दीपशिखा-८. आउंग सान स्यू की

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
8 Oct 2016 - 12:57 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया
दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी

.

आउंग सान आणि डाऊ खिन की ला १९४५ सालच्या जून महिन्यात रंगून मध्ये कन्यारत्न झाले. दोन भावांची ही लाडकी स्यू की एखाद्या बाहुलीसारखी होती. बर्माच्या इंडिपेंडन्स आर्मीचे कमांडर असलेले आउंग सान ह्यांची १९४७ च्या जुलै महिन्यात हत्या झाली तेव्हा सान स्यू की अवघी दोन वर्षाची होती. डाऊ खिन की यांनी खचून न जाता देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय सहभागी झाल्या. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर डाऊ खिन की यांना भारतात अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले त्यामुळे छोट्या सान स्यू कीचे शिक्षण दिल्लीतल्या जिझस आणि मेरी कॉन्व्हेन्ट स्कूल आणि नंतर लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झाले. नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी ए ची पदवी संपादन केली. त्याच सुमारास त्यांची तिबेटीयन संस्कृतीचा अभ्यास करणार्‍या मायकेल एरिस शी ओळख आणि पुढे मैत्री झाली. पुढच्या शिक्षणासाठी स्यू की न्यूयॉर्कला गेली. त्यांचे परिचित, प्रसिध्द ब्रह्मदेशी पॉपसिंगर मा थान इ ह्यांच्याकडे राहू लागली. मा थान इ हे युनोचे मेंबर होते. त्यांच्या संपर्कात आल्यावर तिने पुढच्या शिक्षणाचा विचार पुढे ढकलला आणि युनायटेड नेशन्स मध्ये असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम करू लागली. संध्याकाळी आणि शनिवार रविवारी हॉस्पिटल्स मधल्या रुग्णांना वाचून दाखवायला किवा त्यांना तेथल्या बागेत फिरवण्यासाठी जाऊ लागली. एकीकडे मायकेलला रोज पत्रे लिहित, प्रेम बहरत होते.

पुढे ७२च्या जानेवारीत मायकेल अ‍ॅरिसशी लग्न करून दोघे भूतानला गेले. तेथे मायकेल अ‍ॅरिस राजघराण्यातल्या लोकांना शिकवण्याचे आणि भाषांतराचे काम करत असे. स्यू की यांनी तेथील पररष्ट्र मंत्रालयात संशोधन अधिकारी म्हणून काम सुरू केले. छोट्या अलेक्झांडरच्या जन्माच्या वेळी दोघे इंग्लंडला परतले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत तिबेटियन आणि हिमालयीन अभ्यासाचे काम मायकेल एरिस करू लागले. एकीकडे एम. फिल चा अभ्यास चालू होता. किमचा जन्म ऑक्सफर्डचा. एकंदरीत चारचौघींसारखं स्यू की मुलं, घर, संसार या जबाबदार्‍या सांभाळत होती. एकीकडे लिखाण आणि मायकेलला तिबेटी अभ्यासात मदत करणे चालू होते. तिच्या वडिलांचे चरित्र लिहिण्याकरताची जमवाजमवही तिने सुरू केली होती. अशातच दोन वर्षांकरता तिला सिमला येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजची फेलोशिप मिळाली. त्यामुळे त्याकालावधीत सारे कुटुंब शिमल्याला आले. पुढे १९८८ मध्ये खिन की ह्यांना अर्धांगाचा झटका आला आणि आपल्या आईला पाहण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी म्हणून त्या रंगूनला आल्या तेव्हा भविष्यातल्या नाट्याची त्यांना कल्पना नव्हती.

यु ने विन ह्या हुकुमशहाने १९८८ मध्ये आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या ताब्यात देश देऊन स्वतः पडद्यामागून सूत्रे हलवू लागला. त्याच सुमारास कर्मधर्मसंयोगाने स्यू की आईच्या शुश्रुषेसाठी म्हणून रंगूनमध्ये होत्या. स्यू की च्या हे लक्षात आल्यावर त्या तेथे फक्त आईची सेवा करत बसू शकल्या नाहीत की आईला थोडे बरे वाटू लागल्यावर इंग्लडला निघून जाऊ शकल्या नाहीत. तेथली परिस्थिती पाहून हातावर हात ठेवून नुसते बसून न राहता काहीतरी केलेच पाहिजे ह्या विचाराने त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या, त्यांनी लोकशाही आणि मानवी हक्कांबद्दल आवाज उठवायला सुरूवात केली. त्यांचे हे जनतेसमोर उघड उघड विरोधी बोलणे, मानवी हक्कांबाबतची जागरुकता दाखवणे लष्कराच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि त्यांना ह्या लष्करी सरकारने जुलैमध्ये नजरकैदेत ठेवले. बाहेरच्या जगाशी त्यांना संपर्काची बंदी करण्यात आली. जर त्या देश सोडून जाणार असतील तर त्यांना कैदेतून मोकळे करण्याची मोकळिक दिली पण त्यांनी बाणेदारपणे हे नाकारले. तिकडून मायकेलनेही पाठिंबा दिला आणि इकडची, माझी, मुलांची कसलीही काळजी करू नकोस, लढ! असे सांगितल्यावर त्यांना हुरुप आला. त्यांनी लष्कराला ठामपणे सांगितले की राजकीय कैद्यांना मुक्त करून जोवर हा देश नागरी सरकारच्या ताब्यात देत नाही तोवर त्या देश सोडणार नाहीत. पण त्यांना कोणालाच तेव्हा कल्पना नव्हती की ही कैद, हा लढा किती वर्षे द्यावा लागणार आहे.

ह्या नजरकैदेच्या काळात त्यांनी बुध्दिझम, मेडिटेशन याकडे स्वत:ला वाहून घेतले. ह्या बुध्दिझम मधील करुणा आणि प्रेम त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित झालेली दिसते. ९० साली लष्कर सरकारने सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. ह्या निवडणूकीत स्यू की ह्यांना उमेदवार म्हणून उभे रहायला परवानगी नव्हती, त्यांची नजरकैद संपलेली नव्हती तरीही त्यांच्या पक्षाला ८०% हून जास्त जागा मिळाल्या. मग ह्या निवडणुकाच रद्द केल्या गेल्या आणि स्यू की ह्यांच्यावरचे निर्बंध अजून वाढवण्यात आले. त्या वर्षीच त्यांना युरोपियन पार्लमेंटतर्फे 'साखारोव्ह प्राइझ फॉर फ्रिडम ऑफ थॉट' ने गौरवण्यात आले तर ९१ साली मानवी हक्क आणि शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला. दोन्ही वेळी त्या कैदेत असल्याने त्यांचे मुलगे अलेक्झांडर व किम ह्यांनी आईच्या वतीने ते पुरस्कार स्वीकारले. कैदेत असताना नोबेल पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. त्यांनी ब्रह्मदेशात परत न येण्याच्या अटीवर त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी ह्या वेळीही देण्यात आली पण त्यांनी अर्थातच ती नाकारली. ह्या बक्षिसाच्या रकमेचा विनियोग त्यांनी ब्रह्मदेशातल्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी वापरला. ह्या सर्व घडामोडींकडे जगाचे लक्ष वेधले गेले. नोबेल शांतता पुरस्कार मिळालेल्यांनी एकत्र येऊन ह्याविरुध्द युनो मध्ये आवाज उठवला. ब्रह्मदेश आणि थायलंडच्या सीमेवर त्यांनी निर्वासितांच्या भेटी घेतल्या. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर १९९५च्या जुलैमध्ये त्यांच्यावरची नजरकैद उठवण्यात आली आणि त्यावर्षीचा नाताळ त्यांना पती आणि मुलांसोबत घालवता आला. नंतर परत कैद आलीच..

९५ सालच्या नाताळानंतर मायकेल एरिसची बायकोशी भेट नव्हती. त्याने व्हिसाकरता वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या. पण त्याचा व्हिसा नाकारण्यात आला. प्रत्येल वेळी स्यू कीला देश सोडून त्याच्याकडे जाण्यासाठी विचारणा केली जाई आणि एकदा रंगून सोडले की मागचे रस्ते आपल्यासाठी बंद हे जाणून, कुटुंबापेक्षा मानवी हक्कांना प्राधान्य देऊन, मनावर दगड ठेवून स्यू की तेथेच राहत राहिल्या. ८९ सालापासून ते पतीपत्नी फक्त पाच वेळा भेटू शकले होते. मनाने अर्थातच ते एकमेकांसोबर कायम होते, ही मानवी हक्कांसाठीची लढाई संपेल आणि आपण पुढचे आयुष्य एकत्र घालवू असा विश्वास दोघांनाही होता पण इकडे मायकेल यांना कॅन्सर झाला असल्याचे समजले. शेवटची स्टेज! शेवटचे काहीच महिने राहिले आहेत. असे असताना पत्नी जवळ असणे तर सोडाच पण तिला एकदा भेटता यावे ह्याकरताचा व्हिसाही नाकारला गेला. अगदी यु एन सेक्रेटरी कोफी अन्नान, पोप जॉन पॉल दुसरे यांच्या मध्यस्थीचाही काहीही उपयोग झाला नाही. शेवटी १९९९ मध्ये मायकेल एरिस यांच्या कॅन्सर बरोबरच्या जीवघेण्या लढाईत मॄत्यू जिंकला. पण पतीचे शेवटचे बघणे, भेटणेही त्यांच्या नशिबी नव्हते.

पण हा त्याग ब्रह्मदेशाच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाकरता होता. तेथली लष्करशाही संपुष्टात येऊन तेथे लोकशाही यावी ह्याकरता होता. त्यांनी स्वतःला परत लोककार्यात गुंतवले. परिणाम? रंगूनमध्ये स्थानबध्दता आणि परत एकदा नजरकैद! युनोमधून त्यांच्या सुटकेकरता प्रयत्न चालू होतेच. त्या दबावामुळे स्यू की ह्यांना त्यांच्या दोन्ही मुलांची पत्रे मिळू लागली. काही मासिके वाचायला मिळू लागली.

२००९ मध्येच त्यांच्या सुटकेची घटिका समीप येत असतानाच काही ना काही कारणे काढून त्यांना परत कैदेत टाकले. शेवटी त्याच वर्षी २००९ मध्ये युनोने स्यू की ह्यांची कैद म्यानमारच्याच घटनेनुसार बेकायदेशीर आहे हे घोषित केले. २०१० मध्ये सार्वत्रिक निवडणूका होत्या. स्यू की यांना निवडणूकीला उभे राहता येऊ नये ह्याकरता हरएक प्रयत्न केले गेले. स्यू की ह्यांचे पती ब्रिटिश होते ह्या मुद्द्यावर विदेशी व्यक्तीशी लग्न केलेल्याला निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारला जाण्याच्या कायद्याचा मुद्दा काढला गेला. स्यू की ह्यांची लोकप्रियता वाढतच होती. एन एल डी- नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी ह्या त्यांच्या पक्षाने तो झुगारून देत स्यू की ह्यांना सक्रिय राजकारणाकरता पाठिंबा दिला. ह्या निवडणूकीमध्ये एन एल डीचा विजय तर निश्चित होताच पण ४५ पैकी ४३ जागांवर विजय मिळवला. तर नोव्हेंबर २०१५ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ६६४पैकी ३७८ जागा घेत सरकार स्थापन केले. कायद्यानुसार स्यू कींना प्रेसिडेंट होणे शक्य नव्हते कारण त्यांचे पती ब्रह्मी नव्हते. त्यांचे अनेक वर्षांचे सहकारी आणि सल्लागार श्री. हिटन काऊ ह्यांना राष्ट्राध्यक्ष केले गेले व स्यू की ह्यांच्यासाठी एप्रिल २०१६ मध्येस्टेट काउन्सेलर हे पद निर्माण केले गेले. जोपर्यंत घटनेत योग्य बदल केले जात नाहीत तोपर्यंत स्यू कीं महत्त्वाची भूमिका पार पाडणार असे त्यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे. लोकशाहीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्यू की ह्यांचा त्याग, त्यांच्या अहिंसक मार्गाने मानवी हक्कांसाठी दिलेल्या लढ्याची ही सफलता आहे.

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

सुंदर सुरू आहे लेखमाला..!!!!

__/\__

वाचून कसंतरीच वाटलं. जिद्दीची पराकाष्ठा केलिये यांनी.

आत्ताच ओबामांनी म्यानमारवरचे निर्बंध उठल्याची बातली वाचली आणि इकडे हा लेख आला. केवढा तो त्याग!

समर्पक's picture

8 Oct 2016 - 2:06 am | समर्पक

ब्रह्मदेशात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात अतिशय लोकप्रिय आहेत पण तरी सैन्याच्या संसदेतील राखीव जागांच्या गणितामुळे सत्ताकेंद्र संपूर्णपणे लोकशाहीच्या हातात येणे कठीण आहे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना सलाम!

अजून एका कारणासाठी त्या मला आवडतात, ते म्हणजे त्यांची वेशभूषा! काळाप्रमाणे थोडा फरक करून पारंपरिक वेश अतिशय टापटिपीने कॅरी करतात, अगदी केसात माळलेल्या फुलांपर्यंत! अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व !

रातराणी's picture

8 Oct 2016 - 9:12 am | रातराणी

फोटो पाहुन मला अगदी हेच वाटलेल, एवढा त्याग करूनही चेहऱ्यावर किती सात्विक प्रसन्न भाव आहेत, आत्मप्रौढीचा जरासुद्धा आव नाही की किती सहन केल मी म्हणून चेहऱ्यावर कटुता नाही! कोणत्या मातीनी बनलेली असतात ही माणस? फार सुरेख लेखमाला!

व्यवस्थापनशास्त्रात एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. 'माणसे ही इतर कुठल्याही प्रलोभन वा भीतीपेक्षा जास्त प्रेरित होत असतील तर ती एक गोष्ट म्हणजे विचार!' स्यू की यांच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2016 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यवस्थापनशास्त्रात एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. 'माणसे ही इतर कुठल्याही प्रलोभन वा भीतीपेक्षा जास्त प्रेरित होत असतील तर ती एक गोष्ट म्हणजे विचार!' स्यू की यांच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते.

+१०००

अशीच माणसे क्रांतीकारी बदल घडवून आणंतात !

मालिका सुंदर प्रकारे पुढे चालली आहे.

छान सुरु आहे लेखमाला.
पुभाप्र

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2016 - 10:10 am | बोका-ए-आझम

यांचा लढा आणि त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायक आहे. छान ओळख स्वातीताई!

प्रेरणादायक व्यक्तिमत्वाची सुंदर ओळख.

यशोधरा's picture

8 Oct 2016 - 1:37 pm | यशोधरा

किती प्रेरणादायक..

इडली डोसा's picture

9 Oct 2016 - 9:10 am | इडली डोसा

सगळेच लेख प्रेरणादायी आहेत. _/\_

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:23 pm | मी-सौरभ

आम्हि फक्त नाव ऐकले होते त्यांचे.
एवढा सुंदर परीचय करुन दिला त्याबद्दल_/\_

पैसा's picture

15 Oct 2016 - 9:11 pm | पैसा

_/\_

पिशी अबोली's picture

15 Oct 2016 - 10:54 pm | पिशी अबोली

त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल होतं.

हा लेख आणि ही निवड, दोन्ही आवडलं..

बाजीप्रभू's picture

17 Oct 2016 - 1:11 pm | बाजीप्रभू

खूप छान परिचय.
अभिनेत्री "मिशेल येओह" हिने "सान स्यू की"वर साकारलेला "The Lady" वेळ मिळाल्यास नक्की बघा. छान आहे चित्रपट.