दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
7 Oct 2016 - 12:19 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया

.

मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नाची चिंता आणि पैशांची जमवाजमव करण्याच्या काळात म्हणजे ३० जुलै १८८६ रोजी मद्रासजवळच्या पुडुकोट्टई ह्या लहानशा गावात मुथ्थुलक्ष्मींचा जन्म झाला. पिता नारायणसामी हे महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. त्याकाळी मुलींकरता वेगळ्या शाळा तर नव्हत्याच, पण पालक मुलांच्या शाळेतही मुलींना घालत नसतच, मुलींना घरच्याघरी लिहिता वाचता आले म्हणजे खूपच झाले. पोथीपुराणे वाचता आली की डोक्यावरून पाणी.. कित्येक जणींना तर तेवढेही मिळत नसे. पण नारायणसामींनी मुलीला घरी शिकवायला सुरूवात केली. नुसतेच लिहावाचायला नव्हते तर तिला मॅट्रिकच्या परीक्षेला बसवले. जेव्हा तिला महाराजा कॉलेजामध्ये शिकण्याकरता प्रवेश घ्यायचे ठरले तेव्हा ही सगळ्या पुडुकोट्टईमध्ये मोठ्ठीच बातमी होती. कॉलेजातले प्राध्यापक अवाक होऊन तिच्या अर्जाकडे पाहत राहिले. आजवरच्या इतिहासात महाराजा कॉलेजमध्ये कोणी मुलगी शिकली नव्हती. तिला कॉलेजात प्रवेश दिला जाऊ नये म्हणून सनातनी हिंदूंनी निषेधाचे मोर्चे बांधले. पण पुडुकोट्टईचे राजे मार्तंड भैरव ह्यांनी अनुकुलता दर्शवली आणि तिला प्रवेश दिला. नारायणसामींना वाटले तिने शाळामास्तरीण व्हावे पण मुथ्थुलक्ष्मीच्या स्वप्नांचे पंख खूप लांबवर आणि खूप उंचावर उडण्याचे स्वप्न पाहत होते. तिने मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर व्हायचे ठरवले. १९१२ साली त्या मद्रास युनिव्हर्सिटीच्या पहिल्या स्त्री डॉक्टर झाल्या आणि मद्रासच्याच सरकारी इस्पितळात स्त्रिया व मुलांच्या विभागात काम पाहू लागल्या. पुढे त्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या.

कॉलेजमध्ये असताना त्या सरोजिनी नायडूंच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या विचारसरणीने खूप प्रभावित झाल्या. ह्या दरम्यान म.गांधी आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट ह्यांचाही खूप प्रभाव त्यांच्यावर पडला. समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक त्यांना खुपत होती. स्त्रीच्या हक्कांसाठी काय करता येईल ह्याचा विचार त्या करू लागल्या. डॉ रेड्डींशी लग्न करतानाही मला तुमच्याकडून समान दर्जाची वागणूक मिळेल आणि माझ्या इच्छाआकांक्षांना कात्री लावली जाणार नाही असे वचन घेऊन त्या लग्नाला तयार झाल्या. मुलगी जेमतेम १२-१३ वयाची झाली की तिला लग्न करून 'तिच्या' घरी पाठवण्याच्या काळात त्यांनी २८ व्या वर्षी लग्न केले आणि तेही स्वतःच्या अटींवर! त्यांच्या घरच्यांचा सपोर्टही ह्यात महत्त्वाचा आहे.

इंडियन विमेन्स असोशिएशन च्या विनंतीवरून स्वतःची उत्तम चालत असलेली प्रॅक्टिस सोडून त्या मद्रास विधान परिषदेमध्ये गेल्या आणि तेथे एकमताने उपाध्यक्षा झाल्या. तेथे त्यांनी स्त्रियांना मताधिकार मिळावे यासाठी आंदोलन केले. स्त्रिया व मुलांसाठी चे वेगळे इस्पितळ काढण्यासाठीचा ठराव मंजूर करवून घेतला. तसेच अनाथ बालकांसाठी अव्वाई घर नावाचा आसरा काढला. शाळा, कॉलेजातल्या मुलांची वैद्यकिय तपासणी व्हावी ह्याकरता त्या आग्रही होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा असताना त्यांनी वेश्यागॄहांमधील दडपशाही आणि बायका व मुलांची तस्करी रोखण्याच्या दॄष्टीने पावले उचलली. तेथून सुटका झालेल्या मुलींसाठी आसराघराची सोय केली. मुस्लीम मुलींसाठी, हरिजन मुलींसाठी वसतीगृह त्यांच्याच प्रयत्नांनी उभे राहिले. लग्नासाठीचे मुलीचे वय १६ आणि मुलाचे २१ असावे असा कायदा करावा अशी शिफारस त्यांनी तत्कालीन सरकारला केली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच 'रोशनी' नावाच्या मासिकाच्या त्या संपादिकाही होत्या. राज्य समाजकल्याण मंडळाच्या त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. हार्टोग शिक्षण समितीच्याही त्या सभासद होत्या. त्यानिमित्ताने त्यांनी देशभर खूप प्रवास केला. मुलींच्या शिक्षणाची काय अवस्था किंबहुना अनावस्था आहे हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्याकरता योग्य ती पावले उचलायला सुरूवात केली. मुलींच्या शिक्षणासाठी आणि देशातल्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रगतीसाठीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

डॉ. लक्ष्मी यांनी कर्करोगाकरताही बरेच कार्य केले. दुर्देवाने त्यांच्या बहिणीला अगदी तरुण वयातच कॅन्सरने ग्रासले. त्याकाळात कर्करोगावर संशोधनही फार झालेले नव्हते आणि सोयी सुविधा तर नव्हत्याच. सर्वसाधारण लोकांना कर्करोगाविषयी माहिती नव्हती, जागरुकता नव्हती. भारत पारतंत्र्यात होता. दवाखाने, डॉक्टर्स यांची वानवाच होती. स्वतः डॉ़क्टर असूनही आपल्या बहिणीवर योग्य ते उपचार करता आले नाहीत ह्याची त्यांना खंत होती. त्यातूनच त्या कॅन्सरवरच्या संशोधनाकडे वळल्या. त्यांनी कॅन्सर रिलिफ फंड स्थापन केला. जिथे श्रीमंत, गरीब सर्वांनाच उपचार घेता येतील असे एक सुसज्ज हॉस्पिटल काढणे हे आता त्यांचे स्वप्न बनले. पण ह्यातही अनेक अडचणींना तोंड देत त्या ही अडथळ्याची शर्यत जिंकल्या. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारतात १९४९ पासून प्रयत्न करून १९५६ मध्ये त्यांची W.I.A. ही कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी राहिली. आता त्याचे अखिल भारतीय कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्र झाले आहे. त्यांच्यातली करुणा आणि सेवावृत्ती त्यांना राजकारणापासून दूर घेऊन गेली. त्या खर्‍या कळकळीने समाजाकरताच झटत राहिल्या. स्त्रिया, अनाथ मुले आणि समाजातल्या दुर्बल घटकांसाठी काम करत राहिल्या. त्या त्यांच्या ध्येय्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिल्या. अगदी वयाच्या ८० च्या घरातही त्या उत्साही आणि सक्रिय होत्या. भारतसरकारने १९५६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. २२ जुलै १९६८ रोजी चेन्नई मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आव्वई घर आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट ह्या समाजाला त्यांनी दिलेल्या दोन देणग्या मात्र त्यांची स्मॄती जपत कायम उभ्या आहेत.

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

7 Oct 2016 - 12:29 am | सतिश गावडे

कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता उत्तम माहितीपर लेख असणारी ही लेखमाला खुप आवडली.

डॉ. मुथ्थुलक्ष्मींचे कार्य अफाट आहे. त्यांच्याबद्दल आधी माहिती नव्हती. घरचा सपोर्ट असल्यास मुलीही पुढे जाऊ शकतात हे त्या काळात फारसे न दिसणारे चित्र प्रत्यक्षात आले असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे असे दिसते.

प्रीत-मोहर's picture

7 Oct 2016 - 12:56 pm | प्रीत-मोहर

स्वातीताई धन्यवाद या लेखमालेसाठी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

मद्रासी आनंदीबाई जोशी आवडल्या! किती मस्त आहे ती आजी 0:)

फारच स्फूर्तिदायक.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Oct 2016 - 2:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्या काळात लढुन डॉक्टर होणे म्हणजे कमाल!

__/\__

पद्मावति's picture

7 Oct 2016 - 4:00 pm | पद्मावति

__/\__

पूर्वाविवेक's picture

7 Oct 2016 - 5:17 pm | पूर्वाविवेक

स्फूर्तिदायक लेख

यशोधरा's picture

7 Oct 2016 - 5:27 pm | यशोधरा

अत्यंत प्रेरणादायी!

अजिबातच माहिती नव्हती या दीपशिखेची.धन्यवाद ताई.

रुपी's picture

8 Oct 2016 - 12:40 am | रुपी

फारच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख होत आहे या लेखमालेतून.

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:17 pm | मी-सौरभ

सहम्त आहे

स्वीट टॉकर's picture

13 Oct 2016 - 7:49 pm | स्वीट टॉकर

अजया +१

पैसा's picture

15 Oct 2016 - 6:34 pm | पैसा

_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2016 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण लिहिलं नसतं तर कदाचित डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी यांची ओळख मला तरी झाली नसती. थँक्स अ लॉट.

-दिलीप बिरुटे