पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती. मी माझ्या इन्स्ट्रक्टरला सांगितलं कि मला थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करायची आहे आणि मगच मी मोठ्या उतारावर येईन. तेव्हा समजले कि आधी आम्हा सगळ्यांनाच थांबायची प्रॅक्टिस करायला लागणार आहे आणि मग त्यानंतर मोठा स्लोप.
मागच्या वेळी जमलं जमलं असं वाटणार टेक्निक यावेळी मात्र जमत नव्हतं. फ्रेंचफ्राय मधून पिझ्झा मध्ये येत तर होते पण माझी गाडी न थांबता पुढेच जात होती. मग एकमेव प्रकाराने ही घसरगुंडी थांबत होती ते म्हणजे कुठेतरी पडून किंवा कोणालातरी धडकून. अजून दिशा बदलायला शिकवलं नसल्यामुळं आमच्यापैकी दोन तीन जण असेच समोर येईल त्याला धडकत होते. समोरचा माणूस जर आमच्यासारखा नवशिका नसेल तर तो झटकन बाजूला होत असे पण बऱ्याचदा या स्लोपवर सगळी शिकावू जनताच असल्यामुळे थांबायला जमत नसेल तर स्वतःहून खाली पडणे किंवा मग कोणालातरी धडकणे यापैकी काहीतरी होत होतं. दहा पंधरा मिनटांच्या सरावानंतर सगळे थोडे सावरले आता फ्रेंचफ्राय मधून पिझ्झा करण्यापेक्षा सगळे पिझ्झा करतच घसरत होतो. थांबण्यासाठी मग या कोनातलं अंतर थोडं वाढवून स्की पायाच्या आतल्या बाजूने बर्फात रुतवून थांबायला थोडं सोपं जात होतं. सगळ्यांची एकंदर प्रगती की जैसे थे स्थिती बघून आमच्या इन्स्ट्रक्टरने मोठ्या स्लोपवर नको जायला इथेच थोडा अजून सराव करू असं सांगितलं.
आमची अवस्था बघता मोठा स्लोप अजुनही आमच्यासाठी कठीणच होता. आमच्या सात जणांच्या ग्रुपमध्ये तीन जणांना चांगलं थांबता येत होतं त्यांना आमच्या इन्स्ट्रक्टरने दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवलं. हा दुसरा ग्रुप आता घसरत घसरत उजवी डावीकडे कसे वळायचे ते शिकत होता. उरलेल्या आम्हा चार जणांना एकदा घसरायला सुरुवात झाली की थांबता येण्याची अजूनही शाश्वती नव्हती. आम्ही अजुनही छोट्या टेकडीवरच घसरत येऊन थांबायचा सराव करत होतो. पण यात टेकडी स्वत:लाच चढून जावी लागत असल्यामुळे वेळ आणि शक्ती जास्त खर्च होत होती. शिवाय पडणं -धडकणं चालूच होतं त्यामुळं उत्साह हळूहळू कमी होत होता. दुसऱ्या ग्रुपमधले सगळे आतापर्यंत चेअरलिफ्ट वापरायला लागले होते आणि आपण अजून तेच करतोय म्हणजे हे काही आपल्याला जमत नाहीये असं वाटायला लागलं होतं. एकदाचा त्या दिवसाचा लेसन संपला.मुलीचा लेसन अजून चालूच होता त्यामुळे तिला आणायला गेले तर ती आरामात उतारावर घसरत होती आणि थांबत होती. निदान तिला तरी माझ्यापेक्षा चांगलं जमतंय ते बघून थोडं तरी समाधान वाटलं आणि आपणही थोडा अजून सराव केला तर आपल्यालाही जमेल अशी अशा पुन्हा मनात जागी झाली. यावेळी खूपच पडझड झाल्यामुळे सगळी ताकद संपली होती त्यामुळे मुलीचा लेसन संपल्यावर लगेच घराची वाट पकडली. सगळं अंग अतिशय ठणकत होतं. गरम पाण्याचा शेक , हॉट पॅक असं सगळं करूनही पुढच्या आठवड्यात दोन तीन दिवस पायाचे अगदी दगड झाले होते. शुक्रवारपर्यंत थोडं बरं वाटू लागलं पण तोपर्यंत शनिवार येऊन ठेपलाच होता.
यावेळी आपण नक्की मोठ्या स्लोपवर जाऊ असं मनात वाटत होतं. या स्लोपला पॅरडाइज हे नाव आहे. हा ग्रीन स्लोप आहे. स्लोपचं रेटिंग हे मुख्यत्वे त्याच्या उताराची तीव्रता आणि स्लोप पार करण्यासाठी लागणारं कौशल्य यावर अवलंबून असते. तीव्र उतार, कमी रुंदी आणि जास्त अडथळे असलेल्या स्लोपची काठिण्य पातळी जास्त असते. साधारण, ग्रीन सर्कल म्हणजे शिकावू लोकांसाठी असलेला आणि ६ते २५% उतार असलेला स्लोप. ब्लु स्क्वेअर म्हणेज थोडा अजून कठीण, २५ -४०% उतार असलेला स्लोप. यासाठी वेगावर नियंत्रण आणि घसरत येताना दोन्ही बाजूला वळता येणं गरजेचं आहे. ब्लॅक डायमंड, डबल ब्लॅक डायमंड आणि ट्रिपल ब्लॅक डायमंड हे चढत्या क्रमाने ४०% पेक्षा जास्त उतार आणि स्की मधल्या कमाल कौशल्याची गरज असलेले उतार आहेत. नवशिक्या व्यक्तीने या उतारांवर स्की करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
ग्राउस माऊंटन वरच्या स्लोप्सचा रेटिंगसहित मॅप
या शनिवारी आमचा तिसरा लेसन होता. यावेळी काहीही करून चेअर लिफ्टवर जायचंच आणि चांगल्या प्रकारे थांबायला जमवायचंच हा चंग मनाशी बांधूनच घरातून निघाले होते. लेसनच्या सुरुवातीलाच आमच्या इन्स्ट्रक्टरने आज चेअर लिफ्टवर जाऊ असं जाहीर केल्याने सगळे एकदम उत्साहाने मोठ्या स्लोपकडे निघालो. पण हाय रे दुर्दैवा! यावेळी इतरांना चांगलं जमत होत पण का कोण जाणे मी मात्र सारखी पडतच होते. एखाद दुसऱ्या वेळी थांबायला जमत होतं पण इतर वेळी पहिले पाढे पंचावन्नच. यावेळी तर चेअर लिफ्ट मध्ये बसण्याची आणि त्यातून उतरण्याची कसरतही करायची होती. चेअरलिफ्ट मध्ये बसताना तरी ठीक होतं पण उतरताना आम्ही एकमेकांवर धडकून पुन्हा पडत होतो. यावेळी दोन तीन वेळा या स्लोपवर गेल्यावर लगेच लेसन संपला. दुःखात सुख एवढच की चेअरलिफ्ट मधून वर येत असल्यामुळे तेव्हढं दमायला झालं नव्हतं.
पॅरडाइज स्लोप आणि चेअरलिफ्ट लोडिंग एरिया
.
आमच्या लेसननंतर लेकीला आणायला गेलो तर ती तिच्या बनी स्लोपवर छानपैकी घसरत होती आणि थांबत सुद्धा होती. यावेळी सगळेच कमी दमलो होतो. बहुतेक आम्हाला या प्रकारची सवय होत होती. त्यामुळे लंच करून अजून थोडी प्रॅक्टिस करुया असा ठरवून आम्ही पोटोबा करून परत स्लोप्सवर आलो. नवऱ्याच्या ग्रुपला paradise आणि चेअरलिफ्टची बऱ्यापैकी सवय झाल्यामुळे तो अजून एक ग्रीन प्रकारातल्याच द कट नावाच्या स्लोपवर जाणार होता. मला अजून चेअरलिफ्टची एवढी खात्री नव्हती आणि पॅरडाइज स्लोपवरच माझी धांदल उडत होती त्यामुळे मी बानी स्लोपवर लेकीसोबत सराव करायचं ठरवलं. इथे वर येण्यासाठी मॅजिक कार्पेट आहे त्यामुळे चढ चढायला लागून दमायला होत नाही . शिवाय मॅजिक कार्पेटवर चढणं उतरणं चेअरलिफ्टच्या मानाने सोपं होतं.
मॅजीक कार्पेट
मग काय लेक पुढे आणि मी मागे. ती फारच सहज फ्रेंचफ्राय करत शेवटी पिझ्झा करून थांबत होती. मी मात्र स्लोपच्या सुरुवाती पासूनच बचावात्मक पवित्रा घेत छोटा पिझ्झा ते मोठा पिझ्झा असा कोन करत शेवटी हळू हळू थांबत होते. थोडा आत्मविश्वास वाढून मी जरा जोरात पुढे जायला लागले आणि अर्ध्या एक मिनटातच बनी स्लोप संपायला लागला. स्लोपपेक्षा कार्पेटवरून वर जायलाच जास्त वेळ लागत होता त्यामुळे कितीही वेळा स्लोपवर गेले तरी मन भरत नव्हतं. १० -१२ वेळा स्लोपवर खाली वर केल्यावर मात्र आता खूप झालं म्हणून थांबले. यावेळी उर्वरित सीजन आणि पुढच्या सिजनच्या पाससाठी डिस्काउंट चालू होता त्यामुळे आम्हा तिघांसाठी सीजन पास घेऊन टाकला. त्यामुळे आम्हाला स्की लेसन्स आणि रेंटल गिअरवर डिस्काऊन्ट मिळणार होता आणि बाकी ही काही गोष्टी या पासमध्ये समाविष्ट होत्या.
नंतरचा शनिवार हा शेवटचा लेसन असणार होता पण मी सर्दी खोकल्याने आजारी पडल्यामुळे मला घरीच थांबावं लागलं. यावेळी इन्स्ट्रक्टर सगळ्या ग्रुपला वळायला शिकवणार होता. जायची इच्छा खूप होत होती पण गारठ्यात जाऊन आजार वाढवण्यापेक्षा घरी राहू आणि नंतर कधीतरी पुढच्या गोष्टी शिकू अशी मनाची समजून घालून घरीच थांबले. नवरा आणि लेक मात्र त्यांच्या लेसनसाठी गेले.
यानंतर एखादा शनिवार गेला आणि लेक मला अजून स्की करायचं आहे असा हट्ट करायला लागली. तसंही आम्हाला परत माउंटनवर जायला निमित्त हवंच होत. यावेळी तिच्यासाठी अजून चार लेसन्स बुक केले आणि आम्ही मात्र आपलं आपण सराव करू म्हणून फक्त रेंटल गिअर्स घेतले.
दोन तीन आठवडे गॅप झाल्यामुळे मी पुन्हा मॅजिक कार्पेटवाल्या बनी स्लोपवर आधी सराव केला. मागच्यावेळी केलेला सराव चांगलाच कामी आला होता. यावेळी एकदाही न पडता मी भरभर स्लोपवरून खाली जात होते. त्यामुळे साहजिकच बनी स्लोप आता लेकीच्या भाषेत इझी पीझी वाटायला लागला होता. मग पॅरडाइजवर जाऊन बघू असं ठरवून माझी मी एकटीच पॅरडाइज स्लोपवर गेले. हळू हळू खाली येत पूर्ण स्लोप पार पडला. मग चेअरलिफ्ट मध्ये अनोळखी लोकांसोबत बसून वरही आले. पण लिफ्ट मधून उतरायची कुठे सवय होती? मग काय जे व्हायचं तेच झालं लिफ्ट मधून उतरताना उताराचा अंदाज न आल्यामुळे घसरत जाऊन पडले. तिथून उठत असताना बाकीच्या लिफ्टवरुन उतरणाऱ्या लोकांचं निरीक्षण केलं. तेव्हा असं लक्षात आलं कि लोक उतरल्या उतरल्या लगेच डावी उजवीकडे वळत होते त्यामुळे उतारावर न घसरत ते लिफ्टपासून थोडे पुढे येऊन लगेच थांबत होते. म्हणजे पडणं थांबवायचं असेल तर वळायला शिकायला हवं होतं.
मग मोर्चा पुन्हा बनी स्लोपकडे वळवला. माझ्या तिसऱ्या लेसनमध्ये मी इन्स्ट्रक्टर कडून ऐकलं होत की ज्या बाजूला वळायचं त्या पायावर जोर दिला की आपण आपोआप वळतो. ही थियरी मला माहित असली तरी मी प्रॅक्टिकल करून बघितलं नव्हतं. बनी स्लोपवर माझ्यासारखेच अजून नवशिके असंच काहीबाही करत होते ते बघून मलाही धीर आला. घसरता घसरता थोडा उजव्या पायावर भार दिला आणि काय आश्चर्य मी उजवीकडे वळून चक्क थांबले. मग काय पुन्हा चढाकडे पाठ करून घसरायला लागले पुढे गेल्यावर डाव्या पायावर भार दिला पुन्हा डावीकडे वळून थांबले. आपलं आपण काहीतरी शिकलो याचा फार म्हणजे फारच आनंद झाला. पुढचा सगळं वेळ मग याचाच सराव केला. सात आठ वेळा बनी स्लोप करून आता आपल्याला वळता येतंय याची खात्री झाल्यावर पुन्हा पॅरडाइजवर गेले. यावेळी चेअरलिफ्ट वरून उतरताच लगेच डावीकडे वळाले आणि चक्क थांबले. थोडावेळ काय करावं सुचलंच नाही. आजूबाजूची लोकं आपल्याकड कौतुकानं बघतायेत असा उगाचच भास झाला. घरी जायची वेळ होतं आली होती आणि मला मात्र पुढच्या वेळी अजून काय काय करता येईल याचे वेध लागले होते.
पुढच्या दोन पैकी एका वेळी मी पूर्णवेळ पॅरडाइजवर खाली करत होते. शेवटच्या दिवशी दिवशी मात्र दुसरा ग्रीन स्लोप असलेल्या 'द कट' वर जायचं धाडस केलं. कट (३ किमी) हा ग्रीन स्लोप असला तरी पॅरडाइज पेक्षा उतार आणि लांबी दोन्ही जास्त आहे. लेकीची इन्स्ट्रक्टर तिला कटवर घेऊन जाणार होती त्यामुळे आम्ही दोघंही मग तिच्या मागे कटवर निघालो. पॅरडाइज स्लोप हा कटच्या मानाने सपाट असल्याने न वळता सरळ खाली गेलं तरी वेग काही फारसा जास्त होत नव्हता आणि मला न पडता शेवटच्या टप्प्यात थांबता येत होतं. मात्र थोडा जास्त उताराचा असल्यामुळे इथे न वळता सरळ जात राहिल्यावर वेग जास्त वाढून तोल जात होते. कटवर चार पाच वेळा पडल्या नंतर शेवटच्या टप्प्यात मात्र मला या उताराचा अंदाज आला आणि मी न पडता उताराच्या टोकाला असलेल्या चेअरलिफ्ट पर्यंत पोचले. अशाप्रकारे आमच्या स्की सीजनाची सांगता सगळयांनी कटवर स्की करून झाली.
"द कट"
.
आता वेध लागले आहेत पुढच्या सीजनचे आणि नव्या स्लोप्सचे. ते होतील तेव्हा पुढच्या भागांमध्ये लिहून इथे प्रगती कळवेनच. तोपर्यंत दुसर्या काहितरी अॅक्टीव्हीटीबद्दल बोलुया.
(सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार)
प्रतिक्रिया
10 May 2017 - 2:31 pm | मंजूताई
हा ही भाग मस्त झाला. कुलरमध्ये बसून स्किईंग चा अनुभव घेतला.....
11 May 2017 - 5:29 am | रुपी
वा. मस्तच झालाय हा भागही. अगदी रोचक! फोटोही मस्त.
हा हा :)
11 May 2017 - 10:30 am | मितान
मस्त की ! हा प्रकार दिसतो तेवढा सोपा नसतो तर !!!
11 May 2017 - 11:35 am | पद्मावति
मस्तच.
11 May 2017 - 4:59 pm | स्मिता चौगुले
मस्त झालाय हा भाग देखिल
12 May 2017 - 1:31 am | सपकाळ काकू
धाडसी आहेस कि बरीच!