ह्याआधी- दीपशिखा!
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया
दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी
दीपशिखा-८. आउंग सान स्यू की
दीपशिखा-९. श्रीमती सुषमा स्वराज
दि. १७ मार्च १९६२ ह्या दिवशी पंजाबमधल्या आणि आता हरणायामध्ये असलेल्या कर्नाल ह्या गावी चावलांच्या घरी एक 'नन्ही परी' आली. सुनीता, दीपा आणि संजयनंतरचे हे शेंडेफळ कौतुकाचे होते. जेव्हा शाळेत घालायची वेळ आली तेव्हा चुणचुणीत कल्पनाच्या जन्मतारखेत १ जुलै १९६१ असा बदल केला आणि तिला वर्षभर लवकरच शाळेत घातले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. इतर मुली जेव्हा बाहुल्या आणि भातुकली खेळत तेव्हा कल्पना विमानांची चित्र काढत कल्पनेच्या भरार्या घेत असे.
टागोर पब्लिक स्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मुली इंजिनिअरिंगला तुरळकच दिसत होत्या, त्यातही कल्पनाने निवडले अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंग! १९८२ साली इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यावर लगेचच ती उच्चशिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेली. टेक्सास युनिव्हर्सिटीतून तिने एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये एम एस केले. ह्याच दरम्यान गुरु आणि एव्हिएशन ऑथर जीन पिअरी हॅरिसन ह्याच्या ती प्रेमात पडली आणि दोघांनी १९८३ मध्ये लग्न केले. पुढे एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्येच तिने कोलोराडो युनिव्हर्सिटीतून पि.एच.डी केले. विमानांची चित्रे तर ती लहानपणापासून काढत होतीच, त्याच्याशी संबधित उच्चतम शिक्षणही घेत होती. हे करत असताना तिने वैमानिकीचेही शिक्षण घेतले. हवाईजहाज, सागरी विमान (hydroplanes) आणि ग्लायडर्स लायसन्स तिच्याकडे होते. एवढेच नव्हे तर ती उड्डाण प्रशिक्षकही होती पण आकाशाच्याही पुढचे अवकाश तिला खुणावत होते. १९८८ मध्ये तिने नासा मध्ये काम करायला सुरूवात केली.
सुरूवातीला कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स वर संशोधन केल्यावर १९९३ साली संशोधक आणि व्हाइस प्रेसिडेंट म्हणून ती ओव्हरसेट मेथडस वर काम करू लागली आणि ९५ साली नासा अॅसट्रोनटस कॉर्पस मध्ये निवडली गेली. आता ध्येय्य होते अंतराळात झेप घेण्याचे. १९९७ च्या नोव्हेंबरमध्ये सहा जणांचा चमू स्पेस शटल कोलंबिया- flight STS-87 मधून अंतराळात जाणार होता. कल्पनाही त्यात होती. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला! ३७२ तास, १०.४ दशलक्ष किमी म्हणजे २५२ पृथ्वी प्रदक्षिणांएवढे अंतर ती अवकाशात होती. त्या पिसाहूनही हलक्या अंतराळातले तिचे पहिले शब्द होते, "तुम्ही म्हणजे फक्त तुमची बुध्दिमत्ता, तुमची प्रज्ञा!" ह्या यानाबरोबर स्पारटन उपग्रहही नेला होता जो कल्पनाने अंतराळात गेल्यावर तेथे सोडला. ही मोहिम यशस्वी करून आलेल्या चमूचे स्वागत तर झालेच पण कल्पनाच्या ह्या यशामुळे जगभरातल्या मुलींमध्ये प्रेरणेची एक लाट पसरली.
सन २००० मध्ये ती दुसर्या मिशनसाठी सिध्द झाली. ही अवकाशयात्रा कारणा,कारणाने उशीर होत होत २००३ मध्ये नेण्याचे ठरले. STS-107 ने सात वीरांना पोटात घेऊन १६ जानेवारी २००३ रोजी अवकाशात झेप घेतली. १६ दिवसांच्या ह्या उड्डाणकालात ह्या संघाने ८० च्या वर प्रयोग केले. १ फेब्रुवारी २००३, आता परतीचा प्रवास सुरू! मिशन चांगल्या पध्दतीने पूर्ण करून आता घरी परतायचे होते. सगळे खूप आनंदात होते. अंतराळातून यान पृथ्वीच्या कक्षेत आले. आता फक्त काही मिनिटेच की जमिनीवर पोहोचणार आपण.. पण.. काहीतरी गडबड झाली. दुर्दैवाने टेक्सास आणि लुइझानाच्या वर असतानाच यान भंगले, त्याचे तुकडेतुकडे झाले आणि सातही जणांना त्या अज्ञात पोकळीने गिळून टाकले.
एका कल्पनेची ही भरारी नियतीने मोडून टाकली. पण तिची ही भरारी अनेक कल्पनांना प्रेरणा देणारी ठरली आहे. तिच्या नावाने हरयाणा सरकारने कर्नालमध्ये मेडिकल कॉलेज काढले आहे. ह्या अवकाशकन्येला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल, नासा डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेडल अशा पुरस्कारांनी गौरवून तिला मानवंदना दिली आहे. कल्पना सर्वांकरता नेहमीच एक प्रेरक स्फूर्तीस्त्रोत राहिल यात शंका नाही.
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 7:59 am | रातराणी
सुंदर लेख, या लेखमालेने अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख झाली, काही ऐकून माहिती असलेल्या परंतु विस्मृतीत गेलेल्यांविषयी सविस्तर वाचताना छान वाटले! या लेखमालेसाठी धन्यवाद, पुढेही तुम्हाला वेळ मिळेल तशी यात भर घालत रहावी ही विनंती =))
13 Oct 2016 - 7:32 pm | मी-सौरभ
सहमत आहे
10 Oct 2016 - 8:14 am | एस
अतिशय छान माहिती. यानाच्या बाह्यांगावर लावलेल्या उष्णतारोधक फरश्या (टाइल्स) मध्ये दोष असल्याने काही फरश्या उड्डाणाच्या वेळेसच गळून पडल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात परत प्रवेश केल्यावर हवेशी घर्षण होऊन जी प्रचंड उष्णता निर्माण होते तिचा सामना हे यान करू शकले नाही. :-(
10 Oct 2016 - 4:35 pm | रेवती
अवकाशकन्येची माहिती आवडली.
10 Oct 2016 - 5:13 pm | यशोधरा
सुरेख लिहिते आहेस स्वातीताई.
10 Oct 2016 - 5:53 pm | पद्मावति
खूप आवडतेय ही लेखमाला.
12 Oct 2016 - 6:07 pm | नूतन सावंत
खूप छान लेखमाला,बरीच नवी माहिती मिळाली.
12 Oct 2016 - 8:32 pm | पिलीयन रायडर
"तुम्ही म्हणजे फक्त तुमची बुध्दिमत्ता, तुमची प्रज्ञा!"
अत्यंत आवडले हे वाक्य! कल्पना चावलाच्या अशा अपघात जाण्याने नेहमीच फार हळहळ वाटत आली आहे.. :(
16 Oct 2016 - 7:55 pm | पैसा
_/\_