नमस्कार
कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल.
इंग्रजीचा दुराग्रह आणि हिंदीला दिलं जाणारं निरर्थक प्राधान्य हे मराठीसाठी धोक्याचं आहे. दुर्दैवाने यात मराठी लोकंच पुढे आहेत. 'माझं मराठी तेवढं स्ट्राँग नाहीये' असं एखादा मराठी जेंव्हा म्हणतो तेंव्हा त्याला काय म्हणावं कळत नाही. असो. बाकी जे म्हणायचंय ते कवितेत आपसुक आलेलं आहे. तेंव्हा, मराठी बोला, आग्रहाने बोला, निदान समोरचा माणूस मराठी आहे हे कळल्यावर तरी बोला, इतकंच म्हणेन.
माझ्या मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
बाह्यरूप सारं शुष्क
आतपुरतीच ओल
माझी मराठी नटते
सणासुदीच्या पुरती
महाराष्ट्रियन्स त्याला
ट्रॅडिशनल म्हणती
माझ्या मराठीची मुलं
इंग्रजीतून शिकती
मराठीच्याच नावाने
मग तोंड वेंगाडती
माझ्या मराठीला होतो
पराकोटीचा हो शोक
जेंव्हा इंग्रजी बोलती
दोन मराठीच लोक
टीशर्टावर लिहिती
मला मराठीचा माज
बोलताना लोकांमध्ये
वाटे मराठीची लाज
माझ्या मराठीला इथे
होते रोज दमदाटी
आम्ही पुसून टाकली
स्वाभिमानाचीच पाटी
माझ्या मराठीच्या नाही
नशिबात राजाश्रय
कामापेक्षाही आम्हाला
आहे महत्वाचे श्रेय
माझ्या मराठीकरिता
नाही चांगली लक्षणं
आपसामधेच आम्ही
मागतोय आरक्षणं
माझ्या मराठीच्या जिभा
आणि मनगटं फोल
माझ्या घरी मला सक्ती
म्हणे हिंदीमधे बोल
मराठीच्या मदतीला
मराठी न येई हात
सारे असंच म्हणती
साला माझं काय जातं
अपमान मराठीने
सहावे तरी कितीक
चित्रपटही मराठी
मागे थेटराची भीक
माझ्या मराठीच्या भाळी
आता हिंदीची टिकली
तिची मुलंही ग्लोबल
तीही इंग्रजी शिकली
माझी मराठी कण्हते
आत काळजात खोल
जिथे पिटतोय आम्ही
हिंदी इंग्रजीचे ढोल
होतं इतकं तरीही
येई कपाळी न आठी
आता उरलोय आम्ही
नावापुरते मराठी
आता उरलोय आम्ही
नावापुरते मराठी
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
2 Nov 2015 - 3:03 pm | विशाल कुलकर्णी
ज्जे ब्बात !
2 Nov 2015 - 3:57 pm | पद्मावति
मस्तं.
2 Nov 2015 - 6:06 pm | जेपी
मुळ कविता माहित नाही.
वरील कविता वाचल्यावर एक प्रश्न पडला?.
-कंच्या जगात राहता भाऊ?
नै मंजे मराठी संस्थळावर कैच्याकै काव्य..चलु द्या.
3 Nov 2015 - 6:33 am | वेल्लाभट
का बरं?
2 Nov 2015 - 6:29 pm | अभ्या..
वेल्लाभट नाराज नका होऊ पण मी तुमचेच थॉडेफार प्रतिसाद इथे चिकटवण्याच्या/चिटकवण्याच्या विचारात होतो. ;)
कसेही असो, असा विचार करणार असाल मराठीचा तर स्वागतच आहे.
3 Nov 2015 - 4:18 am | वेल्लाभट
खुशाल!
2 Nov 2015 - 6:53 pm | मारवा
कवितेमागचा विचार भावना आवडली.
मराठीप्रेमी मारवा
2 Nov 2015 - 7:08 pm | दिवाकर कुलकर्णी
बहोत बढिया
सो नाइस अैंड टचिंग
याला मराठीत काय म्हणायचं बरं ,जाउदे
तुमचं तुमी समजून घ्या
2 Nov 2015 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
3 Nov 2015 - 2:28 pm | वेल्लाभट
कौतुकाबद्दल सर्वांचे आभार !
3 Nov 2015 - 5:43 pm | शिव कन्या
सगळं बरोबर.
4 Nov 2015 - 12:46 pm | वेल्लाभट
धन्यवाद :)
4 Nov 2015 - 2:36 pm | पैसा
छान लिहिलीय!