संस्कृती आणि धर्म यातील गल्लत

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Jan 2016 - 10:49 am

सर्वसाधारपणे संस्कृती आणि धर्म यांची बेमालुम सरमिसळ दैनंदिन मानवी व्यवहारात एवढी सवयीची झालेली असते की वस्तुतः संस्कृती आणि धर्म या बाबी भिन्न असू शकतात याकडेच मुळी दुर्लक्ष होऊ शकते. संस्कृती आणि धर्म हे एकमेकांवर प्रभाव पाडत असतात ते सहाजिक असते. धर्मसंस्था संस्कृतीतील त्यांना वाटणार्‍या काही सांस्कृतीक गोष्टी त्याज्य ठरवते काही नव्याने जोडते उर्वरीत संस्कृती जशीच्या तशी स्विकारली जाते. उर्वरीत संस्कृती जिचा धार्मीक तत्वाशी प्रत्यक्षतः संबंध नाही तरी सुद्धा ती त्या धर्माची ओळख आहे असा भास निर्माण होऊ शकतो. बहुतांश सांस्कृतिक देवाण घेवाण हि खरेतर मनमोकळे पणाने करण्या जोगी असावी परंतु एखादी सांस्कृतिक गोष्ट एखाद्या धर्माशी एवढी तदरुप होऊन जाते की त्यावर केवळ त्याच धर्माचा संबंध आहे आणि इतर धर्मियांनी त्या सांस्कृतीक गोष्टी स्विकारल्यास त्यांचा धर्म बुडेल इतपत मानसिक असुरक्षा आणि दुश्वासाची स्थिती असलेली असंख्य उदाहरणे असतात.

धर्म आणि भाषांचा संबंधही असाच, या संबंधांचा एक सांस्कृतिक भाग म्हणजे व्यक्तिंचे नाव, समजा कुणी धर्म बदलला तर त्याचा व्यक्ती नावाशी खरेतर प्रत्येक संबंध असलाच पाहीजे असे नाही. पण एखाद्या धर्माची सुरवात जेथून झालेली असते तेथील भाषेतील नावे दुसर्‍या प्रदेशात आयात केलेली दिसतात. स्थानिकांची त्या परकीयभाषेशी नाळ जोडलेली नसेल तर ती नावे परकीय वाटू शकतात का ? मग धर्मांनी स्थानिक भाषीय नावांचाही उपयोग करणे श्रेयस्कर नसू शकते का ? अर्थात धर्मांतरे घडवतानाचा हा तिढा सहसा धर्मसंस्थेच्या कक्षेत येतो, पण नंतरच्या पिढ्यांनी व्यक्ती नामांमध्ये परकीय भाषातील नावे वापरूच नयेत असे नव्हे पण स्थानिक भाषेतील नावे टाळण्या जोगेही काही नसावे.

केक अथवा पुरणपोळी हे केवळ खाद्य पदार्थ आहेत ह्यांचा ख्रिश्चन अथवा हिंदू धर्माशी काही संबंध असू शकतो का ? बेसिकची काळजी घेऊन एकमेकांना प्रिय पदार्थ खाउन पहाण्यात काही उणीव नाही हे तौलनिकदृष्ट्या अधिक सहज स्विकारले जाते. कुंकू आहे रांगोळी आहे अथवा साडी हा पोषाख आहे यांच्यावर एकाच धर्माचा कॉपीराइट असू शकतो का ? इतर धर्मीयांनी कुंकू/टिकली कपाळावर शृंगारासाठी वापरली अथवा रांगोळीने घर सजवले किंवा बुरख्याच्या आत साडी वापरली, ख्रिसमस ट्री सजवला तर धर्म भ्रष्टता येते का ? तरीही मानवी मन संस्कृती आणि धर्माशी अशी गल्लत का करत असावे ?

* ऑगस्ट २०१८ बॉलीवूड आंतरधर्मीय कुटूंबातील भाऊ बहीण धर्म आणि संस्कृतीची गल्लत न करता रक्षा बंधन साजरा करण्याचे वृत्त दिसते तर त्याच आधी महिनाभर केरळात एका चिमुकलीला कपाळावर गंध लावण्यासाठी धर्मांध शाळेतून काढतात आणि धर्म आणि संस्कृतीची गल्लत कशी होत असते हे दाखवून देतात.

संस्कृतीधर्मविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 3:49 pm | प्रचेतस

धर्म आणि संस्कृती भिन्न हे ग्रांथिक किंवा प्रेषितप्रणीत धर्मांबाबत खरे आहे पण हिंदू धर्माबाबत असे म्हणता येणार नाही. धारयति इति धर्म: अर्थात जीवनप्रणाली, संस्कृती इत्यादीपासूनच हिंदू धर्म उत्क्रांत झालेला आहे. त्याची कोणतीही व्याख्या नाही, त्याचा कोणताही धर्मग्रंथ नाही ( भगवद्गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ असे मी मानत नाही) हिंदू धर्म हा वेद आणि प्रस्थानत्रयी ह्यांपासून उत्क्रांत झालाय असे माझे मत.

माहितगार's picture

21 Jan 2016 - 4:51 pm | माहितगार

ह्म्म रांगोळी घालणे ही बाब धार्मीक कशी असेल ?

धार्मिक नाहीच ना. पण तरीही तो संस्कृतिचा एक हिस्सा आहेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 4:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१ केवळ माहितगार ह्यांचा लेख अन वल्लीजी चा प्रतिसाद आहे म्हणून बोलु धजतो आहे! हिंदु धर्म वल्ली तुम्ही म्हणता तसा मूलतः फ्लूइड असा आहेच पण मग सगोत्री विवाह केल्यास खून पाडणे किंवा कट्टर जातिभेद वगैरे रिजिड गोष्टी आपल्या धर्मात कश्या एवोल्व झाल्या असे तुम्हाला वाटते?? त्याची क्रोनोलॉजी काय असावी?? इतिहासमत ह्या बाबतीत काय म्हणते? हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल

सगोत्री विवाह केल्यास खून पाडणे किंवा कट्टर जातिभेद वगैरे रिजिड गोष्टी >> ह्यात धर्माचा काही संबंध आहे असे वाटत नाही.

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 5:01 pm | प्रचेतस

सहमत.
हिंदू धर्म हा स्ट्रक्चर्ड (बंधिस्त) धर्म नसल्याने जातिभेद, कर्मकांड ह्यांसारख्या कित्येक अयोग्य गोष्टीही ह्यात घुसल्या आहेत.

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 5:19 pm | पगला गजोधर

हिंदू धर्म हा स्ट्रक्चर्ड (बंधिस्त) धर्म नसल्याने जातिभेद, कर्मकांड ह्यांसारख्या कित्येक अयोग्य गोष्टीही ह्यात घुसल्या आहेत.

तसेच ''गोमांस निषिद्ध '' हा रूल पण असाच घुसवला असेल काय ?

याॅर्कर's picture

21 Jan 2016 - 8:34 pm | याॅर्कर

((:

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 9:19 pm | प्रचेतस

गोमांस खाणे वैदिक धर्मात सर्रास चाले. तसे कित्येक उल्लेख रामायण- महाभारतात आहेत. रन्तिदेवाचा यज्ञ तर प्रसिद्धच आहे पण नंतर गोधन वाचवण्याच्या हेतूने आणि तदनंतर प जैन आणि बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावानंतर एकूणातच अहिंसचे लोण वैदिक धर्मात मोठ्या प्रमाणावर घुसले.

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 5:45 pm | यशोधरा

सगोत्री विवाह हे inbreedingआसारखे आहे असे वाचल्याचे आठवते, थोडक्यात वैज्ञानिक दृष्ट्याही अयोग्य.

प्राची अश्विनी's picture

21 Jan 2016 - 5:51 pm | प्राची अश्विनी

संस्कृती आणि धर्माशी अशी गल्लत होऊ नये खरं तर पण होते. हे माझे अनुभव.
१ आत्ताआत्तापर्यन्त माझ्या गावात ख्रिश्चन समाज साडी नेसणे, कुंकू लावणे हे सर्व करीत असे. इतकेच काय गणपती, हळदीकुन्कू यात उत्साहाने भाग घेत असे. त्यांची आडनावे देखील हिंदू होती. पण गेल्या दहा पंधरा वर्षात फादरनी सांगितले म्हणून प्रथम हिंदू सणांमध्ये भाग घेणे थांबले, नंतर आडनाव बदलणे, कुंकू न लावणे हे सर्व चालू झाले. आता जवळ जवळ सर्वांची आडनावे ख्रिश्चन आहेत.
२ अजूनही मुस्लीम समाजात लग्नात स्त्रीला मंगळसूत्र घातले जाते पण तेदेहील अजून किती दिवस राहील सांगता येत नाही .

प्राचीच्या निरिक्षणाशी सहमत.
एक मुस्लीमबहुल भाग आमच्या जवळच आहे.आत्ता आत्तापर्यंत मराठी शाळेत तिथल्या मुली असायच्या.मंगळसूत्र लग्नात दिलं जातंच.जोडवी पण.बुरखा नसेच.
हल्ली नव्याने येणाऱ्या तरुण मुलांच्या बायका मुलांचे उलट चित्र पाहते आहे.मुलींना धर्माची तालिमवाल्या शाळेत पाठवायला लागलेत.मुली नखशिखांत बुरख्यात ट्रीटमेंट ला येतात.थेट माझ्यापुढेच तो चेहर्यावरुन काढतात.मंगळसूत्र ,जोडवी इ हिंदू प्रतिकं आता वापरणं कमी झालंय.भाषा बदलत चालली.
गंमत म्हणजे याच गावात काही व्युत्पन्न ब्राम्हण कुटुंब वर्षानुवर्षे आहेत.मुस्लीम मोहल्ल्यात हे लोक.पण एकत्र असायचे.आता मात्र आपण हिंदू संस्कृतीच्या अधिन झालो आहोत असे मुलांना वाटते.अचानक ते धर्माविरुध्दही वाटू लागले आहे.
अशा प्रकारे हिंदू संस्कृतीने त्यांच्या धर्मावर आपोआप केलेली सरमिसळ पाहिली आहे आणि ते आता ओझे समजून(धर्माला अतिरेकी महत्त्व देऊन) फेकणारे तरूणही पाहते आहे.

माहितगार's picture

21 Jan 2016 - 7:28 pm | माहितगार

हिंदू प्रतिकं आता वापरणं कमी झालंय

येथे काही प्रमाणात सांस्कृतीक प्रतिकांवर धार्मीक शिक्का मारला जात नाही आहे ? 'जोडवे' हा प्रकार किंवा पायातील पैंजण असेल त्याचा धर्माशी संबंध असू शकतो ? मुर्तीपुजा नसलेली रांगोळी प्रमाणे अमूर्त स्वरूपात वापरता येतात अशी असंख्य भारतीय सांस्कृतीक प्रतिके असावीत. अभिवादनासाठी बौद्ध घर्मातही दोनी तळहात जोडण्याची पद्धत वापरात होती तुम्ही म्हणता तसे बौद्धधर्मीयात वेगळेपण ठसवण्यासाठी ज्या घरात पुर्वी तेलाचे दिवे लावत तेथे मेणबत्त्यांचा वापर चालू झाला. दिवा तेलाचा अथवा मेणबत्तीचा या सांस्कृतीक बाबी आहेत त्याचा धर्माशी संबंध असावयास नको. योगाचेही तसेच आहे, त्यातील देवतोच्चारणांची विवीध नावे काढून बाजूला ठेवली तर तो एक सांस्कृतीक आरोग्यदायक क्रिडा प्रकार आहे.

संस्कृती आणि धर्म यांची गफलत दाखवून देणे कट्टरवादी दृष्टीकोणांमधल्या दांभिक तर्कदोषांना उघडे पाडण्यास उपयूक्त ठरू शकणारे असू शकणार नाही का ?

पैसा's picture

22 Jan 2016 - 5:21 pm | पैसा

बौद्ध आणि जैन यांना अनेकजण पंथ असे म्हणतात. त्यात आणि हिंदू लोकांमधे सारखे विचार, देव, पद्धती सापडल्या तर काही नवल नाही. पण संस्कृती आणि धर्म यातली गफलत दाखवून देणे नक्कीच धोक्याचे असते कारण मग धर्म संकटात आहे अशी ओरड सुरू होते.

जागतिकीकरणामुळे विभिन्न संस्कृतींमधल्या सीमारेषा पुसट होत आहेत. याचा परिणाम म्हणून धार्मिक कट्टरता कमी व्हायला हवी खरे तर. पण प्रतिक्रिया म्हणून की काय धार्मिक कट्टरता वाढलेली दिसत आहे. लोकांमधे आपले स्वतंत्र अस्तित्व नाहीसे होईल अशी भीतीची भावना जास्त जोर धरत आहे. अशा वेळी ठळक दिसणारी धर्मासारखी गोष्ट ते घट्ट पकडून ठेवतात.

आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषणासारख्या प्रश्नांना उत्तर आणि पर्याय म्हणून मार्क्सवाद उदयाला आला. १९९० च्या दशकात मार्क्सवादी प्रयोग फसल्यामुळे बाजाराला पर्यायच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि धर्म, विशेषतः इस्लाम आणि त्याचं पाश्चात्त्यविरोधी कट्टर स्वरूप हा पर्याय म्हणून उदयाला आला. इतर धर्मांची कट्टरता हे एकप्रकारे इस्लामच्या कट्टरतेला आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांना लोकांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे शोधलेलं उत्तर आहे. त्यामुळे कट्टरता कमी व्हायला हवी असेल तर सर्वच धर्मांची व्हायला हवी, नाहीतर त्याला काहीच अर्थ नाही. मी आधी म्हटलंय तसं - धर्माचं छोटं वर्तुळ मोठं होऊन जर संस्कृतीच्या वर्तुळाशी overlap झालं तर लोक धर्मालाच संस्कृती समजू लागतील आणि मग असलेल्या द-या अजून रुंदावतील.

येथे काही प्रमाणात सांस्कृतीक प्रतिकांवर धार्मिक शिक्का मारला जात नाही आहे ?

बरोबर आहे तुमचं. ही प्रतिकं हिंदू धर्माचे असल्याचा दर्शनीय भाग होऊन गेल्याने संस्कृती वर धर्माचा शिक्का मारला गेला खरा!

उगा काहितरीच's picture

21 Jan 2016 - 10:20 pm | उगा काहितरीच

श्री प्रचेतस यांचे प्रतिसाद आवडले . व त्यांच्याशी बाडिस.

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2016 - 5:11 pm | बोका-ए-आझम

संस्कृती हा धर्माचा superset आहे, किंवा धर्म हा संस्कृतीचा subset. जेव्हा धर्म ही संकल्पनाच नव्हती तेव्हाही संस्कृती होतीच. इतिहास हा माणसाला लेखनकला अवगत झाली तेव्हापासून पुढचा काळ असं जर मानलं तर वरती प्रचेतसभौ म्हणाले तसं structured धर्म हे लेखनकलेनंतरच उदयाला आले असणार, पण त्याआधी म्हणजे इतिहासपूर्व काळातही संस्कृती होतीच. ही अशी relationship लक्षात न घेतल्यानेच संस्कृती आणि धर्म यांच्यात गल्लत होत असेल का?

नितीनचंद्र's picture

22 Jan 2016 - 5:24 pm | नितीनचंद्र

हिंदु ही संस्कृतीच आहे. त्याला एक धर्मनिर्माता, एक धर्मग्रंथ, एक तत्वज्ञान किंवा निर्मीतीचे वर्ष हे निकष लागु पडतच नाहीत. अनेक धर्मग्रंथ, अनेक विचारयात, अनेक पंथ , अनेक उपासना पध्दती यांठिकाणी नांदतात. हिंदु शब्दाची व्याख्या करताना कुठेतरी कायदेशीर उल्लेख असा आहे की जे ख्रिश्चन, मुस्लीम किंवा बौध्द नाहीत ते उर्वरित सर्व हिंदु आहेत.

सबब हिंदु हा धर्म आहे का या निकषावर ती संस्क्रूती आहे असेच म्हणावे लागेल असे मला वाटते.

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 5:47 pm | पालीचा खंडोबा १

चांगल्या विषयाला घातलात. असे कुणीतरी लिहिणे गरजेचे होतेच ते तुम्ही लिहिले. धर्माचा आणि संस्कृतीचा सुतराम संबंध नाही. परंतु आपण विशेषत: भारतीय उपखंडातले लोक अशी सरमिसळ करतो. इथे बहुतेक दुस-या धर्मावर टिका करण्याचे साधन म्हणून हा धागा हाताळतील परंतु दुस-याना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काही लोक तारस्वराने आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे असे अजूनही सांगतात. मग ते जाती व्यवस्था / सती परंपरा / विटाळ / आणि कर्मकांडे ह्याला विसरतात. मुळात भारतीय हि एक संस्कृती आहे आणि ह्यात अनेक धर्मांची सरमिसळ आहे. आजही मोठेपणाचा ढोल पिटणारे उच्चरवाने बोलतात. आम्ही असे होतो नि तसे होतो. मुळात संस्कृती कालानुरूप बदलत असते. ती जर बदलली नाही तर तिचे गटार होते. अशी किती तरी उदाहरणे आपल्या समोर आहेत. भारतीय संस्कृती बदलली पण लोक नाही बदलले.

मिझोराम भारतातले ख्रिशन बहुल राज्य तिथले काही विद्यार्थी अमेरिकेत शिकत होते. विद्यापीठाने एकदा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आणि सांगण्यात आले आपल्या संकृतीशी निगडीत कार्यक्रम करावा. आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी मायकेल जाक्सन च्या गाण्यावर नृत्य केले. सगळ्या कॅम्पस मधील विद्यार्थ्यांनी त्यांची हुर्यो उडवली आणि त्याना सांगितले कि हि आमची संस्कृती आहे तुमची भारतीय नाहि. खजील भारतीय विद्यार्थ्यांनी कार्यक्रम बंद केला. कारण त्यांची अशी समजूत होती कि आपण ख्रीशन chathlic म्हणजे american ते आपले. परदेशात गेल्यावर त्याना कळले कि आपली संस्कृती वेगळी आहे.

लोकांनी इस्लाम स्वखुशीने स्वीकारला हि असेल परंतु आपण इस्लाम स्वीकारल्या नंतर अरबी संस्कृती आपली झाली असा त्यांचा गोड गैरसमज असतो परंतु जेव्हा ते सौदी मध्ये जातात तिकडे त्यांचा भ्रमनिरास होतो. पाकिस्तान चा इतिहास अरबांपासुन सुरु होतो. कारण त्यांना भारतीय संकृती नि इतिहासाशी नाळ तोडायची आहे. एकदा एक पाकिस्तानी डॉक्टर सौदीला गेला असताना त्याने अकलेचे तारे तोडले कि आम्ही स्पनेजीन्के व सपाने वर २०० वर्षे राज्य केले. तेव्हा सगळे अरब हसले. त्यांनी विचारले तुम्ही कधी राज्य केले सपाने वर ते तर आम्ही केले. तुम्ही भारतीय उपखंडातले मुसलमान तुमचा अरबी इतीहासाशी संबंध काय ? (थोर पाकिस्तानी विचारवंत हसन निसार ह्यांनी सांगितलेला किस्सा आहे हा ) धर्म आणि संस्कृतीची सरमिसळ केली कि असे हसे होते. दुसरे उदाहरण एकदा एक पाकिस्तानी खासदार सौदी ला गेली तिने तिचे नाव सांगितले ते अरबी होते तिथल्या बायका म्हणाल्या अरे वा ! तुमच्याकडे तुमची नावे नाहीत का? सगळी अरबी नवे आहेत तुमची.

आता एका bollywood प्रेमी मराठी कुटुंबाची कथा DDLJ बघून एका महाभागाने मुलीचे नाव सिमरन ठेवले . त्याला अर्थ विचारला तर तो म्हणाला काजोलचे नाव आहेते . मी कपाळास हात मारला.

मुस्लिम म्हणजे उर्दू/ catholic म्हणजे इंग्लिश हे सुमार डोक्याच्या लोकांचे लक्षण आहे. पूर्वी महाराष्ट्रातले सर्व धर्मीय मराठी बोलायचे अगदी ज्यू सुध्धा आता ते उर्दू / इंग्लिश बोल्तात. ABP माझा वर मुंबैल्या एका ख्रिस्ती आजीची गोष्ठ दाकःवली होति. तिची कहाणी ऐकून वाईट वाटले . ती म्हणाली मराठी कोकणीत कि पूर्वी आम्ही मराठी बोलायचो पण आताच्या पिढीला मराठीची लाज वाटते.

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 5:50 pm | पालीचा खंडोबा १

पाकिस्तानी लोकांनी स्पेन वर राज्य केले असे त्या डॉक्टरला म्हणायचे होते स्पेलिंग चुकले आणि भलतेच लिहिले गेले

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 5:50 pm | पालीचा खंडोबा १

पाकिस्तानी लोकांनी स्पेन वर राज्य केले असे त्या डॉक्टरला म्हणायचे होते स्पेलिंग चुकले आणि भलतेच लिहिले गेले

सप्तरंगी's picture

22 Jan 2016 - 6:20 pm | सप्तरंगी

धर्माचा आणि खाण्यापिण्याचा , भाषेचा काहीच संबंध नसावा नाहीतर सगळ्या धर्माच्या लोकांनी सारख्याच गोष्टी follow केल्या असत्या. धर्म, संस्कृती, समाज, जात हे सगळे आपण आपल्या सोयीनुसार पाळतो किंवा सोडतो आणि यावर जरा जास्तच चर्चा करतो असे नाही वाटत का? मला तर हे काहीही न पाळता जगायला आवडते, फक्त knowledge / curiosity म्हणून हे सगळे वाचायला आवडते.

माहितगार's picture

22 Jan 2016 - 8:21 pm | माहितगार

वेगावेगळे दृष्टीकोण वाचतोय.

माहितगार's picture

11 Jul 2018 - 1:05 pm | माहितगार

केरळातील एका छोट्याश्या बहुगुणी मुस्लीम मुलीने शॉर्टफील्ममध्ये काम करताना चंदनाचा टिळा लावला, (फोटोत पहा खरच गोड दिसतीए ) तर तिच्या मदरसाने तिला मदरसातून काढले. हि माहिती तिच्या वडीलांनीच -जे की स्वतः बर्‍या पैकी धार्मीक असावेत- तिच्या फोटोसहीत फेसबुकवर शेअर केली तर धर्मांध लोकांनी बर्‍यापैकी ट्रोलींग केले असे दिसते. बिंदी लावण्याचा हिंदू , मुस्लीमक, ख्रिश्चन असण्याचा काय संबंध एक सरळ साधी भारतीय सांस्कृतिक खूण आहे पण हे धर्मांधांना समजावणार कोण ?

या बातमीतून दोन्ही अधोरेखीत होते १) संस्कृती आणि धर्म यांची अनावश्यक गल्लत २) धार्मिक कट्टरतावादाकडून व्यक्तिस्वातंत्र्य आणि कला विषयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातली जाणारी गदा.

संदर्भ इंडियन एक्सप्रेस वृत्त