मोसाद - भाग १०

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
8 Apr 2016 - 9:03 am


.
मोसाद - भाग ९

मोसाद - भाग १०

एप्रिल १९७५. बैरुट, लेबेनॉन. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचं तिथल्या एका पार्टीमध्ये आगमन झालं होतं. पहिली लेबनीज मिस युनिव्हर्स जॉर्जिना रिझ्क. १९७१ मध्ये अमेरिकेमध्ये मायामी येथे झालेल्या स्पर्धेत तिने हा किताब जिंकला होता. आता चार वर्षांनी लेबेनॉनमध्ये ती अत्यंत यशस्वी मॉडेल बनली होती. मॉडेलिंगबरोबरच तिने सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसायही सुरु केला होता आणि तोही अत्यंत यशस्वी झाला होता. याच पार्टीमध्ये तिची ओळख एका देखण्या अरब तरुणाबरोबर झाली. ही पार्टी एका मोठ्या बंगल्याच्या विस्तीर्ण प्रांगणात होती. पार्टीमध्ये हास्यविनोदात गुंग असलेल्या जॉर्जिनाला या बंगल्याच्या समोर असलेल्या एका उंच इमारतीच्या खिडकीमधून थोडीशी बाहेर आलेली दुर्बीण दिसू शकत नव्हती.

दुर्बिणीमागच्या माणसाला तसाही तिच्यात रस नव्हताच. त्याचं लक्ष तिच्याशी गप्पा मारणाऱ्या त्या अरब तरुणाकडे होतं. गेली तीन वर्षे हा दुर्बिणीमागचा माणूस आणि त्याचे सहकारी या तरुणाच्या शोधात होते, आणि तो आता असा अनपेक्षितपणे समोर आला होता.

त्या माणसाने त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या माणसाला त्या तरुणाचे मिळतील तेवढे फोटो काढून ठेवायला सांगितलं आणि एक फोन केला. पलीकडून फोन उचलला गेल्यावर त्याने त्या तरुणाबद्दल सांगितलं.

“तुझी खात्री आहे?”

“शंभर टक्के,” तो माणूस म्हणाला.

“ठीक आहे,” पलीकडचा आवाज म्हणाला, “त्याच्यावर लक्ष ठेवा आणि आम्हाला कळवत राहा!”

या दुर्बिणीमागच्या माणसाने परत दुर्बिणीतून बघायला सुरुवात केली. जॉर्जिनाने त्या तरुणाला चांगलीच भुरळ घातलेली दिसत होतं. तो तिला अगदी एक क्षणसुद्धा सोडायला तयार नव्हता. तीही त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्यासारखी वाटत होती.

पार्टी संपण्याच्या सुमारास ती आणि तो तिच्या कारच्या दिशेने जाताना या दुर्बिणीमागच्या माणसाने पाहिलं, आणि आपल्या एका सहकाऱ्याला इशारा केला. हा सहकारी इमारतीच्या गॅरेजमध्ये जाऊन तिथल्या एका गाडीमध्ये तयारीत बसला. जॉर्जिना आणि तो तरुण यांना घेऊन जाणारी जॉर्जिनाची गाडी रस्त्यावरून पुढे जाताच ही गाडी तिच्या पाठोपाठ जाऊ लागली. पण जॉर्जिना आणि तो तरुण कुठेतरी गायब झाले.

या घटनेनंतर साधारण २ वर्षांनी – जून १९७७ मध्ये मोसादच्या लंडन स्टेशनमध्ये एक पत्र आलं. पत्र पाठवणाऱ्याने स्वतःचं नाव, पत्ता वगैरे काहीही लिहिलं नव्हतं. पत्राच्या पाकिटात एक फोटो आणि एक लग्नाची निमंत्रणपत्रिका होती. फोटो आणि ही निमंत्रणपत्रिका पाहून मोसादचे लंडनमधले ऑफिसर्स स्तंभित झाले. फोटोमध्ये वधुवेशातल्या जॉर्जिनाबरोबर तोच देखणा तरुण वर म्हणून उभा होता आणि निमंत्रणपत्रिकेत त्याचं नावही लिहिलेलं होतं – अली हसन सलामेह.

गेली पाच वर्षे मोसाद सलामेहच्या मागावर होते. स्पष्टपणे सांगायचं तर ५ सप्टेंबर १९७२ पासून.

५ सप्टेंबर १९७२ च्या पहाटे, साधारण साडेचार वाजता ८ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पश्चिम जर्मनीमधल्या म्युनिक शहरातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची राहायची व्यवस्था असणाऱ्या ऑलिंपिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला आणि इझरेली खेळाडूंच्या निवासस्थानावर हल्ला केला. कुस्ती संघाचा प्रशिक्षक मोशे वाईनबर्गने त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला आणि जो रोमानो नावाच्या वेटलिफ्टरला त्यांनी ठार केलं. काही इझरेली खेळाडू खिडक्यांमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण एकूण ९ खेळाडूंना या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलं.

जर्मनीच्या दृष्टीने ही फार मोठी आपत्ती होती. इझराईलमधल्या बहुसंख्य ज्यूंना जर्मनी म्हटलं की एकच गोष्ट आठवत असे – नाझी. नाझींनी युरोपमधल्या ज्यूंवर केलेल्या अत्याचारांना जेमतेम २५ वर्षे होऊन गेली होती. अजूनही जखमा भरून आलेल्या नव्हत्या. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकनंतर ३६ वर्षांनी जर्मनीने ऑलिंपिकचं आयोजन केलेलं होतं आणि इझराईलने या ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावं असा जर्मनीचा पहिल्यापासून प्रयत्न होता. इझराईल आणि जर्मनी यांचे आंतरराष्ट्रीय संबंध जरी असले तर ज्यू खेळाडूंनी जर्मनीच्या भूमीवर, तेही एकेकाळी नाझीवादाचं माहेरघर असणाऱ्या म्युनिकमध्ये होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणं या गोष्टीला फार सखोल अर्थ होता. खुद्द इझराईलमध्ये खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ नये असा मतप्रवाह होता. पण शेवटी सगळ्या वाटाघाटींना यश येऊन इझरेली खेळाडू जर्मनीत दाखल झाले होते. आणि आता ही घटना घडली होती.

जर्मन पोलिस, पत्रकार, छायाचित्रकार आणि टेलिव्हिजन कॅमेरे यांचं घटनास्थळी आगमन झालं आणि संपूर्ण जगाने, इतिहासात पहिल्यांदा एका दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण बघायला सुरुवात केली. हे प्रक्षेपण बघणाऱ्या लोकांमध्ये एक होत्या इझराईलच्या पंतप्रधान गोल्डा मायर. त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती होती. हा हल्ला इझराईलच्या मित्र देशात झाला होता आणि खेळाडूंना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याची जबाबदारी जर्मनीची होती. इझरेली सरकारने जर्मनीच्या बव्हेरिया राज्याच्या सरकारला केलेली मदतीची विनंती – ज्यात इझरेली कमांडो दल सायारेत मत्कालला म्युनिकमध्ये पाठवण्याची योजना होती – बव्हेरियन सरकारने नम्रपणे पण ठामपणे फेटाळली होती आणि या खेळाडूंना सोडवण्याची खात्रीही दिली होती. पण जर्मनीकडे अशा स्वरूपाच्या हल्ल्याला तोंड देणारी यंत्रणा नव्हती. त्यांच्या GSG या कमांडो युनिटला पुरेसा अनुभवही नव्हता.

अतिरेक्यांबरोबर चालू असलेल्या वाटाघाटी संपूर्ण दिवसभर लांबल्या आणि दहशतवादी आणि ओलिस खेळाडू म्युनिक शहराच्या बाहेर असलेल्या फुर्स्टनफेल्डब्रूक विमानतळावर गेले. दहशतवाद्यांना जर्मनीच्या बाहेर पडण्यासाठी विमान देण्यात येईल अशी हमी जर्मन सरकारने दिली होती. प्रत्यक्षात विमानतळावर त्यांनी या दहशतवाद्यांना उडवण्यासाठी सापळा लावला होता आणि दुर्दैवाची गोष्ट ही की तो अजिबात विचारपूर्वक लावलेला नव्हता. दहशतवाद्यांची खात्री पटावी म्हणून एक जुनं लुफ्तान्सा विमान रनवेच्या मध्यभागी आणून ठेवण्यात आलं होतं आणि विमानतळाच्या इमारतीच्या छतावर स्नायपर्स ठेवण्यात आले होते पण त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या.

दहशतवाद्यांपैकी एकजण जेव्हा विमानाची पाहणी करायला आला, तेव्हा रिकामं विमान पाहून त्याला संशय आला आणि या फसवणुकीचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबाराला सुरुवात केली. त्यात जो गोंधळ उडाला, त्यात सर्वच्या सर्व ओलिस खेळाडू, एक जर्मन पोलिस ऑफिसर आणि ५ दहशतवादी मारले गेले. त्यात त्यांचा प्रमुख ‘ इसा ‘ चाही समावेश होता. बाकीच्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली पण नंतर लुफ्तान्साच्या एका विमानाचं अपहरण झालं, तेव्हा प्रवाशांच्या मोबदल्यात या तिघा दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं.

हा सगळा रक्तपात मोसाद संचालक झ्वी झमीर विमानतळाच्या कंट्रोल टॉवरमधून असहाय्यपणे पाहात होता. त्याला तिथे जर्मन सरकारला सल्ला देण्यासाठी म्हणून पंतप्रधान गोल्डा मायर यांनी पाठवलं होतं. प्रत्यक्षात जर्मन सरकारने झमीरची एकही सूचना ऐकली नाही. पण मोसादचे एजंट्स गप्प बसले नव्हते. या हल्ल्याला कोण जबाबदार आहे हे त्यांनी त्या दिवसभरात शोधून काढलं होतं. हे नाव होतं ब्लॅक सप्टेंबर.

१९७० च्या सप्टेंबरमध्ये जॉर्डनचा राजा हुसेनने आपल्या सैनिकांना पूर्णपणे मोकळीक देऊन हजारो पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा संहार केला. या दहशतवाद्यांनी त्यावरून आपल्या एका अत्यंत गुप्त आणि कडव्या संघटनेला हे नाव दिलं होतं. १९६७ च्या सहा दिवसांच्या युद्धानंतर इझराईलने सिनाई द्वीपकल्प, गाझा, वेस्ट बँक आणि गोलान टेकड्या एवढा विस्तीर्ण प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला आणि तिथे राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांनी, ज्यात अनेक दहशतवाद्यांचाही समावेश होता – जॉर्डनमध्ये आश्रय घेतला. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांमुळे लवकरच ते राहात असलेल्या भूभागावर त्यांची अप्रत्यक्ष सत्ता प्रस्थापित झाली. हळूहळू त्यांनी जॉर्डनच्या राजवटीला आव्हान द्यायला सुरुवात केली. शेवटी राजा हुसेनने आपल्या लष्कराला या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. ही तारीख होती १७ सप्टेंबर १९७०. जॉर्डेनियन लष्कराला हेच हवं होतं. त्यांनी सर्व विधिनिषेध गुंडाळून या पॅलेस्टिनींवर हल्ला चढवला. त्यांच्या वस्तीमधल्या प्रत्येक रस्त्यावर, घरात घुसून – जिथे मिळेल तिथे सैनिकांनी पॅलेस्टिनींना ठार केलं. त्यांच्यातल्या काही जणांनी इझराईल – जॉर्डन सीमारेषेवर असलेल्या विस्थापित शिबिरांमध्ये आश्रय घेतला. जॉर्डेनियन लष्कराच्या तोफखान्याने या शिबिरांना चारी बाजूंनी वेढा घालून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा मारा केला आणि ही विस्थापित शिबिरं पूर्णपणे उध्वस्त केली. हजारो पॅलेस्टिनी ठार झाले. जे सुदैवी होते, ते सीरिया आणि लेबेनॉनमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यावेळी पॅलेस्टिनी अरबांच्या दोन प्रमुख दहशतवादी संघटना कार्यरत होत्या – यासर अराफतची अल फताह आणि जॉर्ज हबाशची Popular Front for Liberation of Palestine किंवा पीएफएलपी. मारले गेलेले बहुसंख्य पॅलेस्टिनी हे फताहचे सहानुभूतीदार होते. त्यांच्या हत्येमुळे फताहला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे सूड घेण्यासाठी अराफतने एक नवीन आणि अत्यंत गुप्त संघटना निर्माण केली. या संघटनेबद्दल फताहमध्येही खूप कमी लोकांना माहित होतं. अराफतने मुद्दामच तसं केलं होतं, जेणेकरून या नवीन संघटनेच्या कारवायांशी फताहचा संबंध कोणीही जोडू शकणार नाही. या संघटनेचं नाव ठेवण्यात आलं ब्लॅक सप्टेंबर. अराफतने या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या विश्वासू साथीदाराची – अबू युसुफची निवड केली आणि तिच्या गुप्त कारवाया पार पाडणारा ऑपरेशन्स चीफ म्हणून एका अत्यंत कडव्या आणि लढाऊ वृत्तीच्या तरुणाची निवड केली. त्याचं नाव होतं अली हसन सलामेह. १९४८ च्या इझराईल – पॅलेस्टाईन युद्धात पॅलेस्टिनी सैन्याचा सुप्रीम कमांडर असलेल्या आणि त्या युद्धात मारल्या गेलेल्या हसन सलामेहचा मोठा मुलगा.

ब्लॅक सप्टेंबरच्या सुरुवातीच्या कारवायांकडे मोसादने दुर्लक्ष केलं कारण या कारवाया प्रामुख्याने जॉर्डनविरुद्ध होत्या. त्यांनी जॉर्डनच्या राष्ट्रीय विमानसेवेच्या रोम ऑफिसवर बॉम्बहल्ला करून ते उध्वस्त केलं, जॉर्डनच्या पॅरिसमधल्या दूतावासावर हल्ला केला, एका जॉर्डेनियन विमानाचं अपहरण केलं आणि पाच जॉर्डेनियन एजंट्सना जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये ठार मारलं. त्यांनी जॉर्डनविरुद्ध केलेलं सर्वात भयानक कृत्य म्हणजे जॉर्डनचा माजी पंतप्रधान वस्फी अल-ताल याची कैरो शेरेटनच्या लॉबीमध्ये दिवसाढवळ्या केलेली हत्या.

एवढं झाल्यावर सलामेहने थांबायचा निर्णय घेतला. शेवटी काहीही झालं तरी जॉर्डन हा त्यांचा शत्रू नव्हता. त्यांचा शत्रू होता इझराईल. आणि ५ सप्टेंबर १९७२ या दिवशी घडलेलं अपहरण नाट्य आणि हत्याकांड हा सलामेहने आपल्या प्रच्छन्न शत्रूविरुद्ध केलेला एक जबरदस्त प्रहार होता. या हत्याकांडानंतर सलामेहला त्याचं टोपणनाव मिळालं – रेड प्रिन्स. त्याच्या रक्तपिपासूपणामुळे हे नाव अगदी समर्पक होतं.

----------------------------------------------------------------------------------------------------------

ऑक्टोबर १९७२ च्या पहिल्या आठवड्यात मोसाद संचालक झ्वी झमीर आणि पंतप्रधानांचा सुरक्षा सल्लागार अॅहरॉन यारीव्ह हे दोघेही पंतप्रधान गोल्डा मायरना भेटले. इझराईल अशा प्रसंगात हातावर हात धरून गप्प बसू शकत नाही यावर तिघांचंही एकमत होतं. हे कृत्य घडवून आणणाऱ्या ८ दहशतवाद्यांपैकी ५ जण जर्मनीतच ठार झाले होते. उरलेले तिघं जर्मनांच्या अटकेत होते. पण त्यांना मारून किंवा आइकमनप्रमाणे इझराईलमध्ये आणून, खटला भरून शिक्षा देणं यात मोसादला अर्थ वाटत नव्हता. जर या दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल, तर त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर दिलं पाहिजे याची जाणीव पंतप्रधानांना होती. त्याचबरोबर त्यांना इझराईल हा एक लोकशाही देश आहे आणि सरकार आपल्या कृतीसाठी नेसेटला आणि लोकांना जबाबदार आहे याचीही त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी मोसादच्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती बनवली. त्यात स्वतः पंतप्रधानांशिवाय संरक्षणमंत्री मोशे दायान आणि उपपंतप्रधान यिगाल आलोन यांचा समावेश होता. निरपराध माणसांच्या केसालाही धक्का लागता कामा नये यावर या समितीचं लक्ष असणार होतं. त्यानुसार झमीर आणि यारीव्ह यांनी बनवलेली कुठलीही योजना या समितीपुढे सादर होणार होती आणि जर या समितीने त्याला मंजुरी दिली, तरच त्यावर अंमलबजावणी होणार होती.
झमीर आणि यारीव्ह यांच्या योजनेनुसार म्युनिकमध्ये प्रत्यक्ष उत्पात करणाऱ्या दहशतवाद्यांऐवजी त्यांच्या मागे असणाऱ्या आणि त्यांना सूचना देणाऱ्या नेत्यांना संपवायचं होतं. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचं प्रमुख उद्दिष्ट असतं लोकांच्या मनात भीती निर्माण करणं. मोसादला तीच भीती दहशतवाद्यांच्या मनात निर्माण करायची होती. या ऑपरेशनचं नाव होतं राथ ऑफ गॉड.

सीझरिआ या मोसादमधल्या ऑपरेशन्स विभागाकडे या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. संपूर्ण मोहिमेचा सूत्रधार होता माईक हरारी. रफी एतानचा पट्टशिष्य असणारा हरारी युरोपमधल्या कुठल्याही शहरात सहज वावरू शकत असे. ब्लॅक सप्टेंबरचे बहुतेक सगळे वरिष्ठ नेते म्युनिक हत्याकांडानंतर युरोपमध्ये विखुरले होते आणि त्यांना तिथेच संपवायची मोसादची योजना होती. हरारीची नेमणूक त्या दृष्टीने महत्वाची होती.

हरारीने सहा एजंट्सची एक टीम तयार केली होती. या टीम ची जबाबदारी होती संशयितांना हेरणं, त्यांच्याबद्दल सर्व माहिती गोळा करणं आणि ते खरोखरच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते याची खात्री करून घेणं. त्यामुळे संशयित माणूस ज्या शहरात असेल तिथे येणं; त्या माणसाला शोधणं; त्याच्या मागावर राहून त्याचे फोटो काढणं; त्याच्या सवयी जाणून घेणं; त्याचे मित्र, तो कुठल्या हॉटेल्स आणि बार्समध्ये नियमाने जातो हे शोधणं – ही त्यांची जबाबदारी होती.

अजून एक टीम घरं आणि गाड्या भाड्याने घेण्याचं काम करत असे. एक टीम त्या संशयित माणसाच्या शहरात असलेलं मोसादचं तात्पुरतं हेडक्वार्टर्स आणि इझराईल यांच्यात संपर्क ठेवण्याचं काम करत होती.

त्या संशयित माणसाची प्रत्यक्ष हत्या करणारी टीम सर्वात शेवटी त्या शहरात येणार होती. प्रत्येक माणसाला कसं मारायचं यावरून या टीममधले लोक ठरत असत. यातले सर्वजण हे सीझरिआच्या एका खास विभागातले होते. या विभागाचं नाव होतं किडॉन. हिब्रू भाषेत या शब्दाचा अर्थ होतो बंदुकीची संगीन. त्यांना त्यांचं ‘ काम ‘ झाल्यावर कुठलाही पुरावा न सोडता निसटता यावं म्हणून एक बॅकअप टीम गाड्या आणि शस्त्रं घेऊन तयार राहणार होती. हत्येचं वेळापत्रक अशा प्रकारे आखलं गेलं होतं, की किडॉन टीमने आपलं काम करण्याआधी संशयित माणसाचा माग काढणारी टीम देश सोडून गेलेली असली पाहिजे, आणि संपर्क सांभाळणारी टीम काम झाल्यावर देश सोडून जाणार होती – जेणेकरून ज्या देशात हे काम होणार होतं, तिथल्या सुरक्षा यंत्रणेला संशय येऊ नये.

मोसादने निवडलेलं पहिलं शहर होतं रोम.

मोसादच्या टेहळणी करणाऱ्या टीमने राथ ऑफ गॉड ची सुरुवात करण्यासाठी निवडलेला पहिला माणूस होता वाएल झ्वेतर. तो रोममधल्या लीबियन दूतावासात भाषांतरकार म्हणून महिन्याला १०० लीबियन दिनार एवढ्या तुटपुंज्या पगारावर काम करत होता. पण रोममधल्या साहित्यिक वर्तुळात त्याची उठबस होती. तिथे त्याला सगळेजण इटालियन आणि ग्रीक साहित्य अरेबिकमध्ये भाषांतरित करणारा अव्वल दर्जाचा अनुवादक म्हणून ओळखत असत. त्याची खरी ओळख – ब्लॅक सप्टेंबरच्या रोम ऑफिसचा प्रमुख – कोणालाच माहित नव्हती. मोसादला त्याचा पत्ता त्याने इझराईलविरुद्ध केलेल्या एका अयशस्वी ऑपरेशनमुळे लागला होता. त्याने रोममध्ये सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या दोन इंग्लिश तरुणींना हेरलं. त्या रोममधून पुढे इझराईल आणि तिथून जेरुसलेमला जाणार होत्या. झ्वेतरने दोन देखण्या पॅलेस्टिनी तरुणांना त्यांच्याबरोबर ‘ मैत्री ‘ करण्यासाठी पाठवलं. त्यांची चांगली मैत्री झाली. त्या दोघी जेव्हा इझराईलला जायला निघाल्या, तेव्हा एका तरुणाने त्यांना एक छोटा टेपरेकॉर्डर दिला आणि तो वेस्ट बँक भागात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे भेट म्हणून पोचवायला सांगितलं. या मुलींनीही होकार दिला. झ्वेतरने या टेपरेकॉर्डरमध्ये स्फोटकं भरली होती. एल अॅल च्या ज्या विमानातून या दोघी तेल अवीवला जाणार होत्या, त्याचा स्फोट घडवून आणायची झ्वेतरची योजना होती. सुदैवाने असं काही घडू शकेल असा विचार एल अॅलच्या सुरक्षाव्यवस्थेने केला होता आणि विमानात सामान ठेवण्याचा जो भाग होता, त्याच्याभोवती एखाद्या चिलखताप्रमाणे अभेद्य आवरण घालण्यात आलं होतं. या टेपरेकॉर्डरचा ठरल्या वेळी स्फोट झालादेखील पण चिलखतामुळे त्याचा परिणाम विमानाच्या बाकीच्या भागांवर झाला नाही. जेव्हा या मुलींना तेल अवीव विमानतळावर अटक करण्यात आली, तेव्हा त्यांनी त्याचा खुलासा केला. त्यावरून मोसादला झ्वेतरचा आणि म्युनिक हत्याकांडामधल्या त्याच्या सहभागाचासुद्धा पत्ता लागला.

टेहळणी करणाऱ्या टीमने झ्वेतरचा अनेक दिवस पाठलाग केला. दोन इझरेली एजंट्स – एक तरुण आणि एक तरुणी – दररोज वेषांतर करून लीबियन दूतावासावर लक्ष ठेवत असत आणि झ्वेतरच्या येण्या-जाण्याच्या वेळा, त्याचे सहकारी, तो जेवायला जात असलेली ठिकाणं – या सगळ्यांची नोंद ठेवत असत. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर सायप्रस आणि माल्टा इथून अनेक मोसाद एजंट्स रोममध्ये दाखल झाले. त्यांच्यातल्या काहींनी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या आणि कंपनीच्या काऊंटरवर रोममधल्या वेगवेगळ्या आणि भपकेबाज हॉटेल्सची नावं सांगितली होती.
१० ऑक्टोबरच्या रात्री झ्वेतर त्याच्या इमारतीमध्ये आला आणि त्याने लिफ्टचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. अचानक अंधारातून दोन जण पुढे आले आणि त्यांनी काहीही न बोलता जवळपास १०-११ गोळ्या त्याच्यावर झाडल्या. एवढं करायची खरंतर गरज नव्हती, कारण मारेकऱ्यांपैकी एकाने मारलेली पहिलीच गोळी झ्वेतरच्या डोक्यात लागली होती. पण मोसादला ब्लॅक सप्टेंबरला संदेश द्यायचा होता, त्यामुळे मारल्या गेलेल्या ११ इझरेली खेळाडूंपैकी प्रत्येकासाठी एक अशा एकूण ११ गोळ्या झ्वेतरवर झाडण्यात आल्या. सायलेन्सर लावलेला असल्यामुळे कोणालाही आवाज ऐकू आला नाही.

शांतपणे चालत हे मारेकरी थोड्या दूरवर त्यांनी पार्क केलेल्या गाडीपाशी गेले आणि तिथून सरळ विमानतळावर गेले. झ्वेतरच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना देईपर्यंत ते इझराईलमध्ये परत पोचलेदेखील होते.

फताहला आता झ्वेतरची ओळख लपवून ठेवायची काही गरज नव्हती, त्यामुळे जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्यावर अनेक लेख छापून आले. सगळीकडे त्याचा उल्लेख महान क्रांतिकारक आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा सच्चा सैनिक असा केला होता.

झ्वेतरला पहिली गोळी मारणारा एजंट होता डेव्हिड मोलाद. तो ट्युनिशियन ज्यू होता. त्याच्या लहानपणी त्याचे आईवडील इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. ट्युनिशिया फ्रेंच साम्राज्याचा भाग असल्यामुळे तिथली प्रमुख भाषा फ्रेंच होती आणि डेव्हिडचे वडील फ्रेंच भाषेचे शिक्षक होते. या पार्श्वभूमीमुळे डेव्हिडला हिब्रूबरोबरच फ्रेंच, इंग्लिश आणि अरेबिक या भाषा अस्खलितपणे बोलता आणि लिहिता येत असत. त्यामुळे या संपूर्ण मोहिमेत त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. तो फ्रेंच, बेल्जियन, स्विस, कॅनेडियन, अरब, अमेरिकन अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांमध्ये अगदी सहज वावरू शकत असे. रोममधून तेल अवीवला गेल्यानंतर काही दिवसांनीच डेव्हिडला पुढच्या कामगिरीचं बोलावणं आलं. यावेळी शहर होतं पॅरिस.

झ्वेतरच्या मृत्यूनंतर उडालेला धुरळा शांत व्हायच्या आत मोसादने पुढच्या शिकारीकडे नजर वळवली होती. पण आता कामगिरी कठीण होती. रोमची गोष्ट वेगळी होती. इटालियन गुप्तचर संघटना आणि मोसाद यांच्यात सुरुवातीपासून सहकार्य होतं. शिवाय जोपर्यंत मोसाद कुणा इटालियन नागरिकाला हात लावत नाही, तोपर्यंत इटालियन गुप्तचर संघटनेला फरक पडत नव्हता. फ्रान्समध्ये याआधीच बेन बार्का प्रकरणावरून मोसादबद्दल प्रतिकूल मत होतं आणि फ्रान्सच्या SDECE या गुप्तचर संघटनेच्या कार्यक्षमतेबद्दल मोसादला शंका नव्हती. त्यामुळे त्यांनी थोडी वेगळी पद्धत वापरायचं ठरवलं.

एके दिवशी सकाळी पॅरिसच्या १७५, रू अलेशिया या पत्त्यावर असलेल्या घरातला फोन खणखणला. घराच्या मालकाने फोन उचलला. पलीकडून आवाज आला – “ मला पी.एल.ओ. (Palestine Liberation Organization) चे पॅरिसमधले प्रतिनिधी डॉ. मेहमूद हमशारी यांच्याशी बोलायचं आहे.” फोन स्वतः हमशारीनेच उचलला होता. फोन करणारा माणूस इटालियन पत्रकार होता आणि त्याचा पॅलेस्टाईनच्या संपूर्ण स्वातंत्र्याला पाठिंबा होता. त्याच अनुषंगाने त्याला हमशारीची मुलाखत घ्यायची होती. दोघांनी एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. हा कॅफे हमशारीच्या घरापासून लांब होता.

झ्वेतरप्रमाणेच हमशारीचा एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंध असेल अशी कोणालाही शंका आली नसती. तो इतिहासकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता आणि आपल्या फ्रेंच पत्नी आणि मुलीसमवेत पॅरिसच्या उच्च मध्यमवर्गीय भागात राहत होता. पण मोसादला काही गोष्टी समजलेल्या होत्या. इझराईलचे माजी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्यावर १९६९ मध्ये डेन्मार्कमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे हमशारीचा हात होता. १९७० मध्ये इझराईलचं हवाई हद्दीत झालेल्या स्विसएअरच्या विमानाच्या स्फोटातही त्याचा हात होता. आणि सर्वात महत्वाचं – हमशारीची नुकतीच यासर अराफतने पी.एल.ओ.च्या संपूर्ण युरोप विभागाच्या उपप्रमुखपदावर नेमणूक केलेली होती.

त्या दिवशी जेव्हा तो त्या इटालियन पत्रकाराला भेटायला बाहेर पडला, तेव्हा त्याची पत्नीही बाजारहाट करायला बाहेर पडली. त्याची मुलगी शाळेत गेलेली होती. घरात कोणीही नव्हतं. दोघाजणांनी त्याच्या घरात प्रवेश केला आणि जवळपास १५-२० मिनिटांनी ते बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची पत्नी मुलीला शाळेत सोडायला म्हणून बाहेर पडली, तेव्हा त्याला फोन आला. त्या इटालियन पत्रकाराचाच होता.

“डॉ. हमशारी?”

“बोलतोय.” आणि पुढे त्याने काही शब्द उच्चारायच्या आत प्रचंड मोठा स्फोट झाला. त्याच्या घरात ज्या टेबलवर फोन ठेवला होता, त्याच्या खाली स्फोटकं दडवलेली होती. स्फोटात हमशारी प्राणांतिक जखमी झाला आणि काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युपूर्व जबानीत त्याने मोसादच आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं अगदी ठामपणे सांगितलं होतं.

हमशारीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी माईक हरारी आणि जोनाथन इंगेल्बी नावाचा अजून एक एजंट सायप्रसमध्ये आले. भूमध्य समुद्रात अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे आणि इझराईल, सीरिया, लेबेनॉन आणि इजिप्त यांना बऱ्यापैकी जवळ असल्यामुळे अनेक वेळा इझरेली एजंट आणि अरब दहशतवादी सायप्रसमध्ये समोरासमोर आलेले होते. हरारी आणि इंगेल्बी यांचं लक्ष्य होता हुसेन अब्द अल हीर. तो फताहचा सायप्रसमधला प्रतिनिधी होता, आणि अराफतने त्याची नेमणूक एका खास कामासाठी केलेली होती. पश्चिम युरोपात त्यावेळी काही गुन्हेगारी संघटना आणि काही फुटीरतावादी संघटना कार्यरत होत्या. यांच्यात प्रमुख होत्या आयर्लंडमधली आयरिश रिपब्लिकन आर्मी उर्फ आय.आर.ए., जर्मनीमधली बाडर-माईनहॉफ गँग, इटलीमधली रेड ब्रिगेड ही कम्युनिस्ट दहशतवादी संघटना आणि स्पेनमधली बास्क प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी सी.सी.सी. ही क्रांतिकारक संघटना. या संघटनांना सोविएत रशियाची सक्रीय मदत, अगदी शस्त्रास्त्रं आणि प्रशिक्षणासकट मिळत असे. गेली काही वर्षांमध्ये या संघटनांमध्ये यासर अराफतची अल फताह आणि जॉर्ज ह्बाशची पी.एफ.एल.पी यांचाही समावेश झाला होता. पण रशियाच्या के.जी.बी.चे लोक कधीही उघडपणे असली कामं करत नसत. ते झेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी वगैरे रशियाच्या अंकित देशांच्या गुप्तचर संघटनांचा वापर करायचे. त्यात आता अजून एक नाव समाविष्ट झालं होतं, ते म्हणजे कर्नल गद्दाफीचा लीबिया. रशियन शस्त्रांचा मोठा खरेदीदार असलेल्या लीबियामधून फताहला मदत मिळत होती आणि त्यावर देखरेख करणारा माणूस होता अल हीर. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो सायप्रसमधून आपलं काम करत असे.
म्युनिक हत्याकांडात वापरलेली शस्त्रं ही अल हीरच्याच मध्यस्थीने ब्लॅक सप्टेंबर दहशतवाद्यांना मिळालेली होती अशी मोसादला पक्की खबर होती आणि त्यामुळेच त्यांनी अल हीरचा काटा काढायचा ठरवलं होतं.

त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर अल हीर हॉटेलच्या बागेत फेरफटका मारत होता, आणि इंगेल्बी आणि हरारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो त्याच्या खोलीत गेला आणि कपडे बदलून पलंगावर लवंडला आणि एक-दोन क्षणांतच घोरायला लागला. एका तासाने, तो गाढ झोपलेला आहे याची खात्री पटल्यावर इंगेल्बीने आपल्या जवळच्या रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला आणि अल हीरचं शरीर छिन्नविछिन्न झालं.

हे सगळं चालू असताना ब्लॅक सप्टेंबर आणि सलामेह गप्प बसलेले नव्हतेच.

२६ जानेवारी १९७३ या दिवशी स्पेनची राजधानी माद्रिदमधल्या होजे अँटोनियो स्ट्रीटवर असलेल्या मॉरिसन पब नावाच्या एका पबमध्ये मोशे इशाई नावाचा एक इझरेली ज्यू एका पॅलेस्टिनी माणसाला भेटला. जेवण संपवून दोघेही निघत असताना दोघेजण अचानक त्यांच्या समोर आले आणि त्यांनी इशाईचा रस्ता अडवला. तो पॅलेस्टिनी माणूस पळून गेला आणि त्या मारेकऱ्यांनी इशाईला गोळ्या घातल्या आणि ते अदृश्य झाले.

नंतर हे उघड झालं की इशाईचं खरं नाव होतं बरुच कोहेन. तो मोसादचा एजंट होता आणि फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये शिक्षण घेणाऱ्या पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांचं नेटवर्क उभारण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्या पॅलेस्टिनी माणसाला तो याच संदर्भात भेटला होता. हा माणूस ब्लॅक सप्टेंबरचा हेर होता आणि त्याला कोहेनला फसवून त्या पबमध्ये आणण्याच्या कामासाठीच वापरण्यात आलं होतं.

कोहेनच्या पाठोपाठ ब्लॅक सप्टेंबरने मोसादचा बेल्जियममधला एजंट झादोक ओफिर आणि लंडनमधल्या इझरेली राजदूतावासातला वरिष्ठ अधिकारी डॉ. अमी शेचोरी यांना आपलं लक्ष्य बनवलं.

मोसादने प्रत्युत्तर म्हणून अल हीरच्या जागी आलेल्या फताह प्रतिनिधीला तो सायप्रसमध्ये आल्यानंतर २४ तासांत उडवलं. यावेळी फक्त हॉटेल वेगळं होतं, पण पद्धत तीच होती.

अराफत आणि सलामेह, दोघेही सूडाच्या इच्छेने वेडेपिसे झाले होते. त्यांनी आता एकदम मोठ्या प्रमाणावर याचा बदला घ्यायचं ठरवलं. या योजनेनुसार ब्लॅक सप्टेंबरचे आत्मघातकी दहशतवादी एका विमानाचं अपहरण करून, त्याच्यात स्फोटकं भरून ते विमान इझराईलची राजधानी तेल अवीवमध्ये मध्यवर्ती भागात नेऊन उडवून देणार होते. (२८ वर्षांनी ओसामा बिन लादेनच्या अल कायदाने असंच करून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सना उध्वस्त केलं. अजून एक योगायोग म्हणजे ही घटना सप्टेंबरमध्ये – ११ सप्टेंबरला घडली.)

मोसादचे अंडरकव्हर एजंट्स फताहमध्ये होते. त्यांना या कटाचा वास लागल्यावर त्यांनी मोसादला याची खबर दिली. या कटाची मुख्य सूत्रं पॅरिसमधून हलवली जात असल्याचं मोसादला समजलं होतं. कदाचित सलामेह तिथे असेल या कल्पनेने अनेक मोसाद एजंट्स वेगवेगळ्या पासपोर्टवर आणि वेगवेगळी नावं आणि वेश घेऊन पॅरिसमध्ये आले.
एका रात्री या एजंट्सपैकी एका गटाला एक मध्यमवयीन माणूस या संशयित दहशतवाद्यांसमवेत दिसला. त्या गटातल्या एकाकडे बऱ्यापैकी आधुनिक कॅमेरा होता. तो वापरून त्याने या मध्यमवयीन माणसाचा फोटो काढला आणि तेल अवीवला पाठवला. चोवीस तासांच्या आत या गटाला त्या माणसावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मिळाल्या. त्याचं नाव होतं बेसिल अल कुबैसी. झ्वेतर आणि हमशारीप्रमाणे अजून एक बुद्धिवंत आणि दहशतवाद समर्थक. तो चक्क कायद्याचा प्राध्यापक होता, तेही बैरुटमधल्या अमेरिकन विद्यापीठात. पण हा त्याचा संभावित चेहरा होता. १९५६ मध्ये त्याने इराकचा राजा फैजलची हत्या करायचा प्रयत्न केला होता. फैजलच्या शाही काफिल्याच्या मार्गात त्याने बॉम्ब आणि भूसुरुंग पेरून ठेवले होते. यातल्या एका बॉम्बचा वेळेआधी स्फोट झाला आणि कुबैसीचं नाव उघडकीस आलं. तो इराकमधून पळून लेबेनॉन आणि तिथून अमेरिकेत गेला.

काही वर्षांनी कुबैसीने त्यावेळी इझराईलच्या परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायरच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या त्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या. त्यात अयशस्वी झाल्यावर त्याने परत एकदा पॅरिसमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेच्या अधिवेशनात गोल्डा मायरच्या हत्येचा प्रयत्न केला. तोही अयशस्वी झाला. कुबैसीने त्यानंतर बैरुटमध्ये अमेरिकन विद्यापीठात शिकवायला सुरुवात केली, आणि जॉर्ज हबाशच्या पी.एफ.एल.पी मध्ये तो भरती झाला. हबाश आणि त्याचे सहकारी कट्टर मार्क्सिस्ट होते आणि चे ग्वेव्हाराचे समर्थक होते. त्यांना पॅलेस्टाईनमध्ये कम्युनिस्ट राजवटीची स्थापना करायची होती. त्यामुळे कुबैसी आणि त्यांचे मतभेद झाले आणि कुबैसी तिथून बाहेर पडून फताहसाठी काम करायला लागला. म्युनिक हल्ल्याच्या कटात तो सहभागी असल्याचा पुरावा मोसादला मिळाल्यावर त्यांनी त्याचीही त्याच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच हत्या करायचं ठरवलं. म्युनिक हत्याकांडातल्या दहशतवाद्यांना पासपोर्ट, जर्मन व्हिसा आणि इतर कागदपत्रं कुबैसीने पुरवली होती.

६ एप्रिल १९७३ या दिवशी रात्रीचं जेवण करून कुबैसी त्याच्या हॉटेलकडे चालला होता. वाटेत प्लेस दे ला मेडेलिन या ठिकाणी मोसादचे लोक त्याची वाट पाहात थांबले होते. टेहळणी करणाऱ्या टीम्सपैकी एक टीम गाडीमध्ये बसून रस्त्याकडे लक्ष ठेवून होती तर दुसरी टीम स्त्रियांच्या वेशात रस्त्यावर उभी होती. कुबैसीने टॅक्सीचे पैसे दिले आणि तो चालत मोसाद एजंट्सच्या दिशेने यायला लागला. तेही तयारीत होतेच, एवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. एक एकदम झगमगीत गाडी कुबैसीच्या दिशेने आली आणि त्याच्यापाशी येऊन थांबली. एका सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला. कुबैसी तिच्याशी काहीतरी बोलला आणि गाडीत बसून निघून गेला.

काय झालं ते मोसाद एजंट्सच्या लगेचच लक्षात आलं. ती स्त्री एक कॉलगर्ल होती आणि कुबैसीने तिच्याबरोबर ‘ भेट ‘ ठरवलेली होती. सगळेजण वैतागले. पण तिथे हजर असलेल्या डेव्हिड मोलादने प्रत्येकाला शांत केलं. ती त्याला इथे परत घेऊन येईल असं तो म्हणाला. हे त्याला कसं माहित असा प्रश्न एका एजंटने विचारला. त्यावर मोलादचं उत्तर होतं – अर्धा तास थांब.

खरोखरच अर्ध्या तासाने तीच गाडी तिथे परत आली आणि कुबैसी त्यातून उतरल्यावर निघून गेली. तो त्याच्या हॉटेलच्या दिशेने तीन-चार पावलं चालला असेल-नसेल, तेवढ्यात अंधारातून दोघेजण त्याच्या समोर आले. हादरलेल्या कुबैसीने मागे पाहिलं. त्याचा रस्ता अजून दोघांनी अडवला होता. समोरून आलेल्या दोघांमधला एक डेव्हिड मोलाद होता. कुबैसीने काहीही बोलायच्या आत ११ गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळणी केली.

दुसऱ्या दिवशी, कुबैसीच्या मृत्यूची बातमी सर्वांना समजल्यावर पी.एफ.एल.पी आणि फताह या दोन्हीही संघटनांच्या प्रवक्त्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या ‘ कामांबद्दल ’ गौरवोद्गार काढले.

पुढच्या काही महिन्यांमध्ये मोलाद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडलं. ग्रीसमध्ये जहाजं विकत घेऊन त्यांच्यात सायप्रसमध्ये स्फोटकं भरून ती इझराईलच्या एलात आणि अश्दोद या बंदरांमध्ये नेऊन तिथे स्फोट करून ही दोन्हीही बंदरं निकामी करायची आणि इझराईलची आर्थिक कोंडी करायची एक धाडसी योजना सलामेहने आखली होती, पण मोसादने फताहमध्ये घुसवलेल्या अंडरकव्हर एजंट्समुळे मोसादला या कटाबद्दलही समजलं आणि किडॉन टीमने ग्रीसमध्येच जहाज विकत घ्यायला आलेल्या लोकांना उडवलं. त्यामुळे ही योजनाही फसली.

एवढं सगळं झालं तरीही ब्लॅक सप्टेंबरला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं मोसादला अजून जमलं नव्हतं, आणि त्याचं कारण म्हणजे आली हसन सलामेह अजून जिवंत होता. त्याला मारल्याशिवाय ब्लॅक सप्टेंबरचं कंबरडं मोडणं आपल्याला शक्य होणार नाही, हे मोसादला कळून चुकलं. पण सलामेह कुठे होता, ते कुणालाच माहित नव्हतं. आपल्या जीवाला धोका आहे आणि आपण जिथे कुठे असू, तिथे मोसाद आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणार हे सलामेहलाही माहित होतं. त्यामुळे तो भूमिगत झाला होता, आणि आपल्या योजना आखत होता. कुबैसीच्या मृत्यूच्या वेळी तो बैरुटमध्ये होता. त्यानंतर त्याने अजून दोन कारवाया केल्या.

पहिली म्हणजे ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांनी थायलंडमधल्या इझरेली राजदूतावासाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. पण ही कारवाई अयशस्वी झाली. थाई सेनाधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य करण्यास नकार दिला. शिवाय इजिप्तच्या थायलंडमधल्या राजदूताने दहशतवाद्यांवर आणलेल्या दबावामुळे त्यांना सर्व ओलिसांना सोडून देऊन थायलंडमधून पलायन करावं लागलं.

दुसरी कारवाई झाली सुदानची राजधानी खार्टूममध्ये. सलामेहच्या माणसांनी खार्टूममधल्या सौदी अरेबियन दूतावासावर हल्ला चढवला. त्यावेळी तिथे एका युरोपियन प्रतिनिधीच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने मेजवानी चालू होती. अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आलं. सलामेहच्या आदेशावरून त्यातल्या सर्वांना सोडून देण्यात आलं – तिघे सोडून. अमेरिकन राजदूत क्लिओ नोएल, खार्टूममधल्या अमेरिकन मिशनचा उपप्रमुख जॉर्ज मूर आणि बेल्जियमचा राजदूत गाय इद. आपल्या रेड प्रिन्स या नावाला जागत सलामेहने या तिघांना अत्यंत भीषण आणि नृशंस पद्धतीने हाल हाल करून मारलं. तिघांचा अपराध एकच होता, तो म्हणजे तिघेही ज्यू होते.

इझराईलसाठी हे आता सहन करण्यापलीकडे गेलं होतं. तेल अवीवमध्ये पंतप्रधान गोल्डा मायर यांनी मोसादला ब्लॅक सप्टेंबरच्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. हा मोसादचा ब्लॅक सप्टेंबरवर केलेला निर्णायक हल्ला असणार होता. ऑपरेशन राथ ऑफ गॉड मधला एक महत्वाचा टप्पा. या ऑपरेशनचं नाव ठेवण्यात आलं स्प्रिंग ऑफ युथ आणि याचं प्रमुख लक्ष्य होता अली हसन सलामेह, द रेड प्रिन्स!

क्रमशः

संदर्भ:
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements
५. Mitrokhin Archives – by Vassili Mitrokhin

इतिहासलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2016 - 9:34 am | श्रीरंग_जोशी

जबरदस्त घडामोडींनी भरलेला हा भागही आवडला.

मिपावर वाचलेली Munich Massacre... Operation Wrath of God ही लेखमालिका आठवली (लेखक मोदक).

वा.. पाडव्याला तोंड गोड केलेत.

आधी प्रतिक्रिया. आता वाचतो.

प्रचेतस's picture

8 Apr 2016 - 10:16 am | प्रचेतस

हाही भाग भन्नाट.

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:54 pm | अ-मॅन

धाग्यावर आलो.

महासंग्राम's picture

8 Apr 2016 - 10:42 am | महासंग्राम

अली हसन सलामेह --- वाह पाडव्याला काय भन्नाट वाचनीय भेट दिली आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2016 - 11:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भ न्ना ट बोकोबा!!! पुभाप्र!!

पुभाप्र पुभाप्र पुभालटा!

खिळवून ठेवणारी. मस्तच.

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2016 - 12:10 pm | टवाळ कार्टा

खत्रा

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2016 - 12:12 pm | पिलीयन रायडर

आजवर बॉण्ड किंवा MI वाले ढिशुम ढिशुम पिक्चर्स काल्पनिक आणि अतिरंजित वाटायचे. ते ही फिके पडतील असली तर ही स्टोरी आहे!!! खतरनाक..

पण आता ह्या वेळेला पटकन पुढचा भाग टाकायचा हं.. हे प्रकरण अर्धवट राहिलय.. त्याचा फार त्रास होतो..

नया है वह's picture

8 Apr 2016 - 12:14 pm | नया है वह

हा भाग खुप आवडला

पुभाप्र

नरेश माने's picture

8 Apr 2016 - 12:17 pm | नरेश माने

मस्तच! खुप सुंदर आणि उत्कंठतावर्धक लेखमालिका.

येस. पाडव्याची मेजवानी. आणि योगायोग म्हणजे कालच मोदकरावांचे Munich Massacre... Operation Wrath of God वाचत होतो तर आज हे.
मस्तच !!!

स्पा's picture

8 Apr 2016 - 2:07 pm | स्पा

जबराट मोसाद ए आझम

लवकर टाका पुढचा भाग, अशी मोसाद भारतात कधी तयार होणार?

नाना स्कॉच's picture

8 Apr 2016 - 5:03 pm | नाना स्कॉच

झाली असली तयार तरी ती भारतीय मोसाद "या या आम्ही बघा कशी जम्माडी जम्मत करतोय तो ख्योळ पहा" म्हणून अक्षता वाटत तर फिरत नसेल नाही का?

नाही म्हणजे असे मला वाटले बुआ, बाकी आपण सुज्ञ माणसे आहात :)

ऑन अ सीरियस नोट,

भारतात मोसाद मॉडेल कितपत चालेल ही एक शंका आहे .

अद्द्या's picture

8 Apr 2016 - 2:49 pm | अद्द्या

बेस्ट .

पाडव्याचा मुहूर्त साधलाच चांगला .

येउदे पुढचा भाग

अभ्या..'s picture

8 Apr 2016 - 3:04 pm | अभ्या..

मोसाद भारीच पण पॅलेस्टीनींच्या चिवटपणाचे कौतुक वाटते. कसला कडवेपणा कसा जोपासतात कुणास ठाऊक.

शान्तिप्रिय's picture

8 Apr 2016 - 3:35 pm | शान्तिप्रिय

मस्त!

नाना स्कॉच's picture

8 Apr 2016 - 5:05 pm | नाना स्कॉच

बाकी बोका साहेब

ऍव्हनेर यारीव्ह आपण असला उभा केला आहे की डोळ्यासमोर प्रथम येतो तो एरिक बानाच!!.

सुधीर कांदळकर's picture

8 Apr 2016 - 5:14 pm | सुधीर कांदळकर

वेगवान, थरारक वगैरे. ज्यूंवर अत्याचार झाले तसेच स्लाव, हिप्पी, कुर्द वगैरेंवर देखील झाले. भारतीयांवर ब्रिटिशांनी, मुघलांनी केले. स्पॅनिशांनी दक्षिण अमेरिकेत तर हैदोसच घातला. पण गवगवा ज्यूंनीच केला असावा. प्रतिशोध फक्त मोसादनेच घेतलेला दिसतोय. इतरांनी उगवलेल्या सूडाच्या कौतुकाबद्दल फारसे कधी वाचण्यात आले नाही.

आणखी एक सुरेख लेख वाचायला मिळाला. धन्यवाद. पुभाप्र.

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2016 - 3:31 pm | अत्रन्गि पाउस

काय असावे ??
वेगवेगळ्या देशात विखुरलेला धर्मनिष्ठ समाज, ज्यांची भाषा वेगवेगळी ....कसे काय साध्य केले असावे ?
फक्त "पुढच्या वर्षी जेरुसलेम" हि २००० वर्षे जपलेली ...पिढ्यान पिढ्या जपलेली घोषणा ....

नाखु's picture

12 Apr 2016 - 2:39 pm | नाखु

भागात दिलेय उत्तर बोकोबांनी

त्यामुळे संपूर्ण जगभर इझराईल आणि अरब यांच्यातलं छुपं युद्ध खेळलं जाणार आणि इझराईलचा सूड उगवण्याची संधी अरब दहशतवादी जगभर शोधत फिरणार, हे उघड होतं. अशा वेळी भरपूर लोक कामावर ठेवून सगळ्या जगाला आपण कोण आहोत हे सांगण्यापेक्षा गुप्तपणे काम करणं हे मोसादचं धोरण होतं, आणि गुप्तता ठेवायची असेल तर जितके कमी लोक तेवढं बरं – असा हा सरळ हिशोब आहे.

पण याचा अर्थ असा नाही की मोसादचं लोक कमी असल्यामुळे अडतं. इझराईलच्या निर्मितीनंतर जगभरातल्या ज्यू लोकांसाठी इझराईल हे एक हक्काचं घर आहे. पण अजूनही जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशात ज्यू लोक आहेत. एवढंच नाही तर ते सुशिक्षित आहेत. त्यातले बरेच जण स्वतःच्या व्यवसायांत आहेत. काही जण बँका, विमा कंपन्या, पत्रकारिता अशा व्यवसायांमध्ये आहेत. ते ज्या देशांत आहेत, तिथे त्यांना मान आहे, किंवा नाझींप्रमाणे कोणी त्यांच्या जीवावर उठलेलं नाहीये. ते कदाचित त्या देशाचे निष्ठावंत नागरिकही असतील, पण त्याचबरोबर इझराईलशी त्यांची बांधिलकी आहे. धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक, पण ती आहे हे निश्चित. मोसादकडे अशा लोकांची यादी असते.

आपल्याकडे रॉ बद्दल अगदी रॉ माहीतीही नाही तर आदराचे तर सोडाच.

बोका लिखाण पंखा नाखु

मार्गी's picture

8 Apr 2016 - 5:29 pm | मार्गी

जोरदार! पु. भा. प्र.

लिलहॅमर अफेअर पुढच्या भागात असणार बहुतेक!

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2016 - 3:25 pm | अत्रन्गि पाउस

मोसाद आणि बोकोबांची कथनशैली ...बोलावे तितके कमीच ...
लहान मुले झोपतांना "अजून एक गोष्ट सांग" असा हट्ट करतात तसा करावासा वाटतो इतकेच :)

पद्मावति's picture

12 Apr 2016 - 1:07 am | पद्मावति

मस्तं!! पु.भा.प्र.

अर्धवटराव's picture

12 Apr 2016 - 1:43 am | अर्धवटराव

राहुन राहुन वाटतं कि त्याकाळत इतके आतपर्यंत झिरलपे होते हे गुप्तहेर... आज काय परिस्थिती आसेल. आणि प्रत्यक्ष भारतात काय सिचुएशन असेल.

पैसा's picture

12 Apr 2016 - 1:04 pm | पैसा

थरारक! दहशतवादी लोक लेखक वगैरे मंडळींचा उपयोग करून घेतात हे फार जुनेच आहे तर!

जव्हेरगंज's picture

12 Apr 2016 - 6:55 pm | जव्हेरगंज

मस्त हा भाग पण आवडता.
पुभाप्र.

सुधांशुनूलकर's picture

12 Apr 2016 - 9:39 pm | सुधांशुनूलकर

श्वास रोखून प्रत्येक भाग वाचला आहे. मस्तच चाललीये लेखमाला.
प्रत्यक्ष भेटीत या लेखमालेबद्दल सविस्तर बोलणं झालं होतंच. यासाठी किती सखोल अभ्यास, विस्तृत वाचन लागतं याची कल्पना आली.

अरिंजय's picture

13 Apr 2016 - 11:43 am | अरिंजय

ताबडतोब पुढचा भाग टाका बघू.

मी-सौरभ's picture

13 Apr 2016 - 4:15 pm | मी-सौरभ

हा भाग अर्धाच आहे त्यामुळे पु. भा.ल. टा.

सोनुली's picture

15 Apr 2016 - 11:23 am | सोनुली

पुढची गोष्ट लवकर सांगा.

बोका-ए-आझम's picture

19 Apr 2016 - 1:12 am | बोका-ए-आझम
सोनुली's picture

19 Apr 2016 - 1:29 am | सोनुली

वाचत आहे.

हेम's picture

28 Jul 2016 - 4:04 pm | हेम

भाग ११ वा कधी येतोय???

हेम's picture

28 Jul 2016 - 4:10 pm | हेम

मिळाला...