आजपर्यंत आपण मिपावर शेतकर्यांच्या आत्महत्यांबद्दल अनेक लेख, कथा, कविता आपण बघितल्या आहेत आणि त्यावर गरमागरम चर्चाही झाल्या आहेत. या आत्महत्या अत्यंत दु:खदायक आहेत आणि त्याबाबत त्वरीत व दूरगामी असे दोन्ही प्रकारचे उपाय होणे जरूरीचे आहे याबाबत दुमत नाही.
यासंबंधी दुष्काळनिवारण योजनांवर नादखुळा यांनी शेततळ्यांच्या प्रकल्पाच्या माहितीची अनेक शेतकर्यांचे अनुभव असलेली प्रबोधक लेखमाला लिहिली आहे.
या पार्श्वभूमीवर "ABP माझा" ने प्रसिद्ध केलेली आणि व्हॉट्सअॅपवर फिरणारी एक कथा नजरेस आली. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी ही कथा वाचली असेल. पण तरीही, ही सत्यकथा इतकी प्रेरणादायक आहे की हिच्या अनेक हजार पुनरुक्ती माफ व्हाव्या !
या कथेची सुरुवात झाली १९७२ साली, जेव्हा दुष्काळ होता पण त्याचा इतका बोलबाला नव्हता तेव्हा. तिचा नायक आहे लातूर परिसरातल्या एक दुष्काळग्रस्त शेतकरी तो सर्वसामान्य समजूतीप्रमाणे धडधाकट म्हणता येईल असा नाही... ४५ वर्षांपूर्वीच त्याने आपला एक हात गमावलेला आहे. पण, त्याचे कर्तृत्व सर्वसामान्य समजूतीप्रमाणे धडधाकट म्हणता येईल अश्या अनेक माणसांना आपल्या कर्तृवाची शरम वाटायला लावेल इतके भव्य आहे.
ही कथा मुळातून वाचावी अशीच आहे. मात्र, (व्हॉट्सअॅप वरून फिरत असली तरी) प्रताधिकार कायद्यात ते बसेल की नाही याबद्दल खात्री नसल्याने ती इथे टाकली नाही. परंतू खाली दिलेल्या दुव्यावर ती संपूर्ण कथा चित्रे व चित्रफितींसह आहे. ती जरूर पहा आणि शक्य तर इतरांनाही त्याबद्दल सांगा.
आज शेतकर्यांना इतर मदतीबरोबरच, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर विश्वास ठेवला तर ते काय करू शकतात याबद्दलच्या मार्गदर्शनाचीही गरज आहे... आणि हे त्या कथेद्वारे होईल असे वाटते.
या कथेच्या नायकाला, महादेवअप्पा चिद्रे यांना, कडक सलाम !
***************
बातमीचा दुवा : http://abpmajha.abplive.in/maharashtra/one-hand-no-problem-mahadev-appas...
सौजन्य : ABP माझा
By: राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद | Last Updated: Tuesday, 1 March 2016 11:06 AM
***************
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 11:58 pm | अभ्या..
जबरदस्त, ह्या जबरदस्त ढाण्या वाघाला प्रत्यक्ष पाह्यलंय मी.
जिद्द, चिकाटी अन डेरींग असावं तर असं. लाईफ असावं तर असं.
ह्याला म्हणतेत रिअल हिरो.
.
मुजरा घ्या आप्पा.
8 Mar 2016 - 9:46 am | नाखु
मुजरा आणि डॉ. अनेकानेक धन्यवाद. या पणत्या पाहिल्या की अंधाराची भिती वाटत नाही.
अभ्या पुढच्या वेळेला सोलापुरला आल्यावर भेट घडवून द्यायची जिम्मेदारी तुझी !!!
मिपा आवडतं ते या साठी (चांगल्याला चांगल म्हणायला अजिबात लाजत्बिजत नाही)
8 Mar 2016 - 10:51 am | प्रचेतस
अभ्या आणि नाखुकाकांशी सहमत.
8 Mar 2016 - 7:20 am | एस
वाचतो. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.
8 Mar 2016 - 7:33 am | यशोधरा
घरुन वाचेन. आपल्या त्या ह्यांनाही लिंक द्या म्हणे.
8 Mar 2016 - 7:53 am | नाव आडनाव
भारी !
बातमी वाचली. विडिओ नंतर बघणार.
8 Mar 2016 - 11:52 am | चाणक्य
+१
8 Mar 2016 - 9:19 am | आनन्दा
___/\___
8 Mar 2016 - 12:32 pm | बॅटमॅन
मुजरा. _/\_
8 Mar 2016 - 12:46 pm | असंका
अविश्वसनीय!!
_/\_
8 Mar 2016 - 2:04 pm | पद्मावति
जबरदस्त! _/\_
8 Mar 2016 - 2:41 pm | जेपी
शानदार ! जबरदस्त !! जिदांबाद !!!
8 Mar 2016 - 2:56 pm | मोहनराव
_/\_
8 Mar 2016 - 4:27 pm | प्रमोद देर्देकर
आप्पांना आणि त्यांच्या जिद्दीला त्रिवार मुजरा. या आगोदर कोणी बातमीदार , वृत्तापत्राने त्यांची दखल का नाही घेतली. निदान गेल्या १० वर्षातल्या काही आत्माहत्या झाल्या नसत्या.
9 Mar 2016 - 4:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही बातमी मी एबीपी माझावरून घेतली आहे. पण, अश्या बातमीला माध्यमे स्कॅम, इ सारखी खूप प्रसिद्धी देत नाहीत :(
त्त्यांच्या टीआरपी देवाचे महात्म्य, अजून काय ? !
अश्या प्रेरणादायक गोष्टी, आपल्यासारख्या सामान्य माणसांनीच, हल्ली सहजप्राप्त झालेल्या जालाच्या कृपेने, इतरांपर्यंत पोचवणे, हाच एक मार्ग आहे !
8 Mar 2016 - 5:45 pm | चांदणे संदीप
महादेवअप्पा यांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला सलाम!
___/\___
Sandy
8 Mar 2016 - 5:50 pm | तर्राट जोकर
दोन्ही हात जोडून साष्टांग दंडवत.
8 Mar 2016 - 6:04 pm | प्रीत-मोहर
__/\__
8 Mar 2016 - 6:24 pm | पैसा
जबरदस्त इच्छाशक्ती! प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व!
8 Mar 2016 - 11:26 pm | बोका-ए-आझम
महादेव अप्पांना साष्टांग _/\_
9 Mar 2016 - 8:31 am | अंतरा आनंद
_/\_
9 Mar 2016 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार
महादेवअप्पा चिद्रे खरोखरच जबरदस्त माणुस आहे. त्यांना साष्टांग दंडवत.
आणि ही स्टोरी इकडे शेअर केल्या बद्दल एका काकांना मन:पूर्वक धन्यवाद.
पैजारबुवा
9 Mar 2016 - 4:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रेरणादायी व्यक्तिमत्व!!__/\_
9 Mar 2016 - 11:03 pm | मार्मिक गोडसे
अविश्वसनीय!
इथे शेअर केल्याबद्दल डॉ. सुहास म्हात्रे ह्यांचे धन्यवाद.
14 Mar 2016 - 10:44 am | नाखु
अॅग्रोवन मध्ये आलेला लेख
केवळ एका हाताच्या बळावर विस्तारली १५० एकर शेती
-
Monday, March 14, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special
घरची बिकट आर्थिक परिस्थिती. कुस्ती खेळण्याच्या छंदात उजवा हातच गमावून बसावा लागला. आता भविष्य अंधारात. पण आईला दिलेले वचन पाळायचे, म्हणून ते जिद्दीने पेटून उठले. दवणहिप्परगा (जि. लातूर) येथील हेच मधुकरअण्णा चिद्रे एका हाताच्या बळावर आज दीडशे एकर शेतीचे मालक झाले आहेत. अहोरात्र केवळ शेतीचाच ध्यास घेतलेल्या अण्णांची यशकथा समस्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
हरी तुगावकर
लातूर जिल्ह्यातील दवणहिप्परगा (ता. देवणी) येथील रामचंद्र चिद्रे यांची आर्थिक परिस्थिती तशी हलाखाची होती. अण्णा (मधुकरअण्णा) एकुलता एक मुलगा असल्याने लहानपण लाडात गेले. त्यातच एका महाराजांनी २५ वर्षांपर्यंत मुलाला जपा असा सल्ला दिलेला. त्यामुळे आई-वडिलांनी डोळ्यात तेल घालून त्यांना मोठे केले. खेळण्याचा नाद असल्याने अण्णांचे शिक्षणात मन रमेना. शिक्षकाने मार दिल्याने सातवीतच शाळा सुटली.
कुस्तीचा छंद जोपासला
शाळा सोडल्यानंतर अण्णा गावातील काही मुलांसोबत रोज शेतात खेळायचे. यातच त्यांनी कुस्तीला आपलेसे केले. रोज दंड-बैठका काढत वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत कुस्ती खेळले. गावातील लोक त्यांच्याकडे पैलवान म्हणूनच पाहायचे.
आईला झाडाला बांधून हात काढला
एके दिवशी अण्णांनी सलग चार-पाच मल्लांना चितपट केले. त्यानंतर घरी निघाले असता मोठा मल्ल आला. त्याच्यासोबत कुस्ती खेळत असताना समोरचा मल्ल हातावर पडल्याने अण्णांचा उजवा हात मनगटापासून मोडला. त्या काळात वैद्यकीय सुविधा नसल्याने एका खासगी वैद्याकडून त्यांचा हात बांधण्यात आला. रात्रभर तो तसाच बांधून राहिल्याने हाताच्या रक्तवाहिन्या बंद पडल्या. दुसऱ्या दिवशी त्यांना कर्नाटकातील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शरीरापासून हात काढावा लागेल असे सांगितले. आईने त्यास कडाडून विरोध केला. अखेर आईला एका झाडाला बांधून घातल्यानंतर अण्णांचा हात काढण्यात आला. ही आठवण सांगताना अण्णांना आजही गहिवरून येते.
आईला वचन अन काळ्या आईची पूजा
ही घटना कुटुंबाला सहन न होण्यासारखीच होती. त्यात आईचं काळीज. आई गुणाबाईंनी पंधरा दिवस अन्नच सोडून दिले. या पंधरा दिवसांत अण्णा एकदाही आईसमोर गेले नाहीत. अखेर मनाचा हिय्या करीत ते आईजवळ गेले. तिच्याशी गप्पा मारल्या. मला तू खूप मोठा झालेला पाहायचे होते, आजही तसेच वाटते अशी इच्छा आईने मुलाजवळ व्यक्त केली. तू धीर सोडू नकोस, तुझ्या अपेक्षा नक्की पूर्ण करेन, तरच तुझा मुलगा म्हणून घेईन, तू अाधी जेवण कर, असे वचन अण्णांनी दिले. त्या दिवसापासून ते जिद्दीने कामाला लागले. आजपर्यंत त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
डाव्या हातातील ताकद वापरली
हात गमावल्याने कुस्ती सुटलीच होती. गावातील लोकही विचित्र नजरेने अण्णांकडे पाहू लागले. त्यामुळे ते आपल्या पडीक शेतात जाऊन बसू लागले. इतरजण चांगल्या प्रकारे शेत पिकवतात, मग मी का नाही? हा विचार त्या वेळी मनाला शिवू लागला. डाव्या हातात खूप ताकद होती. त्या हातात टिकाव घेऊन ते शेत तयार करण्याच्या कामाला लागले. जिद्द, मेहनत यातून रात्रंदिवस काम करीत चार एकर शेत तयार केलं. त्यात तीळ पेरले. वीस पोती उत्पादन झालं. अण्णांमध्ये आत्मविश्वास आला. बैल घेतला. बैलांसोबत स्वतः औतही ओढला. सहाबैली नांगरही धरला. इतकी ताकद त्यांच्यात होती.
पडीक जमीन ते १५० एकरांचा मालक
अण्णांची वडिलोपार्जित २० एकर पडीक जमीन होती. अपंगावर मात करीत ती जमीन स्वतः एका हाताने त्यांनी कसदार करण्यास सुरवात केली. त्यातून पीक बहरू लागलं. हळूहळू शेतीत चांगलेच पाय रोवले. १९७४ पासून दर वर्षी थोडी- थोडी जमीन ते खरेदी करू लागले. इतरांची शेतीही बटाईने करण्यास सुरवात केली. तिकडे बाजारात माल नेला की इकडे अण्णा नवीन शेती घेणार असाच पायंडा पडला. गेल्या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात अण्णा तब्बल १५० एकर शेतीचे मालक झाले आहेत. दवणहिप्परगा पंचक्रोशीत त्यांच्या इतका मोठा शेतकरी आज कोणी नाही. आईला दिलेले वचन निभावल्याचा त्यांना अभिमान आहे.
काळानुसार शेतीत केले बदल
काळानुसार अण्णांनी आधुनिकतेची कास धरली. एका हाताने बुलेट चालवू लागले. ट्रॅक्टर चालवत त्याआधारित कामे केली. घोड्यावर रपेट करण्याचा छंद जोपासला. आज त्यांच्याकडे ट्रॅक्टर, मळणीयंत्र, ऊस लावणी यंत्र, काढणीयंत्र, कडबाकुट्टी, क्रशर अशी विविध यंत्रसामग्री आहे.
दुष्काळातही हरले नाहीत
अलीकडील वर्षांत दुष्काळाचे स्वरूप गंभीर झाले आहे. यंदा तर कोणतेच पीक तसे हाती लागले नाही. तरीही अण्णा नाउमेद झालेले नाहीत. मला रात्रंदिन शेतीचाच ध्यास आहे. मी २४ तास राहायला शेतातच असतो अशा शब्दांत त्यांनी शेतीवरील प्रेम व्यक्त केले आहे. सोयाबीन व तूर ही त्यांची मुख्य पिके.
दर वर्षी तुरीसाठी जे काही क्षेत्र असते, त्यात १५० पोतींपर्यंत उत्पादन त्यांना होते. यंदा ते १०० पोत्यांपर्यंत, तर सोयाबीनचे ३५० पोती उत्पादन मिळाले. ठिबकवर चार एकर डाळिंबाची नवी बाग जोपासली आहे. मूग, उडीद आदी पिकेही ते घेतात.
चाळीस वर्षांपासून शेतातच
सुरवातीची काही वर्षे अण्णा शेतात काम करून रात्री घरी जायचे. पहाटे पाच वाजता पुन्हा शेतात यायचे असा दिनक्रम होता. पुढे त्यांनी शेतातच घर बांधलं. आज गेली चाळीस वर्षे ते तिथेच वास्तव्य करून आहेत. आज वयाच्या ७६ व्या वर्षीदेखील हा दिनक्रम चुकलेला नाही. वयाने थकले असले, तरी मनाने ते ताजेतवाने आहेत. त्यांना तीन मुले असून, दोन शेती पाहतात, तर एक शिक्षक आहे. त्यांचा नातू डॉक्टर होत आहे.
शरीरापासून हात काढण्याच्या घटनेने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. आईला दिलेले वचन पाळले आहे. प्रसंगी कर्जही काढले, पण मागे वळून पाहिले नाही. पाहिजे ते मिळवले. आज काही शेतकरी परिस्थितीला शरण जात आत्महत्या करीत आहेत. पण दुष्काळाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे चालण्याची हिंमत ठेवा.
मधुकरअण्णा रामचंद्र चिद्रे-९९७०६०६१३१