन ठेऊन दिला.
नाना विको पावडर तळहातावर घेऊन बोटाने दात घासत स्वयंपाक घराकडे आले. 'विको'ची एक खासियत आहे. खूप दिवस त्याने दात घासले की शरीराचा एक विशिष्ट सुगंध येतो.
"तुझ्या पप्पानी कागदपत्रे काढून ठेवलीत का ग?" नानांचे रॉकेट डायरेक्ट स्वयंपाक घरात शिरले.
या नादात माझ्या डब्याच्या भाजीची फोडणी करपली.
'डेल'ची बॅग उचलून मी कंपनीचा रस्ता धरला. संभा ने माझा पचका केला होता. तरी म्हंटले एक फोन करून पाहावा.
मी जास्त लांबड लावून न घेता थेट मुद्द्यावर आलो.
"बघ अशी संधी आयुष्यात एकदाच येते. ती घालवू नकोस एवढेच वाटते. तू पुढच्या पंचवार्षिकला तिकीट द्या म्हंटलं तरी कोणी उभे करणार नाही."
" दाजी बरोबर आहे, पण दादा .."
" एक बाप म्हणून त्यांचे बरोबर आहे पण तरी ही विचार कर. फक्त २ दिवस उरलेत. नाहीतर आमच्याकडे दुसरा उमेदवार आहे." मी कॉल कट केला.
ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग होती हे विसरलोच होतो. मिटिंग उरकल्यावर डोकं दुखतंय म्हणून लवकरच घरी आलो होतो.
गाडी लावून थेट गोठ्यात गेलो. तर नाना फोन वर बोलत होते.
" ऐक तुझ्या घरकुलाची सगळी कागदपत्रे क्लियर आहेत. कोणाच्या बापाची हिम्मत नाही त्याला धक्का लावायची. एक बरेच झाले म्हणा काही बोगस घरकुलं सापडली तुझ्यामुळे " नानांनी २ काजू तोंडातल्या तोंडात घोलमडले.
"कवळी बसवावी म्हणतोय"
"दात फक्त थोडे झिजले आहेत. कवळी बसवलीतर चव लागणार नाही." मी गूगल सर्च पाजळाले.
-----
संभाच्या नावाची निवड माझी होती. काही ठोकताळे डोक्यात ठेऊन. त्याला भक्कम मानसिक, आर्थिक आणि प्रसंगी ताकतीचा पाठिंबा अनुक्रमे नाना, संग्राम आणि संभाचा तालुका अध्यक्ष असणारा चुलत मामा यांनी दिला होता.
पण पारुबाईंच्या नावाची टोटल जवाबदारी नानांची होती. तिची निवडून यायची शास्वती खूप कमी होती तरीही जाणीवपूर्वक उमेदवारी दिली होती.
पण ह्या महिलेने वाडीची बरीच सेवा केली होती. बाळंतपणे, लहान लेकरांच्या अंघोळी ते पण विना मोबदला. कोणी कोणी ऐपती प्रमाणे साडी चोळी घायचे.
पण असले कोणी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष्यात ठेवत नाही. भपका आणि फक्त हवा पाहिजे.
सप्ताह आणि इतर मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेस पूर्वी आजीला आणि आता माझ्या "सौ"ना पारुबाईचा हातभार असायचा.
नानांना वाटत होते की माझ्या नंतर या स्वतःची गावं सोडून इथं स्थायिक झालेल्या रहदाऱ्यांना कोणी किंमत देणार नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करायला हे नाव निश्चित झाले होते.
वाडीत येऊन ३५-४० वर्ष झाले असून सुद्धा स्थानिकांच्या दृष्टीने ती रहदारीच होती. जिथे माझी वाईट अवस्था होती तिथे त्या माऊलीची काय ती गत!
" धोतराने कशाच्या बदल्यात एवढे मोठे बक्षीस दिले." शांतीमामा पम्या जवळ विचकला. ज्याची बाळुती धुतली त्या आईसमान स्त्रीची टिंगल करताना ह्या भाड्याची जीभ कशी झडली नाही याचे आश्चर्य वाटते.
पारुबाई ठाम राहिली. कर नाही त्याला डर कसला.
फॉर्म भरल्यापासून सतीशची सहपरिवार रवानगी संग्रामच्या तापोळ्यातल्या फार्म हाऊस केली होती. बापजन्मात बायकापोरांना महाबळेश्वरला नेता आले नाही तो तापोळ्याला बर्मुड्यावर फिरत होता. एकदम स्पेशल बडदास्त होती.
-----
शिंगणापूरवरून सासऱ्याचा फोन आलेला पाहून संभा खुश झाला. त्याच्या मनात विचार आला फॉर्म काढायचा आज शेवटचा दिवस. बेस्ट लक द्यायला फोन केला असेल.
" रामराम पाव्हणं, बरं आहे का?"
"ठणठणीत आहे. मला कुठं बांडगुळ उठलंय." संभा ने जावयाचा तोरा मिरवला.
"तसं नाही हो. पण तुम्ही आपलं फॉर्म मागे घ्या. काय करायचंय आपल्याला. लग्नाला आताशी एक वरीस झालाय. आपला कामधंदा बघायचा. पैसे अडका कमवायचा. संसार सुखाचा करायचा. राजकारण गजकारण असते. मोठ्या लोकांची कामे ती." सासऱ्याच्या मोबाईलमध्ये टॉकटाईम कमी होता जणू सगळे एका दमात उरकले.
"अहो पण सगळे ठरलेले आहे. आता माघार घेतली तर मला तोंड राहणार नाही दाखवायला नानांना." हुंडा घेतला नाही हे बरे झाले असा संभाच्या मनात विचार चमकला, कारण न मागता मिळालेल्या रुकवतामुळे सबुरीने घ्यावे लागले होते.
"माउलीचे काय, तो नंगाड गडी आहे. त्याला आग्या ना पीच्या. तुम्ही कशाला जीव धोक्यात घालता. आमच्या पोरीच्या कुकाचा तरी विचार करा की"
"........"" संभाला काय उत्तर द्यावे कळंना.
" माझा बॅलन्स संपायला आलाय तुम्ही टिकुडून फोन करा." सासऱ्याने कॉल बंद केला.
बायकोच्या घराचीसुद्धा जवाबदारी अंगावर घायची असते ही समज लग्नानंतर त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आली होती.
जिओच्या सीमने कॉलींगचा खर्च काहीका होईना आटोक्यात होता. रिंग चालू होती. फोन उचलेपर्यंत त्याच्या मनात काहूर माजले होते. माझ्या जीवाला धोका. बायकोचं कुकू...
"हॅलो, बोला,"
"अहो तुम्ही बोला, तुम्हीच कायतरी सांगत होता." संभाच्या डोक्यावरचा बर्फ वितळायला लागला होता.
" ती माणसं खराब हायती. उगाच दगाफटका करतील. काळजी वाटते तुमची."
त्या बापाची तशी काय चूक नव्हती म्हणा. पोरीचा मालक ठीक तर सगळं ठीक.
"कोणाचा फोन आला होता?"
" तुमच्या चुलत्याचा. बापूरावचा." निरागस उत्तर देऊन सासरे मोकळे झाले.
" होय. बरं चालतंय. मी नंतर फोन करून कळवतो." फोन ठेवण्याच्या पवित्र्यात.
" घेऊन टाका माघार. जास्त विचार नका करत बसू."
बरे झाले 'घेऊन टाका माघार' ऐवजी 'माघार घेऊन टाका' म्हणाले नाही. नाहीतर संभाच्या डोक्यावरुन पाणी पायाच्या अंगठ्यापर्यंत वाहिले असते.
जसे नाना आणि विश्वासच्या नशिबी घरभेदी निपजले होते तसाच अनुभव संभाला आला.
आता तो खरा पुढारी झाला होता. ज्याचे घरात कोणी ऐकत नाही त्याला बाहेर लोक खूप मान देत असतात.
----
संग्राम आणि दाढीवाल्याना पॅनेलचे एकच चिन्ह पाहिजे होते. त्यामुळे क्रॉस वोटिंग आणि मतं बाद होयचे प्रमाण नगण्य राहते.
पण तिसऱ्या पॅनलवाल्याने त्यासाठी आक्षेप घेतला आणि वॉर्ड निहाय प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह मिळणार होती.
तिसरा पॅनल हा हौशी पोरासोरांनी काढला होता. ज्यामध्ये एक मागच्या पंचवार्षिकला सरपंच पदासाठी इच्छुक होता. फराट्यानी त्याला पुढल्या पंचवार्षिकला देतो म्हणून आश्वासन दिले hote.
गावासाठी यांचे योगदान म्हणजे रोज व्यायाम/योगा करणे, ट्रेक आयोजित करणे, पार्ट्या करणे. पण ह्या उपक्रमात फक्त त्यांच्या १०-१२ मित्रांनाच प्रवेश होता.
फॉर्म मागे घायचा ३ वाजे पर्यंत टाईम होता. बाकी वॉर्डात ठरल्याप्रमाणे झाले होते.
सगळ्यात उत्सुकता कचरेवाडी वॉर्डात होती. नाना गायब होते.
संभा, सतीश आणि पारुबाई ऑफिस मध्ये शिरले.
सह्या झाल्यावर संभा ने पहिला फोन सासऱ्याला लावला.
" बॅट मिळाली आहे."
====
क्रमश :

((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))

कथासमाज

प्रतिक्रिया

संग्राम's picture

3 Nov 2017 - 1:04 pm | संग्राम

अगदी डोळ्यासमोर चाललंय सगळं ..... मस्त

बापू नारू's picture

3 Nov 2017 - 1:37 pm | बापू नारू

जोरात सुरु आहे रणसंग्राम..
पुढचे भाग पण येउद्या लवकर

सिरुसेरि's picture

3 Nov 2017 - 1:55 pm | सिरुसेरि

धुरळाच

एस's picture

3 Nov 2017 - 4:20 pm | एस

भारी!

पगला गजोधर's picture

3 Nov 2017 - 4:38 pm | पगला गजोधर

पुलेप्र...

शलभ's picture

3 Nov 2017 - 5:01 pm | शलभ

मस्त..मजा येतेय..

थॉर माणूस's picture

3 Nov 2017 - 10:46 pm | थॉर माणूस

नादच खुळा... उमेदवार ठरले, आता खरा धुरळा. घासून नाय तर ठासून यनार :)

बापू नारू's picture

13 Nov 2017 - 4:41 pm | बापू नारू

पुढचा भाग कधी?

विशुमित's picture

15 Nov 2017 - 10:28 am | विशुमित

कामात अडकलो होतो. २ दिवसात टंकतो.
उशीर झाल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

नाखु's picture

15 Nov 2017 - 10:48 am | नाखु

वेळ लावू नका, मागच्या भागाची टोटल लागत न्हाय

मिपा भोकरवाडी पारावरचा नाखु

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:11 pm | पैसा

प्लॉट सॉलिड रंगतोय!

urenamashi's picture

10 Jan 2018 - 11:21 pm | urenamashi

खरतरं मला ग्रामपंचायतीच्या निवडुनिकी बद्दल फारसे वाचायला आवडत नाही पण तुमची लेखनशैली फारच छान आहे त्यामुळे सगळे भाग लागोपाठ वाचून काढले. जास्त उशीर न करता पुढील भाग लवकरात लवकर वाचायला मिळावा.
पु भा प्र

विशुमित's picture

10 Jan 2018 - 11:25 pm | विशुमित

धन्यवाद...
पुढील भाग पाईप लाईन मधे आहे.