अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग !
शालिनीचा विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,” अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?” अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.” “साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.
कर्टसी म्हणून अंजलीने शालिनीलासुद्धा कॉल केला. “अंजू..... कशी आहेस?..... कित्ती दिवसांनी.......” अंजलीने फोन केला याचा आनंद शालिनीच्या आवाजात लपत नव्हता. “श्रुतीच्या वडलांचं सांगायला फोन केला होतास का?” अंजलीने तुटकपणे विचारलं. “हो, मी निघतेच आहे. तू आणि मोहनासुद्धा याल ना? श्रुतीला सपोर्ट वाटेल. तसंही त्यांना फार नातेवाईकसुद्धा नाहीत.” शालिनीने म्हटलं. “हो, आम्ही दोघी येतोय. तू असणार म्हणून मोहनाला नको वाटत होतं पण मी सामाजावलय तिला” अंजलीने रुक्षपणे सांगितलं. “अंजू, मी चुकले गं.... किती वेळा सांगू मी चुकले, तू तुझ्या दुःखात होतीस, मोहना तिच्या संसारात बिझी, आई तिकडे गावी. मी खूप एकटी पडले, किती पोकळ वाटतं माहितीये.... तुमची मुलं तरी आहेत. मला तेही सुख नाही. त्या एकटेपणाच्या दुःखाच्या भरात चूक झाली माझ्याकडून. मला माझ्या चुकीचं खरच खूप वाईट वाटतं ग. तू मोहनाला सांग ना अंजू. ती माझ्याशी बोलतच नाही.” शालिनीचा रडवेला आवाज ऐकून क्षणभर अन्जलीचं मन कळवळलं. पण तरीही शालिनीच्या वागण्याला क्षमा होती का? शेवटी चूक ते चूकच ना! आपण तिला माफ केलं तर मोहनाला कसं वाटेल असाही विचार अंजलीच्या मनात येऊन गेला. “तुझा एकटेपणा मला समजतो. दुर्दैवाने आपल्या तिघीन्च्याही आयुष्यात हा एकटेपणा आहे शालिनी. पण मैत्रिणीच्या नवर्याबरोबर अफेअर करणं मला तरीही पटत नाही. जाऊदे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. चल घाईत आहे. ठेवते मी.” असं म्हणून अंजलीने फोन कट करून टाकला.
घरी पोहोचल्यावर तिने आईला श्रुतीच्या वडलांची बातमी सांगितली. “आज शालिनीशीसुद्धा बोलले पाच मिनिटं” अंजली म्हणाली, “खूप सॉरी म्हणत होती.” तिने पुढे म्हटलं. “मग तू काय म्हणालीस?” आईने विचारलं. “मी काय म्हणणार! मी काही ठीक आहे, जाऊदे, असं नाही म्हटलं पण मला वाईट वाटलं खरं” अंजलीने खाली बघत म्हटलं. “अंजू, तुमची इतक्या वर्षांची मैत्री! अगदीच तोडून का टाकता एवढ्यासाठी?”
“एवढ्यासाठी म्हणजे? तूच म्हणत्येस ना एवढ्या वर्षांची मैत्री म्हणून मग अशा मैत्रिणीच्या नवर्याबरोबर असं?” अंजलीने चिडून विचारलं.
“अंजू, अगं चुका होतात कधीकधी, पण तिला पश्चात्ताप झालाय. इतके वेळा सॉरी म्हणतेय, बरं ती काही नेहेमी अशीच वागणार्यातली आहे असंही नाही. होतं गं एखाद वेळेस काही. आणि आपण कोण परफेक्ट आहोत सांग! आशिषच्या वेळी सावरायला तुला तिने किती मदत केली. आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे”
“मी माफ करेनही. पण मोहना? तिला काय वाटेल?”
“मोहना खूप समजुतदार आहे. तिलासुद्धा नक्कीच कळेल.”
घरचं आटपून अंजली श्रुतीच्या घरी निघाली. आईचं बोलणं तिच्या मनात रेंगाळत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. या तिघी मेडीकलच्या पहिल्या वर्षाला होत्या, श्रुती त्यांना दोन वर्ष सीनिअर. शालिनीची होस्टेलवरची रूममेट म्हणून आधी शालिनीशी तिची मैत्री झाली आणि मग अंजली आणि मोहनाशीसुद्धा. श्रुतीचे वडील सरकारी ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. श्रुती त्यांची अगदी लाडकी होती. घरी सगळे तिला चिऊ म्हणायचे. तिला एक मोठा भाऊ होता, शार्दूल. तो त्यावेळी इंजिनीअरिंगला होता. त्यांच्या घरचं वातावरण फार कडक शिस्तीचं होतं. श्रुती नेहेमी बाबांना हे चालत नाही, ते चालत नाही, असं सांगत असे. पण ती फायनल इअरला असताना सर्जरीच्या एका लेक्चररबरोबर तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. आधी उडत उडत कानावर येत होतं. पण मग श्रुती उघड उघड डॉक्टर भूषण शर्माबरोबर फिरू लागली. आणि फायनल इअरची परीक्षा झाल्यावर तर ती होस्टेल वरून बॅग पॅक करून त्याच्याबरोबर पळून गेली. लग्न झाल्यावर घरचे ऐकतीलच या विचाराने दोघे लग्न करून आले पण श्रुतीच्या वडलांनी तिचं तोंड बघायलासुद्धा नकार दिला. दहा वर्षानी मोठा, युपीचा भैया आणि स्वतःचा शिक्षक अशा माणसा बरोबर लग्न करून त्यांच्या मुलीने त्यांचं नाक कापलं होतं. त्यांनी जे तिचं नाव टाकलं ते टाकलंच. ते तिला भेटले नाहीतच पण त्यांनी पुढच्या पंधरा वर्षांत तिला कधी त्या घरी पाऊलही टाकू दिलं नाही. काही वर्षानी श्रुती भूषणबरोबर अमेरिकेला गेली. त्यांना मुलं झाली पण श्रुतीचं माहेर तुटलं ते कायमचंच.... भावाशी आणि आईशी तिचं बोलणं होत असे पण वडलांच्या नजरेआड. भारतात आली की ती बाहेर कुठेतरी त्यांना भेटत असे. रडून आता तिचे अश्रूही सुकले होते.
पंधरा वर्षांनी श्रुती आज पुन्हा तिच्या माहेरी आली होती. मोजकेच नातेवाईक होते. इतक्या वर्षांनी वडलांना पाहिलं ते असं! तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मोहना खरं तर श्रुतीहून लहान पण जात्याच प्रेमळ स्वभावाच्या मोहनाने श्रुतीला सावरलं, मायेने तिने तिला थोपटलं. श्रुतीला रडताना बघून शालिनी सुद्धा मैत्रिणीला सावरायला पुढे झाली. ती श्रुतीजवळ आल्याबरोबर मात्र मोहना तिथून दूर सरकली आणि नकळत अंजलीही. घरी करण्याचे विधी आटपून पुरुष मंडळी बॉडी घेऊन गेली. आता खोलीत श्रुती आणि या तिघीच उरल्या. निघता निघता श्रुतीच्या दादाने तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. “चिऊ, बाबांनी जायच्या आधी दोन दिवस मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की इतकी वर्ष मी चिऊला येऊ दिलं नाही. पण आता तिला बोलावून घे. ती नक्की येईल. भेट होईल असं वाटत नाही पण तिला माझा निरोप दे. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांना तुला सांगायचं होतं ते यात रेकॉर्ड केलं आहे. चिऊला लगेच ऐकव तोपर्यंत मला मुक्ती नाही म्हणाले होते.” रेकॉर्डिंग सुरु करून तो निघून गेला. श्रुतीला अवघडल्यासारखं व्हायला नको म्हणून तिघी जायला उठल्या पण श्रुतीने शालिनीचा हात धरून तिला थांबवलं. हो ना करत तिघीही थांबल्या.
रेकॉर्डिंग सुरु झालं. श्रुतीच्या वडलांचा तोच परिचित धीरगंभीर आवाज. “चिऊ, काय सांगू आणि कुठून सुरु करू. काय तोंडाने सांगू! किती दुखः दिलं मी तुला. तुझ्या एका चुकीसाठी केव्हढी शिक्षा दिली मी. तुला, तुझ्या आईला, शार्दूलला, भूषणला आणि मला स्वतःलासुद्धा. तू माझी इतकी लाडकी मग इतका कठोर कसा झालो मी! फार आशा लावली होती मी तुझ्यावर. तुझ्या पळून जाण्याने, लग्नाने, झालेल्या अपेक्षाभंगाचं, अपमानाचं दुःख पचवलच नाही मी. सतत राग केला की रागाचं सोंग केलं.” एवढ्या बोलाण्यानेसुद्धा त्यांना धाप लागली होती. पण अजून उशीर करून चालण्यासारखं नव्हतं. ते नेटाने बोलत राहिले. “तू लहान होतीस पण मी तर मोठा होतो ना, मग मी मोठ्यांसारखा का नाही वागलो! लहान वयात आमचे आबा गेल्यावर कुटुंबात मोठा, भावंडांत मोठा म्हणून जबाबदारीची झूल लवकर अंगावर घेतली. हळूहळू यशही मिळत गेलं. तसतसा माझा अहंकार वाढतच गेला. मग मला हे चालत नाही, ते आवडत नाही असं स्वतः भोवती तारांचं कुंपणच तयार करून घेतलं. आणि तुम्हालाही बळजबरीने त्या कुंपणात डाम्बून ठेवलं. स्वतःला नेहेमी इतरांपेक्षा वरचढ मानत गेलो. माझ्या भोवतीच्या प्रत्येकाची प्रत्येक चूक मी दाखवली. चुकीला क्षमा असते हे माझ्या पुस्तकात कुठे नव्हतंच. तुझी बाजू घेऊन भांडताना तुझी आई म्हणाली होती, “तुम्ही क्षमा कराल तरच परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत येईल” तेव्हा मी ते धुकावूनच लावलं. पण आता मला कळतंय की एकदा तुला बघायला, एकदा तुला भेटायला, तुला सांगायला की तुझ्या आठवणी शिवाय एक दिवस नाही गेला, मी काहीही करेन. पण आता ते शक्यच नाहीये. मी खूप वेळ लावला चिऊ, मी खूप वेळ लावला. तुझी आई नेहेमी म्हणते चिऊसुद्धा तुमच्या सारखीच हट्टी आहे. थोडा हट्ट ठीक आहे पण माझ्यासारखे grudge मनात नको ठेऊ. आपलं आयुष्य जे विस्कटलं, त्याला कारण तुझी चूक नाही तर माझं हे सल, आकस धरून रहाणं होतं. रोग गेला तरी जसे देवीचे व्रण रहातात, चेहरा विद्रूप करून टाकतात, तसे हे सल आपलं आयुष्य कुस्करून गेले. मी कायम राग धरून ठेवला त्यामुळे मला मागायचा काही हक्क नाही तरीही हा बाबा तुझ्याकडे माफी मागतो आहे. चिऊ, या गेल्या पंधरा वर्षांबद्दल गिल्ट तर अजिबात वाटून घेऊ नकोस, मोकळ्या मनाने मला निरोप दे आणि जमलं तर आपल्या बाबाला क्षमा कर, करशील ना?”
रेकॉर्डिंग संपलं होतं. श्रुती हुंदके देऊन रडत होती. शालिनीने तिला मिठी मारली. मोहना आणि अंजलीही तिला येऊन मिळाल्या. अंजलीने मोहनाकडे पाहिलं. श्रुतीबरोबर तिने शालिनीलासुद्धा कवेत घेतलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने मनातले सारे सल धुऊन टाकले होते.
डॉ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/05/blog-post.html
अन्जलीची गोष्ट - तिघी नावाची एक कथा मी काही महिन्यान्पूर्वी लिहिली होती. ही कथा तिचा दुसरा भाग आहे. पहिली कथा इथे वाचता येइल.
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/02/blog-post_7.html
प्रतिक्रिया
17 May 2017 - 10:11 am | एस
अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना नेहमीच दिसतात. तुमच्या लेखनातून हे अनुभव चांगले अभिव्यक्त होत असतात. त्याला तुमच्या स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाची पार्श्वभूमी लाभली आहे, आणि तुम्ही ते चांगल्या पद्धतीने मांडतही आहात. एक स्त्रीसुलभ सहजता त्यातून दिसून येते. कुणाला ही सहजता दवणीय वाटू शकेल, पण दवणीयतेत वाईट असे काय आहे! सिम्प्लिसिटी इज समटाईम्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. असो. लेखनाला शुभेच्छा.
आमच्या आजूबाजूच्या अंजलींना समजून घेण्यास थोडी मदत होतेय हे ही नसे थोडके.
17 May 2017 - 6:45 pm | aanandinee
एस आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. सहज सोपं आणि मनाला भावेल असं लेखन वाचायला मला आवडतं. माझी शैली त्याच दिशेने जाते आहे हे ऐकून बरं वाटलं . मनःपूर्वक धन्यवाद
25 May 2017 - 6:58 am | एमी
कुणाला ही सहजता दवणीय वाटू शकेल, >> मला वाटते :D. अजुन कोण आहे का की मी एकटीच आहे?
पण दवणीयतेत वाईट असे काय आहे! >> डिपेंड्स....
17 May 2017 - 12:14 pm | उपेक्षित
एकदम सुटसुटीत, पाल्हाळ नसलेली मस्त कथा...
17 May 2017 - 6:47 pm | aanandinee
धन्यवाद उपेक्षित :)
17 May 2017 - 2:10 pm | पद्मावति
अतिशय सुरेख लिहिलंय. तुमचं लिखाण आवडतं नेहमीच पण आजची कथा खूप जास्ती आवडली.
17 May 2017 - 6:49 pm | aanandinee
पद्मवति आवर्जून प्रतिक्रिया देण्याकरिता आपले मनःपूर्वक आभार
24 May 2017 - 9:36 pm | शलभ
+११११११११
17 May 2017 - 3:22 pm | सुमीत
ताई, तुझी पीएचडी झाली आहे गुरफट्णारी नाते आणी भावनिक गुंता अगदी सहज लिहिण्या मधे.
हि कथा आता पर्यंत ची तुझी सर्वोत्तम.
17 May 2017 - 6:55 pm | aanandinee
हा हा दादा !! माझा आवडता टॉपिक आहे खरा :-) प्रतिक्रियेकरिता धन्यवाद
17 May 2017 - 9:51 pm | पैसा
कथा आवडली.
18 May 2017 - 1:13 am | रुपी
छान... लेखनशैली आवडली.
18 May 2017 - 12:45 pm | नेत्रेश
आवडली
=/\=
18 May 2017 - 2:15 pm | जगप्रवासी
खूप छान लिहिलं आहे
19 May 2017 - 3:35 am | कौशी
कथा आवडली..
19 May 2017 - 5:03 pm | aanandinee
पैसा , रुपी , नेत्रेश, जगप्रवासी, कौशी आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे _/\_
19 May 2017 - 6:25 pm | भिंगरी
वैद्यकिय व्यवसायात असणार्यांना स्त्रियांच्या भावविश्वाचे निरनिराळे पैलू दिसत असतात. त्यावर आधारित लेखही येऊ द्या.
पु.ले.शु.
24 May 2017 - 9:57 pm | राघवेंद्र
हीपण कथा आवडली.
अश्याच कथा येउदेत.