ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
16 May 2016 - 8:00 am

LPGHomemakerपरिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.

दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण. एकाची बस 6.55 ची तर दुसऱ्याची 7.05 ला म्हणजे सकाळी 6.45 ला सर्व म्हणजे डबे - मोठा - पोळीभाजीचा, छोटा - स्नॅक्सचा, या डब्यांच्या बरोबरीने चहा, दूध, एखाद्या वेळेस पाणी नसेल, वीज नसेल तर गॅस च्या चूलीवर पाणी तापविणे - एक ना अनेक कामे फक्त दोन बर्नरच्या शेगडीवर. सगळी कामे एकाचवेळी मल्टीटास्कींग करुन करावी तर काही तरी पर्याय हवा म्हणून "चार बर्नरची शेगडी" असती तर? असा विचार मनात आला आणी आम्ही उभयतांनी - गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खरेदी करु - असा विचार केला.

गुढीपाडवा आला पण दुपार पर्यंत बाजारात जाण्यास कामातून वेळच नाही मिळाला, पण मुहुर्त साधायचा म्हणून उन्हं कलताच दोघेही बाहेर पडलो. आता पहिला प्रश्न आला कोणत्या दुकानात जावे? मुंबई ग्राहक पंचायतीच्या "ग्राहक पंचायत पेठे" मध्ये प्रेस्टीज (टीटीके प्रॉडक्टस्) चा स्टॉल होता, त्यांचे सिंहगड रोडला कंपनी आऊटलेट आहे असे समजले होते म्हटले श्रीगणेशा तेथून करावा.

प्रेस्टीजच्या दुकानात शिरलो आणी चार बर्नरच्या गॅस शेगड्या दाखवा असे सांगितल्यावर विक्रेत्याने एकदम हॉब टॉप व ग्लास टॉप असे शेगड्यांचे प्रकार दाखवायला सुरुवात केली. आकर्षक असे प्लेटींग केलेले बर्नर, वर लावलेली हार्डन्ड/टफन्ड ग्लास, ऑटो इग्नीशनची सोय, ओट्यावर किंवा ओट्यामध्ये (हॉब असेल तर हॉबमध्ये) ठेवण्याची सोय, पाईप जोडण्याचे नोझल 360 डिग्रीमध्ये फिरणारे अशा एका ना अनेक सुविधा. या शेगड्यांपुढे घरची दोन बर्नरची शेगडी अगदीच छोटी वाटू लागली. या सगळ्या ग्लासटॉप शेगड्यांमधून शेवटी एक निवडली आणी खरेदी अंतिम टप्प्यात येण्यापूर्वी आमच्या दोघांच्याही डोक्यात या शेगड्यांना ISI (Indian Standard Institute) मार्क आहे का? असा प्रश्न आला. आम्ही त्या विक्रेत्याला लगेच ते विचारले आणी आम्हाला उत्तर ऐकून धक्काच बसला. त्याने सांगितले कोणत्याही ग्लास टॉप, हॉब टॉपला ISI मार्क येत नाही.

झालं! , त्या विक्रेत्याला ती शेगडी ठेवायला सांगुन आम्ही घरी परतलो, पण हा ISI चा मार्क डोक्यातूनही जाईना. मग विचार केला की आणखी एखाद्या दुकानात शेगड्या पहाव्यात. सिंहगड रोड वरचे गॅस शेगड्यांचे दुसरे शो-रुम ज्योती गॅस या ठिकाणी आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो व त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या शेगड्या पहायला सुरुवात केली पण यावेळी सुरुवातीलाच आम्ही आम्हाला ISI मार्क असलेलीच ग्लास टॉप किंवा हॉब टॉप दाखवा असे म्हटल्यावर एक आश्चर्यकारक उत्तर या शोरुम मधील विक्रेत्याकडून मिळाले ते म्हणजे या शेगड्यांना ISI मार्कची आवश्यकता नाही. आम्ही थोडेसे हबकूनच गेलो, कारण मुंबई ग्राहक पंचायती मार्फत मुंबईत BIS (Bureau of Indian Standards) च्या प्रशिक्षण शिबिरात घरगुती उपकरणांमध्ये गॅस, विजेची उपकरणे इत्यादींना ISI मार्क असलाच पाहिजे असे सांगितलेले होते इथे काही वेगळेच ऐकायला मिळत होते. याच शोरुम मध्ये इतर कंपन्यांच्याही शेगड्या होत्या व तेथील विक्री प्रतिनिधीने अशा कोणत्याही ब्रँडच्या ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगड्यांना ISI मार्क येत नाही असे ठामपणे सांगितले. वर अशी ISI मार्क असलेली ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगडी आम्हाला दाखवाच असे आव्हानही दिले. आम्ही ज्योती गॅसच्या व्हीजीटर बुक मध्ये आमचा नांव पत्ता नोंदवूनही आलो.

असा शेगडीचा शोध दोन, तीन ब्रँडस् पुरता मर्यादीत न ठेवता हाच शोध लक्ष्मी रोड, अप्पा बळवंत चौक इत्यादी शहराच्या मध्यवर्ती परिसरांतील दुकानांतून घेतला असता विविध ब्रँड्सच्या शेगड्यांचीही हिच परिस्थिती आढळून आली. काही ब्रँडच्या बाबतीत ते ब्रँड्स आंतरराष्ट्रीय (इटली, जर्मनी इ.) असल्याने ISI मार्कचे बंधन नाही असेही काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तर काही विक्रेते ISO असल्याचे सागून ISI मार्कशी साधर्म्य असल्याचे दर्शवित होते. पण त्यांना ISI हा मार्क सुरक्षेचा असतो व ISO हे प्रशासनिक प्रमाणीकरण असते असे सांगितल्यावर, सदर विक्रेत्यांनाच ISI मार्क बद्दलची माहिती नसल्याचे किंवा अपुरी माहिती असल्याचे जाणवले. विक्रेत्यांकडे माहिती घेतली असता "शेगडीमुळे अजुनपर्यंत कोणतेही अपघात झालेले नाहीत" असाही एक शेरा एका विक्रेत्याकडून ऐकायला मिळाला. आमच्या मनात एक प्रश्न आला की जर गॅसला जोडलेले सिलंडर ISI मार्क असेलेले असायलाच हवे, त्या सिलेंडरला जोडलेला गॅस रेग्युलेटर ISI मार्क असलेला हवा, या रेग्युलेटरला जोडलेला रबरी/होज पाईपही ISI मार्क असलेला हवा, पण हे सगळं ज्या शेगडीला जोडायचे ती मात्र ISI मार्क नसलेली? हे काहिसे मनाला पटेना कारण गॅस शेगडीची पुर्ण व्यवस्थाच ISI प्रमाणित हवी, कारण अपघात या व्यवस्थेतील कोणत्या घटकामुळे होतील हे सांगता येत नाही.

हा ISI चा मार्क काही केल्या डोक्यातून जाईना, कारण आम्ही शोरुम्स मध्ये असे पर्यंत इतर ग्राहकांना अशा शेगड्यांची धडाक्यात विक्री सुरु होती.

शेगडीला ISI मार्क सक्तीचा आहे का नाही या करीता अंधेरी, मुंबई येथील BIS कार्यालयातील अधिकाऱ्यांना ई-मेल करुन विचारले असता त्यांनी तो ई-मेल संबंधित तांत्रिक विभागाला तो ई-मेल पाठविलेला आहे असे सांगितले. त्यानंतर या अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांच्याजवळ चर्चा केली असता सदर शेगड्या ह्या सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत नसून उत्पादकाने ISI मार्क घ्यायला हवा असे सांगितले. पण गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडणारा पाईप हे सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत आहेत, पण गॅसची शेगडी मात्र नाही हे जरा अनाकलनीय वाटले. याच अधिकाऱ्यांनी ग्राहकांनी जर मोठ्या संख्येने BIS कडे अशी मागणी केल्यास BIS अशा यादीत हे उत्पादन जोडू शकते व उत्पादकांना ISI मार्क वापरणे सक्तीचे / बंधनकारक करु शकते असे सांगितले. परंतू सर्वसाधारण ग्राहकाचा विचार केला असता असे उपकरण अशा संस्थेने ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर अशा सक्तीच्या यादीत जोडण्यापेक्षा ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता आपणहून या सक्तीच्या यादीत (Mandatory List) टाकायला हवे.

या सबंधी आणखी एक बाबही लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे काही ब्रँड्सच्या स्टीलच्या तीन, चार बर्नरच्या शेगड्या ISI मार्क असलेल्या होत्या शिवाय त्यांची किंमतही या हॉब टॉप, ग्लास टॉप शेगड्यांपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी होती, पण या हॉब टॉप, ग्लास टॉप दिसायला आकर्षक व त्यातील सोयीसुविधांमुळे सर्वसाधारण मध्यमवर्गीय ग्राहक या जास्त असलेल्या किंमतींकडे दुर्लक्ष करुन याच शेगड्या खरेदी करत असल्याचे दिसून येत होते.

घरगुती गॅस शेगड्यांकरीता IS:4246 हे मानक वापरले जाते जे सर्वसाधारणपणे स्टीलच्या दोन, तीन, चार बर्नरच्या शेगड्यांना वापरले जाते असे निदर्शनास आले आहे. या IS:4246 मानकाचे शेवटचे अद्यतन (Update) 2002 या वर्षी केलेले दिसत आहे. गेल्या 14 वर्षात बाजारात या उत्पादनात अनेक बदल झालेले दिसत आहेत. पण वर उल्लेख केलेले हॉब टॉप, ग्लास टॉप किंवा मल्टी बर्नर फॅन्सी कुक-टॉप्स गेले 8 ते 10 वर्षे बाजारात विना-सुरक्षा मानकीकरणाने विकले जात आहेत.

या संदर्भात काही मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी चर्चा / विचारणा करताना या ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे, ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे, हॉब टॉप शेगड्या ह्या ओट्यामध्ये बसविलेल्या असल्याने त्या शेगड्यांमध्ये गॅस मंद पेटणे, या शेगड्यांचे बर्नर आकर्षक दिसण्यासाठी प्लेटेड स्टील, अल्युमिनियम अलॉय अशा प्रकारचे असल्यानेही ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे अशा अनेक समस्यांची यादीच समोर आली.

या सगळ्या बाबींचा विचार करता, सध्या असलेले ISI मार्कचे प्रमाणीकरण हे फक्त स्टीलच्या शेगड्यांपुरते मर्यादीत न ठेवता या हॉब टॉप्स, ग्लास-टॉप्स, कुकटॉप्सनाही किंवा सर्व प्रकारच्या गॅस शेगड्यांना सक्तीचे करावे असे वाटते कारण कोणत्याही प्रकारची गॅस शेगडी ही सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडलेला पाईप यांच्यासह एक व्यवस्था असते. बाजारात धडाक्याने विकणारे वितरक व उत्पादक,
ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता याअनुषंगाने ग्राहकांच्या जास्त करुन स्त्री वर्गाच्या जिवाशी खेळ करीत आहेत का? असा प्रश्न पडतो. आणी समजा या प्रकारच्या शेगड्यांना ISI मानकाकरीता नोंदविण्यास काही समस्या असतील तर अशा शेगड्या ग्राहकांनी वापराव्यात की नाही? हे ठरविण्याची वेळ आलेली दिसते. ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील राजा असतो असे म्हणणारे खरंच ग्राहकाला अशी वागणूक देतात का? पण ग्राहकालाच या समस्यांची जाणीवच नसेल व तो जागृत नसेल तर बाजारात असे जिवाशी खेळ करणारे वितरक, उत्पादक अशी उत्पादने विकायला तयारच आहेत. त्यामुळे ग्राहकांनीच अशा उत्पादनांबाबत तक्रार, संबंधित नियामक संस्थांकडे करुन प्रमाणीकृत उत्पादनेच बाजारात येतील, विकली जातील याची काळजी घेतली पाहिजे. अशा चकचकीत दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या उत्पादनांपेक्षाही आपली स्वतःची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळेच “काय भुललासी वरलिया रंगा” या प्रमाणे वरवरच्या अशा उत्पादनांच्या रंग रुपाला न भुलता ती उत्पादने वापरण्यास किती सुरक्षित आहेत हे प्रथम पहावे.

या संदर्भात तेल कंपन्या पुरवित असलेल्या विम्यासंदर्भात इंटरनेटवर शोध घेतला असता अशा उपकरणांना ISI मार्क असलाच पाहिजे असा उल्लेख आढळतो, पण उपकरणे म्हणून त्यात सिलेंडर, पाईप, शेगडी असा वेगवेगळा उल्लेख दिसत नाही. या संदर्भात एचपी गॅस तसेच भारत गॅस या कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपनी जर गॅस शेगड्यांना ISI मार्क नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विमा रक्कम देण्यास नकार देऊ शकतात असे सांगितले.

तसेच काही राज्यात व आपल्या राज्यातील नागपूर विभागात घरोघर जाऊन गॅस निरिक्षक गॅस उपकरणांची तपासणी करुन त्यात त्रूटी असतील तर त्या दूर करायला सांगतात किंवा गॅस संदर्भात काही अनधिकृत गोष्टी आढळल्या तर सदर गॅस जोडणीच रद्द करु शकतात अशीही माहिती या संदर्भात समोर आली आहे. या अनधिकृत गोष्टींमध्ये गॅस शेगडीचाही उल्लेख आहे, परंतू गॅस शेगडीला ISI मार्क अशा निरिक्षणांमध्ये असायलाच हवा कि नाही या संदर्भातही गॅस कंपन्यांकडून खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

म्हणून अशा सर्व भूलभुलय्याच्या वातावरणात ग्राहकानेच म्हणजेच आपण सर्वांनी सजग राहून आपणच आपली सुरक्षितता ही सर्वोच्च आहे याची मनाशी खूणगाठ बांधून अशा व इतर उत्पादनांना ISI मार्क आहे ना याची खात्री करुनच अशी उत्पादने विकत घ्यावीत व वापरावीत. सदर लेखातील अनुभव हा फक्त गॅस शेगडीकरीता मर्यादीत न ठेवता विद्युत उपकरणे व इतर अशीच महत्वाची उपकरणे यांनाही तपासून पहावा याच करीता हा लेखन प्रपंच.

- सौ. स्नेहल मिलिंद चुटके,
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनसमीक्षामाहिती

प्रतिक्रिया

हकु's picture

16 May 2016 - 9:45 am | हकु

बरीच महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! सर्वसामान्य ग्राहक या गोष्टीचा विचार करत असेल असं वाटत नाही.

वामन देशमुख's picture

16 May 2016 - 9:55 am | वामन देशमुख

माहितीबद्धल धन्यवाद!

"या शेगड्यांना ISI मार्कची आवश्यकता नाही"

हे आणि

"विमा कंपनी जर गॅस शेगड्यांना ISI मार्क नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विमा रक्कम देण्यास नकार देऊ शकतात"

हे रोचक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2016 - 10:09 am | डॉ सुहास म्हात्रे

उपयुक्त माहिती.

गँस पुरवठा करणारी कंपनी अप्रमाणीत शेगडीचा पुरवठा बंद करू शकते का

मोदक's picture

16 May 2016 - 10:27 am | मोदक

उपयुक्त माहिती.!!

पैसा's picture

16 May 2016 - 10:46 am | पैसा

अतिशय उपयोगी आणि महत्त्वाची माहिती.

टवाळ कार्टा's picture

16 May 2016 - 3:59 pm | टवाळ कार्टा

+१

कपिलमुनी's picture

16 May 2016 - 12:33 pm | कपिलमुनी

धन्यवाद!

अत्यंत महत्वाची गोष्ट. तथापि वरलिया रंगाला भुलून सुरक्षिततेपेक्षा आकर्षकतेमागे धावणारा ग्राहकवर्ग हे लक्षात घेईलसं वाटत नाही.

चौथा कोनाडा's picture

16 May 2016 - 12:43 pm | चौथा कोनाडा

अतिशय उपयुक्त माहिती ! धन्यवाद !

या संदर्भात काही मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी चर्चा / विचारणा करताना या ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे, ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे, हॉब टॉप शेगड्या ह्या ओट्यामध्ये बसविलेल्या असल्याने त्या शेगड्यांमध्ये गॅस मंद पेटणे, या शेगड्यांचे बर्नर आकर्षक दिसण्यासाठी प्लेटेड स्टील, अल्युमिनियम अलॉय अशा प्रकारचे असल्यानेही ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे अशा अनेक समस्यांची यादीच समोर आली.

या पैकी "शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे" ही साधारण समस्या सोडुन इतर बाबतीत त्या कंपन्यांनी चाचण्या केल्या नसतील ? या समस्या तर परफॉरमन्स व सुरक्षिततेशी संबधित आहेत. एक वेळ परफॉरमन्सचे सोडुन देवु पण सुरक्षिततेशी संबधित चाचण्या नसतील केल्या नस्तील ? आय डाऊट.
जाणकार मिपाकरांच्या प्रतिक्षेत.....

केल्या असतील ना चाचण्या. कदाचीत अशा - करो कैसा तो बी अ‍ॅडजस्ट . इंडीयन मार्केटमें चलता है. जभी पुछेंगे तभी देखेंगे.

रस्त्यावर हेल्मेट नाहीत का मिळत नॉन आयएसआय वाली ?

अजया's picture

16 May 2016 - 12:45 pm | अजया

माहितीपूर्ण लेख.
याच कारणासाठी दोन वर्षापूर्वी तीन बर्नर्सची स्टिलची शेगडी घेतली.
दुसरे म्हणजे याच काळात गॅस एजन्सीकडून ग्लास टाॅप शेगड्यांचे जोरदार मार्केटिंग सुरू होते.तेव्हा यावर आय एस आय नाही याच कारणानी शेगडी नाकारली होती.

आदिजोशी's picture

16 May 2016 - 12:58 pm | आदिजोशी

केवळ ह्याच कारणासाठी चार बर्नर टाळून ३ ची जुन्या स्टाईलवाली शेगडी घेतली.
जीवाशी खेळ होऊ शकणार्‍या गोष्टी (हेल्मेट, गॅस टॉप, गिझर) ह्या गोष्टींना आय एस आय मान्यता हवीच

पिलीयन रायडर's picture

16 May 2016 - 4:00 pm | पिलीयन रायडर

अगदी हेच!

मुळात स्टीलची वापरायलाही जास्त सोपी असते.

लेख उपयुक्त आहे अगदी!

बबन ताम्बे's picture

16 May 2016 - 1:00 pm | बबन ताम्बे

डोळे उघडणारा लेख.

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 3:28 pm | बोका-ए-आझम

जेव्हा नवीन गॅस शेगडी घ्यायची वेळ येईल तेव्हा हे लक्षात ठेवलं जाईलच.

अतिशय महत्त्वाची बाब आहे ही. धन्यवाद!

रघुनाथ.केरकर's picture

16 May 2016 - 3:52 pm | रघुनाथ.केरकर

ISI not applicable

टवाळ कार्टा's picture

16 May 2016 - 4:23 pm | टवाळ कार्टा

आयला याला ग्लास टॉप शेगडी म्हणतात? आम्च्याकडे हिच आहे...ISI आहे कि नाही ते माहित नाही

रंगासेठ's picture

16 May 2016 - 4:19 pm | रंगासेठ

आम्ही पाडव्याला ग्लास टॉपची शेगडी घेतली. त्यावेळी याचा विचारच केला नाही :-(
आत्ता अधिक सावधानता बाळगणे आले म्हणजे.

राजकुमार१२३४५६'s picture

16 May 2016 - 4:49 pm | राजकुमार१२३४५६

आयला...मी पण ग्लास टोप चीच घेणार होतो पण किंमत ऐकून बजाज ची चार बर्नर वाली स्टील ची घेतली. त्यामुळे बायकोची खूप बोलणी ऐकून घ्यावी लागली. आता हा लेख वाचून एखादा ऑस्कर जिंकल्यासारख फील होतंय. :D

ग्लास top शेगडी विकत घेताना विक्रेत्याने मला स्टील चीच शेगडी घ्यायला लावली, स्टील टिकवू आहे, स्वच्छतेला सोपे जाते आणि सुरक्षित आहे असे सांगितले होते ( सदर विक्रेता ओळखीचा होता ), व शेगडी तालुक्याच्या ठिकाणा हून घेतली होती, साधारण २ वर्षापूर्वी त्याने ISI मार्क विषयी सांगितले होते, हा मुद्दा स्मरणात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. शक्यतो अशी खरेदी ओळखीच्याच ठिकाणाहुन करा पैसा वाचतो आणि सुरक्षितता हि लाभते .

रेवती's picture

17 May 2016 - 4:17 am | रेवती

महत्वाची माहिती.

नमकिन's picture

17 May 2016 - 8:44 am | नमकिन

शेवटी घरी काय घेऊन आलात?
आमच्याकडे एकदा बाहेर पडलो की रिकाम्या हाती परत येत नाहीं, यायचे ते काम फत्ते करुनंच!

किसन शिंदे's picture

17 May 2016 - 10:06 am | किसन शिंदे

अतिशय महत्वपूर्ण गोष्ट तुम्ही निदर्शनास आणून दिलीये. काही दिवसांपूर्वी आम्ही श्री आणि सौ एका मित्राच्या घरी गेलो असता, त्या मित्राच्या बायकोने आमच्या सौं ना नुकतीच घेतलेली ग्लास टाॅपची चकचकीत शेगडी दाखवली. झालं! आता आमच्या सरकारांना तशीच शेगडी हवी असा पाठीमागे तगादा सुरू आहे.

या लेखाबद्दल धन्यवाद. तिला हा लेख वाचायला देतो.

थोडक्यात रन आउट झाल्यावर तो नो बॉल असल्याचे कळल्यावर होतो तसा आनंद झालेला दिसत आहे महाराजांना :)

संजय पाटिल's picture

17 May 2016 - 4:38 pm | संजय पाटिल

हा हा पण नो बॉल वर रनाउट हा आउट अस्तो..

किसन शिंदे's picture

17 May 2016 - 7:12 pm | किसन शिंदे

=))

स्वधर्म's picture

17 May 2016 - 12:29 pm | स्वधर्म

अंत्यंत उपयुक्त माहिती, धन्यवाद. याबाबत, मिपाकर सदस्यही BSI ला ई मेल लिहू शकतील असे वाटते. त्यांचा ई मेल इथे दिला तर हे करता येइल.

अतिशय उपयुक्त माहिती.

आम्ही गेल्या २-३ वर्षांपासून वापरतोय ग्लास टॉप शेगडी पण विकत घेताना ह्या महत्वाच्या बाबीचा विचार केला नव्हता.
आत्ता चेक करावं लागेल की शेगडी आय.एस.आय प्रमाणित आहे कि नाही ते.

राजाभाउ's picture

17 May 2016 - 4:23 pm | राजाभाउ

अत्यंत महत्वाची व उपयुक्त माहीती.

सुबोध खरे's picture

17 May 2016 - 8:54 pm | सुबोध खरे

केवळ आय एस आय ने प्रमाणित केले नाही म्हणून त्या गोष्टी कमी दर्जाच्या कशा होतात? सरकारी खाती "आपल्या वेगाने" काम करतात
आपण वापरत असलेला संगणक किंवा भ्रमणध्वनी हा आय एस आय मार्क असलेला आहे का? भ्रमणध्वनीच्या ब्याटरीचा स्फोट झाल्याने माणसाना इजा पोहोचल्याची किंवा दगावल्याची उदाहरणे पण आहेत.
http://indiatoday.intoday.in/story/man-dies-as-mobile-phone-explodes-dur...
http://www.dailymail.co.uk/news/article-1134838/Man-killed-mobile-phone-...
केवळ काचेचा वरचा पृष्ठभाग आहे म्हणून तो गरम होऊन तडकेल या म्हणण्यामागे अज्ञान दिसून येते. बोरोसिल कंपनीची काचेची भांडी आपण स्वयंपाकाला किंवा मायक्रो वेव्ह मध्ये सदा सर्वदा वापरता आहोत, त्याचा एवढा बाऊ करताना कोणी आढळले नाही.
टफण्ड काच असेल तर ती सहज सहजी फुटत नाही किंवा अतिशय गरम करूनही तडकत नाही. मुळात स्वयम्पाक् घरातील पदार्थांचे तपमान जास्तीत जास्त २५०-३०० सेल्सियस च्या वर जात नाही( ओव्हनमधील अतिगरम झालेले भांडे). उकळत्या तेलाचे तापमान याहूनही कमी असते. या तापमानाला या काचेला काहीही होत नाही. किंवा एक लिटर चे भरलेले पातेले पडले तरीही या काचेला काहीच होत नाही. आपण हातोडीच मारली तर गोष्ट वेगळी. पण याने सुद्धा त्या काचेचे अर्धा ते एक सेंटी मीटर चे धारदार कडा नसलेले तुकडे होतात.( कारची काच फुटलेली आपण पाहतोच).
हि काच भल्यामोठ्या इमारतींना सुद्धा जर वापरली जाते तर शेगडीला वापरायला काय हरकत आहे?
या काचेला प्रक्रिया केल्यावर त्याची क्षमता १० हजार पी एस आय म्हणजे कारच्या टायरच्या ३०० पट दबाव सहन करण्याची क्षमता नसेल तर त्याला टफण्ड काच म्हणता येत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Toughened_glass
http://ezinearticles.com/?Advantages-and-Disadvantages-of-Glass-Temperin...
काचेचा महत्वाचा फायदा हा आहे कि त्याला स्टेनलेस स्टील सारखे चरे/ओरखडे पडत नाहीत किंवा स्वयंपाक घरातील रसायनाचे अजिबात परिणाम होत नाही किंवा चिकट गोष्टी अजिबात चिकटत नाहीत आणि ती साफ करायला जास्त सोपी असते आणि दिसायलाही सुंदर दिसते.
माझे वैयक्तिक मत असे आहे कि चांगल्या कंपनीची काच असलेली शेगडी बिनधास्तपणे विकत घ्यावी.
मी जी माहिती वाचली आहे ती चुकीची आहे असे कुणी दाखवून देणार असेल तर मी आपले मत बदलायला तयार आहे.
बाकी ग्राहक पंचायतीने त्याला आय एस आय मार्क असावा ह्याबद्दल सरकार जवळ आग्रह धरावा
परंतु तोवर काच असलेली शेगडी वापरायला धोकादायक आहे असे पुराव्या निशी सिद्ध करण्या अगोदर ग्राहकाना ती घेऊ नये असा सल्ला देणे चुकीचे वाटते.
काच असलेली शेगडी वापरायला धोकादायक आहे असा एकही पुरावा मला तरी अद्याप सापडलेला नाही. (मी बजाज या विख्यात कंपनीची शेगडी विकत आणण्याच्या अगोदर या गोष्टींचे बरेच वाचन केले होते.)

पुणे मुंग्रापं's picture

18 May 2016 - 11:25 am | पुणे मुंग्रापं

केवळ आय एस आय ने प्रमाणित केले नाही म्हणून त्या गोष्टी कमी दर्जाच्या कशा होतात? सरकारी खाती "आपल्या वेगाने" काम करतात

डॉ. खरे, लेखात कोठेही ISI नाही म्हणून त्या कमी दर्जाच्या आहेत असा उल्लेख/सुर नाही. सुरक्षिततेशी तडजोड केलेली आहे का? हा प्रश्न मात्र नक्कीच आहे.

आपण वापरत असलेला संगणक किंवा भ्रमणध्वनी हा आय एस आय मार्क असलेला आहे का? भ्रमणध्वनीच्या ब्याटरीचा स्फोट झाल्याने माणसाना इजा पोहोचल्याची किंवा दगावल्याची उदाहरणे पण आहेत.

भ्रमणध्वनी व गॅस आपली तुलना चुकतेय. गॅस हा ज्वालाग्रही पदार्थ असल्याने त्याचे सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप (रबरी व होज) या सर्वांना सक्तीने ISI घ्यावाच लागतो, त्याच व्यवस्थेचा भाग असलेली गॅस शेगडी का नाही हाच या लेखात सवाल आहे.

टफण्ड काच असेल तर ती सहज सहजी फुटत नाही किंवा अतिशय गरम करूनही तडकत नाही. मुळात स्वयम्पाक् घरातील पदार्थांचे तपमान जास्तीत जास्त २५०-३०० सेल्सियस च्या वर जात नाही( ओव्हनमधील अतिगरम झालेले भांडे). उकळत्या तेलाचे तापमान याहूनही कमी असते. या तापमानाला या काचेला काहीही होत नाही. किंवा एक लिटर चे भरलेले पातेले पडले तरीही या काचेला काहीच होत नाही. आपण हातोडीच मारली तर गोष्ट वेगळी. पण याने सुद्धा त्या काचेचे अर्धा ते एक सेंटी मीटर चे धारदार कडा नसलेले तुकडे होतात.( कारची काच फुटलेली आपण पाहतोच).

काच टफण्ड असो वा कोणतीही, गॅस स्फोटावेळेस तिचेही तुकडे इतरत्र उडून, शरिरात घुसुन त्याने आणखी जास्त इजा होण्याची शक्यता असते या कारणाने काचेचा वापर हा या प्रमाणीकरणात मान्य नसावा असे वाटते.

हि काच भल्यामोठ्या इमारतींना सुद्धा जर वापरली जाते तर शेगडीला वापरायला काय हरकत आहे?

वरचेच कारण याला लागू होत असावे काय? शिवाय इमारतीची काच त्याच्या मुळच्या संरचनेचा (RCC Structure, स्लॅब्ज, पिलर) भाग नसते, शेगड्यांमध्ये मात्र वरचा पुर्ण पृष्ठभाग हा काचेचा असल्याने काच फुटल्यास / तडकल्यास काय अवस्था होते हे एकदा गुगलवर इमेज शोधून पहा.

काचेचा महत्वाचा फायदा हा आहे कि त्याला स्टेनलेस स्टील सारखे चरे/ओरखडे पडत नाहीत किंवा स्वयंपाक घरातील रसायनाचे अजिबात परिणाम होत नाही किंवा चिकट गोष्टी अजिबात चिकटत नाहीत आणि ती साफ करायला जास्त सोपी असते आणि दिसायलाही सुंदर दिसते.

सुरक्षेच्या बाबतीतला तोटा हा प्रचंड नुकसान करणारा आहे, अर्थात अशा घटना वारंवार घडत नाहीत पण अशी एकही घटना घडू नये असाच या सुरक्षा मानांकनांचा प्रयत्न असावा.

माझे वैयक्तिक मत असे आहे कि चांगल्या कंपनीची काच असलेली शेगडी बिनधास्तपणे विकत घ्यावी.
मी जी माहिती वाचली आहे ती चुकीची आहे असे कुणी दाखवून देणार असेल तर मी आपले मत बदलायला तयार आहे.

आपल्या मताचा आदर आहे, पण वरची माहिती वाचून, चर्चा करुन, अनुभव विचारुन मगच निर्णय घ्यावा असे वाटते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या काही कार्यकर्त्यांकडेही अशा ग्लास टॉप्स आहेत पण या लेखामुळे त्या काढून टाकून लगेच ISI मार्क वाल्या घ्या असे म्हणणेही आततायीपणाचे होईल.

बाकी ग्राहक पंचायतीने त्याला आय एस आय मार्क असावा ह्याबद्दल सरकार जवळ आग्रह धरावा

असा आग्रह केला आहेच, पण ग्राहक जागृती हा असा उपाय आहे की त्याने अशा गोष्टींना सरकारही नाही म्हणत नाही.

परंतु तोवर काच असलेली शेगडी वापरायला धोकादायक आहे असे पुराव्या निशी सिद्ध करण्या अगोदर ग्राहकाना ती घेऊ नये असा सल्ला देणे चुकीचे वाटते.
काच असलेली शेगडी वापरायला धोकादायक आहे असा एकही पुरावा मला तरी अद्याप सापडलेला नाही. (मी बजाज या विख्यात कंपनीची शेगडी विकत आणण्याच्या अगोदर या गोष्टींचे बरेच वाचन केले होते.)

ग्राहकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे की नाही हा ज्या त्या ग्राहकाचा प्रश्न आहे. शिवाय काचेचेच काय पण स्टीलच्या असलेल्या फॅन्सी कुकटॉप्स, हॉबटॉप्स यांनाही किमान ISI मार्क न घेण्यामागे उत्पादकांची भूमिका काय आहे हे ही समोर आलेले नाही

सुबोध खरे's picture

18 May 2016 - 6:14 pm | सुबोध खरे

आपले म्हणणे
लेखात कोठेही ISI नाही म्हणून त्या कमी दर्जाच्या आहेत असा उल्लेख/सुर नाही

प्रत्यक्ष लेखन
या ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे, ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे, हॉब टॉप शेगड्या ह्या ओट्यामध्ये बसविलेल्या असल्याने त्या शेगड्यांमध्ये गॅस मंद पेटणे, या शेगड्यांचे बर्नर आकर्षक दिसण्यासाठी प्लेटेड स्टील, अल्युमिनियम अलॉय अशा प्रकारचे असल्यानेही ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे अशा अनेक समस्यांची यादीच समोर आली.
साहेब
लेखात दिलेल्या "ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे" हि तक्रार सोडली तर बाकी सर्व (नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे गॅस मंद पेटणे,ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे ) तक्रारींचा काचेचा टॉप असण्याशी काहीच संबंध नाही. इतर आय एस आय शेगड्या सुद्धा नीट जोडणी न केल्यास अशाच तक्रारी देऊ शकतात.
उगाच अहमदशहा ची शेंडी अब्दालीला लावली गेली आहे.

काच अतिशय तापल्यामुळे ती स्वच्छ न करता येण्यात काचेचा दोष नसून वापरणार्याचे अज्ञान आहे. गरम झालेली टफण्ड काच ओल्या कापडाने पुसली तरी ती तडकत नाही हे वापरणाऱ्या व्यक्तीस माहित नाही हा तंत्रज्ञानाचा दोष नाही.

राहिली गोष्ट स्फोट-- हा सिलींडरचा होतो नुसत्या ग्यासचा नाही. सिलींडरचा स्फोट झाला तर सिलिंडरच्या लोखंडाचे "गरम" तुकडे प्रचंड वेगाने फेकले जातात. त्यामुळे टफण्ड काचेचे तुकडे झाले तरी ते आपण म्हणता तसे नेहमीची काच तडकून तुकडे होण्याच्या तर्हेने अणकुचीदार होत नाहीत. त्याचे कारच्या काचेसारखे अर्धा ते एक सेमी धार नसलेले तुकडे होतात. उलट स्टील च्या शेगडीचे तुकडे झाले तर ते मात्र आपल्याला प्रचंड धोका पोहोचवू शकतील.
ग्यास लिक झाल्याने होणारे अपघात हे आग लागून होतील त्याचा आणी काचेच्या टॉपचा काहीही संबंध नाही.
गैरसमज नसावा.
आय एस आय मानांकनासाठी सरकारवर दबाव आणणे हे जरुरीचे आहे
पण म्हणून काचेच्या टॉपमुळे धोका आहे असे पटविण्याचे कोणतेही कारण मला तरी सापडलेले नाही. आपल्याजवळ तसा पुरावा असेल तर तो लोकांसमोर सादर करावा.
मी माझे मत बदलण्यास कधीही तयार आहे.
अन्यथा या लेखातील बरेचसे मुद्दे अज्ञानजन्य आहेत असेच म्हणावे लागेल.

असे लेख ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून येत असतील तर त्याच्या शास्त्रीय सत्यतेबद्दल खात्री असावी अन्यथा ग्राहक पंचायतीची विश्वासार्हता( आज तरी माझ्यासारखे अनेक लोक ग्राहक पंचायतीवर डोळे मिटून विश्वास ठेवतात) धोक्यात येऊ शकेल यासाठी हा प्रतिसाद.

क्रेझी's picture

18 May 2016 - 12:09 pm | क्रेझी

उत्तम लेख :)

सुबोध खरे's picture

18 May 2016 - 6:19 pm | सुबोध खरे

किमान ISI मार्क न घेण्यामागे उत्पादकांची भूमिका काय आहे हे ही समोर आलेले नाही
IS ४२४६-२००२ हे आय एस आय चे मानाकन आहे त्यात हॉब टॉप ई बद्दल काहीच प्रमाण दिलेले नाहीत.
उत्पादक स्वतःहून कशाला खाजवून खरुज काढतील. उगाच सरकारी अस्थापानाकडे जा आणी आपलाच वेळ आणी पैसा फुकट घालावा जोवर कायदा होत नाही तो वर चालू द्या.

बरखा's picture

2 Jun 2016 - 5:26 pm | बरखा

या लेखाद्वारे आपण अतिशय उत्तम माहिती दिली आहे.
मि ही अशी ग्लास टॉप शेगडी केवळ आकर्षणापोटी खरेदी केली. (ती मला बाजारी भावापेक्षा कमी दरात सेल मधे मिळाली. हे खरेदीचे अजुन एक कारण) घेतल्या पासुन केवळ चार महिने वापरली. कारण असे लक्षात आले कि सासु बाईना ती शेगडी वापरणे अवघड जात होते. ब-याच वेळेला त्यांच्या हातून बटन चालू रहायचे आणि ज्योत विझलेली असायची. सुरक्षेच्या काळजीने मी नविन वापरातील शेगडी काढुन पुन्हा जुनी स्टील ची शेगडी वापरण्यास काढली. त्या मुळे आपण नविन टेक्नोलॉजीचे काही खरेदी करताना आपल्या घरातील वयस्कर मंड्ळींचाही विचार करायला हवा हे लक्षात आले. कारण दोघेही नवरा- बायको नोकरी करणारे असतील तर पुर्ण वेळ घराची जबाबदारी ही त्यांची असते.