पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो.
स्वानुभव
१९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.
त्या काळात (आजही ही परिस्थिती फार सुधारलेली नाही असे माध्यमांतील माहितीवरून कळते) बलुचिस्तानमधे घर असलेल्या व्यक्तीला सुट्टीत स्वतःच्या घरी जायला कराची मार्गे जावे लागत असे. कराचीपर्यंतच्या दोन तासाच्या विमानप्रवासानंतर तेथून घरी जाण्यास अजून ४ ते ५ दिवस लागत असत. ती परिस्थिती खरी असल्याने माझ्या ऑरगॅनायझेशनमधील बलुची लोकांना सुटीला जोडून १० दिवस ट्रॅव्हल टाइम दिला जात असे. ही झाली बलुचिस्तानमधील रस्त्यांची व दळणवळणाची स्थिती. बलुचिस्तानमध्ये मोठी धरणे आहेत व त्यावर मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. पण, त्यांच्या परिसरांतील बलुची गावा-शहरांना त्यांचे पाणी अथवा वीज मिळत नाही. सर्व फायदा दूरवरच्या पंजाबमध्ये जातो अशी त्यांची तक्रार असे. इतकेच काय, आमच्या ऑरगॅनायझेशनमध्ये असलेल्या पाकिस्तानी अधिकार्यांसमोर "तुम्ही बांगला देशाला स्वतंत्र व्हायला मदत केलीत. आम्हाला का नाही करत ? आम्हाला नाही राहायचे यांच्याबरोबर" असे आम्हाला सांगत असत. कोणाचीच बाजू घ्यायची नसल्याने आम्हाला (मी व इतर भारतीय अधिकारी) बरेच ऑकवर्ड वाटत असे. पण त्यांची तळमळ खरी असे हे स्पष्ट दिसत असे.
आजही तेथे वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, इत्यादी मूलभूत सेवांची चणचण आहेच. नोकरीतली महत्वाची पदे व व्यवसाय पाकिस्तानच्या इतर प्रांतांतून, विशेषत: पंजाबमधून, आलेल्या लोकांनी बळवले आहेत. चीनच्या सहकार्याने विकसित होणार्या ग्वादर बंदराच्या प्रकल्पाचे फायदे स्थानिक लोकांना न मिळता ते स्थलांतरीत लोकाना मिळत आहे, बलुचींना, मिळालेच तर, बहुदा कष्टाच्या कामावर समाधान मानावे लागत आहे.
बलुचीस्तानचा नजिकचा इतिहास
थोडक्यात, बलुची स्वातंत्र्याची आस फार जुनी आहे. तिची मुळे १९४७ साल व त्यानंतरच्या बलुचिस्तानच्या इतिहासातील घडामोडींत आहेत...
१. बलुचिस्तान ब्रिटिश इंडियाचा भाग कधीच नव्हता. त्या भूभागावर ब्रिटिश सरकारचा (ब्रिटिश इंडीयाच्या प्रशासनाचा नव्हे) कमीजास्त प्रभाव असे. खरान, लासबेला, मक्रान आणि कलात अशी चार राज्ये एकत्रितपणे बलुचिस्तान अशी ओळखली जात असत. त्यातल्या कलातच्या खानाची त्यांच्यावर तडक अथवा मांडलिक या नात्याने कमीजास्त सत्ता होती. मात्र, ट्रायबल राज्ये असल्याने या राज्यांत काही ना काही कुरुबुरी चालू असत.
२. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या (१४ ऑगस्ट १९४७) तीन महिने अगोदर महंमद अली जिन्ना (होय तेच ते कायदे आझम जिन्ना) यांच्या ब्रिटिश दरबारी केलेल्या वकिली कारवाईने, ब्रिटिश राणीचा दूत या नात्याने ब्रिटिश व्हॉइसरॉय, जिन्ना व खान ऑफ कलात (त्या वेळेस बलुचिस्तानच्या राजाचे हे नामाभिदान होते) यांच्यात ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी एक करार केला गेला. त्यातली महत्त्वाची कलमे खालीलप्रमाणे आहेत (त्यातल्या काही भागांकडे लक्ष वेढण्यासाठी ते मी ठळक केले आहेत). मात्र, कराराची कलमे मूळातून समजावीत यासाठी मुद्दाम त्यांचे भाषांतर केलेले नाही :
a. The Government of Pakistan recognizes Kalat as an independent sovereign state in treaty relations with the British Government with a status different from that of Indian States.
b. Legal opinion will be sought as to whether or not agreements of leases will be inherited by the Pakistan Government.
c. Meanwhile, a Standstill Agreement has been made between Pakistan and Kalat.
d. Discussions will take place between Pakistan and Kalat at Karachi at an early date with a view to reaching decisions on Defence, External Affairs and Communications.
३. या करारातील वकिलीची फी म्हणून जिन्नांनी कलातच्या खानाकडे स्वतःच्या वजनाइतके सोने मागितले होते व खानाने ते दिले..
४. म्हणजे, खुद्द जिन्नांच्या वकिलीने; भारत (१५ ऑगस्ट १९४७) व पाकिस्तान (१४ ऑगस्ट १९४७) या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याच्या अगोदर काही दिवस; ११ ऑगस्ट १९४७ ला बलुचिस्तान स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनला होता.
५. त्यानंतर बलुचिस्तानच्या दार उल आवाममध्ये (देशाचे निर्णय घेणारी सभा, एकप्रकारे लोकसभा) आपण स्वतंत्र रहावे की भारत, अफगाणिस्तान किंवा इराण यापैकी कोणा एकात विलीन व्हावे यासाठी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेत पाकिस्तान हा पर्याय नव्हता. (आता पाकिस्तानात असलेल्या नॉर्थ वेस्ट फ्राँटीयर प्रॉव्हिन्सचे (आताचा खैबर पख्तूनवा) नेते "सरहद्द गांधी" खान अब्दूल गफार खानही आम्हाला भारतात घ्या असा आग्रह करत दिल्लीत आले होते व काही दिवस ठाण मांडून बसले होते. खान अब्दूल गफार खान नॉर्थ वेस्ट फ्राँटीयर प्रॉव्हिन्सचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या एका इशार्यावर कडवी पठाण जमात हातातले शस्त्र खाली टाकायला तयार असे इतका त्यांचा प्रभाव होता. पण, तो मुस्लिम प्रांत असल्याने त्यांची विनंती अमान्य केली गेली. ते, "तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या हाती सोपवता आहात" असे म्हणत नाईलाजाने परतले. त्याकाळच्या या प्रांताचे विचार पाहता बलुची लोकांच्या विलिनीकरणचर्चेत पाकिस्तान पर्याय नसल्याचे आश्चर्य वाटू नये.)
६. काही काळानंतर, जिन्नाचे मन बदलले व ऑक्टोबर १९४७ पासून त्यांनी कलातच्या खानावर विलिनीकरणाचा दबाव आणायला सुरुवात केली. म्हणजे ज्याला फी घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले तोच देश गिळंकृत करण्याचे ठरवले.
७. २१ फेब्रुवारीमध्ये कलातच्या दार उल आवामने पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दर्शविला.
८. २६ मार्च १९४८ ला पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानवर हल्ला करून त्याला काबीज करणे सुरू केले.
९. २७ मार्च १९४८ रोजी बलुचिस्तानच्या पाकिस्तानबरोबरच्या विलिनीकरणावर कलातच्या खानाची जबरदस्तीने सही घेतली गेली. अश्या रितीने ब्रिटिश साम्राज्यापासून राणीच्या सहमतीने स्वतंत्र झालेला बलुचिस्तान २२७ दिवसांच्या स्वातंत्र्यानंतर बळजबरीने पाकिस्तानचा प्रांत बनला.
१०. हे अर्थातच, बहुसंख्य बलुच लोकांना मान्य नव्हते. त्यामुळे, तेव्हापासूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई चालू आहे. तेव्हापासून आजतागायत, पाकिस्तानी फौजेने अनेक हत्याकांडे, मानवी अत्याचार, नरसंहार आणि इतर क्रूर कारवाया केल्या आहेत. बलुच स्वातंत्र्याच्या घोषणा देणर्या लोकांना हेलिकॉप्टरमधून वर नेवून खाली भिरकावून देण्यासारख्या अनेक जगाने कधी न पाहिलेल्या कारवाया यात सामील आहेत. हल्ली मोबाईल फोन व सोशल मिडियाच्या मदतीने हा इतिहास हळू हळू सबळ पुराव्यांसह (रियल टाईम संदेश, व्हिडिओ क्लिप्स, इ) उजेडात येत आहे.
११. बलुचिस्तानचा हा इतिहास काश्मीरशी बराच मिळताजुळता आहे. मात्र, काश्मीर भारताला लागून आहे, काश्मीरचा राजा भारताकडे मदत मागायला आला आणि भारताने काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केली म्हणून काश्मीरमधला परिणाम वेगळा दिसत आहे. इतकेच.
बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा यशस्वी न होण्याची काही मुख्य कारणे
१. पाकिस्तानचा जवळ जवळ अर्धा भूभाग (३४७,१९० चौ किमी) असलेल्या या एवढ्या विशाल भूभागात फक्त १ कोटी ३२ लाख लोकसंख्या आहे (संपूर्ण पाकिस्तानचि लोकसंख्या १८ कोटीपेक्षा जास्त आहे). त्यातले फक्त निम्मेच बलुच (५४%) असून इतर पश्तून (३०%), ब्राहुई (१५%), हजार, सिंधी, पंजाबी, उझबेक, तुर्कमेन, इत्यादी आहेत.
२. बलुची लोकसंख्या एकसंध नसून अनेक टोळ्यांत विभागली गेली आहे. त्या टोळ्यांत क्षुल्लक कारणाने विवाद होणे हे विरळ नाही. त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्यलढा विविध विचारधारांच्या अनेक गटांकडून स्वतंत्रपणे लढला जात आहे. पाकिस्तानी सैन्य, अर्थातच या दुफळीचा पुरेपूर उपयोग करून घेत आले आहे.
३. हा भाग पाकिस्तानने कसोशीने जगाच्या डोळ्यांपासून दूर ठेवलेला आहे. तेथे स्थानिक व परदेशी वार्ताहरांना मुक्त प्रवेश नाही. केवळ सरकार (मुख्यतः सैन्याने निवडलेले) वार्ताहर तेथे जाऊ शकतात व अर्थातच त्यांचे वार्तांकन म्हणजे सैन्याचा प्रचार (प्रोपागांडा) असतो. तेथे गेलेल्या अनेक पाश्चिमात्य वार्ताहरांना शारीरिक मारहाणही झालेली आहे, यात एक स्त्री वार्ताहरही आहे. अफगाणिस्तानच्या दगडाखाली पाय सापडलेल्या अमेरिकेचे पाकिस्तानशी असलेले संबंध, पाश्चिमात्य वार्ताहरही तेथे सुरक्षित नसण्यात व या प्रकाराचे जागतिकीकरण न होण्यास कारणीभूत आहेत (चीनच्या मते मसूद अझहर अतिरेकी नाही, अगदी तसेच !).
४. पाकिस्तानातील बलुची भूभागाबरोबरच, त्याला लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि इराणमध्येही बलुचबहुल किंवा लक्षणीयारित्या बलुच लोकसंख्या असलेले भूभाग आहेत. या तीन देशांतील बलुच भूभागाचे एकत्रिकरण होऊन स्वतंत्र बलुचिस्तान बनावा अशी इच्छा असलेले गट तेथेही आहेत. त्यामुळे, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीकडे ते दोन देशही संशयाने पाहत असतात व शक्य तेवढे ते प्रयत्न दडपत असतात.
५. या वरच्या स्थानिक कारणांमुळे व जागतिक पाठबळ नसल्यामुळे बलुची स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मनुष्यबळ, रसद, शस्त्रे, दारुगोळा आणि राजकीय पाठिंब्याच्या सततच्या अभावात आपला संघर्ष चालू ठेवणे भाग पडले आहे.
६. नजीकच्या काळात या परिस्थितीत काही लक्षणीय बदल होईल अशी सद्य परिस्थिती नाही.
७. पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा उल्लेख आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केल्यामुळे, ही समस्या जगासमोर प्रकर्षाने आली आहे. मात्र, मध्यपूर्वेतल्या बंडाळीत अडकलेले असल्याने व अमेरिकेचे पाकिस्तानातील हितसंबंध पाहता, पाश्चिमात्य सत्तांना बलुचिस्तानकडे फार लक्ष देण्याइतका वेळ व रस आहे असे दिसत नाही. तरीही, त्यांच्या चळवळीला बर्याच दिवसांनी मिळालेल्या या प्रसिद्धीचा उपयोग करून संयुक्त राष्ट्रसंघावर जितका प्रभाव पाडता येईल तितका पाडण्याचे प्रयत्न, पाश्चिमात्य देशात विस्थापित झालेले बलुच नेते, न्यू यॉर्क व जिनिवा येथे करत आहेत.
असो सद्या इतकेच पुरे.
==========================
मुख्य संदर्भ :
१. http://nation.com.pk/blogs/05-Dec-2015/how-balochistan-became-a-part-of-...
प्रतिक्रिया
28 Nov 2016 - 2:10 am | पद्मावति
रोचक आहे.
28 Nov 2016 - 3:04 am | आनंदयात्री
बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद.
28 Nov 2016 - 3:32 am | निनाद
हे माहित नव्हते. नवीन माहिती आहे. धन्यवाद!
28 Nov 2016 - 5:10 am | नंदन
नेहमीप्रमाणेच माहिती नेटकेपणे आणि समग्रपणे मांडणारा लेख. अधिक वाचायला उत्सुक आहे.
28 Nov 2016 - 5:33 am | मराठमोळा
माहितीपुर्ण लेख. मनःपूर्वक धन्यवाद. एखादे बलूची व्यक्तीचित्रही वाचायला आवडेल.
28 Nov 2016 - 7:00 am | रेवती
माहिती वाचली. तुमचा अनुभवही आवडला.
28 Nov 2016 - 7:23 am | कैलासवासी सोन्याबापु
बाकी लेख नंतर वाचतोच काका, पण तो एकदम कडक असल्याची पावतीही देतो अन अजून एक म्हणजे बरहमदाघ बुगटी हे सध्याचे नवाब अक्षरशः 'रॉयल्टी' असल्याचे जाणवतात असे नोंदवतो. पर्सनलिटी, बोलणे, आवाज, लय, सबकुछ खाशी शाही आहे त्यांची. बलुची लोकांना भारताने जमेल ती सर्व मदत करावी असे वाटते.
28 Nov 2016 - 7:48 am | खटपट्या
बुगटी हे बलुची आहेत. पण पानीपतानंतर आपले काही लोक तीकडे कायमचे अडकले त्यातले काही बुगटी म्हणून ओळखले जातात. लोकसत्तात यावर विस्त्रुत लेख आला होता. जयंतकाकांची छान कथाही होती यावर.
28 Nov 2016 - 8:20 am | अन्या दातार
हा घ्या - http://www.loksatta.com/ls-diwali2015-news/panipat-war-prisoners-1197000/
28 Nov 2016 - 2:51 pm | llपुण्याचे पेशवेll
बुगटी हे मराठा आहेत असे म्हणायचे होते का?
29 Nov 2016 - 2:51 am | खटपट्या
आता तुमची मराठा या शब्दाची व्याख्या काय मला माहीत नाही. मराठा जात म्ह्णत असाल तर नाही. पानीपतात आपल्या बर्याच लोकांना(महाराष्ट्रातील लोक) अब्दालीचे लोक घेउन गेले त्यातले काही सद्या बुगटी म्हणून ओळखले जातात.
28 Nov 2016 - 9:29 am | जानु
उत्तम माहिती धन्यवाद
28 Nov 2016 - 1:46 pm | माहितगार
लेखक महोदयांच्या लेखातून बलुचीस्तान भारतीय उपमहाद्वीपाचा भाग नव्हे अथवा भारतीय सत्ता तेथे कधीच पोहोचली नाही असा समज होऊ शकतो.
बलुच लोकांची वस्ती या अर्थाने 'बलुचीस्तान' हे केवळ पाकीस्तान नव्हे तर इराण आणि अफगाणीस्तानातीलही काही प्रदेशात आहे. ब्रुहुइ आणि बलूच हे या प्रदेशातील सर्वात जुने जन समुह यातील ब्रुहुइ भाषेवर द्रवीड भाषांचा प्रभाव असल्याचे मानले जाते तर बलुच भाषेवर कास्पीअन अथवा मध्य आशियायी भाषांचा प्रभाव असल्याचे मानले जाते (पण बलुच लोक स्वतः अलेप्पो या सिरीयातील सध्या संघर्षरत प्रदेशातून आलेले मानतात).
इस्वीसन आणि पूर्वकाळात हा प्रदेश शंकांच्या (इंडो स्किथीअन) अमला खाली असावा, पण साधारणपणे आताच्या इराणी बलुचीस्तानवर इराणी राज्यकर्त्यांचा तर भारतीय उपमहाद्वीपीय बलुचीस्तानवर भारतीय उपमहाद्वीपीय राजकीय प्रभाव राहीला असावा. इस्वीसनाचे पहीले ते तिसरे शतक भारतीय उपमहाद्वीपीय बलुचीस्तानवर 'परात राजांचा प्रभाव दिसतो' ज्या राजांची लिपी ब्राह्मी आणि बरीच नावे संस्कृतोद्भव दिसतात. काली आणि हिंग्लजा मातेची अती प्राचीन मंदीरे बलुचीस्तानात आढळतात. बलुचीस्तानातील ग्रामनामांचा अधिक अभ्यास व्हावयास हवा पण कोलपूर इत्यादी बर्यापैकी ग्रामनावे भारतीय उपमहाद्वीपाशी नाते सांगणारी असावित.
ज्याप्रमाणे अलेक्झांडर ग्रीक आणि खलीफाच्या ताब्यात हा प्रदेश काही काळ ताब्यात होता तसेच अकबराची सत्ताही भारतीय उपमहाद्वीपीय बलुचीस्तानात पोहोचली होती मध्यंतरी Sehwa नावाचा कुणी हिंदू राजाही होऊन गेला असावा ज्याची फारशी माहिती आंतरजालावर सहजतेने आढळत नाही ज्या सेहवाला दूरकरून काळात ब्रिटीशांनी पुन्हा जम बसवे पर्यंत तेथील खान निजामाप्रमाणे स्वायत्तपणे काम करत असावेत. ब्रिटीशांनी इराणशी युद्धकरून तह करून भारतीय उपमहाद्वीपीय बलोचीस्तानवर जम बसवला भारतीय उपमहाद्विपीय बलोचीस्तानच्या बर्याच मोठ्या भागावर भारतीय ब्रिटीश सत्तेचा डायरेक्ट अमलही होता. तो भाग पाकीस्तानकडे परस्पर गेला असणार त्यामुळे कलातच्या स्वायत्त संस्थानिकांना किमान त्याकाळात पाकीस्तानपासून स्वतंत्र रहाणे सहज सोपे सुद्धा गेले असते असे वाटत नाही. एक मात्र खरे की बलोच लोकांना पाकीस्तानात सामील होण्यात रस त्या काळात तरी नव्हता, पाकीस्तानच्या संकल्पनेचा जेवढा जोर पाकीस्तानी पंजाबमध्ये होता तेवढा पाकिस्तानच्या उर्वरीत तीन प्रांतात नसावा. असो.
28 Nov 2016 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेखक महोदयांच्या लेखातून बलुचीस्तान भारतीय उपमहाद्वीपाचा भाग नव्हे अथवा भारतीय सत्ता तेथे कधीच पोहोचली नाही असा समज होऊ शकतो.
हे कसे काय बुवा ?
पहिले तर त्या भागाचे शीर्षक बलुचीस्तानचा नजिकचा इतिहास असे आहे आणि दुसरे म्हणजे त्याखालचा चर्चेतला इतिहास १९४७ पासून सुरू होतो. यावरून बलुचिस्तानचा प्राचीन इतिहास इथे अध्याहृत नाही हे पुरेसे स्पष्ट आहे. या संक्षिप्त आढाव्यात बलुचितानमधली सद्य स्थिती, त्याचा नजिकचा इतिहास व त्यामुळे निर्माण झालेल्या सद्य समस्या यावर भर होता. त्यामुळे त्याचा प्राचीन इतिहास दिला नाही कारण इथे तो अस्थायी ठरला असता.
ब्रिटिश इंडिया म्हणजे भारतात स्थित असलेल्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या तडक अधिपत्याखाली असलेला दक्षिण आशियाचा भूभाग. ब्रिटिश साम्राज्यात बलुचिस्तान इतर ब्रिटिश इंडीया सारखा प्रशासित नव्हता तर एका स्वतंत्र "बलुचिस्तान एजन्सी" च्या तर्फे प्रशासित होता. या एजन्सीच्या हाती त्या भागाचा पूर्ण ताबा किंवा प्रशासन नव्हते. ती फक्त भांडणार्या बलुच टोळ्यांत तह (ट्रूस) घडवायला मध्यस्ताचे काम करून त्या भूभागावर, दुसर्या पाश्चिमात्य सत्तेने शिरकाव करू नये इतपत, ब्रिटिशांची राजकिय उपस्थिती राखून होती. त्याचमुळे, जिन्नांच्या वकिलीने व इंग्लंडच्या राणीच्या आशिर्वादाने भारताच्या (भारत-पाक) विभाजनाच्या आधी त्याला ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळू शकले. जर तो ब्रिटिश इंडियाचा सर्वसामान्य भाग असता तर त्याला गव्हर्नर जनरलच्या तडक अधिपत्याखाली असलेल्या ५०० पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट्सपेक्षा अशी वेगळी वागणूक मिळाली नसती.
असो. बलुचिस्तानवर विस्तारपूर्वक लिहायचे आहे. पण सद्याच्या वेळेच्या कमतरतेमुळे ते लवकर जमेल असे वाटत नाही.
तुम्ही दिलेल्या बलुचिस्तानचा प्राचीन इतिहास व इतर माहितीसाठी, धन्यवाद.
28 Nov 2016 - 1:59 pm | बोका-ए-आझम
ज्याला कुणाला बलुचिस्तान प्रश्न समजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक अप्रतिम initiator आहे. बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा अयशस्वी होण्याची कारणं आपल्या १८५७ चा स्वातंत्र्यलढा अयशस्वी होण्यामागील कारणांशी बरीच जुळतात.
28 Nov 2016 - 2:14 pm | वरुण मोहिते
बाहेर कधी कोण पाकिस्तान चा कलीग असेल तर हा विषय आवडत नाही त्यांना असेही निदर्शनास आले आहे . १-२ वेळा चर्चेत . बोलताना हा विषय निघाला होता मागे . कारण काश्मीर बोलण्यात आला कि त्यांच्याकडून हा मुद्दा पण येतोच .हि गोष्ट २-३ वर्षांपूर्वीची आहे. आज अजून नवी माहिती मिळाली .
28 Nov 2016 - 3:54 pm | पिशी अबोली
बलुचिस्तानबद्दल कधीपासून नीट जाणून घ्यायचे होते. ही सुरवात तर छानच झाली.
28 Nov 2016 - 5:18 pm | सूड
नवीन माहिती मिळाली.
28 Nov 2016 - 5:36 pm | अमर विश्वास
उत्तम माहिती ... पण त्यामुळे कुतूहलही वाढले
आता या विषयी अधिक वाचन करावे लागेल ...
डॉक्टरसाहेब.. याविषयीचे एखादे पुस्तक उपलब्ध आहे का ?
28 Nov 2016 - 5:47 pm | पाटीलभाऊ
फार उत्तम माहिती डॉ. साहेब.
28 Nov 2016 - 6:16 pm | यशोधरा
वाचते आहे..
28 Nov 2016 - 6:17 pm | पैसा
या विषयावर अजून वाचायला आवडेल. कोणे एकेकाळी तिबेट हा स्वतंत्र देश होता हे जवळपास सर्व जग सोयिस्करपणे विसरून गेले आहे तसेच काहीसे बलुचिस्तानच्या बाबतीत झालेले दिसते.
28 Nov 2016 - 6:32 pm | प्रचेतस
उत्तम माहितीपूर्ण लेख.
28 Nov 2016 - 6:42 pm | अप्पा जोगळेकर
माहितीपूर्ण.
28 Nov 2016 - 7:55 pm | अनिरुद्ध.वैद्य
सहमत. अतिशय माहितीपुर्ण लेख ...
28 Nov 2016 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
बलुची नेत्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली भूतपूर्व पाकिस्तानी राष्ट्रपती मुशरर्फच्या नावे बलुचिस्तान हाय कोर्टाने अरेस्ट वॉरंट बजावले
Balochistan high court issues arrest warrant against former Pakistani president Pervez Musharraf
२००६ मध्ये नबाब अकबर खान बुग्ती या महत्वाच्या वयोवृद्ध बलुच नेत्याची मुशरर्फच्या आज्ञेने पाकिस्तानी सैन्याने हत्या केली होती. या कारवाईचेच पाकिस्तानभर व जगभर पडसाद उमटले होते. त्याबद्दल बलुचिस्तान हाय कोर्टात खटला चालू आहे. हे वॉरंट त्यासंदर्भात आहे.
अर्थात, हे पाऊल न्यायाकरीता असण्यापेक्षा, पाकिस्तानी राजकारणात मुशरर्फने चालाविलेली ढवळाढवळ थांबवून त्याने परदेशात कायमचे वास्तव्य करावे या राजकीय हेतूने प्रेरीत असण्याचीच जास्त शक्यता आहे. कारण, पाकिस्तानी कोर्टांत चालू असलेल्या अनेक खटल्यांमुळे त्याच्यावर असलेली "देश न सोडण्याची" बंदी तीन वर्षांनंतर उठवून, मार्च २०१६ मध्ये त्याला वैद्यकीय उपचारांच्या निमित्ताने गुपचूप देश सोडून जाऊ दिले आहे.
29 Nov 2016 - 10:44 am | mayu4u
पु ले प्र.
29 Nov 2016 - 2:18 pm | अनिंद्य
ह्या विषयावर आणखी वाचायला आवडेल.
यथासमय पूर्ण लेखमालाच लिहावी अशी आग्रहाची विनंती!
29 Nov 2016 - 7:10 pm | सुबोध खरे
एक्का साहेबांच्या अनेक उत्तम लेखांच्या मालिकेत अजून एक मोती.
29 Nov 2016 - 9:52 pm | सस्नेह
धक्कादायक माहिती !
29 Nov 2016 - 11:50 pm | गामा पैलवान
माहितगार,
सॉलिड माहिती दिलीये तुम्ही. कोलपूर आणि हिंगलाज माता म्हणजे आपलं कोल्हापूर आणि गडहिंग्लज म्हणा ना. कोकणातली काही नावं (उदा.: दोड्डामार्ग) जशी काश्मिरी वाटतात तशी घाटावरची नावं बलुची दिसताहेत! :-)
आ.न.,
-गा.पै.