===================================================================
पूर्वेच्या समुद्रात (आधिचे दुवे) : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९...
===================================================================
संध्याकाळ झालेली होती एवढ्यात रडारवर काही बोटींचे अस्तित्व जाणवले अशी सार्वजनिक सूचना झाली. यामुळे मी ब्रिज(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते) तेथे गेलो तर कॅप्टन ने सांगितले कि परदेशी मच्छी मार आपल्या हद्दीत मासे मारी करत आहेत. त्यांना ताकीद दिली आहे पण ते ऐकत नाहीत म्हणून आता आपण त्यांच्याकडे जात आहोत. आम्ही तिकडे मोर्चा वळवला.तिथे दोन इंडोनेशियन जहाजे मासेमारी करत होती. जसे त्यांना आमचे जहाज दिसू लागले तेंव्हा त्यांनी पळायला सुरुवात केली. त्यांना बोम्बल्या वर (LOUDSPEAKER) वर ताकीद दिली तरी ते पळू लागले यावर कॅप्टनने बंदूक चालवण्याचे आदेश दिले. यात प्रथम त्यांच्या बोटीच्या पुढे पाण्यात इशारा देण्यासाठी गोळ्या मारतात. त्याला ते बधेनात म्हणून तोफेचे गोळे उडवले. ते आमच्या गनरी अधिकार्याने बोटीच्या जरा जास्तच जवळ डागले. तोफेचा एक गोळा बोटीच्या जेमतेम पाच फुटावर पाण्यात पडला आणी त्यांनी एक मोठा पाण्याचा फवारा हवेत उडवला.( या बद्दल कॅप्टनने त्याला झापले-- गाढवा थोडी चूक झाली असती तर ती बोट पूर्ण बुडाली असती. हे लोक काही दहशतवादी नाहीत. हे साधे मच्छीमार आहेत. त्यांना मारणे हा आपला हेतू नाही). पण या गोळ्याच्या धमाक्यामुळे मात्र त्यांची घाबरगुंडी उडाली आणी ते थांबले. आता आमचे जहाज त्यांच्या जवळ गेले. एक अधिकारी आणी आठ नौसैनिक मशीन गन आणि पिस्तुले घेऊन त्या बोटींवर गेले. त्या दोनही बोटी इंडोनेशिया चा परवाना असलेल्या होत्या आणी त्या भारतीय हद्दीत खोलवर आलेल्या होत्या. येथे निर्विघ्न पणे मासेमारी करता यावी म्हणून. त्या बोटींची तपासणी केली तर त्यात मोठे पेटारे भरून बर्फात ठेवलेले मासे होते.दोन बोटीत मिळून आठ जण होते.
तुम्ही समुद्रावर एखादे जहाज पकडता तेंव्हा त्या जहाजातील सर्वाना अटक करुन तुमच्या जहाजावर आणले जाते. त्यांची बोट तुमच्या जहाजाला दोर खंडाने बांधतात आणी त्यांना ओढत जवळच्या बंदरावर नेऊन पोलीस ठाण्यावर त्या सर्व जणांना सुपूर्द केले जाते.
सर्वात प्रथम आपले सैनिक त्या बोटीवर गेले आणि तेथे त्यांची झडती घेतली कि त्यांच्या जवळ कोणतेही शस्त्र नाही. सहसा कोळी लोकांकडे मासे कापण्याचा धारदार सुरा असतो. मग त्यांना हात मागे बांधून आपल्या जहाजावर आणले जाते. तसे या लोकांना आमच्या जहाजावर आणले. प्रथम त्यांची मी वैद्यकीय तपासणी केली. डोक्यापासून पायापर्यंत पाहून मी तसे प्रमाणपत्र लिहिले. कारण नंतर ते लोक तट रक्षक दलाच्या लोकांनी आम्हाला जबर मारहाण केली इ तक्रार करू शकतात. हे झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यातील एकालाही इंग्रजी येत नव्हती असे त्यांच्या हावभावावरून वाटत होते. आम्ही काहीच केले नाही आणि आम्ही निष्पाप आहोत अस आव मात्र त्यांनी आणला होता. ( नंतर अंदमान पोलिसांनी त्यांना चौदावे रत्न दाखवल्यावर त्यातील दोघांना थोडे फार इंग्रजी येत होते हे समजले). आता त्यांना एका केबिन मध्ये बंद केले गेले. त्यांना आम्ही जे जेवतो तेच जेवण दिले. पण त्यांनी थोडा भात आणि भाजीचा रस्सा तेवढा खाल्ला. हे सर्व होईस्तोवर त्या दोन्ही बोटींची कसून तपासणी करण्यात आली कारण त्यात स्फोटके किंवा मादक द्रव्ये नाहीत याची खात्री करायची होती. त्यांचे दुपारचे जेवण एका बोटीत झाकून ठेवलेले होते. आमचा एक अधिकारी असिस्टंट कमांन्डंट परमार, प्रधान यांत्रिक मोटे आणि दोन सैनिक एका बोटीवर आणि प्रधान यांत्रिक बेहरा आणि इतर तीन नौसैनिक दुसर्या बोटीवर तैनात केले. त्या बोटी आमच्या जहाजाला दोरखंडाने बांधल्या आणि असे आमचे लटांबर हळू हळू पोर्ट ब्लेअर च्या दिशेने निघाले. वेगात गेले तर दोरखंडावर ताण येऊ शकतो आणि मध्येच हळू गेलात तर त्या बोटी तुमच्या जहाजावर आपटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकसारखा वेग पकडून आम्ही निघालो होतो. नाही तरी अपरात्री कुठेही पोचण्यात काहीच हशील नव्हता. तास दोन तास इकडे तिकडे केल्यावर मी झोपलो तेंव्हा साधारण साडे दहा वाजले असावे.
रात्री दोन वाजता माझा वैद्यकीय सहाय्यक मला उठवायला आला आणि म्हणाला सर जनरल रिकॉल( clear lower deck) झाला आहे. म्हणजे अत्यावश्यक कामावरील व्यक्ती सोडून बाकी सर्व जणानी वरच्या डेक वर जमायचे. मी आपला पटकन गणवेश चढवून वर गेलो तर वातावरण तंग होते. मी अधिशासी अधिकार्याला( executive officer-EXO ) विचारले काय झाले? त्याने जे झाले ते थोडक्यात सांगितले ते असे-- या इंडोनेशियन बोटीतील माणसांनी चावटपणा करून बोटीच्या तळाशी असलेला ड्रेन प्लग( बोट कोरड्या गोदीत नेल्यावर त्यातील पाणी काढून टाकण्यासाठी अगदी तळाशी असलेली तोटी) काढून टाकला होता. यामुळे त्या बोटीत हळूहळू पाणी शिरले आणि तो बोट पाण्याच्या खाली गेली आहे. मी वळून पहिले तर त्या बोटीची फक्त डोलकाठी दिसत होती आणि तिच्या मागे दुसरी बोट व्यवस्थित दिसत होती. बोट बुडताना असिस्टंट कमांन्डंट परमारने बिनतारी यंत्रावर बोट बुडत आहे असा संदेश दिला. पण त्यानंतर काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. एवढ्या वेळेत EXO ने त्या बोटीला मोटार लावून जवळ खेचून घेतले होते तर त्याच्या डोलकाठीच्या टोका वर प्रधान यांत्रिक मोटे दोन्ही हात आणी पाय गुंडाळून बसला होता परमार आणी इतर दोन नौसैनिक गायब होते.त्यांची नावे दुर्दैवाने आज मला आठवत नाहीत.
मोटे हा सांगकाम्या होता म्हणून कॅप्टन त्याला नेहमी त्याला बोलत असे. आता कॅप्टन ने त्याला विचारले काय झाले? त्यावर त्याने सांगितले कि बोट बुडायला लागली तर परमार साहेब म्हणाले आपण बर्फाच्या पेटार्यावर बसू तो तरंगत आहे. पण मी पटकन डोलकाठी वर चढलो आणी ते कुठे गेले ते कळले नाही. कॅप्टननी त्याला परत विचारले कि डोलकाठीवर का बसायचे तर तो म्हणाला सर, बोटीला दोरी बांधली होतीच. जर डोलकाठी पण पाण्यात बुडाली असती तर मी दोरीला धरून खेचत जहाजावर आलो असतो .अशा परिस्थितीतही कॅप्टनी त्याची पाठ थोपटली आणी म्हणाले "मोटे दिमाग का मोटा है लेकीन अपना दिमाग लगाके खुद को बचा तो लिया".
मला तेंव्हा पंचतंत्रातील शंभर युक्त्या हि गोष्ट आठवली. एकदा एक कोल्हा एका मांजरीशी गप्पा मारत होता तेवढ्यात शिकारी कुत्र्यांचा आवाज आला. मांजर घाबरली . तिला कोल्हा म्हणाला. घाबरू नकोस मला कुत्र्यांपासून वाचण्याच्या शंभर युक्त्या माहित आहेत. कुत्रे जवळ आले तसे मांजर पटकन झाडावर चढली आणी म्हणाली कि मला हि एकच युक्ती माहित आहे. कोल्हा कोणती युक्ती वापरावी हा विचार करीत असतानाच कुत्र्यानी त्याची लक्तरे उडवली.
आता हि माणसे नक्की कुठे आहेत ते कळण्यास मार्ग नव्हता. म्हणून जहाजावरील सर्व दिवे आणी सर्च लाईट ऑन केले आणी सर्व जण त्या तीन जणांना शोधू लागले. मधून मधून ट्रेसर कार्ट्रिज सुद्धा हवेत सोडत होतो. हे म्हणजे चाळीस फुल्बाज्यांचा उजेड असलेले रॉकेट हवेत सोडल्यासारखे असते याने काही क्षणांपुरता सभोवतालचा परिसर उजळून निघतो.सर्वत्र दिवाळी चालू असल्याचा भास होता पण कोणीही त्याचा आनंद घेण्याच्या मनस्थितीत नव्हता प्रत्येक सैनिक,अधिकारी समुद्रात डोळे फाडून पाहत होता. कानात प्राण आणून काही ऐकू येते आहे का ते पाहत होता.
EXO नि अजून धोका नको म्हणून दुसर्या बोटीला पण खेचून त्याच्यावरील आपल्या नौसैनिकांना जहाजावर घेतले आणी त्या बोटीला तसेच दोराला मागे बांधून ठेवले. आता प्रश्न होता कि अफाट अशा समुद्रात रात्री दोन वाजता आपल्या माणसाना कसे शोधायचे. जसा जसा वेळ जात होता तसा तसा तणाव वाढत होता. प्रत्येक माणूस डोळे फाडून फाडून पाण्याकडे पाहत होता. कॅप्टन (मानसिक आधारासाठी) मला बरोबर राहा म्हणून सांगत होता. एकीकडे मला १९८९ मधील समुद्रावरील पहिला दिवस आठवत होता. समुद्रात हरवलेले मच्छीमार, फार वेळ पाण्यात राहून डीहायड्रेशन ने दगावलेली माणसे आणी त्यांची कडकडलेली हात पाय वाळलेली पार्थिवे माझ्या डोळ्यासमोर आली. डॉक्टर म्हणून कितीही मृत्यू पहिले असले तरीही रोजच्या संपर्कातील आणी रोज ज्याच्या बरोबर जेवत असू असा अधिकारी आणी सैनिक यांच्या बद्दल असे विचार मनात आणणे अत्यंत क्लेशदायक असते.
मी कॅप्टनला सांगितले सर आपण अजून वाट पाहू पण सकाळी चार वाजता कार निकोबारच्या वायुसेनेच्या तळावर संदेश पाठवू म्हणजे पाच वाजता पहिल्या किरणान बरोबर ते हेलिकॉप्टर पाठवू शकतील. कॅप्टनची दोलायमान परिस्थिती मला समजत होती कि हि गोष्ट "बाहेर" पडली तर त्याचे कोर्ट मार्शल होईल मग त्यात त्याची चूक असो वा नसो, पण एकीकडे आपल्या तीन माणसांचा जीव पण पणास लागलेला होता. इंजिने जोरात चालवली तर माणसे खेचली जाण्याची शक्यता होती. समुद्रातील प्रवाहांनी ते कुठे फेकले गेले असतील तर ते कळायला मार्ग नव्हता. अफाट अशा समुद्रात शोधायचे तर कुठे आणी त्यातून वेळ घालवून चालणार नव्हते एक एक क्षण तासा सारखा वाटत होता. विचार शक्ती कुंठीत झाली होती. जे काय करायचे ते चालूच होते.
असा काही वेळ गेला तेंव्हा एक बी एम कुमार नावाचा नौसैनिक म्हणाला सर उजवीकडून शिटीचा आवाज येत आहे. मुळात बी एम कुमार हा माणूस बारा महिने बत्तीस काळ बोट लागते म्हणून आडवा असे. त्यात त्याला कुठे शिटीचा आवाज ऐकू आला म्हणून आम्ही सर्वांनी त्याच्या दाखवलेल्या दिशेला पाहिले तर लांब पाण्यातून शिटीचा अंधुकसा आवाज येत होता. नीट पाहिल्यावर तेथून दोन विजेरया सुद्धा चमकताना दिसल्या. ताबडतोब जहाजाचे सर्व सर्च लाईट त्या दिशेने वळवले तर समुद्रात शेंदरी रंगाचे काही तरी तरंगताना दिसत होते आणी तेथून विजेरीचा झोत आणी शिटीचा आवाज येत होता. जहाजावर जल्लोषच झाल्यासारखा होता. प्रत्येक माणसाला त्या तीन लोकांची आठवण येत होती आणी मन चिंती ते वैरी न चिंती या उक्ती प्रमाणे प्रत्येकाच्या मनात वाईट विचार होते ते सर्व धुवून निघून आता त्याची जागा आनंदाने घेतली होती
कॅप्टनने जहाज अतिशय हळू तेथे न्यायला सांगितले कारण जहाजाच्या प्रोपेलरच्या ओढीने ती माणसे खेचली जाऊ शकली असती. जरा जवळ गेल्यावर जहाजाची इंजिने बंद करण्याचा आदेश दिला आणी जहाज हळू हळू पुढे जात होते तेंव्हा ते तिघे हातात हात घालून, गळ्यात शेंदरी रंगाचे लाईफ जाकीट घालून पाण्यावर तरंगताना दिसले. मधला सैनिक शिटी वाजवत होता आणी बाजूचे दोघे विजेरीचा प्रकाश दाखवत होते. ते जवळ आल्यावर बाजूला शिडी टाकून त्यांना वर खेचले. मी त्यांना बसवले. पाणी दिले प्यायला. कॅप्टनने विचारले तुम्ही पाण्यात कशाला उडी मारली? त्यावर परमार म्हणाला सर मी वायर लेस वर संदेश दिला आणी आम्ही त्या बर्फाच्या पेटार्यावर बसलो. थोड्यावेळाने तो बर्फ वितळला आणी पेटारा समुद्रात बुडाला. परमारला समुद्रात फार वेळ राहण्याने काय होते याचा अंदाजच नव्हता. फक्त २२ वर्षाचा तरुण अननुभवी अधिकारी होता त्यामुळे तो बिनधास्त होता. अज्ञानात आनंद असतो म्हणतात तो हाच. त्यातून तो म्हणाला सर आम्हाला जहाज दिसत होते. तुमचे सर्च लाईट्स दिसत होते. ट्रेसर कार्ट्रिज सुद्धा दिसत होते पण तुम्हाला आम्ही दिसत नव्हतो. म्हणून मग मी वर्क अप मध्ये शिकवले तसे पाळीपाळीने शिटी वाजवत होतो आणी विजेरीचे झोत टाकत होतो. आम्हाला तुम्ही उचलून घ्याल याची खात्री होती.
कॅप्टनने त्याला पंजाबीत शेलक्या शिव्या दिल्या आणी म्हणाला तुम्ही मला हृदय विकाराचा झटका आणणे तेवढे बाकी ठेवले होते.
हे सर्व होईस्तोवर पहाटेचे चार वाजले होते. रात्र भयंकर गेली होती निदान पहाट तरी सुखावह होती. आमची माणसे सुखरूप होती. डोळ्यात झोप तर नव्हतीच. साडे चार ला तांबडे फुटू लागले होते. पहाटेचे उषेचे रंग इतके सुंदर या अगोदर कधीच पाहिलेले नव्हते. आम्ही त्या बोटींना आणी त्यातील माणसाना घेऊन पोर्ट ब्लेअर कडे कूच केले.
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Nov 2015 - 8:36 pm | मोदक
फार वेळ पाण्यात राहून डीहायड्रेशन ने दगावलेली माणसे
म्हणजे त्यांना प्यायला पाणी मिळाले नाही म्हणून ते दगावले असे झाले का?
तसेच.. खूप जास्त वेळ पाण्यात राहिल्याने त्वचा मऊ होते अशा कोणत्याही गोष्टीमुळे जीवावर बेतू शकते का?
19 Nov 2015 - 10:10 am | सुबोध खरे
फार वेळ समुद्राच्या पाण्यात राहिले कि दोन गोष्टी होतात एक तर तुमच्या त्वचेतून समुद्राचे पाणी थोड्या प्रमाणात आत शिरते आणि थोडे फार पाणी गिळले जाते.हे क्षारयुक्त पाणी तुमच्या रक्तातील पाणी शोषून घेते. त्याने तुमच्या रक्तातील क्षारांचे (मिठाचे) प्रमाण वाढते. रक्ताचे ऑस्मोटीक प्रेशर वाढल्यामुळे अजूनच तहान लागते. या तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी प्यायले तर अजूनच क्षारांचे प्रमाण वाढून रक्त जास्त घट्ट होत जाते आणि शेवटी डी हायड्रेशनने मृत्यू येतो. अर्थात हे सर्व २४ तास आणि नंतर होते.
18 Nov 2015 - 8:36 pm | राघवेंद्र
आम्हाला सुध्दा काळजी वाटली. पु. भा. प्र.
18 Nov 2015 - 8:41 pm | रेवती
भयावह प्रसंग होता.
लेखनशैली आवडली.
18 Nov 2015 - 8:53 pm | एस
थरारक!
18 Nov 2015 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी
समुद्रात अजाणतेपणी केलेली लहानशी चुक किती महागात पडू शकते ते जाणवले.
18 Nov 2015 - 9:27 pm | कैलासवासी सोन्याबापु
तिघे ओवरबोर्ड परत ऑन बोर्ड येईस्तोवर श्वास रोखून धरला होता डॉक्टर साहेब! साष्टांग प्रणाम समस्त लोकांस!
18 Nov 2015 - 9:29 pm | मांत्रिक
खत्तरनाक अनुभवविश्व आहे डाॅक तुमचं!!!
सलाम तुम्हाला!!!
18 Nov 2015 - 9:39 pm | बिपिन कार्यकर्ते
बाप रे!
18 Nov 2015 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
थरारक ! अश्या प्रकारच्या प्रसंगातली नेमकी मनोवस्था ते प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणे कठीण आहे.
18 Nov 2015 - 9:48 pm | टुकुल
एकदम थरारक अनुभव
18 Nov 2015 - 10:24 pm | मोनू
अतिशय थरारक प्रसंग ... उत्सुकता वाढवणारे लेखन... पुभाप्र
18 Nov 2015 - 10:39 pm | मुक्त विहारि
पुभाप्र....
18 Nov 2015 - 10:50 pm | टवाळ कार्टा
थरारक :)
18 Nov 2015 - 10:54 pm | आदूबाळ
जबरीही!
18 Nov 2015 - 11:09 pm | माझीही शॅम्पेन
जबरदस्त .. .आता मालिका वेग घेऊ लागलीये .. पटापट पुढचे भाग यउद्या .. दोन भागामधील असमाईक अंतराने अगोदर ही कथा मालिका भरकटलीया का अस (मला) वाटत होत
18 Nov 2015 - 11:14 pm | महेश हतोळकर
एकदम थरारक अनुभव. शेवटपर्यंत खिळवून ठेवलेत.
19 Nov 2015 - 1:45 pm | मदनबाण
बापरे ! थरारक अनुभव...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
19 Nov 2015 - 1:47 pm | मार्गी
ज ब र द स्त. . .
19 Nov 2015 - 2:04 pm | भाऊंचे भाऊ
मला पुढचा जन्म आपल्यासारखा मिळो अन्यथा तो न मिळो तो बेहतर.
बाकी आपण नेहमीच लाइफ सेवर बनत आलात... कधी याच्या उलटे कार्य करायची वेळ आली होती का ?
19 Nov 2015 - 6:25 pm | सुबोध खरे
भाऊसाहेब
या प्रकरणात माझे योगदान एक प्रवासी सोडले तर तसे काहीच नव्हते.
सुदैवाने माझ्या आयुष्यात कुणावर गोळी चालवून प्राण घ्यावा किंवा कुणाला दुखापत करायला लागावी अशी पाळी आली नाही. अन्यथा एका प्रचंड मानसिक द्वंद्वाला सामोरे जायची पाळी आली असती.
कारण कितीही निर्ढावलेला गुन्हेगार असला(स्वतःच्या मतीमंद मुलीवर बलात्कार करणारा) झटपट न्याय तरीही त्याच्यावर उपचार करण्याची पाळी आली असता तो करण्यासाठी मला विचार करावा लागलेला नाही.डॉक्टर म्हणून तुमचे काम तुम्ही शांत मनाने करु शकता.
19 Nov 2015 - 2:12 pm | सत्य धर्म
मस्त
19 Nov 2015 - 2:14 pm | सिरुसेरि
थरारक अनुभव . त्या इंडोनेशियन बोटीतील मच्छीमार लोकांचे पुढे काय झाले ?
20 Nov 2015 - 9:56 am | सुबोध खरे
इंडोनेशियन बोटीतील मच्छीमार लोकांना अंदमान निकोबार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावर त्यांच्या वर रीतसर खटला दाखल होईल. (त्यांच्या वकिलातीला याबद्दल कळवले जाते अन्यथा "समुद्रात बेपत्ता" म्हणून जाहीर होते.) त्यांना ट्रेसपासिंग( बेकायदेशीर प्रवेश) आणी भारतीय हद्दीत बेकायदेशीर मच्छीमारी केल्याबद्दल खटला दाखल होईल आणी त्यानुसार शिक्षा केली जाईल. भारतीय तटरक्षक दल (समुद्र खवळलेला असेल तर आणी हे लोक हद्दीच्या आसपासच असतील तर) सहसा अशा लोकांना पकडण्यापेक्षा हाकलून देण्याचा जास्त प्रयत्न करते कारण हे सर्व सव्यापसव्य करण्यात वेळ आणी पैसा पण जातो. परंतु शांत समुद्र असतानाही आपल्या हद्दीत फारच आत येणारे लोक जास्त करून निर्ढावलेले असतात. अशाना पकडून वर्षभर आत टाकले कि इतर बरेच लोक "चुकून इकडे न येण्याची काळजी घेतात".
शेवटी हि भारतीय जनतेच्या सागरी संपत्तीची चोरीच आहे.
19 Nov 2015 - 2:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
जबरदस्त उत्कंठा लावणारी मालिका!
19 Nov 2015 - 2:30 pm | नाखु
प्रसंगावधान आणि संयम याची ही परीक्षाच जणू !!!
धन्यवाद हा खराखुरा अस्सल रोमांच आमच्यापर्यंंत पोहोचव्ल्याबद्दल
19 Nov 2015 - 6:31 pm | बॅटमॅन
फॅक्ट इज़ स्त्रेंजर दॅन फिक्षन म्हणतात ते कै खोटं नाय !
19 Nov 2015 - 9:16 pm | संदीप चित्रे
ह्या अर्थाची इंग्लिश म्हण आठवली!
तुमची ही लेखमाला भन्नाटच आहे डॉक्टर.
19 Nov 2015 - 9:32 pm | अजया
समुद्राच्या पाण्यात राहण्याचे दुष्परिणाम आजच कळले.अगदी थरारक अनुभव.
20 Nov 2015 - 4:50 pm | जय२७८१
सुबोध खरे सर, तुम्हचे हे १० हि भाग एका दमात वाचून काढले. मुळात लहान पण पासून भारतीय नौसेनेत दाखल होण्याची खूप इच्छा होती.मात्र १०वि ची परीक्षा झाली आणि मी में महिन्याच्या रजेत जांभूळाच्या झाडावरून पडून पाय मोडून घेतला आणि माझ्या नेविता दाखल होण्याच्या इच्छेवर पाणी फिरले. आजातागत नेवी,आर्मी विषयी माझ्या मनात खूप आस्था आहे. मला कुणी हि जवान भेटले कि मी त्यांच्या पाया पडतो. तेव्हडेच काय ते भारतीय नागरिक म्हणून मी करू शकतो. तुमचे अनुभव आणि लिखाणाची शैली खूपच सुरेख.....!
जय हिंद.....!
20 Nov 2015 - 5:30 pm | बोका-ए-आझम
थरारक अनुभव!
21 Nov 2015 - 9:16 am | प्रचेतस
हा भागही खूप आवडला.
26 Nov 2015 - 12:56 pm | अनिरुद्ध.वैद्य
हा भाग थरारक होता. त्यांनी केलेल्या खोडसाळपणासाठी वेगळे कलम लागले की नाही?
26 Nov 2015 - 2:39 pm | आनंदराव
जबरदस्त !
26 Nov 2015 - 3:38 pm | पैसा
भयानक प्रकार!
23 Dec 2015 - 1:11 pm | सुमीत भातखंडे
थरारक अनुभव