मोसाद - भाग १३
५ ऑक्टोबर १९७३, लंडन. ‘ डुबी ’ हे टोपणनाव असणाऱ्या एका मोसाद एजंटला इजिप्तची राजधानी कैरोमधून रात्री दीड वाजता एक कॉल आला. इझराईलच्या लंडनमधल्या वकिलातीशिवाय मोसादच्या मालकीची लंडनमध्ये अनेक घरं होती. त्यातल्या एका ‘ सुरक्षित घर ’ किंवा सेफ हाऊसमधून डुबी आपलं काम करत असे. इथे असलेल्या फोनचा नंबर फारच कमी जणांना माहित होता आणि तिथे नेहमी सकाळी किंवा दुपारीच फोन येत असत. त्यामुळे रात्री दीड वाजता फोन येणं हीच अनपेक्षित गोष्ट होती.
डुबीने फोन उचलला. पलीकडून कोण बोलतंय हे कळल्यावर त्याची उरलेली झोप उडाली. कैरोमधून बोलणारा माणूस मोसादच्या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गुप्त हेरांपैकी एक होता. त्याच्या अस्तित्वाबद्दल मोसादमध्येच जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांना माहित होतं. मोसादच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख एंजल असा केला जात असे. एंजलने काही शब्द उच्चारले. ऐकणाऱ्या एखाद्या तिऱ्हाईत माणसाला ते अर्थहीन शब्द वाटले असते, पण ते सांकेतिक शब्द होते. त्यातल्या एका शब्दाने डुबी हादरला. हा शब्द होता – केमिकल्स. एंजलने फोन खाली ठेवताच डुबीने मोसादच्या इझराईलमधल्या हेडक्वार्टर्सला फोन लावला आणि तिथे ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला मोसाद संचालक झ्वी झमीरशी बोलू देण्याची विनंती केली. झमीर फोनवर आल्यावर डुबीने एंजलशी झालेलं सगळं बोलणं त्याला ऐकवलं आणि जेव्हा केमिकल्स हा शब्द झमीरने ऐकला, तेव्हा त्याने ताबडतोब लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.
त्याला एवढी घाई करणं भागच होतं, कारण केमिकल्स या शब्दाचा अर्थ होता – इझराईलवर लगेचच हल्ला होऊ शकतो!
आपल्या शेजारील अरब राष्ट्रांकडून असा हल्ला होण्याची अपेक्षा इझराईलला १९६७ पासून होती. त्या वर्षी झालेल्या ६ दिवसांच्या युद्धात इझराईलने आपल्या अरब शत्रूंकडून भरपूर मोठा भूभाग हस्तगत केला होता – इजिप्तकडून सिनाई द्वीपकल्प आणि गाझा, सीरिया कडून गोलान टेकड्या आणि जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि जेरुसलेम. आता गोलान टेकड्यांवर, सुएझ कालव्याच्या पूर्व किनाऱ्यावर आणि जॉर्डन नदीच्या जवळपास संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर इझरेली सैन्याची गस्त चालू होती. अरब देश, विशेषतः इजिप्त आणि सीरिया अधूनमधून इझराईलचा सूड उगवण्याच्या घोषणा करत असत, पण मोठं युद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता. त्याच दरम्यान काही महत्वाच्या घटना घडल्या.
१९७० मध्ये इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षाचा – गमाल अब्दुल नासरचा मृत्यू झाला आणि त्याच्या जागी त्याचा निष्ठावंत सहकारी अन्वर सादात सत्तेवर आला. दुसरीकडे सीरियामध्ये राज्यक्रांती झाली आणि हाफेझ अल असदने सत्ता काबीज केली. इझराईलमध्ये पंतप्रधान लेवी एश्कोल यांच्या निधनानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायर यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांनी इझराईलच्या संरक्षणमंत्रीपदी निवड केली ती धुरंधर सेनानी मोशे दायान यांची.
सादात आणि असद हे दोघेही दोन टोकांवरचे नेते होते. असद सीरियन वायुदलाचा प्रमुख होता. सीरियन बाथ पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. १९६० ते १९७० या काळात सीरियामध्ये झालेल्या प्रत्येक राज्यक्रांतीमध्ये त्याचा सहभाग होता आणि शेवटी १९७० मध्ये जेव्हा त्याने सीरियामध्ये सत्ता हस्तगत केली, तेव्हा तो सीरियामध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करेल अशी सगळ्यांची, अगदी इझराईलसारख्या त्याच्या शत्रूंचीही खात्री होती, आणि झालंही तसंच. २००० मध्ये निधन होईपर्यंत असदची सीरियावरची पकड वादातीत आणि पोलादी होती. सत्तेवर आल्यानंतर असदने अंतर्गत बंडाळी मोडून काढणे आणि देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे या गोष्टींना प्राधान्य देण्याचं जाहीर केलं होतं. इझराईलसाठी ही दिलासा देणारीच गोष्ट होती.
इजिप्तचा सादात असदच्या बरोबर उलटं व्यक्तिमत्व होतं. तो नासरच्या करिष्म्यापुढे झाकोळून गेलेला नेता होता. त्याला नासरचा उजवा हात म्हणून जरी इजिप्तबाहेर ओळखत असले, तरी तो सत्तेवर येईपर्यंत त्याच्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती. मोसादमधल्या इजिप्त डेस्कवर असलेल्या तज्ञांच्या मते सादातकडे देशाला युद्धात एक कणखर आणि सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता नव्हती. या घटनांच्या थोडं आधी इझराईलमध्येही पंतप्रधान लेवी एश्कोल यांचं निधन झालं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायर इझराईलच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व लाभल्यामुळे संपूर्ण देशाने आनंद व्यक्त केला. मायर यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री असलेले मोशे दायान हेही त्यांच्या १९६७ च्या युद्धातील कामगिरीमुळे प्रसिद्ध होतेच. “ इझराईलची सुरक्षा अत्यंत योग्य हातांमध्ये आहे ” असं मत जवळपास सर्वच वृत्तपत्रं व्यक्त करत होती.
५ ऑक्टोबरच्या या फोन कॉलच्या आधी काही आठवडे जॉर्डनचा राजा हुसेन स्वतः गुप्तपणे इझराईलला आला आणि त्याने मायर आणि दायान यांची भेट घेतली. नासरच्या मृत्यूनंतर जॉर्डनने इझराईलबरोबर शांतता प्रस्थापित केलेली होती. त्याचं एक कारण म्हणजे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा दोघाही देशांना होत असणारा त्रास. सर्व अरब राष्ट्रांमध्ये जॉर्डनची गुप्तचर संस्था सर्वात अद्ययावत आणि वास्तवाची जाणीव असणारी आहे असं मोसादचं मत होतं. त्यामुळे जेव्हा राजा हुसेनने या भेटीत इजिप्त आणि सीरिया इझराईलवर आक्रमण करण्याची तयारी करत आहेत अशी धोक्याची सूचना मायर आणि दायान यांना दिली, तेव्हा मोसादने त्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायचं ठरवलं, पण त्यांच्यासमोर एक अनपेक्षित अडथळा उभा राहिला. जगातल्या प्रत्येक लोकशाही देशामधली अपरिहार्य गोष्ट – निवडणूक. गोल्डा मायर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत होता, त्यामुळे त्यांचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे लागलं होतं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लिकुड पक्षाने यावेळी लेबर पक्षापुढे आव्हान उभं केलं होतं, आणि सुएझ कालव्याच्या आसपास असणारी शांतता हा या निवडणुकीत प्रमुख मुद्दा होता. मायर आणि दायान यांचं लक्ष निवडणुकीकडे असल्यामुळे त्यांनी राजा हुसेनने दिलेल्या इशाऱ्याकडे जेवढं द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही.
आणि आता ५ ऑक्टोबरच्या दिवशी सुएझ कालव्याच्या आसपास असणारी शांतता भंग होण्याची पूर्ण चिन्हं दिसत होती.
मोसाद संचालक झमीरने एंजलने केलेला फोन प्रचंड गांभीर्याने घेतला होता. मोसादने अशा प्रसंगी जो प्रतिसाद द्यायचा असतो, तो कार्यान्वित केला आणि त्यानुसार झमीर ताबडतोब तेल अवीवहून लंडनला रवाना झाला. लंडनच्या गजबजलेल्या बॉंड स्ट्रीटवर एका सहा मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये झमीर आणि एंजल भेटत असत. हा फ्लॅट तिथल्या एका ज्यू इस्टेट एजंटने मोसादला कमी दरामध्ये मिळवून दिला होता. एंजल आणि इतर परकीय मोसाद हस्तकांना सुरक्षित वातावरणात भेटणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याने या घरात प्रवेश करताच १० मोसाद एजंट्सनी आजूबाजूच्या रस्त्यांवर आणि इमारतींवर नजर ठेवायला सुरुवात केली. एंजलबरोबर एवढ्या भेटी होऊनसुद्धा जराही गाफील राहायला झमीर तयार नव्हता. समजा एंजल हा इजिप्शीयन गुप्तचर संघटनेचा दुहेरी हेर असला तर? समजा तसं नसलं, पण त्याची खरी ओळख इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेला समजली आणि त्यांनी त्याला अटक करून मुद्दामहून इझराईलच्या एका हेराला पकडण्यासाठी पाठवलं असलं तर? हा धोका पत्करण्याची मोसादची तयारी नव्हती.
झमीर लंडनला अर्थातच त्याच्या खऱ्या पासपोर्टवर आलेला नव्हता. ब्रिटिशांना काही कळावं अशी त्याची इच्छा नव्हती. त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं, कारण एंजलचाही पत्ता नव्हता. पण साधारण दुपारच्या सुमारास त्याला रोममधल्या मोसाद स्टेशनकडून एंजल रोममध्ये काही वेळ थांबला असल्याची आणि आता तिथून निघाला असल्याची बातमी समजली.
एंजल लंडनला रात्री साडेनऊ वाजता पोचला. तोही दुसऱ्या पासपोर्टवर प्रवास करत होता. त्याला झमीरपर्यंत पोचायला रात्रीचे ११ वाजले.
दरम्यानच्या काळात इझराईलमध्ये योम किप्पूर सणाची सुरुवात झाली होती. सर्व काम थांबलं होतं. अगदी रेडिओ आणि टीव्ही यांचं प्रसारणसुद्धा. रस्त्यांवर सामसूम होती. सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. इझराईलच्या सरहद्दींचं संरक्षण करणारे सैनिक पहारा देत होते, पण त्यांचीही संख्या कमी होती.
एंजल आणि झमीर यांच्यात झालेली भेट जवळपास २ तास चालली. डुबीने दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा शब्दन् शब्द नोंदवून घेतला होता.
१ वाजता त्यांच्यातलं संभाषण संपल्यावर झमीरने एंजलला त्याची ठरलेली फी – एक लाख अमेरिकन डॉलर्स – चुकती केली आणि इझराईलला एक तातडीचा गुप्त संदेश पाठवण्याची तयारी केली. पण इझराईलच्या वकिलातीलाही योम किप्पूरची सुट्टी लागल्यामुळे हा संदेश इझराईलला पाठवणार कसा हा मोठा प्रश्न होता.
शेवटी झमीरचा पारा चढला. फ्रेडी ऐनी हा त्याचा प्रमुख सहाय्यक होता. त्याला आपला बॉस कुठेतरी गेलेला आहे, एवढं माहित होतं. झमीरने इझरेली वकिलातीत असलेल्या नाईट ड्युटी ऑपरेटरला सांगून त्याला उठवायला सांगितलं. जवळपास दीड तास प्रयत्न केल्यावर ऐनी फोनवर आला.
“एक काम कर. आधी तुझ्या चेहऱ्यावर थंड पाणी मार, आणि मग कागद आणि पेन्सिल घेऊन ये,” झमीर म्हणाला. ऐनीने तसं केल्यावर झमीरने त्याला संदेश लंडनहून सांगितला – आजच्या दिवसाच्या शेवटी कंपनी करारावर सह्या करेल.
फ्रेडी ऐनीला या संदेशाचा अर्थ जरी माहित नसला, तरी असा संदेश आल्यावर काय करायचं ते माहित होतं. त्याने ताबडतोब इझराईलच्या लष्करी आणि राजकीय नेत्यांना फोन करून हा संदेश द्यायला सुरुवात केली. या संदेशाचा अर्थ होता – आज युद्धाला सुरुवात होणार आहे.
नंतर सकाळ झाल्यावर झमीरने एक विस्तृत संदेश पाठवला. त्यात असं म्हटलं होतं – आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी इजिप्त आणि सीरिया यांचं सैन्य आपल्यावर आक्रमण करेल. आज आपल्या देशात सार्वजनिक सुट्टी आहे हे त्यांना माहित आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की ते आज रात्र व्हायच्या आत सुएझ कालव्याच्या आपल्या बाजूला पोचलेले असतील. ते ज्या पद्धतीने हा हल्ला करतील, त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. एंजलच्या मते सादात अजून उशीर करू शकत नाही, कारण त्याने इतर अरब देशांच्या प्रमुखांना वैयक्तिकरित्या शब्द दिलेला आहे, आणि तो आपलं वचन पाळणार आहे. त्यामुळे आज हल्ला होईल याची ९९.९ टक्के शक्यता आहे. त्यांना त्यांचा विजय होईल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच जर या योजनेबद्दल कुणाला समजलं, तर युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न होतील अशी त्यांना भीती वाटते आहे. रशिया या युद्धात तटस्थ राहणार आहे.
झमीरच्या या संदेशाने इझराईलच्या सुरक्षायंत्रणेत एकच खळबळ माजली. जरी झमीरच्या माहितीच्या सत्यतेबद्दल कुणी उघडपणे शंका घेतली नाही, तरी त्याचा हा संदेश बऱ्याच जणांना अतिरंजित वाटला. या लोकांमध्येच एक होता अमान (लष्करी गुप्तचर संस्था) चा प्रमुख जनरल एली झाईरा. झाईराच्या मते युद्धाची कोणतीही शक्यता नव्हती. जेव्हा मोसादने त्याला सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन किनाऱ्यावर इजिप्तचे सैनिक आणि रणगाडे यांची वाढलेली संख्या दाखवून दिली, तेव्हा झाईराने ते उडवून लावलं. त्याच्या मते ही इजिप्तची एक चाल होती आणि इझराईलमध्ये घबराट पसरवणं हा त्यामागचा हेतू होता. त्याने हा आक्षेप नोंदवल्यावर मोसादने त्याला इझरेली सैन्याच्या ट्रान्समिटर्सनी टिपलेली आणि मोसादच्या के.जी.बी. मधल्या हस्तकांनी खात्री करून घेतलेली एक माहिती सांगितली. सोव्हिएत रशियाने इजिप्त आणि सीरियामध्ये जे लष्करी सल्लागार पाठवले होते, ते आणि त्यांचे कुटुंबीय यांना देश सोडून परत रशियाला जायला सांगण्यात आलं होतं, आणि हा आदेश मॉस्कोहून आला होता. असं का यावर झाईराकडे काहीही उत्तर नव्हतं.
झाईरा आणि त्याच्याप्रमाणे युद्ध होणार नाही असं मानणारे जे लोक होते, त्यांना असं वाटण्यामागे दोन कारणं होती. त्यांच्या मते इजिप्तने इझराईलवर हल्ला फक्त दोन गोष्टींची पूर्ण खात्री झाल्यावरच केला असता – सोव्हिएत रशियाकडून इजिप्तच्या वायुदलाला लढाऊ जेट विमानं, बॉम्बर्स आणि क्षेपणास्त्रं मिळाली पाहिजेत ही पहिली गोष्ट आणि इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तला या युद्धासाठी सहकार्य करावं ही दुसरी गोष्ट. जोपर्यंत या दोन्हीही गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत इजिप्त इझराईलवर हल्ला करणार नाही असं या लोकांचं म्हणणं होतं. त्यांच्या मते इजिप्त धमक्या देईल, गोळीबार करेल, पण प्रत्यक्ष युद्ध करायची हिम्मत करणार नाही.
या तर्काला तसा काही अर्थ नव्हता, कारण १९६७ च्या युद्धाच्या वेळीही या लोकांना इजिप्तबद्दल असंच वाटलं होतं, पण ते चुकीचं ठरलं होतं. त्यावेळी इजिप्तच्या सैन्यापैकी जवळपास ६०% सैन्य येमेनमध्ये तिथल्या सैन्याशी लढत होतं, आणि इझरेली सैन्याला ही खात्री होती, की येमेनमध्ये सैन्य अडकलेलं असताना नासर इझराईलवर आक्रमण करणार नाही. पण १५ मे १९६७ या दिवशी अचानक इजिप्तच्या फौजा सिनाई द्वीपकल्प पार करून इझरेली सीमारेषेच्या दिशेने झेपावल्या होत्या. त्याच वेळी नासरने सुएझ कालव्याच्या निरीक्षणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांना इजिप्तमधून हद्दपार केलं होतं आणि तांबडा समुद्र इझरेली जहाजांसाठी बंद केला होता. इझरेली सैन्याच्या हे त्याचवेळी लक्षात यायला पाहिजे होतं, की अपुरं सैन्य किंवा न झालेली तयारी वगैरे गोष्टींनी इजिप्तला काहीही फरक पडत नाही. इझराईल नष्ट करण्याची इच्छा ही एकमेव गोष्ट पुरेशी आहे. पण अवघ्या ६ दिवसांत इझराईलने ३ अरब राष्ट्रांच्या सैन्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पाजलं आणि मध्यपूर्वेत आपणच बलाढ्य आहोत हे सिद्ध केलं. त्याच्या आनंदात हा मुद्दा सगळेजण विसरून गेले.
६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी सकाळी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी जी मंत्रिमंडळ आणि सैन्याधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावली, त्यात इजिप्त आणि तिथल्या राज्यकर्त्यांचा बेभरवशी स्वभाव हा मुद्दा होताच. या बैठकीत झाईराला अनपेक्षितपणे काही मंत्र्यांचा पाठिंबाही मिळाला. याआधी दोनदा – नोव्हेंबर १९७२ मध्ये आणि मे १९७३ मध्ये एंजलने हल्ला होणार आहे, अशी शक्यता वर्तवली होती. दोन्हीही वेळेला हल्ला झाला नव्हता, पण त्याच्यामुळे इझराईलला मोठ्या प्रमाणात राखीव सैन्य मैदानात उतरवावं लागलं होतं. त्याचा खर्च जवळपास ३५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढा झाला होता. शिवाय दोन्हीही वेळेला एंजलला पैसे द्यावे लागले होते ते वेगळंच.
शेवटी पंतप्रधान मायर यांनी तडजोड केली. इझराईल आपलं राखीव सैन्य पूर्णपणे उतरवणार किंवा कार्यरत करणार नाही, आणि सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन बाजूवर प्रतिबंधात्मक हल्लेही चढवणार नाही. थोडक्यात, युद्ध सुरु करण्याची जबाबदार इजिप्तवर सोडून देणार, पण प्रतिकारासाठी तयार राहणार.
झमीर या बैठकीला हजर राहू शकला नाही, कारण तो लंडनहून निघाला होता, पण इझराईलमध्ये उतरल्यावर त्याने पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांची भेट घेतली आणि युद्ध होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
दुपारी २ वाजता तेल अवीवमधल्या जनरल झाईराच्या ऑफिसमध्ये त्याला त्याच्या सहाय्यकाने एक टेलेक्स संदेश आणून दिला. तो वाचून झाईरा घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडला.
जेमतेम पंधरा मिनिटांत इझराईलमधल्या महत्वाच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचना देणाऱ्या सायरन्सनी योम किप्पूरची शांतता भंग केली. युद्धाला सुरुवात झाली.
६ ऑक्टोबरला सुरु झालेल्या या युद्धाची २३ ऑक्टोबर या दिवशी अखेर झाली. युद्ध संपल्यावर अमानच्या अधिकाऱ्यांनी एंजलवर त्यांना जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. त्यांच्या मते एंजलने संध्याकाळी हल्ला होणार असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात हल्ला दुपारी २ च्या सुमारास सुरु झाला. या आरोपांमुळे वैतागलेल्या एंजलने युद्ध संपल्यावर हे शोधून काढलं, की हल्ल्याची वेळ संध्याकाळचीच होती, पण सादात आणि असद यांच्यात झालेल्या एका संभाषणानंतर ही वेळ आयत्या वेळी बदलण्यात आली. त्यावेळी एंजल लंडनहून कैरोला परत यायला निघाला असल्यामुळे त्याला याबद्दल काहीही माहित नव्हतं आणि त्यामुळे इझराईलपर्यंत ही बातमी पोचवण्याची कुठलीही व्यवस्था त्याच्याकडे नव्हती आणि तो त्याच्या राष्ट्राध्यक्षांना जाबही विचारू शकत नव्हता.
मोसादनेही याबद्दल आपला निषेध नोंदवला. मोसाद संचालक झ्वी झमीरने अत्यंत कडक शब्दांमध्ये अमान अधिकाऱ्यांना, विशेषतः अमानचा प्रमुख एली झाईराला सांगितलं की मोसादसाठी एंजल हा इजिप्तच्या सरकार मध्ये असलेला हेर आहे, पण अमानचे अधिकारी त्याला इजिप्तमध्ये असलेला इझराईलचा प्रतिनिधी समजताहेत, ज्याने प्रत्येक बातमी, अगदी खडानखडा आणि तपशीलवार द्यायलाच पाहिजे. त्याने त्यांना ही आठवण करून दिली की एंजल हा एक हेर असल्यामुळे जी माहिती त्याला मिळते आणि जी माहिती तो स्वतःला लपवून देऊ शकतो, ती माहिती तो देतोय. काही माहिती ही एवढी गुप्त असते, की ती अत्यंत थोड्या लोकांना माहित असते. जर ती इझराईलला समजली हे इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेला समजलं, तर ती माहिती ज्या थोड्या लोकांना आहे, त्यांच्यावर पाळत ठेवून ते त्या हेराला अटक करू शकतात. त्यामुळे माहिती असली, तरी कधीकधी सांगता येत नाही किंवा सांगितली, तरी आपल्या हेराच्या सुरक्षिततेसाठी ते जाहीर करता येत नाही.
युद्धाच्या दरम्यान एंजलने इजिप्त आणि इझराईल यांच्यात मोठा संघर्ष टाळण्याचे अनेक प्रयत्न केले. उदाहरणार्थ जेव्हा इजिप्तने सिनाईवर स्कड क्षेपणास्त्रांचा मारा केला, तेव्हा इझराईलने आपली एक संपूर्ण डिव्हिजन सिनाईच्या रोखाने पाठवली होती, पण इजिप्त अजून क्षेपणास्त्रांचा मारा करणार नाही, या एंजलने दिलेल्या माहितीमुळे इझरेली सैन्य सिनाई ओलांडून इजिप्तमध्ये घुसलं नाही.
योम किप्पूर युद्धाच्या दोन आघाड्या होत्या. नैऋत्य – इजिप्तविरुद्ध आणि ईशान्य – सीरियाविरुद्ध. नैऋत्य आघाडीवर इझरेली सैन्य संरक्षक पवित्र्यात होतं, पण ईशान्येला त्यांनी सगळी कसर भरून काढत पूर्ण आक्रमक भूमिका स्वीकारली होती. १९६७ मध्ये गोलान टेकड्यांचा जो भाग इझराईलच्या ताब्यात आला होता, त्याव्यतिरिक्त अजून काही टेकड्या त्यांनी यावेळी ताब्यात घेतल्या आणि तिथून सीरियन सैन्याला उखडून टाकलं. युद्ध थांबलं, त्यावेळी इझरेली तोफखान्याच्या दोन डिव्हिजन्स सीरियाची राजधानी दमास्कसपासून अवघ्या २० मैलांवर पोचल्या होत्या. नैऋत्येला इजिप्शीयन सैन्य सुएझ कालव्याच्या इझरेली बाजूला ५ मैल आत घुसलं पण त्यांना या यशाचं रुपांतर अंतिम विजयात करता आलं नाही. त्यांना चकवून इझरेली सैन्याच्या दोन डिव्हिजन्सनी त्यांना कोंडीत पकडलं आणि माघार घ्यायला लावली.
कागदोपत्री जरी इझराईलने युद्ध गमावलं नव्हतं, तरीही मानसशास्त्रीय दृष्ट्या या युद्धाचा इझरेली राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर खोलवर परिणाम झाला. अवघ्या ६ वर्षांपूर्वी मिळवलेला निर्णायक विजय यावेळी इझराईलला मिळवता आला नव्हता. सिनाईसारख्या अवाढव्य प्रदेशात इझरेली सैन्य ठेवण्याचा वेडेपणाही लष्कराच्या लक्षात आला होता. या युद्धातली इझरेली मनुष्यहानीसुद्धा भरपूर होती – २६५६ मृत्यू आणि ७२५१ जखमी.
इजिप्तमध्येही राष्ट्राध्यक्ष सादातला इजिप्तच्या अपुऱ्या ताकदीचा अंदाज आला होता. त्यामुळे या युद्धानंतर इजिप्त आणि इझराईल यांच्यात प्रथम युद्धबंदी, नंतर परस्परांच्या सरहद्दींचा आदर करण्याचे करार आणि नंतर मैत्री या प्रक्रियेला सुरुवात झाली. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील कँप डेव्हिड या ठिकाणी सादात आणि इझराईलचे तत्कालीन पंतप्रधान मेनॅचम बेगिन यांच्यात करार झाला आणि इजिप्तने इझराईलला मान्यता दिली आणि हातमिळवणी केली. मोरोक्को आणि जॉर्डन यानंतर अजून एक अरब देश इझराईलचा मित्र झाला. बेगिन आणि सादात एकमेकांचे व्यक्तिगत मित्र बनले. इझराईलबरोबर केलेल्या कराराची सादातला मात्र दुर्दैवाने किंमत चुकवायला लागली. इजिप्तमध्ये झालेल्या राज्यक्रांतीच्या वर्धापनदिनाच्या दिवशी संचलनात मानवंदना स्वीकारत असताना सादातचा इजिप्शीयन सैन्यातील असंतुष्ट आणि पुराणमतवादी अधिकाऱ्यांनी खून केला. त्याच्या अंत्ययात्रेत बेगिन स्वतः सहभागी झाले होते.
पण या सगळ्या नंतर घडलेल्या गोष्टी. युद्ध झाल्यामुळे झमीरचं एंजलने सांगितलेल्या माहितीचं विश्लेषण बरोबर होतं, हे सिद्ध झालं. युद्ध संपल्यावर मोसादने म्युनिक ऑलिंपिक खेळांमध्ये मारल्या गेलेल्या इझरेली खेळाडूंच्या हत्येचा सूड घेण्यासाठी चालू केलेलं ऑपरेशन राथ ऑफ गॉड परत हातांत घेतलं. झमीर मोसादमधून निवृत्त झाला आणि त्याची जागा जनरल यित्झाक होफीने घेतली.
निवृत्तीनंतर झमीरबद्दल इझरेली सुरक्षायंत्रणेचं आणि लोकांचंही मत चांगलं होतं. जेव्हा त्याने योम किप्पूर युद्धाबद्दल आधी सूचना दिली होती, हे बाहेर आलं, तेव्हा त्याचं अजूनच कौतुक व्हायला लागलं. जर त्यावेळच्या नेतृत्वाने झमीरचं म्हणणं ऐकलं असतं तर इझराईलचं एवढं नुकसान झालं नसतं. अनेक मंत्र्यांनी यावर असं म्हटलं, की इझराईलने त्यावेळी इजिप्तवर हल्ला केला नाही, कारण युद्ध सुरु केल्याचा ठपका इझराईलला नको होता. यावर लोकांचं असं मत पडलं, की १९६७ मध्ये इझराईलनेच इजिप्तवर हल्ला करून इजिप्तचं वायुदल उध्वस्त केलं होतं. तेव्हा असा विचार इझरेली नेतृत्वाने का केला नाही? शिवाय महत्वाचं काय आहे – देशाचं रक्षण की आंतरराष्ट्रीय जनमत?
काही वर्षांनी तेल अवीव विद्यापीठातले इतिहासकार डॉ. उरी बार-योसेफ यांचं या युद्धावर लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात झमीर आणि एंजल यांची मुक्तकंठाने स्तुती केली होती. योसेफ यांच्या मते एंजलच्या सूचनेमुळेच गोलान टेकड्यांच्या प्रदेशात इझरेली तोफखाना वेळेवर पोचू शकला आणि नाफाहून इझराईलची सीमारेषा ओलांडू पाहणाऱ्या सीरियन सैन्याला थोपवू शकला.
हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर गदारोळ झाला. जनमताच्या रेट्यामुळे इझरेली सरकारने एक चौकशी आयोग नेमला. योम किप्पूर युद्धाच्या आधी आणि दरम्यान कशा प्रकारे निर्णय घेतले गेले, त्याची छाननी करणं हे या आयोगाचं काम होतं. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शिमॉन अग्रानॅट हे या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने जनरल एली झाईरा आणि इतर अनेक अमान अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस केली, आणि सरकारने ती अंमलातही आणली.
पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत होता. एंजल हा नक्की कोण आहे? इझराईलमध्ये या प्रश्नावरून बराच उहापोह झाला. काही कादंबऱ्या आणि चित्रपटसुद्धा या विषयाबाबत निर्माण झाले. अर्थातच त्यांच्यात मांडलेले तर्क चुकीचे होते. एक गोष्ट नक्की होती – एंजल हा इजिप्तच्या सरकारमधला माणूस होता आणि तो सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ होता. पण तो नक्की कोण होता, याबद्दल काही मोजके अधिकारी सोडले तर कोणालाही माहित नव्हतं.
इकडे जनरल झाईरा आपल्या बडतर्फीमुळे संतापला होता. त्याने आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक पुस्तक लिहायचं ठरवलं. या पुस्तकात तो योम किप्पूर युद्धाबद्दल त्याची बाजू मांडणार होता, जी त्याच्या मते इझरेली सरकारने त्याला मांडू दिली नव्हती. त्याला आपण एंजलच्या म्हणण्यावर का विश्वास ठेवला नाही, याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं, कारण त्याने एंजलने दिलेली सूचना न स्वीकारणं हे त्याच्या बडतर्फीमागचं एक प्रमुख कारण होतं.
त्याने आपल्या पुस्तकात एंजलचं नाव जाहीर केलं नाही, पण असं प्रतिपादन केलं, की एंजल हा मोसादची दिशाभूल करण्यासाठी इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेने पाठवलेला एक दुहेरी हेर होता. इझराईलमधल्या काही पत्रकारांनी झाईराला पाठिंबा दिला. त्यांच्या मते एंजल हा दुहेरी हेर होता आणि त्याचं काम म्हणजे मोसादला काही खरी आणि बरीचशी खोटी माहिती पुरवणं हे होतं. ही खोटी माहिती इतकी बेमालूमपणे खऱ्या माहितीत दडवलेली होती, की मोसादच्या विश्लेषकांना ती वेगळी काढणं जवळपास अशक्य होतं. आणि मग एंजलवर जेव्हा मोसादचा पूर्ण विश्वास बसला, तेव्हा तो एक अशी खोटी माहिती मोसादला देणार होता, की त्यामुळे मोसादची यंत्रणा उध्वस्त झाली असती.
वर्तमानपत्रातली स्टोरी म्हणून हा जबरदस्त धमाका होता. त्यामुळे झाईराची भूमिकाही स्पष्ट होत होती, पण एकच प्रश्न होता. झाईरा आणि त्याच्या पाठीराख्यांचं एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं होतं. एंजलच्या पहिल्या अहवालापासून ते आत्तापर्यंत सगळी माहिती १०० % खरी होती. मोसादने ती पडताळूनही पाहिली होती. मग एंजलने नक्की कुठे मोसादचा विश्वासघात केला होता?
शिवाय जेव्हा इजिप्तचं सैन्य सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन किनाऱ्यावर जमा झालं होतं, तेव्हा एंजल हे मोसादला सांगू शकला असता, की इजिप्तचा युद्ध करण्याचा काहीही हेतू नाही. सैन्याची जमवाजमव ही फक्त एक हूल आहे. पण त्याने तसं केलं नव्हतं. त्याने डुबीशी संपर्क साधला – केमिकल्स हा सांकेतिक शब्द वापरला, मग तो स्वतः लंडनमध्ये आला आणि झमीरला भेटला, त्याने ठासून सांगितलं की हल्ला होणार आहे आणि त्याप्रमाणे हल्ला झालासुद्धा. उलट ज्या वेळेला होणार असं एंजलने सांगितलं होतं, त्याच्याआधी झाला. एंजलची ही वागणूक एका दुहेरी हेरापेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
पण झाईरा ऐकायला किंवा थांबायला तयार नव्हता. २००४ मध्ये त्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रकाशित होणार होती. त्यावेळी त्याने वर्तमानपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनवर मुलाखती द्यायचा सपाटा लावला. या कार्यक्रमांमधला एक कार्यक्रम प्रसिद्ध इझरेली पत्रकार डॅन मार्गालीतचा टॉक शो होता. त्यात झाईराने एंजलचं खरं नाव जाहीर केलं.
अश्रफ मारवान.
अश्रफ मारवान हे नाव जाहीर होताच इजिप्तमध्येच नव्हे, तर संपूर्ण अरब जगात प्रचंड खळबळ उडाली. मारवान इझरेली हेर असू शकेल याची कोणालाच कल्पना नव्हती. सीरियन प्रसारमाध्यमांनी तर एली कोहेननंतरचा सर्वात मोठा विश्वासघात या शब्दांत याचं वर्णन केलं. खुद्द इजिप्तमध्ये सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही.
कोण होता अश्रफ मारवान?
त्याचं नाव जनरल झाईराने जाहीर करण्याच्या ३९ वर्षे आधी – १९६५ मध्ये एका सुंदर आणि लाजाळू इजिप्शीयन तरुणीची एका देखण्या तरुणाशी कैरोमधल्या हेलिओपोलिस टेनिस कोर्टवर ओळख झाली. या तरुणीचं नाव होतं मूना. ती तिच्या वडिलांची तिसरी मुलगी होती. अभ्यासात ती हुशार होती, असं कोणीही म्हटलं नसतं. तो मान तिच्या मोठ्या बहिणीचा होता. पण तिच्या सौंदर्याबद्दल लोक बोलायचे. मूना तिच्या वडिलांची प्रचंड लाडकी होती. त्यामुळे तिने जेव्हा या तरुणाबद्दल आपल्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याची माहिती काढली. हा तरुण एका चांगल्या घराण्यातला होता. त्याचे वडील सैन्यात अधिकारी होते. तो स्वतः रसायनशास्त्रात पदवी मिळवून सैन्यात दाखल झाला होता आणि मूना त्याच्या प्रेमात पडली होती – अगदी सपशेल पाय घसरून पडली होती.
या तरुणाला मूनाचे वडील कोण आहेत, हे सुरुवातीला माहित नव्हतं. पण तिने लवकरच त्याची आपल्या घरच्या लोकांशी भेट घडवून आणली आणि तेव्हा त्याला ते समजलं. ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. गमाल अब्दुल नासर.
मूनाने योग्य निवड केलेली नाही, असं नासरचं म्हणणं होतं, पण मूना त्याचीच मुलगी होती. तेवढीच हट्टी. ती काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नासरने तिच्यापुढे आपला अहंकार आवरता घेतला आणि त्या तरुणाच्या वडिलांना भेटून लग्नाची तारीख पक्की केली. जुलै १९६६ मध्ये मूना आणि तो तरुण विवाहबद्ध झाले. राष्ट्राध्यक्षांचा जावई असल्यामुळे या तरुणाची नेमणूक प्रथम सैन्याच्या रासायनिक संशोधन विभागात आणि नंतर राष्ट्राध्यक्षांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात करण्यात आली.
या तरुणाचं नाव होतं अश्रफ मारवान. त्याला आपल्या नोकरीत काही आव्हानात्मक वाटत नव्हतं. त्याने नासरला लंडनमध्ये रसायनशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. नासरनेही दिली, पण मारवान लंडनला एकटाच गेला. इजिप्तच्या वकिलातीतल्या अधिकाऱ्यांची त्याच्यावर करडी नजर असायची.
पण मारवान जरी प्रशिक्षित नसला, तरी त्याची वृत्ती जातिवंत हेराची होती. या अधिकाऱ्यांना चकवून लंडनमधल्या पार्टीजमध्ये रात्रभर धमाल करण्यात तो निष्णात होता. तिथे त्याच्या अनेक मैत्रिणी झाल्या आणि त्यांच्यावर पैसे उधळल्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली. आता त्याला त्याचे शौक पूर्ण करेल असं कुणीतरी हवं होतं, आणि शोधा म्हणजे सापडेल या न्यायाने त्याने त्या व्यक्तीला शोधून काढलं.
तिचं नाव होतं सुआद अल सबाह आणि ती एका कुवेती शेखची पत्नी होती. तिचं आणि अश्रफचं प्रकरण सुरु झालं, पण नासरने अश्रफच्या मागे सोडलेल्या हेरांमुळे ते नासरला समजलं. त्याने अश्रफला परत बोलावलं आणि आपल्या मुलीपुढे त्याच्या सर्व लफड्यांचा पाढा वाचून तिने त्याला ताबडतोब घटस्फोट द्यावा अशी मागणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूनाने तिच्या वडिलांची ही मागणी सरळ फेटाळून लावली, आणि उलट त्यांनाच त्याला लंडनमध्ये एकटं पाठवल्याबद्दल दोष दिला. पण नासर आता परत अश्रफला लंडनला पाठवायला तयार नव्हता. त्याने मारवानला फक्त त्याचा प्रबंध त्याच्या शिक्षकांना देण्यापुरतं लंडनला जायला परवानगी दिली. बाकी वेळात त्याला नासरच्या ऑफिसमध्ये एका सेक्रेटरीचं काम करायचं होतं. त्याचा पगारही त्याच्या हातात दिला जात नसे. नासरचे लोक त्या पगारातून त्याने सुआद अल सबाहकडून घेतलेले पैसे परत करत असत.
कदाचित यामुळेच असेल पण १९६९ मध्ये लंडनला आपला शेवटचा प्रबंध सादर करायला आलेल्या अश्रफ मारवानने नासरच्या विरोधात जायचं ठरवलं. नासरने त्याच्या घरच्यांसमोर केलेला त्याचा अपमान तो विसरला नव्हता. त्याने इझराईलच्या वकिलातीत फोन केला आणि तिथल्या एका अधिकाऱ्याशी तो बोलला. त्याने आपण कोण आहोत, हे त्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगितलं आणि आपलं नाव मोसादकडे पाठवण्याची विनंती केली. त्या अधिकाऱ्याला हा कुठलातरी खोडसाळपणा वाटल्यामुळे त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. चिडलेल्या मारवानने दुसरा कॉल केला. हा कॉल ज्या अधिकाऱ्याने घेतला, त्याने त्याला परत एकदा कॉल करायला सांगितलं.
या वेळी मारवानचा कॉल श्मुएल गोरेन या मोसाद केस ऑफिसरने घेतला. इजिप्तच्या सरकारी वर्तुळातल्या घटनांवर नजर ठेवणं हे गोरेनचं काम असल्यामुळे त्याला अश्रफ मारवानच्या मूना नासरशी झालेल्या लग्नाबद्दल माहित होतं. त्याने मारवानचं बोलणं ऐकून घेतलं, आणि त्याला यापुढे इझराईलच्या वकिलातीत फोन न करण्याची विनंती केली आणि एक दुसरा नंबर दिला. त्याचबरोबर त्याने ही माहिती मोसाद संचालक झ्वी झमीर आणि त्झोमेत या मोसादमधील परकीय हस्तकांच्या नेमणुकीसाठी जबाबदार असलेल्या विभागाचा प्रमुख रेहाविया वार्दी यांना दिली.
वार्दीला हा फोनकॉल आणि मारवानने दिलेली ऑफर हे संशयास्पद वाटत होतं. हा कदाचित इझराईलच्या हेरांना अडकवण्याचा डाव असेल, असं त्याचं म्हणणं होतं. झमीरला तसं असू शकेल हे मान्य होतं, पण त्याचबरोबर इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचा जावई – आणि तोही आपल्या सासऱ्यावर चिडलेला – ही संधी सोडायला तो तयार नव्हता. त्याने वार्दीला मारवानबद्दल सगळी माहिती काढण्याचा आदेश दिला. वार्दीची माणसं लगेच कामाला लागली. मारवानची मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड, त्याला असलेली पैशांची चणचण, त्याचे आणि त्याच्या सासरच्या लोकांचे बिघडलेले संबंध वगैरे सगळ्या गोष्टी जेव्हा मोसादला समजल्या, तेव्हा त्यांनी एक संधी घेऊन बघायचं ठरवलं.
गोरेनने मारवानशी संपर्क साधला. तो कैरोमध्ये होता, पण प्रबंधातल्या काही चुका सुधारण्याच्या निमित्ताने तो परत लंडनला आला, आणि गोरेनला भेटला. त्याने गोरेनला सरळ सांगितलं, की इजिप्तच्या ६ दिवसांच्या युद्धात पराभव झाल्यामुळे तो निराश झाला होता, आणि हा पराभव नासरच्या धोरणांमुळे झाला त्यामुळे त्याला नासरच्या विरोधातली माहिती इझराईलला द्यायची होती. गोरेनने हे सगळं ऐकून घेतलं. पण मारवान हे काम फुकटात करणार नव्हता. त्याला प्रत्येक माहितीबद्दल १ लाख अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम हवी होती.
गोरेनने हे ऐकल्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तो मनातून हबकला होता. आजवर मोसादने एवढी मोठी रक्कम कुणालाही दिलेली नव्हती. त्याने मारवानला आधी काही गुप्त कागदपत्रं आणून दाखवायला सांगितली. यामागे मोसादचा तिहेरी हेतू होता. मारवान जसा दावा करतोय, त्याप्रमाणे तो खरोखरच गुप्त कागदपत्रं आणू शकतो का हे पडताळून पाहणं हा एक; तो इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेचा दुहेरी हेर नाही, हे पाहणं हा दुसरा आणि त्याला त्या कागदपत्रांबरोबर अडकवणं, जेणेकरून तो नंतर पलटला, तर त्याचा त्याच्याचविरुद्ध वापर करता येईल हा तिसरा.
मारवानने जास्त वेळ लावला नाही. २२ जानेवारी १९७० या दिवशी त्याने नासरची सोव्हिएत रशियाच्या लष्करी नेत्यांबरोबर मॉस्कोमध्ये झालेली जी बातचीत होती, त्याचा पूर्ण अहवाल मोसादकडे दिला. या बैठकीत नासरने रशियाकडे लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांची मागणी केलेली होती.
मोसाद विश्लेषकांचे डोळे ही माहिती पाहून नुसते चमकले नाहीत, तर पांढरे झाले. असं काही यापूर्वी त्यांच्याकडे आलेलं नव्हतं. मारवान हा दुहेरी हेर नाही हे आता स्पष्ट झालं होतं. झमीरने डुबीची मारवानबरोबर भेटणारा एजंट म्हणून नेमणूक केली, आणि लंडनमध्ये त्यांच्या भेटीसाठी एक घर विकत घेण्यात आलं. या घरात जी बातचीत होणार होती, ती रेकॉर्ड करण्यासाठी अद्ययावत उपकरणं बसवण्यात आली.
कधी भेटायचं, हे मारवान ठरवत असे. तो नियमितपणे डुबीला भेटत नसे. जेव्हा त्याच्याकडे सांगण्यासारखं काही असेल, तेव्हाच तो भेटायचा. हे मोसादला पसंत नव्हतं, पण ही मारवानची मागणी असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता. मारवानला स्त्रियांची आवड होती हे माहित असल्यामुळे डुबीने लंडनमधल्या कॉलगर्ल्सचं एक नेटवर्क तयार केलं होतं. या सगळ्या कॉलगर्ल्स ज्यू होत्या. जेव्हा मारवानला भेटायचं असे, तो या कॉलगर्ल्सपैकी एखादीला फोन करत असे. ती मग डुबीला ते कळवत असे. साधारण आपल्या प्रत्यक्ष भेटीच्या एक आठवडा नंतरची तारीख मारवान सांगत असे.
एक हेर म्हणून मारवान जी माहिती मोसादला पुरवत होता, ती पहिल्या दर्ज्याची होती. इजिप्त, इजिप्शीयन सैन्य, इतर अरब राष्ट्रांशी इजिप्तचे असलेले संबंध, इजिप्त-रशिया संबंध, या आणि इतर असंख्य विषयांवर मारवानने मोसादला माहिती दिली.
मारवान जरी डुबीशी संपर्क साधायचा, तरी त्याचं प्रत्यक्ष बोलणं कर्नल मायर मायर हे जरा विचित्र नाव असलेल्या अमान अधिकाऱ्याबरोबर व्हायचं. कर्नल मायर हा अमानच्या इजिप्शीयन सैन्य आणि त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करणाऱ्या विभागाचा प्रमुख होता.
२८ सप्टेंबर १९७० या दिवशी नासरचा मृत्यू झाला आणि त्याची जागा अन्वर सादातने घेतली. सादात हा नासरएवढ्या धडाडीचा माणूस नाही, असं मोसादमधल्या इजिप्त तज्ञांचं म्हणणं होतं. त्यांच्यामते तो युद्धाचा धोका पत्करण्याची संधी फार कमी होती. खुद्द इजिप्तमध्येही लोकांचं हेच मत होतं.
मारवानला मात्र वेगळा संशय येत होता. नासरच्या छायेतून बाहेर येण्यासाठी आणि आपली वेगळी ओळख आणि जरब सैन्यावर प्रस्थापित करण्यासाठी सादात इझराईलवर हल्ला करू शकतो, असं त्याचं मत होतं. त्यामुळे त्याने सादातच्या बरोबर राहायचं ठरवलं. सादातने त्याला आपल्या अगदी जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये जागा दिली.
मे १९७१ मध्ये सादातविरुद्ध इजिप्शीयन लष्कराच्या काही सोव्हिएतवादी अधिकाऱ्यांनी उठाव केला. मोसादला याची कुणकुण आधी लागली होती. त्यांनी मारवानला ही माहिती दिल्यावर मारवानने सादातला सावध केलं. या कटात इजिप्शीयन सरकारमधले अनेक महत्वाचे लोकही सहभागी झाले होते – माजी उपराष्ट्राध्यक्ष अली साबरी, माजी युद्धमंत्री महमूद फावझी, गृहमंत्री शारावी गुमा, आणि इतर बरेच लोक होते. सादात अलेक्झांड्रिया विद्यापीठाला भेट देत असताना त्याला ठार मारून सत्ता हस्तगत करायची त्यांची योजना होती. पण सादातला मिळालेल्या इशाऱ्यामुळे हे कट करणारे लोक पकडले गेले. त्यावेळी सादातच्या बाजूला अश्रफ मारवान ठामपणे उभा होता.
त्याची फळं त्याला मिळालीच. तो आता राष्ट्राध्यक्षांचा विशेष सल्लागार बनला होता. प्रसारमाध्यमांशी कशा प्रकारे वागायचं. यावर तो सादातला सल्ला देत असे. सादातच्या सर्व परदेश दौऱ्यांमध्ये आणि बैठकींमध्ये तो सहभागी होत होता.
जसजशी मारवानची सादातशी जवळीक वाढत गेली, तसतशी मोसादला त्याच्याकडून मिळणारी माहितीसुद्धा सुधारत गेली. १९७१ मध्ये सादातने मॉस्कोला अनेक फेऱ्या मारल्या आणि सोव्हिएत युनियनचे प्रमुख असलेल्या लिओनिद ब्रेझनेव्ह यांना एक भलीमोठी यादी दिली. या यादीवर असलेली शस्त्रास्त्रं त्याला इझराईलवर हल्ला करण्यासाठी हवी होती. या यादीत असलेलं एक नाव होतं मिग २५ विमानाचं. ही संपूर्ण यादी मारवानमुळे मोसादच्या हातात पडली. नुसती ही यादीच नव्हे, तर ब्रेझनेव्ह आणि सादात यांच्यात झालेल्या संभाषणाचा प्रत्येक शब्द मारवानने मोसादपर्यंत पोचवला.
मोसाद संचालक झमीर मारवानमुळे प्रचंड प्रभावित झाला होता. त्याने नियम मोडून मारवानची स्वतः भेट घेतली. तेव्हाच त्याला एक विलक्षण गोष्ट समजली. मोसाद ही फक्त एक गुप्तचर संघटना होती, जिला मारवान इजिप्तमधली माहिती पुरवत होता. त्याशिवाय अमेरिकेची सी.आय.ए., ब्रिटनची एम.आय.६ आणि इटालियन सिस्मी (SISMI) या सर्व गुप्तचर संस्थांकडून त्याला पैसे मिळत होते. हे सगळं निर्वेधपणे चालू होतं, कारण त्याने कधीही त्याला पैसे देणाऱ्या संघटनांच्या बातम्या एकमेकांना सांगितल्या नाहीत. योम किप्पूर युद्ध सुरु होण्याच्या वेळेस झमीरला लंडनला भेटण्याआधी मारवानने रोममध्ये जाऊन सिस्मीला तीच बातमी दिली होती.
त्याच्या या विलक्षण प्रकारांमुळे मोसादला एकदा फायदाही झाला होता. योम किप्पूर युद्धाच्या एक महिना आधी लीबियन सरकारने इजिप्तची मदत मागितली होती. लीबियाचा हुकूमशहा गद्दाफीची इझरेली विमानसेवा एल अॅलचं एक विमान पाडायची इच्छा होती. त्यासाठी तो पॅलेस्टिनी अतिरेक्यांची मदत घेणार होते. या अतिरेक्यांची या विमानाने रोमच्या विमानतळावरून उड्डाण केल्यावर ते उडवून द्यायची इच्छा होती.
हे करून गद्दाफीला इझराईलवर सूड उगवायचा होता. १९७३ च्या फेब्रुवारी महिन्यात सिनाईवरून उडणारं एक लीबियन नागरी विमान इझराईलच्या वायुदलाने गैरसमजातून पाडलं होतं. पॅलेस्टिनी दहशतवादी एका विमानाचं अपहरण करून, त्यात भरपूर स्फोटकं भरून ते इझराईलच्या एखाद्या मोठ्या शहरात भर वस्तीत कोसळवणार आहेत, अशी मोसादकडे माहिती होती. जेव्हा हे लीबियन झेंडा असलेलं विमान सिनाईवरून उडताना इझरेली वायुदलाच्या रडारवर दिसलं, तेव्हा वायुदलाने सर्वात आधी या विमानाला स्वतःची ओळख पटवून द्यायला सांगितलं. जेव्हा या विमानाच्या पायलटने तसं केलं नाही, तेव्हा वायुदलाच्या दोन लढाऊ विमानांनी या विमानाला घेरलं आणि ते जमिनीवर पाडण्यात आलं. इझरेली वायुदलाला असं वाटलं की हे तेच दहशतवाद्यांनी पाठवलेलं विमान आहे. प्रत्यक्षात ते नागरी विमान आहे, हे नंतर उघडकीस आलं. एका धुळीच्या वादळात सापडल्यामुळे हे विमान मार्ग भरकटून इकडे तिकडे फिरत होतं. जेव्हा इझरेली वायुदलाने या विमानाकडे संदेश पाठवला, तेव्हा त्याच्या पायलटला तो नीट समजलाच नाही. परिणामी १०८ निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
जेव्हा ही सगळी माहिती समोर आली, तेव्हा इझराईलने बिनशर्त माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली. पण गद्दाफीचं त्याने समाधान होण्यासारखं नव्हतं. अमीन अल हिंदी या फताहच्या कुख्यात दहशतवाद्याकडे एल अॅलचं विमान उडवण्याची कामगिरी सोपवण्यात आली. त्याच्या गटात ५ लोक होते. सादातने गद्दाफीला मदत करायचं ठरवलं आणि रशियन बनावटीची दोन स्त्रेला क्षेपणास्त्रं त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी अश्रफ मारवानवर सोपवली.
मारवानने या क्षेपणास्त्रांचे सुटे भाग राजनैतिक पत्रव्यवहाराचा भाग (diplomatic courier) म्हणून रोमला पाठवले. ते असे पाठवले, त्यामुळे त्यांची तपासणी झाली नाही. रोममध्ये त्याने हे सुटे भाग अमीन अल हिंदीपर्यंत पोचवण्यासाठी एक विचित्र पद्धत वापरली. तो आणि अल हिंदी एका गालिचे विकणाऱ्या प्रसिद्ध दुकानात गेले आणि दोन गालिचे विकत घेऊन त्यांनी ते सुटे भाग अतिरेक्यांच्या अड्ड्यापर्यंत पोचवले.
मारवानने या सगळ्या घडामोडी मोसादपर्यंत पोचवल्या होत्या, आणि त्यांनी सिस्मीच्या लोकांना सावध केलं होतं. त्यामुळे ६ सप्टेंबर या दिवशी इटालियन पोलिसांच्या स्पेशल युनिटने या अतिरेक्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली आणि क्षेपणास्त्रांचे सुटे भाग जप्त केले. सगळ्या दहशतवाद्यांनाही अटक झाली.
या घटनेनंतर एका महिन्याने योम किप्पूर युद्धाला सुरुवात झाली.
युद्ध संपल्यावरही मारवान सादातचा निकटवर्तीय होता. त्याने सादातची अनेक कामं केली. पण हळूहळू सादातवरचा त्याचा प्रभाव कमी व्हायला लागला. इझराईल आणि इजिप्त यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यावर तर इजिप्तमधून गुप्त माहिती मिळवण्याची मोसादला एवढी गरज राहिली नाही.
या सगळ्या गोष्टींमुळे मारवानने त्याची दुसरी कारकीर्द सुरु केली. इतकी वर्षे तो मोसादसह बाकीच्या गुप्तचर संघटनांकडून पैसे मिळवत होता. ते पैसे न उधळता त्याने अत्यंत काळजीपूर्वक गुंतवले होते. इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी एकत्र चालू केलेल्या अरब इंडस्ट्रीयल युनियनचा मारवान पहिला अध्यक्ष होता. या संस्थेच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणज शस्त्रास्त्रांचं उत्पादन. पुढे हा प्रकल्प बारगळला पण त्यामुळे मारवानच्या शस्त्रांच्या बाजारात अनेक ओळखी झाल्या. १९७९ मध्ये तो इजिप्शीयन सरकारमधून निवृत्त झाला आणि पॅरिसमध्ये स्थायिक झाला. पुढे १९८१ मध्ये सादातची हत्या झाल्यावर तो लंडनमध्ये गेला. तिथे त्याची दुसरी कारकीर्द – गुंतवणूकदाराची – अजूनच बहरली. त्याने चेल्सी फुटबॉल क्लबचा बराच मोठा हिस्सा विकत घेतला, आणि तोही इजिप्शीयन धनाढ्य मोहम्मद अल फायेदच्या नाकावर टिच्चून. त्याची आणि अल फायेदची स्पर्धा पुढेही चालू राहिली. जेव्हा अल फायेदने लंडनमधील प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर हॅरड्स विकत घेतलं, तेव्हा त्याच्या विरोधात बोली लावणाऱ्यांपैकी एक अश्रफ मारवानदेखील होता. अल फायेदचा मुलगा डोडी हा प्रिन्सेस डायनाचा प्रियकर होता. जेव्हा डोडी आणि डायना पॅरिसमध्ये एका अपघातात मारले गेले, तेव्हा मोसादला ही बातमी मारवानकडूनच कळली होती.
१९८० च्या दशकात मारवान दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करतो, असाही आरोप त्याच्यावर झाला होता, पण त्यात काही तथ्य नव्हतं. एकतर जगातल्या जवळपास सर्व दहशतवादी संघटनांना यासर अराफतच्या पी.एल.ओ. कडून मदत मिळत असे, आणि मोसाद आणि अराफत यांच्यामधून तेव्हा विस्तवही जात नव्हता. अराफतचा मानसपुत्र आणि इझरेली खेळाडूंचं १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये जे हत्याकांड झालं, त्याचा सूत्रधार असलेल्या अली हसन सलामेहला मोसादने ज्या पद्धतीने मारलं, त्यावरून जगभरातल्या अनेक दहशतवादाच्या सहानुभूतीदारांनी आणि समर्थकांनी योग्य तो धडा घेतला होता. मारवान जरी राजकारणातून निवृत्त झाला होता, तरी मोसादचं त्याच्यावर लक्ष होतं, आणि त्याने दहशतवाद्यांना मदत केली असती, तर मोसादने त्यालाही दयामाया दाखवली नसती, हेही तितकंच खरं होतं.
२१वं शतक सुरु झालं आणि मारवानचे ग्रह फिरले. २००२ मध्ये इझरेली इतिहासकार अहरॉन ब्रेगमान याने लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्याने ज्या हेराने इझराईलला योम किप्पूर युद्धाबद्दल सावधगिरीची सूचना दिली, त्या हेराचा उल्लेख जावई असा केलेला होता. ब्रेगमानने पुढे असंही म्हटलं होतं, की हा दुहेरी हेर होता, आणि त्याने इझराईलला चुकीची माहिती दिली होती.
ब्रेगमानच्या पुस्तकात मारवानचं नाव घेतलेलं नव्हतं. पण जावई या उल्लेखावरून त्याला काय म्हणायचंय हे पुरेसं स्पष्ट होत होतं. मारवान साहजिकच भडकला आणि त्याने इजिप्तमधल्या अल अहराम या प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ब्रेगमानवर तो मूर्ख आणि पोरकट असल्याचे आरोप केले.
ब्रेगमानही संतापला आणि त्याने अल अहरामला दिलेल्या मुलाखतीत हे जाहीरपणे सांगितलं, की त्याने जावई म्हणून उल्लेख केलेला माणूस अश्रफ मारवानच आहे. हे बोलणं २००४ पर्यंत कोणीही गंभीरपणे घेतलं नव्हतं, पण जेव्हा जनरल एली झाईराने अश्रफ मारवानचं नाव घेतलं, तेव्हा सत्य काय आहे, ते सगळ्यांसमोर आलं.
मोसादमध्ये आणि इझराईलमध्ये हलकल्लोळ माजला. एक तर असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं. कितीही मतभेद झाले असले, तरी कोणीही इझराईलच्या हेरांची ओळख अशी जाहीर केली नव्हती. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे मारवान अजूनही सार्वजनिक जीवनात वावरत होता. इजिप्त आणि इझराईल हे जरी आत्ता मित्र असले, तरी या गद्दारीबद्दल मारवानला इजिप्शीयन सरकार आणि इजिप्तची गुप्तचर संस्था माफ करतील असं समजणं हा वेडेपणा होता.
झमीरने या सगळ्या प्रकारानंतर मोसाद एजंट्सच्याद्वारे मारवानशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण मारवान दुखावला गेला होता. त्याने मोसादच्या एजंट्सना भेटायला नकार दिला.
त्याच वर्षी (२००४ मध्ये ) अजून एक घटना घडली. इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आणि अश्रफ मारवान एका व्यासपीठावर होते. गमाल अब्दुल नासरला श्रद्धांजली वाहण्यासाठी. मुबारकला जेव्हा पत्रकारांनी मारवान आणि त्याच्यावर ठेवलेल्या आरोपांविषयी विचारलं, तेव्हा त्याने मारवानने इझराईलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाचा पूर्ण इन्कार केला.
हे ऐकल्यावर मोसाद संचालक मायर डागानची प्रतिक्रिया बोलकी होती - इजिप्त का आज मान्य करेल, की त्यांच्या सरकारमधल्या कुणी आमच्यासाठी हेरगिरी केली होती?
झाईरा आणि त्याच्या पाठीराख्यांना मुबारकची प्रतिक्रिया म्हणजे आपला विजय झाल्यासारखं वाटलं. ते हे विसरले की इजिप्तचे नेते उघडपणे हे कधीच मान्य करणार नाहीत, की मारवानने इझराईलसाठी हेरगिरी केली होती. ते एकीकडे मारवान इजिप्तचा दुहेरी हेर होता, असंच म्हणणार पण दुसरीकडे त्यांनी मारवानला संपवायचा निर्णय घेतला असणार.
इझरेली सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने २००७ च्या जून महिन्यात आपला अहवाल दिला. १२ जून २००७ या दिवशी इझराईलच्या सर्वोच्च न्यायालयाने मोसाद संचालक झ्वी झमीरची बाजू खरी आहे हा निर्णय दिला. त्यानंतर दोनच आठवड्यांनी – २७ जून २००७ या दिवशी मारवानचा मृतदेह त्याच्या घराच्या खाली असलेल्या रस्त्यावर मिळाला. त्याला कुणीतरी मारहाण करून सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं होतं.
मोसादने इजिप्शीयन गुप्तचर संघटना मुखबारतवर मारवानची हत्या केल्याचा आरोप केला. त्यांचा रोख एली झाईरावरही होता. झाईरावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुरेसा पुरावा नसल्याच्या कारणावरून हा खटला रद्दबातल केला.
अश्रफ मारवानची पत्नी मूना मारवानने मोसादवर त्याला मारल्याचा आरोप केला, ज्यावर मोसादने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. स्कॉटलंड यार्डने अश्रफ मारवानच्या हत्येच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केलं होतं, पण कालांतराने हाही तपास थांबवण्यात आला.
एंजलचे खरे खुनी आजही इजिप्तमध्ये असावेत असा अंदाज आहे.
क्रमशः
संदर्भ -
1. Gideon's Spies - by Gordon Thomas
2. Mossad - the Greatest Missions of the Israeli Secret Service - by Michael Bar-Zohar and Nissim Mishal.
.
प्रतिक्रिया
7 Oct 2016 - 12:13 am | सही रे सई
अरेवा, चक्क मी पहिली.. भारी चालू आहे ही मालिका.
7 Oct 2016 - 12:39 am | मी-सौरभ
देर से हि सही मगर नायाब लिखा है
7 Oct 2016 - 12:55 am | सचु कुळकर्णी
हमेशा की तरह !
7 Oct 2016 - 1:08 am | सचु कुळकर्णी
जनरल एली झाईरा.
तिथे जनरल ला काय एव्हढि युगपुरुष होण्याची घाई झाली होती कि डीप असेट चे नावच जाहिर करून टाकले. आपण सुध्दा आपले कीत्येक डीप असेट अशाच दुरद्रूष्टि नसलेल्या किमान २ सर्वोच्च नेत्यांमुळे गमावलेत.
7 Oct 2016 - 9:03 am | नाखु
सत्तेचा असो की पदाचा मोह हा खरा कळीचा मुद्दा आहे. आताच्या बातम्याच पहा सत्तेविणा कशी तडफड चालली आहे ते.
सत्य थेट प्रमुखांकडूनच
बाकी लेखमालेतील या भागाला फार विलंब लावलात बोकेशा.
निस्सीम कट्टरता आणि सर्वोच्च देशभक्ती या गुणांमुळे मोसाद सगळ्यांपेक्षा प्रभावी आणि परिणामकारक असावी काय?
7 Oct 2016 - 1:12 am | अमितदादा
अतिशय आवडती लेख मालिका...उत्तम लेख.
7 Oct 2016 - 3:32 am | अभिजीत अवलिया
काही दिवसापूर्वी ही मालिका पूर्ण वाचून काढली. एकदम जबरदस्त.
अवांतर - बोकाशेठ तुम्ही सध्या मोसादचे प्रमुख नाही ना?
7 Oct 2016 - 5:12 am | damn
मोसादने एंजल ला मारण्याचे कारण काय??
व्हाट्स द मोटिव्ह?
आणि झाइरा कशाला मरत असलेल्याला किंवा नजीकच्या भविष्यात स्वतःच्या देशाच्या गुप्तचर खात्याकडून मरण्याची मोठी शक्यता असलेल्याला, मारून निवृत्ती(बडतर्फी) नंतर आपल्या हाताला रक्त लावून घेईल?
7 Oct 2016 - 8:07 am | एस
नॉट एव्हरीथिंग इज ऑल राईट इन इव्हन मोसाद.
7 Oct 2016 - 8:38 am | कैलासवासी सोन्याबापु
+१११११
सीम्स दॅट द होलीयर काऊ इज नॉट दॅट होलीयर आफ्टरऑल
7 Oct 2016 - 2:34 pm | नाखु
असे असले तरीही मोसाद आपला वचक आणि दरारा ठेऊन आहे/असावा का नाही?
7 Oct 2016 - 2:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
इथे नको चर्चा, बोकभाऊंच्या लेखनाला उगा गालबोट लागेल
8 Oct 2016 - 11:10 am | नाखु
सहमत
7 Oct 2016 - 8:24 am | vikrammadhav
आला रं बाबा एकदाचा !!!
आता वाचतो .....
7 Oct 2016 - 9:13 am | प्रचेतस
जबरदस्त....
7 Oct 2016 - 10:10 am | कविता१९७८
अरे वाह , वाचते.
7 Oct 2016 - 10:30 am | अनिरुद्ध प्रभू
बहुत आनंद जाहला......
7 Oct 2016 - 10:55 am | अनिरुद्ध.वैद्य
मस्त लेख अन जबरदस्त माहिती!!
7 Oct 2016 - 11:25 am | वरुण मोहिते
7 Oct 2016 - 12:33 pm | नया है वह
१ नंबर
7 Oct 2016 - 2:24 pm | वरुण मोहिते
हा भाग जरा उशिराने आला. तुम्ही जी संदर्भ म्हणून पुस्तकं दिली आहेत ती आधीच वाचली आहेत पण तुमच्या लेखन शैलीची बात वेगळी आहे. सगळे भाग वाचतोय . पुभाप्र .
7 Oct 2016 - 2:33 pm | खेडूत
झक्कास!
वाचतोय... अजून येउद्यात दादा!
7 Oct 2016 - 2:51 pm | तुषार काळभोर
थरारक!
(ह्म्म... 'जावयांवर' लक्ष्य ठेवायला हवे सरकारने)
7 Oct 2016 - 3:57 pm | पद्मावति
जबरदस्त!!!!
7 Oct 2016 - 5:28 pm | रघुनाथ.केरकर
खुप दिवस लावलेत राव.
7 Oct 2016 - 5:39 pm | सुखी
जबरी....
7 Oct 2016 - 6:18 pm | भम्पक
ग्रेट.....नेहेमीप्रमाणे हाही भाग रोचक. खरे तर बोकाभाऊंचा मोसादवर लेख आला कि पहिले मी तारीख पाहतो कारण बऱ्याचदा जुना लेख कोणीतरी नवागताने वाचून त्यावर उत्साहाने प्रतिक्रिया दिली असल्याने वर येतो. पण आज तारीख पहिली और हम तो खुश हो गया.....झकास कॉफीसहीत या लेखाचे रसपान केले. आणि क्रमशः वाचून तर अतिरेकी आनंद जाहला.
और आणे दो.....
बादवे....तुम्हीच झमीर तर नाही ना....?
7 Oct 2016 - 9:32 pm | अजया
जबरदस्त!
7 Oct 2016 - 9:55 pm | आनन्दिता
नेहमी प्रमाणेच अतिशय उत्कंठावर्धक लेखन!! पुढचा भाग टाकायला इतका वेळ घेऊ नका बोकेश
8 Oct 2016 - 4:43 pm | महासंग्राम
तुफान,जब्राट, भारी, एक नंबर, कैच्याकै भारी, थरारक लिखाण गाववाले....
खूप दिवसांनी लिहिलंत पण अत्युकृष्ट झालाय हा भाग
10 Oct 2016 - 12:09 pm | स्वाती दिनेश
आहे, ही मालिका फार छान सुरू आहे.
स्वाती
12 Oct 2016 - 2:56 pm | नरेश माने
मस्त आहे हा भाग सुध्दा. पुढील भाग लवकर येऊद्या.
13 Oct 2016 - 2:42 pm | भुमन्यु
फारच भारी... क्रमशः वाचुन आनंद झाला.
आता सुनबाई आणि सिस्मिच्या संबंधात विचार येऊन गेला... असो
14 Oct 2016 - 2:31 am | जुइ
मोसादची आणखीन एक थरारक हेर कथा वाचायला मिळाली.
14 Oct 2016 - 2:39 am | अ.वि
नेहमी प्रमाने जबरदस्त
+१०१
14 Oct 2016 - 9:35 am | यशोधरा
मस्त.
14 Oct 2016 - 11:37 am | साधा मुलगा
हा पण भाग अफलातून आहे.
एक निरीक्षण : मोसादच्या धाग्यावर बरेच वेळा नवीन ID कमेंटा टाकताना दिसतात.
मिपावर नवे सदस्य यायला या लेखमालेचा मोठा हातभार आहे असे दिसते.
15 Oct 2016 - 5:39 pm | शिद
जबराट आणि थरारक झालाय हा भाग देखील.
पुढचा भाग कृपया लवकर टाका ही आग्रहाची विनंती.
15 Oct 2016 - 5:56 pm | पैसा
जबरदस्त लिहिलंय! हेरांची अखेर बरेचदा अशी दुर्दैवीच होते.
15 Oct 2016 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय (म्हणजे पुर्वीही वाचतच होतो) म्हणुन ही पोच. :)
-दिलीप बिरुटे
15 Oct 2016 - 9:25 pm | स्वीट टॉकर
बोकाभाऊ,
Worth the wait असा प्रत्येक भाग असतो. चालू राहू द्या!
16 Oct 2016 - 12:16 am | कवितानागेश
जबरदस्त आहे हा सगळा प्रकार!
16 Oct 2016 - 10:01 am | जव्हेरगंज
मोसाद सारखी संघटना एंजलला का मारेल किंवा त्याचं नावतरी का उघड करेल हे काही कळलं नाही.
पण भारी चालू आहे!!!
16 Oct 2016 - 10:46 am | लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट
मोसादचे गुप्तहेर आहात का???? एवढी माहिती तर कदाचित त्यांच्या बऱ्याच गुप्तहेरांना पण ठाऊक नसावी
16 Oct 2016 - 11:46 am | वटवट
+१११११११११
16 Oct 2016 - 11:46 am | वटवट
हे अत्यंत जब्राट आहे....
प्रत्येक भाग असे डोळ्यासमोरून चित्रपटासारखे जात होते... जात आहेत...
हे क्रमशः कधीच संपू नये असे वाटत आहे... बहुतेक पहिल्यांदा...
तुमची जिद्द, लिहिण्याची सचोटी, शैली, अभ्यास सगळंच भारीएस्ट आहे....
बोकांचा एसी, फॅन, जनरेटर, बॅटरी, सेल..... सगळं सगळं झालोय आपण...
साष्टांग दंडवत...
16 Oct 2016 - 4:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त मालिकेतला जबरदस्त लेख ! पुभाप्र.
18 Oct 2016 - 11:41 pm | निओ
बोकाभाऊ तुमचे वाचन, लिखाण अफाट आहे...मस्त चालली आहे लेखमाला.
19 Oct 2016 - 12:05 pm | हकु
खत्तरनाक !!!
31 Oct 2016 - 5:17 pm | इरसाल कार्टं
१४ व भाग कधि येनार?
3 Feb 2017 - 4:58 pm | हकु
वाट बघतोय!
5 Apr 2017 - 12:33 am | बोका-ए-आझम
मोसाद - भाग १४