उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता..
अनेकांसाठी ही तर फक्त १७-१८ तासांची कसरत, फार नाही,. ९ मार्चला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. ‘महिला दिन’ असतो तसा ‘पुरूष दिन’ही असावा किंवा ‘हल्ली पुरूषच कसे दीन झाले आहेत’ असले नेहमीचे विनोदही आहेत. असले विनोद ‘महिला दिना’ची नीट माहिती नसल्याने केले जातात असं मला अनेकदा वाटतं.
दोन मुद्दे आधीच स्पष्ट करते. एक म्हणजे या जगात फक्त स्त्रियांना समस्या आहेत आणि सगळे पुरूष एकजात सुखी आहेत असं मी मानत नाही. सामाजिक वास्तवाची जाणीव असणारी कोणतीही व्यक्ती असं एकांगी विधान करणार नाही. पुरूषांनाही समस्या आहेत, संघर्ष आहेत, जबाबदा-या आहेत, दु:खं आहेत, ताण आहेत हे नाकारण्याचं कारण नाही. पण सामान्यत: स्त्री-पुरूष नात्यांत व्यवस्थेने पुरूषाचा वरचष्मा निर्माण झाला आहे. स्त्री-पुरूष नातं म्हणते फक्त पत्नी-पती हे नातं नाही. मुलगा-आई, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, सहकारी .. अशा नात्यांच्या अनेक पदरांत ‘पुरूष प्राधान्य’ दिसून येतं. सामाजिक रचनेचा आणि संस्कारांचा हा परिणाम आहे. स्त्रियाही पुरूषांना प्राधान्य देतात कारण त्याही पुरूषप्रधान समाजरचनेत जन्म घेतात आणि वाढतात. ‘पुरूषसत्ता’ हा आजच्या लेखाचा विषय नाही. परंतु स्त्री चळवळीने व्यक्तिगत पुरूषांना आव्हान दिलं नसून पुरूषसत्तेला – म्हणजेच स्त्रिया आणि पुरूष यातल्या श्रेणीक्रमाला, उतरंडीला आणि साचेबद्ध भूमिका आणि अपेक्षांना- आव्हान दिलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे सर्वच पुरूष स्त्रियांबाबत असंवेदनशील असतात आणि सर्व स्त्रिया इतर स्त्रियांबाबत संवेदनशील असतात – असं घाऊक विधान कोणी करत असेल तर त्यात तथ्य नाही. काही पुरूष संवेदनशील असतात, तर काही पुरूष असंवेदनशील असतात. जगातले सगळे पुरूष त्यांना भेटेल त्या स्त्रीचा छळ करत असतात, तिच्यावर अत्त्याचार करत असतात असं नाही. तसंच काही स्त्रिया संवेदनशील असतात, तर काही स्त्रिया असंवेदनशील असतात. परिवर्तन स्त्रिया आणि पुरूष या दोघांमध्येही अपेक्षित आहे. त्यामुळे ‘स्त्री चळवळ’ स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही बरोबर काम करते. वर्षानुवर्षांच्या परंपरेने काही संस्कार आपल्यावर होतात, आपल्या काही सवयी पक्क्या होतात. मात्र या परंपरेने स्त्रियांना व्यवहारात दुय्यम स्थान दिलं आहे. हे फक्त भारतात घडलं-घडतं असं नाही तर जगभरात घडलं-घडतं. ‘स्त्रिया हा एक स्वतंत्र वर्ग आहे’ असं एके काळी मानलं जायचं. पण व्यवहारात असं दिसतं की स्त्रिया ज्या समाजाच्या (धर्म, वंश, प्रांत, जात, भाषा इत्यादी घटक समाजरचना घडवतात) सदस्य असतात त्याचा त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो. पण दुस्-या बाजूने स्त्रीला कायम स्त्रीत्त्वाचं जोखड वागवावं लागतं. म्हणून जगभरातल्या स्त्रियांमध्ये बरेच फरक असले तरी त्यांच्या स्थितीत काही विलक्षण साम्यही दिसून येतं.
पुरूषसत्ता म्हणजे काय? विस्तारभयास्तव मी विस्तृत लिहित नाही. वंशसातत्यासाठी ‘मुलग्यां’ ना दिलं जाणारं महत्त्व; खाण्यापिण्यात, शिक्षणात घरात मुलगा-मुलगी यांच्यात केला जाणारा भेदभाव (हा स्त्रियाही करतात कारण त्याही ‘पुरूषसत्तेत’ वाढलेल्या असतात); घरकाम फक्त स्त्रियांची आणि मुलींची जबाबदारी असणं; मुली आणि स्त्रियांवर असणारी अनेक बंधनं (त्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणाशी बोलावं-बोलू नये, एकटीने फिरू नये इत्यादी); लैंगिक शोषण; परंपरेने स्त्रियांना वारसाहक्क नसणं (कायद्यात सुधारणा झाल्या आहेत); मुले-मुली किती आणि कधी व्हावीत यासंबंधी निर्णय घेण्याचा स्त्रियांना अधिकार नसणं असे अनेक मुद्दे ‘पुरूषांना दिलं जाणारं महत्त्व’ अधोरेखित करतात. यातल्या प्रत्येक मुद्द्याला अपवाद असू शकतो पण आपण इथं आत्ता सर्वसाधारणपणे समाजात काय दिसतं त्याची उजळणी करतो आहोत.
थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांची उत्पादन शक्ती, स्त्रियांची पुनरूत्पादन शक्ती, स्त्रियांची लैंगिकता, स्त्रियांचं हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य, साधनसंपत्ती (शेती, घर इत्यादी) यावर पुरूषांचं नियंत्रण असणं म्हणचे पुरूषसत्ता. धर्म, कुटुंब, कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था, बाजार, राजकारण ... अशा अनेक व्यवस्थांमधून पुरूषसत्तेला बळ मिळत असतं.
‘पुरूषसत्ता’ खरं तर पुरूषांनाही कधीकधी जाचक वाटते, त्यांनाही ती नकोशी वाटते कारण त्यात त्यांच्यावरही अनेक जबाबदा-या असतात आणि ‘पुरूष म्हणजे असाच असायला हवा’ या अपेक्षांचं त्यांनाही ओझं पेलून न्यावं लागतं. स्त्री चळवळीने स्त्रियांचे स्वत:बदद्लचे-पुरूषांबद्दलचे समज, स्वत:कडून आणि पुरूषांकडून असलेल्या अपेक्षा - अशा अनेक बाबतीत परंपरेला छेद देणारा विचार मांडला आहे. स्त्री आणि पुरूष यांच्यात जीवशास्त्रीय भेद आहेत (तेही फक्त प्रजननसंस्थेत), पण त्याच्या आधारे सामाजिक भेदांचं एक विश्व रचलं गेलं आहे. प्रश्न विचारले जात आहेत ते या सामाजिक रचनेबाबत, बदल अपेक्षित आहे तो सामाजिक रचनेत. समाजाच्या धारणांमध्ये तसेही बदल होत असतात – आपले आजोबा-वडील-आपण स्वत: किंवा आपली आजी-आई- आपण स्वत: यांच्या जीवनावर एक नजर टाकली तरी खूप बदल झालेले दिसून येतील. स्त्री चळवळीला अपेक्षित असलेले बदल होणं काहीसं अवघड असलं तरी अशक्यप्राय मात्र नाही.
स्त्रियांमध्ये बदल झाला तर परंपरेने मिळत आलेल्या काही फायद्यांवर पुरूषांना पाणी सोडावं लागेल हे खरं आहे. पण म्हणून ‘स्त्री चळवळ’ (त्यात वेगवेगळ्या विचारधारा आहेत) म्हणजे ‘पुरूषांच्या विरोधातलं कारस्थान’ असा काही विचार तुम्ही करत असाल, तर तो कृपया डोक्यातून काढून टाका. स्त्रिया परग्रहावरून आलेल्या नाहीत. आजी, आई, आत्त्या, मावशी, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, सहकारी .... या सगळ्या ‘आपल्या’ आहेत. माणूस म्हणून स्त्रियांच्या हक्कांची प्रस्थापना करण्याच्या या लढाईत स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही सहभागी होण्याची गरज आहे.
स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी अनेक शतकं संघर्ष चालू आहे. आर्थिक हक्क, नागरी हक्क, सामाजिक-सांस्कृतिक हक्क आणि राजकीय हक्क अशी या हक्कांची साधारण वर्गवारी केली जाते. काळाच्या ओघात स्त्रियांच्या संघर्षाचं स्वरूप बदललं, त्यांची साधनं बदलली आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही बदलला. या दीर्घ वाटचालीत अनेक संवेदनशील पुरूषांनी स्त्रियांना साथ दिली. स्त्रियांच्या हक्कांची दखल घेणारे अनेक कायदे झाले. पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीवही झाली. ही जाणीव केवळ आपल्या देशापुरती नाही तर जागतिक स्तरावर आहे.
‘स्त्री चळवळीचा’ इतिहास मोठा आहे. या लेखात त्याचा आढावा घेता येणं शक्य नाही. पण आपण ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ कसा आला आणि कसा रूजला हे थोडक्यात पाहू.
१९०८ मध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) शहरातील कापड उद्योगातील स्त्रिया संपावर गेल्या. कामाच्या ठिकाणी योग्य त्या सोयी नाहीत, कामाचे तास खूप जास्त आहेत, कामाचं मोल अगदी कमी मिळतं अशा त्यांच्या असंख्य तक्रारी होत्या.
१९०९ मध्ये अमेरिकेत पहिला ‘महिला दिन’ साजरा झाला. तो दिवस होता २८ फेब्रुवारी. १९१० मध्ये कोपनहेगन शहरात ‘आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद’ भरली होती. या परिषदेत १७ देशांतील सुमारे १०० महिला प्रतिनिधी सामील झाल्या होत्या. महिला हक्कांच्या चळवळीला पाठिंबा देणं आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ठिकठिकाणी चालू असलेल्या प्रयत्नांना समर्थन देणं अशा दुहेरी उद्देशांना समोर ठेवून या परिषदेने ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मात्र हा दिवस कोणता असावा यासंबंधी परिषदेत काही ठरलं नाही.
२६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेने २१ वर्षावरील स्त्रियांना (पुरूषांप्रमाणेच) मतदानाचा अधिकार दिला. एका अर्थी भारतातल्या स्त्रियांना हा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला नाही, कदाचित त्यामुळेच जगभरात याविषयी झालेल्या संघर्षाची आपल्याला कमी माहिती आहे. काही देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला ही माहिती स्त्रियांच्या लढ्याचा अंदाज आपल्याला देईल. (पूर्ण चर्चेत प्रौढ स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत उल्लेख आहे. काही देशांत सर्व प्रौढ पुरूषांनाही मतदानाचा अधिकार अनेक वर्ष नव्हता हेही एक वास्तव आहे.)
स्वीडन – १७१८ मध्ये सिटी गिल्डच्या सदस्य असणा-या आणि कर भरणा-या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो १९२१ मध्ये. अमेरिका – १७५६ मध्ये Uxbridge (Massachusetts) इथल्या एका स्त्रीला शहराच्या मीटींगमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळाला. १९१० मध्ये राज्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यायला सुरुवात झाली आणि १९२० मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. ग्रेट ब्रिटन १९२८, न्यूझीलँड १९२९, रशिया १९१७ (झारच्या पदच्युतीनंतर), १९३५ मध्ये ब्रिटीश राज (भारतातही सुरूवात) आणि बर्मा (आताचा म्यानमार), १९४५ – फ्रान्स, इटली आणि जपान, १९४७ चीन आणि पाकिस्तान (१९४७ मध्ये पाकिस्तानने फक्त शिकलेल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, तो १९५६ मध्ये सार्वत्रिक करण्यात आला.) ही प्रक्रिया अगदी २०१५ मधल्या सौदी अरेबियाच्या निर्णयापर्यंत चालू आहे.
कोपनहेगन परिषदेचा परिणाम म्हणून १९११ मध्ये १९ मार्च या दिवशी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लँड या देशांत ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. दहा लाखांपेक्षा जास्त स्त्रिया आणि पुरूष या समारंभात सामील झाले. मतदानाच्या हक्कांबरोबर स्त्रियांना काम (नोकरी) करण्याचा अधिकार, व्यावसायिक शिक्षण घेण्याचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी अशा मागण्या या दिवशी मांडल्या गेल्या.
१९१३ मध्ये ‘पहिल्या जागतिक युद्धा’ला विरोध दर्शवत, शांतीची मागणी करत रशियातल्या स्त्रिया फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या रविवारी रस्त्यावर उतरल्या. तर युरोपमध्ये १९१४ मध्ये ८ मार्च आणि त्याच्या एक दोन दिवस पुढे-मागे ‘महिला दिन’ साजरा झाला. १९१७ मध्ये रशियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारीमधल्या शेवटच्या रविवारी ‘भाकरी आणि शांती’ चा उद्घोष करत रशियन स्त्रिया मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्या. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा दिवस होता ८ मार्च. (रशियाने १९१८ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं.) यानंतर चार दिवसांत झारची सत्ता संपली.
यानंतर विविध देशांत ‘महिला दिन’ साजरा होत राहिला. ‘अखिल भारतीय महिला परिषदे’च्या (All India Women’s Conference) पुढाकाराने भारतात १ मार्च १९३० या दिवशी ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. (१३ फेब्रुवारी हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो.)
‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ ख-या अर्थाने जागतिक झाला तो १९७५ मध्ये. ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून जाहीर केला. त्यानंतर जगभर या दिवशी स्त्रियांच्या हक्कांसंबंधी विचारमंथन होण्यास अधिक जोमदार सुरूवात झाली.
‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा एक दिवसाचा उपक्रम होऊ नये याकरिता दरवर्षी एक दिशादर्शक वाक्य, घोषवाक्य (थीम) जाहीर केलं जातं. १९७५ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली’ अशी थीम होती. स्त्रिया आणि मानवी अधिकार (१९९८), स्त्रियांवरील हिंसेपासून मुक्त जग (१९९९), आजच्या अफगाण स्त्रिया – वास्तव आणि संधी (२००२), स्त्रिया आणि एचआयव्ही एड्स (२००४), निर्णयप्रक्रियेत स्त्रिया (२००६), ग्रामीण स्त्रियांचे सबलीकरण – भूक आणि गरीबी संपवणे (२०१२) अशा काही थीम मला सहज आठवल्या.
२०१६ ची ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ची थीम आहे #PledgeForParity – ‘शपथ समतेची’ किंवा ‘समतेसाठी शपथ’. व्यक्तिगत पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर करता येतील असे चार विविध उपक्रम सुचवण्यात आले आहेत. १. स्त्रिया आणि मुलींना त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मदत करणे: कळत-नकळत असलेल्या (जाणीव-नेणीवेतल्या) पूर्वग्रहांना आव्हान देणे (Help women and girls to achieve their ambitions: challenge conscious and unconscious bias). २. लिंगभाव संतुलित नेतृत्वाला साद (Call for Gender balanced leadership) ३. स्त्री आणि पुरूषांच्या योगदानाला समान मूल्य देणे (Value women’s and men’s contribution equally) ४. सर्वसमावेशक आणि लवचीक संस्कृती निर्माण करणे (Create inclusive, flexible cultures) असे चार पर्याय आहेत. यापलीकडचा एखादा पर्याय आपल्याला सुचत असल्यास त्यानुसार उपक्रम करायला काहीच हरकत नाही. मी एक क्रमांकाची शपथ घेतली आहे – संकल्प केला आहे.
या ठिकाणी जाऊन आपण शपथ घेऊ शकता. हे सगळं काहीसं फेसबुकी शैलीचं (म्हणजे उथळ) वाटू शकतं याची मला कल्पना आहे. त्यामुळे शपथ न घेताही आपण आपल्यापुरता, आपल्या भवतालच्या परिस्थितीशी सुसंगत असा संकल्प करू शकतो.
माझ्या घरात, माझ्या कामाच्या ठिकाणी, मी ज्या ज्या ठिकाणी वावरते/वावरतो अशा सर्व ठिकाणी ‘मी जाणीवपूर्वक स्त्री-पुरूष समतेसाठी प्रयत्नशील राहीन’ असा निश्चय आपण करू शकतो का? तो आचरणात आणू शकतो का? ही शपथ फक्त पुरूषांनी घेणं अपेक्षित नाही, स्त्रिया आणि पुरूष यांची ही संयुक्त जबाबदारी आहे. स्त्री-पुरूष समतेच्या मार्गावर आपण एकटेच नाही, अनेक जण आणि अनेक जणी सोबत आहेत याची खातरी असू द्या. हा एका दिवसाचा उपक्रम नाही, हा सातत्याने करण्याचा प्रवास आहे.
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या सर्वांना शुभेच्छा.
शपथ घेतल्यावर (अथवा संकल्प केल्यावर) तुमच्या वाटचालीतले अनुभव जरूर सांगा. मला ते वाचायला नक्कीच आवडतील.
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 12:22 pm | यशोधरा
लेख आवडला.
दुव्यावरलं लिखाण वाचते आणि सांगते.
7 Mar 2016 - 1:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आवडला.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2016 - 1:39 pm | पिलीयन रायडर
लेख उत्तमच. संतुलित!! अगदी मनातले विचार मांडले आहेत.
आमच्याही ऑफिसमध्ये ही शपथ घेण्यात आली. सतत मेल्स येत आहेत. पण मी मुख्य कार्यक्रमालाच जाउ न शकल्याने नक्की ही शपथ काय होती हे आज कळाले. धन्यवाद!
7 Mar 2016 - 2:13 pm | खेडूत
लेख आवडला. इतरांना वाचायला देत आहे.
आता दुवा वाचतो.
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्य सर्वांना आधीच शुभेच्छा...!
7 Mar 2016 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिवास आपलं लेखन नेहमीच संवेदनशील राहीलं आहे. माझी पुढील मतं ही आपल्या विरोधातील नाही, लेखनातील काही मुद्द्या संबंधी आहेत. आत्ताच आपला लेख वाचून प्रतिसाद लिहिला की लेख आवडला. पण, काही लिहायचं राहुन गेलं आहे असं वाटल्यामुळे हा प्रतिसाद.
लेखातील शेवटच्या चार ओळीबद्दल मला म्हणायचं आहे की स्त्रीवादी चळवळ ही अनेक वर्ष पुरुषांनी स्त्रीचं कसं शोषण केलं याच्या तक्रारीत गुंतलेलं दिसून येतं. ती गोष्ट काही खोटी नव्हती. अर्थात त्याला कारण पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती आणि लिंगभेदावर आधारित विषम समाजरचना. लिंगभेदावर आधारित शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्रीचा विचार करतांना या समाजात पुरुषाकडे असलेल्या सत्तास्थानाचा फायदा घेऊन स्त्रीच्या जगण्याचा काही एक संकोच केला त्यातून तिला बाहेर काढण्याचं काम काही चळवळींनी केलं, काही स्त्रीयांनी केलं आणि काही पुरुषांनी केलं. आणि माणुस म्हणुन तिच्या जगण्याच्या कक्षा विस्तारायला सर्वांनीच मदत केली.
''बाईचा जन्म म्हणजे केवळ काळोखाचं वाण आहे' हा विचार आता बदलत चालला आहे. स्त्रीला पुरुषाशिवाय पर्याय नाही हाही विचार मागे पडत चालला आहे. स्त्री नाजूक असेल पण ती आता तितकीशी दुर्बल राहीलेली नाही, पुरुषाचा आधार नाकारणारी, स्वतःचे शोषण व त्याची जाणीव होऊन त्याविरुद्ध बंड करणारी स्त्री आता इतक्या पुढे जात आहे की ती प्रचंड प्रमाणात पुरुषांचा द्वेष करायला लागली आहे यालाच जहाल स्त्रीवाद असा एक शब्द वापरला गेलेला आहे. स्त्रीचा शोषक हा पुरुषच आहे म्हणुन त्याचे वर्चस्वच मोडून काढले पाहिजे, ही एक प्रवृत्ती आता वाढत चाललेली आहे. आता काळ बदलला आहे, ग्रामीण भागात अजूनही स्त्रीयांचं शोषण होतच आहे, हे नाकारुच शकत नाही परंतु शिक्षण, विचार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रभावांनी पुरुषांनी स्त्रीला समानतेच्या पातळीवर आणन्यास मदतच केली आहे करत, आहे. तेव्हाच आधुनिक स्त्रीयांनी (प्रमाण कमी आहे) मात्र एक टोकाची भूमिका घेतल्याचे दिसून येते. पुरुषांपासून स्वातंत्र्य पाहिजे की पुरुषांबरोबर आपल्या अनुभवांचे महत्व लक्षात घेऊन खाजगी ते सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक होण्याचा प्रयत्न करायचा हे ती विसरत चालली आहे. स्त्री समानतेचा विचार म्हणजे कोणीकोणाचा द्वेश न करता, कोणी कोणाला लहान न समजता लिंगभेदापलिकडचा विचार करुन माणुस म्हणुन विचार करणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता असे वाटते.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2016 - 8:39 pm | विवेक ठाकूर
हा इतका गहन विषय नसावा. एकमेकांप्रती प्रेम असेल तर या सर्व गोष्टी आपसूक येतात.
7 Mar 2016 - 2:59 pm | चाणक्य
मिपा वर 'लेखक/लेखिकेचं' नाव वाचून लेख उघडावा अशी जी काही मोजकी नावं आहेत त्यात तुमचा क्रमांक फार वरचा आहे. तुमचं लिखाण नेहमीच विचारप्रवर्तक असतं.
7 Mar 2016 - 3:31 pm | अजया
लेख आवडला.दुवा वाचते आता.उद्या काहीशा अशाच विषयावर बोलायचे होते एका ठिकाणी. तुमचा लेख आणि दुव्याचा मला यावर वेगळ्या प्रकाराने बोलायला नक्कीच मदत होणारे.धन्यवाद.
7 Mar 2016 - 3:47 pm | मितान
लेख आवडला. पटला. दुवा वाचून नक्कीच संकल्प करेन.
7 Mar 2016 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख आवडला व त्याची वेळही उत्तम साधली आहे !
मात्र याबाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या आहेत असे वाटते ;
१. हा एक दिवस साजरा करायचा उत्सव नाही तर त्यामागील भावना वर्षाचे १२ महिने, २४ X ७ लक्षात ठेवून आचरणात आणणे गरजेचे आहे.
२. स्त्रीपुरूष समानतेची बाजू बर्याचदा "स्त्री विरुद्ध पुरुष" अशी नकारात्मक पद्धतीने मांडली जाते, त्याऐवजी तिच्याकडे स्त्रीपुरुष या दोघांनी एकमेकाला पूरक व एकत्रीतपणे उचलायच्या जबाबदार्या व हक्क अश्या सकारात्मक दृष्टीने पाहणे जास्त फायद्याचे होईल. कारण सकारात्मक सुखी जीवनासाठी स्त्री व पुरुष दोन्हीही तुल्यबलतेने आवश्यक आहेत.
7 Mar 2016 - 4:44 pm | नूतन सावंत
लेख आवडला.दुवा वाचते आता.
7 Mar 2016 - 5:53 pm | मीता
लेख आवडला.
8 Mar 2016 - 3:12 am | मधुरा देशपांडे
लेख नेहमीप्रमाणेच खूप संतुलित. आवडलाच.
8 Mar 2016 - 6:24 am | राजेश घासकडवी
लेख आवडला. वैचारिक संतुलनाबद्दल कौतुक वाटलंच. पण तरीही संतुलन आणि समन्वय साधण्याच्या प्रयत्नात काही कटू सत्यं टाळणारा वाटला.
या भेदभावाचं टोक गाठलं जातं ते स्त्रीभ्रूणहत्येत. गेली कित्येक वर्षं भारत, चीन यांसारख्या पुत्रप्रधानी देशांत ते होतं आहे आणि त्याचे तोटे आता दिसत आहेत. १० मुलांसाठी ९ मुली उपलब्ध आहेत. या असमतेपोटी एका बाजूला मुलांना 'माझ्याकडे घर आहे, नोकरी आहे' असं दाखवत रीव्हर्स हुंडा देण्याची पाळी येते आहे, तर दुसऱ्या बाजूला लैंगिकदृष्ट्या अतृप्त राहिलेल्या पुरुषांमुळे अत्याचारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होते आहे. अजूनही ० ते ६ वयोगटात मुलांचं प्रमाण अतिरेकी आहे. यातून काय उद्भवतं हे पुढच्या वीस पंचवीस वर्षांत उलगडेलच.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने या विषयावर खोलवर विचार करून जर काही स्त्रीभ्रूणहत्या कमी व्हाव्या अशी आशा.
8 Mar 2016 - 11:48 am | भाऊंचे भाऊ
बाकी महिला दिनाच्च्या भरपूर शुभकामना
8 Mar 2016 - 12:54 pm | बॅटमॅन
लेख आवडला आणि पटला.
8 Mar 2016 - 1:13 pm | पैसा
अतिशय माहितीपूर्ण, संतुलित लिखाण! अर्थात हे नेहमीच तुमच्या लिखाणाचे विशेष असतात!
8 Mar 2016 - 1:46 pm | प्रमोद देर्देकर
लेख आवडला.
8 Mar 2016 - 2:17 pm | सस्नेह
औचित्यपूर्ण, समर्पक आणि सन्तुलित लेख.
8 Mar 2016 - 2:25 pm | यशोधरा
शपथेचे डीटेल्स वाचले. शपथ घेतली. वेळ मिळाला की काही लिहिन म्हणते इथे प्रतिसादामध्ये.
8 Mar 2016 - 6:05 pm | विवेक ठाकूर
आपल्या कामवालीला बधाई देत म्हटलं का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
आज तू सुट्टी घेऊन मजा कर !
8 Mar 2016 - 6:06 pm | राजाभाउ
लेख आवडला.
मध्यंतरी पुण्यात अविनाश धर्माधीकारी याची एक व्याख्यानमाला झाली होती त्यातिल एक विषय होता "स्त्रीवाद" खुप उत्तम व्याख्यान होते ते. त्यात त्यांनी मांडलेला एक मुद्दा होता तो अंतर्गत विरोधाभासाचा, अंतर्गत विरोधाभास असतो सामाजिक पातळीवर आणि वैयतिक पातळीवर पण. म्हणजे एकाच वेळी समाज स्त्रीयांबाबत दोन टोकाच्या भुमीका घेतो ज्या एकमेकांना विरोधी असतात. तर वैयतिक पातळीवर आपल्याला एखादी गोष्ट तत्व म्हणुन पटलेली असते, आपण स्विकारलेली असते बहुतेक वेळेला त्या तत्वाशी सुसंगत असे वागतो पण, पण कधी कधी सामाजिक बंधने, पुर्वापार संस्कार, पुरषी अहंकार किंवा वेगळ्या कारणांनी आपण या तत्वांविरोधी भुमिका घेतो.
हा मुद्दाही मला महत्वाचा वाटतो.
10 Mar 2016 - 10:08 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
7 Mar 2017 - 9:50 pm | स्रुजा
लेख आवडला. आज काही निमित्ताने ही प्लेज वाचनात आली म्हणुन गुगल सर्च केलं तर हा ही लेख मिळाला. उत्तम लेख !
हे अतिशय आवडलं. स्त्रियांचीही जबाबदारी आहेच ! अनेकदा बायका जेंडर बेनेफिट घेतात ते मुळीच आवडत नाही. मुळात आपण आधी एक व्यक्ती आहोत हे बायकांनी पण समजून घेतलं पाहिजे तर ते पुरुषांना कळणार. दोघांची संयुक्तिक जबाबदारी, हे खरंच.
7 Mar 2017 - 10:48 pm | गामा पैलवान
अतिवास,
स्त्रियांना न्यायाने वागवायला हवं यात दुमत नाही. पण समतेने कशासाठी वागवायचं? जर स्त्रिया पुरुषांहून वेगळ्या आहेत तर त्यांना अट्टाहासाने समान वागवायची गरज काय? केवळ न्यायाने वागवलेलं पुरेसं नाही का?
आ.न.,
-गा.पै.
7 Mar 2017 - 11:19 pm | पिलीयन रायडर
म्हणजे? वेगळ्या आहेत म्हणुन समान वागवायचं नाही? स्त्रिया कोणत्या अर्थाने वेगळ्या आहेत असं म्हणत आहात?
8 Mar 2017 - 8:14 pm | गामा पैलवान
पिरा,
'आपण पुरुष असतो तर काय मजा आली असती' असं प्रत्येक बाईला केंव्हातरी वाटतंच. पुरुषांना मात्र उलट वाटंत नाही. अर्थात दोन्हीकडे काही अपवाद आहेत. ते वगळून बघितल्यास बहुसंख्य बायका स्त्रीजन्म हे बंधन वाटतं. हा निसर्गाने स्त्रीवर केलेला अन्याय आहे.
नेमक्या याच कारणासाठी पुरुषांनी स्त्रियांचा स्त्री म्हणून आदर ठेवला पाहिजे. जर समान वागवलं तर पुरुष आणि बायकांत फरक तो काय राहिला? मग स्त्रियांना वेगळा आदर कशासाठी? पुरुष पुरुषाप्रति खास वेगळा आदर दाखवीत नाही.
सांगायचा मुद्दा काये की स्त्रीपुरुष समानता केवळ अमूर्त कल्पना आहे. व्यवहारात तिला काडीइतकीही किंमत नाही.
आ.न.,
-गा.पै.
8 Mar 2017 - 8:58 pm | पिलीयन रायडर
स्त्रियांना असं वाटतं ते केवळ शाररिक वेगळेपणांमुळे नाही.. त्यांना मिळणार्या वागणुकीमुळे.
मला असं कधीही वाटलं नाही की पुरुषा प्रमाणे पाळी नसती आणि बाळांतपण नसतं तर किती मज्जा आली असती. मला असं मात्र अनेकदा वाटलंय की आपण पुरुष असतो तर घाणेरड्या नजरांची पर्वा न करता रात्री बेरात्री फिरलो असतो, कुठेही राहिलो असतो.समाज म्हणुन आपण एक सुरक्षित जग निर्माण करु शकलो तर पुरुष न होताही हे साध्य करता येईलच ना. मग का वाटेल बायकांना की आपण पुरुष असावं?
मुलगी म्हणून घरात कामाला जुंपले जात असेन आणि मुलग्याला मात्र हातात ताट मिळत असेल तर तिथे समानता नको? मुलगा असो वा मुलगी, एक सारखी वागणुक मिळाली तर का वाटेल मुलीला की आपण मुलगा असावं?
स्त्रियांना वेगळा खास आदर द्यावा असं मलाही वाटत नाही. पण किमान माणुस म्हणुन वागवण्याची अपेक्षा केवळ अमुर्त कल्पना आहे? तुमच्या नसेल पण ह्या कल्पनेमुळे होणार्या बारिक सारिक बदलांची आमच्या लेखी बरीच किंमत आहे.
8 Mar 2017 - 9:31 pm | चाणक्य
काय आहे ?
8 Mar 2017 - 10:12 pm | आतिवास
#BeBoldForChange
अधिक माहितीसाठी दुवा.
9 Mar 2017 - 6:50 am | चाणक्य
.
9 Mar 2017 - 1:10 am | गामा पैलवान
पिरा,
पुरुष आणि बायकांच्या विचारसरणीतला फरक या विधानातून तुम्ही नेमका उलगडून दाखवला आहे. म्हणूनंच स्त्रियांना केवळ स्त्री म्हणून खास आदर द्यायला हवा असं माझं मत आहे. त्यांना समान लेखलं तर पुरुष हा आदर देऊ शकणार नाहीत.
पुरुषांच्या दृष्टीने 'स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून आदर करणे' आणि 'त्यांना आपल्यासमान लेखणे' परस्परविरोधी आहे. बायकांना कदाचित हे पटणार नाही. पण त्याला माझा इलाज नाही.
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
9 Mar 2017 - 8:55 am | शब्दबम्बाळ
आपले अनुभव आणि लिखाण नेहमीच आवडते!
संतुलित लेख...