पूर्वेच्या समुद्रात- १३
पूर्वेच्या समुद्रात- १
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
माया बंदर वरून आम्ही निघालो परत समुद्रात गस्त घालत फिरत फिरत मध्ये रंगट या बंदरात फक्त इंधन भरण्यासाठी थांबलो. अंदमानच्या आसपास दीड दिवस असेच दिशाहीन आणि ध्येयहीन( माझ्या दृष्टीने) भटकून संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला बंदरात उतरलो. तेथे उतरलो कि मी प्रथम वृत्तपत्र विकत घेत असे. कारण मधल्या दिवसात काय घडामोडी झाल्या आहेत त्याचा उहापोह करण्याच्या दृष्टीने त्याच फायदा होत असे. तेथे फक्त चेन्नईचे हिंदू वृत्तपत्र मिळत असे ते सुद्धा संध्याकाळी.
वृत्तपत्र घेतले तर त्यात आंध्र प्रदेश (विशाखापटणम) ला भयंकर चक्री वादळाचा तडाखा हि बातमी पहिल्याच पानावर. हि बहुधा १०-११ नोव्हेंबर तारीख असावी. विशाखापटणमला पण जोरदार तडाखा बसल्याचे त्यात वृत्त होते. मी ताबडतोब जवळच्या एस टी डी बूथ वर धाव घेतली आणि विशाखापटणमला फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु विशाखापटणमचा कोणताच फोन लागत नव्हता. लाईन खराब होने के कारण आपका कॉल अभी पुरा नाही हो सकता हि ओळ मी त्या दिवशी इतक्या वेळेस ऐकली कि हातातील फोन आपटून तुकडे करावे अशी आंतरिक उर्मी सतत उचंबळून वर येत होती. एकीकडे तेथे काय झाले असेल याची काळजी होतीच परंतु माझे घर पाचव्या मजल्यावर होते त्यामुळे तेथे पाणी शिरण्याची शक्यता नव्हतीच. परंतु प्रत्यक्ष माझे कुटुंब काय करीत असेल, कोणत्या स्थितीत असेल याचा काहीही थांग पत्ता लागत नव्हता. मी तेथे असलेलि सर्व इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रे अथ पासून इतिपर्यंत वाचून काढली. त्यात अजून काहीच माहिती कळली नाही. नक्की काय झाले आहे आणि काय करावे हेही समजत नव्हते.
सुटी घेऊन तेथे जाणे अशक्य होते कारण दुसरा डॉक्टर माझ्या ठिकाणी विशाखापटणम वरूनच येऊ शकत होता आणि तेथेच वादळाचा तडाखा बसला आहे म्हटल्यावर मी कोणत्या तोंडाने रजा मागणार होतो? तेथेच थोडा वेळ बसलो एक चहा प्यायलो. थोडं डोकं शांत झाल्यावर जहाजावर परत आलो.
असेच विचित्र मनस्थितीत एक दोन दिवस गेले. सकाळी उठत होतो. नाश्ता करत होतो. गणवेश घालून बसत होतो जहाज गस्तीसाठी गेलं आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी ते परत पोर्ट ब्लेअरला आले. मी परत बाहेर जाऊन वृत्तपत्र विकत घेतलं तेथे वादळाच्या थैमानाच्या मोठ्या मोठ्या बातम्या. झाडं विजेचे खांब उन्मळलेले, रस्ते पुराने भरलेले अशी चित्रे. सुदैवाने श्री चंद्राबाबू नायडू यांच्या चोख व्यवस्थापनामुळे जीवितहानी खूप कमी झाली होती. अशा बातम्या. एस टी डी बूथ वर जाऊन परत "लाईन खराब होने के कारण आपका कॉल अभी पुरा नाही हो सकता" हीच रेकॉर्ड ऐकून परत आलो. मुंबईला फोन करावा असे वाटले पण विचार केला त्यांना जर काही कळले नसेल तर आपण त्यांच्या चिंतेत भर घालून काय निष्पन्न होणांर ?
मी माझ्या भावाला फोन केला. त्यावर तो पण म्हणाला कि विशाखापटणमला वादळ झालं हि बातमी आम्ही पण वाचली पण तेथील एकही फोन लागत नाही. म्हणून मग आम्ही तूच फोन करशील असा विचार केला. असाच अजून एक दिवस विमनस्क अवस्थेत गेला.
दुसर्या दिवशी संध्याकाळी परत गस्त घालून पोर्ट ब्लेअर्ल परत आलो. मी लगेच बाहेर पडलो आणि प्रथम तो एस टी डी बूथ गाठला. तेथुन विशाखापटणमला फोन लावलं आणि काय आश्चर्य आमच्या खाली राहत असलेले श्री राव यांना फोन लागला. मी त्यांना माझ्या सौ. ला बोलावण्याची विनंती केली आणि सांगितले कि मी दहा मिनिटांनी फोन करतो. ती दहा मिनिटे सुद्धा मला दोन तासांसारखी वाटत होती. सौ. आली आणि मी घाईघाईने विचारायला सुरुवात केली. ती म्हणाली आम्ही तिघे व्यवस्थित आहोत. काळजीचे काहीच कारण नाही. काय झाले त्याचा वृत्तांत असा होता.
११ नोव्हेंबर रोजी विशाखापटणमला जबरदस्त वेगाने वारे वाहू लागले. (त्याच्या अगोदर दोन दिवस वातावरण ढगाळ होते.) या वेगवान वाऱ्यान सोबत प्रचंड पाऊस सुरु झाला. आणि घरतील वीज गेली. हि परिस्थिती नेहमीच होते म्हणून मी फारशी चिंता केली नाही. वादळ होणार हि सूचना आगाऊ दिलेलि असल्याने मुलगी शाळेत गेलीच नव्हती. दोन्ही मुले घरात आहेत म्हणून मी पण चिंता केली नव्हती. असाच प्रचंड वर आणि पाउस पुढचे दोन दिवस पूर्ण वेळ पडत होता. आपल्या घरासमोर असलेला राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलेला दिसत होता दूरवर जागोजागी झाडे विजेचे खांब उन्मळून पडलेले दिसत होते. थोडेसे जरी दार किंवा खिडकी उघडली तरी आत पाउस येत होता म्हणून मी ते सर्व बंद केलेले होते. मुलं आपली खेळणी घेऊन खेळत होती. एक दिवस गेला, रात्र गेली तरी वीज आली नाही म्हणून मी मुलं झोपलेली असताना बाहेर जाऊन पाहीले तर वीज गेल्यामुळे लिफ्ट चालत नव्हती. सगळीकडे अंधार होता. बाहेर संततधार लागलेली. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. घरात वीज नाही त्यामुळे गिझर चालत नव्हता. ग्यासवर पाणी तापवून दोन्ही मुलांना अंघोळ घातली. स्वयंपाकाची बाई, झाडूवाली बाई येणं शक्यच नव्हतं. सुदैवाची गोष्ट एकच होती कि बिल्डींगमध्ये राहायला फारशी माणसे आलेली नव्हत, त्यामुळे पाणी गेलं नाही. अन्यथा पाचव्या मजल्यावर पाणी चढवायला नाकी नऊ आले असते. घराची सफाई करून स्वयंपाक हि मीच करत होते. वीज नाही त्यामुळे दारावरची घंटी वाजणार नव्हती.
दुसर्या दिवशी मुलांना अशा वातावरणामुळे सर्दी आणी ताप भरला. घरात औषधे होती म्हणून मी अगोदर साधी औषधे दिली. दुधवाला सुद्धा आला नाही. असलेलं दुध मुलांना दिलं पण उद्यापासून काय हा विचार होताच. स्वयंपाकाची बाई येणार नव्हती त्यामुळे मी परत स्वयंपाकाला लागले. वीज नाही म्हणून मिक्सर पण चालत नव्हता. मोठा खलबत्ता आणी पाटा वरवंटा अवजड म्हणून मुंबईतच सोडून आलो होतो. छोटा खलबत्ता घेऊन त्यातच काम चालवावे लागले. कपडे धुवावे तर धुलाई यंत्र चालू नाही. झक्कत तिघांचे कपडे भिजवले आणी हाताने धुतले. घरातच खुर्च्यांवर वाळत टाकले.बाल्कनीत दोर्यांवर टाकणे शक्यच नव्हते कारण आडवा तिडवा पाऊस पडत होता ( सततच्या पावसामुळे कपडे पुढे तीन दिवस वाळले नव्हते)
विजेवर आपण किती अवलंबून आहोत ते आता कळायला लागले.घरात टीव्ही नव्हता सुदैवाने एक ट्रान्झिस्टर होता त्यावर बातम्या ऐकत होते. त्यात एकंदर बाहेरची परिस्थिती गंभीर आहे याचा अंदाज आला होता. संद्याकाळ पर्यंत मुलांचा ताप उतरला नव्हता म्हणून मी त्यांना सांगून पाच जिने उतरून खाली गेले. वॉचमनला १०० रुपये दिले आणी औषधांची यादी दिली. त्याशिवाय त्याला ५० रुपये वेगळे दिले त्यामुळे तो जाऊन कुठून तरी ती औषधे घेऊन आला. जेवण तयार करून सहा वाजताच जेवण भरवले. मेणबत्तीच्या उजेडात त्यांना गोष्टी सांगत काही तरी करून त्यांचे मनोरंजन करीत होते. दुसरा दिवस पार पडला. तिसर्या दिवशी परत वीज नव्हतीच. दुधही संपले होते. भाजीसुद्धा संपली होती. सकाळी उठून परत झाडू मारला. पाणी ग्यासवर तापवून स्वतःची आणी मुलांची अंघोळ उरकली. कपडे धुतले. त्यांना म्यागी तयार करून दिले आणी खायला बसवले आणी रेनकोट घालून हेल्मेट घालून स्कुटरवरून जवळच्या बाजारात गेले तेथे फक्त एक केमिस्ट आणी एक वाण सामानाचे दुकान उघडे होते. तेथुन दुधाची पावडर. म्यागी, कडधान्ये आणी मुलांसाठी औषधे विकत घेऊन आले. सुदैवाने इतक्या पावसात स्कूटर( कायनेटिक होंडा) मात्र व्यवस्थित चालत होती.
बाहेर पडल्यावर प्रत्यक्ष कळले कि काय हाहा कार झाला आहे तो. जवळपास असलेल्या सर्व झोपड्या नामशेष झाल्या होत्या आणी तेथील गरीब माणसे आपले किडूक मिडूक घेऊन रेल्वे स्टेशनच्या आश्रयाला गेली होती. ठिकठिकाणी झाडे आणी विजेचे खांब उन्मळून पडलेले होते. परंतु सरकारी माणसे मात्र झाडे आणी खांब बाजूला करून अत्यावश्यक सेवा परत चालू करण्यासाठी झटत होती. राष्ट्रीय महामार्ग असूनही रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक चालू होती. एकंदर परिस्थितीचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. घरात वीज नाही किंवा इमारतीत मदतीला माणसे नाही तेवढे सोडले तरी निदान आपले नुकसान काहीच झालेले नाही. मुले आजारी असली तरी जवळ सुखरूप आहेत हे समाधान होते.निदान मी डॉक्टर असल्याने पुढे इलाज काय करायचा याची चिंता नव्हती. परंतु हे उसने अवसान किती टिकेल याची खात्री नव्हती. मुलांचा आजार जर जास्त झाला तर नौदलाचे रुग्णालय १३ किमी दूर होते. परंतु तेथे संपर्क साधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. फारच वाईट परिस्थिती आली तर स्कूटर वर मुलांना रेनकोट घालून बसवून तेथे घेऊन गेले असते.
तू कुठे आहेस याचा थांग पत्ता लागणे शक्य नव्हते पण देवावर हवाला होता आणी मुळात तू वादळापासून शेकडो किमी दूर होतास. असेच तीन दिवस काढले. आपण कठीण परिस्थितीत असताना इतर लोकांच्या अवस्थेकडे पहिले तर आपली अवस्था चांगली आहे याची जाणीव होते."
चौथ्या दिवशी सकाळी माझा एक मित्र कृष्णमुर्ती अधिकारी हा नौदलाच्या रुग्णालयात बालरोग तज्ञ आहे. तो बिचारा तटरक्षक दलाच्या स्थानिक मुख्यालयातून माझा पत्ता मिळवून एवढ्या भर पावसात रेनकोट घालून स्कूटर वर १३ किमी अंतर कापून माझ्या कुटुंबाची ख्याली खुशाली पाहायला आला. त्याने दोन्ही मुलांना तपासले औषध योजना बरोबर आहे हे सांगितले. सौ. स्वतः डॉक्टर असली तरी आई आहे. स्वतःच्या मुलांच्या बाबतीत आपण बरोबर आहोत कि नाही हि शंका कायम असते. अशा वेळेस बाल रोग तज्ञ घरी येउन तुम्ही बरोबर आहात हे सांगतो याची किंमत शब्दात सांगता येणार नाही.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो सौ ला धीर देऊन म्हणाला कि मी परवा परत येईन. जर काही लागले तर त्याने आमच्या घराच्या जवळच्या नौदलाच्या एका युनिटचा पत्ता आणी फोन नं दिला आणी सांगितले कि तिथे तुम्ही संपर्क करा पुढचे आम्ही पाहून घेऊ. नौदलाच्या तळावर सर्व आपत्कालीन सोयी उपलब्ध होत्या त्यामुळे त्याला नि त्याच्या कुटुंबाला तशी काही तोशीस लागली नव्हती. शिवाय तो रुग्णालयाच्या आवारातच राहत असल्याने वीज गेली तरी त्याच्या घरात जनरेटरची वीज होतीच. असे असूनही हा माणूस भर पावसात मित्राच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी शहराबाहेर माझ्या घरी पोहोचला. सौ. चे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. खरा मित्र हा असा असतो.
वरमेको गुणी मित्रो नच मूर्खो शतान्यपी
एकः चंद्र तमोहन्ति नच तारागणोपीच
एकच गुणी मित्र असावा फेसबुक वरील पाचशे(मित्र) असण्यापेक्षा
एकटा चन्द्र अंधाराचा नायनाट करतो, जे अख्खा तारागण असूनही करू शकत नाही
प्रतिक्रिया
19 Dec 2015 - 1:23 pm | नंदन
परक्या गावात, अशा परिस्थितीची केवळ कल्पनाच करू शकतो.
वाचतो आहे, पु. भा. प्र.
19 Dec 2015 - 2:03 pm | एस
वाचतोय.
19 Dec 2015 - 2:10 pm | नाखु
वाचतोय
पु. भा. प्र.
19 Dec 2015 - 3:05 pm | जेपी
वाचतोय..
पुभाप्र
19 Dec 2015 - 3:59 pm | जातवेद
पुभाप्र
19 Dec 2015 - 4:09 pm | बोका-ए-आझम
सैन्यातल्या लोकांबद्दल अशा गोष्टींमुळेच कृतज्ञता वाटते.
22 Dec 2015 - 2:35 pm | टुकुल
+१
19 Dec 2015 - 4:16 pm | आनंदराव
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होतो / आहे
19 Dec 2015 - 6:03 pm | विवेकपटाईत
आवडले, मस्त.
19 Dec 2015 - 6:12 pm | अभिजित - १
वाचनीय , मस्त !!
बुलेट ट्रेन मुळे कितीही वाद असला तरी तुमचे लिखाण वाचण्या सारखे असतेच !!
19 Dec 2015 - 7:24 pm | सुबोध खरे
अभिजित साहेब
मी ढीग म्हणालो बुलेट ट्रेन हवी आणि तुम्ही म्हणाला तरी नको तरी त्याने काहीच फरक पडत नाही. आपल्याला विचारतो कोण ?
या चर्चेतून चार नवीन मुद्दे समजले तर आपल्या ज्ञानात भर पडते इतकेच. आपसात मतभेद असू द्या. नात्यात कटुता येण्याचे कारण नाही
19 Dec 2015 - 7:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
डॉक, अशीच काहीशी परिस्थिती २५ एप्रिल २०१५ च्या भुकंपावेळी अनुभवली आहे पुरेपूर, मी लॉंग रेंज पट्रोल वर, घरी नवीन लग्न झालेली बायको एकटी (४ महीने झाले होते लग्नाला) जगात मजबूत आहे असे वाटणारे सगळे काही मुळापासुन हलताना पाहिले होते तेव्हा, पहिले प्रश्न तोच "घरी कसे?" पहिला झटका लागताच मोबाइल नेटवर्क सपशेल झोपलेले, शेवटी लोकल पोलिस वायरलेस वर मॅसेज टाकला तेव्हा कुठे त्यांनी एक जीप घरी धाडली अन बायको त्यांच्या रेडियो वरुन बोलली की ती सेफ होती घर ठीकठाक होते अन खालीच राहणाऱ्या घर मालक/मालकीण असणाऱ्या वृद्ध अंकल आंटी ह्यांनी तिला ठेऊन घेतले होते घरी , घर चिंचोळ्या बोळीत असल्या कारणे एकदा तिच्याकडून आपातकाळात (भूकंपाच्या) काय करायचे (टेबल खाली जाणे, भिंतीचा कोपरा पकड़णे, दाराच्या चौकटीत उभे रहाणे) इत्यादी सुद्धा तिला वायरलेस वरुनच उजळणी करुन घेतली होती, सगळे सगळे एकदम आठवले !
19 Dec 2015 - 9:13 pm | श्रीरंग_जोशी
एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती अन त्या दरम्यान कुटूंबियांशी अजिबात संपर्क होऊ न शकणे, खरच अवघड होती परिस्थिती.
नेहमीप्रमाणे हे ही लेखन आवडले.
पुभाप्र.
20 Dec 2015 - 12:38 am | आदूबाळ
जबरदस्त लेखन, नेहेमीप्रमाणेच, डॉक्टरसाहेब. या (आणि तुमच्या इतरही) लेखनाचं पुस्तक व्हावं असं फार वाटतं...
20 Dec 2015 - 11:09 am | प्रचेतस
सहमत.
20 Dec 2015 - 2:43 am | रेवती
बापरे! अशा प्रसंगी आपल्या आप्तांजवळ नसणे म्हणजे ताण असतो. आपले लेखन वाचून पूर्वी आम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण आली.
20 Dec 2015 - 9:33 am | सौन्दर्य
त्यावेळी माझे पोस्टिंग बडोद्याला झाले होते. मुलगा जेमतेम दीड वर्षाचा होता. १९९३ च्या ऑगस्ट महिन्यात अचानक खूप पाउस पडायला लागला होता. जवळजवळ दोन-तीन दिवस सतत कोसळत होता, सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते, बडोदा शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीला पूर आला होता. सर्व दुकाने बंद, भाजीपाला येत नव्हता, वीज येऊन जाऊन होती, प्यायचे पाणी येत नव्हते, सुगम (बडोदा) डेअरीत दुध होते पण लोकांपर्यंत पोहोचवायची यंत्रणा कोलमडली होती. जवळच एक एस.टी.डी. बूथ होता जेथे आम्ही खूप वेळा, मुंबईला कुटुंबातील इतर लोकांशी बोलायला जात असू. आमचा मुलगा त्या वयात देखील बोलका होता आणि बोबडे बोलायचा. शरीराने सुदृढ असल्याने त्या एस.टी.डी.बूथ वर सगळ्यांचा लाडका होता. घरी नेहमी एखाद लिटर दुध, फ्रीझ करून ठेवले असायचेच, पण ह्या सततच्या पावसाने ते देखील संपले होते. ह्या मुसळधार पावसाच्या तिसर्या दिवशी सकाळी सकाळी कोणीतरी दरवाजा ठोठावला, कोण आले असावे ह्याचा अंदाज घेत दरवाजा उघडला तर दारात त्या एस.टी.डी. बुथचा मालक दुधाच्या दोन पिशव्या घेऊन उभा होता, म्हणाला, "आपडा जाडिया माटे दुध लायवो छु" (आपल्या जाड्या (माझा मुलगा) साठी दुध घेऊन आलो आहे).
त्या दिवसाच्या मुसळधार पावसात काही अश्रूंची आणखीन भर पडली.
21 Dec 2015 - 6:25 pm | रेवती
आईग्ग! भारी माणूस आहे.
20 Dec 2015 - 9:45 am | मुक्त विहारि
पुभाप्र
20 Dec 2015 - 11:07 am | एक एकटा एकटाच
बापरे!!!!!
21 Dec 2015 - 1:36 pm | नरेश माने
खरंच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची त्यावेळची मानसिक अवस्था कशी झाली असेल ते सर्व डोळ्यासमोर उभे राहिले.
21 Dec 2015 - 1:36 pm | नरेश माने
खरंच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची त्यावेळची मानसिक अवस्था कशी झाली असेल ते सर्व डोळ्यासमोर उभे राहिले.
21 Dec 2015 - 2:03 pm | स्पा
मस्त लिहिताय डॉक !!!!
21 Dec 2015 - 2:48 pm | असंका
शब्दप्रभू आहात. काय प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात!
अनुभव तर अगदी काटा आणणारा. शब्दश:!!
धन्यवाद!!
21 Dec 2015 - 2:48 pm | असंका
शब्दप्रभू आहात. काय प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात!
अनुभव तर अगदी काटा आणणारा. शब्दश:!!
धन्यवाद!!