.
मोसाद - भाग ३
या सगळ्याची सुरुवात झाली होती, ती एका प्रेमप्रकरणातून. वर्ष होतं १९५६. अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्यातलं शीतयुद्ध ऐन भरात होतं. रशियाच्या अंकित राष्ट्रांमध्ये कम्युनिस्ट राजवटींनी अगदी व्यवस्थित पाय रोवले होते. या राष्ट्रांमधला एक महत्वाचा देश म्हणजे पोलंड. एडवर्ड ओखाब हा पोलिश कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. त्याची सेक्रेटरी होती ल्युसिया बरानोव्ह्स्की. ल्युसियाचा पती पोलंडचा उपपंतप्रधान होता आणि त्याच्या कामात तो दिवसभर व्यस्त असे. ल्युसियाला काम करण्याची तशी गरज नव्हती, पण घरी बसून कंटाळा यायचा म्हणून ती ओखाबची सेक्रेटरी बनली होती. अर्थात, तिच्या नवऱ्याच्या पदामुळे तिला तिथेही फारसं काम करायला लागत नव्हतं.
एका पार्टीमध्ये तिची गाठ व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीशी पडली. व्हिक्टर पोलिश न्यूज एजन्सीमध्ये वरिष्ठ संपादक होता. सोविएत रशिया आणि इतर पूर्व युरोपियन कम्युनिस्ट देश इथल्या घडामोडींवर तो लिहित असे. बहुश्रुत, बडबड्या, विनोदी व्हिक्टर ल्युसियाला पहिल्या भेटीतच आवडला. त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
व्हिक्टरचं खरं नाव होतं व्हिक्टर श्पीलमन. तो ज्यू होता. अनेक वर्षांपूर्वी तो जेव्हा पोलिश कम्युनिस्ट पक्षात भरती झाला होता, तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला आपलं नाव बदलायचा सल्ला दिला होता. नाझींप्रमाणे कट्टर आणि खुनशी ज्यूद्वेष जरी पोलंडमध्ये नसला, तरी तो होता, हेही तितकंच खरं होतं. श्पीलमन असं उघड ज्यू आडनाव असलेल्या व्हिक्टरला पोलिश कम्युनिस्ट पक्षात पुढे जाता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे त्याने आपलं आडनाव बदलून पोलिश वाटेल असं ग्रेव्ह्स्की हे आडनाव घेतलं होतं. ‘
सप्टेंबर १९३९ मध्ये नाझींनी पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला ‘ज्यू मुक्त ‘ बनवणं नाझींनी लगेचच सुरु केलं होतं. त्यापासून कसाबसा जीव वाचवून व्हिक्टर आणि त्याचं कुटुंब रशियामध्ये पळून गेले. युद्ध संपल्यावर ते पोलंडमध्ये परत आले. १९४९ मध्ये त्याचे आई-वडील आणि धाकटी बहिण इझराईलला निघून गेले, पण कडवा कम्युनिस्ट असलेला व्हिक्टर मात्र पोलंडमध्येच राहिला. स्टॅलिन हा व्हिक्टरचं दैवत होता. त्याच्या संकल्पनेप्रमाणे कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या स्वर्गाची निर्मिती करणं हे त्याला आपलं जीवितकार्य वाटत होतं.
पण हळूहळू त्याची ही विचारसरणी बदलायला लागली होती. पत्रकार असल्यामुळे जगातल्या घडामोडी तो बघत होता. कशा प्रकारे पोलंड आणि इतर पूर्व युरोपियन कम्युनिस्ट देशांमध्ये सरकारी दडपशाही चालू झालेली आहे आणि स्वतंत्र विचार मांडणारे लोक कसे कम्युनिस्ट प्रचारयंत्रणेच्या रोषाला बळी पडताहेत, ते त्याला दिसत होतं. तशातच १९५५ मध्ये त्याचे वडील आजारी होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी त्याला इझराईलला जायची संधी मिळाली. तिथलं आयुष्य बघून त्याला पोलंड आणि इतर कम्युनिस्ट देश आणि इझराईल यांच्यातला फरक जाणवला. तिथून पोलंडमध्ये परत आल्यावर त्याच्या मनात इझराईलमध्ये स्थायिक होण्याचे विचार घोळायला लागले.
अशा मनःस्थितीत असतानाच त्याची आणि ल्युसियाची भेट झाली होती. तिच्याबरोबरच्या प्रेमाला काय भवितव्य आहे, हे त्याला माहित होतं, पण ल्युसियाच्या भेटीचा मोहही सोडवत नव्हता. आजकाल तो तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्येही जात असे.
एप्रिल १९५६ मधल्या त्या दिवशी तो असाच तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेला होता. तिच्याशी गप्पा मारता मारता त्याची नजर तिथल्या एका लाल रंगाच्या फाईलवर पडली.
“काय आहे हे?” त्याने सहज विचारलं.
“हे? काही विशेष नाही. क्रुश्चेव्हचं भाषण आहे.” ती अगदी सहजपणे म्हणाली.
हे ऐकल्यावर व्हिक्टर हादरला. क्रुश्चेव्हच्या भाषणाबद्दल त्याने ऐकलं होतं पण अजूनपर्यंत त्या भाषणातलं एक वाक्यही त्याला कुठे वाचायला किंवा ऐकायला मिळालं नव्हतं, किंवा ते ऐकलेला किंवा वाचलेला कोणी माणूसही त्याला भेटला नव्हता. कम्युनिस्ट जगातल्या अत्यंत गुप्त रहस्यांपैकी होतं हे भाषण.
या भाषणामागची पार्श्वभूमी व्हिक्टरला माहित होती. १९५३ मध्ये स्टॅलिनचा मृत्यू झाला. नंतर त्याचा उजवा हात आणि केजीबीचा तत्कालीन प्रमुख लावरेन्ती बेरिया सत्ता काबीज करण्याची स्वप्नं पाहात होता. पण बेरियाविरुद्ध कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये संताप आणि तिरस्कार यांच्याशिवाय दुसरी भावना नव्हती. हे हेरून निकिता क्रुश्चेव्हने पॉलिटब्युरोमधल्या सदस्यांना बेरियाविरुद्ध फितवलं आणि बेरियाचा काटा काढून तो सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर संपूर्ण सोविएत युनियनमधला आणि पर्यायाने कम्युनिस्ट जगातला सर्वात सामर्थ्यशाली माणूस.
१९३० च्या दशकात स्टॅलिनने त्याला जे जे आव्हान देऊ शकतील अशा लोकांना मार्गातून बाजूला काढण्याची देशव्यापी मोहीम चालू केली होती. जे स्वतंत्र विचारांचे असतील, ज्यांनी पूर्वी कधी स्टॅलिनला अगदी क्षुल्लक मुद्द्यांवरून विरोध केलेला असेल, जे जनमत बदलू शकतील, अशा प्रत्येकाला एन.के.व्ही.डी. या गुप्तचर संघटनेच्या हस्तकांनी अटक करणं आणि त्यांच्यावर तथाकथित खटले चालवून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांच्या तीव्रतेप्रमाणे शिक्षा होणं हा १९३० च्या दशकातल्या सोविएत युनियनमधला दैनिक कार्यक्रम होता. या शिक्षा म्हणजे मृत्युदंड, तुरुंगवास, सक्तमजुरी यापैकी काहीही असायचं. त्यासाठी एन.के.व्ही.डी.ने खास छळछावण्या उभारल्या होत्या. या छावण्यांना ‘ गुलाग ‘ असं नाव होतं. सर्वसामान्य जनताही यात भरडून निघाली होती. १९४० मध्ये आपला कट्टर विरोधक लिऑन ट्रॉट्स्की याची हत्या स्टॅलिनने रेमन मर्कादर या मारेकऱ्याकरवी मेक्सिकोमध्ये घडवून आणली होती. १९४१ मध्ये नाझींचं आक्रमण झाल्यावरच हे दमनसत्र थांबलं होतं. पुढे युद्ध संपल्यावरही नाझींच्या ताब्यातल्या रशियन आणि इतर सोविएत युद्धकैद्यांना रशियन राजवटीने स्वीकारलं नव्हतं. स्टॅलिनने तर ‘ एकही देशभक्त सोविएत नागरिक हा युद्धकैदी नव्हता ’ असं जाहीर केलं होतं. अनेक युद्धकैद्यांना पुन्हा अटक करून गुलागमध्ये पाठवण्यात आलं होतं.
क्रुश्चेव्हने हे सगळे अत्याचार जवळून पाहिले होते. त्यांच्याविरुद्ध मत नोंदवलं तर आपलीही ट्रॉट्स्कीप्रमाणे गत होईल, हे त्याला कळून चुकलं होतं. त्यामुळे आपला राजकीय धूर्तपणा स्टॅलिनच्या किंवा त्याच्या निष्ठावंतांच्या नजरेत येणार नाही, याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. पण कम्युनिस्ट पक्षाचं सरचिटणीसपद मिळाल्यावर हे आजवर गुप्त राहिलेले अत्याचार सर्वांसमोर आणायचा त्याने निर्णय घेतला.
कम्युनिस्ट पक्षाची विसावी परिषद १९५६ च्या फेब्रुवारी महिन्यात क्रेमलिनमध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व सोविएत गणराज्यांमधल्या कम्युनिस्ट पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर देशांमधल्या कम्युनिस्ट पक्षांचे प्रतिनिधीही तिथे उपस्थित होते. २५ फेब्रुवारी या दिवशी, मध्यरात्रीच्या थोडं आधी सर्व परदेशी पाहुणे आणि प्रतिनिधींना सभागृहातून बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. जे रशियन प्रतिनिधी हॉटेलमध्ये परत गेले होते, त्यांना तिथून परत बोलावण्यात आलं. रात्री बाराच्या ठोक्याला क्रुश्चेव्हने भाषणाला सुरुवात केली आणि पुढचे चार तास तो तिथे जमलेल्या चौदाशे प्रतिनिधींसमोर अथकपणे बोलत होता.
त्याच्या भाषणातला एक शब्ददेखील पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रसारित झाला नव्हता, तरी एका अमेरिकन पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार असं समजलं होतं, की या भाषणामध्ये क्रुश्चेव्हने स्टॅलिनच्या चेहऱ्यावरचा बुरखा टराटरा फाडला होता. स्टॅलिन, स्टॅलिनवाद, स्टॅलिनने पद्धतशीरपणे निर्माण केलेला आणि जोपासलेला आपल्या व्यक्तिमत्वाचा ‘ कल्ट ’ या सगळ्यांच्या या भाषणात क्रुश्चेव्हने ठिकऱ्या उडवल्या होत्या. पद्धतशीर पुरावे देऊन स्टॅलिनने केलेली आणि त्याच्या राजवटीत झालेली असंख्य दुष्कृत्यं त्याने सर्वांसमोर मांडली होती. कशा प्रकारे लेनिनच्या मृत्युनंतर झिनोव्हिएव, कामेनेव्ह आणि बुखारीन यांच्या मदतीने स्टॅलिनने ट्रॉट्स्कीला एकाकी पाडलं, देश सोडून जायला भाग पाडलं, आणि नंतर या सगळ्यांना एकमेकांविरुद्ध झुंजवून सगळ्यांचा काटा काढला, याचं वर्णन क्रुश्चेव्हच्या तोंडून ऐकल्यावर सभागृह निःस्तब्ध झालं. नंतर त्याने अजून एक गौप्यस्फोट केला, तो म्हणजे खुद्द लेनिनची स्टॅलिन आपला उत्तराधिकारी व्हावा अशी इच्छा नव्हती. तसं लेनिनने लिहून ठेवलं होतं. आता सर्व प्रतिनिधी हतबुद्ध झाले, कारण १९२४ पासून, म्हणजे लेनिनचा मृत्यू झाल्यानंतर आपणच त्याच्या विचारसरणीचे खरे वारस आहोत हे स्टॅलिनने अत्यंत पद्धतशीरपणे सर्वांच्या मनावर बिंबवलं होतं. या गौप्यस्फोटाचा परिणाम जबरदस्त होता. दोन प्रतिनिधींना सभागृहातच हृदयविकाराचा झटका आला. काही प्रतिनिधींनी भाषण संपल्यावर हॉटेलवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इतके दिवस, इतकी वर्षे मनाशी बाळगलेला विश्वास इतका तकलादू आणि कचकड्याचा ठरल्यावर कम्युनिस्ट जग मुळापासून हादरलेलं असणार हे उघड होतं.
केजीबीच्या यंत्रणेने आपली सगळी ताकद पणाला लावून हे भाषण कम्युनिस्ट जगाच्या बाहेर पडू दिलं नव्हतं. त्यातले थोडे मुद्दे बाहेर आले होते आणि काहींवर चर्चा वगैरे झाल्या होत्या, पण संपूर्ण भाषणाचा मसुदा केजीबीने यशस्वीरीत्या दडपला होता. सी.आय.ए. आणि एम.आय.६ या केजीबीच्या प्रतिस्पर्धी गुप्तचर संघटनांनी आपापल्या परीने या भाषणाचा मसुदा किंवा त्याच्याबद्दल जी मिळेल ती माहिती मिळवण्यासाठी जंग जंग पछाडायला सुरुवात केलेली होती. सी.आय.ए. ने तर त्याच्यासाठी अनौपचारिकरीत्या दहा लाख डॉलर्स एवढं प्रचंड इनाम ठेवलं होतं. त्या वेळी सी.आय.ए. चा संचालक असलेला अॅलन डलेस हा कट्टर कम्युनिस्टविरोधी होता. सोविएत रशियाची नाचक्की होईल अशी एकही संधी सोडायला तो तयार नसायचा. हे भाषण जर लोकांपुढे आलं तर संपूर्ण कम्युनिस्ट जगात आणि त्याच्याबाहेरही भूकंप झाला असता, स्टॅलिनवर वेडी भक्ती करणाऱ्या लोकांच्या श्रद्धेचा चक्काचूर झाला असता, आणि त्याचा सरळसरळ परिणाम सोविएत रशियाच्या पतनात होऊ शकला असता – ही डलेसची अटकळ होती.
पण अजूनतरी हे भाषण मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते.
व्हिक्टरच्या कानांवर उडत उडत बातमी आली होती, की ज्या दिवशी क्रुश्चेव्हने हे भाषण दिलं, त्याच्या आधी सर्व परकीय कम्युनिस्ट सदस्यांना निघून जायला सांगण्यात आल्यामुळे हे कम्युनिस्ट सदस्य वैतागलेले होते. सोविएत रशियाचा जर आमच्या राज्यकारभारात हस्तक्षेप असतो, तर एवढ्या महत्वाच्या घटनेच्या वेळी आम्हाला जाणूनबुजून का डावलण्यात आलं, हा प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यांच्यातला हा असंतोष अजून पसरू नये, म्हणून केजीबीने या भाषणाच्या काही प्रती इतर कम्युनिस्ट देशांमध्ये पाठवल्या होत्या, पण त्या अगदी उच्चपदस्थ व्यक्तींनाच बघायला मिळाल्या होत्या. ल्युसियाचा नवरा पोलंडचा उपपंतप्रधान आणि तिचा बॉस तिथल्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस असल्यामुळे तिला त्या भाषणाची एक प्रत मिळाली होती, आणि व्हिक्टर आता त्याच प्रतीकडे बघत होता.
ती प्रत पाहिल्यावर व्हिक्टरच्या डोक्यात एक अचाट कल्पना आली. त्याने ल्युसियाकडे ती प्रत दोन-तीन तास वाचण्यासाठी मागून घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिलाही त्यात काही वावगं वाटलं नाही. त्याला आनंद वाटेल अशी कुठलीही गोष्ट करण्याची तिची तयारी होती, “संध्याकाळी चारच्या आत परत आणून दे,” ती म्हणाली,
“ऑफिस बंद करताना मला ती परत तिजोरीमध्ये बंद करून ठेवावी लागेल.”
घरी जाऊन व्हिक्टरने संपूर्ण भाषण वाचून काढलं. त्याला रशियन भाषा चांगली अवगत होती. भाषण वाचून तो निःस्तब्ध झाला. स्टॅलिन, त्याची राक्षसी महत्वाकांक्षा, त्यापायी त्याने घडवलेलं हत्याकांड आणि दमनसत्र या सगळ्यांवर क्रुश्चेव्हने घणाघाती प्रहार केले होते. जवळजवळ दहा लाख लोकांना या दमनसत्रात अटक झाली होती आणि त्यातल्या ६,८०,००० लोकांना ठार मारण्यात आलेलं होतं. बाकीचे लोक गुलागमध्ये खितपत पडले होते. ठार मारल्या गेलेल्यांमध्ये ८४८ लोक कम्युनिस्ट पक्षाच्या कॉंग्रेसचे सदस्य होते. त्यांना कॉंग्रेसच्या बैठकीमधून बाहेर पडल्यावर अटक करून सरळ तुरुंगात नेऊन मारण्यात आलं होतं. पक्षाच्या केंद्रीय समितीमधल्या १३८ पैकी ९८ जणांना स्टॅलिनच्या थेट आदेशांवरून मारण्यात आलं होतं. सर्वात कहर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर स्टॅलिनने विजयाचं सगळं श्रेय स्वतः घेतलं पण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचं एक साधं स्मारकही रशियामध्ये कुठेही उभारलं नव्हतं. (Russkiy Soldat किंवा Russian Soldier या नावाने प्रसिद्ध असलेलं हे स्मारक क्रुश्चेव्हच्या कारकीर्दीत उभारण्यात आलं.)
व्हिक्टरच्या मनात कम्युनिस्ट तत्वज्ञान आणि राजवट यांच्याविषयी शिल्लक असलेली थोडीफार आत्मीयता हे भाषण वाचून पूर्णपणे निघून गेली, आणि आपल्या मनात आलेल्या कल्पनेवर काम करायचं त्याने ठरवलं.
सर्व कम्युनिस्ट देशांमध्ये पोलंड हा नागरिकांवर त्यातल्या त्यात कमी बंधनं असलेला देश होता. पोलंडमधून अनेक ज्यू त्यावेळी इझराईलमध्ये स्थायिक होण्यासाठी जात असत. या लोकांना इझराईलच्या वकिलातीत एक हस्तलिखित अर्ज नेऊन द्यावा लागत असे. व्हिक्टरने भराभर असा अर्ज खरडला आणि तो घेऊन तो इझराईलच्या वकिलातीत गेला. तिथे बाहेर उभ्या असलेल्या पोलिश सैनिकांनी त्याच्या हातातला अर्ज पाहिल्यावर काही हरकत न घेता त्याला आत जाऊ दिलं. क्रुश्चेव्हच्या भाषणाची प्रत व्हिक्टरने आपल्या शर्टाच्या आत लपवली होती.
आत गेल्यावर व्हिक्टर याकोव्ह बार्मर नावाच्या माणसाला भेटला. बार्मर अधिकृतरीत्या जरी फर्स्ट सेक्रेटरी असला, तरी प्रत्यक्षात तो इझरेली प्रतिहेरसंघटना शिनबेतचा (किंवा शाबाक – ही संघटना या दोन्ही नावांनी ओळखली जाते) पोलंडमधला प्रतिनिधी होता.
बार्मरच्या हातात व्हिक्टरने भाषणाची प्रत दिली. पहिलं पान वाचल्यावरच बार्मरचे डोळे विस्फारले. त्याने व्हिक्टरला थोडं थांबायला सांगितलं आणि तो खोलीबाहेर पडला. एक तासाने तो परत आला, आणि त्याने ती प्रत व्हिक्टरला परत दिली. त्याने ती फोटोकॉपी करून घेतली असणार हे व्हिक्टरच्या लक्षात आलं. ती प्रत जशी आणली होती तशीच त्याने ती आपल्या कपड्यांत लपवली आणि तो वकिलातीबाहेर पडला. बाहेर कोणीही त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही. चार वाजायच्या आत ल्युसियाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने तिला ती प्रत परत दिली. देताना अर्थातच आपले बोटांचे ठसे त्याच्यावर नाहीयेत याची काळजी त्याने घेतली होती.
इकडे १३ एप्रिल १९५६ या दिवशी तेल अवीवमधल्या शाबाकच्या ऑफिसमध्ये शाबाकचा संचालक अमोस मॅनॉर आपल्या ऑफिसमध्ये बसला होता, तेव्हा त्याचा सहाय्यक झेलीग कात्झ याने त्याच्यासमोर क्रुश्चेव्हच्या भाषणाची प्रत ठेवली. कात्झला त्यात काय माहिती आहे आणि ती किती स्फोटक आहे, याविषयी काहीही कल्पना नव्हती. मॅनॉरने जेव्हा ते भाषण वाचलं तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने तडक मोसाद संचालक इसेर हॅरेलला फोन केला.
मॅनॉर आणि हॅरेल हे त्यावेळी इझराईलच्या गुप्तचर संघटनांमधले चमकते तारे होते. मॅनॉरचा जन्म रोमानियामध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्याचं खरं नाव होतं आर्थर मेंडेलोव्हीच. त्याच्या डोळ्यांदेखत त्याचं संपूर्ण कुटुंब – आई, वडील, धाकटी बहीण आणि दोन मोठे भाऊ – ऑशविट्झमध्ये मारलं गेलं होतं. जानेवारी १९४५ मध्ये जेव्हा सोविएत सैनिकांनी ऑशविट्झ मुक्त केलं, त्यावेळी तिथे उरलेल्या काही कैद्यांमध्ये तोही होता. बुखारेस्टमध्ये परत गेल्यावर त्याने आलिया बेथ या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली. मुख्य काम म्हणजे रोमानियामधल्या ज्यूंना त्यावेळी पॅलेस्टाईनचे राज्यकर्ते असणाऱ्या ब्रिटीशांची नजर चुकवून पॅलेस्टाईनमध्ये पोहोचवणं. त्यावेळी ब्रिटीशांच्या नजरेत न येण्यासाठी त्याने अमोस हे नाव घेतलं. अर्थात हे काही त्याचं एकमेव नाव नव्हतं. जेव्हा त्याची स्वतःची इझराईलला जाण्याची वेळ आली तेव्हा रोमानियन पोलिसांनी त्याला जाऊ दिलं नाही. त्यांच्या अटकेतून तो निसटला आणि एका खोट्या झेक पासपोर्टवर त्याने इझराईलमध्ये प्रवेश केला. तो १९४९ मध्ये इझराईलमध्ये आला, तेव्हा रूव्हेन शिलोह मोसादचा आणि इसेर हॅरेल शाबाकचा संचालक होते. हॅरेलनेच त्याची नेमणूक शाबाकमध्ये केली आणि नंतर १९५२ मध्ये शिलोहने राजीनामा दिल्यावर जेव्हा हॅरेल मोसादचा प्रमुख झाला तेव्हा शाबाकच्या प्रमुखपदी त्याने मॅनॉरची निवड केली.
मॅनॉरच्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये इतर मित्रदेशांच्या गुप्तचर संघटनांशी संबंध वाढवून इझराईलसाठी माहिती मिळवणं ही एक मोठी जबाबदारी होती. सी.आय.ए.चे क्रुश्चेव्हचं भाषण मिळवण्यासाठी चाललेले प्रयत्न त्याला माहित होतेच. तो आणि हॅरेल या भाषणाची प्रत घेऊन सरळ पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनना भेटले. त्यांनाही रशियन भाषा येत होती. त्यामुळे हे भाषण किती स्फोटक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पण या भाषणाचं करायचं काय, याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम होता.
अखेरीस हॅरेलने निर्णय घेतला. सी.आय.ए. संचालक अॅलन डलेसच्या कम्युनिस्टविरोधी भावना त्याला माहित होत्याच. त्यावेळी मोसाद आणि सी.आय.ए. यांच्यात अगदी मर्यादित स्वरूपाचं सहकार्य होतं. १९५१ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान बेन गुरियन तत्कालीन सी.आय.ए. संचालक वॉल्टर बेडेल स्मिथला भेटले होते, आणि त्यांनी हे सहकार्य स्थापित केलं होतं. यानुसार सोविएत रशिया किंवा इतर कम्युनिस्ट देशांमधून इझराईलमध्ये येणाऱ्या ज्यूंकडून माहिती मिळवणं आणि ती सी.आय.ए.ला देणं हे प्रमुख काम होतं. या ज्यूंमध्ये अनेक जण सैन्यात काम केलेले होते. काहीजण तंत्रज्ञ आणि अभियंते होते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे सी.आय.ए.ला कम्युनिस्ट देशांच्या सैन्याविषयी आणि त्यांच्या एकूण तयारीविषयी चांगला अंदाज बांधता येत होता.
पण अजूनही सी.आय.ए.च्या दृष्टीने मोसाद म्हणजे एका छोट्या देशाची फारशी महत्व न देण्याजोगी संघटना होती. हॅरेलला ही परिस्थिती बदलायची होती आणि आता तसं करण्याची संधी मिळाली होती. बेडेल स्मिथ आणि त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेले हॅरी ट्रुमन यांचं रशियाविषयी असलेलं धोरण हे अगदी बोटचेपं जरी नसलं, तरी ते तेवढं आक्रमकही नव्हतं. पण नंतर राष्ट्राध्यक्ष झालेले ड्वाइट आयझेनहॉवर आणि सी.आय.ए. संचालक अॅलन डलेस हे वेगळेच होते. आयझेनहॉवर दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपमधल्या सेनांचे सरसेनापती होते. त्यावेळी पूर्व युरोपियन देशांना सोविएत तावडीतून वाचवण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या सेनांनी जर्मनीच्या पूर्व भागात चढाई करणं गरजेचं आहे, असं त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या रूझवेल्टना निक्षून सांगितलं होतं. त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांचाही पाठिंबा होता. पण स्टॅलिनला दुखवायला तयार नसलेल्या रूझवेल्टनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यामुळे पूर्व युरोप सोविएत टाचांखाली आला. याचा राग आयझेनहॉवर यांच्या मनात होताच. म्हणून तर त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक रूझवेल्ट यांच्या विरोधी असलेल्या रिपब्लिकन पक्षातर्फे लढवली होती. डलेसचा कम्युनिस्ट द्वेष तर प्रसिद्ध होताच.
या सगळ्या पार्श्वभूमीचा वापर आपल्याला मोसादची प्रतिमा उंचावण्यासाठी करून घेता येईल याची हॅरेलला खात्री होती. त्यामुळे मोसादने सी.आय.ए.च्या तेल अवीवमधल्या प्रतिनिधीला काहीही न सांगता या भाषणाची अजून एक प्रत मोसादचा वॉशिंग्टन डी.सी. मधला प्रतिनिधी असलेल्या इझ्झी दोरोतला पाठवली. दोरोतने ती सी.आय.ए.मधल्या प्रतिहेरखात्याचा प्रमुख जेम्स अँगलटनला दिली. १७ एप्रिल १९५६ या दिवशी सी.आय.ए. संचालक डलेस आणि राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी ती पाहिली.
सी.आय.ए.मधल्या दुढ्ढाचार्यांना इझराईलसारख्या एका ‘ छोट्या ‘ देशाच्या, त्यांच्या एखाद्या डिपार्टमेंटएवढं बजेट असणाऱ्या मोसादने तोंडात बोटं घालायला लावली होती. अर्थात हे भाषण मोसादकडे येण्यात मोसादचं काहीच कर्तृत्व नव्हतं, पण त्यांनी त्या संधीचा वापर फार हुशारीने करून घेतला, हेही तितकंच खरं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मोसादची प्रतिमा इतर मित्र देशांच्या गुप्तचर संस्थांमध्ये प्रचंड प्रमाणात उंचावली.
सी.आय.ए.ने तरीही हे भाषण सरळसरळ स्वीकारलं नाही. त्यांनी आपल्या अनेक सूत्रांकडून त्याच्या सत्यतेची खात्री करून घेतली आणि मग ५ जून १९५६ या दिवशी न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर हे भाषण छापलं गेलं. अपेक्षेप्रमाणेच त्याच्यामुळे कम्युनिस्ट जगात आणि जिथे जिथे कम्युनिस्ट प्रभावशाली होते, तिथे राजकीय भूकंप झाला. सोविएत युनियन, स्टॅलिन आणि एकूणच कम्युनिस्ट विचारसरणी यांच्यापासून अनेक लोकांनी फारकत घ्यायला, निदान आंधळा विश्वास न ठेवता प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेक इतिहासकारांच्या मते पोलंड आणि हंगेरी इथे १९५६ च्या शेवटी झालेले सोविएतविरोधी उठाव आणि नंतर १९६८ मध्ये झेकोस्लोव्हाकियामध्ये झालेलं सोविएतविरोधी आंदोलन यांच्यामागे या भाषणाच्या प्रकाशित होण्याचा बराच हात होता. प्रत्यक्षात सोविएत युनियनचं पतन अजून ३५ वर्षांनी, १९९१ मध्ये झालेलं असलं, तरी इतिहासकारांच्या मते १९५६ मध्ये क्रुश्चेव्हने केलेल्या भाषणाने त्याची अंशतः सुरुवात झाली होती. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी स्वतःवरचा या भाषणाचा प्रभाव एका मुलाखतीत मान्य केला होताच.
इकडे वॉर्सामध्ये व्हिक्टरला पोलंड सोडून इझराईलला जाण्याची परवानगी मिळाली. त्याने एप्रिल १९५६ मध्ये अर्ज केला होता, आणि त्याला जानेवारी १९५७ मध्ये, बरीच लवकर ही परवानगी मिळाली. याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, कुणीतरी चक्रं फिरवलेली आहेत, आणि हे कुणीतरी मोसाद असण्याची शक्यता फार कमी आहे अशी व्हिक्टरची अटकळ होती. ती फार मजेशीररीत्या खरी ठरली.
इझराईलमध्ये आल्यावर व्हिक्टरला अमोस मॅनॉरच्या शिफारशीने परराष्ट्र खात्यात नोकरी मिळाली. त्यानंतर त्याला कोल इझराईल या इझराईलच्या सरकारी आकाशवाणीमध्ये पोलिश भाषेतल्या कार्यक्रमांचा निर्माता म्हणूनही काम मिळालं. या दोन नोकऱ्या व्हिक्टरच्या दिवसाचा बराचसा वेळ घेत होत्या. तेवढ्यात त्याला एक तिसरं – काहीसं अपेक्षित, बरंचसं अनपेक्षित – असं काम मिळालं.
इझराईलमध्ये अगदी सुरुवातीपासून ज्यूंच्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालू होते. अनेक ज्यू नागरिकांना हिब्रू भाषा येत नसे. त्यांच्यासाठी उल्पान ही हिब्रू भाषा शिकवणारी संस्था होती. ती कागदोपत्री जरी इझराईलच्या शिक्षण खात्याने चालू केली होती, तरी तिच्या शिक्षकवर्गापैकी निम्मे तरी लोक मोसादमध्ये काम करायचे. त्याचं एक कारण म्हणजे इथे हिब्रू शिकायला येणाऱ्या लोकांमध्ये रशियन आणि इतर पूर्व युरोपियन लोकांचा समावेश होता. व्हिक्टर इथे विद्यार्थी म्हणून हिब्रू भाषा शिकत होता.
एक दिवस, तास संपल्यावर तेल अवीवच्या गजबजलेल्या रस्त्यावर व्हिक्टरला एका सहाध्यायी विद्यार्थ्याने गाठलं. तो रशियन वकिलातीत काम करत होता. त्याने व्हिक्टरला त्याच्या कम्युनिस्ट भूतकाळाची आठवण करून दिली आणि भेटीच्या शेवटी केजीबीसाठी हेरगिरी करायची ऑफर दिली. व्हिक्टरला आता आपल्या अर्जावर एवढं लवकर काम कसं झालं, हे समजलं. त्याला इझराईलला पाठवण्यामागे केजीबीचा हात होता.
लगेचच हो न म्हणता व्हिक्टरने थोडी मुदत मागून घेतली आणि अमोस मॅनॉरशी संपर्क साधला. ही सगळी घटना ऐकल्यावर मॅनॉरला हसू आवरेना. “ वा वा ! हो म्हणून सांग त्याला !” कसंबसं स्वतःला सावरत तो म्हणाला. व्हिक्टरने त्या सहाध्यायी विद्यार्थ्याला दोन दिवसांनी होकार कळवला आणि मोसादच्या, किंबहुना हेरगिरीच्या इतिहासातल्या एका सर्वात यशस्वी डबल एजंटच्या कामगिरीला सुरुवात झाली.
अत्यंत काळजीपूर्वक मोसादच्या लोकांनी बनवलेली माहिती व्हिक्टर केजीबीच्या हेरांच्या हातात देत असे. त्याच्याकडून माहिती घेणारे केजीबी हेर त्याला इझराईलमधल्या इतर शहरांतसुद्धा बोलवत असत आणि व्हिक्टर विनातक्रार जात असे. त्याचे केजीबीमधले मित्र त्याला शक्यतो गर्दीच्या ठिकाणी भेटत असत. त्या गर्दीमध्ये बहुसंख्य लोक हे मोसादचे एजंट्स असायचे हे मात्र केजीबीला पुढची अनेक वर्षे समजलं नाही. व्हिक्टरकडून मिळणारी माहिती खोटी, मुद्दामहून मसाला घातलेली किंवा सरळसरळ बनावट असू शकेल अशी पुसटशीसुद्धा शक्यता केजीबीच्या लोकांना आली नाही. एकदाही त्यांनी त्याने पाठवलेल्या माहितीबद्दल शंका घेतली नाही.
एकच अपवाद म्हणजे १९६७ मध्ये इझराईल आणि इतर अरब देशांमध्ये झडलेल्या ‘ ६ दिवसांच्या युद्धाच्या ‘ वेळचा. त्यावेळी व्हिक्टरने पाठवलेल्या माहितीकडे केजीबीने दुर्लक्ष केलं. सर्वात मजेची गोष्ट ही, की नेमकी याच वेळी व्हिक्टरने अगदी खरी माहिती पाठवलेली होती.
त्यावेळी, इझराईल आणि इजिप्त एकमेकांची ताकद आजमावत होते. इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासरचा इझराईल सीरियावर मे महिन्यात हल्ला करेल असा अंदाज होता. सीरिया म्हणजे इझराईलच्या ईशान्येला. परिणामी इझराईलची दक्षिण सीमा म्हणजे नेगेव्ह वाळवंट कमजोर होईल आणि तिथून आपल्याला हल्ला करता येईल अशी खूणगाठ बांधून नासरने नेगेव्हच्या जवळ असलेल्या सिनाई द्वीपकल्पात (आशिया आणि आफ्रिका यांना जोडणारा त्रिकोणी प्रदेश) सैन्य जमवायला सुरुवात केली, तिथे असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांना हाकलून दिलं, तांबड्या समुद्रातून इझरेली जहाजांना जायला मनाई केली आणि इझराईलला आव्हान दिलं. इकडे इझराईलचा इजिप्तशी युद्ध करण्याचा काहीही इरादा नव्हता. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या लेव्ही एश्कोल यांनी मोसादला सोविएत रशियाला इझराईलचा हेतू कळवायची सूचना केली. त्यावेळी सोविएत रशिया आणि इजिप्त हे एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र होते. इजिप्तच्या सैनिकांकडे असलेल्या बंदुका, त्यातल्या गोळ्या, विमानं, रणगाडे वगैरे सगळी मदत ही रशियाने दिलेली होती. त्यामुळे जर रशियाला इझराईलची भूमिका पटली, तर रशिया इजिप्तवर दबाव आणेल, अशी पंतप्रधान एश्कोलना खात्री वाटत होती. हीच माहिती व्हिक्टरने त्याच्या केजीबीमधल्या ‘ मित्रांना ‘ कळवली होती.
पण सोविएत नेत्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नासरला थांबवण्याऐवजी त्याला अजून उकसवायला सुरुवात केली.
इजिप्तची सिनाईमधून नेगेव्हमध्ये घुसखोरी करण्याची योजना आहे, हे लक्षात येताच इझराईलने इजिप्तवर प्रतिहल्ला चढवला आणि अवघ्या सहा दिवसांत इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या तिन्ही देशांच्या सैन्यदलांना गुडघे टेकायला भाग पाडलं. दक्षिणेला सिनाई, ईशान्येला गोलन टेकड्या आणि पूर्वेला जेरुसलेम इथपर्यंत इझराईलच्या सीमा विस्तारल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सोविएत शस्त्रास्त्रं इझरेली सैनिकांनी आणि वैमानिकांनी कुचकामी ठरवली. त्यामुळे इजिप्त आणि सीरिया यांचे रशियाबरोबर असलेले संबंध बिघडले आणि मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत रशिया पाय रोवू शकेल ही अमेरिकेची भीती दूर झाली.
इकडे व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीवर याचा अगदी उलट परिणाम झाला. त्याने दिलेली माहिती खरी असल्याचं जेव्हा केजीबीच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याचा सत्कार करायचं ठरवलं. इझराईलच्या मध्य भागात असलेल्या एका अभयारण्यात तो त्याच्या केजीबी कंट्रोलरला भेटला. या कंट्रोलरने त्याला एका पदकाचा फोटो दाखवला. “तू जेव्हा शेवटी मॉस्कोला येशील, तेव्हा केजीबी प्रमुख स्वतः हे पदक तुला बक्षीस देतील.” तो म्हणाला.
१९७१ मध्ये व्हिक्टरने हेरगिरीमधून निवृत्ती स्वीकारली. केजीबीच्या लोकांना त्याचा हा निर्णय स्वीकारणं थोडं जड गेलं, पण व्हिक्टर आपल्या निर्णयावर ठाम होता. वयोमानामुळे आता हे झेपत नाही असं कारण त्याने केजीबीला सांगितलं. निवृत्तीनंतर तो मोसादसाठी भाषांतर आणि विश्लेषण हे काम करत होता.
केजीबीच्या पदकाच्या प्रसंगानंतर ४० वर्षांनी – २००७ मध्ये शाबाकचा तत्कालीन प्रमुख युवाल दिस्किनच्या हस्ते व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीचा त्याने केलेल्या इझराईलच्या सेवेबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात व्हिक्टरने केजीबीच्या या पदकाचा उल्लेख केला तेव्हा श्रोत्यांना हसू आवरलं नाही.
स्वदेश आणि शत्रूदेश अशा दोघांनी जबरदस्त कामगिरीसाठी पदक देऊन गौरव केलेला व्हिक्टर ग्रेव्ह्स्की हा बहुधा जगातला एकमेव हेर असावा.
क्रमशः
संदर्भ -
Mossad - The Greatest Missions of the Israeli Secret Service -
by Michael Bar Zohar & Nissim Mishal
The History of Mossad - by Antonella Colonna Vilasi
Gideon's Spies - by Gordon Thomas
प्रतिक्रिया
30 Dec 2015 - 1:34 am | डॉ सुहास म्हात्रे
हा भागही जबरदस्त झालाय ! रम्य त्या हेरकथा !
30 Dec 2015 - 1:49 am | होबासराव
हा भागही जबरदस्त झालाय
30 Dec 2015 - 2:00 am | राघवेंद्र
हा भाग अतिशय आवडला.
30 Dec 2015 - 7:12 am | सौन्दर्य
रोजच मिपावर येऊन तिसरा भाग प्रसिध्द झाला की नाही हे पाहत होतो. आज वाचायला मिळाला. एकदम मस्त माहिती. छान आणि अभ्यासपूर्ण लेख.
30 Dec 2015 - 8:32 am | अजया
काय महान डबल एजंट तो! जबरदस्त जमून आलाय हा भाग पण.बोक्या ,तू वाचकांना हावरट बनवतो आहेस ! पुभालटा!!
30 Dec 2015 - 12:17 pm | रुस्तम
बाडीस
30 Dec 2015 - 9:11 am | कैलासवासी सोन्याबापु
एकच नंबर!!! काय अतरंगी माणसे होती देवा
30 Dec 2015 - 9:31 am | मन१
वाचतोय.
मालिका आवडते आहे.
पुभाप्र.
दुसर्या महायुद्धात अशाच एका प्राण्याला हेरगिरीबद्दल ब्रिटनचे आणि नाझी जर्मनीचे सर्वोच्च मेडल
मिळाले. ( नाझी जर्मनीकडून Iron Cross आणि ब्रिटनकडून Member of the Order of the British Empire
)
हे म्हणजे एकाचवेळी भारताकडून एखादं सर्वोच्च शौर्यपदक आणि पाकिस्तानकडून निशान-ए-पाकिस्तान वगैरे स्टाइलचा सर्वोच्च अॅवॉर्ड मिळवण्यासारखं आहे.
त्याच्याबद्दल अधिक :-
http://www.misalpav.com/node/25241
.
.
http://www.misalpav.com/node/25242
30 Dec 2015 - 9:36 am | खेडूत
सुंदर!
हाही भाग आवडला.
30 Dec 2015 - 9:40 am | पगला गजोधर
कम्युनिस्ट पक्षाची विसावी परिषद १९५६ च्या फेब्रुवारी महिन्यात क्रेमलिनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व प्रतिनिधी समोर क्रुश्चेव्हने केलेले भाषण इन्ग्रजीमधुन.
5 Jan 2016 - 2:29 am | अमित खोजे
लेख वाचत असताना हेच शोधत होतो. धन्यवाद!
5 Jan 2016 - 2:29 am | अमित खोजे
लेख वाचत असताना हेच शोधत होतो. धन्यवाद!
30 Dec 2015 - 9:58 am | प्रचेतस
हॅट्स ऑफ.
जबरदस्त लेखन.
30 Dec 2015 - 10:41 am | श्रीरंग_जोशी
हा ही भाग अप्रतिम. एखाद्या गुप्तहेर संस्थेचे कार्य आंतरराष्ट्रीय राजकारणावर किती खोलवर परिणाम करू शकते याची प्रचिती हा भाग वाचून आली.
यावरून आठवले - थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्या महायुद्धातील एक पान - अंक १, अंक २.
30 Dec 2015 - 11:43 am | महासंग्राम
बोकोबा, एकदम खतरनाक झालाय हा भाग… फोटो मिळेल का या व्हिक्टर ग्रेव्ह्स्की चा…
30 Dec 2015 - 1:57 pm | पगला गजोधर
30 Dec 2015 - 11:56 am | विजुभाऊ
छान माहिती.
डबल एजन्ट किम फिल्बी वर पन लिहा ना एखादा लेख
30 Dec 2015 - 11:59 am | पिलीयन रायडर
ज ब र द स्त!!!!
30 Dec 2015 - 12:04 pm | मोदक
उत्कंठावर्धक लेखमाला सुरू आहे. धन्यवाद..!!
30 Dec 2015 - 12:16 pm | नया है वह
+१००
30 Dec 2015 - 12:35 pm | अद्द्या
ज ब र द स्त
30 Dec 2015 - 2:10 pm | निनाद मुक्काम प...
मस्तच
वाचतोय
30 Dec 2015 - 3:57 pm | पद्मावति
हा भाग तर फारच जबरदस्त. पु.भा.प्र.
30 Dec 2015 - 6:13 pm | कौशिकी०२५
पुभाप्रप्र....
1 Jan 2016 - 5:06 pm | अभिजित - १
मस्त
पु.भा.प्र.
1 Jan 2016 - 9:30 pm | अत्रन्गि पाउस
दंडवत
1 Jan 2016 - 11:14 pm | स्नेहानिकेत
मस्त!!!!! पु. भा. प्र.
2 Jan 2016 - 11:17 am | अनिरुद्ध.वैद्य
लेख वाचतांना थरारकता पदोपदी जाणवत होती ... त्या माणसांनी काय अनुभवले असेल ... आणि त्याही परिस्थितीत कामे केली!
जबरी.
2 Jan 2016 - 11:44 am | मुक्त विहारि
पुभाप्र....
5 Jan 2016 - 9:05 am | नाखु
आणि अपरिचीत जग..
व्यासंगाला सलाम.
नाखुराव आपटे
शॉलीट्ट हेरा फेरी
5 Jan 2016 - 9:25 am | विशाल कुलकर्णी
जबरदस्त झालाय हासुद्धा भाग, पुभाप्र !
5 Jan 2016 - 9:26 am | विशाल कुलकर्णी
मोस्साद पुर्ण झाले की माताहारीवर लिहायला घ्या देवा.
5 Jan 2016 - 3:59 pm | भुमी
मस्त भाग,पुढचा भाग लवकर टाका.
6 Jan 2016 - 4:33 pm | कविता१९७८
जबरदस्त पकड ठेवलीये, मस्तच
13 Jan 2016 - 9:55 pm | जव्हेरगंज
जबराट!
15 Apr 2017 - 10:13 am | सुचिता१
खुप च छान !!! पुस्तक छापा ...मराठीत या विषयावरयअ असलि्या ताकदिचे लिखाण दुर्मील आहे . धन्यवाद अगदि मनापासुन धनयवाद!!!